Home Blog Page 286

हडपसरमध्ये तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली!

डेंटल असोसिएशनच्या पुढाकाराने तंबाखू विरोधात जनतेचा निर्धार

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशनच्या हडपसर शाखेतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ च्या वतीने 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तंबाखूच्या सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम आरोग्यावर होणारे परिणाम आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व याविषयी जनजागृती केली जाते.
इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेच्या वतीने हडपसर परिसरात जनजागृती पर रॅली आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष डॉ.अनिकेत कुगांवकर, सेक्रेटरी डॉ.भारती संत, खजिनदार डॉ.अक्षय साखरे, डॉ. प्रवीण जावळे, डॉ. पल्लवी लडकत, डॉ.अमित लडकत, माजी अध्यक्ष डॉ.जयदीप फरांदे, डॉ.ओंकार हरिदास, डॉ.अक्षय राऊत, डॉ.सौरभ बिर्ला, पदाधिकारी डॉ.विद्युलता जगताप, डॉ.सोनाली खेडकर, डॉ.रोहित गांधी, डॉ.अविरत नवले, डॉ.किशोर वोरखाटे, डॉ.प्रतीक खेत्रे, डॉ.अपूर्वा लोढा, डॉ. राजलक्ष्मी जावळे आदी सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थिती डॉ.शंतनू जगदाळे यांची होती.
युवक व कष्टकऱ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढल्याने अनेक घातक रोगांचा सामना करावा लागतो, त्यामुळे यावेळी सिगारेटचे पाकीट तंबाखूजन्य पदार्थांचे पाकीट याची प्रतीकात्मक होळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
वासुदेवाची ऐका वाणी, तंबाखू करी जीवनाची हानी, तंबाखूचे व्यसन मरणाला आमंत्रण, आरोग्य हवे असेल तर ठेवा यावर नियंत्रण या घोषणा देऊन डेंटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशनच्या हडपसर शाखेने हडपसर परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन केले. दरवर्षी 31 मे रोजी जागतिक आरोग्य संघटना (WHO) तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी हा दिवस साजरा करते.

रॅलीद्वारे तंबाखूचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, कर्करोग, फुफ्फुसांचे आजार, दातांच्या समस्या अशा अनेक घातक दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात आली.

या उपक्रमात अध्यक्ष डॉ.अनिकेत कुगांवकर, सेक्रेटरी डॉ.भारती संत, खजिनदार डॉ.अक्षय साखरे, डॉ. प्रवीण जावळे, डॉ. पल्लवी लडकत, डॉ.अमित लडकत, माजी अध्यक्ष डॉ.जयदीप फरांदे, डॉ.ओंकार हरिदास, डॉ.अक्षय राऊत, डॉ.सौरभ बिर्ला, पदाधिकारी डॉ.विद्युलता जगताप, डॉ.सोनाली खेडकर, डॉ.रोहित गांधी, डॉ.अविरत नवले, डॉ.किशोर वोरखाटे, डॉ.प्रतीक खेत्रे, डॉ.अपूर्वा लोढा, डॉ. राजलक्ष्मी जावळे आदी सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थिती डॉ.शंतनू जगदाळे यांची होती.

रॅलीदरम्यानवासुदेवाची ऐका वाणी, तंबाखू करी जीवनाची हानी, तंबाखूचे व्यसन मरणाला आमंत्रण, आरोग्य हवे असेल तर ठेवा यावर नियंत्रण” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

युवकांमध्ये वाढणाऱ्या तंबाखूच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्यासाठी सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेचा हा दरवर्षी उपक्रम स्तुत्य असून, तंबाखूमुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे. हडपसर परिसरात जनजागृती रॅली आयोजित करून डेंटल असोसिएशन नी तंबाखू सेवन पासून दूर राहण्याचे आवाहन केले.

मिळकतकर सवलतीसाठी पात्र नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करा; आमदार बापूसाहेब पठारे

पुणे: पुणे महानगरपालिका हद्दीतील पात्र नागरिकांना मिळकत करातील ४० टक्के सवलत देताना महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नागरिकांना त्रास दिल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे, की अलीकडच्या काळात काही महापालिका अधिकारी व कर्मचारी नागरिकांना विविध कारणांनी मुद्दाम त्रास देत आहेत. पात्र असतानाही अनेक नागरिकांना सवलतीपासून वंचित ठेवले जात असून, काही प्रकरणांमध्ये आर्थिक लाभासाठी दबाव टाकून सवलत नाकारली जात असल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करणारी असून तत्काळ दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी स्पष्ट केले.

४० टक्के सवलतीचा वाढला सावळा गोंधळ
पुणेकरांना १९७० पासून मिळकतकरात लागू असलेली ४० टक्के सवलत राज्य सरकारने काही काळापूर्वी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर पहिल्या टप्प्यात दोन फ्लॅट असलेल्या किंवा भाडेकरू ठेवलेल्या सुमारे ९७ हजार मिळकतींचा समावेश करण्यात आला. यांना २०१९ ते २०२२ या कालावधीतील सवलतीचा फरक भरण्याचे आदेश देण्यात आले.

पालिकेने आवाहन केल्यावर अनेक नागरिकांनी पीटी-३ अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ‘स्वतः मालक राहतो का?’ याची खातरजमा केली, मात्र त्यानंतरही सवलत मंजूर झाली आहे की नाही याची नागरिकांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात असून, व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो.

चौकट
बापूसाहेब पठारे ठाम भूमिका घेत, “या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे स्पष्टपणे मागणी केली आहे की, पात्र नागरिकांना अनावश्यक त्रास देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, सवलत प्रक्रियेत पारदर्शकता आणून पात्र मिळकतींना कोणताही विलंब किंवा त्रास न होता ४० टक्के सवलत तात्काळ मिळेल, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.”

“महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा

मुंबई, दि. ३१ मे २०२५ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश शेडगे, बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा, शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख दिलीप नाईक, महिला शाखा प्रमुख कविता मल्हार तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महिला म्हणून आणि शिवसेनेच्या नेत्या या नात्याने मला विशेष आनंद होतो की, राज्य सरकारने चौंडी येथे स्मारकासाठी भरीव निधी दिला आहे. मेडिकल कॉलेज व शाळेची उभारणी होणार असून, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही निर्माण होणार आहे.”

“ज्या काळात स्त्रियांना सती जाण्याची प्रथा होती, त्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी निष्पक्ष, समाजहिताचा, न्यायप्रिय आणि आदर्श नेतृत्व दिले. महिला आणि पुरुष दोघांनाही त्यांनी आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात त्यांच्या कार्याचा जागर व्हावा, या हेतूने महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशातही कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून शक्य झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाला त्यांनी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकत्र येऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर पंकजा मुंडे यांच्या हस्ते कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे उद्घाटन

पुणे – केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त पुढाकारातून एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहिम देशभर राबवली जात आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसविण्यात आले. याचे उद्घाटन राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त हाती घेतलेल्या एकल प्लास्टिक बंदीच्या मोहिमेचा भाग आहे. देशभर प्लास्टिकमुक्त समाजनिर्मितीसाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.

या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्त पर्यायांबाबत जागृती निर्माण करणे. मंदिर परिसरात उपलब्ध करण्यात आलेल्या वेंडिंग मशीनमधून फक्त १० रुपयांत पर्यावरणपूरक कापडी पिशवी सहज मिळू शकते. धार्मिक स्थळांवर प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याऐवजी अशा पर्यायांचा स्वीकार केल्यास पर्यावरण रक्षणास मोठा हातभार लागू शकतो. आम्ही दगडूशेठ ट्रस्टला या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली होती आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”

या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष . महेश सूर्यवंशी, तसेच ट्रस्टचे इतर पदाधिकारी, कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवात ‘दगडूशेठ’ गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, राजाभाऊ चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुण्यातील विविध मंदिरे, धार्मिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल.

पद्मनाभ स्वामी हे अनंतशयन मुद्रेत विराजमान असे भगवान विष्णूंचे एका रूप आहेत. जे शेष नावाच्या त्यांच्या नाग पर्वतावर शाश्वत योगिक निद्रेमध्ये गुंतलेले आहे. पद्मनाभस्वामी हे त्रावणकोर राजघराण्याचे पालक देवता देखील आहेत. याच पद्मनाभ स्वामी मंदिराची रचना अत्यंत विलोभनीय असून मुख्य तीर्थक्षेत्र म्हणून याची सर्वदूर ख्याती आहे. मंदिराच्या गर्भगृहात पद्मनाभ सर्प अनंत किंवा आदिशेषावर बसलेला आढळतो. या सर्पाचे पाच फणे हे आतील बाजूला तोंड करून आहेत, जे चिंतन दर्शवितात. पद्मनाभ स्वामींचा उजवा हात शिवलिंगावर ठेवला आहे. समृद्धीची देवी श्रीदेवी – लक्ष्मी आणि विष्णूंच्या पत्नी पृथ्वीची देवी भूदेवी त्याच्या बाजूला आहेत. ब्रह्मा हे या देवतेच्या नाभीतून बाहेर पडणा-या कमळावर अवतरतात.

पद्मनाभ स्वामींचे दर्शन तीन दरवाज्यांमधून घेता येते. पहिल्या दरवाज्यातून पद्मनाभ आणि त्याच्या हाताखाली शिवलिंगाचे रूप दिसते. दुस-या दरवाज्यातून पद्मनाभ, श्री देवी आणि भूदेवी यांच्या सोन्याच्या अभिषेक मूर्ती व पद्मनाभ स्वामींची चांदीची उत्सव मूर्ती पाहायला मिळते. तर, तिस-या दरवाज्यातून देवतेचे चरण आणि भूदेवी व मार्कंडेय मुनी यांचे दर्शन होते. अशा केरळमधील विलोभनीय पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती सन २०२५ च्या गणेशोत्सवात देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे.

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी मंदिराचे काम, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

काँग्रेसच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्‍या जयंती निमित्त सारस बागेसमोरील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथाला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेसाठी कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. ज्या प्रमाणे आहिल्यादेवी लोककल्याण आणि समाज सुधारणा करीत त्याचप्रमाने लोकांमधे समानता आणण्याचे काम करीत आहिल्यादेवींनी आपल्या सैन्यामध्ये पुरुषांना संधी देत त्याचप्रमाने महिलांनाही संधी मिळत आणि म्हणुनच आहिल्यादेवींनी सैन्यामध्ये महिलांची ही एक मोठी तुकडी खास सामावुन घेतली. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती.’’

यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, नीता रजपूत, प्राची दुधाने, सीमा सावंत, हनुमंत पवार, ब्लॉक अध्यक्ष दिलीप तुपे, संतोष पाटोळे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, आबा जगताप, द. स. पोळेकर, भगवान कडू, नुर शेख, अविनाश अडसूळ, वैभव डांगमाळी, देवीदास लोणकर, चेतन पडवळ, संतोष सुपेकर, सुमित डांगी, सचिन भोसले, प्रकाश पवार आदींसह असंख्य काँग्रेसजण अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते.

भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी

प्रत्येक भारतीयाने सायबर हल्ल्याप्रति दक्ष रहावे!

निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांचे मत.

पुणे:

पहगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट होती. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन हलचाली सुरु होत्या, त्यानुसार काहीतरी मोठं घडणार असा प्रत्येकालाच विश्वास वाटत होता. त्यानंतर जे घडलं , ते सर्व जगाने पाहिले. भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, अशी भावना माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, एस. एस. हसबनीस आणि एअर मार्शल एस. एस. सोमण यांनी व्यक्त केले.

युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) (PVSM, UYSM, VSM), ले. जनरल एस. एस. हसबनिस(नि.) (PVSM, VSM, ADC), एअर मार्शल एस. एस. सोमण(नि.) (PVSM AVSM VM) यांच्याशी संवाद साधला. आजचा हा संवाद ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडारा आणि भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन मान्यवरांचे विचार ग्रहण केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीततेबाबत बोलताना, माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर म्हणाले की, समोरच्या शत्रूला जर शांततेची भाषा समजत नाही, तर युद्धाशिवाय पर्याय राहत नाही. आज आपल्या सैन्य दलाचे सामर्थ्य एवढे प्रचंड वाढले आहे की, त्याला जगात कशाचीही तोड नाही. आज संरक्षण सामुग्रीच्याबाबत स्वयंपूर्ण झालो आहोत. यासाठी भारत सरकारने दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच हे शक्य झाले अशी भावना व्यक्त केली.

देशातला प्रत्येक नागरिक हा एक देखील सैनिक आहे. त्यांनी शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी नेहमीच सज्ज असलं पाहिजे. युद्ध हे केवळ सीमेवर लढलं जातं असं नाही; तर अंतर्गत ही लढलं पाहिजे. सायबर हल्ला हे आज आपल्यासमोरचं एक संकट आहे. त्यामुळे त्याविरोधात ही लढण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज असलं पाहिजे, अशी भावना पाटणकर यांनी व्यक्त केली.

ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वतयारी आणि यशस्वीतेबाबत लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस म्हणाले, दहशतवादी हल्ला हे यापूर्वी देखील झाले. पण आज जशास तसे उत्तर देत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यासाठी; जी माहिती संकलित केली होती, त्यासाठी अनेक विभाग कार्यरत होते. यात काही मित्र राष्ट्रांची देखील मदत झाली, अशी भावना व्यक्त केली.

एअर मार्शल एस. एस. सोमण म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये इटिग्रेटी हा अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांनी आपल्याला दिलेले काम अतिशय चोख बजावले. त्यासोबतच या यशस्वीतेसाठी जी इच्छाशक्ती आवश्यक होती, ती पाठिशी खंबीरपणे असल्याने, मोहिम यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली.

मेट्रोच्या विस्तारीकरणाला मिळणार गती

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी चर्चा
  • ⁠मेट्रो विस्तारीकरणाला गती देण्याची मोहोळ यांची मागणी

पुणे: शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे तसेच खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासलासोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या टप्प्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची मान्यता मिळविण्यासंदर्भात मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली.

पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महा मेट्रोने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारचीदेखील मंजुरी मिळालेली आहे. तसेच पब्लिक इनव्हेसमेंट बोर्डाचीही मान्यता ११ मार्च २०२५ रोजी मिळाली असून आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी प्रतीक्षात आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी मोहोळ यांनी खट्टर यांच्याकडे केली.

तसेच मेट्रोच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्गही दृष्टीक्षेपत असून सोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग हा जोडमार्गही प्रस्तावित आहे. याही प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून पीआयबीची मान्यता प्रतीक्षेत आहे .तसेच पीआयबीच्या मान्यनंतर मान्यतेनंतर सदर प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात यावा, याबाबत मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याची मोदी सरकारची भूमिका असून नवे प्रस्तावित मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरभर मेट्रोचे जाळे तयार करताना त्याला आणखी वेग यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही विषयांबाबत खट्टर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास वाटतो.

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. ३०: ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

प्रशांत पोळ यांचे पुस्तक लेखनासाठी अभिनंदन करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आपला इतिहास, परंपरा, संस्कृतीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या समाजाचे तेज आणि आत्माभिमान संपविण्याचे काम परकियांनी केल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. भारत समृद्ध देश होता, परकीय आक्रमकांनी आपल्या संपत्तीची लुट केली. आपले ज्ञान आणि संस्कृती ही आपली शक्ती आहे हे लक्षात घेऊन ज्ञानकेंद्रे उध्वस्त करणे, आपल्या संस्कृतीची प्रतिके जमिनदोस्त करणे आणि आपल्यावर त्यांची संस्कृती, परंपरेचा पगडा बसविण्याचे काम सातशेहून अधिक वर्ष चालले. त्यामुळे आपला इतिहास माहित नसलेल्या पिढ्या तयार झाल्या आणि भारत पारतंत्र्यात गेला.

वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाने आपली संस्कृती भारताबाहेर गेली हा निष्कर्ष काढला आहे. जगातील इतर संस्कृती नष्ट पावल्या आहेत. पूर्वीपासून असलेली आणि अजूनही चालत आलेली भारत ही एकमेव संस्कृती आहे. ढोलावीरा, लोथलबद्दल प्रशांत पोळ यांनी पुस्तकात वर्णन केले आहे. आजच्या स्थापत्य शास्त्राला अपेक्षित गोष्टी सहा हजार वर्षापूर्वी असल्याचे त्यातून पहायला मिळते.

युरोपीय देशात जेव्हा संस्कृतीची संकल्पना स्पष्ट नव्हती तेव्हा आपली संस्कृती विकसीत स्वरुपात होती. संस्कृतसारखी भाषा विकसीत स्वरुपात आपल्याला माहित होती. भारताचा हा ज्ञानाचा खजिना फार जुना आहे. ही सिंधू संस्कृतीदेखील आहे आणि सरस्वती संस्कृतीदेखील आहे. भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशी ही संस्कृती होती. पहिल्या शतकातले भारताचे जगातील व्यापारातले स्थान ३३ टक्के होते. आपल्या या इतिहासाची माहिती आपल्याला असायला हवी. देशाचा हा इतिहास, आपले वैभव आणि गणितात भारताने केलेली प्रगतीदेखील या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.

देशात हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचे साम्राज्य होते ते आपण शिकू शकलो नाही. त्यामुळे आपली संस्कृती ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे आणि ते पुढेही न्यावे लागेल. आयुर्वेदातील संहितावरही संशोधन झाले पाहिजे. या पुस्तकातून सर्वांना मार्गदर्शन मिळेल. ज्ञानाची ही शोधयात्रा अशीच सुरू रहावी, अशी अपेक्षा श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले, भारताला जगद्गुरू पदापर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेची माहिती, जाणिव, महत्त्व लक्षात आणून दिले पाहिजे. त्यासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानाची परंपरा समाविष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रशांत पोळ यांच्या पुस्तकात प्राचीन काळातील व्यापार वैभवाचेही वर्णन करण्यात आले आहे. पुस्तकातून अशा अनेक नव्या बाबी मांडल्या आहेत.

मध्यप्रदेशचे मंत्री श्री. सिंह म्हणाले, भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असताना लेखणीच्या माध्यमातून देशाचा इतिहासही नागरिकांसमोर येत आहे. हे पुस्तक भारताला जाणून घेण्यासाठीची आणि देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे स्मरण करण्यासाठी दिलेली हाक आहे. प्रशांत पोळ यांच्यासारख्या लेखकांमुळे आपण देशाचे सांस्कृतिक वैभव अनुभवू शकतो. त्यांच्या लेखणीत प्रामाणिकपणासोबतच भारताच्या संस्कृती प्रति निष्ठा आहे, असे त्यांनी सांगितले. हे पुस्तक देशाच्या सर्व भाषेत प्रकाशित होऊन देशभरात पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ.देगलुरकर म्हणाले, भारतीय संस्कृती जगातील पहिली संस्कृती आहे, ती समाजानुसार बदलणारी आहे. आपली संस्कृती प्रवाही आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीतेतील ज्ञान आपण जगासमोर ठेवले. आपली विचारांची श्रीमंती आपल्या लक्षात येत नाही. भारतीय संस्कृती, ज्ञानोपासना, विचारांकडे पाहिल्यास हा ज्ञानाचा खजिना जनतेसमोर येण्याची गरज आहे. असे भारतीय प्राचीन ज्ञान समाजासमोर आल्यास देशाचा अभ्युदय निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशांत पोळ म्हणाले, २०१७ साली प्रकाशित ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या पुस्तकाला सर्व शासकीय वाचनालयात वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय विचारवंत अनेक ज्ञानशाखांमध्ये जगामध्ये पुढे होते. दुर्दैवाने जगात ज्या परदेशी संशोधकांच्या नावावर विविध शोधांचे जनक असे नाव लागले ते अनेक शोध त्यापूर्वी भारतात लागलेले आहेत. मात्र, ते आपल्याला पुढे सांगितले गेले नाही. जगाचे विश्वगुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना आपल्याला आपल्या समृद्ध संस्कृतीची, ज्ञानपरंपरेची माहिती आणि अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी राजेश पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. खजिन्याच्या शोधात हे पुस्तक देशाच्या वैभवावर आधारित आहे. पुणे पुस्तकप्रेमींचे शहर असल्याने या पुस्तकालाही वाचक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0000

इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय

अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण
कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांशी यशस्वी तोडगा
मुंबई दि. ३० :-
इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.
या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. पंरतू, त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. याचसंदर्भात विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला व आपल्या न्याय मागण्या मांडल्या भाजपाकडे मांडल्या होत्या. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेत या गंभीर विषयाच्या अनुषंगाने भाजपच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करण्यात आली.
कंपनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या या रास्त होत्या, त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत यशस्वी तोडगा काढण्याच्या दृष्टीने गेले काही महिने व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेण्यात आल्या. अखेर, कर्मचाऱ्यांचे हित ध्यानात घेऊन इंडिया एअरलाईन्स कंपनीच्या मुंबई व गोवा सह देशभरातील सुमारे 26 हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याची भाजपची मागणी मान्य करण्यात आली. व त्या दृष्टीने प्रक्रिया करुन निर्णय घेण्यात आला. याचा लाभ देशभरातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार असून त्यांच्यावरील गेले काही वर्षे सूरु असलेला अन्याय दूर झालेला आहे, असे श्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नेहमीच कामगारांच्या हिताचा विचार केला आणि कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षाने घेतली. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी कंपनीच्या व्यवस्थापन समिती समवेत झालेल्या चर्चेअंती यशस्वी तोडगा निघाला असून प्रत्येक कामगारांना चांगली पगारवाढ मिळेल याची दक्षता घेण्यात आल्याचे श्री. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात कामगारांच्या वेतनासोबतच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात देखील व्यवस्थापन समितीच्या अधिका-यांमसमेवत होणा-या पुढील बैठकांमध्ये वेळोवेळी चर्चा करण्यात येईल, असेही श्री.चव्हाण यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, इंडिगो एअरलाईन्स कंपनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष करण कांबळे, सचिव दिनेश शेवाळे, चंदन कडू, सिराज हाशमी, शैलेश पवार, देवेंद्र पोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कर्तृत्ववान तरुणाईस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० : समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून समर्पित भावनेने लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी, मेहनत घेत, अडचणीत तग धरून राहत, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी ही आजची तरुण पिढी सर्वांसाठी प्रेरक आहे. भारताचे उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणाईस आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देत असताना अभिमान वाटतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्याचे आज एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते तर, मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, कवी दासू वैद्य, संयोजक नीलेश राऊत, केतकी नेवपुरकर, गौरव सोमवंशी, विभागप्रमुख संतोष मेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना टोपे म्हणाले, आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे. या सर्वांनी आपल्या कामांतून ‘नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा’ हाच संदेश दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना प्रेरणा आणि बळ देण्याचे काम करत आहे.

भारताला संतांच्या विचारांची फार मोठी परंपरा आहे. भगवान बुध्दाने उदात्त धर्माची दिलेली शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरलेली आहे. अशा समृद्ध विचारपरंपरा लाभलेल्या देशात जाती-धर्माच्या नावाने होणारे वाद बघून मन विषन्न होतं. वडीलधाऱ्या माणसाने तरुणांना याविषयी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटरने यासाठी पुढील काळात काम केले पाहिजे. संधीची नवनवीन क्षितिजे उपलब्ध होत असताना आता या तरुणांनी न थांबता, अथक परिश्रमातून नवनवीन विक्रम स्थापित केले पाहिजेत, असे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.

मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यावेळी बोलताना म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे सगळे युवक-युवती समाजाच्या भल्यासाठी अनेक महत्वाच्या विषयावर काम करत आहेत. माध्यमे याची दखल घेत असतील किंवा नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाण सेंटरने यांच्या कामाची दखल घेतली आहे. आपली आवड जोपासत ही सगळी तरुण मंडळी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत आहेत. या अशा समाजातील तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे महाराष्ट्र चालतो आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मुळे यांनी केले तर आभार विभागप्रमुख संतोष मेकाले यांनी केले.

आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ७ विविध विभागांमध्ये एकूण १६ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

पुरस्काराचे स्वरूप :
रोख २१ हजार रु., स्मृतीचिन्ह व मानपत्र असे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे स्वरुप आहे.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत :
साहित्य :
विनायक होगाडे (कोल्हापूर)
मृदगंधा दीक्षित (पुणे),

सामाजिक :
आकाश टाले (नागपूर)
ऋतुजा जेवे (बुलढाणा)

इनोव्हेटर :
सुश्रुत पाटील (पालघर)
पद्मजा राजगुरू (परभणी)

क्रीडा :
ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या)
हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग),

पत्रकारिता :
प्रथमेश पाटील (पुणे)
ज्योती वाय. एल. (मुंबई)

उद्योजक :
जयेश टोपे (नाशिक)
शिवानी सोनवणे (पुणे)

रंगमंचीय कलाविष्कार :
कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला)
तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य)
ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत)
कल्पेश समेळ, रायगड (नाट्य)

सान्वी फुंडकर आणि बिपांची बोरठाकूर यांना सत्रिय नृत्यासाठी सीसीआरटी शिष्यवृत्ती

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत  उदयोन्मुख गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्सहन

पुणे :सान्वी फुंडकर आणि बिपांची बोरठाकूर या पुण्यातील सत्रिय शास्त्रीय नृत्याच्या दोन विद्यार्थिनींची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक स्रोत आणि प्रशिक्षण केन्द्र (सीसीआरटी) तर्फे २०२४–२५ या वर्षासाठी नृत्यशास्त्रातील शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती देशभरातील कलाक्षेत्रातील उदयोन्मुख गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येते.

सान्वी फुंडकर ही न्यू इंडिया स्कूल, भुसारी कॉलनी, कोथरूड येथील विद्यार्थीनी असून बिपांची बोरठाकूर ही सेंट हेलेनाज स्कूल, सुजी सोराबजी रोड, आगरकर नगर येथील आहे. दोघीही इयत्ता नववीत शिकत आहेत.

नऊ वर्षांपासून डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सान्वी व बिपांची सत्रिय नृत्याचे प्रशिक्षण ‘आदि स्कूल ऑफ डान्स’ या संस्थेमध्ये घेत आहेत. या दोघींनी विविध आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन नेपाळ व अबु धाबी अशा ठिकाणी सत्रिय नृत्य सादर करून स्पर्धा जिंकल्या आहेत.

डॉ. देविका बोरठाकूर या ख्यातनाम तज्ञ आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कोथरूड येथील प्रमुख प्राध्यापिका आहेत. याशिवाय, बिस्मिल्ला खान पुरस्कारप्राप्त गुरु नरेनचंद्र बरुआ आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेती गुरु अनीता शर्मा या दोघींचे मार्गदर्शन आणि विशेष प्रशिक्षण या विद्यार्थिनींना मिळत आहे.

सत्रिय हे भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक असून याची सुरुवात १५व्या शतकात महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांनी आसाममध्ये केली. हे नृत्य वैष्णव धार्मिक परंपरेशी निगडित असून परंपरेने ‘सत्र’ नावाच्या मठांमध्ये आजही सादर केले जाते. १५ नोव्हेंबर २००० रोजी संगीत नाटक अकादमीने सत्रिय नृत्याला शास्त्रीय नृत्याचा दर्जा दिला आहे.

या परंपरेच्या संवर्धनासाठी आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार करण्यासाठी भारती विद्यापीठाचे संचालक शारंगधर साठे यांनी दिलेल्या पाठबळामुळे विद्यापीठात सत्रिय डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू होऊ शकला. त्यामुळे ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक ‘सत्रिय नृत्याच्या’ वारशाचा सन्मान, प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रात प्रभावीपणे होत आहे.

विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात – मंत्री पंकजा मुंडे 

पुणे, ३० मे २०२५ – रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ‘ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण कसे लक्षणीयरीत्या कमी करते हे सांगितले.

त्या सीआयआय इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) पुणे चॅप्टरने आयोजित केलेल्या ‘ग्रीन पुणे समिट आणि अभिनंदन २०२५’ दरम्यान बोलत होत्या. या शिखर परिषदेच्या उदघाटनाला पद्मश्री पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक सदस्य श्री. अमिताव मल्लिक, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे ​​सीईओ श्री. राहुल सहाय, सीआयआय – आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. सी. शेखर रेड्डी; आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर; आणि आयजीबीसी पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष श्री. हृषीकेश मांजरेकर उपस्थित होते. 

पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, बांधकाम उपक्रमांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना लागू करण्यासाठी सरकारकडून नवीन नियम तयार केले जात आहेत. विशेषतः सांडपाणी प्रक्रिया नियमांमध्ये नवीन नियम येत आहेत, असे ही त्यांनी नमूद केले. त्यांनी आयजीबीसी भागधारकांकडून धोरण ठरवताना केलेल्या शिफारशी आणि सूचनांचे स्वागत केले. तसेच ही ऐतिहासिक शिखर परिषद सार्वजनिक आणि खाजगी भागधारकांसाठी पुणे हे भारतासाठी हिरवे मॉडेल शहर बनवण्यासाठी अंतर्दृष्टी आणि धोरणे सामायिक करण्यासाठी एक अभिसरण बिंदू म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. 

आयजीबीसी पुणे चॅप्टरचे सह-अध्यक्ष श्री. हृषिकेश मांजरेकर यांनी आयजीबीसी-प्रमाणित हरित इमारती, सरकारचे प्रोत्साहनात्मक धोरणे त्याचबरोबर पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीतील वाढीमुळे शाश्वत शहरी विकासात पुणे हे एक आघाडीचे शहर म्हणून कसे उदयास येत आहे, हे यावेळी स्पष्ट केले. सुधारित रस्त्यांचे जाळे आणि सर्वसमावेशक उपजीविका योजना यासारखे उपक्रम हवामान-स्नेही वाढीबाबत पुण्याची वचनबद्धता दाखवून देते.

आर्थिक दृष्टिकोनातून, या हरित इमारतींचे भाडेपट्टा/भाडेपट्टा दर ४-७ ट्क्यांनी अधिक आहे. तसेच त्यांचा ताबा जलद मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून या इमारतींना पसंती मिळते. आयजीबीसी उपक्रम पुण्याच्या हवामान क़ृती आऱाखड्याशी अतिशय मिळताजुळता आहे. विशेषतः ऊर्जा कार्यक्षमता, कचरा व्यवस्थापन आणि २०५० पर्यंत कार्बन-पॉझिटिव्ह दर्जा साध्य करण्याच्या उद्दिष्टांना तो पाठबळ देतो.

पुण्याच्या शाश्वत विकासाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) ग्रीन सिटीड रेटींग्ज सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. हे उपक्रम पर्यावरणपूरक शहरी नियोजनाला प्रोत्साहन देत आहेत. तसेच पुणे चॅप्टरच्या कार्यशाळा आणि विविध कार्यक्रमांद्वारे स्थानिक विकसक आणि वास्तुविशारदांना हरित इमारतीच्या पद्धतींबद्दल शिक्षित करत आहे. पुण्यातील उल्लेखनीय IGBC-प्रमाणित प्रकल्पांमध्ये ISC टॉवर पुणे, अमर टेक पार्क आणि राजश्री इस्टेट यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांनी ऊर्जा-कार्यक्षम आणि शाश्वत डिझाइनसाठी प्लॅटिनम रेटिंग प्राप्त केलेले आहे.

“द ग्रीन डायलॉग: ब्रेकिंग बॅरियर्स अँड बिल्डिंग सोल्युशन्स” या संकल्पनेलवरील आधारित आगळ्यावेगळ्या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजा मुंडे यांनी आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर यांच्याशी संवाद साधला. या सत्रात महाराष्ट्राचे पर्यावरण धोरण, शहरी भारतातील हरित संक्रमणाची आव्हाने आणि जागतिक हवामान उद्दिष्टांशी स्थानिक कृतींचा ताळमेळ घडविण्याचे महत्त्व आदी मुद्दांवर लक्षवेधी चर्चा करण्यात आली.

या लक्षवेधी चर्चेत सहभागी होताना आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर म्हणाल्या, ” भारताच्या हरित इमारत चळवळीत पुणे शहर आघाडीवर आहे. ते जलद शहरी विकास आणि शाश्वततेकडे जाणीवपूर्वक होत असलेला बदल यांचा मिलाफ घडवत आहे. मेट्रो पायाभूत सुविधांच्या सुरुवातीसह आणि नाविन्यपूर्णतेच्या सक्षम संस्कृतीसह, पुणे शहर आता हवामान-लवचिक विकासासाठी मापदंड तयार करत आहे. तरुणाईमध्ये आपल्याला दिसणारा उत्साह, पुण्यातील आमचे आयजीबीसी विद्यार्थी चॅप्टर, जागरूकतेसाठी राबविल्या जात असलेल्या मोहिमा आणि नानाविध कार्यक्रम भविष्यात उदयास येणाऱ्या हरित नेतृत्व घटकांना सक्षम करत आहेत. त्यांची ऊर्जा तसेच उद्योगांच्या बांधिलकीमुळे तयार झालेले हे प्रारुप (मॉडेल) हरित शहर बनण्याच्या पुण्याच्या प्रवासाला बळ मिळत चालले आहे.”

तांत्रिक सत्रात, तज्ज्ञांनी शाश्वत बांधकामातील सर्वोत्तम पद्धती आणि भविष्यात येत असलेले तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकला. आयजीबीसी अहमदाबाद चॅप्टरचे अध्यक्ष आणि आयएनआय ग्रुपचे सीएमडी श्री जयेश हरियाणी यांनी समग्र आणि विशिष्ट डिझाइन पर्याय याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुजरात गार्डियन आणि शिंडलर इंडियासह आघाडीच्या कंपन्यांनी तांत्रिक सादरीकरणे सादर केली. त्यात ऊर्जा-कार्यक्षम काच आणि उभ्या स्वरुपातील गतिशीलता प्रणालींमधील नावीन्यपूर्णतेवर प्रकाश टाकला.

“रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष केंद्रित असलेल्या शहरांसाठी हवामान कृती योजना” या विषयावरील विचारप्रवर्तक पॅनेल चर्चेने या शिखर परिषदेचा समारोप झाला. प्रिन्सिपल आर्किटेक्ट सुश्री प्रितिका मांजरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोको डिझाईन स्टुडिओच्या पॅनेलमध्ये पंचशील रिअॅल्टीचे संचालक – ऑपरेशन्स श्री आनंद संघवी; एनआययूएचे धोरण आणि नियोजन प्रमुख श्री अंशुल अब्बासी; आणि पुणे महापालिकेचे आर्किटेक्ट आणि अर्बन प्लॅनर श्री. निखिल मिजार हे प्रमुख म्हणून सहभागी झाले होते.

या चर्चेत हवामान-प्रतिसाद आधारित वास्तुकला, ग्रीन इमारतींसाठी वित्तपुरवठा आणि शाश्वत शहरी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान, भारतातील हरित इमारतींच्या निर्मितीमध्ये पुण्याच्या योगदानाची दखल घेऊन, अनेक आयजीबीसी-प्रमाणित प्रकल्पांना सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजा मुंडे; पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी (आयएएस) आणि सीआयआय – आयजीबीसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री सी शेखर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

“४ वर्षीय मुलीच्या हत्येनंतर आईची आत्महत्या”; तळोजा घटनेवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे तत्काळ दोषीवर कार्यवाही करण्याचे निर्देश

नवी मुंबई : तळोजा फेज-१ मधील पेठाली गावात राहणाऱ्या सोनम केणी (वय ३० वर्ष) या महिलेने आपल्या चार वर्षीय मुलीची उशीच्या सहाय्याने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेची तत्काळ दखल विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून त्यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल व सर्वांगीण चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

सोनम हिच्या आत्महत्येचे खरे कारण समोर येणे अत्यंत गरजेचे असून ही घटना केवळ कौटुंबिक कारणावर आधारित आहे की त्यामागे कोणते सामाजिक, मानसिक अथवा इतर दबाव होते, हे तपासणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी पोलीस प्रशासनाला सूचित केले की, या घटनेची चौकशी करताना तिच्यावर मानसिक, शारीरिक अथवा कौटुंबिक पातळीवर कोणता दबाव होता का, हेही बारकाईने पाहावे. सोनमच्या आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“मी स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. संबंधित यंत्रणांनी वेळीच कार्यवाही करणे गरजेचे आहे. सोनमच्या आत्महत्येमागे जर कोणी कारणीभूत असेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन महिलांच्या मानसिक आरोग्याची, सुरक्षिततेची व भावनिक गरजांची दखल घ्यायला हवी,” असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस प्रशासनाला चौकशीस गती देण्याचे तसेच सोनमच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्युत सुरक्षेच्या जागरासाठी महावितरणची चिंचवडमध्ये रविवारी ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन

पुणे, दि. ३० मे २०२५: महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये दि. १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासोबतच ‘सुरक्षाथॉन’ मॅरेथॉन स्पर्धेचे व ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे उद्घाटन रविवारी (दि. १ जून) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते होणार आहे.

बिजलीनगर (चिंचवड) येथील महावितरणच्या उपविभाग कार्यालय परिसरातून ‘रन फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी’ मॅरेथॉनने या सप्ताहाला प्रारंभ होत आहे. रविवारी (दि. १) सकाळी ५.३० वाजता तीन किलोमीटर व पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनला सुरवात होईल व निर्धारित मार्गाने परत त्याच ठिकाणी समाप्त होईल.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुणे परिमंडल अंतर्गत सुमारे ६५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच वीजग्राहक व महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विद्युत सुरक्षेबाबत ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे उद्घाटन संचालक श्री. पवार यांच्याहस्ते होईल.

महावितरणचे कर्मचारी व सर्व नागरिकांसाठी शून्य विद्युत अपघाताचे ध्येय घेऊन सुरक्षेबाबत जनजागरण सुरू आहे. घरगुती, व्यावसायिक ठिकाणी वापरले जाणारे विविध उपकरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून कायम सावध व सतर्क राहण्याचा जागर करण्यासाठी विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.