Home Blog Page 283

वाल्मीक कराडवरील ‘मकोका’ हटणार ?सरकारी वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले….

बीड-येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज न्यायालयात आज सुनावणी पार पडली. त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत सुनावणीदरम्यान काय घटना घडल्या तसेच कोणता युक्तिवाद करण्यात आला याची माहिती दिली आहे. वाल्मीक कराडने त्याच्या वकिलांच्या मार्फत न्यायालयात उत्तरे दिली आहेत, त्या अर्जाची चौकशी येत्या 17 तारखेला होणार असल्याची माहिती निकम यांनी दिली आहे.

उज्ज्वल निकम म्हणाले, वाल्मीक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेले आहेत. त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल. त्या अर्जावर युक्तिवाद माझे सहकारी ॲड. कोल्हे हे करतील. तसेच या खटल्यात मला मकोका मधून दोषमुक्त करावे. त्यावर आम्ही कोर्टाला असे प्रस्तावित केले की याला दोषमुक्त करावे की याच्यावर आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात यावर न्यायालयाने आणि बचाव पक्षाच्या वकिलांची हरकत असल्याने बचाव पक्षाकडून असे सांगण्यात आले की प्रथम त्याला मकोकामधून मुक्त करावे. या अर्जावर चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असे म्हटले. त्यामुळे आता वाल्मीक कराडला मकोकाच्या तरतुदी लागू होतात की नाही यावर 17 तारखेनंतर युक्तिवाद होतील.

पुढे बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, 17 तारखेला जे काही न्यायालयात अर्ज प्रलंबित होती त्यावर युक्तिवाद आणि न्यायालयाकडून निर्णय येईल. 17 तारीख ही अर्जांच्या चौकशीसाठी असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही. परंतु ज्या-ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे. आणि तसेच माझे सहकारी ॲड. कोल्हे सरकारतर्फे 17 तारखेला बाजू मांडतील.

पुन्हा एकदा डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचे बोलले गेले आहे का? असा प्रश्न विचारला असता, उज्ज्वल निकम म्हणाले, आज त्यांच्या सगळ्या शंकांची पूर्तता करण्यात आली आहे. न्यायालयात आता त्यावर फक्त ऑर्डर करायचे बाकी आहे ते आता 17 तारखेला दोन्ही पक्षाचे ऐकून त्यावर ऑर्डर करेल. सध्या केवळ वाल्मीक कराडलाच मकोकामधून दोषमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे बोलताना निकम म्हणाले, न्यायालयात आम्ही वाल्मीक कराड व त्याच्या सहकाऱ्यांवर कोणते आरोप निश्चित करावे याची जंत्री मी न्यायालयात सादर केली होती. परंतु न्यायालयाने सांगितले की त्याच्या दोषमुक्तीचा निकाल झाल्यावर त्यानंतर त्यावर निर्णय घेऊ, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकले जाईल आणि त्यानंतर न्यायालय निर्णय घेईल.

लोककला हा आपल्या संस्कृतीचा आरसा- ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी च्या वतीने कै.शाहीर रत्न किसनराव हिंगे स्मृतिदिन

पुणे : ग्रामीण भागात पोवाडा, गवळण, लावणी असे प्रकार जपण्याचे काम होत आहे. मात्र शहरामध्ये ही संस्कृती रुजत नव्हती. ती संस्कृती शहरात रुजविण्याचे काम करण्याची गरज आहे. लोककला हा आपल्या संस्कृतीचा आरसा असून ही कला जोपासायला हवी, असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै.शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २७ व्या स्मृतीदिनानिमित्त हिंगे यांचे सहकारी ढोलकी वादक विनायक वाघचौरे यांचा सन्मान व शाहिरी निनाद या अंकाचा प्रकाशन सोहळा घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय लोककला संयोजक निरंजन पंडा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिलिंद कांबळे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पोवाडा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले.

निरंजन पंडा म्हणाले, भारतीय वाड्.मयात लोक या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे लोक कलांना खूप महत्व आहे. फोक नाही, तर लोककला ही आपली आहे. समुद्र आणि आकाश याला जसा दुसरा शब्द नाही, त्याप्रमाणे लोककलांना दुसरा शब्द नाही. आपली संस्कृती जीवंत राहण्यामागे लोककलांचे मोठे योगदान आहे. भारतीय कला या सामान्य व्यक्तीला देवत्वाकडे नेणा-या कला आहेत.

विक्रमसिंह मोहिते म्हणाले, काव्यमय चरित्र सांगण्याच्या अनेक पद्धती भारतामध्ये आहेत. मात्र, महाराष्ट्रात पोवाडयाच्या माध्यमातून चरित्र सांगितले जाते. पोवाडयाच्या माध्यमातून लोककला जपण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. तरी देखील अनेक विषय अजूनही शाहिरीमध्ये गुंफणे गरजेचे आहे. पूर्वी या कलेला राजाश्रय होता. स्वातंत्र्यानंतर यात खंड पडला असून प्रबोधिनी सारख्या संस्था हे जपण्याचे कार्य करीत आहेत.

प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंत मावळे म्हणाले, महाराष्ट्र शाहिर परिषद ही संघटना हिंगे यांच्या ४० व्या वाढदिवसाला व शाहिर हिंगे लोककला प्रबोधिनीची स्थापना त्यांच्या ६१ व्या वाढदिवशी झाली. एकाच व्यक्तीच्या वाढदिवशी अशा संस्था स्थापन होणे आणि आजपर्यंत कार्यरत असणे ही एकमेव घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत त्यांचे नाव व कार्य कधीही विस्मृतीत जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

विद्याधर अनास्कर यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ रु. ५१,०००/- निधी शाहिरी भवन गुरुकुलासाठी दिला. यावेळी प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादरीकरण केले. शाहीर गणेश टोकेकर व सहका-यांचा नमन तुज शाहीरा हा पोवाडयाचा कार्यक्रम देखील झाला. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. प्रा.संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मृणालिनी दुसाने यांनी आभार प्रदर्शन केले.

इंडिया ब्लॉकच्या बैठकीला शरद पवारांच्या NCPची दांडी:16 पक्ष सहभागी


नवी दिल्ली-‘ऑपरेशन सिंदूर’ वर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी I.N.D.I.A ब्लॉकने मंगळवारी नवी दिल्लीत बैठक घेतली. त्यात १६ विरोधी पक्षांनी भाग घेतला.तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी माहिती दिली की सर्व पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.आम आदमी पक्ष (आप) बैठकीला उपस्थित राहिला नाही. डेरेक म्हणाले की, ‘आप’ बुधवारी पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र पाठवेल.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस (एआयटीसी), द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय जनता दल (राजद), जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), विदुथलाई चिरुथैगल कच्ची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, मारुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन यांनी बैठकीला हजेरी लावली.

ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी केंद्र सरकारने ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगाच्या दौऱ्यावर पाठवली आहेत. या आठवड्याच्या अखेरीस सर्व शिष्टमंडळे भारतात परततील. त्यांच्या परतीनंतर पुढील आठवड्यात विशेष अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चेची मागणी विरोधक करत आहेत.

राजदचे मनोज झा म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर घडले. ‘आपण’ या भावनेने विचार करूनही, चिंतेची काही चिन्हे दिसून आली. जगातील एका देशाचे राष्ट्रपती दररोज ‘सरपंच’गिरी करत आहेत. १५ दिवसांत १३ विधाने केली. यामुळे कोणत्याही सरकारला दुखापत झाली असो वा नसो, कोणत्याही राजकीय पक्षाला दुखापत झाली असो वा नसो, भारताच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे वेदनादायक आहे. ही चर्चा सोशल मीडियावर, टीव्ही वादविवादांवर होणार नाही. १९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धादरम्यान संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते.यापूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार मनोज कुमार झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्रात झा म्हणाले की, भारतातील लोकांना वाटते की त्यांना अंधारात ठेवले जात आहे आणि त्यांना सरकारच्या निर्णयांबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल उत्तर मिळायला हवे.

राजद खासदारांनी पत्रात लिहिले आहे की, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत किमान बारा वेळा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे. भारत सरकारने आतापर्यंत विशेष अधिवेशन बोलावण्यास नकार दिला आहे. यावरून असे दिसून येते की एकतर सरकारला त्यांच्या विधानांवर विश्वास नाही किंवा ते उत्तर देण्याचे टाळण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशासाठी धोकादायक आहेत.’

सिंगापूरमध्ये पाकिस्तानशी झालेल्या चकमकीत भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आल्याच्या दाव्यांवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी ३१ मे रोजी ब्लूमबर्गशी संवाद साधला. ते म्हणाले की, खरा मुद्दा किती विमाने पाडण्यात आली हा नाही, तर ती का पाडली गेली हा आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सीडीएस अनिल चौहान यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करताना काँग्रेसने लिहिले- या विधानात हे मान्य करण्यात आले की आपल्याला लढाऊ विमानांचे नुकसान झाले आहे. मग मोदी सरकार ही वस्तुस्थिती का लपवत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले. त्यांनी शनिवारी एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांचे स्पष्टीकरण देण्याऐवजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सशस्त्र दलांच्या शौर्याचे वैयक्तिक श्रेय घेत आहेत.’

‘भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपवण्यासाठी कोणत्या अटी होत्या हे पंतप्रधानांना सांगावे. भारत आणि पाकिस्तान आता पुन्हा एकत्र आले आहेत का? युद्धबंदी कराराच्या अटी काय आहेत? १४० कोटी देशभक्त भारतीयांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.’

ममता म्हणाल्या- देशातील जनतेला संघर्षाबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे

काँग्रेस व्यतिरिक्त, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्राकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मी केंद्र सरकारला आवाहन करते की भारतीय शिष्टमंडळ परतल्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, कारण मला वाटते की देशातील जनतेला अलीकडील संघर्ष आणि घडामोडींबद्दल इतर कोणाही आधी जाणून घेण्याचा सर्वात मोठा अधिकार आहे.’

७ मे रोजी, ऑपरेशन सिंदूरच्या दिवशी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत दावा केला होता की त्यांनी एक भारतीय लढाऊ विमान पाडले आहे. त्यांनी म्हटले होते की भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली, ज्यामध्ये आम्ही ५ भारतीय लढाऊ विमाने पाडली. त्यापैकी ३ राफेल होते. नंतर, पाकिस्तानने ६ भारतीय विमाने पाडल्याचा दावा करण्यास सुरुवात केली.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना ठार मारले. याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. सैन्याने १०० दहशतवादी ठार केले.

भारताने दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. सीमावर्ती भागात ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्नही केला. प्रत्युत्तरादाखल, भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणा, रडार पायाभूत सुविधा आणि दळणवळण केंद्रांवर हल्ला करून ते नष्ट केले.

भारताच्या हल्ल्यात ११ पाकिस्तानी हवाई तळांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपवण्यासाठी १० मे रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली.

घरीच तयार होणार मृत्युपत्र; ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा उपक्रम


पुणे:तुमच्यानंतर तुमच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत, अथवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावयाची असेल, त्यासाठी तुम्ही मुत्युपत्र तयार करू शकता. परंतु ते कसे करावे, ते करताना काय काळजी घ्यावी, या संदर्भातील कायदा काय सांगतो, याची कल्पना अनेकांना नसते.त्यामुळे मुत्युपत्रावरून पुढे वाद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन या संदर्भातील मार्गदर्शन करण्याचा तसेच मृत्युपत्र करून देण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग पुण्यात राबविण्यात आला आहे.

ज्येष्ठांप्रती आदर भाव

राज्य शासनाच्या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा उपक्रमात जिल्हा सहनिबंधक वर्ग पुणे शहर कार्यालयाने विविध उपक्रम राबविले होते. साईराम या उपक्रमात ‘रिस्पेक्ट’ (आदर भाव) याअंतर्गत ज्या ज्येष्ठ नागरिकांना ‘मृत्युपत्र’ या विषयावर मार्गदर्शन करण्याचे ठरविले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मोहम्मदवाडीतील सोनाश्रय वृद्धाश्रमाला जिल्हा सहनिबंधकांनी भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मृत्युपत्र विषयावर मार्गदर्शन केले. पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भात माहिती हवी असल्यास त्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याबाबत जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे म्हणाले, ”जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकास त्याचे मृत्युपत्र नोंदणी करायचे असेल आणि त्यासाठी त्याला दुय्यम निबंधक कार्यालयात तब्येतीच्या कारणास्तव समक्ष येणे शक्य होणार नसेल तर त्यासाठी गृहभेट हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांनी त्यांच्या जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात वकील किंवा प्रतिनिधीमार्फत अर्जासहित संपर्क साधावा.

असे करा मृत्युपत्र

अर्जाचा नमुना विभागाच्या igrmaharashtra.gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध

मृत्युपत्र करणारी व्यक्ती आजारी असली तरी मृत्युपत्र करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक

अर्ज केल्यानंतर दुय्यम निबंधक दोन-तीन दिवसांमधील त्यांच्या सोयीची वेळ देणार

यासाठी तीनशे रुपये गृहभेट शुल्क आकारे जाते

गृहभेटीसाठी जाताना व गृहभेट प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करून त्याची सीडी दुय्यम निबंधक द्यावी

अधिक माहितीसाठी नोंदणी विभागाच्या सारथी कॉल सेंटर ८८८८००७७७७ कडे संपर्क साधावा

मृत्युपत्र म्हणजे काय?

मृत्युपत्र म्हणजे स्वतःच्या स्थावर व जंगम मालमतेची आपल्या मृत्युपश्चात केलेली व्यवस्था. स्वतःची मालकी- ज्यामध्ये स्थावर वा जंगम मिळकत जी तुमच्या मालकीची आहे अथवा भविष्यात तुमच्या मालकीची होणार आहे, अशी सर्व मिळकत.

मृत्युपत्र कोणी करावे?

कोणीही सजाण व्यक्ती मृत्युपत्र करू शकते. जिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, अशी व्यक्ती अथवा मानसिक असंतुलन असलेली व्यक्ती मृत्युपत्र करू शकत नाही. अशा व्यक्तींनी केलेले मृत्युपत्र कायद्याने विचारात घेतले जात नाही.

का करावे?

मृत्युपश्चात आपल्या वारसांमध्ये संपत्तीबाबत होणारे वाद व तंटे टाळण्यासाठी

कसे करावे?

मृत्युपत्र हे लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे.

ते कोऱ्या कागदावर लिखित स्वरूपात असणे पुरेसे आहे.

त्याला मुद्रांकशुल्काची आवश्यकता नाही.

त्याच्या दस्ताची नोंदणी कायद्याने बंधनकारक नाही, ती ऐच्छिक आहे.

या पत्राची अंमलबजावणी मृत्युपश्चात होत असल्याने मृत्युपत्राचा दस्त सुस्पष्ट लिखित स्वरूपात करून ठेवणे व त्याची रितसर नोंदणी करणे फायद्याचे ठरते.

मृत्युपत्र नोंदणी करतेवेळी सोबत वैद्यकीय दाखला असणे सोयीचे. त्यातून मृत्युपत्र करणारी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम आहे, हे सिद्ध होते.

मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीने या पत्रावर दोन साक्षीदारांसमक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक

साक्षीदार हे मृत्युपत्राचे लाभार्थी नसावेत व तेही काय‌द्याने सजाण असावेत. तसेच ते मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीपेक्षा वयाने मोठे नसावेत.

मृत्युपत्र नोंदणीसाठी खर्च किती येतो

मृत्युपत्राची नोंदणी करण्यासाठी शासनाने नाममात्र नोंदणी शुल्क (१०० रुपये) निश्चित केलेले आहे. त्याची नोंदणी कोणत्याही दस्तनोंदणी कार्यालयात करता येते. मृत्युपत्राच्या दस्ताची प्रमाणित प्रत निष्पादित करणाऱ्यास त्याच्या हयातीमध्ये केव्हाही ते मिळू शकते. लाभार्थ्याला मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युपश्चात मृत्यू दाखला आणि अन्य आवश्यकत कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची प्रमाणित प्रत संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे मिळू शकते. नोंदणीकृत मृत्युपत्र न्यायालयामध्ये आणि अन्य सरकारी कामकाजामध्ये पुरावा म्हणून वापरता येते. त्यामुळे मृत्युपत्राच्या दस्ताची नोंदणी करणे केव्हाही फायदेशीर आहे.

मृत्युपत्र कधी करावे?

कोणीही सक्षम व्यक्ती मृत्युपत्र करू शकते. तसेच पूर्वी केलेले मृत्युपत्र वा लिहून ठेवलेला तत्सम लेख रद्द करू शकते व नव्याने मृत्युपत्र करून ठेवू शकते. मृत्युपत्र कितीवेळा करावे, याला काय‌द्याचे बंधन नाही. परंतु संबंधित व्यक्तीने आपल्या हयातीत केलेले अखेरचे मृत्युपत्र काय‌द्याने अंमलबजावणीस पात्र ठरते.

निळकंठ ज्वेलर्सच्या सेल्समनवर साडेचार कोटींच्या सोन्याच्या चोरीचा आरोप

पुणे :नारायण पेठ येथील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्समन तरुणाने अफरातफर करून सुमारे साडेचार कोटींच्या सोन्याची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक नगरकर (वय ३५ वर्ष, रा. सुतारदारा, कोथरुड) असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे नाव आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे (वय ३७ वर्ष, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन डांगे हे नीलकंठ ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मॅनेजर म्हणून कामास आहे. आरोपी नगरकर हा नारायण पेठ येथील नीलकंठ ज्वेलर्स या सोन्याच्या प्रसिद्ध दुकानात सेल्समन म्हणून काम करत आहे. नीलकंठ ज्वेलर्स येथे नगरकरकडे अंगठी, कॉईन आणि वेडणी च्या काउंटरची जबाबदारी होती. १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने अफरातफर करून तब्बल ४ कोटी ५८ लाखांच्या सोन्याची चोरी केली आहे. हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नीलकंठ ज्वेलर्सच्या मॅनेजरने विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे अधिक तपास करीत आहेत.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक नगरकर (वय ३५ वर्ष, रा. सुतारदारा, कोथरुड) याने ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे ४ हजार ६८९ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची चोरी केली. यामध्ये २ हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेडणी (२ कोटी २१ लाख ६ हजार ५७९ रुपये) आणि २,४२६ ग्रॅम वजनाचे ९४ कॉईन्स (२ कोटी ३७ लाख ७ हजार १०० रुपये) याचा समावेश आहे.

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:7 जून रोजी पुण्यात सुमीत राघवन, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार सन्मान

पुणे-निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असल्याची माहिती बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर यांनी कळविली आहे.

येत्या शनिवार दिनांक ७ जून रोजी मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे मागील वर्षीचे सन्मानार्थी अभिनेता सुमीत राघवन आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सदर पुरस्कार ओक यांचा प्रदान करण्यात येईल.

निळू फुले यांच्यासारख्या महान कलाकाराला आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील तीन वर्षे पुण्यात हा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असून यंदा या सन्मान सोहळ्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. रोख रुपये २१ हजार, मानचिन्ह, गांधी टोपी आणि उपरणे असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या आधी ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, सुमीत राघवन यांना या कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले होते हे विशेष.

बेलवलकर संस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर म्हणाले, निळू फुले यांसारख्या दिग्गज कलाकाराप्रती आदर व्यक्त करणे, यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि नव्या पिढीला त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने आम्ही हा पुरस्काराचा उपक्रम राबवितो आहोत. प्रमुख पाहुण्यांपेक्षा मागील वर्षीच्या सन्मानार्थीने यावर्षीच्या सन्मानार्थीला सन्मानित करावे आणि ही परंपरा अशीच पुढे चालावी या कल्पनेने मागील वर्षीचे कृतज्ञता सन्मान सन्मानार्थी सुमीत राघवन यांच्या हस्ते आम्ही यावर्षी प्रसाद ओक यांचा सन्मान करीत आहोत. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते हे देखील यावेळी उपस्थित असतीत.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ३ जून रोजी महिला आयोगाच्या कार्यपद्धती, SOPs आणि अडचणींवर विशेष शासकीय बैठक

मुंबई, दि. १ जून २०२५ :
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण शासकीय बैठक मंगळवारी दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया (SOPs), अंतर्गत अडचणी, अंमलबजावणीची स्थिती, तसेच आयोगाकडुन असलेल्या अपेक्षांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा यावर सविस्तर विचारमंथन होणार आहे.

या शासकीय बैठकीनंतर दुपारी १२:०० वाजता महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या संवादातून सामाजिक कार्यकर्त्यांचे अनुभव, अपेक्षा आणि सूचना समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून आयोगाच्या कामाबाबत संवाद घडवण्याचा हेतू आहे.बैठका फक्त निमंत्रिताकरता आहे.

या दोन्ही सत्रांकरिता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या उपस्थित राहणार आहेत.

अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले,पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने करा – बाळासाहेब थोरात

शेतकरी कर्जमाफीचा भाजपा युती सरकारला विसर, केवळ कोरड्या घोषणा नको, कर्जमाफी जाहीर करा.

कृषीमंत्र्यांनी संवेदनशिलपणे बोलावे, जनतेला दुखावणारी वक्तव्ये करू नये, कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी तर बागायती विभाग कोणता ?

आ. सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना खूप काही दिले, त्यांना खूप शिकायचे आहे, त्यांनी आत्मचिंतन करावे.

मुंबई, दि. २ जून २०२५

महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाची असल्याचे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, मे महिन्यात काही पीके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले, केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, टोमॅटो, कांदा, डाळिंब पिकाचेही नुकसान झाले आहे. घऱांची पडझड झाली, काही ठिकाणी पशुधन गेले, पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, रस्त्यांचे नुकसान झाले आहे, जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे खरिपाची तयारी सुरु असतानाच हे संकट ओढवल्याने आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, शेतकरी मोडून पडला आहे. पण सरकारची मदत करण्याची मानसिकता दिसत नाही. एनडीआरएफच्या निकषाने मदत करायची की एसडीआरएफच्या निकषाने ह्यात शेतकऱ्याला काही देणेघेणे नाही, त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे. सरकारने ३ हेक्टरचा निकष बदलून २ हेक्टर केला हे आणखी अन्यायकारक आहे. पीक विम्याचे निकष बदलल्याने त्यातूनही फारशी मदत मिळत नाही. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पण प्रत्यक्षात प्रशासन काम करताना दिसत नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला पाहिजे पण तसे होतानाही दिसत नाही. आज कांद्याला एकरी ६० हजार रुपये खर्च येतो तर टोमॅटोला एकरी ५० हजारांचा खर्च येतो. शेती करणे महाग झाले आहे. सरकारने अशा संकटावेळी शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे.

निवडणूक प्रचारावेळी भाजपा युतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडलेला दिसत आहे. काँग्रेस आघाडी सरकार व मविआ सरकार असताना शेतकऱ्याला सातत्याने मदत दिली, कर्जमाफी केली पण आत्ताचे सरकार कर्जमाफी वर बोलत नाही. शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केवळ कोरड्या घोषणा करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे, असे थोरात म्हणाले.

कृषिमंत्र्यांनी संवेदनशिलपणे बोलावे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याची गरज असते, आपण पालक आहोत अशी विधाने करून दुखवू नये, संवेदनशीलपणे वागले पाहिजे. कृषीमंत्री हे पद महत्वाचे आहे, मी स्वतः या विभागाचा मंत्री होतो, शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते पण कोकाटे यांनी ती ओसाड गावची पाटीलकी का वाटते हे माहित नाही. कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी आहे तर मग बागायती विभाग कोणता हे त्यांनी सांगावे, असा टोलाही थोरात यांनी लगावला.

आ. सत्यजित तांबेंचे विधान बालीशपणाचे!
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्यासाठी ज्यांनी काही केले त्याचे ऋण ठेवावे. काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिले आहे. त्यांचे बोलणे बालीशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे असेही थोरात म्हणाले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशासन व संघटन गणेश पाटील, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते चरणजित सिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.

नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

पुणे

पुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी आज पदभार स्वीकारला. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महापालिका क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासोबत; समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचित केले.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आ. भीमराव तापकीर, हेमंत रासने, माजी नगरसेवक गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, वर्षाताई तापकीर, दीपक पोटे, गणेश कळमकर, राहुल भंडारे, रविंद्र साळेगावकर, महेश पुंडे, सुभाष जंगले, प्रमोद कोंढरे,आदी उपस्थित होते.

पीएमपी ची भाडेवाढ हि महापालिका निवडणुकीसाठी राजकीय खेळी- संजय मोरेंचा आरोप

पुणे- दस मे बस अशी घोषणा करत निवडणुका लढवलेल्या भाजपने आता महापालिका निवडणुका तोंडावर येताच प्रशासनाला हाताशी धरून पीएमपीएमएल बस ची भाडेवाढ केली असून निवडणुका जवळ येताच ती मागे घेऊन लोकांची सहानुभूती मिळविण्याचे राजकीय षड्यंत्र भाजपा खेळत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. लोकांना मूर्ख समजून ते खेळत असलेल्या या राजकीय चाली लोकच हाणून पाडतील , हेल्मेट सक्ती साठी भाजपने भाजपच्या विद्यमान खासदारांनी आंदोलने केल्याचे लोकांना आठवत असेल आणि त्यानंतर राज्यात , केंद्रात सक्ती असतानाही अजूनही लोक हेल्मेट सक्ती साठीची दंड वसुली बिनबोभाट सहन करत आली आहे . या सर्व गोष्टींचा विचार महापालिका निवडणुकीत लोकांनी करावा असे मोरे आणि बधे यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेल्या पीएमपीएमएलच्या मार्फत बस सेवा पुरवण्यात येते कमीत कमी पैशांमध्ये सार्वजनिक वाहतूक पुरवणे हा उद्देश आहे परंतु अनेक वेळेस भाडेवाढ करण्यात आली. आता ही दरवाढ दुपटीने करण्यात आली आहे ही बेकायदेशीर, पुणेकरांना त्रास देणारी दरवाढ आहे. याचा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.

अनेक वर्ष पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता आहे भाजपाच्या अनेक नेत्यांनी पुणे शहरातील व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक कमी दरात देण्याचे आश्वासन दिले. भाजपच्या राजकीय रणनितीप्रमाणे खोटी आश्वासन भाजपाने दिली. त्या खोट्या आश्वासनाला पुणेकर व पिंपरी चिंचवड नागरिक फसले गेले. त्यांना मते दिली व ठरल्याप्रमाणे त्यांनी मत मिळाल्यानंतर आश्वासन पूर्ण केली नाहीत. याची अनेक उदाहरणे आहेत उदाहरणार्थ दस मे बस ही योजना मागील सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाकडून देण्यात आली होती. निवडणुका जिंकल्या आणि आश्वासनांचा विसर भाजपाला पडला.
भाजप सत्ताधारी असल्याकारणाने पी एम पी एम एल चा वापर राजकारणासाठी करत आहे. आज भाजप पी एम पी एम एल ची भाडेवाढ करत आहे. त्याच्यातले काही नेते जसे भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर त्याला विरोध करत आहेत. सत्ता तुमची, निर्णय तुमचा, विरोधहि तुमचाच असं होत नाही. संदीप खर्डेकर विरोध करण्यापेक्षा तुमच्या भाजपाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय राज्यमंत्री ना मुरलीधरजी मोहोळ व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मतासाठी काय षडयंत्र केले याचा जाब विचारण्याची हिंमत असेल तर विचारा, अन्यथा नोटंकी बंद करा.
पी एम पी एम एल ची भाडेवाढ करण्याची गरज नाही तर त्याच्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्याची गरज आहे. हे आपल्या सर्व राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक नेतृत्वाला माहित आहे.
पी एम पी एम एल चे स्वतःचे आगार कॉन्ट्रॅक्टर वापरतात व सर्व सुख सुविधाचा वापर मोफत केला जातो. तसेच सी इ आर टी च्या गाड्यांचा गाईडलाईनचा भंग करून कॉन्ट्रॅक्टरच्या जास्तीत जास्त गाड्या चालवल्या जातात व कमीत कमी गाड्या पी एम पी एम एल च्या चालवल्या जातात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची व त्यांच्या जवळच्या हितचिंतकांची अधिकाऱ्यांची घर भरली जातात. याची माहिती आपल्या सर्व नेत्यांना आहे. याबाबतची भूमिका भाजपाने स्पष्ट करावी. आपल्या काही चाणक्य नेत्यांची मतांसाठी राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पी एम पी एम एल त्वरित भाडेवाढ करायची व पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका घोषित झाल्या की भाडेवाढ कमी करायची व नवनवीन योजना सुरू करण्याची ही रणनीती आहे का याचेही स्पष्टीकरण भाजपाने द्यावे. आता निवडणुका जवळ आल्यामुळे पुणेकरांना व पिंपरी चिंचवड करांना कसे फसवायचे कसे खोटे आश्वासन द्यायचे व निवडणुकीपर्यंत कशा मोठमोठ्या योजना द्यायच्या हा षड्यंत्राचा भाग आहे हे पुणेकर व पिंपरी चिंचवड नागरिक समजतात कारण ही पहिली वेळ नसून असे अनेक वेळा झाले आहे.असेही मोरे आणि बधे यांनी म्हटले आहे.


द्वेषाचे राजकारण टाळून आपलेपणाने माणूस जोडायला हवा-प्रा. सुभाष वारे

बंधुता दिनानिमित्त सातव्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन

पुणे: “पहलगाम घटनेच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकरण करण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र, सामान्य माणूस आणि काश्मिरी जनतेने त्यांचा हा डाव हणून पाडला. आरक्षण, आर्थिक विषमता, जातीवाद यातून समाजात फूट पाडण्याचे काम होत असताना बंधुतेच्या भावनेतून आपलेपणाने माणूस जोडायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी केले. समाजामध्ये बंधुता व समतेचा विचार पेरण्याचे काम बंधुता परिवाराकडून होत असल्याचे गौरवोद्गारही प्रा. वारे यांनी काढले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनाच्या निमित्ताने आयोजित सातव्या बंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन सोहळ्यात प्रा. सुभाष वारे बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात काव्यमहोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. भारती जाधव, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते.

यावेळी सिराज शिकलगार लिखित ‘गझल प्रकाश’ गझलसंग्रहाचे, ‘भारत: विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र’ साहित्यकृतीचे प्रकाशन झाले. अरुण पुराणिक (पुणे), प्रभाकर शेळके (जालना), राजू आठवले (अकोला), पालवी पतंगे (मुंबई), तुकाराम कांबळे (नांदेड) सरला कापसे (वर्धा), राजश्री मराठे (हैद्राबाद), राजेश नागूलवार (वर्धा), मनीषा गोरे (सोलापूर), हृदयमानव अशोक (पुणे), प्रतिभा विभुते (पुणे) यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. सुभाष वारे म्हणाले, “चळवळीत ‘विचार पेरा कृती उगवेल’ हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. सकारात्मक, शाश्वत काम व्हायचे असेल, तर ध्येयासक्त होऊन सदोदित प्रयत्नशील रहायला हवे. बाबासाहेबांनी बंधुता व समता या दोन मूल्यांची कमतरता असल्याची खंत संविधान सभेत व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या विचारांना पुढे घेऊन जात बंधुता परिवार माणसाला माणूस जोडत आहे. समता ही समाजाच्या भल्यासाठी हवी. आज मुस्लिमांना व्हिलन ठरवण्याचे काम होतेय. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही खरे गुन्हेगार मोकाट आहेत. समाज घडायचा असेल, तर पुस्तक वाचायला हवीत. मुस्लिम धर्मातही चांगला माणूस घडण्यासाठी काही सुधारणा, प्रबोधन आवश्यक आहे.”

अध्यक्षीय भाषणात सिराज शिकलगार म्हणाले, “कवी हा कवितेच्या माध्यमातून समाजातील व्यथा मांडत असतो. शब्दांमध्ये समाजात बदल करण्याची ताकद असते. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेतील साहित्य हे समकालीन कालखंडात लिहले गेलेले असते. त्यामुळे त्यावर सद्यपरिस्थितीनुसार आकलन करणे योग्य नाही. प्रमाण भाषेचा वापर करून लिखान व्हायला हवे. परंतु भाषेची मोडतोड, मराठी भाषेचे विद्रुपीकरण होऊ नये. परभाषेच्या नादात उचलेगिरी केली जाते. त्यामुळे लिखाणात चुकीच्या शब्दांचा वापर होऊन मराठी भाषेचा ऱ्हास होण्याची भीती असते.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुता चळवळीत प्रेमाचे अंतःकरण असलेल्या अनेकांची साथ मिळाली. गेल्या पन्नास वर्षात माणुसकी जपण्याचे काम करता आल्याचे समाधान आहे. समृद्ध, प्रामाणिक माणूस म्हणून प्रत्येकाने बंधुतेचा विचार पेरला पाहिजे. आज युद्धजन्य परिस्थितीत बुद्धाच्या, बंधुतेच्या विचारांची समाजाला गरज आहे.”

प्रा. भारती जाधव यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आभार मानले.

७ जूनपर्यंत सर्व रस्ते चकाचक आणि ठकाठक करा ,कोणतेही कारण चालणार नाही,पावसाळा गेल्यावरच ठेकेदारांना बिले द्या- ओमप्रकाश दिवटेंनी सुनावले

पुणे- शहरभर असलेले रस्ते , खोदलेले रस्ते येत्या ७ जून पर्यंत चकाचक आणि ठकाठक करा . कोणतेही कारण चालणार नाही, आणि हा पावसाला पूर्ण झाल्यावर हिवाळ्यातच या संदर्भातील ठेकेदारांची बिले काढा असे स्पष्ट निर्देश आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी येथे दिले.

पावसाळ्यापूर्वी मनपाच्या विविध विभागांना त्यांच्याकडील कामकाजासाठी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे . संबंधित विभागाच्या सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे समवेत आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी आढावा बैठक घेतली.या बैठकीस मुख्य अभियंता ( पथ ) अनिरूध्द पावसकर , मुख्य अभियंता ( मलनि:सारण) .जगदीश खानोरे , मुख्य अभियंता ( विद्युत )श्रीमती मनिषा शेकटकर, मुख्य अभियंता ( पाणीपुरवठा ) नंदकिशोर जगताप तसेच संबंधित विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये सर्व संबंधित विभागांच्या पथ विभागाकडुन दिलेल्या रस्ते खोदाई परवानगीच्या सर्व ठिकाणच्या तसेच प्रमुख रस्त्यावरील ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. काही अपवाद वगळता बहुतांश विभागांचे काम झालेले असून रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे , या सर्व खोदलेल्या रस्त्यांचे पर्नपृष्ठीकरण आवश्यकता भासल्यास जास्त मनुष्यबळ वापरून दिनांक ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी दिले.
पुर्नपृष्ठीकरण करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित म.न.पा. कनिष्ठ अभियंते यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत हि कामे करून घ्यावी. तसेच त्या कामांची देयके पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये. आपत्ती निवारण संदर्भातील करावयाची खोदाई आणि कामाच्या संदर्भात पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवण्यात येऊन काम करावे अशा सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खराडी – वाघोली, पुणे येथे गोदरेज प्रॉपर्टीजने 14 एकर जमीन संपादित केली

या प्रकल्पातून अंदाजे 4,200 कोटी रुपये महसूल निर्मितीचा अंदाज

 पुणे
गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: गोदरेजप्रॉप) या भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट
डेव्हलपर्सने खराडी – वाघोली, पुणे येथे – 14 एकर जमीन विकसित करण्याची घोषणा करत त्यासाठी जमीनही
संपादित केली आहे
.या जागेवर प्रामुख्याने प्रीमियम गटातील घरे उभारली जातील. या प्रकल्पाची विकासक्षम क्षमता ~3.7 दशलक्ष
चौरस फूट आणि अंदाजे महसूल क्षमता- 4,200 कोटी- रुपये असेल.

 
पुण्यातील खराडी येथील प्रमुख व्यापारी केंद्रांजवळ ही जागा असल्याने शाळा, रुग्णालये, मॉल्स, रेस्टॉरंट्स तसेच
मोठी हॉटेल्स, अशा जीवनावश्यक गोष्टी हाकेच्या अंतरावर उपलब्ध होऊ शकतात. तसेच छत्रपती संभाजी महाराज
आंतरराष्ट्रीय विमानतळही येथून जवळच आहे.

 
पुण्यातील प्रमुख आयटी आणि बिझनेस हबपासून जवळ असल्याने तसेच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि
वाढत्या सामाजिक बदलांमुळे खराडी-वाघोली मायक्रो मार्केट या भागाला सध्या राहण्यासाठी प्रचंड मागणी आहे.
काम करणाऱ्यांकडून या भागाला सातत्याने प्राधान्य मिळत असल्याने हा भाग वेगाने विकसित होत असून
पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या विस्तारासाठी कारणीभूत ठरतो आहे.

 
गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, खराडी – वाघोली
हे पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण असून या मायक्रो मार्केटमध्ये प्रवेश करताना आम्हाला आनंद होत
आहे. यामुळे पुण्यातील आमचे स्थान भक्कम होते. तसेच भारतातील प्रमुख मायक्रो मार्केट्समध्ये आमची उपस्थिती
मजबूत करण्याच्या आमच्या धोरणाशी हे जोडलेले आहे. उत्तम प्रतीची घरे ग्राहकांना देणे, हे आमचे लक्ष्य आहे.
ज्यामुळे ग्राहकांना त्याचा दीर्घकाळ फायदा होईल.”

 

मुळशीचे चित्र बदलण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार

ना. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

मुठा खोऱ्यातील मुलींच्या शिक्षणासाठी बसचे लोकार्पण

पुणे

मुळशी हा अतिशय समृद्ध तालुका आहे. तालुक्याचे रंगवले जाणारे चित्र अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी महिलांना आर्थिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु केल्यास त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुठा खोऱ्यातील दुर्गम भागातील मुली आणि शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्याचे लोकार्पण ना‌. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी म्हसोबा ट्रस्टच्या अध्यक्षा मधुराताई भेलके, सचिव उमाताई माने, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, खरवडे गावचे सरपंच शंकरराव मारणे, दिनेश जोगावडे, माऊली ढेबे, राहुल मारणे, हभप रामचंद्र भरेकर, एन. डी. मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुळशी तालुका अतिशय समृद्ध तालुका आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी लखपती दिदी उपक्रमाअंतर्गत; देशातील ग्रामीण भागातील महिलांना उद्योग होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.मुळशी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्यामुळे मुठा खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु करण्याची तयारी दर्शवल्यास; त्यांना उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, एमपीएससी-युपीएससीतील आपला टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सारथी, पार्टी, महाज्योती सारख्या संस्थांच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करणाऱ्यांना फेलोशीप दिली जाते. त्यामुळे तालुक्यातील मुलं-मुलींनी एमपीएससी-युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांकडे वळले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करु, असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले‌.

दरम्यान, यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील दुर्गम भागातील गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.

ब्राह्मणांची संख्या बोटावर मोजण्याइतकी पण कोणतंही क्षेत्र घ्या….; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..

नाशिक : मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये परशुराम भवनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण इतिहासात कोणतंही क्षेत्र काढा, त्यात चित्पावन समाजाची लोक दिसतात.स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्रातील १० मोठी नावं काढली तरी त्यात ३ ते ४ चित्पावन ब्राह्मण समाजाची असतात.
परशुराम भवन ही सुंदर वास्तू बांधली याबद्दल मी चित्पावन ब्राह्मण संघाचं अभिनंदन करतो. त्याची उद्घाटन करण्याची संधी मला दिलीत त्यासाठी तुमचे आभार. इथं ४० मुलांसाठी हॉस्टेल उभारलंय. एनडीए किंवा इथर परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. या सामाजिक उपक्रमांसाठी मी आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.
एखादी सामाजिक संघटना ९३ वर्षे सातत्यानं काम करते. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाला एकत्र ठेवते आणि गरजूंना मदत करते अशी कमी उदाहरण दिसतात असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
ब्राह्मण समाजाच्या संख्येबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास पाहता कोणतंही क्षेत्र बघा त्यात अग्रणी चित्पावन ब्राह्मण समाजाचे लोक बघायला मिळतील. हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असतो. स्वातंत्र्य लढा, सामाजिक सुधारणा, कला, साहित्य या कोणत्याही क्षेत्रात १० ठळक नावं काढली तर त्यात ३ ते ४ नावं चित्पावन ब्राह्मण समाजाची बघायला मिळतात.
अतिशय बुद्धिमान आणि मेहनती असा आपला ब्राह्मण समाज आहे. विषम परिस्थितीतून वर आलेला असा हा समाज सामान्य, मध्यमवर्गीय आणि गरीब असूनही स्वत:च्या कर्तृत्वाने पुढे आलेले लोक बघायला मिळतात असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, जात कधी जात नसते. जातीय व्यवस्था असू म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं म्हणणं समर्पक ठरेल. विषमता दूर करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते. ब्राह्मणांची संख्या बोटावर मोजण्यासारखी असते पण दुधात साखरेचं काम करणं हे ब्राह्मण समाजाचं काम आहे. साखर चिमूटभर असते पण दुधात टाकली की दूध गोड लागतं. साखरेसारखा गोडवा समाजात कसा निर्माण करता येईल हे आपल्याला करायचंय.