पुणे- वेळ आलीच तर …. तयारी असावी म्हणून बालेवाडीत पुणे महापालिकेने ११०० रुग्णासाठी कोविड १९ केअर सेंटर ची उभारणी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल, शांतनू गोयल आणि पत्रकारांनी आज या केअर सेंटर ला भेट दिली . रुग्ण आढळून येण्याच्या संख्ये पेक्षा सध्या तरी बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे १३०० प्रत्यक्षात अॅक्टीव्ह रुग्ण आहेत आणि आणखी साडेचार हजार रुग्णांची व्यवस्था महापालिकेकडे उपलब्ध असताना या केअर सेंटर ची उभारणी केल्याचे आगरवाल यांनी सांगितले. साधारणतः जून च्या पहिल्या आठवड्यात येथील केअर सेंटर चा उपयोग करण्याची वेळ येवू शकते असे त्या म्हणाल्या. पहा हा व्हिडीओ रिपोर्ट ….
कोरोनाच्या आक्रमणातही खाजगी रुग्णालयांची भूमिका व्यापाराचीच -महापालिका आयुक्तांची खंत
पुणे : महापालिका , राज्य शासन , केंद्र शासन विविध स्वयंसेवी संस्था या पुण्यात कोरोनाशी लढा देत असताना खाजगी रुग्णालयांचा यात किती व कसा सहभाग आहे? असा सवाल करत अप्रत्यक्षपणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील वैद्यकीय सेवा व्यवसाय म्हणून करणाऱ्या रुग्णालयांना सणसणीत चपराक लगावली आहे. किमान महामारी च्या काळात तरी वैद्यकीय सेवेचा धंदा होवू नये. पुण्यात कोरोना विरोधात लढाई सुरु असताना पुण्यातील खाजगी रुग्णालये या लढाईत आहेत कुठे असा ही सवाल त्यांनी केला .तसेच याबाबत आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कानावर देखील हि बाब घातल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .सिंहगड रस्त्यावरील स्मार्त सिटी च्या कोविड १९ च्या वॉर रूम मध्ये पत्रकारांना आपल्या लढाई बाबतची माहिती देताना ते बोलत होते. हे सर्व झाल्यावर आपण सुमारे ५०० पानांचे एक पुस्तक हि लिहिणार आहोत . आपणा या महामारीत नेमके काय काय केले , काय करायला हवे होते काय राहिले , कोणाचा कसा प्रतिसाद मिळाला , किती बैठका कोणा कोणा बरोबर कशा झाल्या , एकंदरीत या लढाईचा इतिहास आपण आपल्या नजरेतून लिहून काढू ज्या अन्वये पुढील काळात जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्या त्या काळातल्या लढवय्यांना तिचा उपयोग व्हावा
शेखर गायकवाड यावेळी म्हणाले ,’ कोरोना बाधितांचा एकूण आकडा जनते समोर आणला जातोय , त्यात बरे झालेले, मृत्यू पावलेले यांचाही समावेश एकूण संख्येत असतो आणि तीच संख्या वाढताना पुढे पुढे दिसते . आणि कागदावर ती लिहावी लागते. परंतु प्रत्यक्षात किती रुग्ण जे पोझीटीव्ह आहेत आणि उपचार घेत आहेत अशांची संख्या ॲक्टीव्ह संख्या म्हणून लिहिली जाते तेवढेच खरे कोरोनाग्रस्त असतात . जे सध्या १२०० चे १३०० च्या घरात आहेत .कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आढावा घेऊन सध्या शहरात असलेल्या 69 कन्टेन्मेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रांत) बदल करण्याचे संकेत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.
पुण्याचा मृत्यूदर 14 टक्क्यांवरून 5.18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनाला यश; अर्थात ही टक्केवारी अजूनही राज्य आणि राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा जास्त आहे.मेअखेरपर्यंत शहरात 9,600 पॉझिटीव्ह रुग्ण आढळतील, या अंदाजानुसार प्रशासनाचे नियोजन चालू होते. आता परिस्थिती बदलली असून मेअखेरपर्यंत जास्तीत जास्त 5,000 कोरोनाबाधित आढळतील, अशी शक्यता आहे.
18 तारखेपासून शहरात जास्तीत जास्त शिथिलता आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल. त्यानुसार खासगी कार्यालयांना परवानगी, सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के मनुष्यबळ उपस्थिती यावर भर दिला जाईल. कन्टेन्मेंट क्षेत्रातदेखील रोजगार आणि जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता वाढविण्यावर प्रशासनाचा भर असेल.
कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न
सोमवारपासून बीकेसी येथे रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. १५: कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील. सोमवारपासून बीकेसी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील सुरू केला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे असे :
• आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासमवेत बीकेसी येथील कोरोना केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारीदखील उपस्थित होते.
• वरळी येथील एनएससीआय डोम मध्ये ६०० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या लगत असलेल्या नेहरु प्लॅनेटोरियम येथेही सुमारे ५०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.
• गोरेगाव येथील सुविधा आठवडाभरात सुरू होईल. बीकेसी येथील कोरोना केअर सेंटर केवळ २० दिवसांमध्ये तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये १००८ खाटांची सुविधा असून तेथे नव्याने १००० खाटांचे अतिदक्षता विभाग देखील उभारले जात आहे.
• मुंबईत कोरोना केअर सेंटरचे एक आणि दोन अशा प्रकारात वर्गीकरण करण्यात आले तेथे क्वारंटाईन आणि आयसोलेशनची व्यवस्था असेल. मुंबईत कोरोना केअर सेंटर २ मध्ये सुमारे एक लाख आयसोलेशन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
• जूनपर्यंत रुग्ण दुपटीचा वेग पाहता अधिक काळजी घेण्यात आहे. मात्र ज्या गणितीय शास्त्रानुसार मुंबईत रुग्ण वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला होता, तेवढ्या रुग्णांची वाढ झालेली नाही. लॉकडाऊनचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते.
• मुंबईतील खासगी रुग्णालयातील सुमारे ७५ टक्के खाटा वापरात नाही आहेत. अपघात, बाळंतपण, डायलेसिस, पक्षाघात, हृदयविकार या आजारांच्या रुग्णांना प्राधान्य देत उर्वरित खाटांमधील ६० टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, त्यासाठी खासगी रुग्णालयांना राज्य शासन, महापालिकांमार्फत त्यांचे देयके दिले जातील.अशा मागणीचा प्रस्ताव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे सादर केला आहे. त्यावर येत्या एक दोन दिवसात निर्णय होऊ शकतो.
• राज्यभरातील आरोग्य विभागातील १७ हजार ३३७ रिक्त पदे आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील ११ हजार पदे तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर विशेष भर दिला जात आहे.
शरद पवार यांच्याकडून पाहणी
मुंबई : कोरोना स्थितीच्या हाताळणीचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील संकुलात सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयाची पाहणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात आलेल्या रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढणार असे गृहित धरून सुमारे 20 हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी धारावी आणि कुर्ला परिसरात जेथे कोरोना विषाणूचे वाहक आहेत तेथेच रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात 27 कोटी रुपये खर्चून सुमारे 500 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. तेथे प्राणवायूसह अन्य सुविधा मिळतील याची पाहणी करण्यात आली. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही व्यवस्थेचे अवलोकन केले.
गोरेगावात नेस्को मैदानात 1000 खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले आहे. परिसरातील रुग्णांना तिथे औषधोपचार दिले जाणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पाहणीच्या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापालिका उपायुक्त संजीव जयस्वाल, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
तहसिल कार्यालयाच्यावतीने 1 लाख पांढरे सुती कापडी मास्कचे मोफत वाटप- तहसिलदार तृप्ती कोलते
पुणे, दिनांक 15- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आदेशानुसार व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे शहर तहसिल कार्यालयाच्यावतीने पुणे शहरातील दाट लोकवस्तीच्या कंटेन्मेंट झोनमध्ये वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित 1 लाख पांढरे सुती कापडी मास्कचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे हे मास्क रोज घरी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येणार आहेत. किमान वर्षभर वापरता येतील इतका उत्कृष्ट दर्जा या मास्कचा आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तहसिल कार्यालय पुणे शहरकडून उपलब्ध झालेल्या एक लाख रियुजेबल मास्कचे मनपा क्षेत्रीय कार्यालयामार्फत कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना मोफत वितरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊन नंतरही मास्क वापरणे अतिशय गरजेचे आहे. किमान वर्षभर किंवा त्याही पेक्षा जास्त काळ वापरावेच लागेल, अशी तरी सध्या परिस्थिती आहे. मास्क वापरण्याबाबत अनेक जण गंभीर नसलेले दिसून येतात. मास्कचा वापर हा सहजतेने घेण्याचा विषय नाहीए. त्यामुळेच दाट लोकवस्तीच्या काही भागात काही सामाजिक संस्थांमार्फत मास्कचे वाटप झाले आहे. मात्र, ते तकलादू स्वरूपाचे आहेत. डिस्पोजेबल मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने ते आणखी धोकादायक आहेत.
तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील म्हणाल्या, मी या भागातून फिरत असतांना बरेच नागरिक तोंडावर रूमाल बांधणे, काही महिला साडीचा पदर तात्पुरता तोंडाला लावणे,ओढणी, स्कार्फ गुंडाळून बिनधास्त रस्त्यावर फिरतात. हे फारच धोकादायक आहे. त्यांचे हे वर्तन स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याशी खेळणारे आहे. योग्य संरक्षण न मिळाल्याने दाट लोकवस्तीच्या भागात कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढण्याचे मास्क न वापरणे हेही एक कारण ठरत असावे, असे मला वाटते. अधिकारी म्हणून एन 95 सुरक्षित काही मास्क मला मिळालेही. पण ते फार काळ वापरू शकत नाही आणि आपल्याला तर किमान वर्षभर किंवा त्याही पेक्षा जास्त काळ मास्क वापरावेच लागणार आहेत. त्यामुळे माझ्याबरोबरच सामान्य नागरिकांसाठी रोज आपल्या घरी स्वच्छ धुवून किमान वर्षभर वापरता येतील असे वैद्यकीयदृष्टया प्रमाणित दोन लेअरचे कापडी मास्क शासनाच्या वतीने पुणे शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये वाटणार आहे.
नागरिकांना आवाहन- मास्क वापरायला टाळाटाळ करू नका. डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर त्याची योग्य विल्हेवाट लावा. ते रस्त्यावर टाकू नका. रूमाल वापरणे सुद्धा फार सुरक्षित नाही आणि हलक्या दर्जाचे मास्क वापरणे तर फार धोकादायक आहे.
कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण-तर ३ लाख ४५ हजार जण क्वारंटाईन
६५६४ रुग्ण बरे होऊन घरी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि.१५: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये२, धुळयात २,पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १७,६७१ (६५५)
ठाणे: १८९ (३)
ठाणे मनपा: १३०२ (११)
नवी मुंबई मनपा: ११७७ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४४४ (६)
उल्हासनगर मनपा: ८६
भिवंडी निजामपूर मनपा: ४१ (२)
मीरा भाईंदर मनपा: २६० (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: ३२१ (११)
रायगड: २१२ (२)
पनवेल मनपा: १८० (१०)
ठाणे मंडळ एकूण: २१,९२५ (७१८)
नाशिक: ९९
नाशिक मनपा: ६३
मालेगाव मनपा: ६६३ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ६४ (५)
जळगाव: १९० (२३)
जळगाव मनपा: ५६ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२३८ (७४)
पुणे: १८५ (५)
पुणे मनपा: ३१४१ (१७२)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३५६ (२०)
सातारा: १२६ (२)
पुणे मंडळ एकूण: ३९७२ (२०४)
कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३७
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८६ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १६२ (५)
औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६८३ (२०)
जालना: २१
हिंगोली: ६६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ८७१ (२१)
लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ६
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९६ (५)
अकोला: १९ (१)
अकोला मनपा: २०७ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: ९२ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४५२ (२८)
नागपूर: २
नागपूर मनपा: ३३२ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३४३ (३)
इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २९ हजार १०० (१०६८)
(टीप – आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार १६७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
दिवसभरात राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई दि.15: गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील ४ हजार ८७५ ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली.
राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्हयांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 4 हजार 597 अनुज्ञप्ती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्यात 24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.14 मे, 2020 रोजी राज्यात 84 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 45 आरोपींना अटक करण्यात आली असून 22 लाख 62 हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020 पासून दि.14 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,489 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,457 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 554 वाहने जप्त करण्यात आली असून रु.14.93 कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ आहे. ई-मेल – commstateexcise@gmail.com असा आहे.
महावितरणला केंद्राला तात्काळ बिनव्याजी 5000 कोटीची मदत करावी : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
- वीज क्षेत्राला अत्यावश्यक घटक म्हणून एन.डी.आर.एफ.मध्ये समाविष्ट करा
- लॉकडाऊनमुळे वीज बिल वसुली कमी झाल्याने आर्थिक झळ
- 90000कोटींचे पॅकेज अस्पष्ट
नागपूर 15 मे 2020 : लॉकडाऊनमुळे महावितरणसह देशातील सर्व वीज वितरण कंपन्या आर्थिक संकटात सापडल्यामुळे केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राष्ट्रीय आपदा निवारण फंड (एन.डी.आर.एफ.) मधून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
सध्या महावितरण कंपनीला केंद्राकडून तातडीने 5000 कोटी रुपयांची मदत आवश्यक असून गेल्या 2 महिन्यात 7200 कोटी रुपयांचे नुकसान महावितरणला सहन करावे लागले असून एप्रिल महिन्यात वीज बिलाची फक्त 40 टक्के वसुली झाली आहे. मे महिन्यात ती 25 टक्के इतकी कमी होणार असल्याचे अनुमान असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 90 हजार कोटी रुपयांचे पॅकेज वीज वितरण कंपन्यांना देण्याची घोषणा केली असून हे पैसे अनुदान स्वरूपात अथवा बिनव्याजी मिळाले तरच महावितरणला वीज खरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर आवश्यक देणी देणे शक्य होणार आहे. केंद्राने वीज वितरण क्षेत्राला कर्जरुपी पैसे न देता आर्थिक आधार देण्याची हि वेळ असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.
आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत पॅकेजमधील 90 हजार कोटी रुपये वितरण कंपन्यांना नेमके कोणत्या स्वरूपात, किती रक्कम आणि कधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. हे पैसे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व रूरल ईलेट्रीफिकेशन कॉर्पोरेशनकडून कर्जाच्या स्वरूपात मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र त्यावर व्याज किती असेल?, कर्ज फेडीचे हप्ते किती असतील व अटी कोणत्या असतील हे अजूनहि गुलदस्त्यातच आहे. याचा उलगडा लवकर झाल्यास त्यादृष्टीने पुढची पाउले उचलता येतील असे मत डॉ राऊत यांनी व्यक्त केले.
स्थिर आकार रद्द करण्याची मागणी देखील उद्योजकांकडून होत आहे. लॉकडाऊनमुळे देशांतील वीज वितरण कंपन्यांना खूप मोठा तोटा सोसावा लागत असल्याने नुकसानभरपाईच्या स्वरूपात केंद्राने तातडीने मदत करावी, अशी आग्रही मागणी उर्जामंत्री यांनी केली आहे.
कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री पवार
पुणे, दिनांक 15- कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना आर्थिक अडचणी किंवा मनुष्यबळाच्या अडचणी असतील तर त्याबाबत स्पष्टपणे सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून उप मुख्यमंत्री पवार यांनी आज विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्ये बैठक घेतली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, मुख्य अभियंता एस.एस. साळुंके आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा विस्तृत आढावा घेतला. पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी राज्यनिहाय समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाअसून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि पोलीस विभागाला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
आगामी काळात मान्सूनचे आगमन होणार आहे. कोरोनाशी मुकाबला करतांना मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका यांनी त्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. खरीप हंगामाचा उल्लेख करुन उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतक-यांना बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासता कामा नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. येत्या सोमवारपासून बाजार समित्या सुरु करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनावर नियंत्रण मिळवले असल्याने तेथे अटी-शर्तींच्या अधीन राहून उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्योग किंवा औद्योगिक आस्थापनांच्या प्रमुखांना कामगार किंवा मजुरांची वाहतूक, त्यांची निवास व्यवस्था, मास्कचा वापर याबाबत आवश्यक ते निर्देश देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागाची, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्याची माहिती दिली. आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे महापालिका आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ससून हॉस्पीटलमधील उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामुग्री, डॉक्टर-परिचारिका यांच्या भरतीबाबत माहिती दिली.
पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनीही त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.
आषाढी वारीसाठी निघणारी दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, 15- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक
असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके,माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्याच्या विविध भागातून आषाढी वारीसाठी दिंडया निघतात, दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय दिंडी, पालखी पंढरपूरकडे प्रयाण करणार नाही, असेही श्री पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात या, उद्योग सुरू करा : गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाचा पुढाकार
मुंबई, दि. १५ – संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. विविध परवान्यांऐवजी महापरवाना घेऊन उद्योग सुरू करता येईल. याशिवाय एमआयडीसीबाहेरील जमीन अधिग्रहित करून उद्योग सुरू करण्यास चालना दिली जाईल.
विदेशी गुंतवणुकदारांसाठी एमआयडीसीने राज्याच्या विविध भागांत सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. यामध्ये पाणी, वीज रस्ते आदी पायाभूत सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. गुंतवणूक करार केल्यानंतर थेट उत्पादन सुरू करण्यासाठी एमआयडीसी स्वखर्चाने औद्योगिक शेड उभे करणार आहेत. या ठिकाणी प्ले अँड प्लगद्वारे थेट उद्योग सुरू करता येईल.
विदेशी गुंतवणूकदारांच्या सल्लागारांसोबत उद्योग विभागाचे अधिकारी चर्चा करत आहेत. याशिवाय विविध देशांच्या वाणिज्यदूतांसोबत चर्चा केली जाईल.
राज्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने खुले धोरण स्वीकारले आहे. विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाईल. उद्योग सुरू झाल्यांतर पुढील एक दोन वर्षांत इतर विभागांचे परवाने घेण्याची मुभा दिली जाईल.
मनुष्यबळाची टंचाई भासू नये यासाठी कामगार ब्युरोची स्थापना करण्यात येणार आहे. याद्वारे उद्योगांना लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ अवघ्या सात दिवसांत पुरविण्याचे नियोजन उद्योग विभागाने केले आहे.
गुंतवणूकदारांनी या सर्व संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वतीने आयोजित वेबिनारदरम्यान केले
पीएमच्या २० लाख करोडच्या पैकेजवर कॉमेडी अभिनेता सुनील पाल यांची रोखठोक प्रतिक्रिया (व्हिडीओ)
पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या वीस लाख करोड च्या पैकेज वर बॉलीवूड मधून पहिली रोख ठोक प्रतिक्रिया कॉमेडी अभिनेता सुनील पाल यांनी माय मराठी कडे नोंदविली आहे ….. इन्सान का इन्सान से हो भाईचारा असा संदेश देत २० लाख करोड कधी ,कुठे पोहोचणार ? ..आता मजूर पायी गावाकडे हाल अपेष्टा सहन करत निघाले आहेत .. लोकांना आता गरज आहे ..हे वीस लाख करोड कसे ,कधी पोहोचणार ? असा सवाल करत पहा नेमके सुनील पाल यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ..जसेच्या तसे …
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक
शिर्डी : कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, पी.वाय.कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी बैठकीत उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु., कुरण, घुलेवाडी येथील परिस्थिती व प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी श्री.थोरात म्हणाले, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहून करु या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने काही कडक नियम केले आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना संकटात महसूल, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी, स्वयंसेवक चांगले काम करत आहेत. या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत गरीब, रोजंदारीवरीलल मजूर व परप्रांतीय कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे काम कौतुकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करताना मदत कक्षातून परप्रांतीय मजूर, गोरगरिब यांच्यासाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय मदतकार्याचा आढावा घेत आहे. नागरिकांच्या मिळालेल्या सहकार्यातून अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी कोरोनाचे रुग्ण, तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती, त्यांना दिलेल्या सुविधा यासोबत प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.
तहसीलदार अमोल निकम यांनी परप्रांतीय मजूर व त्यांची सद्य परिस्थिती याबाबत माहिती दिली.
पुणे विभागात आजची प्रत्यक्ष ॲक्टीव रुग्णसंख्या 1 हजार 924
पुणे विभागातील 1 हजार 886 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात एकूण कोरोना बाधितसंख्या झाली 4 हजार 20 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि. 15 :- पुणे विभागातील 1 हजार 886 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 20 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 924 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 145 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 490 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 702 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 603 आहे. कोरोनाबाधित एकूण 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 133 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 125 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 88 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 336 कोरोना बाधीत रुग्ण असून 110 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 205 आहे. कोरोना बाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 43 कोरोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 26 कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 43 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 39 हजार 16 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 7 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 35 हजार 1 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 20 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 5 लाख 48 हजार 588 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 18 लाख 86 हजार 844 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 886 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
नेस्को कोरोना काळजी केंद्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी
मुंबई, दि. १५- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC २) व्यवस्थेची आज सकाळी पाहणी केली.
यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी नेस्को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रामुख्याने पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. जयस्वाल यांनी नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. एकूण १,२४० बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार आहे. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
