Home Blog Page 2819

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात – चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्पनामा श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रसिद्ध केला.  यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, राजस्थानचे खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी, महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव राजेश पांडे, पुणे भाजप अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना नेते शाम देशपांडे, नगरसेवक आणि भाजप शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उज्जवल केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संकल्पनामा प्रकाशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे. यामध्ये अनेक गोष्टी नव्याने समाविष्ट होतील. त्या निश्चतपणेच पूर्ण करु. रस्ते, पाणी, वीज आदी सुविधांसोबतच शहरात मेट्रोची सुरु असलेली कामे जलदगतीने पूर्ण करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करुन, त्यामध्ये ई-व्हेईकल समावेश करणे आदी विषयांवर काम करणार असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य

शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगतानाच श्री. पाटील म्हणाले की, “कोथरूडमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासोबतच अंथरुणाला खिळलेल्या वयोवृद्धधांसाठी सेवा केंद्र उभारण्याचा माझा संकल्प आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने त्यांच्यासाठी एखादे पर्यटन केंद्र विकसित करण्याचा मानस आहे. या पर्यटन केंद्रामध्ये चार दिवसाची वयोवृद्ध मंडळींची सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून देणार” असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोथरूडमध्ये सांस्कृतिक विद्यापीठ उभारणार

पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यासोबतच सांस्कृतिक केंद्र देखील असल्याचे सांगून, भारतीय संस्कृतीची जगाला ओळख व्हावी, यासाठी कोथरूडमध्ये सांस्कृतिक विद्यापीठ उभारण्याचा मानस यावेळी श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसृष़टीसाठी पाठपुरावा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रकल्प अद्याप का कार्यन्वित झाला नाही, कोणत्या टप्प्यावर यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत याचा पाठपुरावा करु,” असे यावेळी त्यांनी आश्वस्त केले.
झपाट्याने वाढलेल्या कोथरूड करांना पुरेशा व दर्जेदार मूलभूत नागरी सुविधा देण्यात येतील असे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले.
सिनेअभिनेते आणि खासदार सनी देओल यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची कोथरूड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन अनौपचारिक चर्चा केली. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी चंद्रकांत दादांना शुभेच्छा दिल्या.

पूरसंकटाबाबत नागरिक, प्रशासन-राज्यकर्त्यांनी जागे व्हावे

0
मराठी विज्ञान परिषद आयोजित ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’ या परिसंवादात मान्यवरांचा सूर
 
पुणे : “शहरी पूरसमस्येबाबत खबरदारी म्हणून बांधकामाकरीता नैसर्गिक प्रवाहावर होणारी आक्रमणे थांबवावीत. नदी स्वच्छता, तसेच मैला व्यवस्थापन याकडेही लक्ष द्यावे. लाल आणि निळ्या रेषा ठळक केल्या जाव्यात. पुराच्या संकटाची तीव्रता आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, याबाबत नागरिकांनी सजग होत प्रशासन आणि राज्यकर्त्यांना जागे करायला हवे,” असा सूर ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’ या विषयावरील परिसंवादामध्ये निघाला. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स यांच्या वतीने ‘शहरी पूरसमस्या : सत्य व मिथक’वर शिवाजीनगर येथील फिरोदिया सभागृह आयोजित परिसंवादात डॉ. दि. मा. मोरे, अभिजित घोरपडे, नंदकुमार वडनेरे, सतीश भिंगारे, प्रा. पराग सदगिर या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी परिसंवादाचे संचालन केले.
डॉ. दि. मा. मोरे म्हणाले, ”पावसाचे प्रमाण बदलले आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडतो. उशीरा पाऊस आणि अती पाऊस यामुळे खरिपाचे पीक धोक्यात येते. खरिपाच्या शेतीसाठी हा खूप प्रतिकूल पाऊस आहे. तसेच पुणे शहराच्या वाढिला कुठेतरी मर्यादा असणे आवश्यक आहे. शहराची जी नैसर्गिक स्थिती आहे, ती तेवढीच राहू देऊ द्यावी.” सतीश भिंगारे म्हणाले, “एकाच वेळी पडणारा धोधो पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली. पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र विभाग हवा. ही नैसर्गिक आपत्ती असून, आपल्याला ते थांबवणे शक्य नाही. त्यावर नियंत्रण मिळणेच आपल्या हाती असून, त्यासाठी शहराची रचना करताना नद्या, नाले, ओढे ह्यात बदल होणार नाहीत याची काळजी घ्यावी.”
नंदकुमार वडनेरे म्हणाले, “यावर्षी कोयना खोऱ्यामध्ये प्रचंड पाऊस पडला. १२ दिवसात ४५७ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. निसर्गात मानवाने बदल केल्याने हे परिणाम दिसत आहेत. पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उसाची शेती हेदेखील यामागील कारण आहे. शहरातील नद्यानाले, ओढे बुजवु नयेत.” ”विकासाच्या नावाखाली नैसर्गिक प्रवाहावर अतिक्रमण होत आहे. पुण्याचे धोरणकर्ते आणि प्रशासन याला जबाबदार आहेत. नदी स्वच्छता, मैला व्यवस्थापन, स्वच्छता हे प्राधान्य क्रमाचे विषय आहेत. प्रशासन आणि राज्यकर्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, यासाठी नागरिकांनी त्यांच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे,” असे अभिजित घोरपडे म्हणाले.
डॉ. पराग सदगीर म्हणाले, “शहरीकरणामुळे भूमिवापरात फार मोठा बदल होतो आहे. अच्छिद्र पृष्ठ्भागामुळे पाणी मुरत नाही व ते वेगाने पुठे वाहत जाते. शहरी भागात मोठया प्रमाणात काँक्रीटीकरण आणि पेवरब्लॉक झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात शहरी पूर समस्यावर संशोधन व्हावे. अभ्यासक्रमात वादळी पावसाचे नियोजन अंतर्भूत करावे.” प्रस्तावना राजेंद्रकुमार सराफ यांनी केली. उपाध्यक्षा डॉ. नीलिमा राजूरकर, सहसचिव डॉ. सचिन सकटे, वसंत शिंदे यांनी सहभागी मान्यवरांची ओळख करून दिली.

तिसऱ्या आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे नेदरलँड येथे २५, २६ रोजी आयोजन

0
पुणे : जागतिक पातळीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ आणि नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ ला ही परिषद गांधी सेंटर, (इंडियन नेदरलँड्सच्या एम्बेसीची सांस्कृतिक शाखा), डेनहॅग नेदरलँड येथे होणार आहे. या परिषदेत आयुर्वेदाच्या जागतिक प्रसार वाढविण्यासाठी कार्यपद्धती, आयुर्वेद उपचार पद्धतीची व्याप्ती, आयुर्वेदासमोरील जागतिक आव्हाने, या क्षेत्रातील सर्वात अलीकडील शोध, आयुर्वेदिक शिक्षण आणि संशोधनाचे आदी विषयांवर चर्चा होणार आहेत.
 
विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. मोहन खामगावकर, पुणे येथील वैद्य हरीश पाटणकर यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे. ‘केशायुर्वेद’च्या सदस्या डॉ. गायत्री पांडव, किशोर पांडव यांच्यासह वैद्य वैभव मेहता, वैद्य कुणाल कामठे, वैद्य स्नेहल पाटणकर त्यांचे संशोधनात्मक कार्य या परिषदेत मांडणार आहेत. वैद्य रश्मी वेद आयुर्वेदीय सौंदर्य प्रसादन निर्मिती व महत्व छोट्या कार्यशाळेच्या रुपात सादर करतील, तर नागपूरचे डॉ. तपस निखारे, जयपूरचे डॉ शरद पोर्टे, रायपूरचे डॉ. के. बी. श्रीनिवास राव, मुंबईचे डॉ. प्रियांका ठिगळे-रिसबुड शोधनिबंध सादर करणार आहेत. शिक्षण मंत्रालय व दूतावासातील पदाधिकारी विचार मांडणार आहेत. येथे धन्वंतरी पूजनही करण्यात येणार आहे, असे संयोजन समितीचे सदस्य डॉ. हरीश पाटणकर यांनी सांगितले.

सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत क्विनस् टाऊन, डायमंडस्, एफ सी फाल्कन्स संघांचा उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

0
पुणे : सोलारिस क्लब  व पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित व रावेतकर हाऊसिंग यांच्या तर्फे प्रायोजित सोलारिस आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत  क्विनस् टाऊन,  डायमंडस् व एफ सी फाल्कन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. 
 
मयूर कॉलनी येथील सोलारिस क्लब टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत क्विनस् टाऊन  संघाने एस हंटर्स संघाचा 24-14 असा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.  क्विनस् टाऊन संघाकडून  तुषार वाडके,विजय हतनकर, सुरेंद्र कांदथ, रुपेश मेटकर,  सरवानन एमएन, महेंद्र प्रभुपाठक, अनंत खोडके व मंदार पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. दुस-या लढतीत डायमंडस् संघाने ओडीएमटी अ संघाचा 24-03 असा सहज पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरी गाठली. यात  ऋतू कुलकर्णी, हनिफ मेनन, अमित लाटे, अमित नेटकर,  अभिषेक ताम्हाणे, केदार शहा व अनुप मिंडा यांनी विजयी कामगिरी केली. तिस-या लढतीत  एफ सी फाल्कन्स संघाने ऍडवांटेज टेनिस संघाचा 23-10 असा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. यात  सुरेश परहाद, अभिजीत मोरे, वैभव अवघडे, गणेश देवकुळे,  केदार वेदपाठक व सुमित यांनी संघाला विजय  मिळवून दिला. पीसीएलटीए संघाने ओडीएमटी ब संघावर 24-05  असा विजय मिळवत पहिला विजय नोंदविला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:   

क्विनस् टाऊन  वि.वि एस हंटर्स 24-14(100 अधिक-तुषार वाडके/विजय हतनकर वि.वि लक्ष्मीकांत श्रोत्री/मनिष आर्य 6-3; 90 अधिक-सुरेंद्र कांदथ/रुपेश मेटकर वि.वि संजय बाबर/दिपु गलगली 6-3; खुला गट- सरवानन एमएन/महेंद्र प्रभुपाठक वि.वि मयुर कुलकर्णी/दिपक दिसा 6-4; खुला गट- अनंत खोडके/मंदार पाटील वि.वि आनंद परचुरे/सुरेंद्र देशुमख 6-4);

डायमंडस् वि.वि ओडीएमटी अ 24-03(100 अधिक- ऋतू कुलकर्णी/हनिफ मेनन वि.वि गुप्ते/कौस्तुभ देशमुख 6-0; 90 अधिक- अमित लाटे/अमित नेटकर वि.वि कोनर कुमार/चंदन निगुडकर 6-1; खुला गट- अभिषेक ताम्हाणे/केदार शहा वि.वि नितिन सिंघवी/कौस्तुभ देशमुख 6-1; खुला गट- ऋतू कुलकर्णी/अनुप मिंडा वि.वि अतूल जोशी/शगुन ठकराल 6-1);

एफ सी फाल्कन्स वि.वि ऍडवांटेज टेनिस 23-10(100 अधिक- सुरेश परहाद/अभिजीत मोरे वि.वि शरद खानापुरकर/अभिषेक ओझा 6-2; 90 अधिक- कपिल बोरावके/संज्योत तावडे पराभूत वि मुकेश ब्रम्हे/सागर शेंडगे 5-6(7-2); खुला गट- वैभव अवघडे/गणेश देवकुळे वि.वि अभिषेक ओझा/योगेश निकुंभ 6-1; खुला गट- केदार वेदपाठक/सुमित वि.वि समिर देवधर/अजिंक्य पाटणकर 6-1);

पीसीएलटीए वि.वि ओडीएमटी ब 24-05(100 अधिक -डॉ. मित्तल/गिरिश कुलकर्णी वि.वि उमेश दळवी/ज्ञानेश्वर जैद 6-1; 90अधिक- निर्मल वाधवानी/आनंत गुप्ता वि.वि राम नायर/ज्ञानेश्वर कारकर 6-0; खुला गट- विशाल साळवी/जॉय बॅनर्जी वि.वि सिध्देश्वर वाघमारे/किशोर मिरेकर 6-2; खुला गट- रवी जौहानी/कल्पेश महंत वि.वि राहुल पाटील/राज कपुर 6-2).

मॉब लिंचिंग करणारी संघी मानसिकता नष्ट करण्यासाठी काँग्रेसला सत्ता सोपवा – नदीम जावेद

पुणे-मॉब लिंचिंग द्वारे हत्या करणारी संघी मानसिकता मुळासह नष्ट करण्यासाठी काँग्रेसला सत्ता सोपवा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नदीम जावेद यांनी केले.

महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ , खड्डा झोपडपट्टी, जुना बाजार परिसरात आयोजित सभेत जावेद बोलत होते.

येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे, मोदी सरकारने आर्थिक निर्णय या परिस्थितीस कारणीभूत आहेत.बेरोजगारी वाढत चाललीय, आहे त्यांचे रोजगार बंद होत आहेत. व्यापारी, उद्योजक दुकाने, कंपन्या बंद करत आहेत.फसव्या घोषणा करून सत्तेवर आलेले हे भाजप सरकार, धार्मिक तेढ वाढवून, मुख्य प्रश्नापासून जनतेला दूर नेत आहेत. एमआयएम सारखे कट्टरवादी पक्ष भाजपलाच मदत करत आहेत, त्यामुळे त्यांच्या ईडीची धाड पडत नाही, असे स्पष्टीकरण जावेद यांनी दिले.मंगळवार पेठेतील जुना बाजार, खड्डा झोपडपट्टी मध्ये आयोजित या सभेत बोलताना महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी भाजप प्रणित महायुतीवर चौफेर हल्ला चढवला.

अल्पसंख्याक लोकांना मुद्दामहून लक्ष्य केले जात असून, त्यांच्या प्रगतीची कवाडे भाजप सरकारने बंद केली आहेत, असे सांगून ते पुढे म्हणाले की, बहुसंख्यांकांचे राजकारण खेळून भाजप सरकार सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. संविधान बदलण्यासाठी भाजप आणि संघ सतत प्रयत्न करत आहेत. आपल्या कॅन्टोन्मेंट मधील सर्व समस्या जैसे थे असून, भाजप आमदार भ्रष्टाचाराच्या चिखलात आकंठ बुडाले आहेत.

या सभेस शहर काँग्रेसचे रोहित टिळक, मेघालय काँग्रेस नेत्या जरीना हेफ्तेलॉंग, सुनिल आहेर, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक अविनाश बागवे, , यासर बागवे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी, लता राजगुरू, गुरुद्वारा ट्रस्टचे भोलसिंग अरोरा, आमिर शेख, हाजी नदाफ, नदीम मुजावर, फय्याज शेख, अजीम गुडाकुवाला, वाल्मिकी जगताप, चांदबी नदाफ, बबलू सय्यद, मुन्नाभाई शेख, मौलाना निझामुद्दीन, अस्लम बागवान, विशाल ताडे, व इतर मान्यवर कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसब्यातील शिवसेनेच्या २०० कार्यकर्त्यांचे राजीनामे (व्हिडीओ)

पुणे-विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ठरल्यानुसार जागा वाटप करण्यात आले. मात्र, जागावाटपात पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ भाजपाला गेले आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही भरला आहे. दरम्यान, कसबा मतदारसंघातील शिवसेनेच्या २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागावाटपावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

२०१४ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणाऱ्या शिवसेना-भाजपाने यावेळी युती केली. त्यामुळे अनेक ठिकाणच्या जागा वाटपामध्ये दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातून राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. महायुतीसमोरील डोकेदुखी वाढत असल्याने दोन्ही पक्षांकडून बंडखोरांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात भाजपाच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कसबा, पुणे कॅन्टोमेंट, वडगावशेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केले. पण पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. मात्र, कसबा विधानसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला अपयश आले आहे. ते भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीची रंगत वाढत असताना, आज कसबा विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला शहरात काही जागा मिळाव्यात, अशी मागणी पक्षाकडे केली होती. मात्र तरी देखील जागा मिळाल्या नाही. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर आज ही कायम आहे. पण आता शहरातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्याकडून माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. तसेच माझ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली जात आहे. हे सर्व पाहून, आता आम्ही पक्षाचा राजीनामा देत आहोत. पण अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक राहू,” असं ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

0

पुणे: निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती देत  विधानसभा निवडणुकीत नवमतदारांनी उत्साहाने व हिरीरीने सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार जनजागृती (स्वीप)कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती चित्ररथाचे उदघाटन व  विद्यार्थ्यांसाठी मतदार जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, समन्वय अधिकारी अजय पवार, स्विपच्या आशाराणी पाटील आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, निवडणूक प्रक्रिया ही खूप मोठी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदानाचा हक्क हा महत्वाचा आहे. त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे.  लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही ईव्हीएम बरोबरच व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर होणार असल्याने मतदान अधिक सुरक्षित आणि पारदर्शक झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हयाची शिक्षण, कला, उद्योग अशा विविध क्षेत्रात वेगळी ओळख आहे, मतदान टक्का वाढवून पुण्याची नवी ओळख निर्माण करायची आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेत नवमतदारांची संख्या वाढली आहे. तरुण पिढीने मतदान करून आपले योगदान देऊन लोकशाहीच्या उत्सवाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी राम यांनी मतदानासाठी आवश्यक असलेले 11 विविध ओळखपत्र,  मतदारांसाठीच्या सुविधा आदींची सविस्तर माहिती दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, 21 ऑक्टोबर हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहीजे. विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वीपचे नोडल अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली.  या प्रशिक्षणास निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे यांना आठवलेंनी दिल्या काव्यात्मक शुभेच्छा…

पुणे: पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी त्यांवर रंगत चढवली. ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, विजय आहे तुझ्या गाठीशी,” अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काव्यातून शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ शिरोळेंच्या प्रचारासाठी औंध ते खडकी बाजार अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, चिंतन शहा, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, मुकेश गवळी, परशुराम वाडेकर, विलास पंगुडवाले, शाम काची, सुरेंद्र जी भाटी, अमित बिवाल, अमर देशपांडे, दादा कचरे, योगेश कणनायर, दत्ता सावंत, अजित पवार उपस्थित होते.

“मी इथे आलो आहे सिद्धार्थ शिरोळे यांना निवडून देण्यासाठी आणि मी इथून जात आहे तुझ्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांचा बदला घेण्यासाठी,” अशी आणखी एक चारोळी देखील त्यांनी पेश केली व शिरोळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. सिद्धार्थच्या रुपानं तरुण-तडफदार उमेदवार शिवाजीनगर मतदारसंघाला मिळाला आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना केले.

दरम्यान शिवाजीनगर परिसरात सिद्धार्थ यांच्या प्रचारासाठी एका खास मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये नगरसेविका रेश्मा भोसले आणि शिवाजीनगरमधील कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले. खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक गणेश घोष, समीर धुमाळ, बाळासाहेब दारवटकर, गोपाळ देशमुख या वेळी उपस्थित होते. तर औंधमध्ये आयोजित मेळावा नगरसेवक विजय शेवाळे, पुण्याचे माजी महापौर सुरेश शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न.

0

पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले.

           जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार यादव, चंदर शेखर, मिथिलेश कुमार, देवदत्त शर्मा, दीपक सिंह, महंमद शफकत कमाल, राजीव रत्तन, गगनदीप सिंग ब्रार, समीर वर्मा, साजिदा इस्लाम रशीद आदी उपस्थित होते.

       प्रशिक्षणात निवडणूक सूक्ष्म निरीक्षकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण, मॉकपोल पध्दती, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर अधिकारी यांच्यातील समन्वय, मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य आदि बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

      मतमोजणी केंद्राची मांडणी व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य, संनियंत्रण पदधती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना अशा अनेक विषयांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लापशेटवार यांनी केले.

            या प्रशिक्षणास निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेलोतर्फे पुण्यात ‘ट्रिपल सीट’च्या स्टारकास्टबरोबर स्टारफॅन मीट अपचे आयोजन

0

पुणे, 15 ऑक्टोबर 2019 – चाहते आणि स्टार्सना एकत्र आणण्याच्या आश्वासनासह भारतातील आघाडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हेलोतर्फे स्टारफॅन मीटअपच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या मीटअपमुळे चाहत्यांना ट्रिपल सीट या रोमँटिक सिनेमातले  त्यांच्या आवडीचे स्टार्स म्हणजे अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांना भेटण्याची संधी मिळाली. दिग्दर्शक संकेत पावसेही स्टारकास्टबरोबर उपस्थित होते. हा सिनेमा 24 ऑक्टोबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेलोनेने आपल्या युजर्सना त्यांच्या पसंतीच्या भाषेत व्यक्त होण्यासाठी, त्या भाषेतल्या कंटेंटचा आनंद घेण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात 14 भाषांत उपलब्ध असलेले हेलो युजर्सना वेगवेगळ्या संकल्पना आणि विभागातील ट्रेंडिंग तसेच लोकप्रिय कंटेंट उपलब्ध करून देते. स्टारफॅन मीटअप हा हेलोच्या युजर्सना त्यांच्या आवडीच्या स्टारबरोबर कनेक्ट होण्याची व त्यांच्या आयुष्याबद्दल आणखी जाणून घेण्याची संधी देणारा उपक्रम आहे.

पुण्यात ट्रिपल सीटच्या कलाकारांबरोबर झालेल्या भेटीच्या कार्यक्रमात चाहत्यांना मराठी सिनेअभिनेता, स्क्रीनरायटर, संचालक, निर्माता आणि रंगमंच कलाकार असलेल्या अंकुश चौधरीचे आयुष्य कसे असते हे जाणून घेता आले. अंकुश 1995 मध्ये सूना येती घरा या मराठी सिनेमातून उदयास आला. सिनेमाइंडस्ट्रीत यशाच्या पायऱ्या चढत त्याने बरेच सिनेमे केले. आदित्य सरपोतदार यांच्या क्लासमेट्स या पहिल्या सिनेमात त्यानं सत्या नावाच्या कॉलेज तरुणाची भूमिका साकारली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि तो 2015 मधील अंकुशचा पहिला हिट सिनेमा ठरला.

चाहत्यांशी संवाद साधताना शिवानी सुर्वेनं या सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव मांडला. ती स्टार प्लसवरी जाना ना दिल से दूर मालिकेतील विविधा या भूमिकेसाठी तसेच स्टार प्रवाहवरील देवयानी मालिकेतील देवयानीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

क्लासमेट्स या सिनेमातून पर्दापण करणाऱ्या अभिनेत्री पल्लवी पाटीलनेही तिचा अनुभव चाहत्यांशी शेयर केला.

हेलोतर्फे आयोजित केला जाणारा स्टारफॅन हा कार्यक्रम चाहते व कलाकारांमधली दरी दूर करतोच, शिवाय चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला प्रत्यक्षात भेटण्याची संधी देतो. स्टारफॅन भेटीचे पहिले दोन कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आले होते. तेव्हा चाहत्यांना अभिनेत्री, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक प्रियांक शर्मा व प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांना भेटण्याची संधी मिळाली होती.

हेलोबद्दल

हेलो हा ग्लोबल देसीजसाठी बनवण्यात आलेला आघाडीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सर्वांना एकत्र आणून त्यांना स्वतःच्या भेषत संवाद कंटेंटची निर्मिती करण्याची व तो शेयर करण्याची संधी देणे तसेच त्यांना अधिक मोठ्या समाजाशी जोडणे हे हेलोचे मिशन आहे. हिंदी, तमिळ, मल्याळम अशा 14 भारतीय भाषांत उपलब्ध असलेले हेलो 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अप्सपैकी एक आहे. हेलो भारत तसेच अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, सौदी अरेबिया, युएई, ओमान, कुवैत, कतार, नेपाळ, श्री लंका, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशमध्ये अँड्रॉइड व आयओएसवर उपलब्ध आहे.

राज ठाकरेंना नैतिक अधिकार राहिलेला नाही – खासदार संंजय काकडे

पुणे : कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन अशी भाजपाची सर्व टीम पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष गेली होती. पूरग्रस्तांच्या पूनर्वसनाचे आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे काम फडणवीस सरकारने आणि भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. गिरीश महाजन पाण्यात उतरुन पूरग्रस्तांच्या मदतीला गेले. याऊलट राज ठाकरे फक्त घरात बसून किंवा सभांमधून बोलतात, टीका करतात. सांगली-कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज ठाकरे गेल्याचे दिसले नाही. त्यामुळे यासंदर्भात टीका करण्याचा राज ठाकरे यांना नैतिक अधिकारच नाही, अशा खरमरीत शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
रेश्माताई भोसले मित्र परिवाराच्या वतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात खासदार संजय काकडे बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका रेश्मा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची घोडदौड सुरू आहे. मुंबईसह पुणे व नागपूरमध्ये 350 किलोमीटर पेक्षा अधिक मेट्रो प्रकल्प, पाणी व शेती विकास, महिला सबलीकरण, आरोग्य, उद्योग अशा सर्व क्षेत्रात गतीने विकास प्रकल्प फडणवीस सरकारने राबविले. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात फडणवीस सरकार येण्यासाठी सिद्धार्थ शिरोळे यांना निवडून द्या, असे आवाहन खासदार संजय काकडे यांनी आज केले.

शिरोळे घराणं हे भाजपशी एकनिष्ठ आहे. अनिल शिरोळे यांचे नाव पुणे लोकसभासाठी अंतिम झालेले असतानाही पक्षाने घेतलेला निर्णय त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता मान्य केला. त्यामुळे अशा एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील सिद्धार्थ शिरोळे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.
राज यांना आता फक्त पेपर वाचायचं काम राहील! – खा. काकडे
राज ठाकरे यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. घरात बसून बोलण्यामुळे व सभांमधून फक्त टीका करण्यामुळे महाराष्ट्रातील कोणीच त्यांना गांभिर्याने घेत नाही. विकासात्मक धोरण आणि संघटनात्मक काम नसल्यानेच राज ठाकरे यांना माणसं सोडून जात आहेत. मागच्यावेळी त्यांचा एक आमदार निवडून आला. तोही त्याच्या स्वतःच्या कामामुळे आणि तोही नंतर शिवसेनेत गेला. यावेळी तर, त्यांचा एकही आमदार निवडून येईल असे वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना या निवडणुकीनंतर फक्त पेपर वाचण्याचेच काम शिल्लक राहील, असा चिमटाही खासदार संजय काकडे यांनी राज यांना काढला.

पाच वर्षात तुम्ही काय केले हे जनतेला सांगा” -शरद पवार

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अध्यक्षशरद पवार यांनी पुण्यातील हडपसर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मी काय केले? हे तुम्ही मला विचारण्याची आवश्यकता नाही, त्यापेक्षा सत्ता तुमच्या हातात असताना, तुम्ही पाच वर्षात काय कामं केली? हे जनतेला सांगा, असे पवारांनी यावेळी म्हटले. तसेच, माझं नाव घेतल्याशिवाय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांची भाषणं देखील पूर्ण होत नसल्याचाही त्यांनी यावेळी टोला लगावला.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रभारी शहर अध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचार सभांमधून शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले आहे? असे सतत विचारत आहेत. मात्र, राज्याच्या जनतेला माहिती आहे की, मी काय केले आहे. याचा तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे तुम्ही पाच वर्षात काय कामं केली? हे जनतेला सांगा. मी देशाचा कृषीमंत्री असताना, गहु, तांदूळ आणि ऊस उत्पादन कसे वाढवता येईल. यावर भर देण्याचे काम केले आहे, नवनवीन उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी चालना देण्याचे काम केले आहे, कृषिमंत्री पदाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. मात्र, हे भाजप सरकार आल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरुणाच्या हाताच रोजगार गेला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने पाच वर्षात काय कामं केली आहेत? हे एका तरी भाजपाच्या नेत्याने सांगावे, असे त्यांनी यावेळी आव्हान केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका बाजूला यंदाच्या निवडणुकीत आमच्या समोर उमेदवार नाही, असे सांगत आहेत. मग दुसरीकडे राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा कानाकोपर्‍यात का घेतल्या जात आहेत? असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, या प्रचार सभांमुळे एकच गोष्ट स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे या सरकारला मागील पाच वर्षात सर्व सामान्य जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच आता पुन्हा सत्ता येणे शक्य नाही असे दिसत असल्याने भाजपाकडून एवढ्या सभांचा सपाटा लावला जात आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

माझ नाव घेतल्याशिवाय पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांची भाषणं पूर्ण होत नाहीत : शरद पवार
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे कार्यक्रम किंवा सभेसाठी आल्यावर भाषणा दरम्यान माझ नाव आवर्जुन घेतात. माझ नाव घेतल्या शिवाय त्यांची भाषणंच पूर्ण होत नाही आणि त्यांना जमतही नाही. पण एवढा वेळ नाव घेतात, हे पाहून झोपत देखील माझे नाव घेत असतील असं मला वाटतं. या दोघांपैकी नरेंद्र मोदी हे एकटे आहेत. तर अमित शाह कुटुंबाबरोबर राहतात, जर त्यांनी झोपत माझं नाव घेतले तर काय होईल? असं शरद पवार यांनी म्हटले

काँग्रेसने आणलेला अन्न सुरक्षा कायदा भाजपने रद्द करून गरिबांच्या तोंडाचा घास हिरावला – रमेश बागवे

0

पुणे-काँग्रेसच्या कारकिर्दीत तूरडाळ, गॅस, रॉकेल वगैरे जीवनावश्यक वस्तू गरिबांच्या आवाक्यात होत्या, त्यासाठी काँग्रेसने अन्न सुरक्षा कायदा केला होता, मात्र भाजप सरकारने तूरडाळ 200 रुपये किलो, गॅस साडेआठशे वर नेऊन ठेवला, रॉकेल तर बाजारातून गायबच झाले, भाजपने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला, अशी खरमरीत टीका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाघाडीचे कॅन्टोन्मेंट मधील उमेदवार रमेश बागवे यांनी केली.घोरपडी बझार मध्ये झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.

कॅन्टोन्मेंट मधील नागरिक एफएसआय वाढवून मिळवण्याची मागणी करत आहेत, पण भाजपच्या ताब्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड त्याकडे दुर्लक्ष करत आहे. खुद्द कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामगारांना पगार देण्याच्या स्थितीत बोर्ड नाही. कारण केंद्राकडून बोर्डाला मिळणारा हजारो कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे सांगून त्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डावर सडकून टीका केली.

डोबरवाडी येथील मैदान लष्कराने ताब्यात घेतले तेंव्हा मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रस्ताव पाठवून घोरपडी मधील फुटबॉलपटू साठी मैदान उपलब्ध करून दिले, असे बागवे यांनी यावेळी सांगितले.

वानवडी, घोरपडी बझार याठिकाणी झालेल्या या कोपरा सभांना स्थानिक नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.

कॅन्टोन्मेंट भागातील प्रभाग क्र.21 व 7 मधील अनंत टॉकीज येथे पदयात्रेस सुरुवात झाली. श्रावस्तीनगर, बालाजीनगर, श्रीनाथनगर, निगडेनगर, कवडे मळा, अशा मार्गे जाऊन बीटी कवडे रोड येथे समारोप करण्यात आला.

या पदयात्रेस पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, स्थानिक पदाधिकारी सुरेखा कवडे, पुणे सिटी प्रियदर्शिनी काँग्रेस च्या अध्यक्षा पूनम बोराटे, शांताराम कवडे, संजय कवडे, चंद्रकांत कवडे, प्रदिप परदेशी, संकेत कवडे, नंदू निंबाळकर, प्रशांत म्हस्के, क्लेमेंट लझरस, शामराव वाघमारे, टोनी अंथोनी, अमलराज फ्रान्सिस, अलविन आनंदराज, इतर मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागातील पाणीप्रश्न,  रेल्वेगेट समस्या, बेरोजगारीचा प्रश्न,  कामगारांच्या वेतनाचा प्रश्न , सेवा सुविधांचा प्रश्न, आदी समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन बागवे यांनी यावेळी दिले, नागरिकांची बेरोजगारी दूर करण्यासाठी रमेश बागवे पूर्वी पासूनच कार्यरत आहेत .याही नंतर ते समाजातील  बेरोजगारी व दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत . यासाठीच नागरिकांनी रमेश बागवे यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने  निवडून द्यावे असे  आवाहन पदाधिकारी यांनी नागरिकांना या पदयात्रेदरम्यान केले.

कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदाराने भ्रष्टाचार केल्याने या मतदारसंघाची प्रतिमा मलिन झाली. भागाच्या विकासासाठी निधी खर्च केला नाही, पुन्हा एकदा विकासाचे वारे आणण्यासाठी मला विधानसभेत जाण्याची संधी नागरिक शंभर टक्के देतील, असा आत्मविश्वास महाआघाडीचे कॅन्टोन्मेंट मधील उमदेवार रमेश बागवे यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेवक सनी निम्हण यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

0

भाजपला शिवाजीनगर, कोथरुड मतदारसंघात होणार फायदा

पुणे  – पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक, शिवसेना उपशहरप्रमुख सनी निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शिवाजीनगर आणि कोथरुड मतदारसंघात येत असलेल्या औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण या भागात निम्हण यांचे वर्चस्व असून भाजपचे कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना याचा फायदा होणार आहे.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज (मंगळवारी) हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने निम्हण यांचा भाजप प्रवेश झाला आहे.

सनी निम्हण हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. 2012 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडून आले होते. त्यांनी औंध-पाषाण भागाचे महापालिकेत नेतृत्व केले आहे. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही सनी निवडून आले होते. त्यांचे शिवाजीनगर आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघात मोठे काम आहे. तरुण कार्यकर्त्यांचे त्यांचे मोठे जाळे आहे. शिवाजीनगर आणि कोथरुड मतदारसंघात येत असलेल्या औंध, बालेवाडी, बाणेर, पाषाण या भागात निम्हण यांचे वर्चस्व आहे. निम्हण यांच्या भाजप प्रवेशाने कोथरुड मतदारसंघातील भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची ताकद वाढली आहे. त्यांना निवडणुकीत मोठा फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

सनी यांनी नगरसेवक असताना पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडीतील सोमेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार केला आहे. ग्रामसंस्क्रूती उद्यान विकसित केले. सनी स्पोट््र्स कॉमप्लेक्स, एम्स हॉस्पीटल, सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, पंडीत भीमसेन जोशी नाट्यगृह उभारणीत पुढाकार घेऊन काम पुर्ण केले. सोमेश्वरवाडीत मुलीसांठी आठवीपर्यंत शाळा सुरु केली.
सनी हे शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे सुपुत्र आहेत. सनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता विनायक निम्हण यांच्या भुमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विनायक निम्हण यांनी तीनवेळा शिवाजीनगर मतदारसंघाचे विधीमंडळात प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख पद देखील भुषिवले आहे.

‘यांनी’ केला भाजपमध्ये प्रवेश
सनी विनायक निम्हण (माजी नगरसेवक, शिवसेना उपशहर प्रमुख )विनोद ओरसे ( माजी नगरसेवक ) अमित मुरकुटे ( माजी सदस्य शिक्षण मंडळ पुणे, शिवसेना विभागप्रमुख), राहुल शिरोळे ( शिवसेना विभागप्रमुख ) अनिकेत कपोते ( अध्यक्ष युवासेना शिवाजीनगर )प्राजक्ता गायकवाड ( क्षेत्र संघटिक शिवाजीनगर)पौर्णिमा बहिरट (शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख )वनमाला कांबळे (शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख )सोनिया मुंडे ( प्रभागप्रमुख महिला आघाडी )प्रवीण जेधे ( उपविभाग प्रमुख औंध)रमेश जुनवणे ( उपविभाग प्रमुख कस्तुरबा इंदिरा )हेमंत डबी ( उपविभाग प्रमुख मॉडेल कॉलनी )टिंकू दास ( उपविभाग प्रमुख मुलारोड )हेमंत कांबळे ( खडकी )अभिषेक परदेशी ( शिवाजीनगर )मायकल स्वामी (खडकी ), संजय निम्हण (पाषाण)

होंडा टुव्हीलर्स इंडिया- टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर रिटेल वित्त सामंजस्य करार

0

महत्त्वाची वैशिष्ट्ये –
गाडीच्या किंमतीच्या पूर्ण 100 टक्के कर्ज, झिरो डाउन पेमेंट, आकर्षक व्याजदर, कर्जाचा कालावधी 36 महिने

दिल्ली– ग्राहकांसाठी रिटेल वित्त पुरवठ्याचे पर्याय विस्तारण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडसारख्या देशातील आघाडीच्या एनबीएफसीबरोबर सामंजस्य करार (एमओयू) केला. देशभरात रिटेल वित्त पुरवठा करण्यासाठी ही भागिदारी करण्यात आली आहे.

भागिदारी औपचारिक करण्यासाठी सामंजस्य करारावर सही करण्याच्या कार्यक्रमात होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया, टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुसल रॉय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

होंडाच्या नव्या दुचाकी रिटेल वित्त भागिदारीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘वाहनांची किंमत वाढत असताना दुचाकीचे जास्तीत जास्त ग्राहक त्यांची आवडती दुचाकी खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठ्याचे पर्याय पसंत करत आहेत. बीएस- व्हीआय स्थित्यंतर जवळ आले असल्यामुळे येत्या वर्षात ग्राहकांचा कर्ज घेण्याकडे असलेला कल आणखी वाढेल असे आम्हाला वाटते. अशावेळेस टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर केलेली भागिदारी आमच्यासाठी तसेच ग्राहकांना वित्तपुरवठ्याचे सोयीस्कर पर्याय करून देणारी फायदेशीर असेल.’

टाटा कॅपिटल फायनान्सेस सर्व्हिसेस लिमिटेडबरोबर करण्यात आलेला नवा सामंजस्य करार आजपासून अमलात येणार असून होंडाच्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर, दुचाकीच्या किंमतीच्या 100 टक्के कर्ज, परतफेडीसाठी 36 महिन्यांचा कालावधी, ग्राहकाच्या पात्रतेनुसार कमी ईएमआय योजना असे अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. पसंतीचे वित्तपुरवठा भागीदार या नात्याने टाटा कॅपिटल होंडा टुव्हीलर्स इंडियाच्यचा ग्राहकांना कमीत कमी कागदपत्रे आणि सरासरी कर्जावर 5 हजार रुपयांच्या अतिरिक्त बचतीसह कर्ज वितरणाचे सोपे आणि जलद पर्याय मिळणार आहेत.