Home Blog Page 2861

पूरग्रस्त नावाच्या आपत्तीला कॉंग्रेसही जबाबदार -चंद्रकांतदादांनी सांगितली कारणे (व्हिडीओ)

0

पुणे-पुण्यासह,कोल्हापूर,सांगली येथील पूर आणि पूरग्रस्त आपत्तीबाबतच्या कारणांबाबत पत्रकारांनी छेडले असता ,पूरग्रस्त नावाच्या आपत्तीला कॉंग्रेस जबाबदार असल्याचे एक कारण देखील असल्याचे आज पुणे महापालिकेत आल्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे सांगितले .

चंद्रकांत पाटील हे पुणे महापालिकेच्या आढावा बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची पूररेषा बदलली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. याच प्रश्नाला उत्तर देत असताना चंद्रकांत पाटील यांनी ही पूररेषा आघाडीच्या काळातच बदलली गेली असल्याचं म्हटलं आहे. पुणे अलमट्टी धरणाची उंची केंद्रात आणि राज्यात आघाडीचे सरकार असताना वाढवण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी आलेला पूर हे नैसर्गिक संकट आहे मात्र या पुराला आघाडी सरकारही जबाबदार आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मागील काही वर्षांचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कोयना, अलमट्टी धरणातून राज्यातील मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाकडे पाणी कसे वळवता येईल या दृष्टीने सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या पुराला आघाडी सरकार जबाबदार आहे. पंचगंगा नदीची पूररेषा बांधकाम व्यावसायिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलली नाही तर आघाडीच्या काळातच ती बदलण्यात आली असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. २००५ मध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला होता. त्यावेळी पूररेषा आखण्यात आली होती. मात्र त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंचगंगा नदीची पूररेषा बदलली असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूररेषा बदलल्याचा आरोप झाला. मात्र या आरोपात काहीही तथ्य नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.त्यांनी काय नेमके म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका ……

विरोधी पक्षाच्या नेत्यांसह राहुल गांधी करणार काश्मीर दौरा

0

नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधी पक्षाच्या नऊ नेत्यांसह शनिवारी काश्मीरचा दौरा करणार आहेत अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात राहुल गांधी जम्मू काश्मीर आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी आणि आरजेडीचे नेते मनोज झा असणार आहेत.

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरच्या स्थितीबाबत जेव्हा भाष्य केलं तेव्हा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांना काश्मीर भेटीचे निमंत्रण दिले होते. राज्यातली परिस्थिती काय आहे ते समजून घेण्यासाठी काश्मीरला या असा सल्लाच मलिक यांनी राहुल गांधींना दिला होता. यानंतर आता शनिवारी राहुल गांधी जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळच जाणार आहे. श्रीनगरमध्ये जाऊन राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष नेते तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील. केंद्र सरकारने काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर त्यावर काँग्रेसने बरीच टीका केली होती. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही सरकारचा समाचार घेतला होता. आता सगळ्या आरोपानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी काश्मीरचा दौरा करणार आहेत. काश्मीरमध्ये जाऊन ते तिथल्या  जनतेशी संवादसाधू शकतील किंवा नाही हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे.

रंगणार रोमांचकारी अश्वशर्यती

0

आरडब्लूआयटीसी क्लबवर द एफ.डी.वाडिया ट्रॉफी आणि द पंचशील मिलियनचे आयोजन

पुणे, 23 ऑगस्ट 2019 : येत्या शनिवारी, 24 ऑगस्ट व रविवार 25 ऑगस्ट रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) यांच्या तर्फे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मौसमातील दोन अत्यंत रोमांचकारी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून  द एफ.डी.वाडिया ट्रॉफी आणि  द पंचशील मिलियन  या दर्जेदार शर्यतींमध्ये एकाहून एक सरस अश्वामधील चुरस अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

यातील शनिवारी होणार्‍या पहिल्या रंगतदार शर्यतीत  द एफ.डी.वाडिया ट्रॉफी  जिंकण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या अश्वांमधील झुंज पाहता येणार आहे. ही शर्यत शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून ही प्रतिष्ठेची शर्यत सर्वप्रथम द पूना सिटी कप या नावाने ओळखली जात होती आणि त्यानंतर या रेसला 1976 रोजी फली वाडिया यांनी घोड्यांच्या शर्यतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल या रेसला द एफ.डी.वाडिया ट्रॉफी असे नाव देण्यात आले. या शर्यतीत अत्यंत उच्च कामगिरीचा इतिहास असणार्‍या 3 वर्षे वयाच्या अश्वाचा सहभाग असून 1400 मीटर अंतराची ही रेस असणार आहे.

रविवारी होणार्‍या द पंचशील मिलियन या दुसर्‍या शर्यतीतही दर्जेदार अश्व आणि उत्तम जॉकी यात झुंज रंगणार आहे. पंचशील रिअलिटी यांचे प्रायोजकत्व लाभलेली ही शर्यत रविवार  25 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे. 1200 मीटर अंतराची ही रेस असणार आहे.

कथक आणि शास्त्रीय रचनांमधून उलगडली श्रीकृष्णाची रूपे !

0
पुणे ः

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘  श्यामरंग  ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  .   कृष्णाच्या विविध रुपांवर आधारित कथक नृत्य आणि शास्त्रीय गायनाच्या रचनांचे सादरीकरण   या कार्यक्रमात केले गेले 

 .’नृत्यवेध ‘  प्रस्तुत हा कार्यक्रम शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ वेळेत   ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे झाला . ‘
या कार्यक्रमात  डॉ माधुरी आपटे आणि त्यांच्या शिष्यानी श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे कथक द्वारे सादरीकरण केले  .किशोरी जानोरकर यानी शास्त्रीय रचना सादर केल्या.
. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८३ वा विनामूल्य कार्यक्रम  होता. भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनीस्वागत केले .
सुरवातीला किशोरी जानोरकर यांनी गायन करताना  प्रारंभी राग ‘ बिहाग ‘ सादर केला. त्यातून  कृष्णलीलांचे वर्णन सर्वांसमोर आणले.
संत तुकारामांचा ‘ पद्मनाभा, नारायणा ‘ हा अभंग ही त्यांनी शैलीदार पध्दतीने सादर केला.     कथक नृत्यातील ताल प्रस्तुतीवर श्रीकृष्ण भक्तीचा प्रभाव आहे, तो या कार्यक्रमात सादर झालेल्या  रास तालातूनही दिसला. ‘ नृत्यवेध ‘ संस्थेच्या विद्यार्थिनींनी कळशी नृत्यातून कृष्ण जन्म सोहळा साकार केला. त्याला रसिकांनी भरभरुन दाद दिली. .मल्हार रागावर आधारित नृत्यही विद्यार्थिनींनी सादर केले आणि कालियामर्दनाचा प्रसंगही जिवंत केला .भैरवीने सांगता झाली.

महसूल विभागाकडून नागरीकांना सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

u
पुणे दि.23:- राज्यामध्ये महसूल वाढीचे प्रयत्न करताना नागरीकांना सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नोंदणी व मुद्रांक विभाग व पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने “लोकसेवेतील पुढील पाऊल” आय- सरीता प्रणाली व भाडेकरु माहिती प्रणालीची जोडणी या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जमाबंदी आयुक्त् एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, अपर जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, नोंदणी उप महानिरीक्षक सोनप्पा यमगर, सह नोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे शहरामध्ये विविध कारणांनी स्थायिक होण्याकरीता नागरीक येत आहेत. अशावेळी ते भाडयाने घरे घेत असतात. यावेळी नोंदणी कार्यालयाकडे तसेच पोलीस विभागाकडे नोंदणी करावी लागते. त्यामुळेच त्यांचा त्रास कमी होण्याकरीता या संगणकीय प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. राज्याला महसूल मिळवून देणारे जीएसटी, उत्पादनशुल्क तसेच महसूल हे प्रमुख विभाग आहेत. सध्या राज्याला नोंदणी व मुद्रांक विभागाकडून चांगला महसूल तसेच नागरीकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत आहे. महसूल वाढीचे प्रयत्न करताना नागरीकांना सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी प्रास्ताविक करताना भाडे नियंत्रण कायदा ( महाराष्ट्र रेन्ट कंट्रोल ॲक्ट) नुसार लिव्ह ॲण्ड लायसन्स करारनाम्यांची दुय्यम निबंधकाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सीआरपीसी कलम 144 मधील तरतुदींनुसार घरमालकाने भाडेकरु ठेवताना सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यामध्ये सादर करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अशा व्यवहारांची माहिती दोन विभागांना स्वतंत्रपणे द्यावी लागत होती. परंतु आता या संगणक प्रणालीमुळे दस्त नोंदणी करतानाच पोलीस विभागास ती माहिती घेण्याची सुविधा उपलबध करुन देण्यात आली असल्यामुळे नागरीकांचा वेळ, श्रम व खर्च कमी होणार असल्याचे तसेच सध्या पुणे जिल्हयाकरीता प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी महाराष्ट्र राज्यातील महसूली नोंदणीची पार्श्वभूमी सांगितली. यापूर्वी 3 हजार गावठाणांचा सर्व्हे करण्यात आलेला असून उर्वरित गावांचा सर्व्हे ड्रोनच्या सहाय्याने विहीत वेळेत करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे विभागातील प्रशासनाच्या सर्वच विभागांमध्ये समन्वय असल्याने तात्काळ निर्णय घेणे सोईचे ठरत असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त् के.व्यंकटेशम यांनीही पोलीस विभागामार्फत नागरीकांच्या सोईच्या वेगवेगळया उपक्रमांविषयीची माहिती दिली.
यावेळी उपस्थितांना नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत लोकाभिमुख उपक्रम, संकल्पिात लोकाभिमुख उपक्रम, महसूल वृध्दीचा आलेख, महसूल वाढीसाठी पुढील उपाययोजना इ.बाबतची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे देण्यात आली.
0 0 0 0

प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच सुरु होणार –विनोद तावडे

0

मुंबई- प्रायोगिक रंगभूमी होणे ही महाऱाष्ट्राची सांस्कृतिक आवश्यकता आहे, गेली सुमारे १० वर्षे लालफितीमध्ये रखडलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाच्या कामाचा आज शुभारंभ आज झाला असून सर्व नियम व कायद्याचे पालन करुनच येत्या सहा महिन्यात रंगमंचाचे काम पूर्ण होईल आणि येत्या जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगमंच सुरु होईल. राज्य शासन प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, महाराष्ट्रातील नाट्यचळवळ अधिक जोमाने पुढे नेता येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज ठामपणे सांगितले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावरील जागेत प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुणकाका काकडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील नामंवत मंडळी उपस्थित होती.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांनी सांगितले की, एखादा प्रकल्प लालफीतीमध्ये अडकतो म्हणजे काय याचे हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. २००९ पासून ही जागा अशीच पडून होती. याजागेत प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाची निर्मितीमध्ये अनेक अडथळे येत होते. परंतु गेल्या सुमारे दीड–दोन वर्षात हा प्रकल्प उभारणीचे उद्दीष्ट्य आखण्यात आले. या फाईल वर असलेले अनेक प्रशासकीय तांत्रिक अडथळे दूर करीत व नियम व कायद्याचे पालन करुन प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्यात आला. गेली सुमारे १० वर्षे लालफितीत अडकलेला हा प्रकल्प मंजूर करताना अतिशय पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत या रंगमंचाबाबत माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरु ठेवणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य मिळावे, चांगले कलाकार घडावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, येथील आसनव्यवस्था रंगमंचाला पूरक अशी करण्यात येणार आहे.

वर्षभरात प्रायोगिक नाट्यसाठी २०० प्रयोग ठेवण्यात येतील. अतिशय नाममात्र दरामध्ये नाट्यसंस्थेला प्रायोगिक रंगभूमी उपलब्ध करुन देण्यात येईल. यामध्ये रंगकर्मींना सर्व पायाभूत सोयी-सुविधा देण्यात येतील. व्यावसायिक नाट्यक्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना प्रायोगिक रंगभूमी हा नाटकाचा पाया असतो. त्यामुळे या माध्यमातून प्रायोगिक नाट्यभूमीचा पाया भक्कम होईल. तसेच आजच्या युवा कलाकारांना या नवीन व्यासपीठाच्या मार्फत आपली कला सादर करण्याची अधिक चांगली संधी मिळेल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

राज्य शासन व महापालिकांमार्फत नाट्यगृहांची उभारणी करण्यात येते. त्यानंतर या नाट्यगृहांमध्ये चालणा-या नाट्यप्रयोगाच्या भाड्यामधून नाट्यगृहांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल, अशी सर्वसाधारण व्यवस्था आहे, पण नाट्यगृहच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य शासन व पालिका यांच्या व्यवस्थेतून पुरेशी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन व पालिकांच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.

*प्रायोगिक रंगभूचीच्या प्रस्तावित रंगमच असा असेल…*
१. ३९१ दर्जेदार आसने
२. ‍डिजीटल सिनेमा प्रोजेक्टर
३. आधुनिक तंत्रज्ञानाची युक्त प्रकाशव्यवस्था व ध्वनी व्यवस्था
४. दर्जेदार ध्वनी शोषक (अकौस्टिक्स) प्रणाली
५. सुसज्ज मेकअप रुम
६. डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरसाठी स्वतंत्र कक्ष
७. सेंटरलाईज्ड वातानुकुलन
८. भव्य स्टेज
९. भव्य स्क्रिन व आधुनिक स्टेज ड्रेपरी
१०.पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय
११. २ उद्वाहने
१२. अग्नीशमन यंत्रणा.
———————————

पीएमडीटीए-केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत 150हून अधिक खेळाडू सहभागी

0

पुणे, 23 ऑगस्ट 2019: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत 150हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.  ही स्पर्धा 24 ते 27 ऑगस्ट 2019 या कालावधीत फ्युचर प्रो टेनिस अकादमी, येरवडा येथील टेनिस कोर्टवर पार पडणार आहे.

ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धेच्या संचालिका राधिका कानिटकर-तुळपुळे यांनी दिली.

पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्टॅन्ड- अप कॉमेडी स्पर्धा

0

पुणे दि. 23:- पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमांतर्गत स्टॅन्ड-अप कॉमेडी स्पर्धाचे आयोजन राज्यात करण्यात आले.

मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील सर्व  जिल्ह्यात 16 जुलै ते 21 ऑगस्ट 2019, या कालावधीत स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर पात्र ठरलेल्या निवडक विजेत्यांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. या 36 जिल्ह्यातून विजेता व उपविजेता ठरलेल्या निवडक स्पर्धकांचा महाअंतिम सोहळा 25 ऑगस्ट 2019 रोजी सायं. 6.00 वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला जाणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

आर्थिक मंदीवर सरकार योग्य ती पाऊले उचलेल- केंद्रीय मंत्री अरविंद सावंत

0

पुणे, दि.२३ ऑगस्ट: “ आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे. ”असे विचार केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक मंत्री अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
इंडस्ट्री अ‍ॅकॅडमीया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित एक दिवसीय “इंडकॉन” (इंडस्ट्री अ‍ॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह)  परिषदेचे उद्घाटन केंद्रीय  मंत्री अरिवंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती व न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, प्र कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, युनिव्हर्सल बिझनेस अँड कॉर्पोरेट सर्व्हीस सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ शहा, स्टारकिंग स्पोर्टस प्रा.लि. एमडी आणि सीईओ प्रविण पाटील आणि विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर हे उपस्थित होते.
अरविंद सावंत म्हणाले,“ स्मार्ट सिटीसाठी पाणी,वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच सर्वांनी ही जवाबदारी उचलणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून असे कार्य केल्यास अशा शहरांचा विकास होईल.”
“कोणताही देश हा तंत्रज्ञानाच्या विकासाने प्रगती करतो. अशा वेळेस आपल्या देशात लिबरलाइजेशन, प्रायवेटेशन आणि ग्लोबलाइजेशन गरजेचे आहे. परंतू त्यासाठी मानवाला कौशल्याची जोड असणे अत्यंत महत्वाचे आहे. ती गरज फक्त शैक्षणिक संस्थापूर्ण करू शकतात. औद्योगिक क्षेत्रात रोबोटायजेशन आल्याने प्रत्येक कार्य रोबोटच्या मार्फत केल्या जात आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे येणार्‍या काही वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर देशात होईल परंतू त्याही पुढील २० ते २५ वर्षात हायड्रोजनवर वाहने चालतील. त्यामुळे असे म्हणू शकतो की कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधन आहे. प्रगती साधतांना बेरोजगारी येईल हा प्रश्‍न उद्भवतच नाही. बदलत्या तंत्रज्ञानाने प्रमाणे उद्योगधंद्यानी बदलणे गरजेचे आहे. आज इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठी भरारी घेतली आहे.”
प्रगतीबरोबर येथे बँकीक क्षेत्रात डाटा हॅकींगचे प्रमाण ही वाढतच चालले आहे. त्याला काय समजावे हा एक प्रश्‍न देशासमोर उभा राहतो.”
शैलेश हरीभक्ती म्हणाले,“कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता असते. अशावेळेस सरकारने जनतेच्या हितासाठी वेगवेगळया व चांगली कंपनी पॉलिसी राबवावी. भविष्यात न्यूक्लियर पॉवर व एनर्जीसारख्या क्षेत्रात संधी आहेत. त्यामुळे कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी काळाची पाऊले ओळखून त्यानुसार संशोधन करावे.”
राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ भारतात ४ हजार इंजीनियरिंग कॉलेज आहे. त्यामुळे भारत सरकार ने पुढाकार घेऊन संशोधनावर अधिक भर दयावा. पॉवर आणि स्वातंत्रतेचा अधिकार शिक्षण क्षेत्रातील कार्यरत लोकांना देण्याची गरज आहे. या देशात ज्या पद्धतीने टीस आणि पिलाई सारख्या शैक्षणिक संस्था चमकल्या आहेत, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात फंडिग मिळाले आहे.”
“ वर्तमान काळात शिक्षण क्षेत्रातील डीएनएची पडताळणी करणे गरजेचे आहे. पुणे येथे जवळपास ५ लाख विद्यार्थी आहेत. परंतू कंपन्यांमध्ये इंटरशिप देण्यास कासाकूस होते. आता ही संस्कृती बदलण्याची गरज आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्राने पुढील दिशा ठरविण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण भूमिका असेल.”
नानीक रूपानी म्हणाले,“ टेलिकम्यूनिकेशन आणि व्हिडियो कॉन्फरन्सी क्षेत्रात आमची कंपनी पायोनियर आहे. वर्तमानकाळात प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडत आहे. एकीकडे रशिया एवढी प्रगत झाली आहे, की त्यांनी रोबोटच्या हातात बंदूका दिल्या आहेत. भविष्यात आर्टीफिशिल इंटेलिजन्सी हे क्रांतीकारी पाऊल आहे.”
प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक केली. तसेच या परिषदेचा उद्देश व भविष्यातील फायदे या संदर्भात माहिती दिली.
परिषदे दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या दरम्यान सामजस्य करार झाला.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भारतातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी गोदरेज लॉक्सच्या ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचा प्रारंभ

0

मुंबई: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त (२१ ऑगस्ट) गोदरेज लॉक्स या भारतातील लॉकिंग उत्पादने व सुविधांच्या सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅंडने ‘सुरक्षा चर्चा’ हा अभिनव मंच सुरु केला.  देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना घराच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे हा या मंचाचा उद्देश आहे. देशातील नागरिकांना घराच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी गोदरेज लॉक्सने चालविलेल्या ‘हर घर सुरक्षित’ या भारतातील सर्वात मोठ्या जनजागृती अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचे आयोजन दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, चंदिगढ, कोलकाता आणि बंगलोर या शहरांमध्ये केले जाणार असून त्याद्वारे देशभरातील १००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत घराच्या सुरक्षिततेबद्दलची उपयुक्त माहिती पोहोचवली जाईल.जगात सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आपले घर असे जरी प्रत्येक कुटुंबात मानले जात असले तरी वास्तव हे आहे की ६४% भारतीय हे घराच्या सुरक्षेला असलेल्या चोरी, दरोडे यासारख्या धोक्यांना रोखण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत.  प्रत्येक क्षणी घराची देखरेख करणे शक्य नसते, याचाच फायदा दरोडेखोर आणि चोरांना मिळतो.  कितीतरी घरांमध्ये वयस्क व्यक्ती असतात, ज्यांना बऱ्याचदा एकटे ठेवावे लागते किंवा केअरटेकर किंवा घरातील नोकरांच्या भरवशावर ठेवले जाते.  नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) २०१७ सालच्या अहवालानुसार २०१६ साली ज्येष्ठ नागरिकांसोबत घडलेल्या तब्बल २१,४१० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली त्यापैकी १०२४ प्रकरणे फक्त दरोड्यांची होती.  यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, घराच्या चार भिंतींच्या आत देखील ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत आणि त्यांना याबाबत जागरूक करणे अत्यंत गरजेचे आहे.

२०१८ मध्ये १५ नोव्हेंबर रोजी घर सुरक्षा दिनाचे औचित्य साधून गोदरेज लॉक्सने ‘हर घर सुरक्षित’ हे राष्ट्रव्यापी अभियान सुरु केले.  भारतातील प्रत्येक घर सुरक्षित असावे हा या अभियानाचा उद्देश आहे.  फक्त घराच्या बाहेरच नव्हे तर घराच्या चार भिंतींच्या आत देखील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला किती धोका आहे हे ओळखून गोदरेज लॉक्सने ‘सुरक्षा चर्चा’ या मंचाची संकल्पना तयार  केली. भारतातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहयोगाने हा मंच चालविला जाणार आहे.  गोदरेज लॉक्सचे सुरक्षा तज्ञ एका दोन दिवसीय कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या समजून घेतील, त्यांच्या सुरक्षाविषयक गरजा नेमक्या काय आहेत ते जाणून घेतील व ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच स्वतःच्या, घराच्या आणि समाजाच्या सुरक्षेची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती देतील.

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सुरक्षा चर्चा’ मंचाबद्दल बोलताना गोदरेज लॉक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझनेस हेड श्री. श्याम मोटवानी यांनी सांगितले, विश्वास आणि सुरक्षा यांचे दुसरे नाव म्हणून ओळखला जाणारा ब्रँड या नात्याने आम्ही देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षाविषयक गरजा जाणतो.  घरी असो किंवा बाहेरज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षेबाबत स्वावलंबी व्हावे यासाठी आम्ही सुरक्षा चर्चा‘ या मंचाची संकल्पना तयार केली.  त्याचप्रमाणे आम्हाला असेही वाटते कीप्रत्येक कुटुंबाने अशा सुरक्षा प्रणालींचा वापर करावा ज्यामुळे ज्येष्ठांच्या मनात सुरक्षेची भावना दृढ होईल.  आम्हाला पूर्ण खात्री आहे की या मंचामुळे १००० पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिक त्यांच्या स्वतःच्या व घराच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम होतील.”

मुंबईमध्ये समन्वय या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेसोबत ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचे उदघाटनपर सत्र गोदरेज लॉक्सने आयोजित केले होते.  ७० पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरीक यावेळी उपस्थित होते.  मुंबईमध्ये समन्वय या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेसोबत ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचे उदघाटनपर सत्र गोदरेज लॉक्सने आयोजित केले होते.  ७० पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरीक यावेळी उपस्थित होते.  गोदरेज लॉक्सच्या तज्ञांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी घराच्या सुरक्षिततेसंदर्भातील एक मोड्यूल दाखवले.  उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी घर सुरक्षा उपाययोजनांचा वापर करण्याबाबत दाखवलेला उत्साह खूपच प्रेरणादायी होता.  पहिल्या ‘सुरक्षा चर्चा’ मंचासाठी हेल्पएज इंडियाचे संचालक श्री. प्रकाश बोरगावकर उपस्थित होते.  ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा व सुरक्षितता या विषयावर भाषण देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हेल्पएज इंडिया या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे संचालक श्री. प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले, भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे.  तरुणांना मोठ्या पगाराच्या आणि खूप जास्त वेळेची मागणी करणाऱ्या नोकऱ्या मिळत आहेतत्यामुळे कुटुंबे संकुचित होत चालली आहेतज्येष्ठ नागरिकांना फारशी कोणाची सोबत मिळत नाही.  असे एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक हे चोरगुन्हेगारांच्या तावडीत सहज सापडतात.  म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना अडीअडचणींचीआव्हानांची माहिती असायला हवीप्रत्येक अडचणींचा सामना कसा करायचा याची माहिती त्यांना असायला हवी.  गोदरेज लॉक्सने हा उपक्रम सुरु केला याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटते.  यामुळे हे जगहा समाज ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकाधिक सुरक्षित बनण्यात मोठे मोठे योगदान दिले जाईल.”   

स्टॉल कि बाल्कनी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

 

कुठलं तिकीट देऊ, स्टॉल की बाल्कनी  – तिकीट खिडकीवरील क्लार्कने विचारले. ‘स्टॉलचं द्या, शक्यतो पुढचं असेल तर बघा जरा.’…तिकीट घेऊन मी निघाले. स्टॉल की बाल्कनी हा नेहमीचाच तिकीट बुक करताना विचारला जाणारा सरळ साधा प्रश्न…

नाटक बघावं स्टॉलमधून आणि सिनेमा बघावा बाल्कनीमधून ही सर्वसामान्य मानसिकता. स्टॉलचं तिकीटही बऱ्यापैकी महाग अन बाल्कनीचं त्या मानाने स्वस्त. नाटकाची जाहिरात आली की पेपरमध्ये स्टॉलची तिकीटं पटापट बुक होतात मग उशिरा गेल्यानं नाईलाजाने बाल्कनीचे तिकीट घ्यावे लागते.

अशाच एका नाटकाच्या वेळेचा अनुभव. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ कधीही बुकिंगला गेलं की स्टॉल फुल्ल. तिकीट खिडकीवर विचारलं तर म्हणाले, ‘काय करणार मॅडम, नाटक चांगलं असलं की लगेच बुक होतं बघा.’  समोर चार्ट ठेवला की तिकीट काढणारे हि किती चोखंदळपणे बघतात. अगदी कोपऱ्यातली नको…मग साईडचं नीट दिसत नाही….या मधल्या रोची साईड द्या म्हणजे कसं मध्यन्तराला लगेच बाहेर जायला मिळतं – ही बऱ्याचशा महिला वर्गाची मागणी. लहान मुलांना घेऊन येणारेही साईडच्या तिकीटाची मागणी करतात, कारण मूल रडायला लागलं की पटकन उचलून बाहेर घेऊन जायला बरं. पुढे कुणी उंच व्यक्ती आली की साईडचं तिकीट असलं की बरं म्हणजे थोडं तिरकं होऊन वाकूनही बघता यावं. पहिल्या रांगेतून काही वेळा जरा मान उंच करूनच बघावं लागतं. असे एकेक नमुने तिकीट बुक करण्याचे.

बाल्कनीमध्ये सुद्धा तीच तऱ्हा. पहिल्या दोन रांगेचं तिकीट नको कारण बाल्कनीचा कठडा मध्ये येतो ना, मग नाटक किंवा सिनेमा काय नीट दिसत नाही.

नाटक स्टॉलमधून बघण्यात मजा असली तरी ऑर्केस्ट्रा मात्र बाल्कनीमधून बघण्यात खरी मजा. स्टॉलमधला प्रेक्षक तसा सोफीस्टीकेटेड आणि बाल्कनीमधला शिट्या मारणारा आणि ‘वन्स मोअर’च्या नावाने जोरजोरात ओरडणारा…एकंदरीत धमाल करून फुल्ल टू पैसा वसूल करणारं पब्लिक. काही उत्साही प्रेक्षक मध्यंतरात बाल्कनीत उभे राहून स्टॉलमध्ये कोणी ओळखीचं आहे का ते बघत असतात, अशावेळी कोणी ओळखीचं दिसलं की त्याला कॉल करून सांगतात – अरे, वर बघ…मी हात हलवतोय. तू पण आलास या नाटकाला, आम्हाला नाही सांगितलं… इति बाल्कनी ते स्टॉल असाही संवाद! ही सगळी मजा खऱ्या अर्थाने अनुभवली ती जेव्हा फक्त दूरदर्शनवर शनिवार आणि रविवार हे दोन दिवसच सिनेमा लागायचे. त्यावेळी चित्रपटगृह आणि नाट्यगृहाचा चालता काळ होता. शनिवार आणि रविवारची सिनेमाची तिकिटे आयत्या वेळी जाऊन मिळणे शक्यच नसायचे. मग त्यावेळी तिकीटे ब्लॅकने घ्यावी लागायची. सिनेमा थिएटरच्या बाहेर बस स्टॉपच्या जवळ किंवा पानबिडीच्या दुकानाजवळ ब्लॅकने तिकीट विकणारे उभे असायचे आणि दबक्या आवाजात विचारायचे -स्टॉल की बाल्कनी? मग त्याप्रमाणे त्या तिकीटाचा दुप्पट भाव सांगायचे. हळूच पॅन्टच्या खिशातून तिकीट काढून द्यायचे कारण पोलीस पकडतील ही भीती.

सिनेमाला बाल्कनीच्या ब्लॅकचा रेट जास्तच असायचा कारण सिनेमा हा बाल्कनीतून बघण्यात खरी मजा. या ब्लॅकवाल्यांनी सर्वांत जास्त धंदा केला तो शोलेच्या वेळी. १५ ऑगस्ट १९७५ साली रिलीज झालेल्या या सिनेमाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. तिकिटांचा ब्लॅकचा धंदा करणारे तर मालामाल झालेत. बाल्कनीची अजून एक मजा अशी ही, दादरच्या कोहिनूर थिएटरची  (आता त्या ठिकाणी नक्षत्र मॉल आहे) खूप जुने थिएटर ते. त्याच्या बाल्कनीत मांजर तर हमखास असायची आणि साईडची तिकीटं मिळाली तर झुरळांचा त्रास. मग सीटवर मांडी घालून बसावे लागे आणि एकसारखं आजूबाजूला लक्षही ठेवावे लागे. असो…बाल्कनीच्या कॉर्नरच्या सीट या खास प्रेमी युगलांसाठी असायच्या.

बहुदा थिएटरमध्ये स्टॉल आणि बाल्कनी असे दोनच प्रकार होते; तर नवीन बांधलेल्या थिएटरना सांगायचंच झालं तर सत्यम, सचिनम आणि सुंदरम या थिएटरपैकी एका थिएटरला स्टॉल, बाल्कनी आणि ड्रेस सर्कलही होते. त्या ड्रेस सर्कलचं तिकीट मिळणं आणि तिथे बसून सिनेमा बघणं जाम भारी वाटायचं. त्या वेळी स्टॉल आणि बाल्कनी अशा दोन वेगळ्या तिकीट खिडक्या असायच्या. काही सिनेमा प्रेमींना दोन्ही खिडक्यांवर नंबर  लावायची सवय होती…बाल्कनीची नाहीच मिळाली तर स्टॉलची तरी मिळेल; पण रिकाम्या हाती घरी परत जायचे नाही. हल्ली सिनेमा बघण्यासाठी बरेच ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत, ऑनलाईन तिकीटही मिळतं. नाटक, सांगीतिक कार्यक्रम आणि ऑर्केस्ट्रा आजही नाट्यगृहातच जाऊन बघण्यात खरी मजा आहे. तिकीट खिडकीवर विचारला जाणारा प्रश्न त्यावेळी ही हाच होता आणि आताही तोच आहे – कुठली देऊ स्टॉल की बाल्कनी…

 

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

व्यापाऱ्यांनी दूत बनावं महापालिका व पोलीस प्रशासनाची अपेक्षा

0
पुणे : व्यापारी हा सर्वसामान्य जनतेच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे महापालिकेतर्फे सुरु असलेल्या स्वच्छता मोहिम व अन्य योजनांच्या अंमलबजावणीत आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या गुन्ह्यांच्या तपासणीत दूत म्हणून भूमिका बजावावी, अशी अपेक्षा महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे आज कर्वेनगर येथील प्रतिज्ञा सभागृहात व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, महापालिका उपायुक्त माधव जगताप, घाडगे, आरोग्य निरीक्षक सुहास पांढरे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, मांगिलाल चौधरी, नेणाराम चौधरी, सोमाराम राठोड, रामभाऊ दोडके, अजित चंगेडिया, सुनील गेहलोत, उमेश यादव, भंवर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यावेळी बोलताना म्हणाल्या की, व्यापारी संघातर्फे आयोजित या कार्यक्रमामुळे व्यापाऱ्यांपर्यंत पोलिसांकडून सुरू असलेले उपक्रम पोहोचवित आले. आणि व्यापारी हा सर्वसामान्य जनतेच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे पोलिसांना ते अधिक चांगले आहे. व्यापाऱ्यांचेही प्रश्न पोलीस सोडवतील व त्यांना सहकार्य करतील.
पुणे महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यामध्ये व्यापारी महत्वाची भूमिका बजावू शकतो. व्यापाऱ्यांनी या मोहिमेचा दूत बनून काम करण्याची आवश्यकता आहे, असे उपायुक्त माधव जगताप, घाडगे व आरोग्य निरीक्षक सुहास पांढरे यांनी सांगितले.
व्यापारी हा नेहमीच प्रशासनाला सहकार्य करतो व यापुढेही सर्व चांगल्या योजनेत व्यापारी सहभागी होईल. परंतु अशावेळी व्यापाऱ्यांवर चुकीच्या कारवाया होऊ नयेत. तसेच, दमदाटी करणारे, जबरदस्तीने वर्गणी मागणारे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सचिन निवंगुणे यांनी केली.

नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर

0

मुंबई-कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने कार्यालयाने समन्स बजावलं होतं. आज राज ठाकरे कार्यालयात सकाळी सव्वा अकरा वाजता आले होते. त्यानंतर त्यांची चौकशी सुरु होती. रात्री ८ वाजून २० मिनिटे झाली तेव्हा ते बाहेर पडले. उन्मेश जोशी, राजेंद्र शिरोडकर यांना जे प्रश्न विचारले गेले त्याच संदर्भातले प्रश्न ईडीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी सामोरं जावं लागणार  आहे. मात्र सध्या कित्येक  तासाच्या प्रदीर्घ चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर आले आहेत. गरज पडल्यास राज ठाकरेंना पुन्हा बोलवण्यात येईल असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी जी काही उत्तरं दिली आहेत ती समाधानकारक आहेत असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मीडियाशी कोणताही संवाद न साधता ते कृष्णकुंज या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले आहेत. शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे हे वेगळ्या गाडीतून कृष्णकुंज या ठिकाणी गेले. उद्या राज ठाकरे यांना बोलवण्यात आलेले नाही असे ईडीच्या अधिकाऱ्यानी स्पष्ट केले. मात्र गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा बोलवण्यात येईल असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केले असंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळी साडेअकराच्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते आणि रात्री सव्वाआठच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल झाले. १२ वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. रात्री सव्वा आठच्या सुमारास राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही  या ठिकाणी दाखल झाले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी मीडियाकडे पाहून फक्त स्मितहास्य केले आणि कारमध्ये बसून कृष्णकुंज या निवासस्थानी निघून गेले. साडेआठ तासांच्या चौकशीत राज ठाकरे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं राज ठाकरे यांनी दिली. आता राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत.

दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यालयाबाहेर आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला . तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.

चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

0

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना गुरुवारी दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चिदंबरम यांनी चौकशीसाठी सहकार्य केले नसल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने चिदंबरम यांना 100 प्रश्न विचारायचे आहेत.

सीबीआयने बुधवारी रात्री केली होती अटक 
सीबीआयने आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक केली. यानंतर सीबीआयचे अधिकारी अर्थमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानाहून सीबीआय मुख्यालयात घेऊन गेले. याअगोदर चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. परिषदेनंतर ते जोरबाग येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. सीबीआयचे पथक देखील त्यांच्या पाठोपाठ तेथे दाखल झाले होते. काही वेळ गेट वाजवल्यानंतर सीबीआय पथकाने भिंतीवरून उड्या मारून घरात प्रवेश केला होता.

चिदंबरम यांनी सीबीआय मुख्यालयात काढली रात्र

दरम्यान सीबीआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, चिदंबरम यांना कोर्टाच्या अटक वॉरंटच्या आधारावरच अटक करण्यात आली आहे. अटत केल्यानंतर चिदंबरम यांना वैद्यकीय तपासणीसाठी राम मनोहर लोहिया रुग्णलयात नेण्यात आले. चिदंबरम यांनी सीबीआय मुख्यालयातील अतिथी गृहाच्या सुइट नंबर 5 मध्ये ठेवण्यात आल्याचे सु्त्रांनी सांगितले. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वकील आणि कुटुंबीयांना भेटण्यास मुभा
दरम्यान, कोर्टाने चिदंबरम यांना दररोज अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.
यावेळी सीबीआयचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा केला. आयएनएक्स मीडियाने चुकीच्या पद्धतीने एफडीआय वसूली केली. एफआयपीबीच्या नियमांचं उल्लंघन करून ही वसूली करण्यात आली. त्यामुळे आएनएक्सला फायदा मिळाला. त्यामुळे या कंपनीने इतर कंपन्यांनाही पैसे दिले, असं मेहता यांनी सांगितलं. मौन पाळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जाणूनबुजून प्रश्नांची उत्तरं टाळणं हे चुकीचं आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण करण्यासाठीच चिदंबरम यांना कोठडी मिळणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला.

कार्ती चिदंबरम आरोपी- सिब्बल
यावेळी कपिल सिब्बल यांनी पी. चिदंबरम यांची बाजू मांडताना याप्रकरणात कार्ती चिदंबरम दोषी आहेत. त्यामुळे पी. चिदंबरम यांना अटक का करण्यात आली? असा सवाल केला. कार्ती चिदंबरम यांना उच्च न्यायालयाने जामीन दिलाय. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारला नाही. याच प्रकरणातील इतर आरोपींनाही जामीन देण्यात आलाय. त्यामुळे पी. चिदंबरम यांनाही जामीन मिळाला पाहिजे, असं सिब्बल म्हणाले, एफआयपीबीच्या बोर्डाने डिल करण्यास मंजूरी दिली होती. या बोर्डात केंद्राचे ६ सेक्रेटरी होते. त्यातील काही लोक आरबीआयचे गव्हर्नरही बनले आहेत, तर काही लोक नीती आयोगाचे चेअरमनही बनले आहेत. मात्र त्यांना अटक करण्यात आलेली नाही, याकडेही सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. सुमारे अडीच तास हा युक्तिवाद चालला.

महापुरातील ‘प्रकाशदूत’

0

महापुराच्या उरलेल्या खाणाखुणा प्रत्येकाचे मन विदीर्ण करणाऱ्या असतात. सर्व काही डोळ्यादेखत वाहून गेलेले असते. उरतो फक्त अंधार. पण या अंधारालाही भेदून काढणाऱा एक आधार असतो माणुसकीचा. महापुरात बचाव कार्य करणारे, प्राण वाचविणारे आपले देवदूतासम जवान असोत किंवा स्थानिक नागरिक. जलतांडवातून उद्ध्वस्थ झालेल्या लाखोंचे संसार सावरण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटतो. गावागावातून पूरग्रस्त बांधवांसाठी तातडीने मदतकार्य सुरु होते. अनेक संस्था, संघटना स्वयंस्फूर्तीने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरु करतात. यासोबतच अशा आपात्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणेमधील अधिकारी, कर्मचारी हे पूरग्रस्त बांधवांसाठी रात्रंदिवस अविश्रांत आपापल्या जबाबदाऱ्यांची कामे करतात. या सर्व एकजुटीच्या प्रयत्नांतून महापुराच्या प्रलयामध्ये सर्व काही गमावलेल्या पूरग्रस्तांना नवी भरारी घेण्याची, नव्याने आयुष्य फुलविण्याची उमेद मिळते. आधार मिळतो.

      आपत्ती निवारणाच्या कामामध्ये ‘प्रकाशाचे नाते’ अखंडित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणसाठी अधिकच खडतर असते. संततधार व मुसळधार पाऊस, पूरस्थिती, वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावरील वीज वितरण यंत्रणेला सर्वप्रथम फटका बसतो. वीजयंत्रणेचे दूरवर पसरलेले जाळे जमीनदोस्त होते. पुराच्या पाण्यात वीजयंत्रणा असलेली सावधगिरीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. वादळ, पूर, पाऊस ओसरल्यानंतर वीज खंडित असेल तर ती लवकरात लवकर सुरु करण्याची स्वाभाविक अपेक्षा व्यक्त केली जाते. कारण सर्व काही आता विजेवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेकविध कामांसाठी किंवा जनजीवन सुरळीत करण्यासाठी विजेची नितांत आवश्यक असते. शुद्ध पाण्यासाठी विविध पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय सेवेसाठी छोटी मोठी रुग्णालये, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ठिकठिकाणचे तात्पुरते पुनर्वसन केंद्र, मोठमोठ्या सोसायट्या आदी अत्यावश्यक ठिकाणी वीजपुरवठ्याअभावी अडचणी येऊ शकतात. वादळ किंवा महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या वीजयंत्रणेची दुरुस्ती ही अतिशय आव्हानात्मक असते. त्यामुळे युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून तसेच पर्यायी व्यवस्थेतून अत्यावश्यक सेवेसाठी वीजपुरवठा सुरु करण्यास प्राथमिकता दिली जाते.

अत्यावश्यक वीजसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या महावितरणमधील अभियंते व जनमित्रांसाठी यंदाचा पावसाळा हा खऱ्या अर्थाने कसोटीचा व कर्तव्याची परीक्षा घेणारा ठरला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, पुणे व सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस व विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे प्रलयकारी पूरस्थिती होती. अशाही परिस्थितीत पुराने विस्कळीत झालेल्या वीजयंत्रणेमधून प्रामुख्याने कोल्हापूर व सांगलीमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याची उल्लेखनीय कामगिरी महावितरणच्या ‘प्रकाशदूतां’नी म्हणजेच अभियंता व जनमित्रांनी केली आहे.

विजेची निर्मिती व त्यानंतर पारेषण, वितरण अशा तीन टप्प्यांत ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम डोंगरदऱ्यांतील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या ‘प्रकाशदूतां’ची तारेवरची कसरत आणि धडपड ही पावसाळ्यात तर अधिकच आव्हानात्मक असते.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांना गंभीर पूरस्थितीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. अक्षरशः प्रलयकारी अशीच स्थिती होती. यासोबतच पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, ठाणे, पालघर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागात पुराचा मोठा फटका बसला. या महापुरात लाखो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. शेती, छोटे व्यवसाय, उद्योदधंदे बुडाले. हजारो कोटींची वित्तहानी झाली. सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात सुमारे 40 जणांचा मृत्यू झाला. हजारो मुकी जनावरे वाहून गेली. राज्यातील पूरस्थितीमुळे यंदा महावितरणचे सुमारे 525 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या यंत्रणेला मोठा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे 45 उपकेंद्रातील 750 कृषी व बिगरकृषी वीजवाहिन्यांवरील वीजयंत्रणेला फटका बसला. त्यामुळे सुमारे 23890 वितरण रोहित्रांमधून होणार वीजपुरवठा खंडित झाला किंवा पूरस्थितीमुळे बंद करावा लागला. शहरी व ग्रामीण भागातील सुमारे 4 लाख 50 हजार बिगरकृषी आणि 3 लाख 45 हजार कृषी अशा एकूण 7 लाख 95 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता.

महापुर ओसरताच त्या-त्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तसेच वीजयंत्रणेची उभारणी करण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु झाले. सर्वाधिक गंभीर परिस्थिती असलेल्या कोल्हापूर व सांगलीमधील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला लागले. याशिवाय पुणे, बारामती, सातारा व सोलापूर येथील अभियंता व कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे कुशल कर्मचारी यांचा समावेश असलेली 45 पथके या पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली. पूरग्रस्त भागात वीजयंत्रणा नेण्यासाठी इतर परिमंडलातून पॉवर ट्रॉन्सफॉर्मर, वितरण रोहित्रे, लोखंडी वीजखांब, वीजवाहिन्या, सिंगल फेज व थ्री फेजचे नवीन मीटर्स आदी साधनसामग्री कोल्हापूर व सांगलीकडे रवाना करण्यात आले. दुसरीकडे महापुराचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या मुख्यालयात विशेष दैनंदिन सनियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे या कालावधीत दैनंदिन आढावा घेत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू यांनी कोल्हापूरात येऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वीजसेवेसाठी अविश्रांत काम करणाऱ्या अभियंता, जनमित्रांना प्रत्यक्ष भेटून शाबासकी दिली. त्यांचे कौतुक केले. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे हे सुद्धा आठवडाभर कोल्हापूर व सांगलीच्या भागात होते. पूरस्थिती ओसरल्यानंतर केवळ 5 ते 6 दिवसांत शहरी व ग्रामीण भागातील सर्वच 4 लाख 50 हजार बिगरकृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. अनेक पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, बसस्थानके, अग्निशामक दल, तात्पुते पुनर्वसन केंद्रांना प्राधान्यांना पर्यायी व्यवस्थेतून किंवा वीजयंत्रणेची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. सुमारे 2 लाख कृषिपंपाचाही वीजपुरवठा सुरु झाला आहे. महापूर ओसरल्यानंतर लगेचच वीजपुरवठा सुरु करण्याचे जे यशस्वी प्रयत्न केले त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, संस्थांनी लेखी पत्र देऊन महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील महावितरणने वीजपुरवठ्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

कोल्हापूर व सांगलीमध्ये अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात बोटीने जाऊन अभियंते, जनमित्रांनी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची कामे केली. चिखल व निसरडे रस्त्यातून तसेच गुडघाभर पाण्यातून वाट शोधत विद्युत साहित्य नेण्यात आले. वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली. सर्व प्रकारचे धोके टाळून ही कामे करण्यात आली. खरेतर महापुरानंतर आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो. विविध आजार पसरण्याची शक्यता असते. सर्वत्र दुर्गंधी असते. याशिवाय प्रत्यक्ष काम करताना अनेक प्रकारचे विविध धोके असतात. परंतु महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत प्रयत्नांतून महापुरामुळे आलेले अंधाराचे साम्राज्य नाहिसे करण्याचे अभिमानास्पद काम केले आहे. रोगप्रतिबंधक लसी टोचून अभियंता, अधिकारी व कर्मचारी कर्तव्यनिष्ठेने आपआपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीशी अहोरात्र झुंजत होते, सणासुदीचे दिवस असताना सुद्धा कोल्हापूर व सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी महावितरणच्या जिगरबाज अभियंता व कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन सेवा दिली आहे. आपत्तीच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले. आपात्कालिन परिस्थितीमध्ये साधनसामग्रीसह प्राधान्यपर कामांचे अचूक नियोजन, कुशल मनुष्यबळ आणि वीजपुरवठा सुरु करण्यासाठी एकजुटीने केलेले शर्थीचे प्रयत्न या बळावर महावितरणने कमीत कमी वेळेत वीज पुरवठा सुरळीत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण त्यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करावे लागते, याची माहिती बऱ्याचदा नसते. पण वीज अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर या ‘प्रकाशदूतां’च्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना निश्चितच न्याय मिळेल.

लेखक-

 निशिकांत राऊत, 

जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, बारामती परिमंडल

(मोबाईल – 7875762055)