Home Blog Page 269

सुवर्ण भिशीच्या नावाखाली ज्वेलर्सकडून ४२ लाखांची फसवणूक


पुणे ,सुवर्ण भिशी योजनेच्या आमिषाने धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफी पेढीच्या मालकाने तब्बल ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच, २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दहिवाळ दांपत्य फरार झाले आहे.या प्रकरणी नऱ्हे येथील एका व्यावसायिकाने सोमवारी (ता. ९) फिर्याद दिली. त्यानुसार नांदेड सिटी पोलिसांनी ‘श्री ज्वेलर्स’चा मालक विष्णू सखाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती ( दोघे रा. रासकरमळा, धायरी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

धायरी परिसरात दहिवाळ यांचे ‘श्री ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. त्यांनी सुवर्ण भिशी योजना सुरू केली होती. या योजनेत अनेकांनी आकर्षक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केली. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीने मिळून तीन लाख ३९ हजार रुपये गुंतवले. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी ही रक्कम दिली होती. यामध्ये एका जुन्या गंठणाचे मोडीतून आलेले एक लाख रुपये रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराचाही समावेश होता. तक्रारदार दांपत्य २५ मे रोजी ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले असता, दुकान बंद असल्याचे समजले. चौकशीअंती दहिवाळ दांपत्य पसार झाल्याचे उघड झाले. यानंतर तक्रारदाराने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिस तपासात ३६ गुंतवणूकदारांनी दहिवाळ यांच्याकडे पैसे आणि सोने गुंतवले असल्याचे समोर आले आहे. दहिवाळ दाम्पत्याने मिळून ४२ लाख ७८ हजार रुपयांची रोकड आणि २१ तोळे सोने घेऊन पलायन केले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे पुढील तपास करीत आहेत.

महापालिका उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात…

सांगली:२४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (३१, रा. फ्लॅट क्रमांक ४०३, ग्रीन एकर्स धामणी रस्ता, मूळ रा.सातारा) लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सांगलीत प्रथमच कारवाई झाल्याने खळबळ उडाली. उपायुक्त साबळे याच्या घराची सायंकाळी उशीरापर्यंत छडती सुरू होती. लाचलुचपच्या सांगली विभागाने ही कारवाई केली असून साबळे याला अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. याबाबत १७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत साबळे याने स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे याने केल्याने आज कारवाई करण्यात आली आहे. साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, साबळे याला पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशीरा त्याच्या सांगलीतील घराची छडती घेण्यात आली. काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
लाचलुचपतचे नूतन उपाधीक्षक अनिल कटके, तत्कालीन उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, कशोर खाडे, अंमलदार प्रतीम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव यांचा कारवाईत सहभाग होता.
उपायुक्त वैभव साबळे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. आज कारवाई झाल्यानंतर सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले. साताराच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मूळ घराचीही झडती घेण्यात आली आहे. काही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही समजते आहे.

डॉ. संजीव वावरे, डॉ. कल्पना बळीवंत यांना बजावली नोटीस


पुणे:महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्यासह अंतर्गत महिला चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांना नोटीस बजावून महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल वेळीच का घेतली नाही? अशी विचारणा केली आहे.
भाजपचा पदाधिकारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याला त्रास देत असल्याच्या तक्रारीची दखल का घेतली नाही,’ याचा खुलासा करण्याबाबतची नोटीस आरोग्य प्रमुखांनी दोन अधिकाऱ्यांना बजावली आहे.भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याने जानेवारी २०२५ मध्ये महापालिका आयुक्तांसह आरोग्य प्रमुखांकडे केली होती. तसेच, महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात न आल्याने संबंधित पदाधिकाऱ्याकडून त्रास देणे सुरूच राहिले.
त्यामुळे महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. महापालिका आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे.
आयुक्तांच्या कारवाईनंतर महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्यासह अंतर्गत महिला चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल वेळीच का घेतली नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.

पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या देशी झाडांची लागवड व्हावी

0
  • प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; पद्मा प्रतिष्ठान, ज्ञानमाउली फाउंडेशनतर्फे ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रम

पुणे: “माणसाने सिमेंटचे जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला. त्यामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे. अशावेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्णपिंपळ, वड, आंबा, चिंच, बांबू यांसारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘जागर पर्यावरणाचा’सारख्या कार्यक्रमाची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

पद्मा प्रतिष्ठान व ज्ञानमाऊली फाऊंडेशन आयोजित ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, उद्योजक जवाहरशेठ चोरगे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे, ज्ञानमाउली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे-कांबळे, पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडोलकर, उद्योजक नितीन हणमघर, हेमंत कांबळे आदी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, उद्योजक तुषार गोसावी, माजी नगरसेविका ज्योती गोसावी, राष्ट्रीय खेळाडू प्रियांका यादव व मयानी कांबळे, गायिका मनीषा निश्चल, सोनाली कांबळे यांना ‘जागर पर्यावरणाचा’ सन्मान देऊन गौरविण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला. ज्ञानगंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला ५१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय करावा. निसर्गातील प्रत्येक घटकाचे, अगदी कीटकाचेही अनन्यसाधारण स्थान आहे. एकेकाळी पुण्याचे पर्यावरण देशात आदर्श मानले जात होते. अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. हे टाळण्यासाठी येथील वनराई, टेकडी जतन करण्याची जबाबदारी आपली आहे.”

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचा जागर करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आपले आरोग्य चांगले राहायचे असेल, तर पर्यावरणाचे संवर्धन खूप गरजेचे आहे. प्रदूषणाच्या अनेक समस्या माणसाला सतावत आहेत. त्यामुळे आजूबाजूला खूप झाडे लावण्याची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण यज्ञात सहभाग घेतला पाहिजे.”

विष्णू लांबा म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एक लाख झाडे लावण्याचा संकल्प कांबळे यांनी हाती घेतला आहे. वृक्षरोपणाच्या या मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ‘जागर पर्यावरणाचा’ हा कार्यक्रम या मोहिमेचा शुभारंभ आहे. केक कापून, नको तिथे पैशांची उधळपट्टी करून वाढदिवस करण्यापेक्षा हा उपक्रम अतिशय विधायक असा आहे.”

धीरज घाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले. जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा रणदिवे-कांबळे यांनी आभार मानले.

पालखी मार्गावर केलेल्या कामांचा घेतला आढावा

पुणे: शहरात पालखी मार्गावर केलेल्या कामांचा आढावा म्हणून आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी आढावा बैठक घेतली .
आज दुपारी ३.०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दुसरा मजला या ठिकाणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व खाते प्रमुख व अधिकारी यांच्या समवेत पालखी मार्गावर केलेल्या कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांचे पुणे शहरात आगमनापूर्वी पालखी संबंधित कामांची माहिती घेतली व सर्व उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व खाते प्रमुख यांना दिले.
याप्रसंगी नगरसचिव योगिता भोसले, मुख्य उद्यान अधिकारी श्अशोक घोरपडे, मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संदीप कदम, उप आयुक्त (सांस्कृतिक विभाग) सुनील बल्लाळ, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, अधीक्षक अभियंता (मलनि:सारण) जगदीश खानोरे इत्यादी खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन

महसूली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी महसूल विभागाला बहुउद्देशीय वाहने- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, दि. ९ : नागपूर जिल्ह्यात महसूल विभागाला अत्याधुनिक बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) वाहने देण्याचा निर्णय यापूर्वी शासनाने घेतला असून राज्यातील पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण महसूली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणीदेखील यावर्षी अशी वाहने महसूल विभागाला देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राज्यात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या महसूल लोक अदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पक्षकार, वकील यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

अधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना त्यांनाही पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात सर्व विभागीय आयुक्तालयांच्या ठिकाणी आणि त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर जिल्ह्यांतील महसूल विभागाला वाहने उपलब्ध करून दिली जातील.

आजच्या महसूल अदालतीत जवळपास ११ हजार महसूली दावे तडजोडीने निकाली निघणार असल्याने महसूल विभाग आणि न्याय व्यवस्थेवरीलही ताण कमी होणार आहे. पुढील अनेक वर्षे चालणारे खटले थांबणार असून त्यातून जनतेच्या आणि प्रशासनाच्या वेळेची, पैशाची आणि श्रमाची बचत होणार आहे. वाद संमतीने किंवा तडजोडी मिटल्याने गावातील भांडणे संपतील, जमिनीच्या वादामुळे कलुषित झालेली मने स्वच्छ होतील. घरात, गावात शांततेचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उर्वरित २० हजार दावेही अशा महसूल अदालतीचे आयोजन करुन तडजोडीने निकाली काढावेत, असेही ते म्हणाले.

प्रशासन आपली जबाबदारी बजावत असताना जे गुन्हेगारीवृत्तीने काम करतात अशांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली पाहिजे. त्यादृष्टीने कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

शासनाचे जे विभाग अधिकाधिक महसूल शासनाच्या तिजोरीत आणतील त्यांना त्याप्रमाणात प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

राज्य शासनातर्फे विविध भव्य शासकीय इमारती उभारण्यात येत आहेत. यशदा येथे मसुरीच्या धर्तीवर राज्यातील अधिकाऱ्यांसाठी देशात इतर कोणत्याही राज्यात नसेल असे भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १२० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे राज्यभरात राबविली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.

पुणे येथे भरलेल्या महसूल परिषदेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 6 विभागीय आयुक्तांना महसूल विभागाच्या परिवर्तनाच्या दृष्टीने काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यानुसार पुणे जिल्ह्याने हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यात नायब तहसील ते मंत्रालय पातळीवर तीन ते साडेतीन लाख महसूली दावे प्रलंबित आहेत. ही मोठ्या प्रमाणावरील प्रकरणे कशी संपतील यासाठी महसूल लोक अदालतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच पक्षकार आणि वकीलांचे सहकार्य घेण्यात येईल.

महसूल विभाग हा राज्याचा चेहरा आहे. वेळ आणि पैशाची बचत, मैत्रीपूर्ण न्यायव्यवस्था निर्माण करण्याकरिता, स्वखुशीने तडजोड निर्माण करण्याची व्यवस्था, महसूल व्यवस्थेवरील ताण कमी करणे आदी काम या महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून झाले आहे. महसूल विभागात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणण्यात येत आहे. विभागातील मागील २५ वर्षापासून प्रलंबित असलेले विषय शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्याने सादरीकरण केलेल्या बाबींच्या अनुषंगाने विविध शासन निर्णय काढण्यात येणार असून त्यामुळे राज्याच्या महसूलात २० हजार कोटींची वाढ होईल. ई-फेरफार प्रणालीच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकाचे राज्यभरात अभिनंदन झाले असून या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणीसाठी शासन निर्णय करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले असून ‘एम-सँड’म्हणजेच दगडापासून केलेली वाळू बांधकामात वापरली जाईल. त्यादृष्टीने शासकीय, खासगी जागा उपलब्ध करून देऊन क्रेशर उभारण्यात येतील. महाखनिजच्या माध्यमातून ऑनलाईन संनियंत्रण करून मागणीप्रमाणे वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून बुडणारा महसूल वाचण्यासह नदीच्या वाळूवरुन होणारे गैरप्रकार बंद होणार आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानासाठी ज्याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला त्याप्रमाणे महसूल लोक अदालतीला द्यावा, महसूल विभागाला अत्याधुनिक मल्टीपर्पज वाहने मिळाल्यास विभागाच्या कामाला गती येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. ते म्हणाले राज्यातील मोठ्या प्रमाणात प्रलंबित महसूल प्रकरणांबाबत उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे जिल्ह्याने पुढाकार घेऊन ही लोक अदालत आयोजित केली आहे. जिल्ह्यात मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी स्तरावर 31 हजारावर महसूली प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी ११ हजार ५८९ प्रकरणे या अदालती मध्ये ठेवण्यात आली आहे. यापुढेही दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालतीचे आयोजन करून दाव्यांची संख्या ३१ हजारावरून १० हजारापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ईक्यूजे कोर्ट, ई- हक्क प्रणाली, ई- फेरफार नोंदणी, पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम, नाविन्यपूर्ण असा सेवादूर उपक्रम आदींची माहिती दिली. महाखनिज व बांधकाम परवानगी एकात्मिक प्रणालीवर आणल्यामुळे १५० कोटी रुपयांच्या महसूलात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूल लोक अदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणातील पक्षकारांना प्रातिनिधीक स्वरुपात निकालपत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वकील आणि पक्षकार यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी आभार व्यक्त केले.
०००००

शेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

पुणे, दि. ९: शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करुन देण्याकरीता याबाबत इतर राज्याच्या प्रणालीचा अभ्यास करावा, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नवीन प्रशासकीय इमारत येथे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, उपसंचालक कमलाकर हटेकर, राजेंद्र गोळे, सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

श्री. बाबनकुळे म्हणाले, राज्यातील समुद्र व खाडी किनारपट्टीवरील महसूली सीमा व उच्चतम भरती रेषेपर्यंतच्या जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभाग, महसूल प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, वनविभाग, कांदळवन संरक्षण विभाग आदींच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करावी. मोजणी प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा आणून नागरिकांना सुलभ सेवा देण्याकरीता प्रयत्न करावे. स्वामित्व योजनेअंतर्गत येणारी प्रकरणे बारकाईने हाताळून मार्गी लावावेत. योजनेअंतर्गत येणाऱ्या मालमत्तापत्रकांवर बँकेने कर्ज देण्याकरीता पुढे यावे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही करावी.

विभागाच्या आकृतीबंधाबाबत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन करावे. विभागातील रिक्तपदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याकरीता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत विभागनिहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. राज्य शासन गतीमान पद्धतीने कामे करीत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजात गतिमानता आण्यासोबतच पारदर्शक पद्धतीने कामे करावीत, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

डॉ.दिवसे म्हणाले, गावठाण जमाबंदी प्रकल्प स्वामित्व योजनेअंतर्गत ३० हजार ४२२ गावे समाविष्ट असून त्यापैकी १८ हजार २८३ गावांचे मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत. माहे जून २०२५ ते माहे मे २०२६ पर्यंत प्रती महिना सुमारे १ हजार याप्रमाणे स्वामित्व योजना पूर्ण करण्याबाबत लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३० भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्यात आले असून येत्या काळात दुसऱ्या टप्प्यात ३५ भु-प्रणाम केंद्राचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.

यावेळी डॉ. दिवसे यांनी माहिती तंत्रज्ञान कक्षाद्वारे करण्यात येणारे संगणकीकरण उपक्रम, नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरफार प्रकरणे, स्वामित्व योजना, नक्शा प्रकल्प, भू-प्रणाम केंद्र -प्रगती अहवाल, प्रलंबित अपील प्रकरणे, ईक्युजे कोर्ट २ प्रकल्प, रिक्तपदे, पी.जी.संकेतस्थळावरील प्रकरणे व निकाली काढण्याच्यादृष्टीने करण्यात येणारे प्रयत्न आदीबाबत माहिती दिली.
0000

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, दि. ९: मुद्रांक शुलक् अभय योजनांची मुदत ३० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त झाली असून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने या योजनेस मुदतवाढ देण्याकरीता प्रस्ताव सादर करावा, नागरिकांच्या दस्ताऐवजाची गोपनीयता अबाधित ठेवण्यासोबतच त्याचा गैरवापर टाळण्याकरीता प्रणाली विकसित करण्याबाबत विचार करावा, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नवीन प्रशासकीय इमारत येथे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या क्षेत्रीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे, अपर मुद्रांक नियंत्रक, प्रधान मुद्रांक संजयसिंह चव्हाण, सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधीक्षक अशोक पाटील, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण व अभयसिंह मोहिते, लेखा उपसंचालक अविनाश देशमुख यांच्यासह पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक दीपक सोनवणे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विजय भालेराव, मुंबई विभागाचे राजू थोटे, नागपूर व अमरावती विभागाचे साहेबराव दुतोंडे, नाशिक विभागाचे कैलास दवंगे, कोकण विभागाचे राहुल मुंडके आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, विभागाच्या कामकाजाचा आढावा पाहता न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याकरीता ५ विधी अधिकारी व महालेखापाल तपासणीतील आक्षेपाचे निराकरण करण्याकरीता सनदी लेखापाल (सीए) नेमणूक करण्याची कार्यवाही करावी. मंत्रालयीन स्तरावरील प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्याकरीता एका समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या बांधकामाचा दरमहा आढावा घ्यावा. नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रकांने महिन्यात दोन ऐवजी चार कार्यालयीन कामकाजाची तपासणी करावी. विभागातील प्रलंबित विषय मार्गी लावून प्रकरणे शून्य प्रलंबितता (झिरो पेंडन्सी) राहील, याकरीता सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे. रिक्त पदे भरण्यासोबतच पदोन्नतीची प्रकरणे मार्गी लावण्याची कार्यवाही सुरु करावी.

राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत ‘एक राज्य एक नोंदणी’ व ‘एक जिल्हा एक नोंदणी’ आदीबाबत माहिती देण्याकरीता अधिकाऱ्यांसाठी विभागनिहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत करुन नागरिकांना सुलभ सेवा देण्याचे काम करावे. याकरिता इतर राज्यातील चांगल्या कामांचा अभ्यास करावा. विभागाच्यावतीने विविध लोककल्याणकारी मार्गदर्शक सूचना, नियम, आदेश पारीत करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचूकपणे कामे करावीत, पारदर्शक कामे करण्यासोबतच गैरप्रकार होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

यावेळी श्री. बिनवडे यांनी सन २०२४-२५ चे शासकीय वसुलीचे उद्दिष्ट व वसुली, सन २०२५-२६ शासकीय वसुलीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केलेले नियोजन, परतावा, अभिनिर्णय, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम १० ड ची अंमलबजावणी, कार्यालयीन तपासणी प्रक्रिया, फेसलेस नोंदणी प्रक्रियेचा आढावा, अभिलेख्याचे संगणकीकरण आणि स्कॅनिंग, १०० दिवसांचा आढावा आणि आगामी १५० दिवसात करावयाच्या कामाचे नियोजन, रिक्त पदे, महालेखापाल तपासणी, दस्त नोंदणी प्रक्रिया आदीबाबत माहिती दिली. येत्या काळात बैठकीत ठरल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. बिनवडे म्हणाले.
0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ

पुणे, दि. ९: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर येथे करण्यात आला.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हनुमंत शेळके, सचिव डॉ. स्वाती शेळके आदी उपस्थित होते.

सन २०३० पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचे ध्येय
डॉ. हनुमंत शेळके व डॉ. स्वाती जोगदंड शेळके या दांपत्याने २००९ साली बीड जिल्ह्यातून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली. सन २०३० पर्यंत रेबीज निर्मूलन करण्याचे ध्येय समोर ठेऊन हे रुग्णालय सुरू केले आहे. ग्रामीण भागात श्वानांची वाढती संख्या, श्वानदंशामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका व त्यावर उपाय योजना राबविण्यासाठी उपलब्ध असलेले व्यवस्था, कर्मचारी राहण्यासाठी गैरसोय या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात पशुवैद्यकीय सेवा देत आहेत.

महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता
फिरते पशुवैद्यकीय रुग्णालयाचे क्षेत्रफळ सुमारे २ हजार चौरस मीटर आहे. पहिल्यामजल्यावर १० कर्मचारी राहण्यासाठी व्यवस्था, महिन्याला ५०० शस्त्रक्रिया करण्याची क्षमता, ज्यामध्ये १०० कुत्र्यांना ठेवण्याची सुविधा, ऑपरेशन थिएटर, ओपीडी, आणि कन्व्हर्टेबल कॉन्फरन्स रूम, किचन, अभिलेख कक्ष, चर्चासत्र कक्ष व वातानुकूलित, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती, ओपीडी, लसीकरण, आपत्कालीन उपचार, नसबंदी आदी सुविधा उपलब्ध आहेत.
0000

रा.स्व. संघ मोतीबाग नगर तर्फे ‘कौमुदी संचलन’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग नगर ; घोषवादनासह शिस्तबद्ध संचलन 

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग नगरातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तरुण विभागाचे ‘कौमुदी संचलन’ उत्साहात पार पडले. घोषवादनासह शिस्तबद्ध संचलनात स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात सहभाग घेतला. 

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेतून संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी कसबा भाग संघचालक प्रशांत यादव उपस्थित होते. रमणबाग प्रशालेतून मुठेश्वर मंडळ, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीज चौक, खंडुजीबाबा चौक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा मारून कुमठेकर रस्त्याने उंबऱ्या गणपती चौकामार्गे रमणबाग प्रशाला मैदान येथे संचालनाचा समारोप झाला. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला स्वयंसेवकांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन देखील केले. तसेच संचालनाचे ठिकठिकाणी स्वागत पुणेकरांनी केले. रा. स्व. संघाच्या आगामी शताब्दी वर्षांचा विचार करीत तरुण वर्गाची ताकद वाढावी, याकरिता देखील संचालनाचे आयोजन करण्यात आले होते. 

पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी रद्द,पण …मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

मुंबई-यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेश मूर्ती तयार करण्यावरील आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याची सक्ती कायम राहणार असून, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास सक्त मनाई करण्यात आली आहे.

न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये कोणत्याही पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ञ समितीनेही हीच शिफारस केली होती, त्यानुसार पीओपी मूर्ती केवळ कृत्रिम जलसाठ्यातच विसर्जित करता येतील.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुढील तीन आठवड्यांत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात विसर्जनासाठीच्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाविषयीची माहिती असणे अपेक्षित आहे.

या निर्णयामुळे आता घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्ती साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करण्याच्या अटीचे पालन अनिवार्य राहील. यामुळे ज्या मूर्तीकारांनी आधीच पीओपी मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये कोणत्याही पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते कोणत्याही पीओपी मूर्तीचे नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी देणार नाही.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) तज्ञ समितीने शिफारस केली आहे की, पीओपी मूर्ती तयार करता येतील. परंतु नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जित करता येणार नाहीत. सीपीसीबी समितीने असे म्हटले आहे की, अशा मूर्ती फक्त कृत्रिम जलसाठ्यात विसर्जित केल्या जाऊ शकतात. पीओपी बनवलेल्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत आता राज्य सरकारला विवेकबुद्धी वापरावी लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल, असे खंडपीठाने म्हटले आहे.

सुनावणी दरम्यान मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत एकमेव मुद्दा समोर आला. यावेळी न्या. मारणे यांनी मंडळांना दरवर्षी एक मूर्ती बनवून ती सुरू ठेवण्यास सांगितले जाऊ शकते का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी मोठ्या मूर्तींसाठी काही “सवलत” मागितली आहे. या मोठ्या मूर्ती (20 फूट आणि त्याहून अधिक उंचीच्या) आपल्या संस्कृतीचा भाग बनल्या आहेत, असे सराफ म्हणाले.

सीजे आराधे यांनी म्हटले की, आम्हाला खात्री आहे की, कोणत्याही पीओपी मूर्तीचे नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तुम्ही कृत्रिम जलसाठे तयार करू शकता आणि तेथे पीओपी मूर्तींचे विसर्जन करू शकता. एजी सराफ यांनी म्हटले की, जर मंडळांनी कायमस्वरूपी त्याच मूर्तीचा वापर केला तर राज्य म्हणून आम्ही त्यात अडथळा आणणार नाही. यावर सीजे आराधे यांनी हो, तुम्ही निर्णय घ्या, असे म्हटले आहे.

तज्ज्ञ समितीने मान्य केले की, अशी मार्गदर्शक तत्वे नेहमीच सल्लागार स्वरूपाची असतात.
तज्ज्ञ समितीने, सीपीसीबीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कायदेशीर स्थिती आणि महाराष्ट्र सरकारकडून 09.04.2025 आणि 05.05.2025 रोजीच्या पत्रांद्वारे प्राप्त झालेल्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या प्रतिनिधित्वाची आणि समितीच्या अहवालाचा विचार केला आहे.
तज्ञ समितीचे मत आहे की, राज्य सरकार खालील अटींच्या अधीन राहून पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींचे विसर्जन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ शकतात.
राज्य सरकारने पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव असल्याची खात्री करावी. परंतु पीओपी मूर्तींचे विसर्जन नद्या, तलाव, नैसर्गिक तलाव आणि समुद्रात करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
विसर्जनानंतर, राज्य सरकार तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये जमा झालेले साहित्य काढून टाकण्याची खात्री करेल. गोळा केलेले पीओपी साहित्य पुनर्जन्म आणि पुनर्वापरासाठी उचलले जाईपर्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने साठवले जाईल.
पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यासाठी सीपीसीबीने 2020 मध्ये जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या इतर उपाययोजनांचे पालन करणे.

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे दि. ९ जून : माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्राद्वारे महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या “विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५” या मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये पश्चिम विभाग (सोहम गंभीर)े, मराठवाडा (अथर्व वाघचौरे) आणि विदर्भ (गौरी मुंडोकार) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती परीक्षेचे मुख्य समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माईर्स एमआयटी पुणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकासाची जोड दिली आहे. संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून जगात विश्वशांती व राष्ट्रनिर्मितीचे काम करतील. हा उद्देश्य ठेऊन गेल्या १२ वर्षापासून मूल्याधिष्टित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. २०२५ या वर्षापासून परीक्षेचे रुपांतर शिष्यवृत्ती मध्ये करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी १०वीचा विद्यार्थी बसू शकतो. त्या विद्यार्थ्याला १०वींत ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती त्याला ११वी आणि १२वी या दोन वर्षासाठी दिली जाईल.
विभागात गुणानुक्रमे येणार्‍या विद्यार्थी प्रथम (२५ हजार), द्वितीय (२० हजार), तृतीय (१५ हजार), चतुर्थ (१० हजार) आणि पाचवा (५ हजार) ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
या परीक्षेचा निकाल ः पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय,विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे(चतुर्थ, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर )
मराठवाडा विभागः अथर्व अमोल वाघचौरे (प्रथम, कै. दादाराव कराड विद्यालय, अंबाजोगाई), वैभवी तातेराव लहाडे (द्वितीय, श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर रूई), आर्या सचिन गडदे (तृतीय, कै. दादाराव कराड विद्यालय,अंबाजोगाई), सुरज विश्वंबर गायकवाड (चतुर्थ, मुकुंदराज विद्यालय, नांदगाव), दिव्या विलास धांडे (पाचवी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव)

विदर्भ विभागः गौरी गोपाळ मुंडोकार(प्रथम, श्री शिवाजी विद्यालय,अकोट), पयोष्णी विजय पार्शिवकर (द्वितीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), सह्याद्री अरविंद कळसकर (तृतीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), स्वराज नितीन बंड (चतुर्थ , जनता विद्यालय,पूर्णानगर), वैभवी नंदकिशोर अकोटकर (पाचवा, श्री शिवाजी विद्यालय, अकोट )

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन

पुणे / लोणावळा : यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले.

लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधव भोंडे, उपाध्यक्ष नारायण भार्गव, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा जगदीशचंद्र मठ, राजेंद्र चतुर्वेदी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे, विश्वस्त पंडित विद्यासागर,अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे. या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे. त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे, अशी जोशी यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता, शास्त्रज्ञ, कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे. अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे. त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो, नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली.

कल्पना चावला स्पेस अकादमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्र मठ यांनी दिली. उत्सुकताही प्रगतीची जननी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिवान, भावनिक दृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जीवन विद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे, असेही प्रा मठ यांनी सांगितले.

अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील, किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली.

सुनील पोटे यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. देवतोष कृष्णा यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका भोंडे यांनी आभार मानले.

रेल्वे दुघर्टनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच:त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही-अजित पवार

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई लोकल अपघाताची जबाबदारी रेल्वे असून, त्यांना ती टाळता येणार नाही असे परखड मत व्यक्त केले आहे. मुंब्रा येथे झालेल्या फास्ट लोकल दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला प्रवाशी जबाबदार असल्याचा दावा रेल्वेने केला होता. पण अजित पवारांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावत रेल्वे प्रशासनाला या अपघाताची जबाबदारी टाळता येणार नाही, असे म्हटले आहे.

अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी पडल्याची माहिती सुरुवातीला सांगितली जात हाेती. परंतु तसा काेणता प्रकार घडला नाही. साेमवारी सकाळी साडेनऊ वाजता दाेन ट्रेन रुळावरुन जात असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्या. त्यामुळे प्रवाशी खाली पडले. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेची आहे. ती ते टाळू शकणार नाही. याबाबत चाैकशीअंती वस्तुस्थिती पुढे येईल. तूर्त काेणत्या राजकीय नेत्यांना काय बाेलायचे हा त्यांचा अधिकार आहे. चाैकशी केल्यावर ज्या गाेष्टी समाेर येतील त्याबाबत खबरदारी घेण्याचे सक्त सूचना सबंधितांना दिल्या जातील.

अजित पवार म्हणाले, मुंबईत लाेकांची ये-जा करण्यासाठी रेल्वे एक महत्वाचे साधन आहे. रेल्वे प्रशासनामार्फत अनेक उपाययाेजना केल्या जात आहे. ब्रिटिश काळातील पूल काढून नवीन पुल बसवले गेले आहेत. माेठ्या प्रमाणात लाेक रेल्वे स्थानकावर येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही रेल्वेमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. लाेकलला दरवाजे केले तर ते कितपत लागू हाेतील सांगता येत नाही. कारण प्रवाशांची कमी वेळेत चढ- उतार हाेत असते. झालेली घटना दुर्देवी असून मनाला वेदना देणारी आहे. अशाप्रकारे घटना घडल्यावर रेल्वे विभागा तर्फे मयत व जखमी यांना रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदत दिली जाते.

रेल्वेचे डबे वाढवले तरी त्या प्रमाणात स्थानकाचे प्लॅटफाॅर्म देखील वाढले पाहिजे. मेट्राे ही देखील सार्वजनिक व्यवस्था असून त्याला गती देण्याचे काम केले जात आहे. चर्चगेटकडे येणारा माेठा प्रवासी गट असून त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. लोकल ट्रेन दोन-तीन मिनिटांनी सुटते. डबे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या गतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू असून, त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी आश्वासन दिले.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

पुणे दि.9 : अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर अशा तिनही प्रवर्गातील दिव्यांग विदयार्थ्यांसाठी शासकीय बहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र येरवडा येथे इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत (वयोगट 06 ते 18 वर्ष) साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अधिक्षिका रोहिणी मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या केंद्रात प्रशिक्षित शिक्षक वर्ग, डिजिटल शिक्षण, दर्जेदार वसतीगृह, भौतिक उपचार, व्यवसाय उपचार समाज उपचार, वैद्यकिय मदत, व समुपदेशन आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया यांसारख्या अत्याआधुनिक सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम आणि नैतिक मुल्यांचे शिक्षण केंद्रात दिले जाते. प्रवेशासाठी संपर्क शासकीय वहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र, गोल्फ क्लब रोड (औद्यागिक शाळेच्या बाजुला) येरवडा पुणे. मोवाईल नंबर:-मोरे-9763895598, वाघ-9960233823, सोनवणे-9226959371, कारंडे-9765077666. सरोदे-9730515597 या नंबरवर संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.