Home Blog Page 2840

भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक दर्जाच्या मागणीसाठी मशाल मोर्चा

0

पुणे-महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरु केली होती. यामुळे भिडे वाड्याला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा प्राप्त झाला आहे. म्हणूनच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी फुलेवाडा ते भिडेवाडा मशाल मोर्चा काढण्यात आला.

या महामशाल मोर्चामध्ये महात्मा फुले वसतिगृह कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले- पाटील, महामशाल मोर्चाचे मुख्य समन्वयक कल्याण जाधव, रघुनाथ ढोक तसेच युवा माळी संघाच्या महिला अध्यक्षा आणि ओबीसी महासभेच्या महिला अध्यक्षा सुनीता भगत, युवा माळी संघाच्या चिटणीस वृषाली शिंदे, अमर हजारे, छाया भगत, सतीश गायकवाड, अरुण हरकळ, देवरा जाळे आदी मान्यवरांसह फुले विचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलतानामाजी आमदार कमलताई ढोले- पाटील म्हणाल्या की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ साली भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा, म्हणजे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातही ‘सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती’च्या वतीने मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण आंदोलन आणि उपोषण करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. मात्र, शासकीय पातळीवर या मागण्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने यासाठी भरघोस तरतूद करून भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक घोषित करून ते जतन करावे, अशी आमची मागणी आहे.

तृप्ती देसाईंचा रास्ताराेकाे करण्याचा प्रयत्न ; पाेलिसांनी घेतले ताब्यात

0

पुणे : भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे या मागणीसाठी गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापासून बुधवार पेठेतील भिडे वाड्यापर्यंत मशाल माेर्चा काढण्यात आला हाेता. या माेर्चात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील सहभागी झाल्या हाेत्या. माेर्चा दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ आल्यानंतर तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रास्ताराेकाे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन समज देत साेडून दिले.

पुण्यातील भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी करत आज सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती आणि युवा माळी संघाच्यावतीने माेर्चा काढण्यात आला. गंजपेठेतील फुले वाड्यापासून भिडेवाड्यापर्यंत महामशाल माेर्चा काढण्यात आला. फुले विचारांच्या हजारो समर्थकांनी या महामशाल मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली मागणी मांडली. या माेर्चात तृप्ती देसाई देखील सहभागी झाल्या हाेत्या. मशाल माेर्चा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ आल्यानंतर तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्ताराेकाे करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच फरासखाना पाेलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन नंतर साेडण्यात आले.

दरम्यान या महामशाल मोर्चामध्ये महात्मा फुले वसतिगृह कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले- पाटील, महामशाल मोर्चाचे मुख्य समन्वयक कल्याण जाधव, तसेच युवा माळी संघाच्या महिला अध्यक्षा आणि ओबीसी महासभेच्या महिला अध्यक्षा सुनीता भगत, युवा माळी संघाच्या चिटणीस वृषाली शिंदे, अमर हजारे, छाया भगत, सतीश गायकवाड, अरुण हरकळ, देवरा जाळे आदी मान्यवरांसह फुले विचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा …अमोल बालवडकर

0

पुणे-हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत जमीन बळकाविण्यासाठी ‘लँड माफियां’ ची एजंट म्हणून मदत केली, असा आरोप करत त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी हिंजवडीतील साखरे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन शुक्रवारी केले.
भाजपचे नगरसेवक नांनी शहर सुधारणा समिती चे अध्यक्ष  अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली दीड तास चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध असो, एजंट पीआयचे निलंबन करा, मांडोली अधिकाऱ्यांचे निलंबन करा, पिंपरी-चिंचवड पोलिसांचा निषेध, आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल (संपर्क हिंजवडी पोलीस ठाणे) अशा आशयाचे फलक घेतलेल्या तरुणांनी घोषणाबाजी केली. सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्याकडे याबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


हिंजवडी येथे दि. १८ सप्टेंबर रोजी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकाविण्यासाठी लँड माफियांना त्यांचा एजंट म्हणून मदत केली. तसेच विक्रम साखरे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. पोलीस खात्यातील गुंडगिरीचे हे उदाहरण आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन पीआय गवारे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

 

अजय पूरकर साकारणार सुभेदार तानाजी मालुसरे

0

 

असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे….सुभेदार तानाजी मालुसरे. वयाच्या १६ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत ‘स्वराज्यासाठी लढण्याची आणि मरण्याची’ शपथ घेतली, याच मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. या सुभेदार तानाजी मालुसरे यांची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेता अजय पूरकर आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात रंगविणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भूमिकेतलं वेगळेपण जपत रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे अजय पूरकर यांच्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक होती. ‘फर्जद’ मधील ‘मोत्याजी मामा’ यांची भूमिका साकारल्यानंतर अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा तानाजींच्या या भूमिकेसाठी वेगळेपण जपणं गरजेचं होतं. आपल्या या भूमिकेबाबत बोलताना अजयजी सांगतात की, फर्जंद च्या यशानंतर प्रेक्षकांना आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मी साकारत असलेली ‘तानाजी’ ही व्यक्तिरेखा महत्त्वपूर्ण असल्याने या व्यक्तिरेखेसाठी मी चांगलीच मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे हा वेगळेपणा जपण्यासाठी सिंहगडावरील तानाजीच्या पुतळ्यावरून प्रेरित होऊन माझी वेशभूषा करण्यात आली आहे. तसेच भूमिका अधिक चांगली वठण्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी यासारखी अभ्यासपूर्ण तयारी मी केली आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शब्दातून, अभिनायातून तसेच देहबोलीतून व्यक्त होणं गरजेच होतं त्यामुळे बारीक कंगोऱ्यांसह ही भूमिका उभी करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत.

१५ नोव्हेंबरला फत्तेशिकस्त प्रदर्शित होणार आहे.

नाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा: पवार

0
जालना: एकदा काय उन्हाळा आला तर पक्षबदलूंनी पळापळी सुरू केली आहे. या साऱ्यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाहीत, असं सांगतानाच बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैल वाकडे चालतात. मग आपण त्यांच्या जागेची अदलाबदल करतो. तरी तो नाठाळ बैल तसाच वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज हे बैल तसेच झाले आहेत. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच गडचिरोलीत पूर आला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. त्यांना रात्री झोप तरी कशी लागते? असा सवालही पवारांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने जालना येथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका करतानाच भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल चिंताही व्यक्त केली. काहीजण आज पक्ष सोडून जात आहेत. मराठवाड्यातील काही नेते सोडून गेले आहेत. आम्हाला विकास करायचा आहे, असं म्हणत हे पक्षांतर सुरू आहे. अरे, तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले? या जनतेने मोठे केले, पक्षाने हवे ते दिले. तरी गद्दारी करता?, असा सवाल करतानाच आजचा तरूण शांत आहे. उद्या ही तरूण मंडळी संतप्त झाली तर हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा पवारांनी दिला.

किल्ल्यांच्या खरा इतिहास जाणण्यासाठी मोडीलिपी शिकणे गरजेचे : पांडुरंग बलकवडे

0
संदीप तापकीर लिखित ‘अपरिचित दुर्गांची सफर’ पुस्तकाचे ‘पीआयएलएफ’मध्ये प्रकाशन
पुणे : “किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास असलेली पाच कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. परंतु, ते सर्व मोडी लिपीत आहेत. त्यातील फक्त दोन लाख कागदपत्रे वाचून झाली असतील. त्यामुळे अजूनही माहित नसेलला इतिहास समोर येणे बाकी आहे. किल्ल्यांचा हा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी मोडी लिपी शिकणे गरजेचे आहे. मोडी लिपी येणाऱ्यांची संख्या वाढली तर हजारो किल्ल्यांचा इतिहास समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकेल,” असे मत जेष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांची मुलाखत लेखक संदिप तापकीर यांनी घेतली. यावेळी तापकीर यांनी लिहलेल्या ‘अपरिचित दुर्गांची सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, ”गडकोट हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कणा होता. भारतातील इतर किल्ले आणि महाराष्ट्रातील विशेषतः सहयाद्रीच्या किल्यांमध्ये फरक आहे. आपल्या किल्ल्यांचा इतिहास हा दैदिप्यामान आहे. इथे खूप मोठा संघर्ष झाला. स्वतंत्र्यापूर्वी इंग्रजांनी गडकोटाच्या वाटा सुरुंग लावून पाडल्या. दुर्गबंदी केली, कारण किल्ले हे स्वराज्याचे प्रेरणास्थान आहेत, हे त्याच्या लक्षात आले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्रात किल्ले, गडकोट, जलदुर्ग यांची संख्या खूप मोठी आहे. शेकडो किल्ले खाजगी किंवा वनखात्याकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. संरक्षण स्मारक नसल्याने तेथे काम करता येत नाही. अशा किल्ल्यांकडे जाऊन ते अभ्यासले जावेत.”
आजच्या तरुण पिढीला गटकोट किल्यांचे आकर्षण आहे. याबाबात ते जागृत झाले आहेत. तरुण आज गडकोट किल्ल्यावर जातात. त्यांचा अभ्यास करतात. ही परिस्थिती आशादायक आहे. तरुण लेखकांनी किल्ले आणि किल्ल्यांवरचे लेखन अधिकाधिक प्रमाणात करावे, अशी अपेक्षाही बलकवडे यांनी व्यक्त केली.
संतोष घुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक केले. विशाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. मनोहर सोनावणे यांनी आभार मानले.

पुण्यात सेनेला जागा नाही -या अट्टाहासाने होणार नुकसान ..?

0
 
पुणे- आठ हि आमदार आमचेच आहेत विद्यमान आमदारांच्या जागा सोडू शकणार नाही ,त्यामुळे सेनेला पुण्यातून 1 हि जागा देणार नाही,असे सांगत प्रत्येक आमदार माझी उमेदवारी पक्की असे सांगत आहेत … तर सेनेला जागा द्यायचा संबधच नाही असा पुण्यातील भाजपच्या नेत्यांचा दावा म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्याचे काम  असल्याचा आरोप सेनेच्या वर्तुळातून होतो आहे .विद्यमान आमदारांपैकी किती आमदारांची कामगिरी समाधानकारक आहे हे भाजपची यादी जाहीर होताच बदललेले चेहरे स्पष्ट करतील .राज्यात युती झाली तरी भाजपच्या स्थानिक अट्टाहासापायी पुण्यात युती -मनोमिलन होणे कठीण दिसते आहे. हडपसर ,खडकवासला ,शिवाजीनगर आणि वडगाव शेरी अशी 4 मतदार संघातून सेनेची मागणी होत असताना नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा मतदार संघ मागून ५ व्या मतदार संघाची मागणी नोंदविली आहे.
८ पैकी 1 आमदार खासदार झाल्याने विद्यमान ७ चेहरे भाजप मध्ये आहेत या ७ पैकी हडपसर सेनेला देवून इथला  चेहरा बदलावाच लागेल अन्यथा येथूनच युतीला घरघर लागेल आणि पुण्यातील संख्याबळाला ग्रहण लागेल असे म्हटले जाते. हडपसरच्या विद्यमान आमदारांची कारकीर्द वादग्रस्त अशी राहिली आहे त्यावर पडदा टाकण्यासाठी इथली जागा सेनेला देणे महत्वाचे ठरणार आहे .सेनेचे इथले माजी आमदार महादेव बाबर पराभवानंतर काही काळ  अलिप्त पडल्याचे दिसले होते .पण तेथूनच नाना भानगिरे यांनी अव्याहतपणे सुरु ठेवलेली संपर्काची मोहीम आणि कसलेली कंबर पाहता राष्ट्रवादी ला खंबीर लढत देनाऱ्या युतीतील कार्यकर्त्याच्या   विजयाची संधी हुकवू नये  असे सेनेच्या गोटातून आग्रहाने सांगितले जाते आहे.  सेनेकडून शिवाजीनगर मधून भानुप्रताप बर्गे, विनायक निम्हण अशी नावे घेतली जात आहेत तर भाजप मधून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे ,बापट यांचे निकटवर्तीय पत्रकार सुनील माने  अशा नावात रस्सीखेच आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातून चेहरा बदल ठरलेलाच असे चित्र असताना आयत्यावेळी मुख्यमंत्री हे ,’राज्यसभा सद्स्य असलेल्या संजय काकडे यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणालाही येथे लढण्याचे आदेश देवू शकतात असे सांगितले जाते आहे .
कँटोमेंट मतदार संघातून  चेहरा बदल संभवतो आहे असा दावा भाजपवासी च करताना आढळत आहेत . आता येथून विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना उमेदवारी मिळणार कि अन्य कुठल्या नव्या तरुण चेहऱ्याला संधी मिळणार याकडे या मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. खडकवासला मतदार संघातून विद्यमान आमदार यांच्या विषयी मोठी नाराजी आहेच . फक्त वडगाव शेरी मतदार संघातील जगदीश मुळीक यांची उमेदवारी जास्त सेफ मानली जाते. अगदी तरुण असलेल्या मुळीक यांच्या कारभाराविषयी थेट अशा फारश्या तक्रारी नसल्याने आणि  महापालिकेत गटनेता पद भूषविलेल्या येथील सेनेच्या इच्छुकाने कितीही मेळावे भरविले तरी मुळीक यांच्यासारख्या  निष्कलंक,तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देईल असे भाजपच्या कार्यकर्त्यांच म्हणणे आहे .
कसबा विधानसभा मतदार संघ गिरीश बापट यांच्या खासदार होण्याने रिक्त झाला आहे. मात्र तो भाजपचा अभेद्य असा किला आहे असा दावा करत येथून महापौर असलेल्या मुक्ता टिळकांना संधी देण्यात येईल असे बोलले जाते आहे. अर्थात त्यांना तेथून सेनेचे सहाय्य मिळेल काय ? त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा उमेदवार कोण असेल , आणि महापौर  कारकिर्दीतील काही घडामोडी ,काही क्रिया आणि कारभार  बालेकिल्ल्याला धडका देनाऱ्या ठरतील कि मजबूत करतील यावर हि राजकीय गोटात मंथन होताना दिसते आहे .

..तर कोथरूडमधून चंद्रकांत दादा लढतील …. निर्वाणीचा इशारा ?

0
पुणे-चेहरे तर बदलणार,पण किती ,आणि कोण कोणते चेहरे भाजप पुण्याच्या आठ विधानसभा मतदार संघात बदलणार यावर राजकीय चर्चेला उधाण आले असताना ,कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना ,महापालिकेत भाजपने  २ अर्थसंकल्प सादर करण्याची ‘डबल धमाका ‘ संधी उपलब्ध करून दिलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी दिलेले रस्सीखेच आव्हान आणि त्यातून उठलेली धुळवड पाहता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वो असलेले नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोथरूड मधून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना लढविता येईल काय ? याबाबत चाचपणी केल्याचे म्हणणे काही सूत्रांनी मांडले आहे . मेधा कुलकर्णी.मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर,मंजुश्री खर्डेकर ,अमोल बालवडकर,शामराव सातपुते,सुशील मेंगडे,निलेश निधाळकर,विशाल गंधिले,योगेश राजपुरकर,राहुल कोकाटेअशी मंडळी येथून इच्छुक असताना प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठरविले तर येथून थेट चंद्रकांत दादा पाटील लढतील असे सांगितले जाते आहे .
कोथरूड विधानसभा मतदार संघ हा भाजप साठी अत्यंत सुरक्षित असा मतदार संघ मानला जातो त्यानुळे येथून विजयाची हमी अनेकांना असते . अर्थात इथले प्रमुख आव्हान ठरणारे राष्ट्रवादी चे दीपक  मानकर नावाचे वादळ शमविल्यानंतर या मतदार संघावर अनेकांचा डोळा आहे. आणि महापालिकेत २ अर्थसंकल्प सादर करण्याची ‘डबल धमाका ‘ संधी मिळालेले मोहोळ या नामी संधीच्या प्रतीक्षेत होतेच . मेधा कुलकर्णी यांचे कार्य आणि जनहितासाठी थेट लढत देण्याची वृत्ती आता त्यांच्या नामी संधी ला आड येते आहे. कदाचित याच कारणाने फ्लेक्स वॉर झाले ,आडवे तिडवे फ्लेक्स लावून एकमेकांना शह देण्याचे प्रकार झाले. मोहोळ बुद्धिमान असे शक्तिमान आहेत तर कुलकर्णी बुद्धिमान अशा युक्तीमान आहेत. या दोहोतील हि स्पर्धा पक्षाला वेगळ्या वादळात खेचू पहाते आहे आणि यामुळे या दोघांच्यातील या राजयुद्धाचा फायदा खर्डेकर किंवा सातपुते यांच्यासारख्या ज्येष्ठ जुन्या कार्यकर्त्यांना होणे गरजेचे असताना आता येथे कोल्हापूरचे चंद्रकांत दादा पाटील यांना पाठवून कोथरूडची मक्तेदारी मुख्यमंत्री संपुष्टात आणू पाहत आहेत असे सांगितले जाते आहे. अर्थात उमेदवारी घोषित होण्यापूर्वीची हि वादळे नेमका निवडणुकीच्या मैदानात कोणता आणि कसा रंग भरतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बाबासाहेबांनी धर्मांध शक्तीना विरोध केला आणि तुम्ही त्यांच्याशी आघाडी करता ..सुशीलकुमार शिंदेंचा वंचित ला सवाल

0

आंबेडकर -नेहरू मैत्री पुरस्काराने रमेश बागवे सन्मानित

पुणे-‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या नावावर चालणाऱ्या शक्तींना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्यासोबत तुम्ही आघाडी करता आणि धर्मांध शक्तीला मते मिळवून निवडून देता… तुम्ही कुणाला साथ दिली,’ असा खडा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना केला. उत्तर प्रदेशात एका तरुणाला कॉटवर बांधून जाळले जाते, बेंगळुरूत भाजपच्या मागासवर्गीय खासदाराला गावात प्रवेश करू दिला जात नाही, मग लोकशाही कुठेय.. या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’ असे ताशेरेही त्यांनी ओढले.
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्रतर्फे काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांना आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आयोजक राहुल डंबाळे आदी उपस्थित होते. जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करा असे सरदार पटेल यांनीच सांगितल्याचा इतिहास लपवून ठेवला जात असल्याची खंत व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘सोलापूर येथे अमित शहांच्या सभेपूर्वी दुसरे सरदार पटेल जन्माला आल्याचे बोर्ड लावण्यात आले. मात्र, कलम ३७० रद्द केल्याने कोणालाही सरदार पटेल होता येत नाही. काश्मीरमध्ये महिनाभरानंतरही शाळा, संपर्क यंत्रणा सुरू नाही. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागते. मोदींना पुतीन यांच्यासारखे हुकूमशहा व्हायचे आहे. मात्र, ते देश सांभाळू शकणार नाही’ असा टोलाही त्यांनी लगावला. सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले
.देशाला आरएसएस-भाजपचे ग्रहण

‘आरक्षणामुळेच मागासवर्गीयांना प्रगतीची संधी प्राप्त होते, तसेच आधी धर्म, जात, समाज व्यवस्थेची समीक्षा करा, मग आरक्षणाची समीक्षा करा’, अशी टीका करून जोगेंद्र कवाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ‘या देशाच्या संविधान, समता, बंधुतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे. त्यातून सुटण्यासाठी आघाडीला मतांचे दान द्या,’ असे आवाहन त्यांनी केले. तर ‘सर्व तूप तुमच्या वाट्याला घेऊन घटक पक्षाला विसरू नका,’ अशी टिप्पणीही त्यांनी आघाडीतील जागावाटपावर केली.

पक्षांतर म्हणजे राजकारणाचे भणंगीकरण

‘सिद्धांत, तत्त्वांसाठी पक्ष बदलणे समजू शकतो, पण सध्याचे पक्षांतर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे भणंगीकरण आहे. पन्नास वर्षे साखर कारखाने, सूतगिरण्यांद्वारे साम्राज्य निर्माण करणारे, आता तिकीट मिळणार नाही किंवा ‘ईडी’ची नोटीस येऊन तुरुंगात जावे लागेल, या भीतीपोटी पक्ष बदलत आहेत,’ असा उद्वेग भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला

मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हतीच : भालचंद्र मुणगेकर

0

पुणे : काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची जरी ऑफर दिली तरी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करायची नव्हतीच असे मत काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. आंबेडकर यांच्या मागण्यांचे शेपूट प्रत्येकवेळी अवास्तव होते अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पुण्यात काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी,बाळासाहेब शिवरकर,कमल व्यवहारे,  अरविंद शिंदे, अविनाश बागवे,रविन्द्र धंगेकर, अजित दरेकर,शेखर कपोते, संगीता तिवारी, नीता रजपूत आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, वंचितने काँग्रेससोबत यावे असे आम्हालाही वाटत होते पण त्यांना कधीही आघाडी करायची नव्हती. प्रत्येकवेळी त्यांची ताठर राहिलेली आहे. यावेळी त्यांनी सरकारावरही टीका केली. ते म्हणाले की, दलित हा शब्द न वापरता अनुसूचित हा शब्द वापरावा असे सरकारचे म्हणणे म्हणजे रिकामपणाचा उद्योग आहे. दलितांना दिले जाणारे आर्थिक,राजकीय,सामजिक कार्यक्रम बंद करून, मुस्कटदाबी करून शब्दखेळ करण्याचं काम सुरू आहे. दलित शब्दाला निर्माण झालेली धार कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

देशाच्या अर्थकारणाच्या सद्यस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, देशाचा आर्थिक विकास दर कमी होत चालला आहे. याला मोदी सरकारच्या काळात झालेले दोन चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत..यामध्ये एक नोटाबंदी व दुसरा जीएसटी लागू करणे या दोन निर्णयाचा फटका बसला आहे. सध्या अनेक उद्योग बंद झाले. ऑटोमोबाईल कंपन्या बंद झाल्याने जवळपास साडेतीन लाख लोकांचा रोजगार गेला असून .भाजप सरकार मात्र सध्याची ही परिस्थिती मान्य करायला तयार नाही असेही ते म्हणाले.

…अन् रंगली बापट मास्तरांची शाळा

0

सुनील माने यांच्या संयोजनातून साधला विद्यार्थ्यांशी संवाद

पुणे : शाळेतून थकले-भागलेले चेहरे सभागृहात येऊन शांत बसले होते खरे. पण इथे कोण येणारं आहे?, आपल्याशी काय बोलणार आहेत? याबाबत असणारी प्रचंड उत्सुकता त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. इतक्यात ‘ ते ‘ आले. आपला सगळा व्याप बाजूला ठेवत त्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला. अगदी हलक्या फुलक्या टीप्स देत त्यांनी यशस्वी आयुष्याचा कानमंत्र दिला. आणि यात रमलेल्या विद्यार्थ्यांना ‘ बापट ‘ मास्तरांची शाळा कधी संपली हे कळालेसुद्धा नाही.

पंतप्रधान श्री नरेंद्र  मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत भारतीय जनता पक्षाचे सदस्य व कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संयोजनातून झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.  बुद्ध भूषण समाज मंडळ, बोपोडी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी थोर व्यक्तिमत्वांची चरित्र  व शालोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी नगरसेवक विजय शेवाळे, प्रकाश ढोरे, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, राजश्री कांबळे, उषा शेलार, उमेश कांबळे, काका कांबळे, अण्णा आठवले, नाना शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना बापट म्हणाले की, आई वडिलांचा आदर करा, वेळेचे नियोजन करा, नियमित व्यायाम करा, अभ्यासासोबत अवांतर वाचन ही करा, सर्वांशी प्रेमाने बोला, सदैव प्रमाणिकपणाची कास धरा या आज छोट्या-छोट्या वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनवतील. प्रत्येकाला आपल्या कष्टाने व कर्तृत्वाने पुढे जाता येते. देश व समाज याकरिता आपले आयुष्य उपयोगी पडले पाहिजे हे ध्येय असावे. यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत आवश्यक आहे. असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

माने म्हणाले की, तरुण संपत्तीचा आपण योग्य वापर करून घेतल्यास २०२० मध्ये देश महासत्ता होईल, असे स्वप्न भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांनी पहिले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच स्वप्न घेऊन कार्यरत आहेत. या प्रेरणेतून, भविष्यात उज्ज्वल पिढी घडवून देश महासत्ता व्हायचा असेल तर शालेय वयापासून विद्यार्थ्यांवर संस्कार करणे आवश्यक आहे.

विधायक उपक्रमातून सेवा सप्ताह साजरा
देशभर उत्साहात सुरु असलेल्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सुनील माने यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रीय सहभाग घेतला. यामध्ये अन्नदान, ‘स्वच्छ’ संस्थेच्या सभासदांना स्वच्छता साहित्याचे वाटप, दैनंदिन पाणी बचतीच्या माहितीपत्रकाचे तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्याचे वाटप आदी विधायक उपक्रमांचा समावेश होता.

पूरपरिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक

0

पुणे : “धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरण बांधणीसाठी विरोध करतात. परंतु धरणच बांधली गेली नाहीत तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे धरणे बंधने गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य अभियंता आणि धरण सुरक्षा समितीचे सदस्य डॉ. दीपक मोडक यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘धरणांद्वारे पूर नियंत्रण – मिथक आणि सत्य’ या विषयावर डॉ. दीपक मोडक बोलत होते. शिवाजीनगर येथील दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ उपस्थित होते.

डॉ. दीपक मोडक म्हणाले, “यंदा सगळीकडे एकदाच पाऊस पडल्यामुळे अनेक धरणातून पाणी सोडावे लागले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी नदीपात्रात माती, राडारोडा, अवैध बांधकाम केल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातून पात्रातील पाणी बाहेर येते व पूर परिस्थिती निर्माण होते. तसेच नदीच्या पात्राच्या शेजारी ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते यामुळेही पाण्याला अडथळा होतो. बंधारे किंवा पूल बांधताना नदी प्रवाहाला अडथळा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. धरणाची उंची वाढवुन त्यामागे काही काळासाठी तरी पुरशोषण क्षमता निर्माण करता येत का याचा अभ्यास करायला हवा.”

प्रास्ताविकामध्ये प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, ब्रिटीश काळापासून पाण्याला महत्त्व दिले गेले आहे. त्या काळातही अनेक धरणे बांधली गेली आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे आपल्या जीवनात धरणे महत्वाची भूमिका बजावतात. सूत्रसंचलन विनय र. र. यांनी केले. शोभा नाहार यांनी आभार मानले.

विघ्नहर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

0
विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांची एकमुखी मंजूरी
जुन्नर /आनंद कांबळे 
  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज बुधवारी (दि.१८) खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषयपत्रिकेवरील सर्व १२ विषयांना सभासदांनी एकमुखी मंजूरी दिली.
अध्यक्षस्थानावरुन सभासदांना मार्गदर्शन करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी. प्रतिटन रुपये २६८५ इतकी होती. या सिझनमध्ये गळीतास आलेल्या ऊसास संपूर्णपणे एफ.आर.पी पेमेंट कारखान्याने अदा केले असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. आगामी २०१९-२० गाळप हंगामात आपण ८ लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून हंगामाच्या तयारीसाठी कारखान्याने ऊस तोडणी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये ६०० टायर बैलगाडी, २५० ट्रॅक्टर टायरगाडी, ३०० ट्रक / टोळी तसेच ५ ऊस तोडणी यंत्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर को-जनरेशन प्रकल्प व डिस्टीलरी विभागातील देखभाल, दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यामध्ये असून येत्या ऑक्टोबर २०१९ अखेरपर्यन्त कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज होत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पिकावर हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव        होत असल्याने विघ्नहरने सुमारे १३ टन भुंगेरे गोळा करुन त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. हुमणी आटोक्यात आणणेसाठी शेतकी विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.
  सत्यशिल शेरकर म्हणाले की, केंद्ग सरकारने बफर स्टॉक अनुदान व साखरेवरील निर्यात अनुदान जाहिर केले. परंतू अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. निर्यात साखरेचे अनुदान लवकर देणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.सतत मागिल दोन वर्षे साखर उत्पादन जास्त झालेने बाजारभाव कमी होवून शेतकर्‍यांना  देणे अवघड  झाले. यावर केंद्ग शासनाने मागिल दोन वर्षे कारखान्यांना सॉफ्टलोनद्वारे पैसे उपलब्ध करुन दिल्यामुळे   पूर्ण करता आली. तथापि, याद्वारे मोठ्या प्रमाणावर कर्जाचा बोजा कारखान्यांवर निर्माण           झाला. सदर कर्जाची परतफेड एक वर्षे मुदतीची असल्याने याचा परिणाम कारखान्यांच्या खेळते भांडवलावर होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. केंद्ग सरकारने साखरेचे किमान विक्री मुल्य ३१००/- रु. केले. याचा फायदा होणे अपेक्षित होते. परंतू देशामध्ये एकच दर ठेवल्याने उत्तर प्रदेश सारख्या राज्याला त्याचा चांगला फायदा झाला. संपूर्ण देशभर उत्तर प्रदेशची साखर जाऊ लागली. व महाराष्ट्रातील साखरेचे साठे आजही पडून आहेत. याचा परिणाम साखरेवरील व्याजाचा बोजा वाढला असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशिल सभासद राहणेसाठी ५ वर्षामधून एकदा गाळपास ऊस घालणे व ५ वर्षामधून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहाणे अनिवार्य आहे, याबाबत सभासदांस वेळोवेळी नोटीशीद्वारे, अहवालाद्वारे कळविणेत आलेले आहे. सभासद क्रियाशिल नसल्यास त्यांना  मिळणार्‍या अनेक सवलती, सोई-सुविधा व हक्कापासून वंचीत रहावे लागणार आहे. सर्व सभासदांनी याबाबत जागरुक रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 सत्यशिल शेरकर म्हणाले की मागिल दोन वर्षांमध्ये सलग साखरेचे बंपर उत्पादन झालेने साखरेचे बाजारभाव देशांर्तगत व आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळले. आपल्या को-जन. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा करार मागीलवर्षी संपला. त्याचा विज खरेदी दर ६.४५ पैसे युनिट होता. तो आज ३.५६ पैस युनिट झाला आहे. त्यामुळे को-जन. युनिटमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले. संचालक मंडळाने नेहमीच ऊस उत्पादक, शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. व यापुढील काळामध्येही घेणार आहे. तथापि, सदरील सर्व बाबींचा विचार करता  पेक्षा अधिकचा भाव देणे अवघड आहे. परंतू यामधूनही आपण मार्ग काढून पैशांची उपलब्धता झालेवर आपली दिवाळी नक्कीच गोड करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी विघ्नहरचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन सभेच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे   ५ शेतकरी, हंगामात एकरी १११ मे.टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेतलेले १४ शेतकरी, हंगामात एकरी १०० मे.टनाचे पुढे उत्पादन घेतलेले २७ शेतकरी, हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे ४ कंत्राटदार, हंगामात जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे २ कंत्राटदार, हंगामात हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे १ कंत्राटदार यांचा ट्रॉफी, प्रशस्तीपत्र, पुरस्कार व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पारगांव तर्फे आळे येथील ऊस उत्पादक शेतकरी विकास चव्हाण यांना पुणे जिल्हा परिषदेचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी अनेक सभासद शेतकर्‍यांनी चर्चेत भाग घेवून प्रश्न मांडले. तसेच सुचना केल्या. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी समाधानकारक खुलासा केला. कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी दुःखवट्याचा ठराव मांडला. उपस्थित सभासदांचे आभार व्हाईस चेअरमन अशोकशेठ घोलप यांनी मानले.
 कारखान्याच्या ३७ व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी  कारखान्यास हंगाम २०१८-१९ साठीचा नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज, नवि दिल्ली या संस्थेकडून तांत्रिक कार्यक्षमतेचा उच्च साखर उतारा विभागातील संपूर्ण भारत देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सलग तिसर्‍यांदा मिळाला असून नुकताच भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर उद्योगासाठी काम करणार्‍या अशा प्रथितयश संस्थेकडून कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ऊस विकासाचे पारितोषिक मिळाले आहे. सदरहू बक्षिस वितरण समारंभ येत्या २१ सप्टेंबर-२०१९ रोजी कोल्हापूर येथे होणार असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी सांगितले. विघ्नहर कारखान्याला मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्यावतीने चेअरमन सत्यशिल शेरकर व सर्व संचालक मंडळाचा याप्रसंगी सत्कार  करण्यात आला.

नाटय निर्मिती अनुदान योजनेची सुधारीत नियमावली जाहीर

0

मुंबई : राज्य शासनामार्फत नवीन नाटय निर्मिती करणाऱ्या संस्थांना नाटय प्रयोग सादरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेत यापूर्वी व्यावसायिक व संगीत नाटकांसाठी राज्यातील सहा महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक होते, आता नवीन नियमानुसार सहा महसूली विभाग ऐवजी चार महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक आहे, अशी सुधारणा करण्यात आली आहे.
तसेच प्रायोगिक नाटकांनाही जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठीचे नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना अनुदान मिळण्यासाठी असणारा जो पहिला १० चा टप्पा होता, तो आता कमी करण्यात आला असून, पहिल्याच टप्प्यात ५ प्रयोगांचे अनुदान घेता येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सहा महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग करण्याची अट आता शिथिल करण्यात आली असून, आता फक्त दोन महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग सादर करावयाचा आहे. तसेच नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी आवश्यक असणारी पोलीस परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग सादरीकरणाचा यापूर्वी नसलेला कालावधी या नियमावलीत निश्चित करण्यात आला आहे.
सदरची योजना ही सन २००६ पासून सुरू करण्यात आली आहे. अनेक जुन्या नाटय निर्मात्यांबरोबर नवीन नाटय निर्मातेही या योजनेचा लाभ घेत असतात. परंतु, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने, ज्या महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत, त्या जिल्ह्यात नाट्यप्रयोग करणे शक्य नसल्याने, ही अट शिथिल करण्याची विनंती नाटय निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांना केली. त्याची दखल घेत सदरच्या योजनेतील काही अटी आता शिथिल करण्यात आल्या असून, यामुळे नाटय निर्मात्यांना ज्या जिल्ह्यात सुस्थितीत नाट्यगृह आहे, अशा महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यप्रयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. तावडे यांनी दिली.
व्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच यामुळे जास्तीत नाटय नाट्यनिर्मिती होऊन नाटय रसिकांना दर्जेदार नाटकं पाहता येणार आहे. नाटय क्षेत्रातील नाटय निर्मात्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

‘एन्थुजिया’च्या सर्वसाधारण विजेतेपदावर ‘सिम्बायोसिस’ची मोहोर

0
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन महोत्सव
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले. विजेत्या महाविद्यालयाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व सहभागी विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील एकूण ४० महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतला. गायन, वादन, नृत्य या कलांच्या बहारदार सादरीकरणासोबतच बुद्धीला चालना देणाऱ्या विविध स्पर्धांनी ‘एन्थुजिया २०१९’ महोत्सवात रंगत आणली. एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नृत्य, संगीत, बौद्धिक, व्यवस्थापन, सांस्कृतिक, बॉक्स क्रीडा, स्कॅव्हेंजर  हंट, ट्रेजर हंट, कुकिंग, वादविवाद स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, सोलो सिंगिंग, टग ऑफ वॉर अश्या एकूण १८ प्रकारचा समावेश असतो. यंदा पुण्यातील ४० महाविद्यालयांच्या एकूण ७५० विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला.
‘एन्थुझिया’ महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल कराड, प्र-कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, अधिष्ठाता डॉ. कल्याण स्वरुप, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अंजली साने, बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील कुमार बन्सल, सुनील देव, ‘एन्थुझिया’ समन्वयिका आणि बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. पल्लवी आद्य, विभागप्रमुख प्रा. सुमिता जोशी, विभागप्रमुख प्रा. हेमंत भिसे, सहसमन्वयिका प्रा मृदुल वैद्य, विद्यार्थी समन्वयक सोहम लांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
राहुल कराड म्हणाले, ”एन्थुजिया महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अभ्यासासोबत विविध कला आत्मसात करणे आवश्यक आहे. संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी विविध क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, “कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या हेतूने गेल्या आठ वर्षांपासून ‘एन्थुझिया’ महोत्सव वर्षातून दोनदा आयोजिला जातो.”