Home Blog Page 2809

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार संजय राउत यांचा पुनरुच्चार

0

मुंबई – आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेनेचे नेते  यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून खडाजंगी सुरू असताना त्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. महाराष्ट्रातील राजकारण बदल आहे. आणि शिवसेनेला न्याय्य लढ्यात निश्चितच विजय मिळेल अशी अपेक्षा देखील संजय राउत यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे नेते संजय राउत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “निर्णय झाला आहे, की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेना पक्षातूनच राहील.” राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशात शिवसेना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना मुख्यमंत्री पद देणार अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, संजय राउत यांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. यात भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 288 पैकी 145 जागा मिळवणे आवश्यक आहे. भाजप-शिवसेना महायुतीने 161 जागा मिळाल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री आपल्याच पक्षातून हवा या मागणीवर दोन्ही पक्ष अडून आहेत. त्यामुळेच, सत्ता स्थापनेला विलंब होत आहे.

महापालिकेतील, घोषित -अघोषित झोपडपट्टीच्या वादात डोबरवाडीची १०३ घरे उध्वस्त …

0

पुणे-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सोपान बागेजवळ असलेल्या डोबरवाडी च्या १०३ घरांवर बुलडोझर फिरल्याचे स्पष्ट  असले तरीही आता या मागे महापालिकेतील एका अधिकाऱ्याचे कारस्थान  असल्याचा आरोप होवू लागला आहे. तो खरा आहे कि खोटा याचे स्पष्टीकरण अद्याप झालेले नाही  ,महापालिकेने दिलेल्या   चुकीच्या(?) माहिती मुळे सुप्रीम कोर्टाने येथील २१ घरे पाडून सुमारे ३९ गुंठे जागा रिकामी करून देण्याचा आदेश दिल्याचे सांगण्यात येते आहे .महापालिकेचे एक अधिकारी यांनी पूर्वी   हि झोपडपट्टी घोषित असल्याचे सांगितले होते ,मात्र  दुसरे एक अधिकारी या पदावर आले आणि त्यांनी  हि झोपडपट्टी घोषित नसल्याचे  सांगितले. हि झोपडपट्टी घोषित -अघोषित वादात अडकली आणि नंतर त्यांच्या अघोषित असल्याच्या या माहितीवर विसंबूनच न्यायालयाने येथील प्रकरणात निर्णय दिल्याचे सांगण्यात येते .आणि हि जागा कोणी एक बिल्डर विकसित करेल असेही बोलले जाते आहे.असेही सांगण्यात येते कि ,न्यायालयाच्या आदेशात २१ घरे असाच उल्लेख आहे . कारण जेव्हा  जागामालकाने खटला दाखल केला तेव्हा येथे केवळ २१ घरे होती पण पुढे ४० वर्षात कुटुंबे वाढली तशी त्याची १०३ घरे झाली .हि झोपडपट्टी घोषित नव्हती तर येथे महापालिकेच्या अंदाजपत्रकातून तरतुदी करून विकासकामे कशी केली गेली ? असा सवाल हि यामुळे उपस्थित होतो आहे .केवळ सर्वोच्च  न्यायालयात या सर्व बाबी स्पष्टपणे न मांडल्यामुळे न्यायालयाची धारणा वेगळी झाली आणि या खटल्याचा निकाल तसा झाला असे बोलले जाते आहे.या सर्व बाबींची आता घरे पाडल्यानंतर चौकशी होईल किंवा नाही हे मात्र अनिश्चित आहे.

चाळीस वर्षांपासून हा खटला  सुरू होता. तो जागामालकाने जिंकल्याने सोपानबाग, डोबरवाडी येथील घरांवर पोलिस बंदोबस्तात सोमवारी कारवाई करण्यात आली. या वेळी क्रेनच्या साह्याने घरे जमीनदोस्त करण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता कारवाई शांततेत झाली.सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, वानवडी पोलिस ठाणे हद्दीतील डोबरवाडी सर्व्हे नं. ६६ अ येथील वस्तीवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करून घरे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी वस्तीतील महिला व नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून विरोध करण्याचा प्रयत्न केला. या वेळी विरोध करणाऱ्या पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र बहुतांश नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करून घरे रिकामी करून देण्यास सहकार्य केले. सायंकाळी पाऊस आल्याने कारवाई थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या वेळी वानवडी पोलिस व शहर पोलिस अशा शंभरहून अधिक पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. या वेळी सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, न्यायालयाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश बधे यांनी ही कारवाई केली.

 

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत अरिंदम बीट, काम्या परब यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

0

पुणे- नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन  चॅम्पियनशिप   सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगर मानांकीत अरिंदम बीट याने तिस-या मानांकीत ईशान गोदभरले तर मुलींच्या गटात  काम्या परबने तिस-या मानांकीत ऐश्वर्या कुमारचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत अरिंदम बीटने तिस-या मानांकीत ईशान गोदभरलेचा 9-6 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकीत आर्यन कोटस्थाने याने विक्रम अरभट्टीचा 9-5  असा तर  आर्यन हुडने जय पवारचा 9-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात बिगर मानांकीत  काम्या परबने तिस-या मानांकीत ऐश्वर्या कुमारचा 9-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकीत संजीवनी कुतवळने सातव्या मानांकीत पुर्वा भुजबळचा 9-1 असा तर आशी छाजेडने लोलाक्षी कांकरीयाचा  9-5 असा व  गार्गी फुलेने गार्गी शहाचा 9-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्यपुर्व फेरी:

आर्यन हुड वि.वि जय पवार 9-4;

अरिंदम बीट वि.वि ईशान गोदभरले (3) 9-6;
आर्यन कोटस्थाने(5) वि.वि विक्रम अरभट्टी 9-5


मुली

संजीवनी कुतवळ(1) वि.वि पुर्वा भुजबळ (7) 9-1;
आशी छाजेड वि.वि लोलाक्षी कांकरीया  9-5;
काम्या परब वि.वि ऐश्वर्या कुमार (3) 9-3
गार्गी फुले वि.वि गार्गी शहा 9-3.

अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला, पुढील तीन दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन

0

मुंबई- अरबी समुद्रात “महा” नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस(8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे. असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.अतिवृष्टीमुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग तात्काळ करावा लागेल, त्याकरिता नदीकाठच्या सर्व नागरिकांनी या दरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. विशेष नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नागरिकांसाठी काही महत्वाच्या सूचना

> शेतकरी बांधवांनी शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा किंवा सुरक्षित साठवणूक करावी. जेणेकरून पावसाच्या पाण्यामुळे शेतमाल खराब होणार नाही. विशेष काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी.

> वादळामुळे व वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेड, पत्रे, कमकुवत घरे, झाडे, गुरांचे गोठे, पशुपालन शेड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.

> शाळांचे पत्रे, घरांचे पत्रे, कांदा चाळ पत्रे वाऱ्यामुळे उडू शकतात त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी संबंधितांनी याकडे विशेष लक्ष द्यावे.

> अतिवृष्टीमुळे नदीपात्रातील पाण्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्क राहावे.

> नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करू नये, तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये.

> विद्युत खांबापासून दूर रहावे.

> जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.

> वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये.

> कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

> धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नये.

> गोदावरीस पूर आल्यास पंचवटी, रामकुंड क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी.

> विजेंचा आवाज होत असल्यास घराबाहेर पडू नये.

> पर्यटन स्थळी जातांना हवामानाचा अंदाज घ्यावा.

दिवाळी झाली तरी पावसाचे तडाखे सुरूच …(व्हिडिओ)

0

पुणे :काल पावसाच्या तडाख्या नंतर आज पुन्हा  पावसाने  पुण्याला झोडपून काढले. मात्र पुणे शहर प्रशासनाने यातून काहीही धडा न घेतल्याने आजही बहुतांश रस्त्यांवर पाणी आणि त्यातून कसेबसे वाट काढणारे, जीव मुठीत धरून जाणारे पुणेकर बघायला मिळत होते,. साेसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण दिवाळी पावसात गेल्यानंतर आता हिवाळ्यातही पाऊस पुणेकरांची पाठ साेडायला तयार नाही.

जुलैमध्ये सुरु झालेला पाऊस यंदा थांबण्याचे नाव घेत नाहीये. नाेव्हेंबर महिना सुरु झाला असला तरी पाऊस अद्याप परत गेलेला नाही. सप्टेंबर अखेर पुण्यात झालेल्या पावसाने 20 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला हाेता. ऑक्टाेबरमध्ये देखील शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी काेसळत राहिल्या. आता नाेव्हेंबरमध्ये देखील शहरात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

संध्याकाळी 6 च्या सुमारास शहरासह  उपनगरांमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. कात्रज ,धनकवडी ,बिबवेवाडी ,विमाननगर, वडगावशेरी, वाघाेली, धानाेरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस काेसळत आहे.  अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पश्चिम उपनगरांमध्ये देखील जाेरदार पाऊस झाला  आहे. वारजे- माळवाडी, कर्वेनगर, काेथरुड या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील सर्वच भागात  जोरदार पाऊस झाला .

 

देशात सर्वत्र डिसेंबर 1, 2019 पासून राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग बंधनकारक -एनपीसीआय

0
  • ऑक्टोबर 2019 मध्ये ओलांडला 31 दशलक्ष व्यवहारांचा टप्पा
  • निर्मितीपासून आतापर्यंत 6 दशलक्षहून अधिक फास्टॅग जारी
  • सध्या 23 सदस्य बँका फास्टॅग जारी करतात
  • भारतातील 528+ टोल प्लाझांवर फास्टॅगचा वापर

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ऑक्टोबर 2019 मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) कार्यक्रमांतर्गत केलेल्या व्यवहारांचा 31 दशलक्षचा टप्पा ओलांडला असल्याचे जाहीर केले आहे.

फास्टॅग हा वापरण्यास सोपा, रीलोडेबल असणारा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. गाडी जात असताना, या टॅगशी जोडलेल्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून टोलचे शुल्क आपोआप वजा केले जाते.  युजरना त्यांच्या टॅग खात्यामध्ये करण्यात आलेल्या सर्व व्यवहारांचा एसएमएस अलर्ट त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर क्रमांकावर येतो. फास्टॅग असणाऱ्या वाहनांना रोख व्यवहार करण्यासाठी टोल प्लाझावर थांबावे लागत नाही. यामुळे त्यांचा वेळ व इंधन वाचते.

ऑक्टोबर 2019 मध्ये, फास्टॅगच्या व्यवहारांची संख्या 31.46 दशलक्ष होती आणि व्यवहारांचे मूल्य 702.86 कोटी रुपये होते, या तुलनेत सप्टेंबर 2019 मध्ये व्यवहारांची संख्या 29.01 दशलक्ष होती आणि व्यवहारांचे मूल्य 658.94 कोटी रुपये होते.

एनपीसीआयच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रवीणा राय यांनी सांगितले, “आम्ही प्रामुख्याने फास्टॅगवर भर देत आहोत आणि 2 वर्षांपेक्षाही कमी कालावधीमध्ये फास्टॅग खऱ्या अर्थाने इंटरऑपरेबल झाले आहे. आज, फास्टॅग जारी करणाऱ्या 23 सदस्य बँका आहेत आणि फास्टॅग व्यवहार संपादित करणाऱ्या 10 सदस्य बँका आहेत (टोल प्लाझावर स्वीकारण्यासाठी पाठिंबा देतात). आज, फास्टॅग राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील 528+ टोल प्लाझांवर कार्यरत आहे. फास्टॅग राज्य महामार्ग व शहरातील टोल प्लाझा येथेही प्रवेश करत आहे आणि शहरातील स्थानिक रहिवाशांना डिजिटल पद्धतीने टोल भरण्याची सुविधा देत आहे.”

डिसेंबर 1, 2017 पासून, सर्व नव्या कारमध्ये प्री-अॅक्टिवेटेड फास्टॅग असणार आहेत. फास्टॅग निवडक टोल प्लाझा, निवडक बँक शाखा, रिटेल पीओएस ठिकाणे / इश्यूअर बँक वेबसाइट / माय फास्टॅग अॅप येथे व ई-कॉमर्सद्वारे ऑनलाइन खरेदी करता येऊ शकतात.

ग्राहकाला वाहनाच्या विंडस्क्रिनवर फास्टॅग लावून त्याचा वापर सुरू करता येऊ शकतो. ग्राहक आपले वाहन घेऊन ज्या ज्या टोल प्लाझावरून जाईल, तेथे फास्टॅगशी लिंक केलेल्या वॉलेटमधून टोलची रक्कम आपोआप वजा केली जाईल. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / एनईएफटी/आरटीजीएस/यूपीआय किंवा नेट बँकिंग याद्वारे हा टॅग ऑनलाइन टॉप-अप करता येऊ शकतो.

फास्टॅग लवकरच पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा वापर पेट्रोल खरेदी करण्यासाठी व पार्किंग शुल्क भरण्यासाठी केला जाऊ शकतो.

देशात सर्वत्र डिसेंबर 1, 2019 पासून राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग बंधनकारक असणार आहे.

दुसऱ्या ‘नॅशनल वुमेन वेल्डर कॉम्पिटिशन’ची विभागीय फेरी पुण्यात

0

पुणे : फिनलँडस्थित केम्पी इंडिया, नेक्स्टजन प्लाझ्मा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅशनल वुमेन वेल्डर कॉम्पिटिशन २०१९’ची विभागीय फेरी पुण्यात झाली. पिंपरी-चिंचवड येथील केम्पी रोबोटिक अप्लिकेशन सेंटरमध्ये पश्चिम विभागीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यातून महिंद्रा अँड महिंद्रा, जीई, थरमॅक्स, आयनॉक्स इंडिया, ऍडोर वेल्डिंग, आरके दत्ता आदी कंपन्यातील महिला वेल्डर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयटीआय, डिप्लोमा होल्डर असलेल्या या महिला वेल्डिंग क्षेत्रात विविध कंपन्यात काम करीत आहेत. एसएमएडब्लू, जीएमएडब्लु, जीटीएडब्लु या तीन प्रकारात वेल्डिंगची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी केम्पी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रश्मीरंजन मोहपात्रा, नॅशनल सेल्स मैनेजर मृगेश सुतारिया, राहुल चिखले, नेक्सजन प्लाझ्माचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय स्पर्धेतून तीन जणींची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी ६ डिसेंबर २०१९ रोजी चेन्नई येथे होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. महिला वेल्डरांना प्रोत्साहन देण्यासाठी केम्पी इंडियाच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजिली जाते.केंद्र सरकारच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत केम्पी इंडिया अनेक राज्यांमध्ये काम करत असून, कौशल्य विकास प्रशिक्षण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण आणि रोबोटिक प्रशिक्षण यामध्येही केम्पी इंडिया काम करत आहे. यावेळी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मृगेश सुतारीया म्हणाले, “वेल्डिंग हे महिलांचे क्षेत्र नाही असे बोलले जाते. मात्र, महिला अतिशय चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि नवीन मुलींनी संकोच न करता वेल्डिंगमध्ये काम करावे, यासाठी ही वेल्डिंग स्पर्धा गेल्या वर्षीपासून आयोजिली जात आहे. दोन्ही वर्षी अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे. ही एक महिला सक्षमीकरणाची चळवळ आहे. पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे ही विभागीय स्पर्धा होत असून, त्याची अंतिम फेरी चेन्नईमध्ये होणार आहे.”

यावेळी स्पर्धक रसिका लोखंडे म्हणाल्या, गेल्या वर्षीही मी सहभागी झाले होते. या स्पर्धेतून एक वेगळी संधी आम्हा मुलींना मिळत आहे. उषा जाधव म्हणाल्या, स्पर्धेसाठी उपयुक्त प्रशिक्षण मिळाले असून, आमच्यातील कला दाखवण्याचे हे उत्तम व्यासपीठ आहे. वेल्डिंग हे मुलींचे क्षेत्र नसल्याचे बोलले जाते. मात्र, आम्हीही खूप चांगल्या पद्धतीने वेल्डिंगचे काम करू शकतो, हे सिद्ध करण्याची संधी मिळाल्याचे उर्मिला पालेकरने सांगितले. दर्शिका गांधी म्हणाल्या, महिलांसाठी ही एक संधी आहे. याने आम्हा महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड 2) शर्यतीत ब्रॉंक्स विजेता

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत  द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड 2)  या शर्यतीत ब्रॉंक्स या घोड्याने 2000 मीटर या अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील  द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड2 )  या लढतीत जे.एम.लाइव्हस्टोक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी जयदेव एम मोदी यांच्या मालकीच्या ब्रॉंक्स या घोड्याने 2 मिनिट 03 सेकंद व 824 मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा नीरज रावळ हा जॉकी होता, तर नोशेर कामा ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:   द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड 2)
विजेता:  ब्रॉंक्स, उपविजेता: रईस. 

संजय राऊतांपेक्षा माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0

 

मुंबई दि. 4 – फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी शिवजीपार्कवर होईल असा दावा संजय राऊत यांनी करू नये. शिवजीपार्कवर शपथविधी केवळ शिवसेनेचा नाही तर भाजपसह शिवसेना आरपीआय महायुती च्या मंत्र्यांचा शपथविधी झाला पाहिजे असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे हा आग्रह सोडावा. काँग्रेस राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दुराग्रह संजय राऊत यांनी सोडावा त्यांनी हे लक्ष्यात घ्यावे की त्यांच्या पेक्षा अधिक जवळचे संबंध माझे शरद पवारांशी आहेत. त्यामुळे लवकरच मी शरद पवार यांची भेट घेणार आहे असे वक्तव्य
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी केले.

शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडावा; शिवसेनेने उपमुख्यमंत्री पद आणि 16 मंत्रीपदांचा भाजप चा प्रस्ताव स्वीकारावा; त्यात आणखी दोन मंत्रीपदे शिवसेनेला वाढवून द्यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत  रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुती चया सरकार चा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला.
जनतेने भाजप शिवसेनेला बहुमताचा जनादेश दिला आहे. त्या विपरीत भूमिका शिवसेनेने घेऊ नये. शरद पवारांचा पाठिंबा फक्त संजय राऊत मिळवू शकतात असे नाही माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध आहेत. भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असे सत्तवाटप करून महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन करावे ही माझी भूमिका आहे. पण वेळ पडल्यास आपण लवकर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य रामदास आठवले यांनी आज केले.

 

‘अवांछित’च्या दुसऱ्या सत्रात कोलकाताचं विस्तीर्ण दर्शन!

0

अभिनेते किशोर कदम, मृणाल कुलकर्णी, मृण्मई गोडबोले अभय महाजन यांच्यासह डॉ. मोहन आगाशे आणि सुहास जोशी यांचा सहभाग!

पश्चिम बेंगॉलच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांना घालण्यासाठी दिग्दर्शक शुभो बासु नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, सहयोगी निर्माते विकी शर्मा त्यांच्या ‘फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट’ प्रस्तुत ‘अवांछित’ या मराठी चित्रपटाद्वारे सज्ज झाले असून त्यांच्या या चित्रपटाचं पहिलं चित्रीकरण सत्र नुकतचं पूर्ण झालं होत. येत्या ७ नोव्हेंबर पासून या चित्रपटाचं दुसरं चित्रीकरण सत्र कोलकाताच्या विस्तीर्ण सौंदर्य संपन्न विविध ठिकाणी सुरु होत आहे. उत्तर कोलकातामधील लाहाबाडीसह दक्षिण कोलकातामधील विविध कॅफेटेरिया आणि ऑलिगोमध्ये पहिल्या सत्रात चित्रीकरण झालं आहे. मराठी भाषेत तयार होणाऱ्या ‘अवांछित’ या चित्रपटाची सर्व लोकेशन्स चित्रपटाच्या कथेप्रमाणेच वैशिष्ट्येपूर्ण आहेत. कोलकातामधील डोळ्याचं पारणं फेडणारी विस्तीर्ण अशी बहुतांश सौंदर्यस्थळे प्रथमच मराठी प्रेक्षकांना वेड लावणार आहेत.

हरहुन्नरी कलावंत किशोर कदम, सदाबहार सौंदर्यवती अर्थात अभिनेत्री  मृणाल कुलकर्णी, युवा अभिनेता अभय महाजन, युवा अभिनेत्री मृण्मई गोडबोले, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण, सुलभा आर्य, राजेश शिंदे यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा, असीम दास, दिलीप दवे, अरुण गुहा ठाकूरता, राणा बासू ठाकुर या  प्रमुख बेंगॉली कलावंतांचाही अभिनय मराठी रसिकांना पहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने बेंगॉली – मराठी कलावंत पडद्यावर व मागेही एकत्र काम करीत आहेत. पन्नास हून अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बेंगॉली निर्माते प्रितम चौधरी हे ‘अवांछित’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून त्यासोबतच बेंगॉली दिग्दर्शक शुभो बासु नाग यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘गणवेश’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे हे या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसोबतच क्रिएटिव्ह प्रोडूसर बनले आहेत.

‘अवांछित’मध्ये नव्या आणि जुन्या कोलकाताची रूपकात्मक कथा दिसणार असून ती वडील मधुसूदन गव्हाणे आणि मुलगा तपन गव्हाणे यांच्या नात्याप्रमाणे विभागली आहे. वृध्दाश्रमातल्या नोकरीत गुंतलेल्या मधुसूदन यांचं नकळत त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि त्यामुळेच आईने जीव गमावल्याची भावना मनात बाळगून तारुण्यात पदार्पण करणारा तपन त्यांच्याशी खटकून वागू लागतो. बापलेकातला दुरावा वाढत जातो. त्यांच्या नातेसंबंधांची वीण कधी घट्ट तर कधी सैल होत जाते.

दिग्दर्शक शुभो बासु नाग यांच्या मूळ कथेवर ‘अवांछित’ बेतला असून त्यावर पटकथा व संवाद निर्मिती योगेश जोशी यांनी केली आहे. ओंकार कुलकर्णी यांनी रचलेल्या गीतांना संगीत व पार्श्वसंगीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते लोकप्रिय बंगाली संगीतकार अनुपम रॉय यांनी दिले आहे. त्यांचं हे संगीत मराठी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या चित्रपसाठी विकी निर्माते प्रितम चौधरी यांच्यासोबत विकी शर्मा सहयोगी निर्माते असून अनु बासू हे प्रॉडक्शन डिझाईन करीत आहेत. त्यांच्या साथीनं अमित डे कलादिग्दर्शन करीत आहेत. वेशभूषाकार जयंती सेन यांनी स्टाईल व कॉश्च्युम डिझाईन करीत असून रंगभूषा प्रसेनजीत यांची आहे. या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मिती डेबोलीन सेन पाहत असून प्रॉडक्शन मॅनेजर अरुण मन्ना आहेत.

जगाला मधुमेहमुक्त करण्यासाठी आयुर्वेद उपयुक्त- डॉ. हरीश पाटणकर

0
नेदरलँड येथील आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत डॉ. हरीश पाटणकर यांना इंडो-डच आयुर्वेद आयकॉन २०१९ पुरस्कार

पुणे : “मधुमेहासारख्या आजाराने संपूर्ण जग त्रस्त आहे. आयुर्वेदातील उपचारपद्धती जगाला मधुमेहासारख्या आजारांपासून मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे अधिकाधिक देशांनी, लोकांनी आयुर्वेदाला आपलेसे केले पाहिजे. त्यासाठी आयुर्वेद जागतिक स्तरावर पोहोचण्याची गरज आहे,” असे मत आयुर्वेदाचार्य व केशायुर्वेदाचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर यांनी व्यक्त केले.

जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ (एमयुएचएस), नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा महाविद्यालय आणि नेदरलँडमधील भारतीय दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने नेदरलँड येथे आयोजित दोन दिवसीय तिसऱ्या आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी डॉ. पाटणकर व डॉ. गायत्री पांडव यांना ‘इंडो-डच आयुर्वेद आयकॉन २०१९’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेमदानी आयुर्वेदा महाविद्यालय आणि गांधी सेंटर (इंडियन नेदरलँड्सच्या एम्बेसीची सांस्कृतिक शाखा), डेनहॅग नेदरलँड येथे भरविण्यात आलेल्या परिषदेचे उद्धाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, महर्षी आयुर्वेद हॉलंडचे गिरीशजी मोमाया, प्रेमदानी आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. एटियन प्रेमदानी, नेदरलँड येथील भारतीय दूतावसाच्या डॉ. निर्मला शर्मा, डॉ. मिलिंद जानी, व्यंकट जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी आयुर्वेद स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.

या परिषदेत आयुर्वेदासंबंधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि प्रेमदानी आयुर्वेद महाविद्यालयात शैक्षणिक करार झाला. याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आदान-प्रदान, प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जाणार आहे, असे डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. डॉ. चव्हाण म्हणाले, “आयुर्वेदाला जागतिक स्तरावर कायदेशीर मान्यता मिळण्यात अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे विद्यापीठांच्यामार्फत आयुर्वेदाचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. संबंधित देशातील विद्यापीठांच्या माध्यमातून आदानप्रदान झाल्यास आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यास मदत होईल.”

डॉ. निर्मला शर्मा यांनी आयुर्वेदाचा इतिहास, पूर्वापारपासून वेगवेगळया देशातील विद्यापीठात आयुर्वेदात होत असलेले काम याबद्दल माहिती दिली. आयुर्वेदाची भारतातील नालंदा, तक्षशीलापासून चालत आलेली परंपरा संगितली. भारतातील आयुर्वेद विद्यापीठाच्या माध्यमातून जगभरातील विविध आयुर्वेद विद्यापीठात सुरु असलेले ज्ञानप्रसाराच्या कार्याविषयीही माहिती दिली.

या परिषदेत विविध देशांतून आलेल्या आयुर्वेद तज्ज्ञांनी आपले प्रबंध सादर करीत विचार मांडले. नेदरलँड येथे आयुर्वेदाचा प्रसार, आयुर्वेदामधील आहारशास्त्र उपचार पद्धती, नेत्ररोग, मधुमेह यासारख्या आजारावरील उपचार, आयुर्वेदातील सौंदर्यप्रसादन साधने, मूळव्याधसारख्या आजारावर उपचार, स्वयं रोगप्रतिकारक व्याधी आणि आयुर्वेद, श्वसन रोग आयुर्वेद उपचार पद्धतीची व्याप्ती, आयुर्वेदासमोरील जागतिक आव्हाने आदी विषयांवर व्याख्याने झाली.

‘केशायुर्वेद’च्या सदस्या डॉ. स्नेहल पाटणकर, डॉ. गायत्री पांडव, किशोर पांडव यांच्यासह वैद्य वैभव मेहता, वैद्य कुणाल कामठे यांनी त्यांचे प्रबंध सादर केले. वैद्य रश्मी वेद यांनी आयुर्वेदीय सौंदर्यप्रसाधन निर्मिती व महत्व कार्यशाळेच्या रुपात मांडले. नागपूरचे डॉ. तपस निखारे, जयपूरचे डॉ शरद पोर्टे, रायपूरचे डॉ. के. बी. श्रीनिवास राव, मुंबईचे डॉ. प्रियांका ठिगळे-रिसबुड शोधनिबंध सादर केले.

माहेश्वरी समाजातर्फे दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजन व अन्नकोट महोत्सव

0
पुणे : माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव उत्साहात साजरा झाला. लोकांच्या रक्षणाकरिता करंगळीवर पर्वत उचलून धरणाऱ्या प्रसंगांची आठवण म्हणून गोवर्धन गिरिधारीचे पूजन आणि ५६ भोगाची (मिठाई व इतर पदार्थ) आरास करण्यात आली. या अन्नकोट महोत्सवात शहर व जिल्ह्यातील जवळपास चार हजार माहेश्वरी बांधवांसह इतर समाजातील मान्यवर व भक्तगण सहभागी झाले होते. पावसामुळे काहीसा परिणाम झाला असला, तरी माहेश्वरी समाजातील लोकांचा उत्साह होता. ५६ प्रकारच्या भोगामध्ये मिठाई, फळे, दिवाळी फराळ आदी पदार्थ ठेवण्यात आले होते. 


कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या महोत्सवावेळी माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहानी, बालाप्रसाद बजाज, राजेंद्र भट्टड, मदनलाल भुतडा, हरी भुतडा, शामसुंदर कलंत्री, दिलीप धूत, संतोष लढ्ढा, विजयराज मुंदडा, भंवरलाल पुंगलिया, अशोक राठी, महेश सोमाणी, रामबिलास तापडिया यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सचिव संजय चांडक म्हणाले, “गोवर्धन गिरिधारी यांच्या आठवणीतील पवित्र दिवस म्हणून अन्नकोट महोत्सव साजरा होतो. दरवर्षी माहेश्वरी समाजबांधव एकत्र येऊन दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव साजरा करतात. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुण्यात औषधोपचार व अन्य कामांसाठी बाहेरून येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती मुकुंदनगर या भागात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त सॅनेटोरियम, अतिथीगृह आणि बहुउद्देशीय प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असून, लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.”

साताराहून मुंबईला जाणारी बस दरीत कोसळली; 5 ठार, 25 जखमी

0

पुणे – पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फुट दरीत कोसळळी. भल्या पहाटे झालेल्या या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्येएका चिमुकल्याचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोपोली पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस कराड येथून मुंबईकडे निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात अंडा पाँइंटच्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 49 प्रवासी होते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बचावासाठी स्थानिकांनी मदत केली. त्यांच्याच साह्याने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

चंद्रकांतदादांनी केली भिवरी येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी (व्हिडीओ)

0

पुणे- अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत आदी उपस्थित होते. अतिवृष्टी ने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे शासनाची जबाबदारी असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

0

मुंबई-राज ठाकरे यांनी आज सायंकाळी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी पवार यांच्याशी अवघे दहा मिनिटे संवाद साधला. यावेळी राज्याच्या परिस्थितीवरच प्रामुख्याने चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. येत्या सोमवारी शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय समीकरणांची उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राज यांनी पवार यांची भेट घेण्याचा अधिक महत्त्व आलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्याचवेळी राज-पवार भेटीची वेळ निश्चित करण्यात आल्याचंही सांगण्यात येतं. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला. मात्र या निवडणुकीत राज यांना कमी जागा लढवूनही १२ लाखाहून अधिक मते मिळविण्यात यश आलं होतं. त्यामुळे मनसे आमदारांच्या संख्याबळात कमी पडली असली तरी मनसेचं उपद्रवमूल्य कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे. या पार्श्वभूमीवर उद्या राज्यात सत्ता समीकरणं बदलली किंवा नाही बदलली तरी मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्यानेही राज-पवार भेट महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही पवारांची नुकतीच भेट घेतली होती. त्यामुळेही शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी दरम्यान काही तरी शिजत असल्याचं बोललं जात आहे.