Home Blog Page 2576

लॉकडाऊनमध्ये अडकलेले ४१ हजार ६९८ मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

0

अलिबाग : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यातील तब्बल ४१ हजार ६९८ मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही सुखरुपपणे पाठविण्यात आले. आतापर्यंत उत्तरप्रदेशकरिता १०, मध्यप्रदेशकरिता ५, झारखंडकरिता-५, बिहारकरिता-५, ओरिसाकरिता व राजस्थानकरिता-१ रेल्वे सोडण्यातआल्या आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.

ही सर्व प्रक्रिया पालकमंत्री कु.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल), सिद्धराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार विशाल दौंडकर, अमित सानप यांच्या एकत्रित नियोजनाने सुरळीत पार पडली.

कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध राज्यातील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते. तसे मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि ओरिसा येथील मजूर/व्यक्ती रायगड जिल्ह्यातही अडकले होते. शासन आणि जिल्हा प्रशासन या मजूरांची व्यवस्थित काळजीही घेत होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरु लागल्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना  सुखरुप आपल्या गावाकडे जात असल्याबद्दल आणि कुटुंबाशी भेटण्याचा आनंद मिळणार असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात अडकलेल्या सर्वांची जेवण व राहण्याची देखील चांगली व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी शासनाने व प्रशासनाने देखील संबंधित राज्यांशी उत्तम समन्वय साधला. बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना सुखरूप जाता यावे आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित गावी येता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.

रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर/व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी  त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यात आले होते.

रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाईज करणे व रेल्वे स्थानकावर निर्जंतूकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते, ओढ होती. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे  टाळ्या वाजवून मन:पर्वूक आभार मानले.

पुण्यातील आयएएस- आयपीएस अधिकाऱ्यांतील मतभिन्नतेने जनता भयभीत -खा. गिरीश बापट (व्हिडीओ)

रिक्षावाले ,सलूनवाले आणि लाँड्रीवाले यांना दरमहा १० हजार रुपयांप्रणे २ महिन्यांची मदत द्या 

पुणे-केंद्र सरकारने २० लाख कोटीचे पैकेज जाहीर केले ,कोरोना सारख्या महामारीने महाराष्ट्र व्यथित ,हैराण झालेला असताना ठाकरे सरकारने नेमके कोणते पैकेज जाहीर केले असा सवाल करत आज भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील आय ए एस आणि आय पीएस  अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याने पुण्याची समस्या गंभीर बनते आहे, जनता भयभीत होते आहे असा आरोप केला . शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक ,रवी अनासपुरे ,उज्ज्वल निकम आणि बापट यांनी शहर भाजपा कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून राज्माय सरकारच्ध्यया विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आणि यावेळी माध्मांयशी संवाद साधला . नेमके बापट आणि मुळीक यावेळी काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका ……

कणकवली शहरातील उड्डाणपूल येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत सुरु करा – पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

0

सिंधुदुर्ग – राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील कणकवली ते झाराप या टप्प्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून त्याअंतर्गत असणारा कणकवली शहरातील उड्डाणपूल येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत सुरु करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

महामार्ग कामांची आढावा बैठक आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार वैभव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश सावंत, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी रमेश पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता बी.एस.पोवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रकाश भिसे, दिलीप बिल्डकॉन चे प्रकल्प अधिकारी के.के. गौतम, संजय पडते, संदेश पारकर उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कणकवलीतील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले असल्याने या पुलावरील स्ट्रिट लाईट तातडीने सुरु कराव्यात तसेच महामार्गालगतचे सर्व्हिस रोड तातडीने सुरु करावेत. या सर्व्हिस रोड साठी ज्या ठिकाणी जमीन संपादन करणे बाकी आहे. त्याठिकाणी भूमी अभिलेख खात्याने तातडीने मोजणी करावी व जमीन अधिग्रहित करावी. या मोजणीसाठी नॅशनल हायवे ॲथोरिटीने ३० हजार रुपये प्रशासनाकडे जमा केले असल्याने याबाबतची कार्यवाही तातडीने व्हावी असे सांगून पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, शहरी भागामध्ये ४५ मीटर व ग्रामीण भागात ६० मीटर रस्त्याची हद्द निश्चित करण्यात यावी. महामार्गालगतच्या ज्या इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यांचा मोबदला त्यांना मिळाला आहे. ज्या इमारती अर्धवट पाडण्यात आल्या आहेत त्या ताब्यात घेऊन तातडीने पाडण्यात याव्यात.

महामार्गावर पंचायत समिती लगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी संरक्षक कठडे बांधावेत व बॅरेकेटींग करण्यात यावे असे सांगून पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गालगत कणकवली ते झाराप या दरम्यान दिलीप बिल्डकॉमने एस.टी बस थांबे तातडीने उभे करावेत. त्याचबरोबर पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गालगतची गटारांची काम दर्जेदार करावीत, पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. कणकवली उड्डाण पुलाच्या ठिकाणी योग्य सर्व्हे करुन दिलीप बिल्डकॉनने आपल्या राखीव निधीमधून शौचालय उभारावे. या सर्व कामाकडे बांधकाम विभागाने लक्ष घालून संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त

0

मुंबई दि. 21 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 864 अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत. आज दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात ( 3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर ) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. आज एका दिवसात अंदाजित 34,352 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याचीसुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येतअसलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणालाऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुनमिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करीरोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत.काल दि.20 मे, 2020 रोजी राज्यात 83 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.31.57/- लाखकिंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.24 मार्च, 2020 पासुन दि.20 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5984 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2664 आरोपींना अटककरण्यात आली आहे. 599 वाहने जप्त करण्यात आली असूनरु.16.16/- कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  ई-मेल – commstateexcise@gmail.com असा आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत डॉ. म्हैसेकर व एस. चोक्कलिंगम यांनी घेतली आढावा बैठक

प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत यासाठी विशेष खबरदारी घ्यावी

पुणे दि.21:- पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयासाठी नियुक्त प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नियुक्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भुजल सर्वेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर व श्री. चोक्कलिंगम यांनी पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये असणारी शासकीय व खाजगी रुग्णालये, यामधील उपलब्ध खाटांची संख्या, अतिदक्षता विभागात उपलब्ध खाटा व अन्य बाबींचा आढावा घेतला.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी. प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. कोविड रुग्णांवर उपचार करताना अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, या दृष्टीने काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची यादी करुन त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर कोविडचा संसर्ग वाढू नये, यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर, स्वछतेबाबत जनजागृती करावी. शासकीय व खासगी रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या विचारात घेऊन पुढील काळात गरज भासल्यास आवश्यक बेड, व्हेंटिलेटर व त्या अनुषंगिक वैद्यकीय साधनसामग्रीची व्यवस्था करुन घ्यावी. खासगी रुग्णालयांनी गोर-गरीब रुग्णांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रयोगशाळांनी स्वॅब तपासणीची क्षमता वाढवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देवून आवश्यक त्या सूचना केल्या.
बैठकीत आयुक्त शेखर गायकवाड व श्रावण हर्डीकर यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील नागरिक, झोपडपट्टीमध्ये राहणारे एकूण नागरिक, शहरातील कंटेन्मेंट क्षेत्रे तसेच येथील दक्षता घेणे आवश्यक असणारे ज्येष्ठ व आजाराची पार्श्वभूमी असणारे नागरिक यांची माहिती दिली.

डॉ. के. व्यंकटेशम यांनी शहरात कोरोना अटकावासाठी पोलीस विभाग करत असलेल्या कामाची माहिती दिली.

सौरभ राव यांनी कंटेन्मेंट क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने कोणकोणते बदल करणे आवश्यक आहे, याबाबत सूचना केल्या.

यावेळी अनिल कवडे, सचिंद्र प्रताप सिंग, डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देऊन सूचना केल्या.

डाव रंगला… (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

ए हाऊझ दॅट… बॅटिंग करणारा आऊट झाला की प्रतिस्पर्धी टीमची मुलं अक्षरशः बेंबीच्या देठापासून ओरडत एकच कल्ला करत. पूर्ण गल्लीभर नुसता आवाज, गोंधळ, गडबड. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या रे संपल्या की गल्लोगल्ली दिसणारं हे टिपिकल दृश्य. परीक्षा कधी संपताहेत आणि टीम बनवून आपण कधी खेळायला सुरुवात करतोय असं या क्रिकेटवेड्यांना झालेलं असतं. यावर्षी मात्र मार्चमध्ये करोनामुळे लॉकडाऊन झाला आणि खेळाने  गजबजणाऱ्या गल्ल्या सुन्या सुन्या झाल्या. बरं हा लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठीच असेल आणि मग मनसोक्त खेळता येईल, या आशेवरही पाणी पडलं. मे महिना सुद्धा संपत आला पण लॉकडाऊनमुळे बाहेर खेळता येत नाही या विचाराने घरोघरी बच्चे कंपनी नाराज झालीय. खिडकीत, बाल्कनीत येऊन गल्ली, ग्राऊंडला उदास नजरेनं न्याहाळत बसलीय.

‘आता घरातच बसावं लागणार तेव्हा घरी राहून काय काय खेळ खेळता येतील ते बघा’…वडीलधाऱ्या मंडळींच्या या सल्ल्याने मग विचारचक्रे फिरली. कोपऱ्यात ठेवलेला कॅरम फटक्यात बाहेर निघाला, कपाटातील पत्त्यांचा कॅट शोधून काढला तर माळ्यावर कुठे बुद्धिबळाचा पट, व्यवहार डाव आहे का याचाही धांडोळा घेतला गेला. मग काय लहानांसोबत मोठेही सापशिडी, व्यवहार, पत्त्यांमध्ये तर पाच-तीन-दोन, बदाम-सात, मेंढीकोट, झब्बू खेळताना दिसू लागले. सोबतीला कॅरम, बुद्धिबळाचे डावही रंगू लागले. झूमवर फक्त गप्पाच नाही तर हाउझीचा खेळही खेळला जाऊ लागला (कल्पकता यालाच म्हणतात बरं!). बैठे खेळ खेळण्यात आणि नवनवीन शिकण्यात वेळ जाऊ लागला. याचदरम्यान एक उल्लेखनीय बाब म्हणजे मुलांसाठी वाड्यामधील हरहुन्नरी शिक्षकांनी एक गमतीदार पण शैक्षणिक सापशिडी बनवली – खेळातून विरंगुळा आणि शिक्षणही…नक्कीच ही अभिनव कल्पना आहे

खरंतर पुन्हा बाहेर केव्हा खेळायला जायला मिळणार हा विचार अधूनमधून डोकं वर काढू लागला. बच्चे कंपनीची ही परिस्थिती तर खेळाडूंची काय अवस्था असेल…

आंतरराष्ट्रीय खेळाडू, खेलो इंडियाची चॅम्पियन आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मेडलिस्ट पूर्णा रावराणे म्हणाली की ग्राउंड वर्क थांबलं आहे; पण घरी करता येण्याजोगे एक्सरसाइज तसेच टेक्निकल वर्क आऊट आम्ही करत आहोत. त्यादृष्टीने आमचे प्रशिक्षकही आमच्याशी ऑनलाईन संवाद साधून मार्गदर्शन करत आहेत. समर कॅम्पसाठी बेसिक एक्सरसाईझचे व्हिडिओ आणि शॉर्ट क्लिपच्या माध्यमातून खेळाडूंना शिकवलं जातंय. काही आंतरराष्ट्रीय खेळ, जे या वर्षी होऊ शकत नाहीत; पण त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये यासाठी त्यातील वयोमर्यादांची अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी नामवंत खेळाडूंनी केली आहे.

क्रिकेटच्या बाबतीत ही असंच काहीसं सुचवलं जात आहे. मे महिन्याची सुट्टी म्हणजे मोठी सुट्टी. या सुट्टीत खेळ, छंद, रेसिपी, मेहंदी असे बरेच शॉर्ट कोर्स किंवा कॅम्पचे पेव फुटलेले असते. लॉकडाऊनमुळे या सर्वांनाही आळा बसला. बऱ्याच जणांनी नामी युक्ती शोधून काढली आणि झूमवर किंवा व्हाट्सएपवर व्हिडिओ अपलोड करून क्लासेस सुरू केले. कोळी क्रिकेट अकादमीच्या आदित्य कोळी यांनीही ‘लाईव्ह क्रिकेट स्किल लर्निंग सेशन’ चालू केले. खेळाडू आणि समर कॅम्प घेणाऱ्यांनी सुवर्णमध्य शोधून काढला त्याचप्रमाणे स्पोर्ट्स चॅनेल्सना सुद्धा वाट वाकडी करावी लागली. सगळं जग थांबलंय तर खेळ तरी कुठे चालू असणार. एका स्पोर्ट्स चॅनेलसाठी सोशल मीडियाचे काम बघणाऱ्या कन्टेन्ट रायटरने सांगितले की ऑलिम्पिक, युरो कप, आयपीएल, इंटरनॅशनल क्रिकेट मॅच हे सगळं पुढे ढकलण्यात आले आहे. फक्त डब्ल्यूडब्ल्यूइ(WWE) आणि युएफसी(UFC) चालू आहे. यापैकी WWE हे यूएसला फ्लोरीडा येथे चालू आहे तर UFC चे ठिकाण बदलत असले तरीही ते यूएसभर चालू आहे. सध्या तरी २०२० ची  क्रिकेट वर्ल्ड कप होईल की नाही याबाबत शंका आहे. डिसेंबर मध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आहे, तो विनासायास होईल अशी दिलासादायक बातमी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी सांगितले आहे की भारतात सद्यपरिस्थितीत क्रिकेट होणार नाही; कारण खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा जीव धोक्यात घालून खेळ खेळायचा नाही. अर्थात आईपीएल किंवा टी-20 होईल की नाही हा एक प्रश्नच आहे. दुसरीकडे मात्र यूएसमध्ये WWE लाईव्ह शूट (प्रेक्षकांविना) होतेय. लॉकडाऊनमुळे बच्चे कंपनीच नाही तर जानेमाने खेळाडूही घरी बसून खेळत आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर काही बास्केटबॉलपटू त्यांच्या घरून व्हिडिओ गेमद्वारे बास्केटबॉल खेळत आहेत आणि त्याची वेगळी टुर्नामेंटही चालू आहे. NBA 2K20 नावाची ही टुर्नामेंट आहे. कुणाच्या डोक्यातून काय आयडिया निघतील याचा काही नेम नाही.

सगळेच स्पोर्ट्स चॅनेल जुन्या मॅचेस, शोज पुन्हा दाखवत आहेत आणि सोशल मीडिया द्वारे त्याचे प्रमोशनही करत आहेत. सध्या सोनी स्पोर्ट्सवर जुन्या मॅचेस पुन्हा दाखवल्या जात आहेत. गल्लीत नाही पण घरी त्या मॅच बघून तोच कल्ला अनुभवता येतोय म्हणा.

लॉकडाऊन कधी संपेल हे माहीत नाही पण त्या निमित्ताने का होईना बैठ्या खेळांना पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. लहानपणी घरातील वयस्कर माणसं सुट्टी पडली की महत्त्वाची सूचना देत. दिवसा आणि संध्याकाळी काय ते अंगणात खेळा पण दुपारी मात्र बैठे खेळच खेळा म्हणजे आमची झोपमोड होणार नाही. मग कुणाच्या ना कुणाच्या घरी किंवा गॅलरीत आम्ही सगळे जमत असू आणि खेळत असू. कधी कॅरम, पत्ते, काचपाणी, भातुकली, सागरगोटे, नाव-गाव-फळ-फूल…बरेच खेळ होते की बसून खेळण्यासारखे. विस्मृतीत गेलेले ते खेळ आता फिरून पुन्हा आठवू लागले आहेत आणि जुन्या आठवणींसह नव्याने डाव रंगतो आहे.

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

राज्यातील अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

0

वित्त विभागाकडून ४६२.६९ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला वर्ग; मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती ६ दिवसात खात्यावर जमा होणार – धनंजय मुंडे

मुंबई (दि. 21) – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या शिष्यवृत्ती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून मान्यता मिळवली असून, लाभार्थी असलेल्या जवळपास 1 लाख 97 हजार 16 विद्यार्थ्यांना 6 दिवसाच्या आत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आपापल्या खात्यावर मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीसाठी मुंबईत गेलेल्या मंत्री मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या शिष्यवृत्ती संदर्भात मागणी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास तात्काळ मान्यता देत, वित्त विभागामार्फत शिष्यवृत्तीचा 462.69 कोटी रुपये निधी समाज कल्याण आयुक्तालयास वर्ग केला आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या 1 लाख 69 हजार 171 विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच 27 हजार 845 विद्यार्थ्यांची फ्रीशिप शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग याद्वारे मोकळा झाला आहे.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 1 लाख 69 हजार 171 विद्यार्थ्यांची एकूण 347 कोटी 69 लाख रुपये शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या 27 हजार 845 विद्यार्थ्यांची 114 कोटी रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वित्त विभागाने तातडीने आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र, यांच्या खात्यावर वर्ग केली असून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना येत्या 6 दिवसांच्या आत प्रत्यक्ष वाटप केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच या रकमेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने श्री. मुंडे यांनी श्री. पवार यांच्याकडे पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे.

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तातडीने ही शिष्यवृत्ती देऊ केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपची रक्कम विभागाला प्राप्त झाली असून, येत्या 6 दिवसात ही रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येईल, एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, असे यावेळी बोलताना श्री. मुंडे म्हणाले.

रस्त्यावर अडकलेल्या कोकणवासीयांना तात्काळ पास उपलब्ध करून सुखरूप स्वगृही रवानगी

0

विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांच्या प्रयत्नांना मिळाले यश
मुंबई दि.२१:- कोरोनाच्या भीतीपोटी मूळचे कोकणवासीय चाकरमानी कोकणच्या दिशेने अनेक अडचणींचा सामना करत निघाले आहेत. पण मुंबई आणि ठाण्यातील जवळपास शेकडो नागरिक राजापूर तालुक्यातील खारेपाटण येथे कुवळेकर वाडीतील उन्हाळे गावात जाण्यासाठी पास नसल्याने अडवण्यात आले होते. यांपैकी काहींकडे चुकीचे पास तर काहींच्या ई-पासची वैध तारीख संपल्यामुळे हे सर्व नागरिक बराच वेळ रस्त्या शेजारी लहान मुलाबाळांसह व वयोवृध्द आजीसह उन्हातान्हात उभे होते. कोकणच्या दौ-यावरुन मुंबईच्या दिशेने परतत असताना हे चित्र दिसल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी विषयाचे गांभीर्य मुंबई व ठाणे येथील संबंधित प्रशासकीय वरिष्ठ अधिका-यांशी संवाद साधून प्रवासात अडकलेल्या कोकणवासीय प्रवाश्यांना तात्काळ पास उपलब्ध करून त्यांच्या गावी कोकणात सुखरूप रवानगी केली आहे. त्यानंतर या कुटुंबियांनी दरेकर यांच्यासह भाजपा आमदारांचे आभार व्यक्त केले.

कोकणवासीयांची गावी जाण्याची व्यवस्था केल्यानंतर श्री.दरेकर म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर होतो. आज सिंधुदुर्गाचा दौरा उरकून मुंबईकडे रवाना होत होतो. दरम्यान वाटेत उन्हातान्हात उभ्या असलेल्या ८५ वर्षांच्या गावडे आजी दिसल्या.त्यांच्यासह आणखी बरेच प्रवासी असल्याने विचारपूस केली असता पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या परवानगीची अडचण असल्याचे लक्षात आले.यांच्याकडे असणाऱ्या परवानग्या या चुकीच्या होत्या. तरी या आजींना सुखरूप घरी जाता यावे यासाठी मुंबईचे पोलीस उप-आयुक्त प्रणय अशोक यांना विनंती केली.विषयाचं गांभीर्य लक्षात घेत फक्त पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी परवानगी मिळवून दिली.त्याचबरोबर आणखी काही कुटुंब कालपासून सिंधुदुर्ग या आपल्या गावी जाण्यासाठी धडपड करित असल्याचे समजले. यांमध्ये ठाण्याहून आलेल्या नागरिकांचा समावेश होता. त्यांच्या परवानगीसाठी देखील ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधून विनंती केली.त्यांनी देखील तात्काळ परवानगी पाठवली आहे.अशाप्रकारे या दोन कुटूंबांप्रमाणे अडकलेल्या इतर प्रवाश्यांची परवानगी प्राप्त झाली आहे.अशाप्रकारे हे सर्व कुटुंब आपल्या गावातल्या घरी सुखरूप जाणार असल्याचे समाधान श्री.दरेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजपचे आमदार भाई गिरकर , आमदार रमेश पाटील उपस्थित होते.

राज्यात परप्रांतीयांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व परप्रांतीय आपापल्या गावी पोहचले. परंतु, हा मुंबईचे चाकरमान कोकणवासीय असाच दोन दोन दिवस रस्त्यात अडकून बसत असल्याची खंत श्री.दरेकर यांनी व्यक्त केली. कोकणवासीयांना परवानगी दिली जात नाही किंवा यांची कोणाला चिंता देखील नाही. तरी अडकलेले नागरिक हे आपले भूमिपुत्र आणि स्थानिक आहेत.हे असे रस्त्यात अडकून पडू नये यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी संबंधित परिस्थितीचा आढावा घ्यावा.जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आदेश देऊन रीतसर यांना आपल्या गावी आणि आपल्या मातीत जाण्याची व्यवस्था करा अशी विनंती श्री.दरेकर केली.

श्री.दरेकर यांनी सांगितले की, गेले काही तास उन्हातान्हात रस्त्यावर अडलेल्या प्रवाश्यांना परवानगी मिळवण्यासाठी झटलो. अधिकाऱ्यांनी देखील तत्परतेने या विषयात लक्ष घालून परवानगी मिळवून दिल्या.त्यामुळे प्रशासनात वाईटा बरोबर चांगलेही अधिकारी आहेत याचे प्रत्यंतर आले.मुंबईचे उप-पोलीस आयुक्त प्रणय अशोक आणि ठाण्याचे अरडीसी शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून हे शक्य झालं.हीच सुबुद्धी इतर अधिकाऱ्यांना देखील यावी.तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकांचा छळवाद थांबवा अशी विनंती श्री.दरेकर यांनी सरकारला केली.

महाराष्ट्र कामगार ब्युरोचे कामगार संघटनांकडून स्वागत

0

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. २१ :भांडवली व पायाभूत सुविधांबरोबरच कामगार हा घटक उद्योग विश्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भूमिपुत्रांना संधी देताना उद्योग विश्वाला कुशल-अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कामगारवर्गाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र कामगार ब्युरो ही संकल्पना साकारली जात आहे. आज कामगार संघटनांकडून याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज कामगार ब्यूरोसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार भाई जगताप, विनोद घोसाळकर, जयप्रकाश छाजेड, शिवाजीराव गटकळ, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

मंत्री सुभाष देसाई म्हणाले, कोरोनाचा अर्थचक्रावर होणारा परिणाम किती काळ राहील हे सांगता येत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून सत्तर हजार उद्योगांना परवाने दिले आहेत. त्यात १२ लाख कामगार रुजू झाले आहेत. परंतु स्थलांतरित मजूर गावी गेले आहेत. त्यामुळे उद्योगांत कामागारांची टंचाई निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी औद्योगिक कामगार ब्यूरो ही संकल्पना पुढे आली आहे. आपल्याकडे कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्योजकांनी स्थानिकांना रोजगारांची संधी द्यावी. मराठी तरुणांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले. कामगार नेत्यांच्या सर्व सूचनांचा विचार करून प्रारूप आराखडा तयार करणार असल्याचे यावेळी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथीच्या गोळ्या आणि मास्कचे वाटप (व्हिडीओ)

पुणे-दोन हजार लोकांना स्वखर्चाने अन्नधान्य कीट वाटल्यानंतर ,जैन संघटनेच्या मदतीने आरोग्य तपासणी आल्या दारी उपक्रम राबविल्या नंतर  आज बालाजी नगर येथील भाजपा नगरसेविका राणी रायबा भोसले यांनी आपल्या प्रभागात केद्रीय आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप  आज केले. याबरोबरच या गोळ्या कोणी कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबतचे माहितीपत्रक देण्यात आले. यावेळी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नगरसेविका भोसले यांच्या समवेत या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला .

कोरोनाचे आज २३४५ नवीन रुग्ण-एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले-राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू

0

एकूण ४१ हजार ६४२ रुग्ण

मुंबई, दि.२१: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.आज २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापुरात १  मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६  पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २५,५०० (८८२)

ठाणे: ३३८ (४)

ठाणे मनपा: २०४८ (३३)

नवी मुंबई मनपा: १६६८ (३३)

कल्याण डोंबिवली मनपा: ६४१ (६)

उल्हासनगर मनपा: १३१ (२)

भिवंडी निजामपूर मनपा: ८० (३)

मीरा भाईंदर मनपा: ३६२ (४)

पालघर:१०२  (३)

वसई विरार मनपा: ४२५ (११)

रायगड: २८५ (५)

पनवेल मनपा: २७१ (११)

ठाणे मंडळ एकूण: ३१,८५१ (९९६)

नाशिक: ११३

नाशिक मनपा: ८४ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४३)

अहमदनगर: ४७ (५)

अहमदनगर मनपा: १९

धुळे: १५ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २५२ (२९)

जळगाव मनपा: ७९ (४)

नंदूरबार: २६ (२)

नाशिक मंडळ एकूण: १४२५ (९४)

पुणे: २५५ (५)

पुणे मनपा: ४२०७ (२२२)

पिंपरी चिंचवड मनपा: २०३ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५१२ (२७)

सातारा: १८४ (२)

पुणे मंडळ एकूण: ५३७१ (२६४)

कोल्हापूर:१४१  (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ५४

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १२३ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ३५७ (५)

औरंगाबाद:२०

औरंगाबाद मनपा: ११०६ (३९)

जालना: ४३

हिंगोली: ११०

परभणी: १५ (१)

परभणी मनपा: ३

औरंगाबाद मंडळ एकूण: १२९७ (४०)

लातूर: ५१ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: १९

बीड: १३

नांदेड: ११

नांदेड मनपा: ८१ (४)

लातूर मंडळ एकूण: १७८ (६)

अकोला: २९ (२)

अकोला मनपा: ३१५ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा:  १३१ (१२)

यवतमाळ: १११

बुलढाणा:३८ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६४१ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४३४ (६)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: ३

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ७

नागपूर मंडळ एकूण:  ४७४ (७)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण:  ४१ हजार ६४२  (१४५४)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २४२ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशनअभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५ हजार ८९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६४.८९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

मॉन्ट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईटपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

0

लॉकडाऊन काळात ४०४ गुन्हे दाखल; २१३ जणांना अटक

मुंबई दि.२१-  मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक  फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

 फेक वेबसाईट

सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच सायबर भामटे खोटे मेसेजेस व फेक वेबसाईट बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच मेसेजेस व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात सूट दिली आहे व सर्वांनी त्यांच्या वेबसाईटवरून त्यांची उत्पादने  विकत घ्यावीत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास त्यावर क्लिक करू नये. कारण त्या वेबसाईट या सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.

फेक वेबसाईटची नावे

Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक (Tata Cliq) आहेत व त्यांची वेबसाईट https://luxury.tatacliq.com/अशी आहे. त्यामुळे जर कोणत्याही नागरिकांनी वरीलपैकी कोणत्याही फेक वेबसाईटवर खरेदी केली असेल व त्यांना डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी व www.cybercrime.gov.in  या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे दाखल झाले असून २१३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०४ गुन्ह्यांची (ज्यापैकी २० N.C आहेत) नोंद २० मे २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७० गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्याप्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१३ आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेक डाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

बीड जिल्ह्यात नवीन गुन्हा

बीड जिल्ह्यातील दिंदुड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४१ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर फिर्यादी हा कोरोनाग्रस्त रुग्ण आहे अशा आशयाची खोटी पोस्ट टाकून फिर्यादीस व त्याचा कुटुंबास बदनाम केले व समाजात आणि परिसरात फिर्यादीबाबत अफवा पसरविली .

नियमांचे पालन आणि खबरदारी घेतल्यास जिल्हा १ जून पर्यंत कोरोनामुक्त – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

0

जिल्हा प्रशासनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु. आगामी काळात कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाहीत, तर जिल्हा ०१ जून पर्यंत कोरोनामुक्त होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे कोरोना बाधित ६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आगामी काळात कोरोना रुग्ण सापडले नाहीत, तर आपण ०१ जून रोजी कोरोनामुक्त होऊ. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता. मे महिन्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिक बाधित आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना परत त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ३० हजार नागरिकांपैकी २३ हजारांपेक्षा अधिक मजूर, कामगार, भाविक, विद्यार्थी त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत १० विशेष श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना रवाना करण्यात आले आहे. आणखी ०६ रेल्वेद्वारे उर्वरित नागरिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यात येणार आहे. याशिवाय, परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून १६ हजार नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी कौतुक केले.

यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध सामाजिक योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावाही घेतला. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन अशा विशेष साहाय्य योजनेतील १ लाख ६२ हजार १४८ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील मोठ्या धरणांत सध्या ३६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा २४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या २१ शासकीय आणि ६१ खाजगी टॅंकरद्वारे ७२ गावे आणि २९१ वाड्यांना पाणीपुरवठा होत असून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या २०६९ कामे सुरु असून त्यावर १० हजार ३१० मजूर कामांवर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यातील ८३ टक्के धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमाह अर्धा किलो चणाडाळ आणि अर्धा किलो तूरडाळ वाटप करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रत्येक केंद्रावर दररोज कापसाच्या किमान शंभर गाड्यांची खरेदी होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई, दि. २१: लॉकडाऊनमुळे बंद झालेली कापूस खरेदी लॉकडाऊनचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु खरेदीचा वेग कमी होता. तो खरेदी वेग वाढविण्याचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या राज्याच्या कृषि विभागाच्या आढावा बैठकीत निघाला. यावर खरेदीचा वेग वाढवित दररोज १०० गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यात जे ग्रेडर सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणन सचिवांना दिले.

कापूस उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात आजही कापूस शिल्लक आहे.पावसाळ्यापूर्वी तो खरेदी होणे अत्यंत गरजेचे आहे असा सूर  कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निघाला. सध्या २० ते २५ गाड्या खरेदी होत असल्याची माहिती  अनेक मंत्र्यांनी या बैठकीत उपस्थित केली.यावर सविस्तर चर्चा होऊन दररोज १०० गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दररोज प्रत्येक केंद्रावर शंभर गाड्या कापूस खरेदी झालीच पाहिजे. यात जे ग्रेडर  हयगय करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

गुन्हे दाखल होणार

इतर राज्यातून कापसाचे एसटीबीटी बियाणे मोठ्या प्रमाणात राज्यात येत असल्याच्या तक्रारींबाबतही बैठकीत चर्चा झाली. राज्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणित नसलेले बियाणे विक्रीला आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. जर आंध्रातील एसटीबीटी कापूस बियाणे व प्रमाणित नसलेले बियाणे जे कोणी विक्री करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल तसेच त्यांचे परवानेसुद्धा रद्द करण्यात यावेत असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

‘रमजान ईद’ला नमाज घरीच अदा करणार !

0

मुस्लिम बांधवांचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना आश्वासन

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या सर्वत्र दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या नियमांचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरीच कुटुंबियांसह अदा करावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांच्या प्रतिनिधींनी रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पालकमंत्री श्री.सत्तार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी नवीन नियोजन सभागृहात मुस्लिम समाजातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूचे संकट सर्व जगाला भेडसावत आहे. या विषाणूचा प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असते. या विषाणूचा संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणूनच संपूर्ण संचारबंदीचा (लॉकडाऊन) निर्णय घेण्यात आला आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे, अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे रमजान ईदची नमाज सामूहिक ठिकाणी अदा न करता घरीच अदा करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

महानगरपालिकेने सर्व भागात स्वच्छता मोहीम राबवावी. पुरेसा पाणीपुरवठा करावा. आवश्यक तेथे सॅनिटाइझ करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले.

धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापले दवाखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केले. त्यांनी सांगितले, की खासगी दवाखाने सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत. जे दवाखाने सुरू होणार नाहीत, अशांचे परवाने रद्द करावेत. जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक पात्र व्यक्तीला अन्नधान्याचा पुरवठा करावा. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी. आवश्यक तेथे पर्यवेक्षक नियुक्त करावेत. त्यांच्या माध्यमातून अन्नधान्य वितरणाचे मोबाईलवर चित्रीकरण करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी सांगितले, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक माणसाला कोरोना विषाणूपासून दूर ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी नागरिकही सहकार्य करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्री.पंडित यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी धुळेकरांचेही चांगले सहकार्य लाभत आहे. ड्रोन खरेदीसाठी पालकमंत्री महोदयांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार डॉ. शाह, शव्वाल अन्सारी, साबीर शेख, मंजूर अन्सारी आदींनी मनोगत व्यक्त करीत रमजान ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करण्यात येईल, असे सांगितले.