Home Blog Page 2595

विधान परिषद -राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी दोन उमेदवार जाहीर

मुंबई. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली.

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्यातील शशिकांत शिंदे आणि अकोल्यातील अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुन दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यांनी ट्वीट केले की, ‘शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.’

 

राज्यातील कृषिपंपांसाठी नवीन वीजजोडणी धोरण लवकरच

0

मुंबई, दि.१० मे २०२० :

मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले कृषिपंपांसाठीचे नवीन वीजजोडणी धोरणास त्वरित अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिल्यात. व्हीडीओ कॉन्फ्रंसीगद्वारे आज घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी रक्कमेचा भरणा केलेला आहे तर सुमारे १.५० लाख शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणीसाठी रितसर अर्ज़ भरलेले आहेत. परंतु, धोरणाअभावी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असून विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी या विषयावर धोरण प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले होते.

या प्रस्तावित धोरणामध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या कृषिपंपाना लघुदाब वाहीनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषिपंपाना उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीवरून वीजजोडणी देण्यात येईल. याशिवाय ६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येईल. एकाचवेळी पारंपरिक व सौरऊर्जा या अपारंपारिक स्त्रोताद्वारे वीजजोडणी देण्याचे धोरण आखण्यात येईल. तसेच अशी नवीन जोडणी देतांना  कृषी ,पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग तसेच अन्य विभागांशी समन्वय करून हे धोरण सर्वंकष कसे होऊ शकेल, याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. तसेच याबाबत आवश्यकतेनुसार क्षेत्रीय स्तरावर संबंधित सर्व विभागांशी  समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सुचना  ऊर्जामंत्र्यांनी दिल्यात.

या व्हीडिओ कॉन्फ्रंसीगमध्ये  ऊर्जा राज्यमंत्री श्री.प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.असीमकुमार गुप्ता यांच्यासह महावितरणचे संचालक सहभागी झाले होते.

पुणे विभागातील 1023 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले-बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 242

पुणे दि.१० :- पुणेविभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 242  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 51 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण  168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 104 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 830  बाधीत रुग्ण असून  938  कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण  151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  96  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हयातील  119  कोरोना बाधीत रुग्ण असून  20  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  97 आहे. कोरोनाबाधित एकूण  2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील  238  कोरोना बाधीत रुग्ण असून  29  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  196 आहे. कोरोनाबाधित एकूण  13  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील  37 कोरोना बाधीत रुग्ण असून  27  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  9 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील  18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 32  हजार 498  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 689  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  27  हजार  508  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  3   हजार 242   चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील  90 लाख 80 हजार 526 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 92 लाख 20 हजार 147  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 167   व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

अडकलेल्या लोकांना घरी पाठवा :भाजप प्रदेशाध्यक्षांचे १०० नगरसेवकांना आदेश (व्हिडीओ)

 

पुणे-विद्यार्थी ,पर्यटक,काही कामानिमित्त पुण्यात आलेले लॉक किंवा मजूर असे जे कोणी कोरोनाच्या लॉक डाऊन मुले पुण्यात अडकून पडलेले नागरिक असतील त्यांना त्यांना शासकीय सर्व परवानग्या रीतसर घेऊन विनामुल्य सर्व सुविधा देऊन आपापल्या घरी पाठवा असे आदेश आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे शहरातील भाजपच्या सर्व १०० नगरसेवकांना दिले . आज सर्व प्रथम भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या प्रभागात अडकलेल्या सांगली सात कोल्हापूर कडील   विद्यार्थी व तरुण कामगारांसाठी घरी जाण्यासाठी स्वारगेट येथून २ लक्झरी बस सोडल्या . यावेळी आमदार पाटील माध्यमांशी बोलत होते. श्रीनाथ भिमाले,तसेच महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,राजेश पांडे ,डॉ. श्रीपाद ढेकणे ,सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर ,पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी ,सतीश काळे,गणेश शेरला आदींच्या उपस्थितीत या बसेस सोडून विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी आमचे प्रतिनिधी मयूर आणि अभिषेक लोणकर यांनी केलेला हा व्हिडीओ रिपोर्ट .

राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या पुढाकाराने लखनऊला धावली श्रमिक रेल्वे..

पुणे –
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने आज पुणे रेल्वे स्टेशनहून लखनऊ येथे श्रमिक रेल्वे रवाना करण्यात आली. सुमारे बाराशे प्रवाशांनी या रेल्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला प्रयाण केले.

लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी श्रमिक रेल्वे या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा सर्व खर्च उचलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीय नागरिकांसाठीच्या रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले. राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी त्यासाठीचा समन्वय केला व आर्थिक बाजू सांभाळली. त्यामुळेच आज तिकीटासाठी एकही रुपया न देता या बाराशे मजुरांसाठी आपल्या या गावी परतण्याचा मार्ग खुला झाला.
शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशनहुन लखनऊला ही विशेष श्रमिक रेल्वे निघाली. आपल्या गावी परतणे शक्य झाल्याचा आनंद या प्रवाशांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजूर, विद्यार्थी व नागरिकांसाठी निवारा केंद्रांची चोख व्यवस्था केली आहे. दोन वेळचा नाश्ता, भोजन यासह त्यांच्या आरोग्याचीदेखील देखभाल केली जात आहे. लाखो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. मात्र, तरीही कोणाला आपल्या गावी जायचे असल्यास त्यासाठीदेखील सर्वतोपरीने सहकार्य केले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि गोरगरीब नागरिकांना कायमच मदत करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणांच्या जोरावर आपण कार्यरत आहोत –
डॉ. विश्वजीत पतंगराव कदम,
राज्यमंत्री महाविकास आघाडी सरकार,
महाराष्ट्र राज्य

आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान- राज्यात कोरोनाचे एकूण २० हजार २२८ रुग्ण

0

मुंबई, दि.९: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३८०० रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. आज झालेल्या ४८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये (७२ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १२,८६४ (४८९)

ठाणे: ११० (२)

ठाणे मनपा: ८०० (८)

नवी मुंबई मनपा: ७८९ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३१६ (३)

उल्हासनगर मनपा: २०

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: २०१ (२)

पालघर: ३२ (२)

वसई विरार मनपा: २१६ (९)

रायगड: ८९ (१)

पनवेल मनपा: १३७ (२)

ठाणे मंडळ एकूण: १५,५९५ (५२४)

नाशिक: ५०

नाशिक मनपा: ७३

मालेगाव मनपा:  ४७२ (२०)

अहमदनगर: ५१ (२)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: ४२ (१)

जळगाव: १११ (१२)

जळगाव मनपा: २२ (२)

नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ८५७ (४०)

पुणे: ११८ (५)

पुणे मनपा: १९३७५(१४१)

पिंपरी चिंचवड मनपा: १३२ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: १८४ (१०)

सातारा: ९८ (२)

पुणे मंडळ एकूण: २५१३ (१६१)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)

सिंधुदुर्ग: ५

रत्नागिरी: १८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ७७ (३)

औरंगाबाद:५

औरंगाबाद मनपा: ४३७ (१२)

जालना: १२

हिंगोली: ५८

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ५१४ (१३)

लातूर: २५ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: ३० (३)

लातूर मंडळ एकूण: ६२ (४)

अकोला: ९ (१)

अकोला मनपा: १३४ (१०)

अमरावती: ४ (१)

अमरावती मनपा: ७८ (११)

यवतमाळ: ९५

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ३४५ (२४)

नागपूर: २

नागपूर मनपा: २२२ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २३० (२)

इतर राज्ये: ३५ (८)

एकूण:  २० हजार २२८ (७७९)

(टीप – आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १७८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. आज पालघर जिल्ह्यातील बाधित रुग्णांना त्यांच्या मूळ पत्त्यानुसार वसई विरार आणि मीरा भाईंदर मनपामध्ये दर्शविण्यात आले आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १५३०५७६ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२४३ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ३८८ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५५  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

 

नियमाची अंमलबजावणी करुन जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा

0

हिंगोली : कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत राज्यात सातत्याने वाढ होत आहे. परंतू जिल्हा  प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रमाण सद्यस्थितीत नियंत्रणात आहे. पंरतू आपला जिल्हा लवकरात-लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करा, असे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांची तात्काळ चाचणी करावी. सर्वेक्षण करताना माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांवर गरज पडल्यास योग्य ती कारवाई करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील यासाठी नियोजन करावे. कोरोना बाधितांबरोबरच इतर रोगाने आजारी असणाऱ्या नागरिकांवर योग्य उपचार करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉक्टर रुग्णालयात येतात का? याची माहिती घेऊन त्या म्हणाल्या, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, विविध विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करीत असून त्यांनी आपली काळजी घ्यायला हवी. सर्वेक्षण करणारे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट, मास्क आदी साहित्य देण्यात यावे, असे त्यांनी यावेळी  सांगितले.

जिल्ह्यात विद्युत पुरवठ्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती विषयक कामात अडचण येत असून, अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. महावितरणने याकरिता अखंडीत वीज पुरवठा सुरु राहील याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाचा तात्काळ लाभ द्यावा. तसेच महावितरणने त्यांची प्रलंबित असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.

केशरी कार्ड धारकांना धान्य वाटप सुरू करा. त्याचबरोबर  अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल शेतकरी योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदय आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर नियतन्वाये अन्न-धान्यांचे वितरण करा. कोणीही अन्न-धान्यापासून वंचित राहता कामा नये अशा त्यांनी यावेळी सूचना दिल्या. मात्र धान्य वितरण करताना दुकानात सामाजिक अंतर राखले जाईल याची ही काळजी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य पोहचविण्याचा प्रयत्न करण्याचे ही त्यांनी यावेळी निर्देश दिले.

खरीप हंगामात खत व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अनेक मजूर जिल्ह्यात परतले आहेत.  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मजूरांना कामे उपलब्ध करुन द्यावीत. परंतू कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता वैयक्तिक स्वरुपाची कामे उपलब्ध करुन देण्याच्या त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

मे महिना सुरु झाला असुन, जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार पाणी टंचाई कृती आराखडा तयार करावा. तसेच ज्या गावातून मागणी येईल त्यांना तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी विंधन विहिरीचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा करण्यात यावा.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरून जाता कामा नये. राज्यावर अथवा देशावर ज्यावेळेस कुठलेही संकट येते, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीने त्या संकटाचा सामना करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता, दक्षता घेवून सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी.

या संकटाच्या कालावधीत प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कार्य करत आहेत त्यांचे यावेळी पालकमंत्री प्रा.गायकवाड यांनी आभार मानले. तसेच प्रशासन अतिशय जागरुकपणे सर्व परिस्थिती हाताळत असुन नागरिकांनी त्यांना सहकार्य करुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी केवळ सुरक्षित अंतर व दक्षता यामुळेच हे शक्य होणार आहे. कोरोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत असून, विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या.

यावेळी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोना, पाणी टंचाई, मनरेगा, शासकीय धान्यवाटप योजना, महावितरण याबाबतचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाच्या विभागप्रमुखांची उपस्थिती होती.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

0

मुंबई, दि.९ – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील  विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक, यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने  काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही,अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

या प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे (त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त – DCP) अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर म्हणून  जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे. तसेच अशा अनुमती प्राप्त नागरिकांचे २२ जणांचे गट करून संबंधित नोडल ऑफिसरमार्फत प्रवास करणाऱ्यांची यादी एसटीच्या जिल्हा स्तरावरील विभाग नियंत्रकाकडे दिली जाईल. त्यानुसार सदर नागरिकांना महामंडळामार्फत एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील आणि नोडल ऑफिसरमार्फत अनुमती प्राप्त नागरिकांना एसटी बसेसने त्यांच्या जिल्हा/तालुक्याच्या ठिकाणी सुखरूप पोहचविले जाईल.

ज्या नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर प्रवास करावयाचा आहे त्यांनी नोडल ऑफिसरकडून ऑनलाईन अर्ज करून अनुमतीपत्र प्राप्त करून घ्यावे. सदर पत्र प्राप्त झालेल्यांसाठी सोमवारपासून  एसटीचे नवीन पोर्टल सुरू होत आहे. त्यांनी तेथे आपल्या प्रवासाची नोंद करावी.त्यांच्या प्रवास ठिकाणानुसार त्यांचे २२-२२चे गट करून त्यांना एसटी बसेसची व्यवस्था करून देण्यात येईल.

या प्रवासासाठी दिलेल्या बसेस सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. संपूर्ण प्रवासात सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे गाडी मध्यंतरी कुठेही थांबणार नसल्यामुळे प्रवाशांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे.असेही  श्री.परब यांनी संगितले.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात बसेस सज्ज ठेवाव्यात असे आदेश देऊन,प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये,सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि महामंडळाला सहकार्य करावे,असेही आवाहन श्री.परब यांनी केले आहे.

नफेखोरी करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा

0

मुंबई दि. ९ : राज्य शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असताना काही रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहेत.

श्री. शेख यांनी पत्रात लिहिलय, लोकहिताचा विचार करुन शासनाने ३० एप्रिल २०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असताना काही रुग्णालये शासनाच्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करत त्याला केराची टोपली दाखवत आहेत. दिवसेंदिवस अशा स्वरुपाच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नफेखोरी करणाऱ्या या रुग्णालयांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

खाजगी रुग्णालयांकडून बिलासाठी मृत रुग्णांचे पार्थिव अडविण्यात येऊ नये, रुग्णालयाचे दर वेबसाईटवर व रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावेत, रुग्ण हक्क व जबाबदाऱ्यांची सनद दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी व खाजगी रुग्णालयांना  राज्य शासनाने विहित केलेल्या दरांचे पालन करण्याची हमी देण्याबाबत रुग्णालयांना सूचित करण्यात यावे, असे निर्देश श्री. शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन

0

– विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे,दि.९ : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून आणखी रुग्ण वाढणार नाहीत,यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्यासाठीप् प्रयत्न करावे,अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केल्या.
विभागी आयुक्त आज सातारा जिल्हा दौऱ्यावर होते.कराड येथील विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन काय उपायोजना करीत आहे, त्याचा सविस्तर आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
प्रतिबंधित क्षेत्र सोडून जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनमध्ये सुट देत आहेत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाजारपेठेंबाबत निर्णय घेतील. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून युद्ध पातळीवर काम करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी द्यावी.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपल्याबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ, लहान मुलांची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये.
कोरोना बाधित रुग्णांवर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येतात. या मेडिकल कॉलेजला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार व सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली.
कटेंनमेंट झोन असणाऱ्या मलकापूर येथील अहिल्यानगर व सातारा येथील सदरबझार या भागाला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

महाराष्ट्र शासनाने स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

पुणे-महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच, शहरी भागातून आपल्या गावी बसेसने जाणाऱ्यांकडून दुप्पट भाडे आकारण्याचा शासन आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी सूचना ही त्यांनी केली.

श्री. पाटील म्हणाले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्र्वभूमीवर रोजगारासाठी परराज्यातून येऊन महाराष्ट्राच्या विविध भागात वसलेले मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यापैकी काहीजण जीवावर उदार होऊन पायी निघाले आहेत. औरंगाबादमध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेत अशाप्रकारे पायी जाणार्या मजुरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा सर्व स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी. केंद्र सरकार सर्व प्रवाशांचा ८५ टक्के खर्च उचलत आहे. केवळ १५ टक्के भार हा राज्य सरकारला करायचा आहे. महाराष्ट्रातील मजुरांचे स्थलांतराचे प्रमाण पाहता राज्य सरकारने हा भार उचलून केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी, आणि या सर्व प्रवाशांचा आपापल्या गावी परतण्याचा मार्ग सुकर करावा.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार गावी परतणार्या नागरिकांसाठी बसेसची व्यवस्था करत आहे.‌ मात्र, या बसेस रिकाम्या परतत असल्याने प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.‌ हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही श्री पाटील यांनी यावेळी केली.

दरम्यान, पुण्यात अडकलेल्या १३४ जणांसाठी श्री. पाटील यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विशेष बसची व्यवस्था करुन दिली होती. या बसेस मधून हे सर्वजण गुरुवारी रात्री तेलंगणातील आपल्या गावी रवाना झाले.

पालघर साधूंच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत करावा- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

0

गडचिंचले गावातील घटनास्थळाला दिली भेट
मुंबई दि. ९ मे- पालघरमधील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या सामुदायिक हत्याकांडाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा, तसेच या प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक पध्दतीने करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. तसेच २५ दिवस उलटूनही या प्रकरणातील प्रमुख हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या राजकीय नेत्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची जोरदार टीका प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पालघरमध्ये साधू व त्यांच्या चालकाची निघृणपणे हत्या झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज गडचिंचले गावात घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार मनिषा चौधरी,आमदार सुनिल राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदु पाटील, माजी आमदार पास्कल धनारे उपस्थित होते. घटनास्थळी असेलेले पोलिस उप अधिक्षक सोनावणे यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली, त्यानंतर पालघरचे पोलिस अधिक्षक देशमुख यांची भेट घेऊन त्यांना या प्रकणासंदर्भात निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सांगितले की, ही दुर्दैवी घटनेनंतर आपण तातडीने घटनास्थळी जात होतो, परंतु पोलिस व प्रशासनाने चेक नाक्यावर आम्हाला अडवून तेथे जाण्यापासून रोखले. दोन साधू व चालकाच्या सामुदायिक हत्याकांडाची घटना ही महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी आहे अशी टीकेची झोड त्यांनी उठविली.
या हत्येचा तपास ज्या गतीने होऊन या हत्येमागे कोण सूत्रधार होता त्याची माहिती जनेतसमोर येणे गरजेचे आहे. कारण ज्या पध्दतीने समुदयाने एकत्रित येऊन साधूंना ठेचून मारणे हे महाराष्ट्राला भूषावह नाही. म्हणून या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आपण त्याचवेळी केली होती. कारण चौकशी करणारे पोलिस व येथे आक्षेप असणारे पोलिस हे एकच असल्यामुळे हा तपास निपक्षरित्या होऊ शकत नाही म्हणूनच आपण सीबीआय तपासाची मागणी केल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी पोलिस अधिक्षक देशमुख यांना निवेदन देण्यात आले असून २५ दिवस उलटूनही या घटनेतील काही प्रश्न अनुत्तरित आल्याचे दरेकर यांनी येथे निर्दशनास आणून दिले.
दरेकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यानुसार जमावाने केलेला हल्ला हा चिथावणीमधून झाला होता व विशिष्ट विचारसरणींच्या माथेफिरूंनी हा कट रचला होता, अशी चर्चा असताना सरकारकडून या प्रकरणाच्या तपासात आतापर्यत प्रगती दिसत नाही. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच २५ दिवस उलटूनही हल्ल्यामागील सूत्रधार कोण आहेत हे शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, जमावाने प्रथम पोलिसांना मारहाण केली, मग ही बाब तातडीने पोलिसांनी जिल्हा मुख्यालयाला का कळविण्यात आली नाही, याचेही कारण आम्हाला हवे आहे. त्याचप्रमाणे पालघर पासून गडचिंचले हे ठिकाण एका तासाच्या अंतरावर असताना पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी ५ तास वेळ का लागले. असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत, त्यामुळे या सर्व प्रश्नांची जलदगतीने चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक पध्दतीने चालवावे अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
साधू व चालक यांच्या सामुदायिक हत्येमागे पोलिस व स्थानिक प्रशासन यामधील जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतानाच घटना घडल्यानंतर गृहमंत्र्यांनी तात्काळ या ठिकाणी येणे गरजेचे होते पण खूपच उशिरा घटनास्थळी येऊन त्यांनी काय साधले हे माहित नसल्याचा टोलाही दरेकर यांनी मारला.

पुणे विभागात 26 हजार 509 स्थलांतरित मजुरांची सोय 97 हजार 767 मजुरांना भोजन -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

 

पुणे, दि.9 : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 143 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 80 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 291 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 26 हजार 509 स्थलांतरित मजूर असून 97 हजार 767 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात 8 मे 2020 रोजी 99.88 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.38 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात कोरोना बाधित 3 हजार 23 रुग्ण

पुणे विभागातील 912 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 9:-पुणे विभागातील 912 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 23 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 948 आहेत. विभागात कोरोना बाधीत एकुण 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 92 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 3 हजार 23 बाधित रुग्ण असून 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 657 बाधीत रुग्ण असून 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 827 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 684 आहे. तर 85 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 115 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 20 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 93 आहे.
सोलापूर जिल्हयात 196 बाधीत रुग्ण असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 154 आहे.
सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 27 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे.
कोल्हापूर जिल्हयात 18 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 9 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.
आजपर्यत विभागात एकुण 30 हजार 618 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 29 हजार 610 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 374 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 26 हजार 244 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 3 हजार 23 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागात 88 लाख 49 हजार 655 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 81 लाख 47 हजार 952 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 159 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्वाब टेस्टिंगकरिता “108-रुग्णवाहिकेचे जलद नियोजन –शेखर गायकवाड

पुणे-

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक उपाययोजनेतर्गत प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांचे घशातील स्त्राव ( स्वाब ) घेण्यासाठी व या स्वबचे तातडीने तपासणी करणेकरिता जलदरीत्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा NIV, येथे पाठविणे,व तपासणी अहवाल जलद मागवून अहवालाच्या निर्देशानुसार तातडीने पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने शहरातील ५, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्वाब तपासणी व पुढील कार्यवाही करिता “108” रुग्णवाहिका सेवा जागेवरच उपलब्ध करून देण्यात आलेल्या असल्याचे मा,महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे,
शहरातील ५,प्रतिबंधात्मक क्षेत्रात अर्थात येरवडा,भवानी पेठ,शिवाजीनगर-घोले रस्ता,कसबा- विश्रामबागवाडा, व ढोलेपाटी ल रस्ता या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्येकी एक “108, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,
स्वाब तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अहवालामध्ये निर्देशित केल्यानुसार पुढील उपचारार्थ व्यक्तीस घेऊन जाणे,अशा जलद नियोजनाकरिता स्वाब केंद्राजवळच हि सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक नियोजनाकरिता एखाद्या भागात, प्रतिबांत्मक क्षेत्राबाहेर ही एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्या भागासहि त्वरित प्रतिबंधित करण्यात येईल, व सदरचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येईल,असे जाहीर करणे अर्थात नागरिकांच्या दृष्टीने व विषाणू प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या दृष्टीने नियोजनाचा भाग राहील,त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,तसेच चुकीची माहिती व अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नये,असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी कळविले आहे,
स्वाब घेण्याच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजनात वाढ करण्यात आलेली असून दैनंदिन सुमारे एक हजारापेक्षा अधिक संख्येने जास्तीत जास्त जलद व नियोजनबद्ध स्वाब घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे
मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी कळविले आहे.