भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल. शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय कर्मचारी, रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यावसायिक, लघू उद्योजक अशा सर्वांच्या सहभागाने देश आर्थिक महाशक्ती होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाम निर्धाराने कोरोनाच्या संकटकाळात देशाचे नेतृत्व करत असून त्यांना जनतेची साथ मिळालेली आहे. तशाच ठाम आत्मविश्वासाने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदीजींनी सोमवारी निर्णय जाहीर केला. देशाच्या सकल उत्पन्नाच्या दहा टक्के इतके ऐतिहासिक मोठे पॅकेज त्यांनी जाहीर केले आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळेल, विशेषतः कोरोनामुळे झळ पोहचलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना आधार मिळेल याची काळजी त्यांनी घेतली आहे. कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होऊन निराशा निर्माण झाली असताना मोदीजींच्या मंगळवारच्या संदेशामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांच्या मनात आशा निर्माण करणाऱ्या मोदीजींच्या घोषणेचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते.
ते म्हणाले की, भारताकडे अफाट मनुष्यबळ, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि फार मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या क्षमतेचा पूर्ण वापर होण्याची आणि भारत आत्मनिर्भर होण्याची दिशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे स्पष्ट झाली आहे. मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत स्वयंपूर्ण होईल आणि प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात चांगला बदल घडेल याची आपल्याला खात्री वाटते.
१७ तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सूचना कराव्यात
पावसाळ्यातील रोगांच्या दृष्टीनेही आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे
मुंबई दि १२: राज्यात लॉकडाऊनची स्थिती १७ तारखेनंतर कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील हे पाहावे असेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले
मुख्यमंत्री म्हणाले, पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत. आता मोठ्या प्रमाणावर मजुरांची ये जाणे सुरु झाली आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्या साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्स मध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सूचना त्यांनी केली.
राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे मात्र आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत मग एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याच्या रिक्त जागाही भराव्या लागतील.
गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करून काही लक्षणे आहेत का ते तपासले . आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करून संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत त्याचा आढावा घ्यावा, एकीकडे उद्योग सरू होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पाहा व स्थानिकांमधून उपलब्ध करून द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई, दि.१२: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १४,९२४ (५५६)
ठाणे: १४० (३)
ठाणे मनपा: १००४ (११)
नवी मुंबई मनपा: ९५५ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)
उल्हासनगर मनपा: ५३
भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)
पालघर: ३८ (२)
वसई विरार मनपा: २६३ (१०)
रायगड: १२९ (२)
पनवेल मनपा: १४६ (८)
ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)
नाशिक: ८२
नाशिक मनपा: ४३
मालेगाव मनपा: ६१६ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: १०
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ५४ (३)
जळगाव: १५२ (१५)
जळगाव मनपा: ४० (९)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)
पुणे: १६७ (५)
पुणे मनपा: २६२१ (१५५)
पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: ३०८ (१९)
सातारा: १२३ (२)
पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)
कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३४
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ५५ (२)
कोल्हापूर मंडळ एकूण: ११८ (४)
औरंगाबाद:९४
औरंगाबाद मनपा: ५५९ (१५)
जालना: १६
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७३२ (१६)
लातूर: २६ (१)
लातूर मनपा: ५
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ४२ (४)
लातूर मंडळ एकूण: ८२ (५)
अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १५१ (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८४ (११)
यवतमाळ: ९८
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: ३८३ (२६)
नागपूर: २
नागपूर मनपा: २६६ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २७५ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २४ हजार ४२७ (९२१)
(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून आय सी एम आर पोर्टलनुसार अहवाल देण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा अहवाल दिनांक ११ मे २०२० दुपारी २.०० ते मध्यरात्री ११.५९ पर्यंतचा आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज लॉकडाउन ४ ची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांनी याचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतील जे तुम्हाला १८ मे पूर्वी कळवण्यात येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. आज देशाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला त्यावेळी लॉकडाउन ४ ची त्यांनी घोषणा केली. मात्र याचे नियम या लॉकडाउनचं स्वरुप हे वेगळं असेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. आज करोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. तसंच आत्मनिर्भर भारत हा नाराही दिला.राज्यांनी लॉकडाउन संदर्भात काही सूचना केल्या आहेत. काही मतं मांडली आहेत. त्यानुसार लॉकडाउनचं स्वरुप असेल. ते नेमकं काय आणि कसं असेल ते १८ मेपूर्वी स्पष्ट करण्यात येईल असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन ४ होणार हे नक्की मात्र तो किती कालावधी असेल नवे नियम काय असतील ते समजण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.
२० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज
भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीय. अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठा हे चक्र पूर्ण क्षमतेनं वापरलं जाण्याची गरज आहे. मागणी वाढवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण सक्षम असायला हवा. विशेष आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारत अभियानासाठी महत्त्वाचं ठरेल. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. हे पॅकेज स्वावलंबी भारताला एक नवी गती देणार, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
या आर्थिक पॅकेजशी निगडीत संपूर्ण माहिती अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येणाऱ्या काही दिवसांत देतील, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय.
‘करोना महामारी सुरू होऊन आता चार महिने उलटलेत. ४२ लाखांहून अधिक लोक करोनाबाधित आहे. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेक कुटुंबांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. मी या सर्वांप्रती आपली संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसनं जगाला उद्ध्वस्त केलंय. जगभरात करोडो लोक संकाटाचा सामना करत आहेत. आम्ही असं संकट ना पाहिलंय ना ऐकलंय… निश्चितपणे मानवजातीसाठी हे सगळं अकल्पनीय आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. थकवा, हरणं, तुटणं मानवाला मंजूर नाही. सतर्क राहताना नियमांचं पालन करत यापासून संरक्षण करून पुढे वाटचाल करायची आहे. जग संकटात असताना आपला संकल्प आणखीन मजबूत करायला हवा. संकटापेक्षाही आपला संकल्प विराट हवा’, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली.२१ वं शतक भारताचं आहे, असं मागच्या शतकापासून आपणं ऐकत आलोय. करोना संकटानंतरही जगात निर्माण होणारी स्थिती आपण न्याहाळत आहोत. भारताच्या नजरेतून पाहिलं तर २१ वं शतक भारताचं असावं हे आपलं स्वप्नच नाही तर ही आपली जबाबदारीही असावी. जागतिक स्थिती आपल्याला एकच मार्ग दाखवतेय… स्वावलंबी भारत… असं म्हणत त्यांनी स्वावलंबी भारताची ही भव्य इमारत पाच स्तंभांवर आधारीत असेल असं सांगितलं.
नाशिक, : लॉकडाऊनमध्ये अडकलेले आणि आर्थिक टंचाईने ग्रासलेले हजारो जीव आता मुंबई, ठाण्यात राहण्यापेक्षा आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. घरात होतं नव्हतं तेव्हढं सोबत घेवून मिळेल त्या वाहनाने किंवा पायीच निघालेल्या वाटसरूंना आयुष्याच्या या अनवट वाटेवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून उभ्या असलेल्या सेवाभाव संस्थांच्या माणुसकीने धीर दिला आहे. जवळपास १०० हून अधिक सेवाभावी संस्था ची मोट बांधून त्यांच्यासाठी दोन घासांची सोय केली, त्यांच्यासोबतच्या इवल्याशा जीवांसाठी पाणी, दूध, फुड्स पॅकेट्स पुरवून ‘होय, अजूनही माणुसकी जीवंत आहे’ असा संदेशच दिला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांचा मोठा जथ्थाच उतरला आहे. शेकडो किलोमीटर अंतर कापून रणरणत्या उन्हाने पोळून निघालेल्या या कामगार, मजुरांसह, लहानमुलांसाठी नाशिक जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वयंसेवी संस्थांचे आभार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिकमधून जाणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांना अन्नधान्य आणि जेवण पुरविवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. त्या निरपेक्ष पद्धतीने आपले काम करीत असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच जिल्हा प्रशासन आज लाखो लोकांना अन्नदान करू शकले असल्याची माहिती देत असतांनाच या सर्व स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले.
चांदवड येथील गुरुद्वाराने ३० हजार लोकांना अन्नदान केले. मनमाड येथील गुरुद्वाराने १८ हजार लोकांना, विल्होळी येथील गुरुद्वाराने दिवसाला ३ हजार लोकांना असे पाच दिवस अन्नदान केले आहे. तर नाशिक रोड येथील गुरुद्वाराने लॉकडाऊन काळात २२ हजार ५०० लोकांना अन्नदान केले असल्याची माहिती श्री. मांढरे यांनी दिली आहे.
वाटसरूनी व्यक्त केले समाधान : उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे
माणुसकीची वागणूक तसेच वेळीवेळी केलेली जेवणाची सोय तसेच गावाकडे जाण्यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था त्यामुळे वाटसरूनी जिल्हा प्रशासनाचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व स्वंयसेवी संस्थांप्रति आभार व्यक्त केले आहे. अशा दानशूर स्वंयसेवी संस्थांचा आदर्श घेवून येणाऱ्या काळासाठी इतरही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी केले आहे.
एकाचं दिवशी हजारोंची भागविली भूक
विविध स्वयंसेवी संस्थानी नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी आपल्या गावी जाणाऱ्या परप्रांतीयांना वाटेत १० मे रोजी या एकाच दिवशी एकूण ३२ हजार लोकांना अन्नदान केले आहे. यात सकल जैन संघटना यांच्यामार्फत जुना नाशिक, सिडको, सातपूर, अंबड व पाथर्डी, द्वारका ते नाशिकरोड, आग्रा हायवे, विल्होळी मंदिर तसेच सिव्हील हॉस्पिटल, आर. के. स्थानक येथील लोकांना अन्नदान केले आहे. सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्र मंडळ यांचेमार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथे अन्नदान सुरू आहे. श्री गुरुद्वारा गुरुनानक दरबार शिंगाडा तलाव यांचेमार्फत शिंगाडा तलाव येथील लोकांना, श्री गुरुव्दारा देवळाली व रॉबीन हुड आर्मी यांचेमार्फत, अमिगो लॉजेस्टीकस इंडिया व दिनीयत संस्था यांचेमार्फत बेलतगव्हाण, व्हिलरेज, बिटको, उपनगर कॅनाल रोड, गोरेवाडी, जेलरोड, बागुल नगर झोपडपट्टी येथील लोकांना, वुई फाउंडेशन यांचे मार्फत सिव्हील हॉस्पीटल नाशिक येथील लोकांना, श्री. अनिकेत उपासनी यांचेमार्फत रंगरेज कॉलनी, वडाळा येथे अन्नदान करण्यात आले आहे.
श्री गुरुद्वारा नाशिकरोड यांचेमार्फत मातोश्री आश्रम, रेल्वे कामगार येथील लोकांना अन्नदान करण्यात येते आहे. गुरुव्दारा नाशिकरोड व रॉबीन हुड आर्मी, श्री गुरुव्दारा हिरावाडी यांचे मार्फत हिरावाडी येथे, श्री गुरुव्दारा पंचवटी व रॉबीन हुड आर्मी यांचेमार्फत पंचवटी येथे, श्री गुरुव्दारा इगतपुरी यांचे मार्फत, श्रीजी प्रसाद व झेप व नयनतारा ग्रृप, गुरमित बग्गा यांचेमार्फत गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, मखमलाबाद नाका शाळा, म्हाडा कॉलनी पाथर्डी फाटा, पंचवटी परिसर येथे अन्नदान करण्यात आले आहे. तसेच तपोवन मित्र मंडळ, सुजाण नागरिक मंच, तुलसी आय हॉस्पिटल, संदीप फाऊंडेशन, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पांजरापोळ, गोली वडापाव, माऊली द फुड, नाशिक ऑप्टीकल फ्रेण्डस, रुहानी मिशन देवळाली,श्वास फाँऊडेशन, इस्कॉन, विवेकानंद केंद्र, सिद्धांत युवा फाऊडेशन, ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संघटना व इतर दानशून व्यक्तींना अन्नदानाचे पवित्र कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
मुंबई दि. 12 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात ( तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत ) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळीचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे
चार मेपासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु . २ प्रति किलो दराने गहू व रु . ३ प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत ५१ % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे .
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९००० / – पेक्षा जास्त व रूपये १ लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना गहू रू . ८ / – प्रति किलो व तांदूळ रू . १२ / – प्रति किलो या दराने प्रति माह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचे मे महिन्याचे वितरण दिनांक २४ एप्रिलपासून सुरू करण्यात आले असून सदर अन्नधान्याचे वितरण मे महिन्यातही सुरु राहील . आतापर्यंत तांदूळ २४९४ मेट्रिक टन आणि गहू ३४४३ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे २० % शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे .
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या
http : //mahaepos.gov.in या वेबसाइट वरील Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी . याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल क्रमांक dycor.ho.mum @ gov.in यावर तक्रार नोंदवावी . जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल .
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) शिधापत्रिकाधारकांनी स्वत : हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन प्राप्त करुन घ्यावे .
राष्ट्रीयअन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) तसेच एपीएल ( केशरी ) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत . अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप दुकाना समोर गर्दी करु नये , असे आवाहन कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी केले आहे
मुंबई दि.१२- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या ४५ ठिकाणी असलेल्या ६० कारागृहातील ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ऑर्थर रोड कारागृहातील १५८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशा प्रकारची बाधा इतर कैद्यांना होऊ नये, याकरिता राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
यापूर्वी सात वर्षांपेक्षा कमी सजा असलेल्या गुन्ह्यातील ५१०५ न्यायाधीन बंदी यांना तात्पुरत्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.तसेच ३०१७ शिक्षाधीन बंद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आता सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील न्यायाधीन ९५२० बंद्यांना तात्पुरते जामिनावर सोडण्यात येणार आहे. असे एकूण १७ हजार ६४२ कैदी कारागृहातून मुक्त होणार आहेत.
यामध्ये मोका (MCOC ) टाडा (TADA,) POTA, UAPA, PMLA, NDPS, MPID, Explosive substance Act, Anti hijacking Act,
POCSO, Foreigners in prison,Bank fraud,Major Financial scam आदींअंतर्गत गुन्ह्यातील बंद्यांना सोडण्यात येणार नाही. असेही श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
आठ कारागृहे लॉकडाऊन
राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद,नागपूर नाशिक मध्यवर्ती कारागृहे ही आठ कारागृहे लॉकडाऊन केलेली आहेत.
त्याठिकाणी कोणीही नवीन कैदी जाणार नाही अथवा आत असलेला बाहेर येणार नाही. पोलीस कर्मचारी देखील जे आत आहेत ते आतच असतील अशी व्यवस्था करण्यात आली. अशी माहिती श्री देशमुख यांनी दिली.
कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास बंद्यांना ठेवण्यासाठी तात्पुरते कारागृह घोषित करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
मुंबई, दि. १२: राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली असून आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा देण्याचं काम होत आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
काल सोमवारी ठाणे येथील २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील १६१ मुंबईतल ५५, रायगड येथील ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज त्यात बरे होणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.
डॉक्टरांच्या उपचाराला आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा परिचारिका ठरत असून रुग्णाची शुश्रुषा करुन त्याला बरं करण्यासाठी त्या परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या लढ्यात रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र झटणाऱ्या, हिमतीने लढणाऱ्या सर्व परिरचारिकांना आरोग्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील अभिनंदन केले आहे. समाजात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
लक्षणीय बाब म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडलेच्या बरोबर एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी संख्येत रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
सोमवारी दि. ११ मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५५, ठाणे २०९, रायगड ५३ असे मुंबई मंडळात एकूण ३२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ३१६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे १६१ तर सातारा येथील १४ असे पुणे मंडळात एकूण १७५ रुग्णांना घरी सोडले तर आतापर्यंत एकूण ११४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण १३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण ४२ रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण ११७, लातूर मंडळात एकूण १२, अकोला मंडळात एकूण १०१ तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण ७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे
मुंबई, दि.१२: राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला.
कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
कृषिमंत्री श्री. भुसे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी या कृती आराखड्याबाबत माहिती देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील बहुतेक कृषि महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहित केलेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, त्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासह कृषि व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वास्थ्य आणि सुरक्षित अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठामधील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला आहे.
यात प्रामुख्याने कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे १०० टक्के गुण देऊन द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार शक्यतो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.
कृषि तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर जवळपास दि.८ ते १५ जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार घेण्यात येईल.
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल. त्याकरिता ५० टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित देण्यात येतील आणि उर्वरित ५० टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारित देण्यात येतील.
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील आणि या परिक्षेचा निकाल हा १५ जुलैपूर्वी जाहीर करण्यात येईल.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतल्या जातील. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धत वापरत लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मुल्यमापित केले जातील. शोधनिबंध सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२० होती अशा विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याकरिता ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी दि.१ ऑगस्ट २०२० रोजी होणार असून पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्राची नोंदणी ही दि.१ जुलै २०२० रोजी होणार आहे. तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश हे दि.१ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास वरील नियोजनामध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले आहे.
३२ ते ३८ कोटीच्या टेंडर साठी रिंग -अरविंद शिंदेंचा आरोप
पुणे- एकीकडे शहर कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना लोकांना आरोग्या बरोबर चरितार्थाची चिंता सतावत असताना सारे प्रशासन कोरोनाशी झुंजत असताना महापालिकेतील काही ठेकेदार आणि अधिकारी मात्र ठेक्यांच्या रिंगा करण्यात मश्गुल असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. आंबील ओढा कल्व्हरट बांधकामाचे ३२ ते ३८ कोटी चे टेंडर काडून ते अपात्र असलेल्या आणि खोटी कागदपत्रे दिलेल्या ,अनुभव नसलेल्या अशा ३ ठेकेदारांना दिल्याचा आरोप करत या कामाची वर्क ऑर्डर देवू नये अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. स्थायी समितीने या टेंडर ला मान्यता दिली आहे आणि हे काम वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच ठेकेदाराने सुरु केले आहे असाही आरोप करत शिंदे यांनी याप्रकरणी दोषी असलेल्या सर्व अधिकार्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कडे केली आहे.
शिर्डी : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ही उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कोरोनाबाबत संगमनेरातील जनतेला अवाहन करताना श्री.थोरात म्हणाले, कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे याचबरोबर गर्दी करणे टाळणे व विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे हे अत्यावश्यक आहे. या नियमांचे पालन केले तर आपण निश्चितच कोरोनाची साखळी तोडू शकतो. कोरोना संसर्ग तिसऱ्या टप्प्यावर येऊ नये आणि तो रोखण्यासाठी देशात, महाराष्ट्रात व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. मागील दीड महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असून महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रभावी आणि अत्यंत चांगले काम केले आहे. प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व शासकीय कर्मचारी अत्यंत सेवाभावीपणे आपले काम करत आहे. या सर्वांना संपूर्ण सहकार्य करणे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण घरीच थांबलो तर या सर्वांवरील ताण कमी होईल. अशा संकटाच्या काळात आपण सरकारच्या सोबत राहणे गरजेचे आहे.
संगमनेर तालुक्यात व शहरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे काही ठिकाणचे भाग सील केले गेले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबर कुटुंबियांच्या सुरक्षिततेकरिता स्वतः घरी थांबा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा आणि मास्कचा वापर करा असे आवाहनही केले. शासन व प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे. संगमनेर शहर, कुरण, धांदरफळ, घुलेवाडी या परिसरातील नागरिकांना थोरात यांनी दिलासा दिला आहे. या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेऊन असून प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहोत. आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही थोरात यांनी केली आहे.
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण १४ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.
नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-
श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा), श्री. संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), श्री. रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.).
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).
श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).
श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.).
नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे :-
श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष).
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १४ मे २०२० आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची पाहणी
पुणे, दिनांक 12- पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व साखर आयुक्त सौरभ राव यांनी संयुक्तरित्या नवीन मोदीखाना व भीमपुरा क्षेत्रातील उपाययोजनांबाबत पाहणी केली. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनेप्रमाणेच पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना करून कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील पाहणीवेळी मेजर जनरल नवनीत कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. गायकवाड यांच्यासह पुणे कॅन्टोनमेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील लगतच्या भवानीपेठ क्षेत्रात सुरू असलेल्या उपाययोजनेप्रमाणेच कॅन्टोन्मेंट क्षेत्रात उपाययोजना राबवा, गरजेप्रमाणे प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूची निकड भासू नये यादृष्टीने भाजीपाला, दूध या सारख्या वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध होतील, या दृष्टीने समन्वय करून व्यवस्था करण्याबाबतच्या सूचनाही सबंधितांना देण्यात आल्या आहेत.
यवतमाळ : राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात एकूण ८०० वृद्ध कलावंत आहेत. यांचे मानधन मागील ६ महिन्यांपासून थकीत होते. ही बाब निवेदनातून वृद्ध कलावंतांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर तात्काळ पुढाकार घेत पालकमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालकांसोबत चर्चा केली. तसेच या वृद्ध कलावंतांचे मानधन तात्काळ जमा करण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ८०० वृद्ध कलावंताच्या खात्यात त्यांच्या मानधनाची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल, असे विभागाचे संचालक यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिक यांना दिलासा मिळणार आहे
– जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, 12- देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल डिस्टसिंग’ बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या
प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.