प्रतिभा ही कुठल्या राजवाड्यात जन्म घेत नाही : विश्वास पाटील
‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना जाहीर
‘रंग ढोलकीचे’ कार्यक्रमात १६ नोव्हेंबर रोजी होणार पुरस्कार प्रदान
पुणे – अंतर्नाद संस्थेच्यावतीने मागील सहा वर्षांपासून विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीपासून संस्थेच्यावतीने दरवर्षी एका गुणवंत कलाकाराचा पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार असून, यंदाचा पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती अंतर्नाद संस्थेचे अमित गोखले यांनी दिली.
या पुरस्काराबद्दल माहिती देताना अमित गोखले म्हणाले की, संगीतावरील प्रेमातून आम्ही या संस्थेची स्थापना केली. संगीतप्रेमींना वैविध्यपूर्ण कार्यक्रम देणे हा आमचा हेतू आहे. सहा वर्षात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आम्ही ८८ शो केले आहेत, यामध्ये फ्युजन, इंस्ट्रुमेंटल, भावगीत, दिवाळी पहाट अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या तिकीटविक्रीतून जमा झालेल्या रकमेतून कार्यक्रमाचा खर्च वगळता जी रक्कम उरेल त्यातून आम्ही आजपर्यंत अनेक स्वयंसेवी संस्थांना मदत केली आहे. आम्ही नुकताच ‘रंग ढोलकीचे’ हा कार्यक्रम लॉन्च केला आहे, या निमित्ताने आम्ही दरवर्षी एका गुणवंत कलावंतास पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.
पहिले पुरस्कारार्थी राजू जावळकर यांचे वडील अंकुश जावळकर हे तबलावादक होते, यामुळे तबलावादनाची आवड घरातूनच निर्माण झाली. राजू जावळकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी तबलावादनाचे धडे उस्ताद गुलाम रसूल खाँ साहेब यांच्याकडे गिरवायला सुरुवात केली. त्याचकाळात ते आर्य भूषण थिएटर येथे तमाशामध्ये साथसंगतही करत असत. त्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ कार्यक्रमातून व्यावसायिक तबलावादन सुरु केले, पुढे त्यांनी किशोरीताई अमोणकर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, वीणा सहस्त्रबुद्धे, सदाशिवराव जाधव, नंदकिशोर कपोते, आनंद मोडक अशा अनेक दिग्गज कलावंताना साथसंगत केली, तसेच अनेक मराठी चित्रपटाच्या संगीतासाठी तबलावादन केले आहे, परदेशातही कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांचे सांगीतिक योगदान लक्षात घेऊन पहिल्या अंतर्नाद पुरस्कारासाठी निवड केली आहे. ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण अंतर्नाद आयोजित ‘रंग ढोलकीचे’ या कार्यक्रमात ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वा. टिळक स्मारक मंदिर येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे अमित गोखले यांनी सांगितले.
‘ प्रकृती ‘ चा अद्भुत मिलाफ नृत्यातून उलगडतो तेव्हा…
राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव ?
नवी दिल्ली- राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याऐवजी अजूनच गुंतत चालला आहे. भाजप नंतर शिवसेनेलाही सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना तीन सत्ता स्थापनेस 24 तास पुरेसे नसल्याने तीन दिवसांचा कालावधी मागितला, पण त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आता राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे सांगण्यात येते आहे..
शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सेनेने आज(मंगळवार) तातडीच्या सुनावणीची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. पण, न्यायालयाकडून त्यांना अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाहीये. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागून झाल्यानंतरही शिवसेना उच्च न्यायालयात निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काल सत्ता स्थापनेस अपयशी झालेल्या शिवसेनेने राज्यपालांच्या वेळ वाढवून न देण्याच्या निर्णयाला असंवैधानिक म्हटले.
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू, आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
- महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू
- यापूर्वी 1980 आणि 2014 मध्ये लागू झाली राष्ट्रपती राजवट
मुंबई – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी दुपारीच राज्यात यासंदर्भातील शिफारस पाठवली होती. त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचे एकमत झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदेशावर स्वाक्षरी केली. राज्याच्या इतिहासात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 17 फेब्रुवारी 1980 मध्ये पहिल्यांदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 8 जून 1980 पर्यंत 112 दिवस ही परिस्थिती होती. त्यानंतर 28 सप्टेंबर 2014 रोजी 33 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
अशी लागू झाली राष्ट्रपती राजवट
राज्यपालांनी भाजप आणि त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देऊनही दावा करता आला नाही. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलावले आणि 24 तासांची वेळ दिली. परंतु, राष्ट्रवादीने सुद्धा दुपारी 12 वाजेच्या सुमारास अतिरिक्त वेळ मागितली. त्यानंतरच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौऱ्यापूर्वी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मंत्रिमंडळाने देखील शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजता आदेशावर स्वाक्षरी केली असे जाहीर करण्यात आले.
कलम 356 च्या गैरवापराचा इतिहास आणि रेकॉर्ड
पक्षांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या नियमांत राज्यपालांची भूमिका वादग्रस्त ठरल्याचे आजवर चित्र आहे. केंद्र व राज्यांतील सत्तासमतोलाच्या अभ्यासासाठी 1983 मध्ये केंद्राने नेमलेल्या न्यायाधीश राजिंदर सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने कलम 356 चा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. आयोगाने 1951 ते 1975 या काळातील राष्ट्रपती राजवटीच्या 75 घटनाचा विचार करत त्यांपैकी केवळ 21 घोषणा या समर्थनीय असल्याचे म्हटले आहे. पक्षांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या नियमांत राज्यपालांची भूमिका वादग्रस्त ठरल्याचे आजवर चित्र आहे. केंद्र व राज्यांतील सत्तासमतोलाच्या अभ्यासासाठी 1983 मध्ये केंद्राने नेमलेल्या न्यायाधीश राजिंदर सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने कलम 356 चा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. आयोगाने 1951 ते 1975 या काळातील राष्ट्रपती राजवटीच्या 75 घटनाचा विचार करत त्यांपैकी केवळ 21 घोषणा या समर्थनीय असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये २०० पट मजबूत ग्रॅफिनचा वापर करून अत्याधुनिक रस्त्याचा प्रयोग सुरु …
(लंडन)-मेल ऑनलाईन ने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी ग्रॅफिनद्वारे एक पदार्थ विकसित केला आहे. या पदार्थाच्या वापराने रस्त्यांना तडे जाणार नाहीत. याचा वापर केल्याने आता रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत आणि अपघात कमी होतील.असा दावा करण्यात येतो आहे . ग्रॅफिन एक विशिष्ट प्रकारचे कार्बन आहे, जो जगातील सर्वात मजबूत पदार्थ आहे. इंग्लंडमधील ऑक्सफोर्डशायर येथील रस्ता तयार करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर या ग्रॅफिनचा वापर केला जात आहे. हा रस्ता १० दिवसांत तयार होईल. रस्ता तयार झाल्यानंतर अवजड वाहने आणि हवामानाचा यावर काय परिणाम होतो याचे परीक्षण केले जाईल. जास्त उष्णतेने हा पदार्थ वितळत नाही, चिकटत नाही तसेच थंडीत याला तडे पडत नाहीत, हे या पदार्थाचे वैशिष्ट्य आहे. या पदार्थाचा शोध २००४ मध्ये मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी लावला होता. वैज्ञानिकांच्या मते, ग्रॅफिनच्या मिश्रणातून तयार झालेला हा पदार्थ रस्त्यांसाठी वापरात येणाऱ्या पदार्थाच्या तुलनेत २० टक्क्यांनी महाग आहे, मात्र दीर्घकाळ टिकाऊ असल्याने हा स्वस्त राहील. याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास त्याचा खर्च आणखी कमी होण्याची अाशा आहे. ग्रॅफिनचा वापर एक वर्षापूर्वी इटलीची राजधानी रोम येथील बाह्य भागातील रस्त्यासाठी केला होता. येथे कडक ऊन आणि कडाक्याची थंडी असताना या रस्त्यावरून वर्षभर वाहनांची ये-जा होऊनदेखील रस्ता ना वितळला ना त्याला तडे गेले. रस्ता तयार करताना ग्रॅफिन या कार्बन संयुगाचा पहिला स्तर असतो, ज्याची बांधणी जाळीदार असते. हे सर्वसाधारण कार्बनपेक्षा २०० पट मजबूत असून त्यामुळे रस्त्याला तडे जात नाहीत.
ऑक्सफोर्डशायर येथील ग्रॅफिन रस्त्यासाठी वापरण्यात येणारे डांबर इटलीतील डायरेक्टा प्लस आणि इटरचिमिका या दोन कंपन्या विकसित करत आहेत. याचा खर्चही या कंपन्यांत करत आहेत.
दहा दिवसात महापौर बदलणार …
पुणे-नवे महापौर २२ नोव्हेंबरला पदारूढ होतील. २१ नोव्हेंबर ही मुदतवाढ मिळालेल्या कालावधीचा शेवटचा दिवस आहे. बुधवार, १३ नोव्हेंबरला मुंबईत सर्वच महापालिकांसाठी पुढील कार्यकाळासाठी रोस्टर निघणार आहे. त्यावेळी महापौर पदाची शर्यत सुरु ,होईल. त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्या सह राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर कार्यकाळास दहाच दिवस उरले आहे.
राज्यातील २७ महापौरांचा कार्यकाळ २१ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे सर्वच महापालिकांतर्फे राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला याबाबत सूचना करण्यात आली आहे. महापौर निवडीच्या किमान १० ते १२ दिवसांपूर्वी नव्या रोस्टरची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर निवडप्रक्रियेला वेग येतो. त्यानुसार बुधवारला मुंबईत महापौर आरक्षणासाठीचे रोस्टर काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या दहावर्षात आलेल्या रोस्टरची माहिती तेवढी सर्वच महापालिका प्रशासनाकडून मागविण्यात आली होती. शिवाय, या दहा वर्षांत महापालिका निवडणुकीत काय बदल झालेत? प्रभाग, वॉर्ड वा इतर कोणत्या पद्धतीचा निवडणुकीसाठी वापर करण्यात आला, याचीही माहिती मागविण्यात आली आहे. रोस्टर कुठलेही येऊ शकते, असे संकेतही मिळत आहेत. प्रारंभी, महापालिकांमध्ये प्रवर्गनिहाय असलेल्या आरक्षणानुसार रोस्टर ठरेल. त्याप्रमाणे प्रवर्गनिहाय चिठ्ठी टाकून तेवढ्याच महापालिकांची निवड करण्यात येईल. ज्या महापालिकांचे रोस्टर अनुसूचित जाती, जमाती वा इतर मागासवर्गीयांसाठी ठरेल त्या महापालिकांची नावे उर्वरित चिठ्ठीतून वगळण्यात येईल. त्यानंतर उर्वरीत प्रवर्गासाठी इतर महापालिकांच्या चिठ्ठया टाकण्यात येतील. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेसाठी रोस्टर नियमावलीचा वापर करण्यात येईल.
संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी
मुंबई-शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे अँजिओग्राफी करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात येते आहे. आज दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत होतं मात्र संजय राऊत यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर शिवसेना खासदार यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली.शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले. दुपारनंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
गेल्या १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपावर निशाणा साधला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते दररोज पत्रकार परिषद घेत होते. तसेच पक्षाची भूमिकाही घडणाऱ्या घडामोडींनंतर माध्यमांसमोर मांडत होते. या सगळ्या कामाचा ताण संजय राऊत यांना आला आहे. त्याचमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आता राष्ट्रवादीला २४ तासाची मुदत … सत्तास्थापनेचं राजकारण -आवाहन -पेच कायम
मुंबई-राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र तसं काहीही घडू शकलेलं नाही.आता राज्यपालांनी राष्ट्रवादी ला तिसरा पक्ष म्हणून आमंत्रण देवून सत्ता स्थापने साठी त्यांनाही २४ तासाची मुदत दिली आहे ..या ताज्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.प्रक्रियेनुसार राज्यपालांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षाशी बोलून लवकरात लवकर आमचा निर्णय कळवू, असं राज्यपालांना सांगितलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राज्यपालांनी आम्हाला निर्णय कळवण्यासाठी उद्या रात्री साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यपालांकडे जाताना राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी मात्र आपल्याला राज्यपालांनी कशासाठी बोलाविले आहे ते ठाऊक नाही असे वक्तव्य केले होते .
शिवसेनेला पाठिंब्याच्या पत्रासाठी वेळ वाढवून देण्यास राज्यपालांचा नकार !
मुंबई:– राज्यात सत्ता स्थापनेवरून दिवसभर चर्चेनंतर अखेर शिवसेनेचे नेते राजभवनात पोहचून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला पण, काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र सेनेला मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेलाही सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही राज्यपालांना वेळ वाढून मागितली, परंतु त्यांनी वेळ दिली नाही. लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करू, असे अदित्य ठाकरे म्हणाले.
राजभवनातून शिवसेनेचे नेते बाहेर आले. यात अदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले की, ”आपल्याला सर्वांना माहित आहे की काल संध्याकाळी आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी पत्र देत सत्तास्थापना करण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी सुरु केली आहे. आमची वेळी 7.30 पर्यंत असल्याने आम्ही पावणेसात पर्यंत येथे पोहचलो. तसेच आम्ही सत्तास्थापन करु असं कळवलं आहे. इतर पक्षांचा पाठिंबा बाकी आहे. त्या पक्षांची चर्चा सुरु आहे. त्यांना निर्णय घेण्यासाठी 2 दिवस तरी लागणार आहे. आम्ही तसं राज्यपालांना कळवलं आहे. आम्ही सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन पुन्हा येऊ. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.” असे अदित्य ठाकरे म्हणाले.
काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिलेच नाही
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र पाठवल्याची माहिती समोर आली होती. मात्र काँग्रेसने जे पत्र प्रसिद्ध केलं आहे, ते पत्र केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित चर्चा करुन उद्या निर्णय घेऊ अशा आशयाचे आहे. राज्यपालांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे पत्रच मिळाले नाही.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सकाळपासून दोन महत्वपूर्ण बैठका घेतल्या. या बैठकीनंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ताज लँड एंड्स हॉटेलमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवर बातचीत करून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती.
अखेर शिवसेना आघाडीच्या पाठींब्यावर सत्ता स्थापन करणार ….?
मुंबई-शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचं निश्चित झालं आहे असे वृत्त इथे आले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार येणार असे मानण्यात येते आहे. भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलवलं. त्यानंतर दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर शिवसेना सरकार स्थापन करणार असे सांगण्यात येत आहे. सत्ता स्थापनेसाठीचा दावा शिवसेना करणार आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा पाहण्यास मिळाला. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते हसत हसत बाहेर पडले. त्यानंतर प्रतीक्षा होती ती सोनिया गांधी काय भूमिका घेणार हा प्रश्न प्रलंबित होता.
निवडणूक निकालानंतर कौल मिळाला होता तो महायुतीला. ज्यामध्ये भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. या दोन्ही पक्षांचं सरकार येणार हे निश्चित झालं होतं. मात्र अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची अट शिवसेनेने घातली होती. मात्र असं काहीही ठरलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सरकार स्थापनेची तयारी केली. त्यात उद्धव ठाकरे यशस्वीही झाले. फॅक्सद्वारे दोन्ही पक्षांकडून पाठिंब्याचं पत्र मिळाल्याने शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत ईशान देगमवार, अलिना शेख यांना विजेतेपद
पुणे- आदर पूनावाला महाराष्ट्र टेनिस अकादमी(एपीएमटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या ईशान देगमवार, अलिना शेख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित ईशान देगमवार याने सहाव्या मानांकित आर्यन सुतारचा 3-6, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. सुमारे 2तास 15मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये आर्यन याने वर्चस्व राखले व हा सेट ईशानविरुद्ध 6-3असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या ईशानने 2-1 अशी सामन्यात स्थिती असताना चौथ्या, सहाव्या गेममध्ये आर्यनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये ईशान याने अधिक भक्कम सुरुवात केली. या सेटमध्ये ईशानने आर्यनची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-1 असा जिंकून विजय मिळवला. ईशान हा व्हीकटोरीयस किड्स एज्युकेअरमध्ये नववी इयत्तेत शिकत असून इंटेसिटी टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक अतुल देवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत सहाव्या मानांकित अलिना शेख हिने प्रिशा जुनेजाचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. अलिना ही आठवी इयत्तेत उंड्री येथील बिशप्स शाळेत शिकत असून मॅसट्रो टेनिस अकादमीत प्रशिक्षक प्रणव वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी फेड कप टेनिसपटू राधिका तुळपुळे-कानिटकर आणि सध्याची अव्वल भारतीय महिला टेनिसपटू प्रांजला येडलापल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एपीएमटीएचे आदित्य मडकेकर, एआयटीए सुपरवायझर तेजल कुलकर्णी आणि अजय कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: मुली:
अलिना शेख(6)वि.वि.संचिता नगरकर(3)9-7;
प्रिशा जुनेजा वि.वि.कनिका बाबर 9-2;
अंतिम फेरी: अलिना शेख(6)वि.वि. प्रिशा जुनेजा 6-2, 6-1;
मुले: उपांत्य फेरी:
आर्यन सुतार(6)वि.वि.सुधांशू सावंत(7)9-6;
ईशान देगमवार(2)वि.वि.प्रथमेश पाटील(8)9-1;
अंतिम फेरी: ईशान देगमवार(2)वि.वि. आर्यन सुतार(6) 3-6, 6-3, 6-1.
दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे पूना क्लबपुढे 256 धावांचे आव्हान;
झोपलेल्या प्रशासना विरोधात विरोधकांचा आक्रोश महापौरांनी दाबला ….(व्हिडिओ)
पुणे : महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये विरोधी पक्षांनी प्रतिकात्मक झोपा काढत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले. सभा सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या गलथान आणि दुर्लक्षित कारभारा संदर्भात आंदोलन सुरु केले आणि तुम्ही जागेवर जा ,नंतर आपले म्हणणे मांडा म्हणणाऱ्या महापौरांनी केवळ बराटे यांना बोलू दिले बराटे यांचे बोलणे संपताच तहकुबी मांडण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांचे नगरसेवक संतापले. त्यांनी आपले म्हणणे मांडू देण्याची विनंती केली. परंतु, महापौर मुक्ता टिळक यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिले नाही.
आचारसंहिता लागल्यानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. या सभेला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवकही या सभेला उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी घंटा वाजवीत महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली. झोपलेल्या प्रशासनाचा निषेध असा मजकूर असलेले बॅनर्स अंगावर घेऊन नगरसेवक . भैय्यासाहेब जाधव आणि योगेश ससाणे यांनी झोपून घोषणाबाजी केली. तसेच विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप , दीपक मानकर, अविनाश बागवे, यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या.
महापौर मुक्ता टिळक यांनी सर्वांना जागेवर बसून आपापले विषय मांडण्याची विनंती केली. त्यानुसार, सर्व सदस्य जागेवर गेले. त्यानंतर दिलीप बराटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. बराटे म्हणाले, ‘आचारसंहिता संपत आली. दिवाळी संपली. परंतु अद्यापही शहरातील कामे सुरू झालेली नाहीत. पावसाळ्यात ज्या ज्या रस्त्यांवर पाणी तुंबले, त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली तेथे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा ठिकानांची यादी केली आहे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओढे-नाले याला पूर येऊन मोठे नुकसान झाले आहे. त्याविषयी प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. शहरात सध्या अघोषित पाणी कपात सुरू आहे. पालिकेचे पंपिंग स्टेशन जलसंपदा विभागाने ताब्यात घेतले आहे. आपले त्यावर नियंत्रण नाही. पाऊस पडूनही पुणेकरांना पाणी न मिळत नाही. हडपसर, वडगाव शेरी, कात्रज भागात पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. पुण्यातील खड्डे तसेच आहेत. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत आहे. या समस्यांकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत अशी टीका बराटे यांनी केली.
यावर महापौर टिळक यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना खुलासा करण्यास सांगितले. परंतु, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आम्हालाही बोलू द्या अशी विनंती केली. परंतु, महापौरांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी आणि घंटानाद करायला सुरुवात केली. या गदारोळात ना प्रशासनाचा खुलासा झाला ना विरोधी नगरसेवकांना आपली गाऱ्हाणी मांडता आली पण महापौरांनी तहकुबी पुकारत सर्वसाधारण सभा 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.
…अन् रंगली कौटुंबिक स्वरसंध्या
पं. डी. के. दातार यांच्या स्मरणार्थ मैफल
पुणे : व्हायोलिनच्या सूमधुर नादाने सजलेले वादन… मनाचा ठाव घेणारे अल्हाददायक सूर… अन् अशा भारावलेल्या वातावरणात तल्लीन झालेले रसिक…अशी दुहेरी अनुभूती देणारी व्हायोलिन वादनाची व गायनाची स्वरसंध्या काल येथे रंगली. ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. डी. के. दातार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे ज्येष्ठ शिष्य व्हायोलिन वादक रत्नाकर गोखले व त्यांच्या कुटुंबियांनी या मैफिलीचे आयोजन केले होते. बेडेकर गणपती, पौड रस्ता येथे पार पडलेल्या या कौटुंबिक स्वरसंध्येला रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली.
कार्यक्रमाचा प्रारंभ पं. दातार यांच्या स्नुषा आणि प्रसिद्ध लेखिका डॉ. स्मिता दातार यांनी लिहिलेल्या ‘डी. के. दातार, द व्हायोलिन सिंग्ज’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने झाला. सुप्रसिद्ध गायक, विचारवंत व संगीत मार्गदर्शक पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या पुस्तकातून पंडित दातार यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य असून पुस्तकाचे वाचन मूल्य आणि अभ्यासपूर्ण लेखन उच्च दर्जाचे असल्याचे मत कशाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यानंतर रत्नाकर गोखले यांचे व्हायोलिन वादन झाले. आपल्या गुरूचा आवडता राग ‘ मधुवंती ‘ त्यांनी प्रथम सादर केला. या रागात विलंबित मध्य आणि द्रुत अशा तीन रचना त्यांनी सादर केल्या. यावेळी ‘ मधुवंती ‘ या रागातील स्वरसौंदर्य अत्यंत सफाईदारपणे उलगडून दाखवले. समेवर येण्याच्या प्रत्येक जागेला श्रोत्यांची वाहवा प्राप्त झाली. गोखले यांच्या प्रस्तुतीची सांगता मिश्र पिलू रागातील दादरा वादनाने झाली. गुरुबंधू राजन माशेलकर यांनी आपल्या सहप्रस्तुतीत गुरूंच्या वादन शैलीचे यथार्थ दर्शन घडविले. लयकारीकडे झुकलेल्या या वादनास तेवढीच दर्जेदार व बहारदार तबला साथ पं. अरविंदकुमार आझाद यांनी देत मैफिलीची उंची वाढवली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांची परंपरा पुढे नेणारे त्यांचे शिष्य हेमंत पेंडसे यांचे सुश्राव्य गायन झाले. पेंडसे यांची सुरुवातीस ‘ श्याम कल्याण ‘ पेश करत रसिकांची मने जिंकली. त्यानंतर
‘ शिवअभेणी ‘ हा दुर्मिळ राग गाऊन रागचिंतनातील आपले वेगळेपण त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सादर केलेली द्रुतरचना ‘ नित रहे मगन तोहे’ उपस्थितांना विशेष भावली. पेंडसे यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता स्वामी स्वरूपानंद रचित भजन ‘ कृपावंत थोर’ या बंदिशीने केली. श्री भरत कामत (तबला) आणि श्री स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) यांची समर्पक साथ पेंडसे यांना लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दामले यांनी केले. या कार्यक्रमास पुण्यातील ज्येष्ठ व्हायोलिनवादकांची उपस्थिती लक्षणीय होती.








