पुणे, दि. 4: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन, निवासाची व्यवस्था असून क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक सहल रक्कम इत्यादी करिता शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम व दरमहा रु. 500/- निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचा दाखला, पालकांचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयात शिकत असलेला बोनाफाईड दाखल, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर करणे आवयक आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दूधगंगा दुधडेअरी समोर, जुना अकलूज-पुणे बायपास, इंदापूर, जि. पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालांनी केले आहे.
पुणे– एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातून 2024 मध्ये पदवी प्राप्त केलेल्या तुषारा थुम्मलापल्ली यांनी भारतीय नौसेनेत पायलट म्हणून गौरवशाली नियुक्ती मिळवली आहे. हा क्षण विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाचा असून, देशभरातील तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
फक्त 23 वर्षांच्या वयात तुषारा यांनी नौदलाच्या विशेष पायलट गटात स्थान मिळवले आहे. अभियंता ते सैन्य अधिकारी असा त्यांचा प्रवास शैक्षणिक गुणवत्ता, निर्धार आणि राष्ट्रसेवेच्या प्रति कटिबद्धतेचे प्रतीक आहे. यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनुसार, तुषारा यांनी शिक्षण काळात नेहमीच उत्कृष्ट शैक्षणिक आणि नेतृत्वगुण दाखवले. तांत्रिक प्रकल्पांमध्ये आणि विभागीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. “पहिल्याच दिवशीपासून तुषारामध्ये अधिकारी म्हणून लागणारे शिस्तप्रियता, चिकाटी आणि प्रेरणा स्पष्टपणे दिसून येत होती. भारतीय नौसेनेत तिच्या या नव्या प्रवासास सुरुवात होत असताना, तिची प्रेरणादायी कहाणी विशेषतः तरुण विद्यार्थिनींना संरक्षण आणि वैमानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देईल”, असे यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनी म्हटले आहे.
तुषाराच्या या कामगिरीनंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, विभागाचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“एमआयटी एडीटी विद्यापीठाने मला केवळ अभियंता म्हणून घडवले नाही, तर आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार केले. येथे मिळालेले प्रत्येक शिक्षण, अनुभव माझ्या जडणघडणीसाठी मोलाचे ठरले. विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने माझ्या तांत्रिक प्रावीण्यासोबतच धोरणात्मक विचारक्षमतेच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली.”
पुणे, दि. 4: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली (ता. खेड) येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामुल्य भोजन, निवासाची व्यवस्था असून स्टेशनरी साहित्य, अंथरुण व पांघरुण दरमहा रुपये 500/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शिवाय विद्यार्थ्यांकरिता अद्यावत ग्रंथालय व संगणक कक्ष आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत.
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली ता. खेड, जि. पुणे येथे संपर्क साधावा , असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे
पुण्यासह राज्यातील जपानी कंपन्यांसमोरच्या अडचणी सोडवण्यासह रस्ते, वीज, पाणी, सुरक्षेसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर देणार –उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. 4 :- भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं.
जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एस.टी.पी., पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.
अदानीला मुंबईतील संपत्ती देण्यात महाराष्ट्राचा फायदा काय ? मदर डेअरीची जागा देण्याचा निर्णय रद्द करा.
प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहविभागाने काढलेला आदेश समाजात वाद निर्माण करणारा; वादग्रस्त जीआर रद्द करा.
काँग्रेस नेते अवकाळीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करुन नुकसान भरपाईसाठी राज्यपालांची भेट घेणार.
मुंबई, दि. ४ जून २०२५ भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन दिलेली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार आहात, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला मदत करण्यासाठी भाजपा युती सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहिण योजनेतून भगिनींना देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजपा युती सरकार तत्पर आहे. एवढे सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला काय मिळणार आहे तर फक्त भोपळा, असे सांगून सपकाळ यांनी मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली.
गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकावर बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा युती सरकार राज्यात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढत असते. आता या सरकाच्या गृविभागाने राज्यातील मंदिर, मशिदी, गुरुद्वारा, चर्च अशा सर्व प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पिकर साठी एक फतवा जारी केला आहे. प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश घालून दिलेले असताना राज्य सरकारने वेगळा फतवा काढून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, हा फतवा मागे घ्यावा अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेताच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करणार आहेत व या पाहणीनंतर राज्यपाल महोदयांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेश कार्याध्यक्ष, CWC सदस्य नसीम खान म्हणाले की, भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भोंग्याचा फतवा कढला आहे. धार्मिक स्थळावरील लाऊडस्पिकर बाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश असतानाही गृहविभागाने अशा पद्धतीने फतवा काढणे निषेधार्ह आहे. सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष, CWC सदस्य नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील उपस्थित होते.
पुणे- येथील सिंबायोसिस कॉलेजमध्ये प्रवेशाच्या नावाने फसविणारा कुणाल कुमार आपल्या पत्नीसह थायलंडला पळून जातानाच पुणे पोलिसांनी पकडला
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ सिम्बायोसीस या संस्थेचा लोगो असलेल्या संस्थेच्या इमारतीचा फोटो वापरुन वेबपेज वरुन सिम्बायोसीस संस्थेची वेबसाईट असल्याचे भासवुन सिम्बायोसीस या संस्थेमध्ये अॅडमिशन करुन देणे बाबत्त ऑनलाईन खोटी जाहीरात करुन विदयार्थ्यांना सिम्बायोसीस मध्ये अॅडमीशनचे खोटे आमीष दाखवून कॉलेज फी व्यतिरीक्त लाखो रुपयाची मागणी करुन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार या परराज्यातील इसमांविरुध्द दि.०२/०४/२०२५ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोद करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार हे तिनही आरोपी फरार झाले होते. अंगली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी यांनी दोन ते तिन वेळा सदर आरोपींचा दिल्ली, हरीयाना या राज्यात जावुन शोध घेतला परंतु ते पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पळुन जाण्यात यशस्वी होत होते. त्यानंतर तपास अधिकारी यांनी दाखल गुन्हयातील आरोपी यांचे लुक ऑऊट नोटीस जारी करुन त्यांचा दिल्ली, हरीयाना तसेच महाराष्ट्रभर कसोशीने शोध सुरु केला होता. यातील आरोपी नामे कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी, वय-३० वर्षे मुळ राज्य-बिहार याचा पुर्व गुन्हेगारी इतिहासाची माहिती घेतली असता, त्याचेविरुध्द सन-२०२१ मध्ये सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.र.नं ४६/२०२१, भा.द. वि. कलम ४१९, ४२०, १२० ब, २०१, ३४ सह आय. टी. अॅक्ट कलम ४३ (अ) (एफ) (जी) (आय), ६६ (सी), ६६ (डी) या गुन्हयात तो आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले होते. सदर आरोपी याने मा.सत्र न्यायालय, पुणे येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता दिलेला अर्ज देखील मा.न्यायालयाने फेटाळलेला होता व सदर गुन्हयातुनही तो अद्यापपर्यंत फरार असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा फसवणुक करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचा पुणे, मुंबई, दिल्ली येथे शोध घेणे कामी पोलीसांचे पथके तयार करण्यात आलेली होती. त्यानंतर दि.३१/०५/२०२५ रोजी आरोपी कुणालकुमार बिरेद्रकुमार विद्यार्थी, हा त्याचे पत्नीसह थायलंड देशात कोलकत्ता विमानतळ येथुन जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेकडील एक पथक तात्काळ कोलकत्ता येथे जावुन कोलकत्ता विमानतळ येथे सापळा लावुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. नमुद आरोपी कुमार कुणाल बिरेद्रकुमार विद्यार्थी, यास दाखल गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दि.०५/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा हे करीत आहे. सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे-१ पुणे शहर गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदिप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे, यांनी केली आहे.
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये संभाव्य युतीची चर्चा अलिकडच्या काही दिवसांपासून रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट व मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र व युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही मनसेला सोबत येण्याची साद घातली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार आहोत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
यापूर्वीही आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या फळीतील काही नेते मात्र या युतीबाबत फारसे उत्साही दिसत नाहीत.
आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्या बरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. हे त्याचंच उदाहरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेले नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी देखील योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्ष आपली ताकद मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदे या महायुतीपुढे एक ताकदवान पर्याय उभा करायचा असेल, तर ठाकरे गट व मनसे यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. परंतु, स्वतः आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यास त्यांचे काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील कथित कृषी घोटाळ्याचे पुरावे एसीबी अर्थात अँटी करप्शन ब्यूरोला दिले. तसेच या पुराव्यांमुळे आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा ठाम दावाही केला. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.
अंजली दमानिया यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एसीबीने त्यांना या आरोपांचे पुरावे देण्याचा समन्स बजावला होता. त्यानुसार, दमानिया यांनी बुधवारी अँटी करप्शन ब्यूरोच्या येथील कार्यालयाला भेट देऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत असा दावा केला.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी आज कृषी घोटाळ्याशी संबंधित दस्तऐवज एसीबीला दिले. आत्ताच्या घटकेला मी एवढेच सांगेन की, अँटी करप्शन ब्यूरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली, तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत. पण त्यांच्यावर शासकीय किंवा प्रशासनाची मेहेरबानी झाली तर मला माहिती नाही. पण आज जी काही माहिती मी दिली, ती अत्यंत खरी असून, त्यात कोणतीही शंका नाही. मी दिलेले दस्तऐवज 3 कंपन्यांशी संबंधित आहेत. त्यापैकी 2 कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होते. त्यांनी पदावर असताना एवढा मोठा कृषी घोटाळा केला. त्यात पहिल्या टप्प्यात 341 कोटींपैकी 161 कोटी खाल्ले गेलेत. हा घोटाळा नाही तर काय आहे? असे त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे काही धार्मिक विधी करत आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासही नकार दिला. पत्रकारांनी याविषयी अंजली दमानिया यांना छेडले असता त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी तोंडावर बोट ठेवले असेल तर मी काय बोलणार? मी ज्या दिवशी कृषी घोटाळा उघड केला, त्यानंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी सर्वच आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर त्यांनी मला वाट्टेल ती टोपण नावेही दिली होती. आज ती वेळ आली आहे.
आज पेपरद्वारे मी शासनाकडे खरी माहिती पोहोचवली आहे. आता त्यांना प्रत्येक गोष्टीत पुरावे देण्यासाठी यावे लागणार आहे. माझे पेपर्स एसीबीने घेतलेत. आता माझे स्टेटमेंट झाल्यानंतर त्यांना या दोन्ही गोष्टी लावून सरकारकडे परवानगी मागायची असते की, यांच्यावर कारवाई करायची की नाही? तिथे त्यांना परवानगी मिळाली, तर पुढची चौकशी होईल. अन्यथा त्यांना (धनंजय मुंडे) वरून दिलासा मिळाला तर काय होईल हे मला माहिती नाही, असे त्या म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी यावेळी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी अडचणीत सापडलेल्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनीही आपल्यावरील आरोपांत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा केला होता. त्यांनी 4 मार्च रोजी माझ्याविरोधात मानहाणीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण आजतागायत त्यांच्याकडून मला कोणतीही नोटीस आली नाही. आता जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनीही मला मानहाणीची नोटीस पाठवण्याचा इशारा दिला. पण आजपर्यंत त्यांचीही नोटीस मिळाली नाही. आज सुरेश धस यांनी त्यांच्यावर जे आरोप केलेत, ते एक्झॅटली मला देखील कळवण्यात आले होते.
आता वाल्मीक कराडची तुरुंगात जी सरबरबाई होत आहे, ती सुपेकर यांच्यामुळेच होत आहे. त्यांच्याच मेहेरबानीने बीडच्या कारागृहात जे राहत आहेत, त्याचीही माहिती मला मिळाली होती. ती भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मांडली. जालिंदर सुपेकर यांनी कैद्याकडून 300 कोटींची मागणी केल्याचा माहिती मला तुमच्याकडूनच मिळत आहे. मी जेव्हा बोलते ते पुराव्यांसकट बोलते. त्यामु्ळे धसांनी आपल्या आरोपांखातर पुरावे दाखवावे.
पुणे ता. ४ (प्रतिनिधि) : महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमात जाहिरात देण्यासंदर्भात नवे धोरण आखले आहे. या धोरणात प्रामुख्याने जास्त प्रभावी आणि मोठ्या डिजिटल कंपन्या, माध्यमे, ओटीटी यांना उपयोग होईल. व्यक्तिगत पातळीवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना याचा किती फायदा होईल याबाबत आम्हाला शंका आहे. धोरणाबद्दल त्यामुळे काही आक्षेपही आहेत. याबाबत पत्रकार संघटना आणि वृत्तपत्रे यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, प्रवक्ता सुनील माने यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, सरकारने या डिजिटल माध्यमांना जाहिराती द्याव्यात अशी मागणी २०२१ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवठाकरे, माहिती आणि जनसंपर्क मंत्री अदिती तटकरे तसेच त्यावेळेचे माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य सचिव दिलीप पांढरपट्टे यांना मी पत्राद्वारे केली होती. कोविड काळात पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडून समाज माध्यमांद्वारे पत्रकारिता करून सामान्य जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणि सरकार समोर मांडणारे, समान भूमिका ठेवणारे, विविध पातळीवर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अर्थिक मदत व्हावी हा त्यामागील माझा द्देश होता. पत्रकार हा नेहमी विरोधी पक्षाची भूमिका निभावतो. सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणारी खरी पत्रकारिता असते. त्यामुळे डिजिटल माध्यमांवर लिखाण करणाऱ्या पत्रकारांनासुद्धा सरकार तर्फे दिले जाणारे पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी ही सर्वात आधी मी २०१५ साली सरकारकडे केली होती. मात्र राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने ३ जून रोजी समाज माध्यमांना अनुसरून एक जाहिरात धोरण आपल्या विविध विभागांना पाठवले आहे. या धोरणामधून मोठ्या कंपन्या, मोठ्या वेबसाइट्स, सरकारच्या विविध धोरणांना अनुसरून काम करणाऱ्या वेबसाईट्स, सरकारची अनुषंगाने त्यांच्या धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या मीडिया व त्यांचे ब्लॉग, यू ट्यूब चॅनेल यांच्यासाठी सरकार हे आर्थिक दालन खुलं करत आहे की काय ? अशी शंका उपस्थित होते. नुकतच जाहीर झालेल्या या सरकारी जाहिराती बाबतच्या धोरणावरून सरकारच्या बाजूने काम करणाऱ्या, धनदांडग्या, परदेशी वृत्तसंस्थांना फायदा पोहचण्याची शक्यता जास्त आहे. तालुकास्तरावर, गावपातळीवरील अथवा शहरातील विशिष्ट भागातील लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना अथवा त्यांच्या माध्यमांना सरकारच्या या जाहिराती मिळतील का ? मिळल्याच तर त्या किती प्रमाणात मिळतील ? सरकारच्या म्हणजे जनतेच्या पैशाचा त्यांना लाभ होईल का ? हा खरा प्रश्न या जाहिरातीच्या धोरणातून निर्माण झाला आहे. महत्वाच्या आणि मोठ्या वृत्तसंस्थांनाच जर या जाहिराती मिळाल्या तर लहान पत्रकारांचे यात काय होईल ? अशी शंका उपस्थित करत, याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्रांच्या संघटनेने याबाबत आवाज उठवून सरकारला जाब विचारत, सरकारला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडणे गरजेचे आहे. अशी भूमिका सुनील माने यांनी मांडली आहे.
टाटाची उपकंपनी असलेल्या कॅरेटलेनने अलीकडेच एक नवे, क्रांतिकारी ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले – ‘रनवे’. विमान वाहतूक क्षेत्रातील महिलांचा उत्साह, महत्त्वाकांक्षा आणि सौंदर्याचा सन्मान यामध्ये करण्यात आला आहे. या लॉन्चसह कॅरेटलेन हा पहिला भारतीय दागिने ब्रँड बनला आहे जो आकाशात आपले कौशल्य दाखवणाऱ्या अग्रगण्य महिलांचा सन्मान करत आहे.
कॅम्पेन फिल्ममध्ये कमर्शियल पायलट, केबिन क्रू पायलट आणि लढाऊ पायलट यांच्या कथा दाखवल्या आहेत, त्यांनी या कलेक्शनमधून उड्डाणाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचे त्यांचे अनोखे मार्ग शोधले आहेत. या कॅटेगरीतील जगातील पहिले, रनवे कलेक्शन परंपरांच्या चौकटी ओलांडून आकाशाची उंची गाठतो. यात ९ कॅरेट आणि १४ कॅरेट सोने आणि हिऱ्यांमध्ये तयार केलेली २०+ डिझाइन्स आहेत. काही डिझाइन्समध्ये अतिशय आश्चर्यकारक मोबाइल एअरक्राफ्ट मोटिफ्स आहेत. प्रत्येक डिझाइन उड्डाण, धैर्य आणि उंच उडण्याच्या स्वप्नांची कहाणी सांगते.
कॅरेटलेनने मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या सिग्नेचर स्टोअरमध्ये ब्रँडने एका भव्य विशेष कलेक्शन प्रिव्ह्यू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वास्तविक जीवनातील केबिन क्रूंना यासाठी विशेष आमंत्रित केले होते. अभिनेत्री, राजकारणी आणि साहसप्रेमी गुल पनाग यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली. त्या स्वतः देखील एक परवानाधारक खाजगी पायलट आहेत.
कॅरेटलेनचे एमडी श्री. सौमेन भौमिक म्हणाले, “भारतातील विमान वाहतूक हा जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्याकडे महिला पायलटची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या काळापासून, विमान वाहतूक कर्मचारी स्टाईलचे आणि उदयोन्मुख, आधुनिक भारताचे प्रतीक मानले जात आहेत. विचारपूर्वक डिझाइन केलेले हे कलेक्शन दररोज आपले आकाश सुरक्षित, अधिकाधिक चांगले आणि स्मार्ट बनवणाऱ्या धाडसी महिलांना सन्मानित करते.”
गुल पनाग म्हणाल्या, “या कलेक्शनने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. विमान वाहतुकीने मला पंख दिले आणि आता असे दागिने आहेत जे या भावनेला इतक्या स्टायलिश आणि शाश्वत पद्धतीने साजरे करतात. हे कलेक्शन विमान उड्डाण प्रेमींसाठी परिपूर्ण आहे. उड्डाणापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे स्टाईलमध्ये उड्डाण करणे ही आहे!”
विमान वाहतूक, प्रवास आणि अशा अनोख्या डिझाइनमध्ये रस असलेले ग्राहक www.caratlane.com वर ऑनलाइन किंवा भारतातील निवडक स्टोअरमध्ये हे कलेक्शन पाहू शकतात.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन
पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदनउटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करून मंदिर सुशोभित करण्यात आले. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे मंदिरात चंदन उटी सोहळा आणि मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. अखिल भारतीय वारकरी संप्रदाय तर्फे भजन कीर्तनाचा कार्यक्रम देखील यानिमित्ताने मंदिरात पार पडला.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात चंदन उटी सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली.
पुणे –कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, अल्पवधीत हा उपक्रम अतिशय लोकप्रिय झाला. राज्यातील विविध ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांकडून या उपक्रमाबाबत विचारणा होत होती. त्यामुळे या उपक्रमाचा प्रतिसाद पाहता, कोथरुडसह इतरांनाही याचा लाभ घेता येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या निसर्ग छाया उपक्रमाने लाभार्थ्यांचा दहा हजारचा टप्पा नुकताच पूर्ण केला. त्या अनुषंगाने कोथरुड मधील पंडित फार्म येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ना. पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, निसर्गछाया उपक्रमाचे संयोजक मंदार देवगावकर, अमृता देगावकर, नवचैतन्य हास्य योगचे मकरंद टिल्लू, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना लांबचा प्रवास शक्य नसल्याने सहलीचा आनंद लुटता यावा; यासाठी दीड वर्षापूर्वी कोथरुडपासून काही अंतरावर असलेल्या भूगाव येथे निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग छाया हा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम सुरू करताना, एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विचार केला नव्हता. मात्र पुण्यासह, रत्नागिरी वगैरे अनेक जिल्ह्यांतूनही यासाठी चौकशी होत होती. कोथरुड मधील या उपक्रमाच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे याची क्षमता देखील वाढविली आहे. त्यामुळे आता कोथरुडसह इतर ठिकाणच्या ज्येष्ठांना याचा लाभ घेता यावा; यासाठी हा उपक्रम सर्वांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघात विविध २२ लोकोपयोगी प्रकल्प सुरू आहेत. याचे प्रकटीकरण आणि सर्वांना याची माहिती व्हावी, एकत्रिकरण व्हावे, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहे, यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. यातील ज्येष्ठ नागरिकांचा निसर्ग छाया उपक्रमाने दहा हजार लाभार्थ्यांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना एकत्रित करुन; मनसोक्त आनंद लुटता यावा; यासाठी आजचा सस्नेह मेळावा होत आहे. आजच्या या मेळाव्याला देखील ज्येष्ठ नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो, अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर आयोजित या मेळाव्याचा ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला.
पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील येरवडा परिसरात तलाठी कार्यालय पुन्हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात आमदार बापूसाहेब पठारे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून कार्यालय लवकरच कार्यान्वित होत असल्याचे पुणे शहर तहसिलदार यांनी सांगितले आहे.
येरवडा, फुलेनगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, विश्रांतवाडी, कल्याणीनगर व परिसरात आज रोजी लाखो नागरिक वास्तव्यास आहेत. महसूल व इतर शासकीय कामांसाठी तलाठी कार्यालयातून मिळणारे दाखले व इतर कागद घेण्यासाठी नागरिकांना खडकमाळ आळी येथील तलाठी कार्यालयात जावे लागत होते.
पठारे म्हणाले की, “येरवडा व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मागणी अतिशय योग्य होती. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. तलाठी कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांना त्यांच्या जवळच शासकीय सेवा मिळणार आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे”, असे मत व्यक्त करत त्यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
येरवडा परिसरातील नागरिकांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले असून, स्थानिक पातळीवर या कार्यालय सुरू झाल्याने मोठा फायदा होईल, असे सांगितले जात आहे.
पुणे : स्त्री सन्मान व तिचे स्वतंत्र अस्तित्व यासाठी स्व.नानाराव ढोबळे हे सत्तरच्या दशकात जागरूक होते त्यातूनच “भारतीय स्त्रीशक्ती जागरण” या संघटनेचा प्रारंभ झाला असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत वैचारिक समूह प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी येथे बोलताना काढले.
भारतीय स्त्रीशक्ती जागरण यांच्या वतीने आयोजित “एकता” मासिकाच्या ज्येष्ठ संघ प्रचारक स्व.नानाराव ढोबळे विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले की, त्या काळात विवाह करताना मुलींच्या पसंतीला अग्रक्रम द्यावा यासाठी नानाराव आग्रही होते. स्त्रीच्या शक्तीची जाणीव तिला स्वतःला करून देणे, त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न केवळ त्यांचे नसून ते स्त्री- पुरुष दोघांचे असतात असे नानारावांचे प्रतिपादन होते.संघ परिवारातील महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महिलांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा व उपक्रम सुरू करावे यासाठी “महिला समन्वय” या मंचाचा प्रारंभ त्यांच्या प्रेरणेने झाला.
नानाराव यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले की, संघकार्याच्या विस्तारासाठी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून काम करताना नानाराव यांनी संवेदनशील मन व त्याला कल्पकतेची जोड यातून धुळे जिल्ह्यातील जनजाती बांधवांच्या सहकारी शेतीच्या प्रकल्पाद्वारे त्यांना स्वावलंबी बनवले.
दृष्टि स्त्री अध्ययन केंद्राच्या संस्थापक कार्यवाह अंजलीताईं देशपांडे यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यांनी नानाराव ढोबळे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. “एकता” मासिकाच्या संपादक रुपाली भुसारी यांनी मनोगत व्यक्त केले.
स्त्री शक्ति जागरण च्या पहिल्या कार्यकारिणीतील कोषाध्यक्ष विनया मेहेंदळे आणि मा. अलका जोगळेकर (डोंबिवली) यांनी नानांच्या आठवणी सांगितल्या.
स्वागतगीत संध्या कुलकर्णी आणि गीता कुंभोजकर यांनी गायले. प्रास्ताविक अध्यक्ष किर्ती देशपांडे आणि आभार प्रदर्शन सचिव सुनिती पारुंडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संध्या देशपांडे, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यपद्धती, अडचणी व सक्षमीकरणावर विधानभवनात सविस्तर चर्चा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई, दि. ३ जून २०२५ : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन येथे महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांचीही या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत महिला आयोगाच्या सेवा प्रमाणीकरण प्रक्रियेतील अडचणी, कार्यपद्धतीतील अंमलबजावणीची सद्यस्थिती आणि आयोगाकडून शासन व समाजाकडून असलेल्या अपेक्षांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या विशेष बैठकीस डॉ. पद्मश्री बैनाडे (सदस्य सचिव, महिला आयोग), श्री लक्ष्मण मानकर (समुपदेशक), भास्कर बनसोडे (प्रशासकीय अधिकारी), कपालिनी सीनकर (कार्यकारी संपादक), अंजली काकडे (समुपदेशक) आणि प्रकल्प अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत मुख्यत्वे राज्य महिला आयोगासाठी स्वतंत्र व सुसज्ज इमारतीची गरज, पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेची गरज, कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस, आयोग व सामाजिक संस्थांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता यावर भर देण्यात आला. आयोगाकडे आलेल्या तक्रारींचे जलद निपटारे व्हावेत, वेळेत चार्जशीट दाखल व्हाव्यात आणि समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जावं, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं की, ही केवळ एक सुरुवात असून अशा प्रकारच्या विभागीय बैठकांचं आयोजन भविष्यात सातत्याने केलं जाणार आहे. त्यांनी महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळासह इतर यंत्रणांनी अधिक सशक्त भूमिका घ्यावी, असा पुनरुच्चार केला. 1993 पासून अस्तित्वात असलेल्या आयोगाच्या कार्याचा वेग वाढवण्यासाठी त्याला अधिक अधिकार, अधिक निधी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी आदिवासी भागात कार्यरत असलेल्या संघटनांबाबत विशेष चर्चा झाली. आदिवासी महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनातर्फे निधी मिळण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आदिशक्ती अभियानाला अधिक बळकटी देण्यात यावी, अशी शिफारसही झाली.
राज्य महिला आयोगाने CSR अंतर्गत निधीसाठी परवानगी घेण्याबाबतचे मुद्दे उपस्थित केले. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आयोगाकडे सध्या प्रबळ अपेक्षा असून शक्ती कायदा, समान नागरी कायदा यासारख्या धोरणात्मक व कायदेशीर बदलांची शिफारस करणं आयोगाच्या कर्तव्यात समाविष्ट आहे.
महिला आयोगाच्या कामकाजाचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. आतापर्यंत ९९० पेक्षा अधिक कॉल्स महिला आयोगाच्या हेल्पलाईनवर प्राप्त झाले असून, अनेक प्रकरणांची दखल घेऊन उपाययोजना केल्याचं सादरीकरणामध्ये दिसून आलं. आयोगाच्या कामकाजात एम.एस.डब्ल्यू पदवीधरांची अधिक प्रभावी भूमिका असावी आणि त्यांचं मानधन वाढवावं, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, “राज्य महिला आयोग ही एकमेव शासनाच्या अधिपत्याखालील संस्था आहे जी महिलांच्या सर्वांगीण प्रश्नांवर कृतीशील आहे. त्यामुळे त्याचं सक्षमीकरण होणं ही काळाची गरज आहे. शासन व सामाजिक संघटनांनी या प्रक्रियेस गती दिली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी, सक्षमीकरणासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाकडून जास्त अपेक्षा असून त्यासाठी शासनानेही पुढाकार घ्यावा.”
या बैठकीतून महिला आयोगाच्या भविष्यातील कार्याचा दिशादर्शक आराखडा ठरविणे गरजेचे असून पुढील काळात प्रत्येक भागात विभागीय बैठकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.