मुंबई दि. २२ एप्रिल- पालघर च्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही असे सांगणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या तत्परतेने व घाई घाईत गुन्हेगारांची यादी जाहीर केली, त्याच तत्परतेने या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोण कोण आहेत व ते कोणाशी संबंधित आहेत, त्यांचे फोटो आणि नावे त्याच तत्परतेने जनतेसमोर जाहीर करावीत असे आवाहन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना केले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य काशीराम चौधरी, पंचायत समिती सदस्य सीताराम चौधरी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनिल रावते रामदास असारे यांचा समावेश आहे. यांचीही नावे गृहमंत्र्यांनी जनतेसमोर जाहिर केल्यास यामध्ये कोणाचा हात आहे हे स्पष्ट होईल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्रे रक्ताने भिजली याचे राजकारण करू नये अशी टीका सामना मधून करण्यात आली असून त्याचा समाचार घेताना दरेकर यांनी सांगितले की, भगवी वस्त्रे रक्ताने लाल झाली आहेत त्याचे काय…भगव्यावर झालेला हा लाल रक्ताचा हल्ला भगवी विचारधारा घेऊन राज्यकारभार करणा-यांना आता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा वाटतो, कारण खुर्ची ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपेक्षा मोठी व महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
कोरोनाच्या भीषण पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसाच मृत्यू दरही वाढतोय हे गंभीर आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयसीएमआर च्या निकषानुसार चाचणी करण्याची केलेली सूचना योग्य आहे. ज्यांना रुग्णालयाची सेवा उपलब्ध झाली नाही, असे कोरोना न झालेले शेकडो रुग्ण मृत्यूमूखी पावले आहेत, त्यामुळे आता सरकारने ती यादीही जाहिर करावी, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
कोरोना सारख्या संकटकाळातही महाविकास आघाडीचे सरकार सापत्न भावनेने व सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप करताना दरेकर यांनी सांगितले की, भंडारा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी बैठक मागितली असता जिल्हाधिका-यांनी वेळ नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळेस सध्या लोकप्रतिनिधी नसलेले राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईसारख्या रेड झोनमधून ग्रीन झोनमधून भंडारा येथे गेले असताना जिल्हाधिका-यांनी त्यांना बैठक दिली. रेड झोनमधून प्रफुल्ल पटेल ग्रीन झोन मध्ये कसे गेले असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते ते राज्य सरकारला चालते पण भाजपने अथवा सामान्य जनतेने सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली तर मात्र पोलिस त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत आहेत, पण ही सूडाची भावना योग्य नाही असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
राज्यात विलगीकरणाची अवस्था देखील आज दयनीय आहे. विलग ठेवलेल्या संशयितांना शौचालय आणि खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच त्याची नीट तपासणीही होत नाही, त्यामुळे विलगीकरणात ठेवलेले रुग्ण अतिशय त्रस्त झाले आहेत, त्याकडे सरकारने गांभीर्याने व तात्काळ लक्ष द्यावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते -गृहमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींची नावे त्याच तत्परतेने जाहिर करावीत -विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर
कोरोनाशी लढताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई, दि. 22 : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती जोखीम पत्करुन कोरोनाची लढाई लढत आहेत त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेतकोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही मंडळी सुरक्षित राहिली पाहिजेत, त्यासाठी या सर्वांनी आपली कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक असून अजूनही काहींना परिस्थितीचे गांभीर्य कळलेले नाही, हे दुर्दैव आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. टाळेबंदीच्या यशाला मर्यादा पडत आहेत. पोलिस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातच थांबण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर रोखता येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती जोखीम पत्करुन कोरोनाची लढाई लढत आहेत. त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. कर्तव्य बजावताना या सर्वांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनीही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
रस्त्यांची कामे दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करा – मंत्री अशोक चव्हाण
बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा
नांदेड, दि. 22 : जिल्ह्यातील रस्त्यांची मंजूर व प्रलंबित कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नांदेड जिल्ह्यातील मंजूर व प्रगती पथावरील, प्रलंबित, प्रस्तावित नवीन कामांचा आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तसेच जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, कंत्राटदार यांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व त्याची यादी सादर करण्याबाबत निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा आढावा घेऊन कोल्हार ते नरसापुर 57 कि.मी. काम वीस टक्के झाले असून मुदत संपून एक वर्ष झाले तरी ती कामे अपूर्ण आहेत सदर कामे तात्काळ पूर्ण करावीत. वसमत ते नांदेड 30 किमी पैकी 14 किमी रस्त्याचे काम 50 टक्के झाले आहे. नांदेड-बारड-भोकर-म्हैसा रस्त्याचे काम सुरू असून बारसगाव ते राहटीपर्यंतचे काम लॉकडाऊनमुळे प्रलंबित आहे. रस्ता कामासाठी डांबरचे प्रमाण कमी होते ते निदर्शनास आणून देणे आवश्यक होते त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
भोकर ते राहाटी पर्यंतचे काम पूर्ण करावे. त्यापुढील काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडे देण्यात यावे. यासाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याशी चर्चा करावी. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याशीही समन्वय ठेवून तीन कामांच्या मोजण्याचे काम पूर्ण करावे. नांदेड ते जळकोट रस्त्याचे कामाच्या मोबदला देण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी कामे अडवले असून तीन कामे रस्त्याची शिल्लक आहेत. या कामांची सविस्तर माहिती सादर करावी. लखमापुर चार पॉईंट 50 किमीचे काम परमिट आहे, तेव्हा या कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित कामांचा आढावा घ्यावा. नांदेड-वारंगा बायपास रस्ता 30 मीटर शासकीय जमीन आहे, परंतू रस्ता करण्यास विरोध होत असल्यास रस्त्याचे काम पोलीस संरक्षणात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
दिलासादायक:राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त-तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक ३१८
साठीतील रुग्णांची संख्याही शंभर-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. २२: कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणत: ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्त ७२२ रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या: शून्य ते १० (१९); ११ ते २० (५९) ; २१ ते ३० (१६०); ३१ ते ४० (१६४); ४१ ते ५० (१५४); ५१ ते ६० (९८); ६१ ते ७० (४५); ७१ ते ८० (१५); ८१ ते ९० (७); ९१ ते १०० (१).
घरी सोडण्यात आलेल्या ७२२ रुग्णांची जिल्हा- मनपानिहाय संख्या : अहमदनगर मनपा- ५, अहमदनगर ग्रामीण-११, औरंगाबाद मनपा- १४, बुलढाणा- ८, गोंदिया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी १, कल्याण-डोंबिवली मनपा- ३१, कोल्हापूर मनपा-२, लातूर ग्रामीण-८, मीरा भाईंदर मनपा- ५, मुंबई मनपा- ३७४, नागपूर मनपा- १२, नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी १, नवी मुंबई मनपा- १९, उस्मानाबाद- ३, पालघर ग्रामीण-१, पनवेल मनपा- १३, पिंपरी-चिंचवड मनपा- १२, पुणे मनपा- १२०, पुणे ग्रामीण- ५, रायगड ग्रामीण-३, रत्नागिरी-१, सांगली ग्रामीण- २६, सातारा- ३, सिंधुदूर्ग-१, ठाणे मनपा १६, ठाणे ग्रामीण- ४, उल्हासनगर मनपा- १, वसई-विरार मनपा- १२, यवतमाळ-७.
मोफत समुपदेशनातून मानसिक आधार
कोरोना विषाणूच्या त्रासामुळे जिल्हा, राज्य, देश नव्हे तर सारे जग त्रासून गेले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘लॉकडाऊन’, ‘घरातच रहा’ यामुळे अनेक जण नाईलाजाने घरातच आहेत. ज्यांना एकांताची सवय आहे, त्यांना इतका त्रास होणार नाही, पण अनेकांना या अस्थिर वातावरणाचा मानसिक त्रास होवू शकतो. या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे अनेक मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक या क्षेत्रात काम करणा-या संस्था स्वत:हून पुढे आल्या आहेत. मानसिक तणावाला सामोरे जाणा-या व्यक्तींना मोफत ऑनलाईन समुपदेशन करुन ते धीर देत आहेत.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला समुहात राहण्याची आवड आहे. सध्याच्या वातावरणामुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक असे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येतात. विद्याथी्र, नोकरदा महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांना वयोमानाप्रमाणे, परिस्थितीनुसार कमी-अधिक प्रमाणात नैराश्य येवू शकते. यावर कशी मात करता येईल, यासाठी वर्तमानपत्रातून, प्रसारमाध्यमांतून, सोशल माध्यमातून माहिती देणारे लेख, संदेश, व्हिडीओ प्रसारित करण्यात येत आहेत. काही समुपदेशकांनी ठराविक वेळेत दूरध्वनीवरुन, सोशल मिडीयावरुन लोकांशी संवाद साधून कौतुकास्पद उपक्रम सुरु केला आहे. निराशेच्या वाटेवरील या व्यक्तींना सकारात्मक वाटेवर आणण्याचा हा उपक्रम गौरवास्पद आहे.
नागरिकांना अन्न–धान्य, दूध, भाजीपाला, औषधी या जीवनावश्यक वस्तू जरी सहजतेने मिळत असल्या तरी ‘कोरोना’चा कहर आणखी किती दिवस राहील, याबाबत निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. यामुळे नागरिकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण होवू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेनेही पुढाकार घेतला आहे.
समुपदेशन राज्यातील पहिला उपक्रम- देशात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्यानंतर खबरदारी म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते उपाय योजण्यास सुरुवात केली होती. त्याबाबत 27 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर 4 मार्च रोजी आणि 6 मार्च रोजी व्यापक बैठक घेवून कोरोना प्रादुर्भाव झाल्यास जिल्हा प्रशासन या आव्हानास तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वेळोवेळी विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला. पुणे शहरात ‘कोरोना’बाधित व्यक्ती 9 मार्चला आढळून आल्यानंतर सर्व संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी सुरु केली. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना मानसिक आधार व समुपदेशन देण्याची यंत्रणाही कार्यान्वित केली.
‘मनसंवाद’ – महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व मनोविकृती शास्त्र विभागातर्फे ‘मनसंवाद’ हेल्पलाईन क्र. ०२०-२६१२७३३१ ही सर्व सामान्यांसाठी सेवा सुरु करण्यात आली. याचा रोज सरासरी 25 लोक लाभ घेत आहेत. तसेच कोरोना संदर्भातील सर्व शंकाचे निरसन करण्यासाठीही २४ तासांसाठी हेल्पलाईन (क्र. ०२०-१८००२३३४१२० व ०२०-२६१०२५५०) सुरु करण्यात आली. समाजप्रबोधनासाठी वेगवेगळया प्रकारच्या मार्गदर्शक पुस्तिका, भित्तीपत्रके तयार करुन वाटण्यात आली.
कर्वे समाज सेवा संस्था येथे मानसिक आरोग्यावरील केंद्र चालविले जाते. येथूनही ऑनलाइन समुपदेशन केंद्र चालविण्यात येत आहे. कर्वे संस्थेचे मानसोपचारतज्ज्ञ मोबाईलवरुन किंवा ऑनलाइन मोफत समुपदेशन करीत असून ते ई -मेलवरही नागरिकांशी संपर्क करीत आहेत. उपक्रमाचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांच्यासह डॉ. संजय कुमावत, डॉ प्रवीण पारगावकर, डॉ. कल्याणी तळवलकर, डॉ. स्नेहा मुलचंदानी हेही लोकांचे समुपदेशन करीत आहेत.
याबरोबरच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्त्व विकास केंद्राकडूनही मोफत समुपदेशन सेवा देण्यात येत आहे. केतकी कुलकर्णी, विशाखा जोगदेव, सुरेखा नंदे, गिरिजा लिखिते हे समुपदेशक नागरिकांशी संवाद साधत आहेत. या शिवाय अनुभूती संस्थेच्या प्राजक्ता अमोल गाडेकर यांच्यासारखे अनेक समुपदेशक वैयक्तिक स्तरावरुनही फोनवरुन संवाद साधून नागरिकांचा मानसिक तणाव दूर करण्यास मदत करत आहेत. बहुतांश सर्व नागरिक घरात असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, हे गरजेचे आहे. या साठी विविध समुपदेशक, संस्था स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेवून समाजसेवा करत आहे, हे आनंददायी आणि कौतुकास्पद आहे.
राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी
पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे वितरण
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती
पुणे दि.22:- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत. उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.
पुणे विभागात कोरोना बाधित 896 रुग्ण -विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे
विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण तर
1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी
पुणे दि.22:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 700 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 896 बाधित रुग्ण असून 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 813 बाधीत रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 10 हजार 210 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे तर 507 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 264 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 896 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 865 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
000000
कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी
– मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. २२ : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कोविड-१९ विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर खर्च करता येतो का याबाबतीत आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची श्री.वडेट्टीवार यांनी बैठक घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली
श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेला आजार नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आज ८१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला असून हा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले असून याबाबत दिनांक २१ एप्रिल रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी ४० कोटी, पुणे विभागासाठी १५ कोटी, नागपूरसाठी १० कोटी, अमरावतीसाठी ६ कोटी तर औरंगाबाद विभागासाठी १० कोटी, याप्रमाणे एकूण ८१ कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या टप्यात कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. असे एकूण ९० कोटी आणि तिसऱ्या टप्यात ८१ कोटी असे आतापर्यत एकूण १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
श्री.वडेट्टीवार म्हणाले, वितरित करण्यात आलेल्या निधीमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत राज्यातील जनतेने काळजी घ्या, सतर्क राहा, आपल्या घरी राहा असे आवाहन श्री.वडेट्टीवार यांनी केले आहे.
सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात…
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची ग्वाही
9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शासन व प्रशासन स्तरावर चिंतेची बाब निर्माण झाली होती. दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशांमुळे लागण पसरल्याचे लक्षात येताच, त्या प्रवाशांकडून कुठपर्यंत संसर्ग पोहोचला, याचा विद्युतगतीने शोध घेण्यास सुरुवात केली. विभागीय आयुक्त म्हणून डॉ.दीपक म्हैसेकर यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आज या घटनेला सहा आठवडे झाले तरी अव्याहतपणे हे काम सुरु आहे. आता मुंबईनंतर पुणे हे कोरोनाबाधितांचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सध्या सुरु असलेले प्रयत्न आणि भविष्याचे नियोजन यासंबंधी त्यांच्याशी केलेली चर्चा.
1. पुणे शहरात कोरोनाबाधित आणि मृत्यूचे प्रमाण वाढतांना दिसत आहे?
– हे बघा. पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून जवळपास 75 लाखापेक्षा अधिक या महानगराची लोकसंख्या आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित शहर म्हणून पुणे हे ओळखले जाते. याठिकाणी नोकरी व कामाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. लोकसंख्येची घनता जास्त असेल तर कोरोना विषाणूची लागण झपाट्याने होत असते. तथापि, विमानाने दुबाईहून प्रवाशी आल्यानंतर आम्ही लगेच त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली. कोरोनाबाधित वा मृत्यूचे प्रमाण अधिक असले तरी बरे होणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. मात्र हे प्रमाण अजिबात वाढू नये, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. जनजागृतीबरोबरच विविध सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकदमच फरक पडणार नाही. पण नक्की फरक पडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
2. आपल्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्याभरापासून विविध आघाड्यावर काम सुरु आहे. नेमकं, याबद्दल काय सांगाल?
– हे एकट्याचे काम नाही आणि नसते देखील..! ही आपत्ती नेहमीपेक्षा वेगळी आहे. अशा स्वरूपाचे प्रसंग यापूर्वी कधी आले नव्हते. परंतू अन्य देशात कोरोनाची सुरूवात झाली होती. त्यामुळे आपण पूर्णपणे अनभिज्ञ होतो, असे नव्हतेच.. ! खरं आहे. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. सर्वच यंत्रणा कामाली लागली आहे. याठिकाणी दोन महानगरपालिका आहेत. एक पुणे आणि दुसरी पिंपरी-चिंचवड..! शिवाय पुणे कॉन्टोनमेंट बोर्ड आहे.
या सर्व यंत्रणेशी समन्वय साधून आम्ही कामाला लागलो. वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि त्या तुलनेत रुग्णालयांची संख्या! याचं ताळमेळ बसवावं लागलं. पुणे शहरात शासकीय व खाजगी मिळून ६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सर्व अधिष्ठातांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून इनपूट घेतले. भविष्यात परिस्थिती कशी असेल, कोणीच सांगू शकत नाही. पण तयारी तर करावीच लागते. दिवसागणिक स्थिती बदलत असते. सर्वप्रथम आरोग्य सेवा सक्षम करण्याचे आमच्या समोर आव्हान होते. शहरातील नामांकित अधिष्ठातांबरोबर बसून निर्णय घेतला. आज आम्ही सिम्बांयसिस हॉस्पिटल, भारती, मंगेशकर, सह्याद्री, नोबल हॉस्पिटल यांनाही विश्वासात घेतले. त्याठिकाणी चांगले काम सुरू आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.
दोन्ही महापालिकेचे आयुक्त अनुक्रमे शेखर गायकवाड व श्रावण हर्डीकर आणि अपर आयुक्त रुबल अग्रवाल उत्तमरित्या काम करीत आहेत. आमच्यात चांगला समन्वय असतो. जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे तर रात्रंदिवस काम करीत आहेत. सर्व अधिकाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी देऊन काम नेमून दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे ग्रामीण भागात छान काम करीत आहेत. शिवाय सोशल मीडियाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत.
3.’ससून’अंतर्गत कोरोना रुग्णालय विक्रमी वेळेत पूर्ण झाले. यासाठी काय प्रयत्न केले आणि आता त्याठिकाणी कशा स्वरुपाची सुविधा असणार आहे?
– बी.जे.मेडिकल कॉलेजच्या ससून रुग्णालयाचे नांव एक नामांकित हॉस्पिटल म्हणून आहे. मात्र नव्याने बांधलेली अकरा मजली इमारत पूर्ण अवस्थेत नव्हती. ही इमारत कोविड हॉस्पिटल म्हणून आपल्याला सुरू करता येईल का? असा विचार समोर आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर बैठकीत प्रस्ताव मांडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मान्यता दिली आणि जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला. नंतर आम्ही सर्वच युद्धपातळीवर कामाला लागलो. परिणामी विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या १४ दिवसांत हे हॉस्पिटल कार्यान्वित झाले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाने खूप मेहनत घेतली. ते आज पूर्ण क्षमतेने हे हॉस्पिटल सुरू आहे.
4. आपण वेगवेगळ्या समन्वय समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्याचे समन्वय कशा पद्धतीने साधला जातो ?
– पुण्याची व्याप्ती बघता संभाव्य धोका आमच्या लक्षात आला होता. तर अशा वेळेस काय केले पाहिजे, असा विचार समोर आला. पुण्यात आय.ए.एस.अधिकाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यांचा उपयोग आपत्तीच्यावेळी करता येईल म्हणून त्यांची तातडीची बैठक बोलावली. त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्या सल्ल्यानेच समन्वय समित्या बनविल्या. या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. आपत्तीप्रसंगी कसे काम करावे, याची त्यांना चांगली जाण असते. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग हे मुळातच डॉक्टर आहेत. म्हणून त्यांना रुग्णालयांमध्ये समन्वयाची जबाबदारी दिली. अन्य अधिकाऱ्यांनाही त्यांच्या क्षेत्रातील आवडीनुसार समन्वयाची जबाबदारी दिली. परिणामी रिझल्ट चांगला मिळत आहे. पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे आयसोलेशन फॅसिलिटी, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे क्वारंटाईन फॅसिलिटी, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे वैद्यकीय साधने व औषधे यांचा पुरवठा, पी.एम.पी.एल.च्या संचालक श्रीमती नयना गुंडे यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापन, श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे रेशन व इंधन पुरवठा, महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागांचे व्यवस्थपकीय संचालक ऋषीकेश यशोद यांच्याकडे अन्न व औषध आणि त्या अनुषंगिक वैद्यकीय साधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अशा पद्धतीने नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली. बैठकीत त्यांनी उपयुक्त अशा सूचनांही केल्या.
5. कामगार व मजूर यांच्या निवास व भोजनाची सोय करणे, हे एक आव्हानच म्हणावे लागेल. त्यासाठी आपल्यास्तरावरुन काय प्रयत्न केले जात आहेत?
– पुणे विभागात 1 हजार 258 पेक्षा अधिक निवारा गृह सुरु करण्यात आली. त्यात जिल्हा प्रशासन आणि साखर कारखान्यांचा देखील सहभाग आहे. शासनातर्फे 146 तर साखर कारखान्यामार्फत 1 हजार 112 निवारा गृह आहेत. स्थलांतरित मजूरांची संख्या पुणे विभागात 1 लाख 27 हजार 504 ऐवढी आहे. साखर कारखान्यामार्फत 1 लाख 18 हजार 152 तर जिल्हा प्रशासनामार्फत 9 हजार 352 मजूरांची सोय करण्यात आली. त्याचबरोबर 2 लाख 36 एवढी संख्या असलेल्या मजूरांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सामाजिक संस्था, खाजगी कंपन्या, साखर कारखाने, बांधकाम व्यावसायिक यांचा मोठा सहभाग आहे. सर्वाधिक 85 हजार 233 मजूर हे पुणे जिल्हयात आहेत. त्या खालोखाल 39 हजार 31 मजूर कोल्हापूर येथील आहेत. त्यांनतर सांगली, सातारा व सोलापूर येथे अनुक्रमे 36 हजार 220,34 हजार 196, 5356 अशी संख्या आहे.
हे आव्हान असले तरी सर्वांच्या सहकार्याने शक्य देखील होत आहे. लॉक डाऊनमुळे परराज्यातील मजूर देखील ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, त्यांची सोय करणे कल्याणकारी राज्य म्हणून शासनाचे कर्तव्य आहे. ऊस तोडणी कामगारांची संख्या 1 लाख 18 हजार 152 एवढी आहे. पुणे जिल्ह्यात शासनातर्फे 62 निवारागृह उभारण्यात आली असून त्याठिकाणी 4 हजार 278 स्थलांतर व्यक्ती राहत आहेत.
पुणे विभागात 127 कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले असून 26 हजार 752 लोकांना रोज दोन वेळेसचे जेवण देण्यात येत आहे. सर्वाधिक 47 कम्युनिटी किचनची संख्या सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर 33 पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात 8 हजार 556 लोकांना तर सोलापूर जिल्ह्यात 13 हजार 376 लोकांना दोन वेळेचे जेवण देण्यात येत आहे.
6. पुणे हे औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शिथिलता आणण्यासाठी आणि थोड्याफार प्रमाणात जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात येणार आहेत?
– पुणे महानगर क्षेत्रात उद्योग व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. पुणे महानगर आणि परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात आहेत. आता तर 8 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. ज्या उद्योगांना उद्योग सुरु करावयाचा आहे त्यांनी मात्र कामगारांची कारखाना परिसरातच निवास व भोजनाची व्यवस्था करणे बंधनकारक केले आहे. दुसरा प्रश्न शैक्षणिक दृष्ट्या पुणे हे महत्त्वाचे शहर मानले जाते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासठी योग्य ती उपाययोजना केली जात आहे. तथापी जी मुले शहरात अडकून पडलेली आहे, परंतू त्यांची भोजनाची व्यवस्था नाही, अशांसाठी देखील सोय करण्यात येत आहे.
7. अन्यधान्याच्या वितरणाच्या अनुषंगाने काय सांगाल?
– पुणे विभागात 27 लाख 19 हजार 16 एवढी कार्ड संख्या आहे. त्याच्यासाठी 63 हजार 876 मेट्रीकटन धान्य मंजूर असून आतापर्यंत 96 % टक्के पेक्षा अधिक लोकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. पुढील महिन्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लॉकडाऊन काळात चांगला उपयोग होत आहे.
8. भविष्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर काय नियोजन असणार आहे?
– अगदी सुरुवातीपासूनच याची आम्ही काळजी घेतलेली आहे. शहरातील नायडू हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, नोबल हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, वाय.सी.एम हॉस्पिटल, इनामदार हॉस्पिटल याचबरोबर सिम्वॉयसिस व भारती हॉस्पीटल यांच्या व्यवस्थापना बरोबर बोलणे करुन त्या ठिकाणी बाधित रुग्णांसाठी उपचार करण्याचा निर्णय घेतला. आज रुग्णांची संख्या वाढत असताना आमच्याकडे पर्याय उपलब्ध असल्यामुळे एवढी तारांबळ उडत नाही.
9. पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासन यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जात आहे.
– आपत्तीच्यावेळी सर्व यंत्रणेनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असते. विभागीय आयुक्त म्हणून विभागाची जबाबदारी असली तरी शहराचा कार्यभार पाहणारी संस्था म्हणून महानगरपालिका आणि जिल्ह्याचे काम पाहणारे जिल्हाधिकारी, शिवाय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काम पाहणारी पोलीस यंत्रणा ही महत्त्वाची असते. या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर सारखे समन्वय ठेवून एकमेकांच्या विचारातून प्रसंगानुसार निर्णय घ्यावा लागतो. शिवाय राज्य शासनस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्देशानुसार काम करावे लागते. लोक प्रतिनिधी हा महत्त्वाचा घटक असतो, त्यांचे मार्गदर्शन सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. आपत्तीप्रसंगी सर्व घटकांना सामावून पुढे चालायचे असते.
10. जीवनावश्यक वस्तू नागरिकांना सुलभ पद्धतीने मिळण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केले जात आहेत?
– लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू लोकांना सुलभ पद्धतीने मिळाव्यात, यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अन्नधान्य, दूध, भाजीपाला, औषधी या जीवनावश्यक वस्तू नागरिकांना मिळाल्याच पाहिजेत, त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. एकदा मला एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा फोन आला. लॉकडाऊनमुळे आमची अडचण होत आहे. अडचण त्यांनी बोलून दाखवली, त्यावर मी संबधित अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या घरापर्यंत तातडीने धान्य पाठविण्याची व्यवस्था केली. त्यामुळे कोणाची अडचण होणार नाही, या संबंधी काळजी घेतली जाते.
आपण वैद्यकीय स्तरावर टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याचा उपयोग कशा पद्धतीने होणार आहे ?
– सल्ला व मार्गर्शनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती केली आहे. त्या समितीत अनेक नामवंत व तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे. डॉ.दिलीप कदम हे या टास्कफोर्सचे अध्यक्ष आहेत, त्यात 10 तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश केला आहे.
– मोहन राठोड
उपसंचालक (माहिती), पुणे
‘मोबाईल डीस्पेन्सरी’ ने दिली आज ३४१ गरजू रुग्णांना उपचार सेवा
टाटा पॉवरने महिला स्वयंसहायता गट व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोविड-१९ लॉकडाऊन काळात ३०,००० किलो नाशवंत भाज्या आणि फळे
टाटा पॉवरने महिला स्वयंसहायता गट व शेतकऱ्यांच्या मदतीचे कार्य सध्याच्या काळात देखील सुरु ठेवले आहे. कोविड-१९ मुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये जमशेदपूर व झारखंडमधील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या नाशवंत भाज्या व फळे बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याचे काम टाटा पॉवर करत आहे. टाटा पॉवरने आपली सहयोगी एजन्सी आइडेंट (एआयडीईएनटी) या सामाजिक कल्याण संघटनेच्या मदतीने जवळपास ३०,००० किलो भाज्या व खरबूज जमशेदपूर व धनबाद, रांची या जवळपासच्या जिल्ह्यांमधील स्थानिक बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली आहे. यामुळे खैरभोनी, डोमजुरी, नूतनदीह, खाकरीपारा गावांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोविड-१९ आजाराच्या साथीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दळणवळण सेवांवरील निर्बंधांमुळे शेतात पिकवला जाणारा माल बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. ही परिस्थिती समजून घेऊन टाटा पॉवरने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने उत्पादने मंडई व बाजारपेठांपर्यंत पोहोचवली आहेत. अशा तऱ्हेने टाटा पॉवरने समाजाच्या रोजगाराला मदतीचा आधार दिला, त्याचबरोबरीने स्थानिक बाजारातील मागणी व पुरवठा गरजा पूर्ण करण्यात देखील मदत केली आहे.
या उपक्रमाबाबत टाटा पॉवरचे सीईओ व एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “सध्या आपण सर्वजण एका अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करत आहोत. एकजुटीने एकमेकांना मदत करणे ही काळाची गरज बनली आहे. या भागातील शेतकऱ्यांचा रोजगार सुरु राहावा यासाठी त्यांना मदतीचा हात देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला जसे जमेल त्याप्रकारे आम्ही त्यांना मदत करत राहू.”
स्थानिक जनतेला पर्यावरणाला अनुकूल जीवन जगण्यात मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून सबळ व सक्षम करण्यात तसेच कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी टाटा पॉवरने मदत केली आहे. अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन टाटा पॉवर कंपनीने तातडीने मदतीचा हात दिला, त्यामुळे शेतकरी व उत्पादकांचा रोजगार टिकून राहिला आणि समाजाला अत्यावश्यक वस्तू देखील उपलब्ध झाल्या.
फार्मसी अध्यापनात रुची वाढविण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त : डॉ. विनोद मोहितकर
पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही;
पूर्वीचीच स्थिती कायम राहील
– विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.21 : – कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामध्ये रद्द करण्यात आलेली आहे. येथे कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे दि.17 एप्रिल पूर्वीचीच परिस्थिती कायम राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
त्यानुसार या क्षेत्रामध्ये फक्त मेडीसीन, एलपीजी अशा सारख्याच अत्यावश्यक सेवांना ज्यांना दि.17 एप्रिल पूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता चालू राहतील. परंतु या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी म्हटले आहे.
*नागरिकांना आवाहन*
त्याचप्रमाणे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोवीड प्रार्दुभावापासून आपल्या व कुटूंबाच्या संरक्षणाकरीता प्रशासन, पोलीस विभाग,महसूल विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच अनेक सामाजिक संस्थाही याकरीता समाजपयोगी काम करीत आहे. पुणे महानगर क्षेत्रामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या व कुटूंबियांच्या हिताकरिता आपण घराबाहेर पडू नका. कुटूंबातील ज्येष्ठ सदस्याला मधुमेह, रक्तदाब, किडणी विकार, ह्दयरोग इ. आजार असल्यास तसेच त्यांना किंवा इतर सदस्यांना फ्लू सदृक्ष आजाराची लक्षणे दिसल्यास त्याची ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी. आपणास आवश्यकता वाटेल तेव्हां तात्काळ वैद्यकीय अधिका-यांशी किंवा 108 क्रमांकावर रुग्णवाहीकेला संपर्क करावा. तसेच नियमीतपणे मास्कचा वापर करावा. बाहेरुन आल्यास एकदम कुटूंबांतील सदस्यांशी थेट संपर्क टाळावा,कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगून प्रशासनास सहकार्य केल्यास आपण निश्चितच या संकटावर मात करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 0 0 0
नगरसेवक नाना भानगिरे यांच्यावतीने डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप
पुणे- : वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न बाळगता रात्रंदिवस जनतेची अहोरात्र सेवा करणारे आपले पोलिस बांधव, डॉक्टर, नर्सेस, फायर ब्रिगेडचे जवान, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी यांना हडपसर येथील नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या माध्यमातून व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
तसेच नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या निधीतून प्रभाग क्र २६ मध्ये घनकचरासाठी घंटा गाडीचे लोकार्पणही यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाना भानगिरे यांनी चौका -चौकात उभारलेल्या सॅनिटायजर फवारणी रूम ची पाहणी करून नाना तू देवदूता सारखा नागरिकांसाठी धावत आहे, असे गौरवोद्गार आढळराव पाटील यांनी काढले .या प्रसंगी नानांनी नागरिकांना सोशल डिस्टेनिंग चे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच अति महत्वाचे काम असेन तरच बाहेर एकानेच पडावे व जास्तीत जास्त घरातच बसण्याचा नागरिकांना सल्ला दिला तसेच पोलिस बांधवाना डॉक्टर तसेच पत्रकार पुणे महानगरपालिका चे कर्मचारी, मेडिकल स्टोअ, यांचे विशेष कौतुक केले. यांना सर्वांना सहकार्य करावे अशी नागरिकांना विनंती केली.
मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश वाघ तसेच त्यांची डॉक्टर मित्र परिवार ,पुणे महानगरपालिका चे कर्मचारी अधिकारी, फायर ब्रिगेड चे अधिकारी पोलीस कर्मचारी, ऑफिसर सुहास यादव, नगरसेविका प्राची आल्हाट,अभिमन्यू भानगिरे,गणेश वाडकर ,योगेंद्र गायकवाड, योगेश सातव ,विकास शेवाळे, तुषार पवार ,नाना भानगिरे आयोजक टीम उपस्थित होते.
‘डॉक्टर, तुमच्या रुपात देव भेटला…’ या भावना समाधान आणि ऊर्जा देतात!
औरंगाबाद जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा (मिनी घाटी) हे कोवीड १९ रुग्णालय असून येथे आज २७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर कोरोना संशयितांची तपासणी करत आहोत. सुरवातीला सगळे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने आम्हाला चांगलं वाटत होतं. पण दि. ३० मार्च रोजी पहिला पॉझिटिव्ह पेशंट आमच्या येथे दाखल झाला आणि त्या दिवसापासून कोरोना युद्धाचा आमचा लढा जास्त खबरदारीने सुरु झाला आहे.
आज घडीला आमच्या रुग्णालयात २४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असून त्या प्रत्येकाला आम्हाला बरं करुन घरी पाठवण्याची इच्छा आहे. आमच्या रुग्णालयातील पहिली पॉझिटिव्ह पेशंट खूप जास्त गंभीर परिस्थितीत दाखल झाली होती. तिच्यावर तातडीने सर्व उपचार करुन तिला मानसिक आधार देत बरं करायचं आव्हान आमच्या येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आमचे आरोग्य सेवक आम्ही सगळ्यांनी स्वीकारले होते.
आमच्या प्रयत्नांना,धावपळीला यश आले आणि पाच दिवसांपूर्वी ती रुग्ण बरी होऊन घरी गेली. ही रुग्ण बरी झाली याचा तिच्या कुटुंबियांइतकाच आनंद आम्हाला आहे. कारण चौदा दिवस रुग्ण पूर्णपणे आमच्या सहवासात असतो. त्याच्या कुटुंबापासून दूर त्याला शारीरिक, मानसिक आधार देताना आमच्याही नकळत आम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातो. त्यातून तो बरा होऊन घरी जाताना निश्चितच आम्हा सगळ्यांना आनंद होणे स्वाभाविक आहेच, पण जेव्हा रुग्ण, त्याचे नातेवाईक घरी जाताना आम्हाला डॉक्टर तुमच्या रुपाने देव भेटला, तुम्ही आता आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहात, आमच्या प्रयत्नांची ,धावपळीची दखल घेत आपलेपणा व्यक्त करतो, तो क्षण खरोखर खूप समाधानाचा आणि ऊर्जा देणारा असतो, अशा शब्दांत कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठीच्या लढाईतील एक डॉक्टर पद्मजा अजय सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
औरंगाबाद सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या आधारे रेड झोन मध्ये असून त्या पार्श्वभूमीवर येथे आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, त्यांचे सर्व डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ,आरोग्य सेवक आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत सेवाभावाने रुग्णांची काळजी घेत आहेत.
कोरोनाला रोखण्यात सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, ते डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणूनच मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन सैनिक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.या सैनिकांची लढाई ही तितकीच अटीतटीची आणि जीवावर बेतणारी आहे,कारण कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे. पण आज घडीला सर्व डॉक्टर आणि त्यांचा नर्सिंग स्टाफ,आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकजण रुग्णाला बरं करण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता झोकून देत काम करत आहे.
विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करून संचारबंदीचा आदेश देऊन सर्वांना घरात राहण्याचे आवाहन शासन प्रशासन करत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या सेवेप्रति कृतीशील निष्ठा ठेवत आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर,नर्सिंग स्टाफ हे संसर्गाच्या धोकादायक परिस्थितीत ही प्रत्यक्ष रुग्णांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्यावर उपचार करण्याचे, काळजी घेण्याचे आपले कतर्व्य बजावत आहे. हे करत असताना त्यांना मनापासून रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न असतो त्यासोबत आपल्या घरी जाताना एक सुप्त ताणही त्यांच्या मनावर असतो तो म्हणजे आपल्यामुळे घरच्यांना तर काही होणार नाही ना ही, स्वाभाविक काळजी त्यांना वाटत असते.पण या लढवय्यांचे कुटुंबीय तसेच त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणारे आहेत.
डॉ.सराफ म्हणाल्या,कोरोना संसर्गाची भीती तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे. आम्ही तर थेट पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात 24 तास ड्युटी करुन घरी जातो त्यामुळे आम्हाला आणि आमच्या घरच्यांनाही भीती, काळजी ही आहेच, पण तरीही कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही बाहेर पडलंच पाहिजे हे ही आमचे कुटुंबीय जाणून आहेत आणि त्यांच्या भावनिक पाठिंबा आणि समंजस सहकार्यामुळेच तर इतक्या चिंताजनक परिस्थितीतही आम्ही दवाखान्यात राहून रुग्णांना व्यवस्थितपणे योग्य उपचार देऊ शकत आहे. यामध्ये आमच्या कुटंबियांची भूमिका आणि सहकार्य विशेष आहे हे डॉ.सराफ यांनी आर्वजून सांगितले.
दोन वर्षापासून मिनी घाटी म्हणजेच जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.सराफ एम.डी.मेडिसीन असून यापूर्वी त्यांना स्वाईन फ्लू या आरोग्य आपत्तीला हाताळण्याचा अनुभव आहे.आपल्या हातून रुग्ण बरा होण्याच्या भावनेतून त्याला उपचार करताना आपोआप मनात एक सकारात्मकता निर्माण होत जाते.त्यातून आपल्याला काम करत राहण्याची क्षमता वाढते.
सुरवातीला काही दिवस आमच्या येथे कोरोना चाचणी करताना स्वॅब घेण्यासाठीचा तणाव होता पण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली खूप कमी काळात आमच्या टीमने मनातील भीतीवर मात करत कामाचा भाग म्हणून या सर्व जोखमीच्या गोष्टी सहजेतेने हाताळायला सुरवात केली.शिप्टमध्ये आम्ही सर्वजण २४ तास काम करुन येथे दाखल रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेत आहोत. यामध्ये आमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी,डॉ.अर्चना भोसले, डॉ.पी.एम.कुलकर्णी, डॉ.प्रेमचंद कांबळे,डॉ.सुनील गायकवाड, डॉ.जावेद, डॉ.बकाल, डॉ.अश्वीन पाटील, डॉ.गोफणे, डॉ.वराडे यांच्यासह आमच्या येथील सर्व नर्सिंग स्टाफ,आरोग्य सेवक यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आम्ही आता पर्यंत तेरा रुग्णांना चांगले करुन डिस्चार्ज दिला आहे.
आता रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करुन त्यांना चांगले करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.ते करत असताना रुग्णांसोबत निर्माण होत जाणारा ऋणानुबंध आणि त्यांच्या तब्बेतीत होणारी सुधारणा हीच आमच्या साठी मोठी गोष्ट असते.समाजात मध्यंतरी डॉक्टरांबद्दल राग व्यक्त करणारे जरासे असुरक्षिततेचे वातावरण होते.त्यानंतर आता या संकट वेळी सर्वत्र शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर,आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वासाची आपुलकीची भावना अनुभवायला मिळते आहे, हा निश्चितच चांगला सुखावणारा बदल आहे, अशा भावना डॉ.सराफ यांनी व्यक्त केल्या.
कोरोनाच्या युद्धाचे प्रत्यक्ष रणांगण असलेल्या दवाखान्यांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांची ही प्रातिनिधीक भावना आहे.या युद्धाला जिंकण्यात मोलाचे योगदान देणा-या सर्व डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश मिळो…..
शब्दांकन
- वंदना आर.थोरात, औरंगाबाद

