पुणे दि. 6 : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. अशाच उपाययोजनांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील 38 मजुरांना दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी थांबविण्यात आले होते. या व्यक्तींची मौजे कोरेगाव भिमा येथे अल अमीन कॉलेजवरती राहण्याची, जेवण्याची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली होती. तसेच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. राज्य शासनाने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची प्रक्रिया निश्चित करुन दिल्यानंतर वाशिम जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेवून त्यांना दिनांक 4 मे रोजी त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींना दिनांक 5 मे 2020 रोजी सुखरुप त्यांच्या घरी पोहचविण्यात आले. शिरूर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी नवल किशोर रामम यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांनी पार पाडली.
राज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे ७०० रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ६: राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २५ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी ४ मे रोजी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना तर लगेच दुसऱ्या दिवशी ३५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.
२७ मार्चला २४, २८ मार्चला २६, २९ मार्चला ३५, ३० मार्चला ३९, ३ एप्रिलला ५०, ४ एप्रिलला ५२, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ६६, ७ एप्रिलला ७९, ८ एप्रिलला ११७, ९ एप्रिलला १२५, १० एप्रिलला १८८, ११ एप्रिलला २०८, १२ एप्रिलला २१७, १३ एप्रिलला २२९, १४ एप्रिलला २५९, १५ एप्रिलला ३६, १६ एप्रिलला ५, १७ एप्रिलला ३१, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला १४२, २० एप्रिलला ६५, २१ एप्रिलला १५०, २२ एप्रिलला ६७, २३ एप्रिलला ५१, २४ एप्रिलला ११७, २५ एप्रिलला ११९, २६ एप्रिलला ११२, २७ एप्रिलला ९४, २८ एप्रिलला १०६, २९ एप्रिलला २०५, ३० एप्रिलला १८०, १ मे रोजी १०६, २ मे रोजी १२१, ३ मे रोजी ११५, ४ मे रोजी ३५०, ५ मे रोजी ३५४ रुग्णांना दररोज घरी सोडण्यात आले.
राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात ४६० रुग्ण गेल्या दोन दिवसात घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात २१३ रुग्णांना पाठविण्यात आले, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
0000
औषधांचे वितरण आणि लॅब चाचणी सेवा पुरवण्यासाठी मेडलाइफ आणि स्नॅपडील यांच्यात भागिदारी
स्नॅपडीलच्या युजर्सना आता मेडलाइफच्या अट होम आरोग्य तपासणी, निदान चाचण्या करता येणार तसेच औषधेही ऑनलाइन मागवता येणार
या भागिदारीमुळे मेडलाइफच्या अत्याधुनिक लॅब चाचणी सेवा आणि स्नॅपडीलची विस्तारित व्याप्ती यांचा देशभरातील 400 शहरांना घरीच कोव्हिड- 19 तपासणीसाठी फायदा होणार
बेंगळुरू, 6 मे 2020 – भारतातील सर्वात मोठा ई- हेल्थ प्लॅटफॉर्म असलेल्या मेडलाइफने देशातील सर्वाधिक मूल्याचा ई- टेलर असलेल्या स्नॅपडीलशी भागिदारी जाहीर केली असून त्यामुळे स्नॅपडीलच्या प्लॅटफॉर्मवरून औषधे मागवता येतील, तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी तसेच इतर निदान (डायग्नोस्टिक) चाचण्या करणेही शक्य होईल. या भागिदारीच्या माध्यमातून आपल्या प्रमुख आणि परवडणाऱ्या दरांतील आरोग्यसेवा देशभरातील लाखो लोकांपर्यंत नेण्याचे मेडलाइफचे उद्दिष्ट आहे.
या भागिदारीमुळे स्नॅपडीलच्या युजर्सना वैध प्रीस्क्रिप्शनसह आता औषधे ऑनलाइन मागवता येणार आहेत. वर्गाला आवश्यक सुरक्षा उपकरणांचा वापर करणारा मेडलाइफचा वितरण कर्मचारी वर्ग ऑर्डर निश्चित झाल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकाच्या घरी औषधे पोहोचवणार आहे.
मेडलाइफने विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध केल्या असून त्यात मधुमेह, थायरॉइड प्रोफायलिंग चाचणी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जोखीम असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांनाही सध्याच्या अवघड काळात घरीच आरामात राहून आवश्यक त्या चाचण्या करण्यासाठी मेडलाइफ प्रोत्साहन देत आहे.
त्याशिवाय मेडलाइफच्या सहकार्याने स्नॅपडीलच्या युजर्सना विशिष्ट निकषांअंतर्गत घरीच कोव्हिड- 19 ची तपासणी करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.
स्नॅपडीलच्या प्लॅटफॉर्मद्वारे विशिष्ट चाचणीची वेळ निश्चित केल्यानंतर मेडलाइफचे प्रशिक्षित आणि प्रमाणित फ्लेबोटॉमिस्ट पूर्वनियोजित वेळेस येऊन नमुना गोळा करतील. नमुना गोळा करण्यासाठी युजर्सना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नसून बहुतेक चाचण्यांचे रिझल्ट्स 48 तासांत दिले जाणार आहेत.
‘स्नॅपडीलवर लॅब चाचण्या व औषधे उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या कठीण काळात आमच्या युजर्सचा मोठा फायदा झाला असून त्यांना आपल्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे. मेडलाइफच्या व्याप्तीच्या मदतीने आम्ही देशभरातील 400 लहान- मोठ्या शहरांत घरातूनच वैद्यकीय चाचणी करण्याचा व युजर्सना घरीच औषधे पुरवण्याचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे,’ असे स्नॅपडीलचे प्रवक्ते म्हणाले.
‘स्नॅपडीलबरोबर मेडलाइफने केलेली भागिदारी हा औषधे व डायग्नोस्टिक लॅब चाचण्यांसाठी ग्राहकाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळण्याच्या प्रयत्नांना चालना देण्याचा प्रयत्न असून त्याचबरोबर सुरक्षित अंतर राखण्यासाठीही त्यांना मदत केली जाणार आहे. लाखो युजर्ससाठी स्नॅपडील हा आदर्श भागीदार आहे, कारण ते कित्येक चिंताग्रस्त, आपली डायग्नोस्टिक चाचणी पुढे ढकलून जोखीम पत्करणाऱ्या रुग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालून घरीच परवडणाऱ्या दरांत आरोग्यसेवा पुरवणार आहेत. संपूर्ण जग कोव्हिड- 19 मुळे तयार झालेल्या अनिश्चिततेने ग्रासले असताना आम्ही रुग्णांनी आवश्यक औषधे घ्यावीत आणि घरीच राहून आपल्या चाचण्या पूर्ण कराव्यात याची खात्री करण्याचे ध्येय ठेवले आहे,’ असे मेडलाइफच्या उत्पन्न विभागाचे प्रमुख भावेश सिंघल म्हणाले.
मेडलाइफचे कर्मचारी, फ्लेबोटॉमिस्ट आणि प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ नियमितपणे तापमान तपासण्यासारखी सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेत असून स्वतःच्या तसेच ग्राहक आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षित उपकरणांचा वापरही ते करत आहेत. या उपायांशिवाय लॅब परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीरणही नियमितपणे केले जात आहे.
सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत ‘स्टार्टअप’ला मोठ्या संधी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
‘आयसीएआय’तर्फे ‘लॉकडाऊन : नवी पहाट’वर लाईव्ह वेबिनार
पुणे : “लॉकडाऊननंतर अनेक समस्याना सामोरे जावे लागणार असले, तरी एक नवी पहाट आपली वाट पाहत आहे. या आव्हानात्मक स्थितीत मोठ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील अनेक गुंतवणूकदार भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. चीनमधून अनेक उद्योगांनी काढता पाय घेतल्याने या उद्योगांना आपल्याकडे येण्याचा पर्याय आहे. अशावेळी सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत स्टार्टअप्सना मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. ‘बी इंडियन बाय इंडियन’ या दृष्टीकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल,” असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने ‘लॉकडाऊन : नवी पहाट’वर आयोजित वेबिनारमध्ये सनदी लेखापालांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. महाराष्ट्र हौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, ज्येष्ठ सनदी लेखापाल सीए डॉ. एस. बी. झावरे, ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पठारे, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे खजिनदार सीए आनंद जाखोटीया, सीए यशवंत कासार आदींनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला.
गृहनिर्माण क्षेत्रातील समस्या, रोजगारसंधी आणि अर्थव्यवस्था यावर चर्चा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या स्थितीवर मात करण्यासाठी मार्गही आपल्याला शोधावे लागणार आहेत. केवळ व्यवसाय सुरू होणे, याला आपले प्राधान्य नको, तर आर्थिक गतिविधी पूर्ण ताकदीने सुरू होतील, याचा विचार करावा लागणार आहे. यासाठीचे नवे मार्ग आणि नियमावली आपल्याला तयार करावे लागतील. ई-लर्निंग, नवीन डिजिटल बाजारपेठ, घरातून काम करणे, नवीन व्यावसायिक परिस्थिती, नवीन गुंतवणूक संधी इत्यादी अनेक बाबी स्वीकाराव्या लागतील. नवीन जीवनपद्धती स्वीकारत कोरोनासोबत जगण्याची सवय आपल्याला करावी लागेल. स्थानिक पातळीवर आपल्याला उत्पादन आणि नवनिर्मिती करावी लागणार आहे. जेणेकरून आयात निर्बंधित होईल. बांधकाम क्षेत्रासह कृषी, पर्यटन, शिक्षण आदी क्षेत्रात आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागतील. सरकार, बँका आणि उद्योग यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच अर्थव्यवस्था बळकट होईल.”
राजेंद्र मिरगणे म्हणाले, “कृषीनंतर बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. मात्र आधी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊन यामुळे या क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. यातून बाहेर पडायचे असेल, तर आपल्याला अल्प उत्पन्न आणि आर्थिक मागास वर्गातील लोकांसाठी घरांची निर्मिती करणे गरजेचे आहे. करांमध्ये सवलती मिळाव्यात. प्रस्ताव लालफितीत अडकवून ठेवता कामा नयेत. जीएसटीतील सूट देण्यासह बांधकाम साहित्याचे दर निश्चित करावेत. सरकारकडून विकसकांना मिळणारा निधी लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे.”
सीए डॉ. एस. बी. झावरे म्हणाले, “लॉकडाऊनमुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र लवकर कार्यशील व्हावे.” सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविक केले. सीए समीर लड्डा यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. सीए काशीनाथ पठारे, सीए यशवंत कासार व सीए आनंद जाखोटीया यांनीही आपले विचार मांडले.
महापालिकेची मोटार सासवड ला करते काय ? वसंत मोरेंचा सवाल (व्हिडीओ)
पुणे-महापालिकेच्या क्षेत्रात जनतेच्या कामासाठी दिलेली महापालिकेची मोटार कायम सासवडला दिसते हि मोटार इथे कशाला येते ?या मोटारीचा इथे कशासाठी वापर होतो ? असे सवाल निर्माण करीत पालिकेच्या या मोटारीचा गैरवापर होत असून महापालिका आयुक्तांनी तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली आहे . आता महापालिका आयुक्त यावर नेमकी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागणार आहे . याबाबत नेमके वसंत मोरे यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ….
वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही – जिल्हाधिकारी राम
पुणे- जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. अशाच उपाययोजनांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील
38 मजुरांना दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी थांबविण्यात आले होते. या व्यक्तींची मौजे कोरेगाव भिमा येथे अल अमीन कॉलेजवरती राहण्याची, जेवण्याची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली होती. तसेच त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. राज्य शासनाने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची प्रक्रिया निश्चित करुन दिल्यानंतर वाशिम जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेवून त्यांना दिनांक 4 मे रोजी त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात आले आहे. या सर्व व्यक्तींना दिनांक 5 मे 2020 रोजी सुखरुप त्यांच्या घरी पोहचविण्यात आले. शिरूर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, शिरूरच्या तहसिलदार
लैला शेख यांनी पार पाडली.
साहेब तुम्ही घरी जाणाऱ्या मजुरांच्या रेल्वे तिकिटांचा खर्च सांगा ..आम्ही देऊ … रमेश बागवे
पुणे- पुण्यातून आपापल्या गावी ,घराकडे जाणाऱ्या माजुरांच्याबाब्त जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती लवकर पूर्ण करून त्यांना सुखरूप घरी जाऊ द्या ,त्यांच्या साठी रेल्वे तिकिटांचा खर्च आमचा पक्ष करणार आहे . सोनिया गांधी, बाळासाहेब थोरात यांनी कळविले तर आहेच पण राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या व शहर कॉंग्रेसच्या पुढाकारातून खर्चाची सारी प्रक्रिया आम्ही तातडीने पार पाडू तुम्ही फक्त मजुरांची नावे, पत्ते, रेल्वे तिकिटांचा तपशील द्या म्हणजे आम्हालाही खर्च जमा करायला बरे … अशा शब्दात शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना तातडीचे साकडे घातले .
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यावेळी बागवे यांच्या समवेत उपस्थित होते. बागवे म्हणाले हे सारे तळागाळतळे मजूर आहेत . सुमारे दीड महिना त्यांनी काम नसताना अंगावर काढला आहे. कधी मदत झाली कधी नाही झाली . अशा अवस्थेत आता घरी परतण्यासाठी त्यांच्याकडून रेल्वे तिकिटांचे पैसे तर घेऊ नयेत पण घेणारच असाल तर आम्ही ते देऊ अशी घोषणा सोनिया गांधी यांनी केली आहे. श्रीमंत लोकांना आपण परदेशातून विमानाने भारतात आणले . मजुरांना कशाला खर्चात पाडायचे? केंद्र सरकारने याबाबत काहीही आस्था दाखविली नाही म्हणून कॉंग्रेसने पुढाकार घेऊन हि तयारी केली आहे. या प्रक्रियेस प्रारंभ करायचा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे रेल्वे आणि जाणाऱ्या मजुरांच्या तिकिटाच्या खर्चाच्या तपशिलाची मागणी केली आहे
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पुणे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन मंगळवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चा आणि किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक कुंजीर यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली होती. जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंढवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
अखिल भारतीय मराठा महासंघातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती. पुणे जिल्हा सरचिटणीस पदी असताना त्यांनी अनेक आंदोलने मोर्चांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. यानंतर त्यांनी मराठा सेवा संघ आणि बामसेफ अशा संस्थांसोबत काम केले. मग काही दिवसांनी संभाजी ब्रिगेडची जबाबदारी पार पाडली. मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक झाली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील शेतकरी आंदोलनांमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परस्परविरोधी लोकांशीही त्यांनी समन्वय साधत यशस्वी आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील दारूची दुकाने उद्यापासून पुन्हा बंद; पालिका आयुक्तांचा दणका
मुंबई: मुंबईत दारूच्या दुकानांबाहेर झालेली गर्दी लक्षात घेऊन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आपल्या विशेषाधिकारात कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईत उद्यापासून दारूची दुकाने पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने सोडून मुंबईत इतर कोणतेही दुकान उघडण्यास मनाई राहिल, असे पालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत आहे. असे असताना मुंबईतील कंटेंटमेंट झोन वगळून इतर भागात केंद्र सरकारचे दिशानिर्देश व राज्य सरकारच्या सूचनांनुसार काही अटींवर दारूची दुकाने व इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी मिळताच मुंबईत प्रामुख्याने विविध वाइन शॉपबाहेर मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील विविध भागांत दारूच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींनी रांगा लावल्या. त्यात फिजिकल डिस्टन्सिंगचेही भान राखले गेले नाही. ही बाब गांभीर्याने घेत पालिका आयुक्तांनी कठोर पाऊल उचलले आहे.
बागवे आणि बागुल यांच्यात रस्सीखेच …?
पुणे- येत्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी दोन ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांमध्ये रस्सीखेच होत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल अशी त्यांची नावे आहेत . तर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्याही नावाचा विचारही पक्षाच्या पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे.
माजी राज्यमंत्री असलेल्या रमेश बागवे यांनीही पक्षाची धोरणे सामान्यां पर्यंत पोहोचविण्यास आणि त्यातून बांधणी करण्यावर कायम भर दिला आहे.रमेश बागवे यांनी पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला संजीवनी देण्याचे काम केले आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या सत्ता काळात कॉंग्रेस भवनला सदैव आक्रमकतेने कार्यरत ठेवणारा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप विरोधात त्यांनी जेवढा आंदोलनाचा धडाका लावला तेवढा आजपर्यंत कोणीही लावला नाही . माजी गृहराज्यमंत्री असताना त्यांनी आर आर पाटील यांच्या सोबत काम केले .त्यांच्याच काळात कसाब ला फाशी दिली गेली .दलित मातंग समाजाचे बलशाली नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. बागवे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मतदारसंघात अतिशय कमी मतांनी पराभव झाला. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून काही जन भाजपवासी झाले. त्यांनी कॉंग्रेस विरोधी प्रचार करून दगलबाजी केली .आणि अगदी मिळणारा विजय बागवे यांच्या हातून अत्यंत अल्प मतांनी निसटला . कॉंग्रेस मध्ये फार पूर्वीपासून फार जन आहेत . हे सारे निष्ठावंत देखील सद्य स्थितीत बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे यांना कॉंग्रेसच्या शहरातील बलस्थानांमध्ये वरचा क्रमांक देतात .
कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये ज्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो आणि ज्यांना सातत्याने आमदारकी हुलकावणी देण्यात आली असे आबा बागुल हे मागील 30 वर्षांपासून पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत.पुण्यातून ज्येष्ठ नागरिकांना काशीयात्रा घडविणारा आधुनिक श्रावण बाळ, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक आणि अभ्यासू भाषणे करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ गेल्या 25 वर्षांपासून आरक्षित होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही.अनेकदा त्यांची आमदारकीची संधी हुकली यावेळी राष्ट्रवादीला पर्वती मतदार संघ देण्यात आल्याने त्यांना रिंगणात उतरल्यावर माघार घ्यावी लागली .बागुल यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे कळविले आहे. त्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणेही झाले आहे असे सांगण्यात येवू लागले आहे. .येत्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे 5, तर भाजपचे 4 सदस्य विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २१ मे रोजी 9 जागांसाठी मतदान होणार आहे.
त्यासाठी ४ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लॉक डाऊन बाबत महापालिका क्षेत्रात सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना – विभागीय आयुक्त (व्हिडीओ)
पुणे- लॉक डाऊन बाबत शासनाच्या नियमांची अंमलबजावणी तंतोतंत केली जाईल ,महापालिका क्षेत्रात झोन ठरविणे नियमांची अंमलबजावणी करणे याबाबत सर्व अधिकार महापालिका आयुक्ताकडे असतील विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे यांनी Lockdown संदर्भात माहिती दिली नेमके ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात
आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान; राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.५: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ५२५ झाली आहे. आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २६,पुण्यातील ६,औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ९९४५ (३८७)
ठाणे: ८२ (२)
ठाणे मनपा: ४६६ (८)
नवी मुंबई मनपा: ४१५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)
उल्हासनगर मनपा: १२
भिवंडी निजामपूर मनपा: २० (२)
मीरा भाईंदर मनपा: १८२ (२)
पालघर: ३१ (१)
वसई विरार मनपा: १६१ (४)
रायगड: ५६ (१)
पनवेल मनपा: १०७ (२)
ठाणे मंडळ एकूण: ११,७०४ (४१६)
नाशिक: २१
नाशिक मनपा: २७
मालेगाव मनपा: ३६१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ४७ (११)
जळगाव मनपा: ११ (१)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ५७१ (३०)
पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८३६ (११२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ३ (१)
सोलापूर मनपा: १२७ (६)
सातारा: ७९ (२)
पुणे मंडळ एकूण: २२७१ (१२८)
कोल्हापूर: ९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)
सिंधुदुर्ग: ३ (१)
रत्नागिरी: १० (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ६२ (४)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३३७ (११)
जालना: ८
हिंगोली: ५५
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४०५ (१२)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ५६ (५)
अमरावती: २ (१)
अमरावती मनपा: ५९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २४१ (१७)
नागपूर: २
नागपूर मनपा: १७९ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८७ (२)
इतर राज्ये: ३० (५)
एकूण: १५ हजार ५२५ (६१७)
( टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १२०३१७८ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांचे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेटा क्लिनिंग झाले असल्यामुळे प्रगतीपर आकडेवारीमध्ये वाढ आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. आज राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्याने ८४१ रुग्णांची नोंद झाली असून इतर १४३ रुग्ण डेटा क्लिनिंग प्रक्रियेमुळे वाढले आहेत.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ९४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६२९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५०.८१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
आज ५ मे कोरोनाची पुण्यातील स्थिती -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर (व्हिडीओ)
* कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध विभाग युध्द पातळीवर कार्यरत
* लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी
* स्वगृही परतणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात पथके स्थापन
* केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार सर्व जिल्हयांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी
पुणे दि.5:- पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे विविध विभाग एकमेकांमध्ये समन्वय ठेवून युध्द पातळीवर काम करत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर न पडता, गर्दी टाळून सूचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते.
कोरोना रुग्णांची माहिती देतांना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात कोरोना बाधीत 2 हजार 388 रुग्ण असून 617 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 644 असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 93 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्हयात 2 हजार 122 कोरोना बाधीत रुग्ण असून 553 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 454 असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे, असे सांगून डॉ.म्हैसेकर म्हणाले, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर व वेळोवेळी हातांच्या स्वच्छतेवर सर्वांनी भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोविड-19 ची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी. कोविड-19 रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणाऱ्या रुग्णालयांसाठी पुरेसे पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती तयार करण्यात आली आहे. ससूनमध्ये प्रायेगिक तत्वावर प्लाझ्मा थेरपी साठी परवानगी मिळाली आहे. एका व्यक्तीचे रक्तसंकलन करण्यात आले असून लवकरच कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीव्दारे उपचार सुरु करण्यात येईल,असे डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.
आपल्या जिल्हयातून स्वगृही जाणाऱ्या तसेच पर जिल्हयातून आपल्या जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची सोय करण्याकरीता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. परराज्यात अथवा पर जिल्हयात जाण्यासाठी इच्छुकांना कोणत्याही डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. तथापी त्यांना ज्या भागात जायचे आहे, तेथील प्रशासनाची परवानगी आल्यानंतरच जाण्याची परवानगी दिली जाईल. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय झाल्यास त्यांच्यासाठी सोशल डिस्टंन्सिंगचा विचार करुन विशेष रेल्वेची व बसेसची सोय करण्यात येईल. पुणे विभागात देखील काही ठिकाणाहुन रेल्वे व बसेसव्दारे विद्यार्थी, कामगार व अडकलेल्या नागरिकांना पाठविण्याबाबत विचार सुरु आहे, असेही ते म्हणाले. खाजगी गाडीने पर जिल्हयात जावू इच्छिणाऱ्या ३ व्यक्तींनाच चारचाकी वाहनातून जाण्यासाठी परवानगी दिली जाईल.
लॉकडाऊनबाबत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार विभागातील सर्व जिल्हयांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त शहरातील कन्टेंन्मेंट झोनसाठी तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक विविध आदेशांची अंमलबजावणी करत आहेत. झोपडपट्टी भागात अपुऱ्या जागेमुळे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नसल्याने या भागातील रुग्ण्संख्या वाढत आहे. या ठिकाणी संस्थात्मक कॉरंन्टाईन होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरचे वाटप अशा उपाययोजना केल्या जात आहेत. कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे ये-जा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हयात लॉकडाऊनमध्ये करण्यात येणाऱ्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराबाहेर तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, वाईनशॉप सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न झाल्यास व दुकानाबाहेर गर्दी झाल्यास संबंधित दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले. वाढत्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 16 हजाराहुन अधिक बेडची तयारी करण्यात आली आहे. कोविड-19 सॅम्पल तपासणीचे प्रमाण वाढविण्यात येत असून दररोज सरासरी 850 च्या दरम्यान सॅम्पलची तपासणी करण्यात येत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून लवकरात लवकर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर राज्यातून व पर जिल्हयातून पुणे जिल्हयात येण्यासाठी इच्छुक विद्यार्थी व नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात येत आहे. याबरोबरच पर जिल्हयात जाणाऱ्यांचीही सोय करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.
मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी कन्टेंन्मेंट झोनमधील कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे,असे सांगितले. वेगवेगळया कारणास्तव आजारी असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाची लागण झाल्याचे ससून व रुबी रुग्णालयाच्या निदर्शनास आल्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी आतापर्यंत 1 हजार 219 विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली असून 1 हजार 700 प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस विभागामार्फत या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी कोरोना प्रतिबंधक कामातील पोलीस विभाग व महानगरपालिका विभागाचे कर्मचारी दिलीप लोंढे, उमाबाई पाटोळे व रंजनाबाई चव्हाण यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0000
संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार
१० हजार एसटी बसेसमार्फत पुढील चार दिवसात होणार सुरूवात – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
गडचिरोली : महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात 10 हजार बसेस द्वारे संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वजिल्हयात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबतचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचे काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचे काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गडचिरोली येथे कोरोनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.
राज्यातील मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक असतील या सर्वच लोकांना पुढील चार पाच दिवसात त्यांच्या स्वजिल्हयात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लक्ष घालून विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. मुख्यंमत्र्यांनी मदत व पुनवर्सन विभागाला कोणत्याही प्रकारे प्रवाशांना तिकीटांचा भुर्दंड पडणार नाही अशा उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. ही कोरोना लढाई जिंकण्यासाठी राज्यात प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्य करत असून आपण ही लढाई लवकरच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशासन व शासनाच्या चांगल्या योगदानामुळे राज्यात कोरोना मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. इतर देशांच्या तुलनेत राज्य शासन कोरोना बाधितांची संख्या रोखण्यातही यशस्वी झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन जनतेकडून झाल्याने आपण ही आकडेवारी कमी ठेवण्यात याशस्वी झालो. राज्य शासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करून तसेच आवश्यक उपाययोजना करून आपण ही कोरोना लढाई निश्चितच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यातून आपला देश, आपले राज्य व गाव वाचवू असे ते म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला घरी राहा सुरक्षित राहा असा संदेशही यावेळी दिला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी
-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.5: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19 ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 ची सॅम्पल तपासणीसाठी येत असतात. त्या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, इतर साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या शॅम्पल तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली.
यावेळी खासगी आणि शासकीय कोविड-19 ची सॅम्पल तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
००००
