Home Blog Page 2855

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमाचा’ मुख्यमंत्राच्या हस्ते होणार शुभारंभ- पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मीतीचे लक्ष

0

मुंबई; राज्यातील युवा उद्योजकांसाठी स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारी महत्वाकांशी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सुभाष देसाई , राज्यमंतत्री अतुल सावे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईतील वरळी येथेईल एन.एस.सी.आय. डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीअम येथे येत्या मंगळवारी दि.03 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 03.00 वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाचे सचिव तथा विकास आयुक्त, (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे, यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कांबळे पुढे म्हणले, या कार्यक्रमाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. होतकरु युवक/ युवती, लघु उद्योजक, अंमलबजावणी यंत्रणा, बॅंकेचे अधिकारी व विविध औद्योगीक संघटना यांना निमंत्रित केले असून, सुमारे 2000 युवक-युवती व संबंधित अधिकारी उदघाटन सोहळयास उपस्थित राहणार आहेत,

हा कार्यक्रम राज्यासाठी महत्वाकांक्षी असून या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित होतील व त्या माध्यमातून सुमारे 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

शासनाने नुकतेच नवीन औद्योगिक धोरण 2019 जाहिर केले आहे. त्यानुसार, राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म व लघु उपक्रम स्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेची अमंलबजावणी उद्योग संचालनालय आणि खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे करण्यात येणार आहे.

सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी रु. 10.00 लाख तसेच उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी रु. 50.00 लाख गुंतवणुकीची मर्यादा असून, शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक सहाय्य हे अनुदान स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रकल्पामध्ये लाभार्थीचा सहभाग 5 ते 10 टक्के व बँक कर्ज 60 ते 80 टक्के असून, योजना राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बँका यांच्या सहयोगाने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कृषीपुरक व कृषीवर आधारीत उद्योग, उत्पादन उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजने अंतर्गत लाभासाठी पात्र असून, लाभार्थीचे वयोमर्यादा 18 ते 45 इतके असून याअंतर्गत महिला, अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 50 वर्ष पर्यंत राहिल. शैक्षणिक पात्रता रू.10 लाख च्या पुढील प्रकल्पांसाठी किमान 7 वी पास व रु.25 लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास असेल.

योजनेअंतर्गत 30 टक्के महिला उद्योजकांसाठी व 20 टक्के उद्दीष्ट अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. राज्यातील नव उद्यमींना सुक्ष्म लघु उद्योग सुरु करण्यास सहाय्य व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारी व व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, अशी माहिती डॉ. कांबळे यांनी यावेळी दिली.

असंघटित कामगारांच्या हितासाठीचा केंद्रसरकार्च्यावतीने नवा वेतन कायदा अस्तित्वात – डॉ. मंजुनाथ

0

एनआयपीएम व एलएलपीए  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

 ‘नवीन वेतन कायद्याचा उद्योगांवरील परिणाम’  या विषयावरील कार्यशाळा  संपन्न

पुणे : इज  टू डू बिझनेस अंतर्गत विविध  क्लिष्ट कामगार कायद्यांचे सुसुत्रीकरण करून फक्त  चार कामगार कायदे अस्तित्वात आणण्याचा केंद्र सरकारचा मानस असून, त्यातील पहिला  वेतन कायदा  अर्थात व्हेज ऑफ अ‍ॅक्ट अस्तित्वात आला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे कामगार कल्याण आयुक्त डॉ. जी. मंजुनाथ यांनी व्यक्त केले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) व  लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन  पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात ‘नवीन वेतन कायद्याचा उद्योगजगतावरील परिणाम’ या विषयावरील कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी या नवीन वेतन कायद्यातील तरतुदी,व्याख्या या विषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी अ‍ॅड. जयंत कुलकर्णी व    लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन  पुणे चे अध्यक्ष  अ‍ॅड. आदित्य जोशी यांनी आपल्या मनोगतात या नवीन कायद्यातील विविध संज्ञा, दंडात्मक तरतुदी आदींबाबत सविस्तर सादरीकरण केले.

तर अल्फा लावल इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे  उपाध्यक्ष विनोद बिडवाईक यांनी आपल्या मनोगतात या कायद्याचा उद्योगजगतावर होणारा परिणाम व या कायद्याबाबत उद्योगजगताचा दृष्टिकोन याबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

या कार्य्रक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड  आदी औद्योगिक परिसरातील विविध नामांकित कंपन्यांचे २५० हुन अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. व्ही. भावे याणी तर आभार

प्रदर्शन एनआयपीएमचे  राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश  कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.

 

पीवायसी बुद्धिबळ लीग 2019 स्पर्धेत मराठा वॉरियर्स संघाचा सलग दुसरा विजय

0
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे पीवायसी बुद्धिबळ लीग स्पर्धेत  मराठा वॉरियर्स संघाने  किंग्स 64 संघाचा पारभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मराठा वॉरियर्स संघाने किंग्स 64 संघाचा 4-2 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. यश मेहेंदळेने अकांश जैनचा 1-0 असा पराभव करत सामन्यात विजयी सुरूवात केली. राजेंद्र एरंडेने  शर्मीला शहाचा 1-0 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. परम जलनने राघव बर्वेचा तर मिहिर शहाने जय केळकरचा अनूक्रमे 1-0 असा पराभव करत आघाडी कायम राखत संघाला विजय मिळवून दिला.
दुस-या लढतीत 7 नाईट्स संघाने द बिशप्स चेक संंघाचा 4.5-1.5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. निखिल चितळेने अभिषेक गोडबोलेच् 1-0 असा पराभव करत स्पर्धेत आघाडी घेतली. तन्मय चितळेने चारू साठेचा तर सारंग उधवर्षेने केतन देवलचा अनूक्रमे 1-0 असा पराभव करत आघाडी कायम राखली. शुभंकर मेनन याने असिम देवगावकरचा 1-0 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला. विजय देशपांडेने  अश्विन त्रिमलसह 1.5-1.5 अशी बरोबरी साधत संघाला विजय मिळवून दिला.
अन्य लढतीत गोल्डन किंग संघाने वाडेश्वर विझार्डस संघासह 3-3 अशी बरोबरी साधली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंड रॉबीन फेरी

किंग्स 64 पराभूत वि   मराठा वॉरियर्स 2-4(अकांश जैन पराभूत वि यश मेहेंदळे 0-1; शर्मीला शहा पराभूत वि राजेंद्र एरंडे 0-1; रोहिन लागु वि.वि आदी जाधव 1-0; आदित्य लाखे वि.वि अमित धर्मा 1-0; राघव बर्वे पराभूत वि परम जलन 0-1; जय केळकर पराभूत वि मिहिर शहा  0-1);

 
गोल्डन किंग बरोबरीत वि वाडेश्वर विझार्डस 3-3(ईशान लागु वि.वि रामकृष्ण मेहेंदळे 1-0; विजय ओगळे वि.वि कौस्तुभ वाळिंबे 1-0; अमोद प्रधान पराभूत वि अक्षय साठे 0-1; राजशेखर करमरकर पराभूत वि कुणाल भुरत 0-1; प्रशांत कुलकर्णी पराभूत वि रोनित जोशी 0-1; पराग चोपडा वि.वि अमोल मेहेंदळे 1-0);

द बिशप्स चेक पराभूत वि 7 नाईट्स 1.5-4.5(अभिषेक गोडबोले पराभूत वि निखिल चितळे 0-1; किरण खरे वि.वि आदित्य भट 1-0; चारू साठे पराभूत वि तन्मय चितळे 0-1; अश्विन त्रिमल बरोबरीत वि विजय देशपांडे 1.5-1.5; केतन देवल पराभूत वि सारंग उधवर्षे  0-1; असिम देवगावकर पराभूत वि शुभंकर मेनन 0-1).

पूरबाधित कुटुंबीयांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

0

चंद्रकांतदादाच्या पुढाकाराने पूरग्रस्त भागात मोफत गणेश मूर्तीचे वाटप

मुंबई दि. 31 : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. तर अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा? असा प्रश्न जिल्ह्यातील गणेश भक्तांसमोर निर्माण झाला होता. दरम्यान, महसूल आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने ही व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी पूरबाधित कुटुंबीयांना २००० हजार गणेश मूर्ती मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. यानुसार टप्याटप्याने कोल्हापूरमधील कुरुंदवाड येथे ५००, सांगलीत १००० आणि इचलकरंजीमध्ये ५०० गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच १००० घरगुती गणपतीचे पूजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेश मूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरुंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील हे नागरिक अत्यंत सलोख्याने हे दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवानी बनवलेल्या गणेश मूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरुंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांची समस्या जाणून घेतल्या. यापार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने २००० गणेश मूर्ती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेन येथून कुरुंदवाड येथे आणण्यात आल्या आहेत.

‘एसएमई’, बांधकाम क्षेत्राला संजीवनी देण्याची गरज- केकी मिस्त्री

0

पुणे : “सद्यस्थितीत देशापुढे आर्थिक मंदीचे सावट आहे. विकासदर खाली आला आहे. उद्योग अडचणीत येत आहेत. अशावेळी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लघु व मध्यम उद्योग (एसएमई) आणि बांधकाम क्षेत्राला संजीवनी देण्याची गरज आहे. या दोन क्षेत्रातील रोजगार निर्मिती या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास उपयुक्त ठरू शकते,” असे प्रतिपादन एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेसच्या (सीएमआयबी) वतीने आयोजित ‘सीएफओ-सीईओ इंटरॅक्टिव्ह मीट’मध्ये ‘सद्यस्थितीत सीएफओ-सीईओ यांची भूमिका’ या विषयावर केकी मिस्त्री बोलत होते. पुणे स्टेशन जवळील हॉटेल शेरटॉन ग्रँड येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए अनिल भंडारी, सीए डॉ. एस. बी. झावरे, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या अध्यक्षा सीए प्रीती सावळा, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए दिलीप आपटे आदी उपस्थित होते.

यावेळी याच विषयावर झालेल्या चर्चासत्रात सीए अनिल भंडारी, सीए दिलीप आपटे, सीए अनिल पटवर्धन, कोटक बँकेचे चेअरमन प्रकाश आपटे, सीए डॉ. एस. बी. झावरे यांनी आपले मते मांडली. सीए अनिल कुलकर्णी यांनी चर्चासत्राचे समन्वयन केले. उद्योग क्षेत्रातील २०० पेक्षा जास्त मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. चंद्रशेखर चितळे यांनी नवीन कायदा, तंत्रज्ञान आणि सध्याच्या वातावरणामुळे ‘सीएफओ’पुढील आव्हानांचा तपशील मांडत ‘आयसीएआय’ करीत असलेल्या उपक्रमांचा लेखाजोखा मांडला.

केकी मिस्त्री म्हणाले, “उद्योग क्षेत्राची आर्थिक घडी बसविण्यात सीएफओ आणि सीईओ यांचे योगदान मोलाचे असते. ‘सीएफओ’नी ‘कम्फर्ट झोन’ सोडून आव्हानात्मक कामे करावीत. ‘सीएफओ’ने आर्थिक नियोजनासह संस्थेच्या जनसंपर्क, विश्वासार्हतेवरही लक्ष द्यावे. अंतर्गत लेखापालनासाठी पुढाकार घ्यावा. दूरदृष्टीने आर्थिक नियोजन करावे. सीईओ व सीएफओ यांनी समन्वयाने काम केल्यास अधिक प्रभावी ठरेल. उद्योग क्षेत्राची प्रगती सध्या मंदावली आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न होत आहेत. बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या उद्योगांना सेवा ‘एसएमई’कडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने आज ते अडचणीत सापडले आहेत. त्यांना सरकारने सवलती देऊन नवसंजीवनी देण्याची गरज आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप माध्यमातून नवनवे प्रकल्प राबवले गेले पाहिजेत. रिझर्व्ह बँकेने दिलेले १.७६ हजार कोटी या परिस्थितून बाहेर पडण्यास उपयुक्त ठरतील, असे वाटते.”

दिलीप आपटे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल भंडारी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सीए ऋता चितळे यांनी केले. आभार सीए प्रीती सावळा यांनी मानले.

पुण्यातील आठही जागा अधिक मताधिक्याने जिंकू -प्रकाश जावडेकर

0

पुणे ः पुण्यातील आठही जागांवर भाजपचे आमदार आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत या आठही जागा आम्ही पुन्हा एकदा अधिक मताधिक्याने जिंकू असा विश्‍वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बूथप्रमुखांचा मेळावा आज बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला श्री. जावडेकर मार्गदर्शन करीत होते.
शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे, हरिष परदेशी, जितेंद्र पोळेकर, संजय गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात भाजपचे आकर्षण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली विकासाची गती वाढली आहे. योजना नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्याचा लोकांवर चांगला परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीला तीन चतुर्थांश जागा मिळतील.’

कार्पोरेट जगत आणि मॅनेजमेंट महाविद्यालये यांच्यात सातत्यपूर्ण संवादाची गरज :डॉ . माणिकराव साळुंखे

0
पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) ने आयोजित केलेल्या ‘इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट ‘ ला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला .  कॉर्पोरेट जगताचे ५० प्रतिनिधी आणि व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या १ हजार विद्यार्थ्यांचा या समिट मध्ये सहभाग होता .  भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांनी उदघाटन केले . आयएमईडीचे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले . समिटचे हे सातवे वर्ष होते . भारती विद्यापीठाच्या एरंडवणे (पौड रस्ता कॅम्पस ) मधील अभिजितदादा कदम सभागृहात ही समिट पार पडली .
” कार्पोरेट जगत आणि मॅनेजमेंट महाविद्यालये यांच्यात सातत्यपूर्ण संवादाची गरज असून एकमेकांच्या गरजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा ‘असे प्रतिपादन भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू डॉ . माणिकराव साळुंखे यांनी केले . डॉ . साळुंखे म्हणाले ,’कार्पोरेट जगत आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षण महाविद्यालये यांच्या एकमेकांकडून विविध अपेक्षा असतात ,त्याचा अभ्यास व्हायला हवा . भारती विद्यापीठ दूरदृष्टी ठेवून ,भविष्याची गरज ओळखून विद्यार्थ्यांची जडण घडण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे . व्यवस्थापन शास्त्र व इंडस्ट्रीमधील संवादाची दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करू . त्यासाठी स्व . पतंगराव कदम यांची या संदर्भातील धोरणे दिशादर्शक ठरतील .
यावेळी बोलताना देवेंद्र देशमुख (मुख्य कार्यकारी अधिकारी ,इ झेस्ट सोल्युशन्स )म्हणाले ,’ कार्पोरेट जगत आणि व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थी यामध्ये संवाद प्रक्रियेबद्दल आय एम इ डी चा पुढाकार महत्वपूर्ण आहे . कार्पोरेट जगतात गांभीर्याने काम करणारे आणि मूल्यव्यवस्था मानणारे विद्यार्थी यावेत अशी अपेक्षा असते . काम सुरु केल्यावर त्यांच्या प्रशिक्षणावर जास्त वेळ घालवावा लागू नये ,अशी कार्पोरेट जगाची अपेक्षा असते . विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणात काम करावे ,त्यांच्याकडे तसे संवाद कौशल्य असावे ‘

‘व्यवस्थापन विद्यार्थ्यांची उद्योगासंबंधित अपेक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले . आयएमईडीच्या ‘प्लेसमेंट ब्रोशर’चे प्रकाशन या झाले . उद्योग, व्यवस्थापन शास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर गटचर्चा, खुली चर्चा देखील आयोजित करण्यात आली . आय एम इ डी चे संचालक डॉ . सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले .

शालेय साहित्यातून दिला मदतीचा हात

0

पुणे -येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक पथावरील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूरग‘स्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याची मदत दिली आहे.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. त्यामध्ये विविध भागातील शाळांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आपल्या प्रमाणेच तेथील विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेतात परंतु पुरामुळे त्याचं शालेय साहित्य वाहून गेल्याने शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचे साहित्य गोळा करून दिले आहे. पुणे महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक  धीरज घाटे यांच्या सामाजिक संस्थेमार्ङ्गत हे साहित्य पूरग‘स्त भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पोहोचवलं जाणार आहे. आपण चांगले असलो की समाज चांगला घडतो आणि पर्यायी देश चांगला आणि सशक्त घडतो तेंव्हा गोळवलकर गुरुजींचा आदर्श आणि शिकवण समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी केलेली ही मदत अत्यंत मोलाची असून पूरग‘स्त भागातील विद्यार्थ्यांना उभारी देणारे आहे. असे कौतुकोद्वार श्री घाटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून काढले. पूरग‘स्त भागातील विद्यार्थी आपल्या सारखेच असून केवळ शैक्षणिक साहित्याअभावी त्याचे शिक्षण अपुरे राहू नये या उद्देशाने विद्यार्थ्यांनी हे साहित्य दिले असल्याचे प्राथमिक शाळेच्या मु‘याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांनी यावेळी सांगितले. चांगल्या भावनेने केलेली मदत ही कितीही छोटी किंवा मोठी असो ती गरजूंपर्यंत पोहोचतेच त्यामुळे भविष्यातही गरजूंना मदत करताना आपले विद्यार्थी कायम पुढे राहतील असा विश्‍वास माध्यमिक विभागाच्या मु‘याध्यापिका सौ. लिना तलाठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी शिक्षिका मंजुषा खेडकर, माधुरी ठकार, स्वाती राजगुरु, अंजली पवार, श्रद्धा साळवेकर, मधुरा करमकर-बापट आदी उपस्थित होते

टेमघर धरण गळती आटोक्यात व धरण सुरक्षित – जलसंपदामंत्री गिरीश महाजन.

0

पुणे- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली होती व त्यानंतर टेमघर धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी सर्व गळती बंद करण्यासाठी आवश्यक ती कामे हाती घेण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते.

त्याअनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत गेल्या दोन वर्षापासून गळती प्रतिबंधक कामे हाती घेण्यात आली होती. या कामांची पाहणी करण्यासाठी श्री महाजन यांनी आज प्रकल्पस्थळी दौरा केला. टेमघर धरणाची गळती सन 2016 च्या तुलनेत सुमारे 90 टक्के कमी झाली असून आता धरण सुरक्षित झाले असल्याची खात्री त्यांनी यावेळी केली.

राज्यातील सर्वाधिक गळके धरण अशी ओळख असलेले टेमघर धरण गळतीमुक्त करण्यासाठी ग्राऊंटींग व शॉर्टक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामे पूर्णत्वास येत आहेत. जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नास आता यश आले असून राज्यातील इतर धरणांमधील गळती देखील “टेमघर पॅटर्न” नुसार बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टेमघर धरण यावेळी शंभर टक्के भरले होते व खडकवासला धरणातून पुणे शहराच्या पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. डिसेंबर 2019 पर्यंत धरण रिकामे करून उर्वरित गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई जलसंपदा विभागाने करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

प्लास्टिक हटावबरोबरच चिनी मालावर टाकणार बहिष्कार

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्लास्टिकचा वापर न करण्याचा आणि पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय रिटेल व्यापाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटना कैट च्या बैठकीत घेण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यासंदर्भात संलग्न व्यापारी संघटनांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. कैट च्या दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कैटचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन निवंगुणे यांनी दिली.

कैट ही रिटेल व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीसाठी पुण्यातून सचिन निवंगुणे, दिलीप कुंभोजकर व विजय नरेला उपस्थित होते. देशभरात ऑनलाइन व्यापारातून 22 हजार मेट्रिक टन प्लास्टिक चा कचरा निर्माण होतो. जगभर प्लास्टिकवर कुठेही बंदी नाही. परंतु, प्लास्टिकवरील प्रक्रिया तिकडे होते. आपल्याकडे ही यंत्रणा अपुरी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक हटाव चा दिलेला नारा अंमलात आणण्यासाठी रिटेल व्यापारी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनेच देशभरातील कैट चे पदाधिकारी दिल्लीत एकत्र आले होते.
काश्मीर प्रश्नांवर चीन पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. त्यामुळे चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी मालाच्या विक्रीवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घालावा म्हणूनही या बैठकीत निर्णय झाला. पुण्यात या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे प्रयत्न करण्यात येतील. तशी जनजागृती व्यापारी वर्गात केली जाईल, असेही निवंगुणे यांनी सांगितले.

देशात एकाच पक्षाची सत्ता राबवून हुकुमशाही कडे वाटचाल करण्याची भाजपची नीती – पृथ्वीराज चव्हाण

भाजप सरकारचा गलथानपणामुळे – पूरग्रस्त भागात अपरिमित नुकसान

भाजपमुळे बॅंकातील घोटाळ्यात ७ पट वाढ

वाहन उद्योगातील  आणखी १० लाख लोक बेरोजगार होण्याची भीती

वंचित ला काखेला बांधून  इडीच्या धमक्या देवून सर्व विरोधी पक्ष संपवून एकाच पक्षाची सत्ता ठेवून हुकुमशाही राबविण्याकडे भाजपचा निर्धार

पुणे – राज्यातील रोजगार बाहेरील राज्यात जात आहेत.बेरोजगारी वाढते आहे  या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. वाहन उद्योगाला वेळीच पाठबळ दिले नाही तर 10 लाख लोकांचे रोजगार जायची भीती व्यक्त होते आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले . देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ टक्के असल्याचे राष्ट्रीय एनएसएसओने जाहीर केले आहे. मागील पाच वर्षांपासून विकासदराचे आकडे सतत घसरत आहेत. सरकार ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न दाखवित आहे. मात्र, राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्याबाबत सरकार हे माहिती देत नाही. नागपूरमधील मिहान हा उत्कृष्ट औद्योगिक प्रकल्प आघाडी सरकारने विकसित केला. तेथील ८ उद्योगपतींनी आता सरकारला जागा परत केल्या आहेत. याची जबाबदारी निश्चित करावी. पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आ. मोहन जोशी, शरद रणपिसे,कमल व्यवहारे , रवी धंगेकर  ,अविनाश बागवे, संजय बालगुडे ,गोपाल तिवारी  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

पुढे चव्हाण म्हणाले, की बँकांमध्ये आमच्या काळात घोटाळे होत होते पण मोदी सरकारच्या काळात त्यात आणखी ७ पट वाढ झाली आहे ,घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी  सरकारने १० राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरणाचा शुक्रवारी निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामधून केवळ वित्तीय चालना देण्याचा आभास निर्माण केला जात आहे. मंदी असल्याने काही कंपन्यांनी वृत्तपत्रात जाहिराती देऊन सरकरचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या मेक इन इंडियाचे काय झाले हे सरकार सांगण्यास तयार नाही.

अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी बिगर राजकीय समितीची गरज-

सांगली आणि कोल्हापूर येथील पूर परिस्थितीट  सरकारचा गलथनपणामुळे अधिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला . नागरिक पुरात अडकलेले असताना सांगली आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पक्षाच्या मेळाव्यात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. त्यामुळे सांगली कोल्हापूर पूर परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. तेथील नुकसान टाळता आले नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराला अर्धवेळ पालकमंत्री नको तर पूर्णवेळ पालकमंत्री द्यावा, अशी तेथील लोकांची मागणी आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक बिगर राजकीय समिती स्थापन करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाचे काम करावे-

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत धाडसत्र सुरू आहे. इतर सर्व पक्ष संपून टाकायचे आणि एकाच पक्षाची सत्ता आणायचे, अशी भूमिका भाजपने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीविरोधात याविरोधात लढायचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपचा छुपा पाठिंबा होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्षनेता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे, असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

विरोधी नेत्यांना धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले-

देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जात आहे. चौकशी लावू, अशी धमकीही त्यांना दिली जात आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाच प्रकारे धमक्या देऊन भाजपमध्ये घेतले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. सगळे विरोधी पक्ष संपवून एकाच पक्षाची सत्ता आणायची आणि एका पक्षाच्या सत्तेद्वारे हुकुमशाही कडे निघायचे अशी भाजपची वाटचाल दिसते आहे . काश्मीर केवळ पंडित नेहरू होते म्हणून भारतात आला . हे लक्षात घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले .

युवक क्रांती दलातर्फे पुण्यात आयोजित बैठकीत हल्लेखोरांचा निषेध 

0

पुणे : राशीन ( नगर ) येथे युक्रांद कार्यकर्त्यांवर हल्याचा, घर जाळण्याच्या प्रयत्नाचा निषेध ३० ऑगस्ट रोजी गांधीभवन येथे बैठकीत करण्यात आला .कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या राशीन दौऱ्याच्या वेळी  शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन देण्याची  तयारी करणाऱ्या  युक्रांद चे कार्यवाह अप्पा अनारसे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना  स्थानबद्ध करण्यात आले होते आणि आणि राशीन(नगर) युक्रांदचे अध्यक्ष श्री किरण पोटफोडे यांचे घर जाळण्याचा प्रयत्न राशीन सरपंच महिलेच्या पतीने केला व त्यांना जबरी मारहाण केली. २८ ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीना अटक केली आहे . 

मारहाणीचा,घर जाळण्याच्या  प्रयत्नाचा  महाराष्ट्र युवक क्रांती दल तर्फे निषेध पुण्यात ३० ऑगस्ट गांधीभवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला.डॉ कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली .बैठकीला अन्वर राजन , कार्यवाह संदीप बर्वे ,शहराध्यक्ष सचिन पांडुळे ,संघटक जांबुवंत मनोहर ,डॉ प्रवीण सप्तर्षी ,डॉ उर्मिला सप्तर्षी,ऋतुजा पुकाळे ,समीर मराठे ,महेश पाटील ,सुदर्शन चखाले ,जय दहिफळकर इत्यादी उपस्थित होते.

पोलीस यंत्रणेने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम  शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्र्यांची सभा होईपर्यंत एक दिवस युवक क्रांती दलाच्या राज्य पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले ,मूलभूत अधिकारांवर भाजपचे अतिक्रमण होत आहे असा आरोपही या बैठकीत करण्यात आला .

या बैठकीनंतर माध्यमांसाठी निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले .  

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये अठरा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी पाच हजारांहून जास्त आत्महत्या या विद्यमान महाराष्ट्र शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर झालेल्या आहेत. शासनाच्या तत्वतः, अंशतः, सरसकट या शब्दछलामध्ये गुंतून शेतकरी जरजर झाला आहे. शासनाच्या नाकर्तेपणाबद्दल युवक क्रांती दल कृषी राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून निवेदन देणार होते. तसेच निवेदन न स्वीकारल्यास काळे झेंडे दाखवणार होते.

त्या निवेदनामध्ये तातडीने संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या स्वरूपाच्या मागण्या होत्या. हे सर्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला धरूनच होते. पण डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या काही समाजकंटकांना ही गोष्ट खटकत होती.

त्या समाजकंटकांनी युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्याला जबरी मारहाण करून त्याचे घर पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या समयसुचकतेमुळे आणि योग्य कारवाईमुळे त्यातल्या काही समाजकंटकांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. या सर्व प्रकारामध्ये युवक क्रांती दलाचा उद्देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा मार्ग अनुसरून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणे हाच होता.

राशीन ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमुळे लोकांना जर शुद्ध पाणी प्यायला मिळाले तर याचा अतोनात आनंद युवक क्रांती दलाला आहे. राशीनच्या सभेत अहिंसक निदर्शने होणार नव्हती. तरीही राशीनच्या सरपंच महिलेच्या पतीने राशीन युक्रांदचे अध्यक्ष श्री किरण पोटफोडे यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला व त्यांना जबरी मारहाण केली. या मारहाणीचा महाराष्ट्र युवक क्रांती दल निषेध करते.

पोलीस यंत्रणेने अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक आमदार ना. राम शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्र्यांची सभा होईपर्यंत एक दिवस युवक क्रांती दलाच्या राज्य पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते.

संपूर्ण देशभर नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर भाजप सरकार आक्रमण करीत आहे. संविधानाने अहिंसक निदर्शने करण्याचा अधिकार समस्त नागरिकांना दिलेला आहे. संविधानाच्या पायमल्लीचा महाराष्ट्र युवक क्रांती दल तीव्र निषेध करत आहे.

आमच्या आंदोलनाला अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांनी प्रत्येक्ष भेटीद्वारे, फोनद्वारे व समाजमाध्यमांवर आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला, त्या सर्व हितचिंतकांचे युवक क्रांती दल आभार व्यक्त करते.

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे डॉ. जितेंद्र जोशी यांचा गौरव

0

पुणे : लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेच्या वतीने पुण्यातील उद्योजक डॉ. जितेंद्र जोशी यांचा सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘नॅशनल एक्सलन्स’ पुरस्कराने गौरविण्यात आले. नुकत्याच इंदोर येथे झालेल्या कार्यक्रमात नेपाळच्या फेडरेशन ऑफ नेपालीज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्षा भवानी राणा, महाराज एच. एच. नरेंद्र सिंह, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संस्थापक डॉ. दिवाकर सुकूल आदी उपस्थित होते. डॉ. जोशी अभि ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात, तर अभि चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. लॉजिस्टिक, मनोरंजन, बांधकाम, माध्यम, आरोग्य आदी क्षेत्रात डॉ. जितेंद्र जोशी काम करीत असून, त्यांच्या कंपन्या भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, मध्य-पूर्व देशांमध्ये सेवा पुरवित आहेत. या गौरवाबद्दल डॉ. जितेंद्र जोशी यांनी आनंद व्यक्त केला असून, आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे म्हटले आहे.

माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षांची कैद, तब्बल 100 कोटींचा दंड

0

जळगाव – राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात 48 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी मंत्री सुरेश जैन यांचाही समावेश आहे. सर्व संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान यात माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षे कारावास व 100 कोटींचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह सर्व 48 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्व संशयिताना ताब्यात घेण्यात आले. आरोपीना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्षे कारावास व 100 कोटी दंड, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षे कारावास व 5 लाख दंड, राजा मयूर व जगन्नाथ वाणी यांना 7 वर्षे कारावास व प्रत्येकी 40 कोटी दंड, प्रदीप रायसोनी यांना 7 वर्षे कारावास व 10 लाख दंड, मुख्याधिकारी पी.डी. काळे यांना 5 वर्षे कारावास व 5 लाख दंड सुनावला. माजी नगराध्यक्ष पुष्पां पाटील यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली व 1 लाख दंड केला. पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?
सुरेश जैन यांना 10 मार्च 2012 रोजीच अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 2006 मध्ये जळगाव महापालिकेतील घरकुल योजनेत 29 कोटींच्या गैरव्यवहारांची चौकशी सुरू होती. या दरम्यान जैन अनेक वेळा जामीनावर सुटण्याचा प्रयत्न करत होते. अखेर 2016 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात 48 जणांना आरोपी केले होते. त्या सर्वांनाच न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

७५० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान

0

पुणे -महापुराची मनात बसलेली धास्ती आणि पूर ओसरल्यानंतर वाहून गेलेला संसार उभा करताना आई- वडिलांची कसरत मग पुराच्या पाण्यात वाहून गेलेले व भिजलेले दप्तर,शालेय साहित्यविना शाळेत जाणाऱ्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या हाती जेंव्हा नवे दप्तरासह शालेय साहित्य पडले तेंव्हा त्यांचे चेहरे आनंदाने फुलले. इतकेच नाहीतर संकटे कोणतेही येऊ द्या,भविष्यात आमचेही हात मदतीसाठी कणखर असतील,हे भावही त्यांच्या चेहऱ्यावर दिसले.
पुण्यात वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग करून देणाऱ्या हेल्प रायडर्स गटाकडून महापुराचा फटका बसलेल्या सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील पुनदी गावासह नागराळे, बुर्ली, आमनापूर या गावातील शाळांमधील साडेसातशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी नव्या दप्तरासह कंपासपेटी, वह्या, रंगपेटी, पेन, पेन्सिल आदी साहित्य माध्यमिक व प्राथमिक अशी वर्गवारी करून शाळांच्या पटसंख्येनुसार नुकतेच प्रदान करण्यात आली. पुराच्यावेळी हेल्प रायडर्स गटाकडून डॉक्टरांच्या पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे वैद्यकीय सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या गावांमध्ये दोन दिवस केला होता. त्यावेळी पूर ओसरल्यानंतर पुनदी गावात शिवानी व पृथ्वीराज लोहार ही भावंडे पलंगावर भिजलेले शालेय साहित्य वाळवताना हेल्प रायडर्सच्या सदस्यांना आढळून आली होती. त्यावेळी या भावंडाना शैक्षणिक साहित्य देण्याचे वचन देऊन हे गाव हेल्प रायडर्सने शैक्षणिक साहित्य सहकार्यासाठी दत्तक घेतले होते. वचनपूर्ती करताना एका गावावरून सात गावांचे नियोजन झाले आणि पूरग्रस्त ७५० विद्यार्थ्यांना नवे दप्तर, वह्या, आदी शैक्षणिक साहित्यांचे किट मिळाल्याने त्यांना भेडसावणारी चिंताही मिटली आहे. पुढील ३ वर्षे या गावांमध्ये शैक्षणिक सहकार्य अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येणार असून लवकरच तीन गावांमध्येही साहित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे हेल्प रायडर्सचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया, सुदीन जायाप्पा, प्रवीण पगारे,सचिन पवार, अजित जाधव यांनी सांगितले. या शैक्षणिक साहित्य सहकार्यासाठी व्हिन्सेस आयटीचे उमेश थरकुडे, विशाल नलावडे , लायन्स क्लबच्या नंदा पंडित आणि पलूसचे प्रमोद देशमुख, डॉ प्रमोद देशमुख , मुख्याध्यापक विश्वास पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.हेल्प रायडर्सचे पदाधिकारी संतोष पोळ, श्रीकांत कापसे,शुभम शितोळे , प्रशांत महानवर, बाळा अहिवळे, सचिन ननावरे, संदीप कुदळे,राहुल वाघवले, बाळासाहेब ढमाले, विनायक मुरुडकर,अनुपम शहा ,श्रीकांत कुंबरे, बाळासाहेब जगताप, ओमकार रासकर, महेश चिले, प्रसाद गोखले यांनी नियोजन केले. तसेच औरंगाबाद हेल्प रायडर्सच्यावतीने पुनदी गावातील पूरग्रस्त २५१घरांना संसारोपयोगी साहित्यही संदीप कुलकर्णी,अक्षय बाहेती व सदस्यांकडून देण्यात आले