Home Blog Page 2631

दीवा प्रतिष्ठान ‘हातावर पोट’ असणाऱ्याच्या मदतीला धावले..

0

पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळेच अशा कुटूंबियांना दोन वेळच्या जेवणाची सोय आपल्या दीवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येत आहे. केळेवाडीसह इतर भागातही अनेक कुटूंबियांना ही सेवा पुरवली जात आहे.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रमुख देखरेखी खाली  कोथरूडमध्ये शेकडो नागरिकांना अन्नदान करण्यात आले. त

कोरोना संकट आपल्या भारतातही पोहचले आहे. या रोगामुळे कष्टकऱ्यांचे एक वेळचे पोट भरणे सुद्धा अवघड आहे. प्रभाग क्र ११ मधील प्रामुख्याने केळेवाडी, हनुमाननगर, राउतवाडी, किष्किंधानंदानगर, जयभवानीनगर, मातोबानगर, सुतारदारा या ठिकाणी बरेच गोरगरीब लोक पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करत होते. पण, सध्याच्या परिस्थितीने पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेने भयभीत व व्याकूळ झाले आहेत.

 

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी नवीन १७ रुग्णांची नोंद;राज्यातील एकूण रुग्ण संख्या २२०

0

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. ३०: राज्यात कोरोनाचे आज १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे तर आज २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला, त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते तर करोना बाधित असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता १० झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-
मुंबई ९२
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ४३
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३
नागपूर १६
यवतमाळ ४
अहमदनगर ५
सातारा, कोल्हापूर २
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक प्रत्येकी १
इतर राज्य – गुजरात १
एकूण २२० त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू
याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही.
राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ९, यवतमाळ- ३, अहमदनगर- १, नागपूर- ४, औरंगाबाद- १
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

 

लॉकडाऊन..पुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहे ; 64 हजार 926 विस्थापितांसाठी सुविधा

0

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि 30: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत बेघर झालेले नागरिक, विस्थापित तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 42 निवारागृहे ( 12 हजार 460 नागरिक), सातारा जिल्ह्यात 143 निवारागृहे (4 हजार 688 नागरिक), सांगली जिल्ह्यात 16 निवारागृहे (1 हजार 306 नागरिक), सोलापूर जिल्ह्यात 2 निवारागृहे,(62 नागरिक) कोल्हापूर जिल्ह्यात 11 निवारागृहे ( 46 हजार 410 नागरिक) एकूण 64 हजार 926 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था पुणे विभागात करण्यात आली आहे.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली.
जमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहात रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे

ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पहाणी

0

 

पुणे, दिनांक 30- कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत 5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. हरीश ताटिया, डॉ. मुरलीधर तांबे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. ससून हॉस्पीटलची नवीन इमारत अकरा मजली असून सहाव्‍या व नवव्‍या मजल्‍यावर रिफ्यूजी एरिया आहे. इमारतीतील सर्वच मजल्‍यावर आयसोलेशन बेड्सची सोय करण्‍यात येणार आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍याकडे रुग्‍णालय व अतिदक्षता विभागाचे व्‍यवस्‍थापन ही जबाबदारी देण्‍यात आली आहे. पहाणीनंतर अधिष्‍ठाता कक्षात बैठक घेण्‍यात आली. बैठकीत इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीन यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर, लॉकडाऊनमुळे उपलब्‍ध मनुष्‍यबळाच्‍या मदतीने गतीने काम करणे यावर चर्चा झाली. कोरोनाच्‍या मुकाबल्‍यासाठी शासनाचे सर्वच विभाग सक्षमपणे काम करत असून नवीन इमारतीत 700 हून अधिक बेड्स तयार करण्‍याचे आव्‍हान पूर्ण करु, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यास इथे तत्काळ संपर्क करा-मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

0

मुंबई, दि.30 : कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागर‍िकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागर‍िकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.

श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव – 9870336560

श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी – 9766158111

श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी- 7588052003

श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-7875280965

मंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक या सुविधेबाबत समाधानी आहेत.

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट ; अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा

0

मुंबई, दि.30 मार्च :- रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

वृंदावन मथुरा येथे अडकून राहिलेले 95 वारकरी यांना महाराष्ट्रात सुखरूप पणे परत आणण्यात डॉ नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांना यश…

0

पंढरपूर दि. ३० : कोरोनामुळे देशातील तसेच राज्यातील नागरिक विविध ठिकाणी अडकून बसले आहेत. असेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे नागरिक मथुरा येथे अडकल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना दि. २७ मार्च, २०२० रोजी दूरध्वनी द्वारे हभप श्री वास्कर महाराज व श्री उखळीकर महाराज पंढरपूर यांनी कल्पना दिली. यांसदर्भात उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ उपसभापती कार्यालयीन खाजगी सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी यांना अडकलेल्या वारकऱ्यांना सोडविण्याबाबत उपयोजन करण्यास आदेश दिले. त्यानुसार या अधिकारी यांनी दि २७ पासून उत्तरप्रदेश गृहविभाग, जिल्हाधिकारी मथुरा, तसेच मध्यप्रदेश गृहविभाग यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करण्यात आले.
या वारकाऱ्यांना प्रवास करण्यासाठी कोणाकडे संपर्क साधायचा याबाबत काहीच ज्ञान नव्हते, वृन्दावन मथुरा येथून निघण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, रस्त्यात रहाण्याची व्यवस्था नव्हती तसेच विविध राज्याच्या प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य नसल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते. परंतु डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती यांनी त्यांना धीर दिला आणि प्रशासनांशी संवाद साधून त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व सातत्याने तसे काम केले। उपसभापती कार्यालयाच्या पाठपुराव्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना मदत मिळण्यास सुरवात झाली आणि त्यांना मायेची साथ मिळाल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवाससाठी दोन ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली तर यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काल दि. २९ मार्च, २०२० रोजी त्यांचे वृन्दावन येथे हेल्थ चेकअप करून त्यांना उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आणण्याबाबतच्या प्रवासाची परवानगी मिळाली. यात उपसभापती कार्यालयातील अधिकारी सचिन चिखलीकर हे वारकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना मायनगरीत आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. आज दि. ३० मार्च, २०२० रोजी पहाटे त्यांचे परळी वैजनाथ येथे आगमन झाले असून त्यांचे तेथे पुन्हा मेडिकल चेकअप केले जात असून त्यांना मेडिकल अधिकारी यांच्या निगरानी ठेवण्यात आले असून लवकरच त्यांचे पंढरपूर येथे आगमन होईल. या संपूर्ण संवेदनशील वातावरणात डॉ नीलम गोऱ्हेनी वारकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना महाराष्ट्र मध्ये आणण्यात केलेल्या प्रयत्नाबद्दल वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

कोविड-19 जागतिक साथीच्या आजाराच्या काळात भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

0

मुंबई-कोविड-19 या साथीच्या आजाराची जागतिक पातळीवर अनेक लोकांना लागण झाली असून या रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या आजारावर मात करण्यासाठी, त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.याचाच भाग म्हणून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक असून, त्याद्वारेच आपण या आजाराच्या संक्रमणाची साखळी रोखू शकतो.

ज्येष्ठ नागरिकांना हा आजार होण्याचा अधिक धोका असतो, कारण वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते शिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनीशी संबंधित अनेक आजार, दमा किंवा श्वसनाशी संबंधित विकार असतात. त्यासोबतच, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास, तो गंभीर आजार होऊ शकतो आणि अनेकदा त्यात जीव जाण्याचीही भीती असते.

मात्र, पुढील उपाययोजना करुन ज्येष्ठ नागरिकांना कोविड-19 चा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जाऊ शकते.

काय करावे :

  1. घरी रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांना भेटू नका. भेटणे अत्यावश्यक असेल तर बोलतांना किमान एक मीटरचे अंतर ठेवा.
  2.  थोड्या थोड्या वेळाने आपले हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवा.
  3. तुम्हाला शिंक किंवा खोकला आल्यास आपल्या बाहीचा, टिश्यू पेपर अथवा हातरुमालाचा वापर करा. वापर करुन झाल्यावर टिश्यू पेपर फेकून द्या आणि रुमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवा.
  4. केवळ घरात शिजलेला ताजा आणि पोषक आहार घ्या. वारंवार पाणी प्या आणि फळांचा ताजा रस पिऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
  5. व्यायाम आणि प्राणायाम करा.
  6.  तुम्हाला दररोज घ्यायला सांगीतलेली सर्व औषधे नियमित घ्या.
  7. तुमच्या कुटुंबियांशी बोला ( दूर असलेल्या कुटुंबियांशीही बोला), नातेवाईक, मित्र यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स करा, गरज पडल्यास कुटुंबियांची मदत घ्या.
  8. तुमच्या काही शास्त्रक्रिया ठरल्या असतील, उदा. डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन, गुडघे प्रत्यारोपण, तर अशा शस्त्रक्रिया पुढे ढकला.
  9.  वारंवार स्पर्श केली जाणारी सर्व  ठिकाणे जंतुनाशक नियमित पाण्याने स्वच्छ करा.
  10. आपल्या तब्येतीकडे नीट लक्ष ठेवा. जर आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवा आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचना, सल्लयाचे काटेकोर पालन करा.

काय करु नये :

  1. शिंक किंवा खोकला आल्यास कधीही मोकळ्या हातावर किंवा चेहरा न झाकता शिंकू/खोकलू नका.
  2. आपल्याला ताप आणि खोकला असेल तर आपल्या आसपासच्या व्यक्तींच्या जवळ जाऊ नका.
  3. तुमचे डोळे, चेहरा, नाक आणि जीभ यांना स्पर्श करु नका.
  4. संसर्ग झालेल्या/आजारी व्यक्तींच्या आसपास अजिबात जाऊ नका.
  5.  स्वतःच्या मनाने कुठलेही औषधोपचार करु नका.
  6. कोणाशीही हस्तांदोलन करु नका किंवा गळाभेट घेऊ नका.
  7. सध्या नियमित तपासणीसाठी देखील रुग्णालयात जाऊ नका. आवश्यक असल्यास आपल्या डॉक्टरांशी टेली-कन्सल्ट (व्हीडीओ फोन) करा.
  8. गर्दीच्या ठिकाणी- जसे, उद्याने, बाजारपेठा आणि धर्मिक स्थळे-अजिबात जाऊ नका.
  9. अगदी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा अजिबात बाहेर जाऊ नका.

देशाच्या विविध भागात वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून कार्गो विमान सेवा सुनिश्चित

0

नवी दिल्ली,-

नागरी विमान वाहतूक  मंत्रालय (एमओसीए) कोविड -19 ची चाचणी आणि या रोगापासून संरक्षणासाठी  आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि अन्य संबंधित सामुग्रीच्या पुरवठ्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय (एमओसीए) राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे.  विविध राज्यांकडून तातडीने प्राप्त झालेल्या आवश्यक वस्तूंच्या मागणीच्या आधारे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आवश्यक सामग्री पुरविण्यासाठी संबंधित पुरवठा संस्थांशी समन्वय साधत आहेत. तसेच देशभरात  आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एअर इंडिया आणि अलायन्स एअरची विमानसेवा सुरु ठेवण्यात आली आहे.

या विमानांमधून माल वाहतूक करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिकृत केलेल्या एजन्सी त्यांच्या प्रदेशातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत  असून, वेळेवर माल पोहचवणे/घेणे यासाठीही  समन्वय साधत आहेत .

देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, एलायन्स एअरने 29 मार्च  2020 रोजी दिल्ली- कोलकाता मार्गावर  विमानसेवा चालवून कोलकाता, गुवाहाटी, दिब्रूगड आणि अगरतलासाठी सामुग्रीची वाहतूक केली.

भारतीय नौदलाच्या विमानाने उत्तर भागात, दिल्ली- चंदीगड- लेह दरम्यान  विमानसेवेद्वारे आयसीएमआर व्हीटीएम किट आणि अन्य आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत.

अलायन्स एअरने एअर इंडियाच्या विमानातून  पुण्यासाठी आवश्यक सामुग्री मुंबईला पाठवली आहे.

(मुंबई-दिल्ली-हैदराबाद-चेन्नई-मुंबई आणि हैदराबाद-कोईम्बतूर)- या मार्गावरील उड्डाणांनी सिमला, ऋषिकेश , लखनऊ आणि इम्फाळसाठी आयसीएमआर किट पुण्याहून दिल्लीला नेल्या. आयसीएमआर किट चेन्नईला नेण्यात आल्या. हैदराबादला एकदा माल पाठवण्यात आला. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीला देखील सामुग्री पुरवण्यात आली. वस्त्रोद्योग मंत्रालयाची एक कंसाइन्मेन्ट कोईम्बतूर येथे पाठवण्यात आली.

संबंधित ठिकाणी वेळेवर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी माहितीचे आदानप्रदान, शंकांचे निरसन आणि प्रत्यक्ष काम अविरत सुरु असून कोविड-19 चा सामना करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (व्हिडिओ)

0

पुणे-पुण्यामध्ये एका 52 वर्षीय कोरोनाबाधिताचा आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्यामुळे  राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा नऊ झाला आहे.

पुण्यामध्ये दररोज कोरोनाचे नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत.  त्यातील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्ण हा मधुमेही होता. उच्च रक्तदाबाचाही त्याला त्रास होता. उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्याला कोरोनाचीही लागण झाली असल्याचे स्पष्ट होते.आज त्यांचा मृत्यू झाला.

पुणे शहरातील 26 व ग्रामीण भागातील पाच असे एकूण 31 कोरोनारुग्ण आढळले असून पिंपरी-चिंचवडचे 12 मिळून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 43 झाली आहे. उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या एकूण 15 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सक्रि़य कोरोनाबाधितांची संख्या 27 झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मार्केट यार्डात 243 वाहनांमधून शेतीमालाची आवक

0

पुणे – मार्केट यार्डातील बाजार सुरळीत सुरू झाला आहे. सोमवारी फळ आणि कांदा बटाटा विभागात मिळून 243 वाहनांतून 12 हजार 361 क क्विंटल शेतीमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रोटेशन पद्धतीने बाजार चालवण्यात येत आहे. रविवारी भाजीपाल्याचा व्यवहार झाला होता. तर, आज फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरू होता. आज झालेल्या आवकेपैकी फळे आणि केळी विभागात मिळून 138 वाहनांमधून 5 हजार 857 क्विंटल मालाची आवक झाली. तर कांदा आणि बटाटा विभागात मिळून एकशे पाच वाहनातून 6 हजार 504 क्विंटल आवक झाली .

याविषयी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड ते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, फळ विभागात नेहमीच्या तुलनेत मालाला उठाव नव्हता. आलेल्या मालपैकी जवळपास निम्मा माल शिल्लक आहे. द्राक्ष वगळता सर्व फळांचे भाव स्थिर आहेत. तर, द्राक्षांच्या भावात मात्र मागणीअभावी घसरण झाली आहे.

कांदा-बटाटा विभागाच्या व व्यवहाराविषयी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा कोरपे म्हणाले, बाजार समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदा-बटाटा विभागातील 70 टक्के आडते कामावर हजर झाले होते. येथील कामकाजात करोनाच्या भीतीमुळे कामगार कमी प्रमाणात सहभागी झाले. त्याचा परिणाम, कामावर झाला. अंदाजाने वजन ठरवुन व्यवहार करण्यात आले. घाऊक बाजारात सोमवारी कांद्यास किलोस 17 ते 20 रुपये, तर बटाट्यास किलोस दर्जानुसार 20 ते 20 रुपये भाव मिळाला.

मार्केट यार्डातील फुल बाजार 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार

0

पुणे – मार्केट यार्डातील फुलबाजार येत्या 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल फुलबाजार आडते असोसिएशन आणि बाजार समिती प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणेकरांना आता फुले खरेदी करण्यासाठी 16 एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे.

फुलबाजार कमी जागेत जास्त व्यापार होतो. येथे खरेदीसाठी नेहमी मोठी गर्दी होत असते. तसेच, फुलेही जीवनावश्यक गोष्टींमध्ये येत नाहीत. या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय झाला असल्याचे अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले. ते म्हणाले, यापूर्वीच 31 मार्चपर्यंत फुलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद लांबविण्याचा निर्णय झाला आहे.

सध्या परिस्थितीत दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि पदार्थनांच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे फुल बाजारात फुलांनाही फारशी मागणी असण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजार समितीशी झालेल्या चर्चेमध्ये एक मताने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.

लॉकडाऊन कालावधीत अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास गौरविणार

0

पुणे-वीजपुरवठा  ही  अत्यावश्यक  सेवा  आहे. महावितरणमधील अधिकारी-कर्मचारी हे महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु  ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यास महावितरणतर्फे योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात यावे आणि लॉकडाऊन कालावधीसाठी तातडीने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.

त्यामध्ये  वेतनगट 3 व 4 मधील तांत्रिक / अतांत्रिक कर्मचारी व  कंत्राटी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर खरेदीकरिता प्रत्येकी रु.1000/- अग्रीम अदा करण्यात यावा व हि  रक्कम माहे एप्रिल 2020 च्या वेतनामध्ये किंवा तत्पूर्वी अदा करावी. ग्राहकाशी थेट संपर्क  होऊ  नये  याकरिता  मिटर रिडींग,  वीज बिल वितरण, वीज बिल भरणा केंद्र, वीज  चोरी मोहिम,  वीजपुरवठा  खंडित  करणे  इत्यादी  प्रक्रिया   थांबविण्यात  आलेल्या आहेत. अत्यंत तातडीचे असल्याशिवाय १४ एप्रिल २०२० पर्यंत  देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित करू नये.

सर्व  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  त्यांच्या मुख्यालयातच  राहावे व आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे  संपर्कात राहून अत्यावश्यक सेवेकरीता  कर्मचाऱ्यांशी  समन्वय साधावा. तसेच प्रत्येकाने ओळखपत्र सोबत बाळगावे व गणवेश परीधान करावा. सदर कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्याबाबतचे पत्र संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत देण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून संचारबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याकरिता अडथळा  निर्माण होणार नाही. कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कामावर जाणे-येणे करण्यासाठी कंपनीचे वाहन उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी त्यांच्या दुचाकी वाहनावर “अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र शासन उपक्रम महावितरण” असे पत्रक लावण्यात यावे.

बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन 7 तारखेपूर्वी करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सुचना दयाव्यात. तसेच उपरोक्त कालावधीत अनुपस्थितीसाठी त्यांचे वेतन कपात करू नये. यंत्रचालकांनी उपकेंद्रातील त्यांच्या कामाच्या वेळा परस्पर समजूतीने ठरवाव्या व तशी माहिती नियंत्रण अधिकाऱ्यांस द्यावी. तसेच  प्रत्येक तासाला रिडींग न घेता फक्त दिवसातून दोन वेळेस रिडींग घ्यावे. जेणेकरून उपकरणांना वारंवार हाताळावे लागणार  नाही. सर्व लाईन स्टाफ यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार कामकाज करावे.

जे कर्मचारी बाहेर गावावरून कामाला येणे-जाणे करतात त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था कंपनीच्या विश्रामगृहामध्ये किंवा कार्यालयामध्ये करण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी.  कर्मचाऱ्यांस वीज ग्राहकाकडून मारहाण झाल्यास संबंधित कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क करावा व कर्मचाऱ्याला संपूर्ण सहकार्य करावे.

बायोमेट्रिक  हजेरी  पद्धती स्थगित करावी. तसेच प्रशासकीय  कार्यालयामध्ये आवश्यकतेनुसार  फक्त 5% पर्यंत  उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. सर्व प्रकारचे  प्रशिक्षण कार्यक्रम पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत  वेळेत  करण्यात  यावे. तसेच माहे मार्च  2020 मध्ये  सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम त्वरित अदा करावी. तथापि,  रजा रोखीकरण  व इतर देयके नंतर अदा करण्यात यावी. सर्व  संबंधितांनी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचा  उपयोग करावा  जसे  व्हीडिओ कॉन्फरेन्स,  ऑडिओ   कॉल, व्हाट्सअँप, ट्विटर, फेसबुक, ई-मेल इत्यादीचा वापर  दैनंदिन  कामकाजात करावा.

स्थापत्य विभागामार्फत अत्यंत  महत्वाच्या कामाव्यतिरिक्त  कोणतेही  काम करण्यात येऊ  नये. सुरक्षा  रक्षक व  सफाई  कामगार यांना देखील  हॅन्ड  सॅनिटायझर व  मास्क  उपलब्ध करून  देण्यात यावे.  सर्व  कर्मचाऱ्यांना  कार्यालयामध्ये प्रवेशद्वार, अभ्यागत कक्ष, लिफ्ट, वसाहत इत्यादी ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing) ठेवण्याबाबतच्या स्पष्ट  सूचना द्याव्या. कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदली 14  एप्रिल  2020 अथवा  पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात  यावी व महावितरण अँपद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात याव्या.

आयसीआयसीआय बँकेने व्हॉट्सअॅपवर दाखल केली बँकिंग सेवा

  • ग्राहकांना बचत खात्यातील बॅलन्स, मागील तीन व्यवहार व क्रेडिट कार्ड लिमिट पाहता येईल, आधीच मंजूर झालेल्या कर्जाचा तपशील मिळवता येईल आणि त्यांचे क्रेडिट व डेबिट कार्ड ब्लॉक/अनब्लॉककरता येईल
  • ग्राहकांना कोणत्याही शाखेत न जाता, ही सेवा 24×7 तातडीने मिळेल
  • बँकेच्या प्रोफाइल नंबरवर (9324953001)नोंदणीकृत मोबाइलवरून‘Hi’असा मेसेज पाठवा व तातडीने सुरुवात करा

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने व्हॉट्सअॅपवर विविध बँकिंग सेवा दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे.कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरू असल्याने घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आलेल्या आमच्या ग्राहकांना विविध बँकिंग व्यवहार करणे सोयीचे जावे, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

रिटेल व बिझनेस अशा दोन्ही ग्राहकांना अखंडितपणे बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने आयसीआयसीआय बँकेने ‘आयसीआयसीआयस्टॅक’ या डिजिटल बँकिंग सेवा आणि एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस) सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने व्हॉट्सअॅपवर ही नवीन सेवा दाखल केली आहे. ‘आयसीआयसीआयस्टॅक’ अंदाजे 500 सेवा देत असून त्यामध्ये ग्राहकांच्या जवळजवळ सर्व बँकिंग गरजांचा समावेश आहे, जसे डिजिटल खाते उघडणे, कर्ज सुविधा, पेमेंट सुविधा, गुंतवणूक व केअर सोल्यूशन्स.

या सेवेचा वापर करून रिटेल ग्राहकांना सर्व मेसेजेसासठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे सुरक्षित पद्धतीने त्यांच्या बचत खात्यातील बॅलन्स तपासता येईल, मागील तीन व्यवहार व क्रेडिट कार्ड लिमिट पाहता येईल, आधीच मंजूर झालेल्या कर्जाचा तपशील मिळवता येईल आणि त्यांचे क्रेडिट व डेबिट कार्ड ब्लॉक/अनब्लॉक करता येईल. याचबरोबर, त्यांना त्यांच्या परिसरातील जवळच्या तीन आयसीआयसीआय बँकएटीएमची व शाखांची माहिती मिळू शकेल. ग्राहकांना सोशल मीडिया वापरत असताना या सेवाही वापरता येऊ शकतील.

आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी या उपक्रमाविषयी बोलताना नमूद केले, “गेले काही आठवडे कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांना अखंडित व सुरळित डिजिटल बँकिंग सेवा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या दृष्टीने, ‘आयसीआयसीआयस्टॅक’ या डिजिटल सुविधेवर 500 सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

आम्ही आता या सेवा व्हॉट्सअॅप या जगातील अत्यंत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशनवर उपलब्ध केल्या आहेत. आमच्या रिटेल ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता त्यांचे बँकिंग व्यवहार स्वतःचे स्वतः करता येऊ शकतात. या सेवा तातडीने दिल्या जातील व त्या सुरक्षित आहेत. दैनंदिन जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर सतत वाढत असल्याने, ही नवी सेवा ग्राहकांना अतिशय सोयीस्कर वाटणार आहे. या सेवेमुळे त्यांना सोशल मीडियाचा वापर करत असतानाच बँकिंग व्यवहारही करता येणार आहेत.”

व्हॉट्सअॅपवापरत असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही बचत खातेधारकाला या नव्या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच, बँकेचे केवळ क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनात्यांचे कार्ड ‘ब्लॉक/अनब्लॉक’ करण्यासाठी या सेवेचा वापर करता येऊ शकतो.आयसीआयसीआय बँकेचे खातेदार नसलेल्या ग्राहकांनाही त्यांच्या परिसरातील शाखा किंवा एटीएम कुठे आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही तत्पर सेवा वापरता येऊ शकते.

तातडीने सुरुवात करण्यासाठी पुढील करा:

  • नंबर सेव्ह करा आणि ‘Hi’ लिहा:ग्राहकाने 9324953001हा आयसीआयसीआय बँकेचा योग्य व्हॉट्सअॅप प्रोफाइल नंबर आपल्या मोबाइल फोनच्या ‘काँटॅक्ट्स’मध्ये सेव्ह करावा आणि बँकेकडे नोंदणीकृत असणाऱ्या नंबरवरून या नंबरला <Hi>असे लिहून पाठवावे. बँक उपलब्ध सेवांची यादी पाठवून त्यास प्रतिसाद देईल.
  • सेवांसाठी कीवर्ड टाइप करा:सेवांच्या यादीमधून आवश्यक सेवेसाठी कीवर्ड टाइप करा (ओळखण्यास सोपे व्हावे यासाठी संभाषणामध्ये कीवर्ड ठळक केलेले असतात), उदा. : <Balance>, <Block>. सेवा तातडीने निवडली व दर्शवली जाईल.

व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असणाऱ्या बँकिंग व अन्य सेवांची माहिती पुढे दिली आहे:

बँकिंग सेवा व त्यांचे कीवर्ड:

  1. खात्यातील बॅलन्स तपासणे :कोणताही कीवर्ड टाइप करा, जसे<balance>, <bal>, <ac bal>
  2. मागील तीन व्यवहार पाहणे :टाइप करा<transaction>, <<stmt>, <history>
  3. थकित रक्कम जाणून घेणे आणि क्रेडिट कार्डाची उपलब्ध क्रेडिट मर्यादा पाहणे :टाइप करा< limit>, <cc limit>, <cc balance>
  4. क्रेडिट व डेबिट कार्ड तातडीने ब्लॉक/अनब्लॉक करणे :टाइप करा< block>, <lost my card >, <unblock>
  5. आधीच मंजूर झालेल्या झटपट कर्जांचा तपशील पाहणे : टाइप करा<loan>, <home loan>, <personal loan>, <instant loans>

अन्य सेवा:

  1. जवळचेआयसीआयसीआय बँक एटीएम व शाखा शोधा:टाइप करा<एटीएम> , <शाखा>इ.
  2. ट्रॅव्हल, डायनिंग, खरेदी इ.वर आजूबाजूला असणाऱ्या सवलती शोधाटाइप करा<offer>, <discounts>

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल’तर्फे ‘कोविड-19’विरोधी लढ्यासाठी 2 लाख सिंगापूर डॉलर्सचे साह्य

  पीएम-केअर्स निधीमध्ये योगदान

–    या कार्यात पुढाकार घेणारी देशातील पहिली पहिली शैक्षणिक संस्था

मुंबई : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) या शाळांचे नेटवर्क चालविणारी संस्था ग्लोबल स्कूल्स फाउंडेशन (जीएसएफ) हिने करोना व्हायरसविरोधातील राष्ट्रीय लढ्यात आपले योगदान देण्याकरीता ‘पंतप्रधान नागरिक मदत व आपत्कालीन सहाय्य निधी’साठी (पीएम-केअर्स फंड) दोन लाख सिंगापूर डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

या निधीचा उपयोग ‘कोविड-19’विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या स्त्रोतांना गती देण्यासाठी वापरला जाणार आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भारत आणि जगाच्या इतर भागात वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. ती लक्षात घेऊन तिच्यावर मात करण्याकरीता  ‘जीआयआयएस’ने हे योगदान देऊ केले आहे.

‘ग्लोबल स्कूल फाउंडेशन’चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष अतुल टेमुर्णीकर म्हणाले, ‘’कोविड-19च्या साथीचा सर्व जगात उद्रेक झाला आहे. भारतातील अनेक नागरिकांना या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. समाजातील वंचित घटकांकडे या आजारावर मात करण्यासाठी पुरेसे आर्थिक स्त्रोत नाहीत. त्या दृष्टीने हा आजार आटोक्यात आणण्यासाठी तातडीने काही उपाययोजना कराव्या लागत आहेत. पंतप्रधानांच्या केअर फंडामध्ये योगदान देऊन ग्लोबल स्कूल फाउंडेशन या लढाईप्रति आपली कटिबद्धता व्यक्त करीत आहे. नागरिकांचे आरोग्य व त्यांचे कल्याण या दृष्टीने आमचे हे फक्त एक लहान पाऊल आहे.”

करोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांना अखंडीत व सुरळीत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘जीआयआयएस इंडिया’ने आभासी वर्गखोल्यांची (व्हर्च्युअल क्लासरूम) सुविधा व इतर अनेक नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती वापरल्या आहेत. त्यायोगे विद्यार्थी घरातूनच शिक्षण घेऊ शकतील व स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील. ‘जीआयआयएस’ने आपले विद्यार्थी आणि शिक्षक यांना विषाणूची बाधा होऊ नये व त्याचवेळी त्यांचे शिक्षण देण्या-घेण्याचे कार्य सुरळीत सुरू राहावे यासाठी एक सातत्य योजना (कंटिन्युटी प्लॅन – सीपी) लागू केली आहे.

गेल्या अनेक वर्षांत, जीआयआयएस आणि जीएसएफ या संस्था विविध आदिवासी शाळा उपक्रमांमध्ये सक्रियपणे गुंतलेल्या आहेत. गुजरात राज्य सरकारच्या सहकार्याने चालविण्यात येणाऱ्या टिळकवाडा येथील महात्मा गांधी ग्लोबल इंडियन एकलव्य शाळेचा यात समावेश आहे.

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलबद्दल

ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) या पारितोषिक विजेत्या शाळा सिंगापूरस्थित ग्लोबल स्कूल फाउंडेशनने स्थापन केल्या आहेत. 7 देशांमध्ये या शाळांचे 21 कॅम्पस आहेत. कौशल्य आधारित आणि विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमासाठी नावाजलेल्या या जीआयआयएस शाळांमधून विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी देण्यात येतात.

शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जीआयआयएस शाळांना गेल्या 18 वर्षांच्या कालावधीत 140 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे. सुमारे 42 हून अधिक देशांतील विद्यार्थांनी ‘जीआयआयएस’च्या विविध शाळांमध्ये प्रवेश घेतलेले असल्याने ही एक बहुसांस्कृतिक शिक्षण संस्था झाली आहे.

शिक्षण आणि चारित्र्य विकासासाठी समग्र दृष्टीकोन स्वीकारण्यासाठी जीआयआयएस शाळांनी नव-रत्नांचे एक मॉडेल विकसीत केले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अनुभव, मानसिक आणि शारीरिक विकास, फाईन आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स, भाषा कौशल्ये आणि सर्जनशीलता, व्यक्तिमत्व विकास, नीतिशास्त्र आणि नैतिकता यांच्यात संतुलन साधण्यासाठी शाळेचे हे एक परिपूर्ण साधन आहे.