सत्यजित धांडेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे : स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. शालेय शिक्षण घेत असताना पर्यावरण संवर्धनासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या 25व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर यांच्यावतीने विविध शाळांमधील गरजू, होतकरू शालेय विद्यार्थ्यांना आज (दि. ६) शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील व्हिआयपी कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संकर्षण कऱ्हाडे बोलत होते. याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, नाट्य परिषद कार्यकारणी सदस्य गिरीश महाजन, नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर, समीर हंपी उपस्थित होते. प्रस्ताविकात सत्यजित धांडेकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागील कलाकार अक्षय जगताप, गणेश भोसले, केदार भालशंकर, बाळासाहेब धांडेकर, मदन गायधने यांनी मदत केली.
पुणे -शहरातील वाढती वाहतूक काेंडी हा ज्वलंत प्रश्न असून याबाबत वेळीच उपाययाेजना हाेणे गरजेचे अाहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडीची ज्वलंत समस्या लक्षात घेता, मेट्रोचा अतिरिक्त एफएसआय व बाहेरील टीडीआर (विकतचे चटई क्षेत्र)ची उधळण मोठ्या प्रमाणात सुरू असून, पुणे शहरातील वर्षानु वर्षांच्या पुर्वीच्याच रस्त्यांवरील प्लॉटवर सुद्धा २० ते ३० मजली इमारतींना आवश्यक वाहतूक सोईविना परवानग्या दिल्या जात आहेत हे भयावह आहे. सदर इमारती मधील किमान १० ते १५ % नागरिक वा त्यांचे व्हिजिटर्स जरी एक ठिकाणाहून दुसरीकडे जावयाचे झाल्यास, रस्ते अत्यंत तोकडे पडत आहेत ही वास्तवता नाकारु शकत नाही.पुणे शहराचा “रुंदावणारा(होरीझोंटल )व समतोल विकास” होण्याऐवजी, “(व्हर्टीकल)उंचावणारा विकास” होत असल्याने, गर्दीयुक्त वाहतुकीच्या खाईत पुणे शहर ढकलले जात आहे. त्यामुळे ‘वाहतूक नियोजन’ ही समस्या नसून, इमारतींचे अयोग्य नियोजन व अवास्तव बांधकाम परवानगी या समस्या आहेत असे मत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे.
या शिष्टमंडळात लिगल सेलचे अँड फैयाज शेख, अँड श्रीकांत पाटील, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, संजय अभंग, गणेश मोरे, योगेश भोकरे, आशिष गुंजाळ उपस्थित होते.
नवनिर्वाचित पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांनीं शहराचा नवीन डीपी व टीपी प्लॅन करण्याची मागणी केली आहे.याबाबत तिवारी म्हणाले,पुणे शहराचे डीपी (विकास आराखडा) वा टीपी (नगर रचना) हे मात्र कागदांवर पूर्वीचेच असून,मेट्रो’च्या आगमना नंतर वास्तविक डीपी व टीपी मध्ये धोरणात्मक आमूलाग्र बदल होणे गरजेचे होते.मात्र ,ते वेळीच न झाल्याने पुणे शहर आज वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहे.मेट्रोचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मेट्रो स्टेशन जवळ मुबलक दोनचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था अत्यावश्यक होती.मात्र, ती दुर्दैवाने उभी राहू शकली नाही. त्यामुळेही या समस्येचा तातडीने बोध घेऊन, नगररचना संचालक यांचे समवेत चर्चा करून पुणे शहरासाठी आवश्यक रुंदीच्या रस्त्यांची व पार्किंगची व्यवस्था होई पर्यंत तसेच मेट्रो-सिटी’साठीचा “डीपी व टीपी” होई पर्यंत, मुक्त व अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूरी (रद्द न करता) तूर्त स्थगित वा नियंत्रित करावी, जेणेकरून पुणेकरांची नित्य व जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून प्रशासनाचे पुणेकर जनतेस अपेक्षीत ऊत्तर दाखल गेल्या ३ वर्षांचे ऑडीट अहवाल प्रकाशीत करून कार्यवाही बाबत नविन आयुक्तांनी माहीती देण्याची मागणी देखील केली आहे.
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या संभाव्य आघाडीवर मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल. या प्रकरणी आमच्या व त्यांच्या (राज ठाकरे) मनात कोणताही संभ्रम नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट व मनसे लवकरच एकत्र येतील, असा दावा केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केले. ते म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल. मी हे एका वाक्यात सांगितले आहे. याविषयी बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. मी या प्रकरणी कोणताही संदेश देणार नाही. थेट बातमी देईल. माझ्या व शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याही मनात कोणता संभ्रम नाही. माझ्या मते, संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती देऊ.
शिंदे गटात गेलेल्यांना पश्चाताप-उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाडे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला. सुजाता शिंगाडे यांनी आपल्या भावना नेमक्या शब्दांत मांडल्या आहेत. त्या शिवसेना सोडत असल्याची बातमी कळली, तेव्हा आम्हाला धक्का बसला होता. वाईटही वाटले होते. आपली एवढी जुनी कार्यकर्ती का व कशासाठी शिवसेना सोडू शकते? असा प्रश्न आम्हाला पडला होता. ठीक आहे, आता हा विषय संपला आहे.सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटात जी काही बेबंदशाही सुरू आहे याचा जवळून अनुभव घेतला आहे. त्यांना तेथील विचित्र वातावराचा अनुभव आला. त्यांना तिथे कुणाशीही जुळवून घेता आले नाही. त्या बैचैन व अस्वस्थ होत्या. तिकडे गेल्यानंतर अनेकांना पश्चाताप होतोय. पण तुमच्या सारखा निर्णय घेण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. ही हिंमत व धाडस केवळ शिवसैनिकांमध्येच असू शकते. लाचारीसाठी तिकडे गेलेल्या लोकांमध्ये असे धाडस असू शकत नाही. आज संपूर्ण शिवसेना कुटुंब आनंदी आहे. त्यांचा आमच्या पक्षातील प्रवेश हा शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी एक संदेश आहे, असे ते म्हणाले.
शिंदे गटात कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही – शिंगाडेसुजाता शिंगाडे यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी 30 जानेवारी रोजी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता जवळपास 5 महिने झाले. ती माझी फार मोठी चूक होती. ओरिजनल शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची व मातोश्रीचीच आहे हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. मागील 4-5 महिन्यांत मला फार वाईट अनुभव आले. मला त्यांनी कोणतेही आमिष दिले नाही. त्यामुळे मी त्यांची मिंधी नाही. वयाच्या 10 व्या वर्षापासून मी शिवसेनेचे काम करते. मला विभागात गटप्रमुखापासून ते विभाग संघटकापर्यंतची सर्वच पदे मला मातोश्रीमु्ळे मिळाली.जवळपास 35 वर्षे मी संघटनेचे काम केले. इतर लोक कोणत्या आमिषाला बळी पडून शिंदे गटात जात आहेत हे मला माहिती नाही. मला 4 महिन्यांतच तिथे राहणे शक्यच नसल्याचा अनुभव आला. मला 4 महिने झोप लागली नाही. शिंदे गटात सर्वकाही देखावा आहे. ते नगरसेवकांना 2-3 कोटी देऊन पक्षात घेत आहेत. या सर्वांना तिथे पश्चाताप होत आहे. तिथे कुणाचाच कुणाशी ताळमेळ नाही, असे शिंगाडे म्हणाल्या.
मुंबई, दि.५:- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मार्गाच्या कामातील अडथळे दूर करण्यात येतील, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रमकुमार, कोकण महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, प्रदीप कांबळे, शशी प्रभू, बुद्ध धर्मगुरू ,बुधिष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, एम एम आर डी ए व विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भव्य वास्तू उभे राहत आहे. पुढील वर्षीपर्यंत हे काम पूर्ण होईल. चैत्यभूमी येथे येणारे अनुयायी या स्मारकास देखील भेट देतील. या अनुषंगाने सदर मार्ग होणे गरजेचे आहे. चैत्यभूमीचे ठिकाण समुद्रकिनारी असल्याने पर्यावरण विषयक मान्यता, तसेच हा रुंद मार्ग बनविण्यासाठी आवश्यक जागा या दृष्टीने संबंधित शासकीय विभागांकडून नियोजन करण्यात येईल, यासाठी माहिती घेण्यात यावी. उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले, या दृष्टीने पर्यावरण विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचेकडून माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. यावेळी बुद्ध धर्मगुरू, बुद्धीष्ट सेवा सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांनी चैत्यभूमी व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील सुविधांबाबत मागण्यांची बैठकीत माहिती दिली. अनेक वर्षांपासून चैत्यभूमीच्या विकासासाठी काम केले जात असल्याचे सांगितले.
यंदाची स्पर्धा जिंकण्याचा निर्धार – बाप्पाला साकडे
पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हंगामातील चषकावर नाव कोरण्याच्या निर्धाराने ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापुर टस्कर’ संघ मैदानात उतरला असून या संघाने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन आणि आरती करून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘इंडीयन प्रिमीयर लीग’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने (एमसीए) महाराष्ट्र प्रिमीयर लीग (एमपीएल) सुरू केली आहे. यंदाचा या लीगचा तिसरा हंगाम सुरु झाला असून या लीगमध्ये उतरलेल्या कोल्हापूर टस्कर संघाची मालकी पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी घेतली आहे. या संघाने सलग दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून पहिल्यावर्षी उपविजेते पदाचा मानही पटकवाला आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी हा संघ पुन्हा एकदा सज्ज झाला असून नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. या संघाचा लीगमधील पहिला सामना उद्या (शनिवार) होणार आहे. त्यापूर्वी या संघातील खेळाडुंनी हिंदूस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ची आरती करुन दर्शन आणि आशिर्वाद घेतले. यावेळी कोल्हापुर टस्कर्स संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, श्रीकांत मुंढे यासह सर्व खेळाडू उपस्थित होते.
*‘‘यंदा आमचा कोल्हापूर टस्कर संघ हा एकदम संतुलित असून आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने खेळणार आहोत. या संघातील सर्वच खेळाडूंबाबत मी अत्यंत समाधानी आहे. यावर्षी स्पर्धेचे विजेतेपद आम्ही निश्चितपणे पटकविणार असाच आमचा निर्धार आहे. त्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेतले.’’ राहुल त्रिपाठी, कर्णधार,
ठाकरे ब्रँड टिकवण्याची भावना मुंबई-राज्यात मनसे – ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चर्चेत उडी घेत ठाकरे गटासोबतच्या युतीच्या मुद्यावर केवळ एका फोनने मार्ग निघू शकतो असा दावा केला आहे. ठाकरे गटाने यासंबंधी एक पाऊल पुढे टाकले, तर राज ठाकरे 100 पाऊले पुढे टाकतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणालेत.राज ठाकरे यांच्या पक्षाच्या विभागप्रमुखांची आज शिवतीर्थावर बैठक झाली. या बैठकीत मनसैनिकांनी ठाकरे गटासोबत युती करण्याच्या मुद्यावर अनुकूलता दर्शवल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंधील फुटीमुळे ठिकठिकाणी परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, असे मत या सर्वांनी बैठकीत व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाने एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे 100 पाऊले पुढे टाकतील असे स्पष्ट केले.
..तर राज ठाकरे 100 पाऊले पुढे येतील
युती प्रसार माध्यमांपुढे बोलून होत नसते. ठाकरे गटाला मनसेसोबत युती करावीशी वाटत असेल तर फक्त एक फोन केला की मार्ग निघू शकतो. त्यामुळे तुम्ही एक पाऊल पुढे आलात, तर मला राज ठाकरे साहेंबावर विश्वास आहे, ते 100 पाऊले पुढे येतील, असे ते म्हणाले.दुसरीकडे, मनसेच्या केंद्रीय समितीमधील पदाधिकारी संजय जामदार यांनीही यावेळी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकण्याची गरज व्यक्त केली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर ते म्हणाले की, आमची राज ठाकरेंसोबत बैठक झाली. राज्यात परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. राज्यात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. दोन भावांमध्ये फूट असल्याने किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्यांची दादागिरी वाढल्याची राज्यातील जनतेची भावना आहे. याला दोन भावातील फूट कारणीभूत आहे. आता हे थांबले पाहिजे. राज ठाकरे यांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.
संदीप देशपांडे यांची वेगळीच भूमिका-तत्पूर्वी, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गट व मनसेत युतीची कोणतीही बोलणी सुरू नसल्याचे जोर देऊन स्पष्ट केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आणि मनसेमध्ये युती बाबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात युती बाबत चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा केवळ नेत्यांमध्ये होत आहे. रोज सकाळी कोणता भोंगा या बाबत बोलतो. त्यांच्याकडेच युतीचा प्रस्ताव तयार असेल, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने युतीसाठी कोणताही प्रस्ताव तयार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मनसे सोबत युती करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेतला असून पक्षाचे नेते वारंवार युती बाबत वक्तव्य करत आहेत.
दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल – संजय राऊत
युती बाबत संजय राऊत यांनी देखील आजच वक्तव्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती विषयी चर्चा करायची असेल, तर त्यांनी एकमेकांना फोन करावा, असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. अमित ठाकरे हा गोड मुलगा आहे. त्याच्या जन्मापासून मी त्याला पाहतोय. त्याचा काका म्हणून त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल. मी दहा मिनिटांनी फोन करतो, हे सांगून फोन करण्याची आवश्यकता नाही. त्या दोघांमध्ये फोनवर बोलणेही झाले असेल? तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल. काही दिवसात झाडाला फळे देखील येतील. त्यामुळे एवढ्या लवकर फळे कशी आली? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करतात, असे देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठित चिनाब रेल्वे पुलावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा आनंद व्यक्त केला. हा क्षण राष्ट्रीय अभिमानाचा आणि सर्वात आव्हानात्मक भूभागात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचा दाखला असल्याचे म्हटले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“चिनाब रेल्वे पुलावर तिरंगा ध्वज दिमाखात फडकत आहे !
हा पूल महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणीचे चे उत्कृष्ट मिश्रण असून, सर्वात आव्हानात्मक प्रदेशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याची भारताची वाढती क्षमता प्रतिबिंबित करतो, ही अत्यंत अभिमानाची भावना आहे.”
देशासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याप्रति त्यांच्या अढळ वचनबद्धतेचे पंतप्रधानांनी केले कौतुक
मुंबई-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात सहभाग असलेल्या काही लोकांशी संवाद साधला. राष्ट्रासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याप्रति त्यांच्या अढळ वचनबद्धतेचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे;
“चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात सहभाग असलेल्या काही लोकांशी संवाद साधला. हे लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतील आहेत आणि आपल्या देशबांधवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प अढळ आहे. या लोकांनी अतिशय आव्हानात्मक काळात काम करण्यासह आपले इतर अनुभव देखील सामायिक केले. आपण केलेल्या कामाचा आपल्या कुटुंबियांनाही खूप अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले!”
पुणे: शास्त्रीय गायन व वादनाचा मिलाफ असलेल्या ‘गंगाधर स्वरोत्सव युव-रंग’ मैफलीचे येत्या शनिवार (ता. ७) व रविवार (ता. ८) या दोन दिवशी आयोजन केले आहे. स्वरनिनाद संस्थेच्या वतीने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) सभागृहात पुणेकर रसिकांसाठी ही संगीत-गायन पर्वणी विनामूल्य आयोजिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व गायन क्षेत्रातील उभरत्या युवा कलाकारांना आपली प्रतिभा रसिकांसमोर सादर करण्याची संधी देणारे हे व्यासपीठ आहे.
कार्यक्रमात शरयू दाते, एस. आकाश, अथर्व वैरागकर, अनुभव खामरु, अमन वरखेडकर, इशा नानल, स्वरा, सारा, स्पृहा, इशिता, इशल, युवान हे युवा कलाकार सादरीकरण करणार आहेत. तर आशय कुलकर्णी, अभिनय खंदे, कार्तिकस्वामी माधव लिमये, यशद गायकी, आशिष बेहरे व निषाद जोशी यांची साथसंगत लाभणार आहे, अशी माहिती स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी दिली. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. अमोल निसळ यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होत आहे.
स्वरनिनाद संस्थेच्या माध्यमातून दहाहून अधिक वर्षे शास्त्रीय संगीताची सेवा केली जात आहे. गंगाधर स्वरोत्सव, युवरंग यासह इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे केले जात आहे. विविध मान्यवर कलाकारांनी गेल्या दहा वर्षात गंगाधर स्वरोत्सव या तीनदिवसीय सांगीतिक कार्यक्रमात आपली कला सादर केली आहे. संगीतसेवेचा हा यज्ञ यापुढेही असाच चालू राहणार आहे, असे वृषाली निसळ म्हणाल्या.
पुणे दि. ६, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार यांच्या हस्ते ‘शिवस्वराज्य’ गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा सर्व जातीधर्माला न्याय देणारी असून सर्वांमध्ये जातीय सलोखा निर्माण करणारी आहे. ही विचारधारा राज्यातील, देशातील सर्वांमध्ये एकोपा ठेवणारी आहे या विचारांशिवाय आपण राज्य, देश पुढे नेऊ शकत नाही. या थोर महापुरुषांनी जी शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे तिचे सर्वांनी सतत स्मरण करून पुढील वाटचाल केली पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.
शिवराज्याभिषेकच्या दिवशी त्याकाळी घराघरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज आनंदाचे प्रतीक म्हणून सर्वत्र गुढी उभारली जाते. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी महाराष्ट्रात, देशात पहिल्यांदाच रयतेचे राज्य सुरू झाले, ‘शिवस्वराज्य’ स्थापन झाले. मराठी साम्राज्याला पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाले. मराठी राज्य स्थापना झाल्याचा हा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,आनंदाचा दिवस आहे. ६ जून हा ‘शिवस्वराज्य दिवस ‘म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र होत आहे. असे त्यांनी सांगितले.
सन २०१९-२० या काळात कोरोना सारखे संकट, आजार अचानक जगात व देशात आले त्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आपले जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले या संकटात जिल्हा परिषद मधील व त्यांच्याशी संबंधित असलेल्या ४२ अधिकारी,कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला या सर्वांची आठवण राहावी म्हणून,या ४२ सहकाऱ्यांची नावे असलेल्या फलकाचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. त्यानंतर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमधील कोविड योद्धा स्मारकाचे व डिजिटल प्रणालीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुरु असलेल्या हिरकणी कक्षाची उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी पाहणी केली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
नालंदा | गयाजी शुक्रवारी बिहारच्या राजगीरमध्ये राहुल गांधी म्हणाले – ‘मोदींना सरेंडरची सवय आहे. ट्रम्प यांनी ११ वेळा जाहीरपणे सांगितले की त्यांनी मोदींना शरणागती पत्करायला लावली. पंतप्रधान काहीही बोलू शकले नाहीत. ट्रम्प खोटे बोलत आहेत असे त्यांनी का म्हटले नाही?’ते इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अत्यंत मागासलेल्या समाजाला संबोधित करत होते. त्यांच्या ३० मिनिटांच्या भाषणात ते पुढे म्हणाले- ‘मोदीजी प्रत्येक भाषणात म्हणायचे की मी ओबीसी आहे. जातीच्या जनगणनेबद्दल बोलल्यानंतर ते म्हणतात की भारतात कोणतीही जात नाही. जर जात नाही, तर तुम्ही ओबीसी कसे झालात?’
राहुल गांधींच्या भाषणातील ठळक मुद्दे
बिहारची नवी व्याख्या म्हणजे भारताची गुन्हेगारीची राजधानी. तुम्ही कुठून कुठे पोहोचला आहात? पूर्वी जगभरातून लोक नालंदाला येत असत, आज लोक येथून संपूर्ण जगात जातात. देशाचे बजेट ११ अधिकाऱ्यांनी तयार केले होते. ९०% अधिकाऱ्यांमध्ये दलित, मागासलेले किंवा अत्यंत मागासलेले कोणीही नाही. तर कामगारांमध्ये तुम्हाला फक्त ओबीसी, दलित आणि अत्यंत मागासलेले आढळतील. मोदीजी प्रत्येक भाषणात म्हणायचे की मी ओबीसी आहे. जातीच्या जनगणनेबद्दल बोलल्यानंतर ते म्हणतात की भारतात कोणतीही जात नाही. जर जात नाही तर तुम्ही ओबीसी कसे झालात? सरकार खाजगी रुग्णालयांसाठी जमीन देते, पण जर एकाही रुग्णालयाचा मालक दलित असेल तर कृपया मला सांगा. जर आपण जातीय जनगणनेची सरकारकडे असलेल्या उर्वरित आकडेवारीशी सांगड घातली तर विकासाचा एक पूर्णपणे नवीन आयाम उदयास येईल आणि त्याची सुरुवात बिहारपासून होईल. देशात फक्त ५० टक्के आरक्षण असू शकते ही कल्पना कुठून आली? तुमची लोकसंख्या ९० टक्के आहे आणि तुम्ही ५० टक्के आरक्षण असावे म्हणून भिंत बांधत आहात.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण
पुणे | ६ जून २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य कार्यक्रमाच्या स्वरूपात साजरा करणार आहे. याबाबत माहिती देताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बांधवांबरोबरच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले.
या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारा हा पहिला वर्धापन दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे, असे तटकरे यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिमेला अभिवादन व समाजोपयोगी उपक्रम
३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, तटकरे यांनी पुण्यातील बालेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस आणि उपक्रमांसाठी प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, आ. चेतन तुपे, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सुरेश घुले, योगेश बहेल, राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने घड्याळ चिन्हावर ७ जागा जिंकत भक्कम कामगिरी केली. यामुळे राज्यभरात पक्षाबाबत जनतेचा विश्वास वाढला असून कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. “राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सध्या प्रचंड उत्साह आहे,” असे मत यावेळी मा. तटकरे यांनी व्यक्त केले.
महायुती सरकारचा घटक म्हणून सकारात्मक वाटचाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या महायुती सरकारचा महत्त्वाचा भाग आहे. या सरकारमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यरत आहेत. प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले धोरण पारदर्शकतेने लोकांसमोर मांडले आहे.
कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि आत्मविश्वास वाढवणारा कार्यक्रम
या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे सिंहावलोकन करण्यात येणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिशादर्शनदेखील होणार आहे. पक्षाचे भविष्यातील ध्येय धोरण जनतेपुढे मांडले जाणार आहे.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या अपेक्षा लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजाभिमुख, पारदर्शक व विकासात्मक कारभार करण्यास कटिबद्ध आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाचे एकजूट आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली जाणार आहे, असेही मा. तटकरे यांनी सांगितले.
बेंगळुरू,: टीव्हीएस मोटर कंपनीने आज घोषणा केली की कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने श्री. सुदर्शन वेणू यांची कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीला आणि धोरणात्मक विकासाला दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. २५ ऑगस्ट २०२५ पासून सुदर्शन वेणू यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकृतपणे नियुक्ती होणार आहे.
कंपनीचे सध्याचे अध्यक्ष सर राल्फ स्पेथ यांनी संचालक मंडळास सूचित केले आहे की, ते आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा संचालकपदासाठी अर्ज करणार नाहीत. त्यामुळे, २२ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीनंतर ते अध्यक्षपदाचा राजीनामा देतील.
संचालक मंडळाने २३ ऑगस्ट २०२५ पासून पुढील तीन वर्षांसाठी सर राल्फ स्पेथ यांची कंपनीचे मुख्य मार्गदर्शक (Chief Mentor) म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा व कौशल्याचा कंपनीला पुढेही लाभ मिळणार आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीचे चेअरमन एमेरिटस श्री. वेणू श्रीनिवासन म्हणाले: “मागील तीन वर्षांत अध्यक्ष म्हणून सर राल्फ यांनी दिलेल्या विलक्षण नेतृत्वाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. जागतिक बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार साधण्यास आणि नावीन्यपूर्णतेला चालना देण्यात त्यांचे योगदान अनमोल ठरले आहे. मुख्य मार्गदर्शक या नव्या भूमिकेत ते आम्हाला पुढेही मार्गदर्शन करतील. तसेच सुदर्शन यांचे अध्यक्षपदी स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. व्यवस्थापकीय संचालक या भूमिकेत त्यांनी कंपनीसाठी उत्कृष्ट प्रगती साधली असून, त्यांच्या नेतृत्वात टीव्हीएस मोटर अजून उच्च शिखरांकडे झेप घेईल, असा मला विश्वास आहे.”
सर राल्फ स्पेथ म्हणाले: “गेल्या तीन वर्षांत टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम करणे हे माझ्यासाठी सन्माननीय होते. या काळात मला भरभरून सहकार्य आणि मैत्री लाभली. मी आता अध्यक्षपदाची जबाबदारी सुदर्शनकडे सोपवत असून, त्यांच्या नेतृत्वात टीव्हीएस कंपनीचा विकास अधिक वेगाने होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. सुदर्शन यांचा उत्साह, दृष्टीकोन आणि मूल्यांवरील निष्ठा कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी आहे.”
सुदर्शन वेणू म्हणाले: “मला ही अनोखी संधी दिल्याबद्दल संचालक मंडळाचे मन:पूर्वक आभार! मी अत्यंत नम्रतेने आणि उत्साहाने ही जबाबदारी स्वीकारत आहे. आमचे चेअरमन एमेरिटस यांनी ज्या मूल्यांवर टीव्हीएसची घडी बसवली – ग्राहक केंद्रीता, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान – आपण भविषाकडे पाहताना याच मूल्यांवर आधारित काम करत राहणे, नव्या संधींचा लाभ घेणे आणि भविष्याची नव्याने कल्पना करणे आवश्यक आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. सर राल्फ यांनी आम्हाला जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रतिभेला सामावून घेण्यासाठी, नव्या प्रक्रिया स्वीकारण्यासाठी आणि भविष्यातील उत्पादने व तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केले आणि मार्गदर्शन केले. मुख्य मार्गदर्शक या भूमिकेत त्यांचं मार्गदर्शन पुढेही लाभेल, ही बाब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. टीव्हीएसचा खरा आधार म्हणजे संपूर्ण टीमचा उत्साह आणि जोश! आपल्या सामायिक भविष्यासाठी या भागीदारीच्या पुढील प्रवासाची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.”
मुंबई-बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. मिठी नदी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी महाराष्ट्रातील त्याच्या घरावर छापा टाकला. हा घोटाळा राज्यातील नद्या स्वच्छ करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे. अभिनेत्याव्यतिरिक्त, बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या जागेवर छापे टाकण्यात आले आहेत.
यापूर्वी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) डिनो मोरियाची दोनदा चौकशी केली आहे. या प्रकरणात EOW ने सुरुवातीचा एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर ईडीने आता मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास अधिक तीव्र केला आहे.
प्रत्यक्षात, मिठी नदीची स्वच्छता मुंबई महानगरपालिकेने केली होती. यासाठी गाळ पुशर आणि ड्रेजिंग मशीन वापरण्यात आल्या होत्या. कोची येथील कंपनी मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून मोठ्या प्रमाणात मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणाच्या चौकशीत असे दिसून आले की केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वच्छतेच्या नावाखाली ६५ कोटी रुपयांचा घोटाळा केला.
घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी केली असता, अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची नावे समोर आली. दोघांनीही केतन कदमशी अनेक वेळा बोलणे केले होते. तपास अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की डिनो मोरिया आणि केतन हे केवळ मित्र नाहीत तर त्यांच्यात पैशाचे व्यवहार देखील असू शकतात. यामुळेच तपासाच्या कक्षेत दिनोची चौकशी केली जात आहे.
नेटफ्लिक्सवरील ‘द रॉयल्स’ या मालिकेत नवाब सलाउद्दीनच्या भूमिकेमुळे डिनो मोरिया चर्चेत आहे. येत्या काळात तो मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे. डिनो मोरियाने १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला खरी ओळख २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज’ या चित्रपटातून मिळाली.
कुठल्याही प्रकारच्या सेलिब्रिटी अथवा मान्यवर व्यक्तींना न बोलावता पहलगाम हल्यात शहीद झालेल्या जगदाळे कुटुंबीय, गणबोटे कुटुंबीय, हुंडाबळी प्रकरणातील बळी ठरलेली स्मृतीशेष वैष्णवी हगवने यांच्या कुटुंबातील सदस्य या सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना अभिषेक करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर येथील श्री शिवाजी वैदिक विद्यालयातून अभ्यास करून महंत कैलास वडघुले कुमारी स्वरा धुमाळ यांनी राज्याभिषेक विधी संपन्न झाला. या प्रसंगी शस्त्र पूजन, धान्य पूजन, फळांचे पूजन, जगद्गुरु संत तुकाराम महाराज्यांच्या गाथेचे पूजन, छत्रपती शिवरायांच्या नित्य वापरात वापरत असलेल्या कवड्याच्या माळीचे पूजन, शिवमुद्रेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिल्पकार सौ.सुप्रिया शेखर शिंदे, ॲड.प्राजक्ता मोरे, पत्रकार चंद्रकांत फुंदे यांना शिवसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीचे विकास पासलकर यांनी प्रास्ताविक केले पासलकर म्हणाले व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या या कुटुंबातील सदस्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश शिवराज्याभिषकाच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न आम्ही आखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून करत आहोत. शिवराजाभिषेकासाठी मोहन जोशी, माधव जगताप, संदीप कदम, राजेंद्र डुबल, संदीप खलाटे, निलेश निकम, मारुतराव सातपुते, रमेश गुजर तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सचिन जोशी, मंदार बहिरट, रोहित ढमाले, युवराज ढवळे यांनी परिश्रम घेतले सूत्र संचालन विराज तावरे यांनी केले तर प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले.