Home Blog Page 2621

कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर – आरोग्यमंत्री

0

मुंबई, दि.२३ : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी येथे सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बुधवारी रात्री संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या संवादतील महत्त्वाचे मुद्दे :

• कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बुथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबुथ बसविण्यात येणार आहे.

• प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील.

• मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. कमी जागेमुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट लोकवस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये मध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल.

• महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या.

• कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.

• राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

• महाराष्ट्रात सुरूवातीला कोरोनासाठी १४ हॉटस्पॉट होते. आता तेथे रुग्ण संख्या नाही त्यामुळे त्याची संख्या कमी करत पाच वर आली आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे परिसर, नागपूर, नाशिक, असे हॉटस्पॉट असून मालेगाववर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.

• राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी पाच वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत.

• कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. रुग्ण दुपटीचा दर सात दिवसांवर गेलाय त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. लोकांनी घाबरू नये.

 

लोकांनी घराबाहेर पडू नये या साठी अगोदर तुम्ही हे करा …पोलीस आणि महापालिका आयुक्तांकडे भाजपची मागणी

0

 

पुणे- कोरोना च्या संकटाने वेढले आहे, लोकांनी घराबाहेर पडू नये हे  सारे खरे आहे, पण खरेच लोकांनी बाहेर पडू नये यासाठी महापालिका आणि पोलीस यांनी अगोदर काय केले पाहिजे याबाबत काही मागण्या भा.ज.पा. चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या आहे .

महाराष्ट्रात एकूणच करोनाचे संकट नियंत्रणात येत असतानाच मुंबई व परिसर, व पुण्यमध्ये हे संकट गडद होत चालले आहे. पुण्यातील संख्या 700 च्या पुढे गेली आहे.त्यामुळे प्रशासनाच्या काय उपाययोजना सुरू आहेत याची माहिती घेण्यासाठी, काही सूचना करण्यासाठी, सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी आज भा.ज.पा. चे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली… यावेळी त्यांनी पुढील मागण्या केल्या .
1) पुण्यात ज्या भागांमध्ये रुग्ण सापडत आहेत त्यासाठी सुरक्षा कडक करावी
2) लोकांनी 10 दिवस घराच्या बाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने दूध पावडर सहित ( जेणे करून दुधासाठी बाहेर पडू नये) धान्य व किराणा सामानाचे किट ह्या भागातील लोकांना मोफत द्यावे.
3) 60 वर्षावरील सर्वांना ( घरच्यांच्या संमतीने) लक्षणे दिसत नसतानाही जवळच्या शाळा, मंगल कार्यालये, लॉजेस, हॉटेल्स मध्ये स्थलांतरित करावे ( अतिशय चांगल्या सुविधा त्या ठिकाणी असाव्यात)
4) केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूचनेनुसार परंतु रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदीक, होमियोपॅथिक औषधे नागरिकांना वाटावीत.
अश्या सूचना त्यांनी केल्या व सर्वप्रकारच्या सहकार्याची तयारी दर्शवली…

 

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय मुंबईत उतरणार

0

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी

मुंबई, दि 22 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने  काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या सुमारे ४० हजार खलाशी, जहाजावरील कर्मचाऱ्यांनासुद्धा होणार आहे.उद्या सकाळपासून या क्रुझवरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल. त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे. प्रसंगी त्यांना  क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध ठेवण्यात आली  आहे.

2 ते 6 एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही  क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहोचणार होती. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या क्रुझने  लाएम चाबँग या थायलंड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ १२ एप्रिल रोजी कोचीन येथे पोहोचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहोचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलंड सोडून ३७ दिवस होऊन गेले होते मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सांगितले तरी परवानगी मिळत नव्हती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. प्रधान सचिव विकास खारगे, आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

काल यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने  एक आदेश काढला. यात व्यापारी व व्यावसायिक जहाजांवरील कर्मचारी, खलाशी यांना भारतीय बंदरांवर उतरणे तसेच बंदरांवरून जाणे शक्य व्हावे म्हणून निश्चित कार्यपद्धती दिली आहे. यानुसार या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गेल्या २८ दिवसांतील प्रवासाची माहिती कळविणे, तसेच बंदरावर उतरल्यावर कोविड चाचणी करून घेणे, प्रसंगी क्वारंटाईन करणे, या खलाशी व कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या घरी सोडण्यासाठी ट्रांझिट पास, वाहनाची व्यवस्था आदी बाबींचा समावेश आहे. याचा फायदा समुद्रात सध्या विविध जहाजांवर अडकलेल्या ३५ ते ४० हजार भारतीय  खलाशांना होणार आहे.

ही क्रुझ पुढे नॉर्वेसाठी रवाना होणार आहे.

 

आरोग्यसेवेतील व्यावसायिक, वैद्यकीय कर्मचारी यांना सुरक्षा मिळेल याची खबरदारी घ्याः केंद्रीय गृहमंत्री

0

सेवा बजावताना कोविड-19 चा संसर्ग होऊन मरण पावलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या किंवा आरोग्य सेवा कामगारांच्या अंत्यविधीत बाधा आणणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा -गृह मंत्रालयाची राज्यांना सूचना

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) आज सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य सेवेतील व्यावसायिक, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील कामगारांविरोधातील हिंसाचार रोखण्यासाठी त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे निर्देश पुन्हा एकदा दिले आहेत. सेवा बजावताना कोविड-19 चा संसर्ग होऊन मरण पावलेल्या  वैद्यकीय व्यावसायिकांच्या किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंतिम संस्कारात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध  कठोर कारवाई केली जायला हवी .
गृह मंत्रालयाने  24.03.2020, 04.04.2020 आणि 11.04.2020 रोजी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सल्लावजा सूचना जारी करून आरोग्य सेवा व्यावसायिक, वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य कामगारांना पुरेसे संरक्षण मिळावे यासाठी त्यांचे सुरक्षा  कवच वाढवण्याची विनंती केली होती. मात्र यानंतरही  आरोग्य सेवा व्यावसायिक / आघाडीच्या कामगारांविरोधात देशाच्या विविध भागांमध्ये  हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. हे स्पष्ट आहे की यावेळी, आरोग्य सेवा व्यावसायिकांवर होणार्‍या कोणत्याही हिंसाचारामुळे संपूर्ण आरोग्य सेवा समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 08.04.2020 रोजी आपल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की केंद्र सरकार, संबंधित राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित पोलिस अधिका्यांनी रुग्णालयांमध्ये तसेच कोविड-19 चे निदान झालेले किंवा संशयित रुग्ण किंवा विलगीकरणात असलेले रुग्ण ज्या ठिकाणी आहेत तिथे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक पोलिस संरक्षण पुरवावे. याशिवाय न्यायालयाने रोगाची लक्षणे शोधण्यासाठी लोकांची तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी भेट देणाऱ्या डॉक्टर आणि अन्य  वैद्यकीय कर्मचार्‍यांना आवश्यक पोलिस संरक्षण पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदींच्या अनुषंगाने, गृह मंत्रालयाने सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हा प्रशासनाला  कायद्याच्या तरतुदी किंवा  लागू असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी करायला तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा  2005 अंतर्गत कायदेशीर सेवा बजावत असलेल्या अधिकृत सरकारी आरोग्य अधिकारी, किंवा इतर आरोग्य व्यावसायिक आणि / किंवा संबंधित व्यक्तींना अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करायला सांगितले आहे.
गृह मंत्रालयाने राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना राज्य / केंद्र शासित प्रदेश आणि जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली आहे. ते वैद्यकीय व्यावसायिकांच्या कामकाजासंबंधी कोणत्याही सुरक्षाविषयक समस्येचे निराकरण करण्यासाठी 24×7 उपलब्ध असावेत.. हिंसाचाराची कोणतीही घटना घडल्यास त्यांनी त्वरित आणि कठोर कारवाई केली पाहिजे, अशी विनंती करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त, राज्ये / केंद्र शासित प्रदेशांना, आयएमएच्या स्थानिक डॉक्टरांसह  वैद्यकीय समुदायामध्ये तसेच जनतेमध्ये प्रतिबंधात्मक उपाय आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत माहितीचा व्यापक प्रचार करण्याची विनंती केली आहे.

जातीय रंग देऊ नका; अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई, दि.२२ : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८ ते १० तासात  पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही. या घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेसबुक द्वारे संवाद साधून केले आहे.

ही घटना घडलेली जागा दुर्गम भागात आहे. हा आदिवासी भाग आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी वेषांतर करून मुले पळवणारी टोळी येत आहे अशा अफवा  होत्या. त्यातून हे घडले असावे. याची  चौकशी  विशेष पोलीस महानिरीक्षक करत असून तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे.

पोलिसांनी घटनेनंतर जंगलात, पहाडावर, डोंगरात  लपलेल्यांना केवळ आठ ते दहा तासात ताब्यात घेतले. १०१ व्यक्ती या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यापैकी एकही नाव मुस्लिम नाही.

सध्या आपण कोरोनाच्या विरुद्ध लढाई लढत आहोत. पोलीस विभाग, आरोग्य विभाग तसेच संपूर्ण राज्यच ही लढाई लढत आहे. परंतु या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे,  हा दुर्दैवी भाग आहे

ही वेळ राजकारण करण्याची नाही. सर्वांनी एकत्र येऊन कोरोना  विरुद्ध लढा द्यावा ,अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली.

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. 22: सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने शासन निर्णय आज जारी करण्यात आला.

सध्याची कोविड परिस्थिती हाताळण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करत स्वतःबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे प्रतिपादन श्री. भरणे यांनी केले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

0

मुंबई, दि. 22 : कोविड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे मार्च 2020 पासून दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने माहे मार्च 2020 च्या वेतनाचा पहिला टप्पा अदा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात मार्च 2020 च्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा व एप्रिल 2020 चा पहिला टप्पा प्रदान करण्याचे विचाराधीन होते. तथापि प्रत्येक महिन्यात पंधरा-पंधरा दिवसाची दोन देयके तयार करावी लागल्याने देयके तयार करणारी आस्थापना व कोषागारांचा कामावरचा ताण वाढला असता. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या 10 टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत. काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन देयके तयार करण्यामुळे वेतन प्रदान करण्यास आणखी विलंब झाला असता त्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च 2020 चे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी प्रदान करणे प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येतील, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मुंबईत केशरी रेशन कार्डधारकांना २४ एप्रिलपासून गहू व तांदूळ वाटप

0

अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची माहिती

मुंबई, दि. २२ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्न धान्य रेशन दुकानांमधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमध्ये या अन्न धान्याचे वाटप १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. धान्य वाटप करताना प्रत्येक दुकानाच्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम व सामाजिक अंतर राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आदी योजनामधून अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. नियंत्रक, शिधा वाटप यांच्या कार्यालयाच्या मुंबई व ठाणे क्षेत्रात होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा डॉ. कदम यांनी घेतला. यावेळी त्यांनी अन्नधान्य वाटप सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रशासनास योग्य त्या सूचना दिल्या.

मुंबई महानगर प्रदेशातील ५७ लाख केशरी शिधापत्रिकाधारकांना फायदा

लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी शिधावाटप दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) कार्डधारक नागरिकांना अन्नधान्य देण्यात येत नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी  ५९ हजार ते १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना १२ रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व ८ रुपये किलोने तीन किलो गहू प्रति व्यक्ति देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचा मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे ५७ लाख २० हजार लाभार्थींना लाभ होणार आहे. या धान्याचे वाटप यापूर्वी १ मे रोजी सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आता येत्या २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत महानगर प्रदेशातील नागरिकांना रेशन दुकानांमधून हे धान्य वाटप होणार आहे. त्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून रेशन दुकानदारांना धान्य वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिली.

तसेच अंत्योदय योजनेतील पिवळे रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमधून एप्रिल महिन्यात २७ हजार ७८४ मेट्रिक टन तांदळाचे १२ लाख ०५ हजार ४२५ शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १० हजार ५९३ मे.टन तांदळाचे वाटप लवकरात लवकर करण्याचे निर्देश डॉ. कदम यांनी यावेळी दिले.

तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठीच्या एप्रिल महिन्यातील अन्नधान्याची शंभर टक्के उचल करण्यात आली आहे. या दोन्ही योजनेतून एप्रिल महिन्यात १३ हजार ८३७ मेट्रिक टन तांदूळ व २० हजार १५५ मेट्रिक टन गव्हाचे १६ लाख ९५ हजार १५९ शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आले आहे.

अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

0

मुंबई, दि.२२ :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना म्हणजेच ३ कोटी ८ लक्ष ४४ हजार ७६ नागरिकांना माहे मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात यावा असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत त्यांनी नाशिक येथील कार्यालयात राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सचिव संजय खंदारे, शिधापत्रिका नियंत्रक कैलास पगारे, सहसचिव सतीश सुपे आदी उपस्थित होते.

एपीएल (केशरी) मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच १४ जिल्ह्यांतील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही अशा एपीएल (केशरी) शिधापत्रिकांची संख्या ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एवढी असून त्यावरील सदस्यांची संख्या ३ कोटी ८ लक्ष  ४४ हजार ७६ एवढी आहे, त्या लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत नसल्याने, देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना २ महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केशरी कार्ड धारकांना गहू 92532 मे.टन व तांदूळ 61 हजार 688 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

त्यानुसार एपीएल (केशरी) मधील सदर लाभार्थ्यांना गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य माहे मे व जून, २०२० या २ महिन्यांच्या कालावधीकरीता वितरित करण्यात येणार आहे. या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाले नसेल, तरी त्या शिधापत्रिकाधारकांना या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात यावे, अन्नधान्य वाटप करताना रास्त भाव दुकानदाराने त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या व शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील या बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. त्या नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रितसर पावती देण्यात यावी. सदर अन्नधान्य उचित लाभार्थ्यास देण्यात येत आहे याची खातरजमा करावी. सदर अन्नधान्याच्या वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. रास्त भाव दुकानदारास लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील देय असलेले मार्जिन सदर अन्नधान्याच्या वितरणाकरिता देखील देण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत.

राज्यात आज ४३१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ५६४९ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

मुंबई, दि. २२ : आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५ हजार २१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९  महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५  रुग्ण आहेत तर १२  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३६८३ (१६१)

ठाणे: २४ (२)

ठाणे मनपा: १६६ (४)

नवी मुंबई मनपा: १०१ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: ९७ (३)

उल्हासनगर मनपा: १

भिवंडी निजामपूर मनपा: ७

मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)

पालघर: १९ (१)

वसई विरार मनपा: ११५ (३)

रायगड: १६

पनवेल मनपा: ३५ (१)

ठाणे मंडळ एकूण: ४३४५ (१०)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ७

मालेगाव मनपा:  ९४ (९)

अहमदनगर: २१ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: ५ (१)

धुळे मनपा: ४

जळगाव: ४ (१)

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: ७

नाशिक मंडळ एकूण: १५६ (१४)

पुणे: १९ (१)

पुणे मनपा: ७३४ (५४)

पिंपरी चिंचवड मनपा: ५२ (२)

सोलापूर: ०

सोलापूर मनपा: ३० (३)

सातारा: १६ (२)

पुणे मंडळ एकूण: ८५१ (६२)

कोल्हापूर: ६

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद:१

औरंगाबाद मनपा: ३७ (५)

जालना: २

हिंगोली: ७

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४८(५)

लातूर: ८

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: १

लातूर मंडळ एकूण: १३

अकोला: ११ (१)

अकोला मनपा: १०

अमरावती: ०

अमरावती मनपा: ७ (१)

यवतमाळ: १८

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ७१ (३)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ९७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)

इतर राज्ये: १७ (२)

एकूण: ५६४९  (२६९)

( या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात  संसर्गग्रस्त  झालेले आहेत.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २६.८९ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते -गृहमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींची नावे त्याच तत्परतेने जाहिर करावीत -विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर

0

मुंबई दि. २२ एप्रिल- पालघर च्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही असे सांगणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या तत्परतेने व घाई घाईत गुन्हेगारांची यादी जाहीर केली, त्याच तत्परतेने या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोण कोण आहेत व ते कोणाशी संबंधित आहेत, त्यांचे फोटो आणि नावे त्याच तत्परतेने जनतेसमोर जाहीर करावीत असे आवाहन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना केले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य काशीराम चौधरी, पंचायत समिती सदस्य सीताराम चौधरी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनिल रावते रामदास असारे यांचा समावेश आहे. यांचीही नावे गृहमंत्र्यांनी जनतेसमोर जाहिर केल्यास यामध्ये कोणाचा हात आहे हे स्पष्ट होईल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्रे रक्ताने भिजली याचे राजकारण करू नये अशी टीका सामना मधून करण्यात आली असून त्याचा समाचार घेताना दरेकर यांनी सांगितले की, भगवी वस्त्रे रक्ताने लाल झाली आहेत त्याचे काय…भगव्यावर झालेला हा लाल रक्ताचा हल्ला भगवी विचारधारा घेऊन राज्यकारभार करणा-यांना आता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा वाटतो, कारण खुर्ची ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपेक्षा मोठी व महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
कोरोनाच्या भीषण पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसाच मृत्यू दरही वाढतोय हे गंभीर आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आयसीएमआर च्या निकषानुसार चाचणी करण्याची केलेली सूचना योग्य आहे. ज्यांना रुग्णालयाची सेवा उपलब्ध झाली नाही, असे कोरोना न झालेले शेकडो रुग्ण मृत्यूमूखी पावले आहेत, त्यामुळे आता सरकारने ती यादीही जाहिर करावी, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
कोरोना सारख्या संकटकाळातही महाविकास आघाडीचे सरकार सापत्न भावनेने व सूडबुध्दीने वागत असल्याचा आरोप करताना दरेकर यांनी सांगितले की, भंडारा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी बैठक मागितली असता जिल्हाधिका-यांनी वेळ नसल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळेस सध्या लोकप्रतिनिधी नसलेले राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते प्रफुल्ल पटेल हे मुंबईसारख्या रेड झोनमधून ग्रीन झोनमधून भंडारा येथे गेले असताना जिल्हाधिका-यांनी त्यांना बैठक दिली. रेड झोनमधून प्रफुल्ल पटेल ग्रीन झोन मध्ये कसे गेले असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे, अशी टिकाही त्यांनी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते ते राज्य सरकारला चालते पण भाजपने अथवा सामान्य जनतेने सोशल मिडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली तर मात्र पोलिस त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत आहेत, पण ही सूडाची भावना योग्य नाही असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
राज्यात विलगीकरणाची अवस्था देखील आज दयनीय आहे. विलग ठेवलेल्या संशयितांना शौचालय आणि खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच त्याची नीट तपासणीही होत नाही, त्यामुळे विलगीकरणात ठेवलेले रुग्ण अतिशय त्रस्त झाले आहेत, त्याकडे सरकारने गांभीर्याने व तात्काळ लक्ष द्यावे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

कोरोनाशी लढताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, दि. 22 : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती जोखीम पत्करुन कोरोनाची लढाई लढत आहेत त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेतकोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही मंडळी सुरक्षित राहिली पाहिजेत, त्यासाठी या सर्वांनी आपली कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक असून अजूनही काहींना परिस्थितीचे गांभीर्य कळलेले नाही, हे दुर्दैव आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. टाळेबंदीच्या यशाला मर्यादा पडत आहेत. पोलिस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातच थांबण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर रोखता येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती जोखीम पत्करुन कोरोनाची लढाई लढत आहेत. त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. कर्तव्य बजावताना या सर्वांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनीही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी  केलं आहे.

रस्त्यांची कामे दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करा – मंत्री अशोक चव्हाण

0

बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा

नांदेड, दि. 22 : जिल्ह्यातील रस्त्यांची मंजूर व प्रलंबित कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण विहित कालावधीत पूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नांदेड जिल्ह्यातील मंजूर व प्रगती पथावरील, प्रलंबित, प्रस्तावित नवीन कामांचा आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तसेच जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, कंत्राटदार यांची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व त्याची यादी सादर करण्याबाबत निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्गाचा कामाचा आढावा घेऊन कोल्हार ते नरसापुर 57 कि.मी. काम वीस टक्के झाले असून मुदत संपून एक वर्ष झाले तरी ती कामे अपूर्ण आहेत सदर कामे तात्काळ पूर्ण करावीत. वसमत ते नांदेड 30 किमी पैकी 14 किमी रस्त्याचे काम 50 टक्के झाले आहे. नांदेड-बारड-भोकर-म्हैसा रस्त्याचे काम सुरू असून बारसगाव ते राहटीपर्यंतचे काम लॉकडाऊनमुळे प्रलंबित आहे. रस्ता कामासाठी डांबरचे प्रमाण कमी होते ते निदर्शनास आणून देणे आवश्यक होते त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

भोकर ते राहाटी पर्यंतचे काम पूर्ण करावे. त्यापुढील काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण यांच्याकडे देण्यात यावे. यासाठी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याशी चर्चा करावी. उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याशीही समन्वय ठेवून तीन कामांच्या मोजण्याचे काम पूर्ण करावे. नांदेड ते जळकोट रस्त्याचे कामाच्या मोबदला देण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी कामे अडवले असून तीन कामे रस्त्याची शिल्लक आहेत. या कामांची सविस्तर माहिती सादर करावी. लखमापुर चार पॉईंट 50 किमीचे काम परमिट आहे, तेव्हा या कामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित कामांचा आढावा घ्यावा. नांदेड-वारंगा बायपास रस्ता 30 मीटर शासकीय जमीन आहे, परंतू रस्ता करण्यास विरोध होत असल्यास रस्त्याचे काम पोलीस संरक्षणात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.

दिलासादायक:राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त-तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक ३१८

0

साठीतील रुग्णांची संख्याही शंभर-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २२: कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणत: ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्त ७२२ रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या: शून्य ते १० (१९); ११ ते २० (५९) ; २१ ते ३० (१६०); ३१ ते ४० (१६४); ४१ ते ५० (१५४); ५१ ते ६० (९८); ६१ ते ७० (४५); ७१ ते ८० (१५); ८१ ते ९० (७); ९१ ते १०० (१).

घरी सोडण्यात आलेल्या ७२२ रुग्णांची जिल्हा- मनपानिहाय संख्या : अहमदनगर मनपा- ५, अहमदनगर ग्रामीण-११, औरंगाबाद मनपा- १४, बुलढाणा- ८, गोंदिया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी १, कल्याण-डोंबिवली मनपा- ३१, कोल्हापूर मनपा-२, लातूर ग्रामीण-८, मीरा भाईंदर मनपा- ५, मुंबई मनपा- ३७४, नागपूर मनपा- १२, नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी १, नवी मुंबई मनपा- १९, उस्मानाबाद- ३, पालघर ग्रामीण-१, पनवेल मनपा- १३, पिंपरी-चिंचवड मनपा- १२, पुणे मनपा- १२०, पुणे ग्रामीण- ५, रायगड ग्रामीण-३, रत्नागिरी-१, सांगली ग्रामीण- २६, सातारा- ३, सिंधुदूर्ग-१, ठाणे मनपा १६, ठाणे ग्रामीण-  ४, उल्हासनगर मनपा- १, वसई-विरार मनपा- १२, यवतमाळ-७.

मोफत समुपदेशनातून मानसिक आधार

0

कोरोना विषाणूच्‍या त्रासामुळे जिल्‍हा, राज्‍य, देश नव्‍हे तर सारे जग त्रासून गेले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘लॉकडाऊन’, ‘घरातच रहा’ यामुळे अनेक जण नाईलाजाने घरातच आहेत. ज्‍यांना एकांताची सवय आहे, त्‍यांना इतका त्रास होणार नाही, पण अनेकांना या अस्थिर वातावरणाचा मानसिक त्रास होवू शकतो. या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे अनेक मानसशास्‍त्रज्ञ, समुपदेशक या क्षेत्रात काम करणा-या संस्‍था स्‍वत:हून पुढे आल्‍या आहेत. मानसिक तणावाला सामोरे जाणा-या व्‍यक्‍तींना मोफत ऑनलाईन समुपदेशन करुन ते धीर देत आहेत.

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्‍याला समुहात राहण्‍याची आवड आहे. सध्‍याच्‍या वातावरणामुळे आर्थिक, सामाजिक, मानसिक असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत, त्‍यामुळे अनेकांच्‍या मनात नकारात्‍मक विचार येतात. विद्याथी्र, नोकरदा महिला, गृहिणी, तरुण, ज्‍येष्‍ठ नागरिक यांना वयोमानाप्रमाणे, परिस्थितीनुसार कमी-अधिक प्रमाणात नैराश्‍य येवू शकते. यावर कशी मात करता येईल, यासाठी वर्तमानपत्रातून, प्रसारमाध्‍यमांतून, सोशल माध्‍यमातून माहिती देणारे लेख, संदेश, व्हिडीओ प्रसारित करण्‍यात येत आहेत. काही समुपदेशकांनी ठराविक वेळेत दूरध्‍वनीवरुन, सोशल मिडीयावरुन लोकांशी संवाद साधून कौतुकास्‍पद उपक्रम सुरु केला आहे. निराशेच्‍या वाटेवरील या व्‍यक्‍तींना सकारात्‍मक वाटेवर आणण्‍याचा हा उपक्रम गौरवास्‍पद आहे.

नागरिकांना अन्‍न–धान्‍य, दूध, भाजीपाला, औषधी या जीवनावश्यक वस्तू जरी सहजतेने मिळत असल्या तरी ‘कोरोना’चा कहर आणखी किती दिवस राहील, याबाबत निश्चितपणे कोणी सांगू शकत नाही. यामुळे नागरिकांमध्‍ये निराशेचे वातावरण निर्माण होवू नये, यासाठी आरोग्‍य यंत्रणेनेही पुढाकार घेतला आहे.

समुपदेशन राज्यातील पहिला उपक्रम- देशात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्‍यानंतर खबरदारी म्‍हणून पुणे जिल्‍हा प्रशासनाने आवश्‍यक ते उपाय योजण्‍यास सुरुवात केली होती. त्याबाबत 27 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्‍यात आली. त्‍यानंतर 4 मार्च रोजी आणि 6 मार्च रोजी व्‍यापक बैठक घेवून कोरोना प्रादुर्भाव झाल्यास जिल्‍हा प्रशासन या आव्‍हानास तोंड देण्‍यासाठी सज्‍ज असल्याचे जाहीर करण्‍यात आले. जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्‍यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी वेळोवेळी विविध यंत्रणांच्‍या सज्‍जतेचा आढावा घेतला. पुणे शहरात ‘कोरोना’बाधित व्‍यक्‍ती 9 मार्चला आढळून आल्यानंतर सर्व संभाव्‍य परिस्थिती लक्षात घेवून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी सुरु केली. याचाच एक भाग म्‍हणून जिल्ह्यातील नागरिकांना मानसिक आधार व समुपदेशन देण्याची यंत्रणाही कार्यान्वित केली.

‘मनसंवाद’ – महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व मनोविकृती शास्त्र विभागातर्फे ‘मनसंवाद’ हेल्पलाईन क्र. ०२०-२६१२७३३१ ही सर्व सामान्यांसाठी सेवा सुरु करण्यात आली. याचा रोज सरासरी 25 लोक लाभ घेत आहेत. तसेच कोरोना संदर्भातील सर्व शंकाचे निरसन करण्यासाठीही २४ तासांसाठी हेल्पलाईन (क्र. ०२०-१८००२३३४१२० व ०२०-२६१०२५५०) सुरु करण्यात आली. समाजप्रबोधनासाठी वेगवेगळया प्रकारच्‍या मार्गदर्शक पुस्तिका, भित्तीपत्रके तयार करुन वाटण्यात आली.

कर्वे समाज सेवा संस्था येथे मानसिक आरोग्यावरील केंद्र चालविले जाते. येथूनही ऑनलाइन समुपदेशन केंद्र चालविण्यात येत आहे. कर्वे संस्थेचे मानसोपचारतज्ज्ञ मोबाईलवरुन किंवा ऑनलाइन मोफत समुपदेशन करीत असून ते ई -मेलवरही नागरिकांशी संपर्क करीत आहेत. उपक्रमाचे समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांच्यासह डॉ. संजय कुमावत, डॉ प्रवीण पारगावकर, डॉ. कल्याणी तळवलकर, डॉ. स्नेहा मुलचंदानी हेही लोकांचे समुपदेशन करीत आहेत.

याबरोबरच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्त्व विकास केंद्राकडूनही मोफत समुपदेशन सेवा देण्‍यात येत आहे. केतकी कुलकर्णी, विशाखा जोगदेव, सुरेखा नंदे, गिरिजा लिखिते हे समुपदेशक नागरिकांशी संवाद साधत आहेत. या शिवाय अनुभूती संस्‍थेच्‍या प्राजक्‍ता अमोल गाडेकर यांच्‍यासारखे अनेक समुपदेशक वैयक्तिक स्‍तरावरुनही फोनवरुन संवाद साधून नागरिकांचा मानसिक तणाव दूर करण्‍यास मदत करत आहेत. बहुतांश सर्व नागरिक घरात असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे, हे गरजेचे आहे. या साठी विविध समुपदेशक, संस्‍था स्‍वयंस्‍फूर्तीने पुढाकार घेवून समाजसेवा करत आहे, हे आनंददायी आणि कौतुकास्‍पद आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे