नांदेड, दि. 29 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मान्यता मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी केले.
श्री. चव्हाण यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो.संजय मोरे, डॉ.सुप्रिया यमेकर, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.
दि. 25 आणि 26 एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.
नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. अशोकराव चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, डॉ.गजानन झोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली. सध्या दररोज सरासरी १०० च्यावर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ.सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.
पुणे दि. 30:–पुणेविभागातील कोरोनाच्या संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच्या स्थितीबाबत ची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
ऐका त्यांच्याच तोंडून …
पुणेविभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोना बाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 13 बाधित रुग्ण आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 383 असून कोरोना बाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.
पुणे- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हॉटस्पॉट भागात आणखी अतिरिक्त निर्बंध लागू केले असून, उद्या १ मे महाराष्ट्र दिनापासून पुढील 3 दिवस काहीही मिळणार नाही फक्त दूध मिळणार आहे. भाजीपाला, किराणा व इतर अत्यावश्यक वस्तू विक्रीला मनाई करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकाने, मेडिकल दुकाने यावर निर्बंध नसतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच भाजीपाला आणि किराणा दुकानांवर हि निर्बंधे असतील . नेमके कुठे कुठे असणार आहेत हे निर्बंध आणि कशा प्रकारे हे ऐका खुद्द सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याच तोंडून …
ऐका हो ऐका …
या भागात अतिरिक्त निर्बंध
1) समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याचा सर्व परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.
2) स्वारगेट पोलिस ठाण्याचा गुलटेकडी , महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर व खड्डा झोपडपट्टी हे भाग असतील.
3) लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भिमपूरा लेन, बाबाजान दर्गा आणि क्वार्टर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला रोड आणि शितलादेवी मंदिर रोड
4) बंडगार्डन परिसरात ताडीवाला रोड या भागात हे निर्बंध असतील
5) सहकारनगर पोलीस ठाणे- तळजाई वसाहत आणि बालाजी नगर या भागात हे निर्बंध असणार आहेत.
6) दत्तवाडी भागात पर्वती दर्शन परिसर…
7) येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात लक्ष्मीनगर, गाडीतळ आणि चित्रा चौक परिसर
8) खडकी पोलीस ठाण्याच्या परिसरात पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर आणि इराणी वस्ती पाटकर प्लॉट या भागात हे निर्बंध असणार आहेत.
हे बंद आणि हे सुरू…
पुढील तीन दिवस या भागात किराणा, भाजीपाला, अंडी, मटण, फळे, पूर्ण पणे विक्री बंद असणार आहे.
तसेच या भागात दूध विक्री केंद्र फक्त दिवसभरात दोन तासासाठी म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत खुली असणार आहेत. तर घरपोच दूध देणाऱ्यांना सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत सेवा देता येणार आहे. त्यासोबतच दुधाच्या वाहतुकीस निर्बंध नसतील. शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून सुरू असलेल्या कार्यवाहिसाठी हे निर्बंध लागू होणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार
मुंबई, दि. ३० :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी पाठविण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आज कोटा येथून रवाना झाल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले.
राजस्थानमधील कोटा येथे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राज्यातून गेलेले हे विद्यार्थी लॉकडाऊनपासून तेथे अडकून होते. त्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे राजस्थान शासनाच्या संपर्कात होते. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत प्रयत्नशील होते. या विद्यार्थ्यांचा प्रवास मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून होणार असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे संबंधित राज्याच्या यंत्रणांशी संपर्कात होते.
याशिवाय एसटी बसेसमधून विद्यार्थ्यांना आणताना कोविड-१९ च्या आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात येत आहे. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणीही करून विलगीकरणही करण्यात येणार आहे.
परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या सुमारे ७६ बसेस कोटा येथे पोहचल्यानंतर त्या आज तेथून विद्यार्थ्यांना घेऊन रवाना होत आहेत. दूर अंतराचा प्रवास असल्याने येत्या एक दोन दिवसांत हे विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित त्या-त्या जिल्ह्यांत पोहचणार आहेत. या दरम्यान महामंडळाने बसेसचे सॅनिटायझेशन, चालकांची पुरेशी संख्या, त्यांची विश्रांती अशा गोष्टींचेही पुरेसे नियोजन केले आहे.
बस रवाना होताना विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे मोबाईल व्हिडीओही चित्रीत केले. त्यामध्ये त्यांनी आपल्या घरी परतण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार, यांच्या पुढाकारसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री श्री. परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी समन्वयाने केलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. कोविड-१९च्या आरोग्य सुरक्षा मानकांचे पालन करून सुखरूपपणे घरी परतण्याचा प्रवास सुरू होतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान तरळू लागले होते. त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या एसटी बसेसचे चालक आदींनाही त्यांनी अभिवादन केले.
बुलडाणा दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २७ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी ३० एप्रिल २०२० पर्यंत तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून ८५.४६ क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी ७२ पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली. लॉकडाऊन कालावधीत २३ मार्च ते आज ३० एप्रिल २०२० पर्यंत जिल्ह्यातील एकूण १०० तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी २७ मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्त्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारीरिक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.
असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज ३० एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : २.२० क्विंटल, कोराडी ता. मेहकर : २.५३, धनवटपूर ता. मेहकर : २.७७, धानोरी ता. चिखली : १.१०, लव्हाळा ता. मेहकर : ०.८० क्विं, नळगंगा ता. मोताळा : १२ , दहीद ता. बुलडाणा : १, पलढग ता. मोताळा : १.५०, व्याघ्रा ता. मोताळा : १, धामणगांव बढे ता. मोताळा : ४, पिंप्री गवळी ता. खामगांव : ३.५९, गारडगांव ता. खामगांव : ३.५०, कंडारी ता. नांदुरा : ४.५०, लांजुड ता. खामगांव : ३.६३, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : ३, येळगांव ता. बुलडाणा : १०, धामणगांव देशमुख ता. मोताळा : ३, गंधारी ता. लोणार :१.१७, शिवणी जाट ता. लोणार : ०.७०, पिंपळनेर ता. लोणार २.५०, झरी ता. बुलडाणा : ३.५०, टाकळी ता. खामगांव : ४.९०, बोरजवळा ता. खामगांव : ४.१०, ब्राम्हणवाडा ता. चिखली : ३, किन्ही मोहदरी ता. चिखली : १, राजुरा ता. जळगांव जामोद : ३ आणि खळेगांव ता. लोणार : १.६५ क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण ८५.६४ क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.
मुंबई, दि. ३० : भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिलेल्या कपूर घराण्याचा समृद्ध वारसा लाभलेला एक सदाबहार तारा आज निखळला, अशा शब्दात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून चित्रपटसृष्टी सावरण्याआधीच ऋषी कपूर यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयातून वेगळी छाप सोडली होती. ऋषी कपूर यांनी ७० च्या दशकात बॉबी चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. दामिनी, सरगम, अमर अकबर अँथोनी, कर्ज, अशा जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनय साकारला. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर कर्करोगावरावरील उपचार घेऊन भारतात परतले पण काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि आज त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन कपूर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
नागपूर, दिनांक 30:-‘लॉकडाऊन’मुळे राज्यात व राज्याबाहेर अडकून पडलेले विद्यार्थी, मजूर व नागरिकांना परत आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून अशा व्यक्तींची माहिती गोळा करून निधीसह तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातून आज त्यांनी नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व अप्पर आयुक्त अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत वितरित करण्यात आलेला निधी, मदत छावण्या, अन्य ठिकाणी अडकलेले विद्यार्थी व मजूर व कोविड -१९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना या सर्व बाबींचा आढावा, यावेळी घेण्यात आला. देशात लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे आपल्याकडील विद्यार्थी, मजूर व नागरिक अन्य जिल्हा व राज्यात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नियोजन करावे. अन्य ठिकाणी अडकलेल्यांची माहिती गोळा करून निधीसह प्रस्ताव सादर करावा.
पीपीई किट, मास्क, सॅनिटरायझर, वैद्यकीय सोयी सुविधा, व्हेंटिलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र व थर्मल स्कॅनर इत्यादी साधन खरेदीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विलगीकरणासाठी तात्पुरती निवास व्यवस्था, अन्न, कपडे, वैद्यकीय देखभाल, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची वैयक्तिक सुरक्षा साधन इत्यादींचा आढावा, श्री. वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालय व शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात अडकलेले मजूर तसेच पुणे, दिल्ली, विजयवाडा, मुंबईसह राज्याच्या अन्य जिल्ह्यात अडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे अन्य राज्यातील तसेच जिल्ह्यातील आपल्याकडे अडकलेल्या विद्यार्थी व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी तेथील प्रशासनासोबत समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्वॅब’ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून ही प्रयोगशाळा लवकर सुरू करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. नागपूर येथील दिप्ती सिग्नल भागात असलेल्या ६०० कुटुंबांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोरोना साथरोग नियंत्रण कामासाठी सेवा घेण्यात आलेल्या होमगार्डच्या वेतनाचा मुद्दा जिल्हाधिकारी नागपूर यांनी मांडला असता वेतनाचा प्रस्ताव पाठवावा मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्हाधिकारी यांना वडेट्टीवार यांनी विविध सूचना केल्या. साथरोग नियंत्रणासाठी विभागीय आयुक्तासह सर्व जिल्हाधिकारी करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
मुंबई. बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले. बुधवारी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या बातमीतून लोक सावरलेही नव्हते की बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीसुद्धा जगाचा निरोप घेतला. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवर याविषयी माहिती दिली आहे. बिग बी यांनी ट्विट करत लिहिले आहे की, ‘तो गेलाय… ऋषी कपूर गेलाय… मी उद्धवस्त झालोय!’
काल इरफान खान च्या मृत्यू नंतर बॉलीवूड आणि रसिकांना लागोपाठ बसलेला हा मोठा दुसरा धक्का कोरोना संकटाच्या काळातच बसला आहे.
ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.
ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती
2 वर्षांपूर्वी कॅन्सरचे झाले होते निदान
ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू होत्या. तर मुलगा रणबीर त्यांना अनेक वेळा भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता. काही दिवसांपूर्वी ऋषी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “आता मला बरे वाटत आहे. आणि कोणतेही काम करू शकतो. पुन्हा अभिनय कधी सुरू करण्याचा विचार करतोय. पण लोकांना आता माझे काम आवडेल की नाही हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्याचदा रक्त चढवण्यात आले. तेव्हा मी मी नीतूला म्हटले होते की – मला आशा आहे की नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही.”
चाहते न्यूयॉर्कमध्ये भेटीसाठी पोहोचले होते
जेव्हा ऋषी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते, तेव्हा त्यांचे मित्र आणि प्रियजन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तेथे आले होते. यामध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, करण जोहर आणि मलायका अरोरा यांचा समावेश होता. ऋषी शेवटचे मरान हाश्मीसोबत स्क्रीनवर दिसले होते.
फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
ऋषी कपूर यांना फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकदा जेव्हा ते दिल्लीतील एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, ऋषी यांनी स्वतः सांगितले होते की, त्यांना संसर्ग झाला होता. मुंबईत परतल्यानंतर, पुन्हा व्हायरल तापामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तब्येत सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
महिन्याभरापासून सोशल मीडियापासून दूर
सोशल मीडियावर आपल्या लॉजिकल आणि अग्रेसिव्ह कमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांनी 2 एप्रिलनंतर ट्विटर अकाऊंटवर काहीही पोस्ट केले नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार असल्याची घोषणा केली होती. यात दीपिका पदुकोण त्यांच्यासोबत काम करणार होती.
पृथ्वीराज कपूर यांचा नातू आणि राज कपूर यांचा मुलगा
चिंटू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईच्या चेंबूर येथे झाला होते. ते राज कपूर यांचा दुसरा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचे नातू होते. त्यांनी आपल्या भावांबरोबर मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि अजमेरमधील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. रणधीर कपूर हा त्यांचा मोठा भाऊ आणि राजीव कपूर हा त्यांचा धाकटा भाऊ आहे. ऋषी आणि नीतू यांना रणबीर कपूर हा मुलगा आणि रिदिमा कपूर ही मुलगी आहे.
ऋषी कपूर यांचा चित्रपट प्रवास
1970 रिषी कपूर यांनी 1970 मध्ये वडील राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ऋषींनी त्यांच्या वडिलांच्या बालपणीची भूमिका वठवली होती. 1973 मध्ये आलेल्या ‘बॉबी’ या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या कारकीर्दीत, त्यांनी 1973-2000 पर्यंत सुमारे 92 चित्रपटांमध्ये रोमँटिक हीरो म्हणून काम केले. सोलो लीड अभिनेता म्हणून त्यांनी 51 चित्रपटांमध्ये काम केले. ऋषी त्यांच्या काळातील चॉकलेट हीरोंपैकी एक होते. त्यांनी बॉलिवूडला अनेक रोमँटिक हिट्स दिले. आपल्या पत्नीसह त्यांनी एकुण 12 चित्रपटांत काम केले. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
ऋषी यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला होता. त्यांनी 1998 मध्ये अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत ‘अब अब लौट चले’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
पुणे-राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचं सावट सरकारवर फिरू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. “राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधीमंडळ नियुक्तीसंदर्भात मध्यस्थी केली नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला.
राज्यात करोनानं शिरकाव करत हातपाय पसरल्यानं मोठं संकट उभं राहिलं.
करोनाचा धोका लक्षात घेता राज्यातील छोट्यामोठ्या कार्यक्रमासह निवडणूकाही रद्द करण्यात आल्या. यात जाहीर झालेली विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर गेल्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेत यायला सुरूवात झाली. सरकारला स्थिरता देण्यासाठी महाविकास आघाडीनं त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुर करून राज्यपालांना पाठवण्यात आला. त्यावर निर्णय न झाल्यानं पुन्हा राज्यपालांना यासंदर्भात आठवण करून देणारा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या निर्णय लांबत असल्यानं राजकीय अस्थिरता राज्यात घर करून लागली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी फोनवरून चर्चा केली. “करोनाचं संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्याचबरोबर आपण मध्यस्थी केली नाही, तर मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल,” असं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. त्यावर “या प्रकरणात आपण लक्ष घालू” असं आश्वासनं मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलं आहे. असं वृत्त एएनआय वृत्त संस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
पंतप्रधानांना फोन करण्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा
राज्यपालांकडून विधान परिषद नियुक्ती संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी राज्यात निर्माण होण्याची शक्यता असलेल्या राजकीय अस्थिरतेबद्दल शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती देत मध्यस्थी करण्याची मागणी केली.
मुंबई दि. २९ एप्रिल- कोरोनोच्या संकटात महाराष्ट्र सापडला आहे. कोरोना सारख्या कठिण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस बांधव दिवस रात्र करित आहेत. पण कर्तव्यावर असणा-या पोलिसांवर गेल्या काही दिवसात हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांवर असे हल्ले वाढत गेल्यास कोरोनोची परिस्थिती हाताळणे अवघड होईल असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढायला हवे आणि पोलिसांना आता अशा प्रवृत्तीपासून संरक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता गृहखाते पोलिंसावरील हल्ले रोखण्यासाठी काय करणार असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे उपस्थित केला आहे.
नाशिक,मानर्खुद भिवंडी, पैठण येथील पोलिंसावरील हल्ल्यांच्या घटना पुन्हा एकदा गृहखात्याचा नाकर्तेपणा सिद्ध करणाऱ्या आहेत. कोरोनाच्या लढाईत दिवसरात्र कर्तव्य बजाविणा-या १५९ पोलिसांवर आतापर्यंत हल्ले झाले आहेत. हल्लेखोर विशिष्ट प्रवृतीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा हल्याने पोलिसांचे मनोबल खचल्यास कोरोनाग्रस्त परिस्थिती हाताळता येणार नाही त्यामुळे राज्याचे गृहमंत्री आता पोलिंसांवर हल्ला करणा-या या प्रवृत्तींना आळा कसा घालणार व पोलिसांचे रक्षण कसे करणार असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
पुणे : ता.29. लॉकडाऊनच्या काळात सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारून कॅटॅलिस्ट फाउंडेशनने शहरातील एक हजार कुटुंबांना शिधा वाटप केले आहे. याद्वारे त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात देऊ केला आहे.
कोरोना या महाभयंकर आजारामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांना अडचणीच्या काळात मदत करण्याच्या भावनेने कॅटॅलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी एक हजार कुटुंबियांना शिधा देण्याचा संकल्प केला होता. ताडीवाला रस्ता, विश्रांतवाडी, येरवडा, बोपोडी, दापोडी,खडकी बाजार, औंध रस्ता,गोखले नगर, दत्तवाडी, मंगळवार पेठ येथील सुमारे एक हजार कुटुंबियांना मदत करून त्यांनी आज हा संकल्प पूर्णत्वास नेला. त्याचप्रमाणे फाउंडेशन मार्फत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 200 विद्यार्थांना फूड पॅकेट्स देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे.
या उपक्रमाबद्दल माहिती सांगताना संस्थेचे अध्यक्ष सुनील माने म्हणाले, कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत बाबसाहेबांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी चित्ररथ रॅलीचे आयोजन केले
होते. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार होती. कोरोना वर मात करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून यावर्षीची ही रॅली आम्ही रद्द केली आहे. मात्र संकटाच्या काळात माणसाला मदत करणे ही बाबासाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे बाबसाहेबांच्या जयंतीसाठी राखून ठेवलेला निधी गरजूंसाठी वापरून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामुळेच ज्यांची हातावरची पोटं आहेत, जे रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा एक हजार कुटुंबांना आमच्या संस्थेमार्फेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वस्तूंमध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, खाद्यतेल, साखर, चहा पावडर, मीठ, हळद, मसाला, जिरे, मोहरी, कांदे, बटाटे आणि अर्धा डझन अंडी अशी सामग्री होती. आज एक हजार कुटूंबियांना मदत दिली असली तरी या पुढेही आवश्यकतेनुसार लोकांना मदत करतच राहू. याबरोबरच या काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे आम्ही रक्तदान ही केले आहे. तसेच आजारापासून वाचण्यासाठी जनजागृतीचे काम ही आम्ही अविरतपणे करत आहोत.
या कामात संस्थेचे सदस्य सिद्धार्थ गायकवाड, समीर भुते, मिलिंद मोरे, राजू परदेसी,रमाकांत कापसे,संतोष भिसे, विजय बनसोडे, अमोल छडीदार,अनिल माने यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मदत करत आहेत. खासदार गिरीश बापट या संस्थेचे पालक तर लेफ्टनंट जनरल (नि) डी. बी. शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत.
मुंबई, दि. २९: राज्यात आज कोरोनाबाधीत ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ९९१५ झाली आहे. आज २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७ हजार १५९ नमुन्यांपैकी १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत. या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ६६४४ (२७०)
ठाणे: ४६ (२)
ठाणे मनपा: ३७३ (४)
नवी मुंबई मनपा: १६२ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १५८ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १५
मीरा भाईंदर मनपा: १२५ (२)
पालघर: ४१ (१)
वसई विरार मनपा: १२८ (३)
रायगड: २३
पनवेल मनपा: ४६ (२)
ठाणे मंडळ एकूण: ७७६४ (२९०)
नाशिक: ५
नाशिक मनपा: १९
मालेगाव मनपा: १७१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: ३० (८)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: ३१३ (२७)
पुणे:५८ (३)
पुणे मनपा: १०६२ (७९)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: ७८ (६)
सातारा: ३२ (२)
पुणे मंडळ एकूण: १३०९ (९३)
कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ५
सांगली: २८
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५१ (२)
औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १०३ (७६)
जालना: २
हिंगोली: १५
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: १२३ (७)
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३
लातूर मंडळ एकूण: १९ (१)
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १६९ (९)
नागपूर: ६
नागपूर मनपा: १३२ (१)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १४२ (१)
इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ९९१५ (४३२)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला संयुक्तपणे आढावा
नाशिक,दि. 29 : नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना मुक्तीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व समन्वयाने काम करीत असून संपूर्ण राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ मालेगांव हे कोरोनाच्या दृष्टीने अतिजोखीमेचे ठिकाण आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्य शासनाच्या दृष्टीने कोरोनामुक्तीसाठी सर्वोच्च केंद्रस्थानी असून मालेगावसाठी कुठलीही तडजोड करू नये, अशा सूचना आज संयुक्तपणे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संयुक्तपणे मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री.भुजबळ, गृहमंत्री श्री.देशमुख, आरोग्यमंत्री श्री.टोपे व कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, उपसंचालक आरोग्य डॉ.पठाणशेट्टी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे व विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोठ्यालढ्याचीतयारीठेवावी : पालकमंत्रीछगनभुजबळ
कोरोनाच्याबाबतीत नाशिक जिल्हा अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. कोरोनाच्या निमित्ताने भविष्यात सामाजिक धार्मिक, राजकीय आणि प्रशासकीय अशा विविध प्रकारच्या समस्या समोर येणार आहेत. या सर्वांसह लोकांचे सार्वजनिक आरोग्य राखण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, त्यासाठी सर्वांना मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी लागेल, खूप कष्ट घ्यावे लागतील, असे यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
श्री.भुजबळ म्हणाले, मालेगावमध्ये जी परिस्थती निर्माण झाली त्याबाबतीत सुरूवातीपासूनच उपायोजना थोड्या प्रमाणत सुरू होत्या. सर्वेक्षणाला एनआरसी, एनपीआरची जोड देण्यात आल्याने याबाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमजाचे वातावरण होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू यांनी या प्रकरणात प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने आज प्रशासकीय पातळीवर मालेगावमध्ये उपायोजनांना यश मिळतांना दिसत आहे. सुरवातीच्या काळात कोरोनामुक्त असलेल्या नाशिक जिल्ह्याने मालेगावच्या रूपात कोरोनाचा उद्रेक अनुभवला. मालेगावच्या बाहेर तालुक्याच्या काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येते, याचे प्रमुख कारण मालेगाव शहरातील काही लोकांनी आसपासच्या गावांमध्ये केलेला संचार आहे. मालेगावमधून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार नाही व मालेगाव शहरातून कुणीही आसपासच्या गावांमध्ये जाणार नाही याची खरबरदारी घ्यावी.
मुंबईहून नाशिककडे येणाऱ्यांची मोठी रांग मुंबई-नाशिक रस्त्यावर दिसून येते. अनेक कुटुंबासोबत लहान मुलेही दिसून येतात. त्यांच्याशी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने व्यवहार करावा, ज्यांच्याकडे बाहेर जाण्याची परवानगी आहे, त्यांना अडवू नका. अडचणी खूप आहेत. तरीही मतभेद होणार नाहीत याची काळजी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी घ्यावी.
गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत व्यस्त दिनक्रमातून व अडचणीच्या काळात नाशिक जिल्ह्याला भेट देवून सर्व अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले, त्याबद्दल त्यांचे आभारही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी मानले.
कायदासुव्यवस्थेचाप्रश्ननिर्माणहोणारनाहीयाचीखबरदारीघ्यावी : गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यात सद्य:स्थितीत स्थलांतरीत मजुरांची समस्या गंभीर असून नाशिक जिल्ह्यातही 1 हजार 900 स्थलांतरीत मजूर आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या संपर्कात असून राज्यातील सर्व स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार व त्या त्या राज्याकडे प्रयत्नशील आहोत. 3 मे रोजी लॉकडाऊन सुटण्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणवर राज्यातील जनता असून 3 मे रोजी ही स्थिती कायम राहिल्यास कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.
मंत्री श्री.देशमुख म्हणाले, मालेगावातील मुस्लिम वस्त्यांमधील गर्दी सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा विषय असून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्याठिकाणी सर्व सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करावे. गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर साधन सामुग्री व पोलिसबळ मालेगावसाठी देण्यात आले आहे व मागणी केल्यास भविष्यातही वाढवून दिले जाईल. मालेगावातील घराघरात सर्वे करण्यावर भर देण्यात यावा. प्रतिनियुक्तीने जे हजर होणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइनशिवाय पर्याय नाही. तसेच भाजीपाल्याच्या गाड्यांच्या माध्यमातून परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख यांनी दिल्या.
कोरोना साथ रोगाच्या निमित्ताने होणऱ्या सर्वेक्षणात आरोग्य यंत्रणांची पथके घरोघरी जात आहेत. परंतू लोक घरातील लोकांची खरी संख्या सांगत नाही. सर्वेक्षण करणारे त्यांना ओळखतही नाही, अशा परिस्थितीत मतदार यादी व पल्स पोलिओ अभियानाच्या याद्यांचा संदर्भ घेवून सर्वेक्षण केल्यास मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाला यश मिळेल. सर्वेक्षण हाच कोरोना नियंत्रणाचा पहिला टप्पा असून त्यात मिळालेले यश हे महत्त्वाचे असेल, त्यात अपयश आल्यास कोरोना नियंत्रणाची दिशाच चुकू शकते. त्यामुळे अचूक सर्वेक्षणावर भर देण्यात यावा, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
ते म्हणाले, 10 ते 15 दिवस प्रलंबित असलेल्या नमुन्यांचे अहवाल हे निगेटिव्ह येवू शकतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जास्त काळ अहवाल प्रलंबित असलेल्या संशयित रूग्णांचे नव्याने स्वॅब घेण्यात यावेत. नमुन्यांचे अहवाल मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. एनआयबीच्या संचालक व लॅब इनचार्ज यांच्याशी समन्वय साधून किती दिवसांचा जुना अहवाल हा ग्राह्य धरावा याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे. एकूण रूग्णांच्या 5 टक्के लोकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, असे गृहीत धरून तयारी ठेवावी.
खाजगी हॉस्पीटल्स व क्लिनीक यांची सक्रियता वाढविण्यात यावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, वेळेवर निदान झाल्यास तात्काळ उपचार सुरू करता येतात. सर्वेक्षणामध्ये एक्सरे डायाग्नोसिस केल्यास त्याचे परिणाम चांगले दिसून येतील. पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व पोर्टेबल एक्सरेची सुविधा डिजिटल माध्यमातून केल्यास कार्डियोलॉजिस्टच्या माध्यमातून त्याचे तात्काळ निदान करता येवू शकते. स्वतंत्र तापाची तपासणी करणारे क्लिनिक सुरू करण्यात यावेत. प्रसंगी खाजगी डॉक्टर्स व हॉस्पीटलसच्या सेवा अधिग्रहीत करण्यात याव्यात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता लक्षात घेवून आरोग्य उपसंचालकांमार्फत मालेगाव येथे प्रतिनियुक्तीने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरती करण्याचे उपसंचालक यांचे अधिकार स्थानिक पातळीवरच आहेत, ते तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.
गंभीर रूग्णांसाठी नाशिक व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात आपण यशस्वी होवू. 60 वर्षे वयाच्या मधुमेह व तत्सम आजारांच्या रुग्णांचेही सर्वेक्षण करण्यात यावेत. एका संसर्गित रूग्णासोबत 10 संशयित क्वारंटाइन करण्याची तयारी ठेवावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची स्वतंत्र टिम तयार करण्यात यावी, असेही यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मालेगाव शहरातील 90 टक्के खाजगी रूग्णालये आज बंद असून त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांचे व कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेवू इच्छिणाऱ्या रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे मालेगाव शहरातील खाजगी रूग्णालये व दवाखाने तात्काळ सुरू करण्यात यावीत. मालेगावच्या पश्चिम भागात वैद्यकीय सुविधा चांगल्या असून प्रादुर्भाव मात्र कमी आहे. ज्याठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे त्याठिकाणी वैद्यकीय सुविधा कमी आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या वैद्यकीय साधन सामुग्रीच्या बळकटीकरणावर भर देण्यात यावा, असे यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोरोनाच्या सर्वेक्षण करणाऱ्या टिमला मनोधैर्याबरोबरच सर्वेक्षणासाठी लागणारी साधन सामुग्री देण्याचीही गरज आहे. सध्या पोलीस यंत्रणेने दिलेल्या साधन सामुग्रीवर मालेगाव मधील आरोग्य पथके सर्वेक्षण करतांना दिसून येत आहेत, असेही यावेळी कृषी मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.
याबैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
मुंबई, दि. २९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरीत मजूर, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्ती अडकल्या आहेत.या व्यक्तींची रस्ता मार्गे ने-आण करण्यासाठी केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे.एका राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशात या व्यक्तींना हलवता येणार आहे मात्र त्यासाठी संबंधित राज्यांनी परस्परांशी चर्चा करून परस्परांची सहमती घेणे आवश्यक आहे.
नियोजित स्थानी पोहोचल्यानंतर अशा व्यक्तींसंदर्भात स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन करून या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता नाही, असे मूल्य मापनात आढळल्यानंतर त्यांना गृह विलगीकरणात ठेवावे, यावर भर देण्यात आला आहे. वेळो वेळी आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात यावी.
यासाठी अशा व्यक्तींनी आरोग्य सेतू ऐपचा उपयोग करावा यासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्र्देशानी त्यांना प्रोत्साहन द्यावे,याद्वारे या व्यक्तींच्या आरोग्यावर देखरेख ठेवता येईल.