Home Blog Page 2812

भाऊबीज निमित्त दिल्ली सरकारची महिलांना भेट; डीटीसी बसमध्ये मोफत प्रवास :सुरक्षेसाठी 13 हजार मार्शल

0

नवी दिल्ली – भाऊबीज निमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाची सुरुवात केली. आजपासून दिल्लीतील महिला दिल्ली ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात डीटीसीच्या बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. एवढेच नव्हे, तर या बसमध्ये महिलांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाणार आहे. यासाठी दिल्ली सरकारने डीटीसीच्या विविध बसमध्ये 13 हजार मार्शल तैनात केले आहेत. हे लोक सुरक्षाच नव्हे, तर लोकांची मदत देखील करणार आहेत.

मार्शल्सला संबोधित करताना सीएम केजरीवाल म्हणाले, “आज मी आपल्याला सार्वजनिक बसमद्ये महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यात आत्मविश्वास भरण्याची जबाबदारी सोपवत आहे. जेणेकरून त्यांना बसमध्ये घरासारखे सुरक्षित वातावरण मिळू शकेल.” सध्या दिल्लीतल 3400 बसमध्ये मार्शल तैनात करण्यात आले आहेत.

केजरीवाल पुढे म्हणाले, “भाऊ बीज निमित्त डीटीसी बसमध्ये मार्शलची संख्या वाढून 13,000 करण्यात आली आहे. दिल्ली सरकार महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी कटीबद्ध आहे. ज्या स्तरावर बसमध्ये मार्शलची संख्या वाढवण्यात आली तशी दुसऱ्या कुठल्याही शहरात वाढवण्यात आली असेल असे वाटत नाही. दिल्ली एक मोठे कुटुंब आहे आणि मी या कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आहे. एक मोठा मुलगा म्हणून येथील माता-भगिणींना मी मोफत बस प्रवासाची सुविधा देत आहे.”

‘आलेली वेळ परत येत नाही’ …आदित्य ठाकरेंना सत्यजित तांबेंचा सल्ला

0
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला जरी जागा कमी मिळाल्या असल्या तरी ताकत मात्र वाढलेली आहे. भाजपला स्पष्ट बहुमतापासून बरंच दूर राहावं लागत असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असून शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी सुरु केली आहे. यात आता काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह केला जाऊ लागला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला दिला आहे. तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील ‘संधी’संदर्भात स्वानुभव कथन करत आदित्य यांना सल्ला दिला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये तांबे यांनी म्हटलं आहे की, 2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी ‘अध्यक्ष’ व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, ‘सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल’. पुढे सर्व जिल्हा मला ‘भावी अध्यक्ष’ म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या, असे तांबे यांनी म्हटले आहे.

शरद पवारांच्या भेटीसाठी प्रचंड गर्दी

0

बारामती: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.राज्यातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यभरात प्रचाराचे दौरे करून राष्ट्रवादीमध्ये नवे चैतन्य निर्माण केली त्या पार्श्वभूमीवर आज भूतो ना भविष्य गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि तरुण आणि आबालवृद्धांनी अलोट गर्दी शरद पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागेत केलेली आहे . देशात साजरे होणाऱ्या अनेक सणा पैकी दिवाळी हा सण मोठा मानला जातो…

पाच दिवस साजरे होणार्‍या उत्सवातील पाडव्याला विशेष महत्त्व असते. देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपल्यापरीने दिवाळी, पाडवा साजरा करतात. मात्र बारामतीत पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो. राज्यातून आलेल्या नागरिकांना सकाळी सहा वाजल्यापासूनच पवार साहेब व कुटुंबीय भेटतात. पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी रांगेत उभे असणा-या नागरिकांसाठी यावेळी ठिकठिकाणी चहा व नाष्टा सोय असते. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. मात्र राज्यात आणि देशात सरकार होती त्यावेळेस आणि सत्तांतर झाल्यानंतरही प्रथमच एवढ्या प्रचंड संख्येने गर्दी बारामतीकरांना पहावयास मिळाली आहे.

शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख शिवसेनेत प्रवेश करणार

0

नगर: क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नेवासाचे आमदार शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख उद्या मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी झालेली भेट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज नगरला जाऊन आमदार शंकरराव गडाख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नार्वेकर यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि उद्धव ठाकरे यांचे फोनवरून संभाषण घडवून आणलं. उद्धव ठाकरे यांनी गडाख यांना पाडव्याच्या शुभेच्छा देतानाच त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. यावेळी नेवासाचे आमदार शंकरराव गडाख आणि प्रशांत गडाखही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर गडाख यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी शंकरराव गडाख आणि त्यांचे बंधू प्रशांत गडाख मुंबईकडे रवाना झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा देणारं पत्रही नार्वेकर यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे गडाख यांच्या रुपाने ती उणीव भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, शंकरराव गडाख यांनी नेवासामधून क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. ही निवडणूक लढवताना त्यांनी भविष्यात गरज पडल्यास सत्ताधाऱ्यांना साथ देणार असल्याचं गडाख यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबाही दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडाख यांच्यासाठी प्रचारही केला होता. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी गडाख यांनी वेगळा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे

आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे – रामदास आठवले

0

मुंबई – शिवसेना आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री पदावरून कुरघोडी सुरु असताना रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केले आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार करावा. कारण भाजप अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी सहमती दर्शवेल असे मला नाही वाटत. यामुळे शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री होऊ द्यावे असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान दोन्ही पक्षांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे अशी शिवसेनेची मागणी आहे.

मुख्यमंत्री पदासाठी निश्चितच भाजपचा दावा

आठवले पुढे म्हणाले की, ”माझा फॉर्म्युला आहे की, भाजपा आणि शिवसेना एकत्रित यावे, कारण जनतेचा जनादेश त्यांच्यासोबत आहे. युतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. मात्र सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी निश्चितच भाजपचा दावा आहे. कारण भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत.”

पुढील चार-पाच दिवसांत निर्णय होईल

आठवले म्हणाले की, ”मी दोन्ही पक्षांशी बोलेन आणि चर्चेद्वारे या मुद्द्याचे निराकरण करण्यास सांगेन. पुढील चार-पाच दिवसांत निर्णय होईल अशी मला आशा आहे.” विधानसभेत भाजपा-शिवसेना युतीला पूर्णपणे बहुमत मिळाले आहे. भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत.

पक्षाकडून बाहेरून आलेल्यांना न्याय मिळतो मलाही मिळेल – एकनाथ खडसे

0

जळगाव – पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष वाढीसाठी लढत आहे. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाची चौकशी झाली. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. माझे तिकीट का कापले? याचे उत्तर मला मिळाले नाही. मुलीच्या विरोधात बंडखोरीच्या बाबत वारंवार बोलून काहीच कारवाई झाली नाही. तरीही मी पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे मला पक्षाकडून न्याय मिळण्याची आशा आहे. अशी अपेक्षा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी जळगावात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. यावेळी राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या 25 गोष्टी वर पुस्तक लिहण्याचा विचार करत असल्याचे खडसे म्हणाले.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज माध्यम प्रतिनिधींना जळगावातील मुक्ताई निवासस्थानी दिवाळीच्या फराळाला बोलावले होते, यावेळी त्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचे घटलेले संख्याबळ, दोन्ही पक्षातील बंडखोरी या बाबतीत आपले मत व्यक्त केले.

भाऊबीजेनिमित्त १० हजार साड्या गरीब बहिणींना भेट देण्याचा  चंद्रकांतदादांचा संकल्प -आणि त्यासाठी खुले आवाहन

0
 
पुणे- आतापर्यंत अडीच हजार साड्या जमा झाल्यात पण सुमारे १० हजार साड्या गरजू ,गरीब महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून साड्या वाटपाचा आपला संकल्प आहे असे कोथरूड चे आमदार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘मायमराठी’ शी बोलताना सांगितले .नव्या साड्या आपण वाटणार आहे  याबाबत समाजातील काही संस्था ,व्यक्ती पुढे आल्यास आणि त्यांनी हाथभार लावल्यास आपला संकल्प निश्चित पूर्ण होईल असे ते म्हणाले ,
मनसे आणि पक्षातील कोणी यास विरोध करण्याचे कारण नाही .खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांच्यासमवेत दिवाळी साजरी करा असा संदेश दिला आहे आणि हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबईतील डबेवाले ,घरगडी अशा लोकांना  फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली . मध्यंतरी मी १० जून ला माझ्या वाढदिवसाच्यादिवशी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील मुलीना ३० हजारड्रेस चे कापड आणि ५ हजार बूट वाटप केले होते .यात मला चांगला अनुभव आला . साड्या वाटपाची कल्पना सुचली तेव्हा कोल्हापुरातुल गांधीनगर मधील साड्यांच्या सेंटर मधून नव्या साड्या मला आल्या .२ ते ३ हजार साड्या आतापर्यंत आल्यात १० हजार तरी साड्या मिळाव्यात आणि त्या गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात अशी इच्छा आहे . कोथरूड मधील त्या त्या भागातील कार्यकर्त्यांची यासाठी मदत घेतो आहे . तेत्यांना नावे ,घरे माहिती असतात . असे कार्यकर्ते या साड्या पोहोचवतील असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले .
मनसे किंवा कोणी यासाठी विरोध करण्याचे कारण नाही आता काही आचारसंहितेची अडचण देखील नाही ,पण भाजपची लोकप्रियता वाढेल असे काही कार्यक्रम घेतले तर साहजिक विरोधी पक्ष त्यास विरोध करतील त्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही साड्या वाटपाचा असा जाहीर कार्यक्रम नसेल ,घरोघरी जाऊन कार्यकर्ते त्या वाटतील असे ते म्हणाले .

सत्ता वाटपासोबतच संपूर्ण कर्जमाफीची देखील कमिटमेंट घ्यावी – संदीप गिड्डे

0

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) – सध्याला राज्यामध्ये सत्तास्थापनेचे वेध लागले असून राज्यातलं प्रमुख सत्ताकेंद्र हे शिवसेनापक्षप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री बनले आहे. मातोश्री व वर्षावर दररोज नवनवीन घडामोडी होत असतानाच मातोश्रीवर शिवसेना आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपाकडून कमिटमेंट पाळताना शब्द फिरवण्याचा अनुभव सांगून सत्ता वाटपाचा फॉर्म्युला भाजपकडून लेखी घेण्यासंदर्भात विनंती केली.

याच पार्श्वभूमीवर किसानक्रांतीचे संदीप गिड्डे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी भाजपची मानसिकता तयार करणे गरजेचे असून संपूर्ण कर्जमुक्ती चे वचन पूर्ण करण्यासाठी सत्तावाटपासोबत भाजपकडून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची कमिटमेंट देखील घ्यावी अशी विनंती केली. संपूर्ण कर्जमाफी संदर्भात भाजप तितकासा उत्सुक दिसत नाही मात्र निवडणुकीदरम्यान शिवसेनेने सर्वत्र संपूर्ण कर्जमाफी चे कर्ज मुक्ती चे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीपूर्वी किसानक्रांती व राष्ट्रीय किसान महासंघाशी निगडित असणाऱ्या अनेक समन्वयकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी शिवसेना शेतकरी कर्जमाफी, हमीभाव व पीक विम्याच्या बाबतीमध्ये नेहमीच शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी वचन दिले होते. त्यानंतर प्रचारात देखील संदीप गिड्डे व सहकाऱ्यांनी जवळजवळ तीस मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवारांचा प्रचार करीत असताना संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या सोबत राहण्याचे विविध माध्यमातून आवाहन केले आहे. आत्ताच्या महायुतीसोबत सरकार स्थापन करत असताना या कर्जमाफीला भाजपने साथ न दिल्यास हे आश्वासन फुसका बार ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सत्तावाटप करण्या या पूर्वीच भाजपकडून कर्जमाफीची कमिटमेंट घ्यावी अशी विनंती संदीप गिड्डे यांनी केल्याचे समजते. यावर शिवसेना काय भूमिका घेते व भाजपा त्यास कसा प्रतिसाद देते हा येणाऱ्या काळातील औत्सुक्याचा विषय राहील.

गेल्या 40 वर्षांतील हे सर्वात मोठे यश – खासदार काकडे

0
पुणे, दि. 27 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर, राज्यातील जनतेने आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य दिले. हा अपेक्षेप्रमाणेच महाजनादेश मिळाला असून 164 जागा लढवून 106 जागा जिंकलेल्या भाजपाचे हे यश 70 टक्के आहे. गेल्या 40 वर्षांत कोणत्याही पक्षाला भाजपासारखे याप्रमाणात इतके मोठे यश मिळालेले नाही, असे रोखठोक मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.
भाजप व शिवसेनेला मिळालेला कौल आणि सरकार स्थापनेसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय काकडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व मित्र पक्ष महायुतीला सत्तेत बसण्यासाठी कौल दिला आहे. शरद पवार व काँग्रेसच्या नेत्यांनी ते विरोधात बसणार म्हणून जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे हे चाणाक्ष असून सध्या ते जादा मंत्रिपदं मिळावीत म्हणून बार्गेनिंगसाठी बोलत असावेत. राष्ट्रवादी व काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांना पिंजऱ्यातून नेले. हे शिवसैनिक अजून विसरला नाही आणि बाळासाहेबांना पिंजऱ्यातून नेणाऱ्यांसोबत जाणे हे कडवट शिवसैनिकांना कदापि आवडणार नाही. याची पूर्ण कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये निश्चितपणे सहभागी होईल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.
1995 ला शिवसेनेला 73 व भाजपला 65 जागा मिळालेल्या असताना शिवसेनेने भाजपाला मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. त्या तुलनेत आताच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाला 106 जागा मिळाल्यात व 19 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे फार न ताणता शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी होईल. आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.
निवडणूक लढवित असताना प्रत्येक पक्ष मोठं लक्ष्य ठेवत असतो. आणि निवडणुकीचा निकाल पाहिला तर, गेल्या 40 वर्षांत कोणत्याही पक्षाला मिळाले नाही इतकं चांगलं यश भाजपाला मिळाले आहे. 1999 पासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीलाही 82 पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत. त्याउलट या निवडणुकीत 164 जागा लढवून भाजपा व मित्र पक्षाला 106 जागा मिळाल्या. 19 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने 2014 च्या संख्येइतकं संख्याबळ भाजपाचे आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.

दिवाळी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरास शुभकलशाची सजावट(व्हिडीओ)

0

पुणे : आंब्याची पाने, तांब्याचा गडवा आणि नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाडके गणपती बाप्पा विराजमान झाले. दीपावलीनिमित्त केलेली ही शुभकलशाची सजावट आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासोबतच हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजविण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. अशोक गोडसे अशोक गोडसे यांसह विश्वस्त आणि कारागिरांच्या संकल्पनेतून ही सजावट साकारण्यात आली. सलग १५ दिवस ३० कारागिर याकरीता काम करीत होते. जरी वर्कचे कापड, व्हेलवेटचे कापड आणि १५० झुंबरांचा वापर सजावटीमध्ये करण्यात आला आहे.

अशोक गोडसे म्हणाले, अंध:कारवर मात करुन ज्ञानरुपी प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्यांच्या जीवनात आनंदरुपी प्रकाश येऊ देत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवापलीनिमित्त मंदिरावर झुंबरे, आकाशकंदील, पणत्या लावण्यात आल्या. यांसह मंगलआरती, पाद्यपूजन व बँडच्या निनादाने मंदिराचा परिसर देखील दुमदुमून गेला. भाविकांनी ही सजावट पाहण्याकरीता उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे रवाना !

0

आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

पुणे :दिवाळीचा आनंददायक सण सीमेवरच्या सैनिकांना साजरा करता यावा यासाठी ६०० सैनिकांसाठी फराळ ,सुका मेवा आणि शुभेच्छापत्रे आज रवाना करण्यात आली.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला. सदर्न कमांड चे सुभेदार अनिल कुमार ,सुभेदार हरी कुमार यांच्याकडे हा सदिच्छांचा ठेवा सुपूर्द करण्यात आला . हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे २६ ऑकटोबर रोजी झाला . प्राचार्य आयेशा शेख ,उपप्राचार्य गफार सय्यद, नजमा शेख ,नय्यरां शेख ,गोहर नदाफ ,डॉ आफरीन शाह ,नूरजहाँ शेख,शिक्षक वर्ग ,विध्यार्थी उपस्थित होते .

पुण्यभूषण फाऊंडेशन ‘ ची २७ वी ‘दिवाळी पहाट’ थाटात संपन्न

0

शताब्दी साजरी करणाऱ्या संस्थांचा सत्कार

पुणे :लक्ष्मीपूजनच्या पहाटेचा पुणेकरांचा उत्साह, रांगोळी -पणत्या -आकाश कंदिलांची नयनरम्य सजावट, अत्तराचा सुगंध, सनई – चौघडा, वासुदेव, पुणेरी पगडी परिधान केलेले कार्यकर्ते , शताब्दी साजरी करणाऱ्या संस्थांचा सत्कार आणि स्वर, सूर, ताल, लय , नृत्य यांची रंगलेली मैफल अशा वातावरणात ‘पुण्यभूषण ‘ पहाट दिवाळी ‘ थाटात संपन्न झाली !

महाराष्ट्राच्या ‘दिवाळी पहाट ‘संस्कृतीला सुरुवात करून देणाऱ्या  ‘त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन ‘ ची ही सत्ताविसावी दिवाळी पहाट २७ ऑक्टोबर रोजी ,रविवारी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.

अवीट गोडीची अशी ‘दीप सूर तेजाळती’ ही स्वर-सूर-नृत्य -गायन मैफल होती.


या मैफलीत अमर ओक यांचे बासरीवादन, पं. विजय घाटे यांचा तबला, शीतल  कोलवालकर यांचे कथक नृत्य, श्रीधर पार्थसारथी यांचे मृदंग वादन, सुरंजन रघुनाथ यांचे गायन आणि श्रीराम हसबनीस यांचे हार्मोनियमवादन पुणेकर रसिकांना ऐकता आले. अमर ओक, सागर पटोका यांनी साथसंगत केली.

जुगलबंदी, परण, ‘ बाजे मुरलीया ‘ नंतर अमर ओक यांनी बासरीवर राग खमाज सादर केला. ‘धन्य भाव सेवा का अवसर पाया’ या भैरवी ने या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीची सांगता झाली.मिलिंद कुलकर्णी यांनी या बहारदार मैफलीत खुमासदार शब्दांनी रंग भरले.

‘पहाट दिवाळीची,साथ सुरेल स्वरांची’ असा अनुभव देणाऱ्या या मैफलीदरम्यान शताब्दी पूर्ण केलेल्या पुण्यातील दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महात्मा फुले वसतिगृह, डेक्कन मुस्लिम लायब्ररी आणि कँप एज्युकेशन सोसायटी या संस्थांचा सत्कार केला करण्यात आला.

रवींद्र जोशी ( पुणे प्रेस असोसिएशन ), शरद कुंटे ( डेक्कन एज्युकेशन सोसायटी,) अरुण कुदळे, दीपक कुदळे ( महात्मा फुले वसतीगृह ), आबेदा इनामदार ( डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट लायब्ररी ), वालचंद संचेती ( कँप एज्युकेशन सोसायटी ) यांनी सत्कार स्वीकारला. आबेदा इनामदार यांनी पुण्यभूषण फाऊंडेशन ‘ च्या सांस्कृतिक उपक्रमांना १ लाख देणगी जाहीर केली.

कृष्णकुमार गोयल,उदय जाधव , राजेश गोयल, ‘ हिरकणी ‘ चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, धनंजय गोखले ( मैत्र फाऊंडेशन ) हे उपस्थित होते.

‘त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, “पहाट दिवाळीचा कार्यक्रम करण्यास प्रथम ‘त्रिदल’ ने १९९२ पासून  सुरवात केली. आता विदेशातही मराठी मंडळी ‘दिवाळी पहाट कार्यक्रम करू लागले आहेत.

संस्थेने या कार्यक्रमाचे वेगळेपणही जपले आहे.यात पाच पुणेकरांचा ‘पक्के पुणेकर’ असा सन्मान केला जातो.
गायिका किशोरी आमोणकर ते पंडित जसराज यांसारख्या दिग्गज कलाकारांनी ‘पहाट दिवाळी’ची मैफल आपल्या दिव्य स्वरांनी सजवलेली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात गायन-वादन केले आहे. ”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.सुरेश ( काका ) धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले.

विजयानंतर ही कोथरूड मध्ये भेटी गाठी सुरुच …

0

पुणे –
कोथरूडकर आणि पुण्याच्या समस्या सोडवून विकास पर्व कायम ठेवण्यास मी कटिबद्ध आहे, हा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पाळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर मुंबईत प्रदेश स्तरावरील बैठका आणि सरकार स्थापनेच्या घडामोडींमधून आवर्जून वेळ काढत चंद्रकांत दादा पाटील यांनी आज, शनिवारी कोथरूड संपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेतल्या. कोथरूडमधील विजय आणि दिवाळीच्या शुभेच्छांचा त्यांनी विनम्रपणे स्वीकार केला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांचे तातडीने निराकरण आणि केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत कार्यवाही करण्यासाठी ठोस पावले उचलली!
भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल आनंदच आहे. त्याचप्रमाणे कोथरूडसारख्या मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याचादेखील आनंद आहे. पण सत्कार सोहळे करण्यापेक्षा नागरिकांना दिलेला शब्द पाळणे याला माझे प्राधान्य आहे. आणि त्याच दृष्टीने आजपासून कोथरूड संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे, अशा शब्दात चंद्रकांत दादा पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
पक्षाची प्रदेश स्तरावरील जबाबदारी, मंत्रिमंडळातील जबाबदारी आणि आणि आमदारकीची जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी विविध स्तरांवर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याचादेखील चंद्रकांत दादा पाटील यांनी आढावा घेतला. याप्रसंगी संपर्क कार्यालयामध्ये कोथरूड, बाणेर, बालेवाडी परिसरातील संबंधित प्रभागांचे नगरसेवक उपस्थित होते. नागरिकांशी झालेल्या चर्चेदरम्यान संबंधित नगरसेवकांना चंद्रकांत दादा पाटील यांनी आवश्यक त्या सूचना देखील तातडीने दिल्या.
तत्पूर्वी नगरसेवक किरण दगडे पाटील आणि पियुषा दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. पुणेकर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पुणे आणि कोथरूडच्या विकासप्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना समान न्यायाने सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन देखील चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिले.
दिवसभरामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या व्यक्तीकडे गाठीभेटीदेखील चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतल्या.

१९ वर्षाखालील विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत यश बारगुजे चे यश

0
पुणे : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने टिळक रोड येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षाखालील विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या यश बारगुजे याने द्वितीय क्रमांक मिळवत यश प्राप्त केले. विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी यश बारगुजे याला मिळणार आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, फिटनेस अँड स्पोर्ट डायरेक्टर निशिगंधा पाटील, संकेत नालकर यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्रीड़ा स्पर्धांमध्ये सूर्यदत्ता संस्थेतील विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या सगळ्या खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. सामाजिक भान, सांघिक भावना, नेतृत्व, सहनशीलता आदी गोष्टी मुलांना त्यातून आत्मसात करता येतात. शिस्तीच्या सवयींबरोबरच त्यांना अपयशातून यश मिळवण्याचा विश्वास मिळतो. त्यामुळे ‘सूर्यदत्ता’मध्ये खेळांनाही तितकेच महत्व दिले जाते. फिजिकल डायरेक्टरची एक टीम विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण विकसित करण्यासाठी मेहनत घेत आहे.”

विकासकामे करूनही जनतेने अपेक्षित कौल दिला नाही, यावर चिंतन करणार – चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर – विकासकामे करूनही जनतेने आम्हाला कौल का दिला नाही असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेला केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. दरम्यान महायुतीचे सरकार येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत अपेक्षित न मिळाल्याने भाजप चिंतन करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विकासकामे करूनही आम्हाला जनतेने अपेक्षित कौल दिला नाही. मात्र जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आमचं नेमकं काय चुकले हे जनतेने सांगावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यासोबतच भाजप-शिवसेना दोघांनाही बंडखोरी शमवता आली नाही. बंडखोरीमुळेच आम्हाला अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच उदयनराजे भोसले यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सत्ता भाजप-शिवसेनेचे येणार हे सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ‘अब की बार 220 पार’ असा नारा दिला होता. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे हे स्वप्न भंगले. निवडणुकीत भाजपला 105 आणि शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या.