Home Blog Page 2574

सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या-मागणी

पुणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या अन्य भागात इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

महामंडळाचे पुणे शहराचे अध्यक्ष महेश सांगळे, युवा अध्यक्ष नीलेश पांडे, गजानन पंडित यांच्यासह समाजाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून ही मागणी केली. कोरोना विरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी लॉकडाऊनच्या आधीच पासून सलून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अधिककाळ दुकाने बंद राहिल्याने सलून व्यावसायिक आणि कारागीर यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लॉकडाऊन नंतरही व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील अन्य भागातील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास शासन आणि महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप सलून व्यावसायिकांना ही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य भागातील दिलेल्या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.

ग्राहक आणि दुकान मालक व कारागिरांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी सर्व अटींचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, असे आश्‍वासनही आयुक्तांना देण्यात आलेल्या पत्रात संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. त्यावर लवकरच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले असल्याचे सांगळे यांनी सांगितले.

 

दस्तनोंदणीसाठी जाताना वकिलांना अडवू नये

जनअदालत संस्थेची ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे मागणी

पुणे – जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात वकिलांना दस्त नोंदणी करण्यास जाताना अथवा येताना अटकाव करण्यात येऊ नये, अशी मागणी जनअदालत संस्थेतर्फे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

सध्या लॉकडाउनचा काळ सुरू आहे. मात्र, महसुली उत्पन्नाची बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाला परवानागी दिली आहे. 15 मे 2020 च्या जिल्हधिकारी यांच्या परिपत्रकाअन्वये काही कार्यालये वगळता सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, वकिलांना दस्त नोंदणी करताना आंतर तालुक्‍यात जाताना त्यांची अडवणूक सुरू झाली आहे, पोलीस त्यांच्या पास किंवा कागदपत्रे मागत आहेत.

आंतर तालुक्‍यात जाताना अथवा जिल्ह्यात कोठे ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना वकिलांना अटकाव करू नये. बार कौन्सिलच्या अथवा स्थानिक वकील बार संघटनेच्या ओळख पत्रावर वकिलांना सोडण्यात यावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे, अॅड. राणी कांबळे , अॅड. अनिशा फणसाळकर, अॅड. नरहर कुलकर्णी, अॅड. स्वरूप कुमार चौधरी यांनी केली आहे.

खरीप हंगामासाठी ११ लाख शेतकऱ्यांना ८ हजार कोटी – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

0

सातारा दि. 23 (जिमाका): खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकऱ्यांना 8 हजार कोटींची रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.

ज्या  शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने  राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.

यामध्ये राज्य सहकारी बँकेच्या वतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यामध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कोरोनाचे आज २६०८ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४७ हजार १९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२३: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४७ हजार १९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५७७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २८,८१७ (९४९)

ठाणे: ३९४ (४)

ठाणे मनपा: २४४०५ (३५)

नवी मुंबई मनपा: १७७८ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७८४ (७)

उल्हासनगर मनपा: १४५ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४४२ (४)

पालघर:१११ (३)

वसई विरार मनपा: ४९९ (१५)

रायगड: ३२१ (५)

पनवेल मनपा: २९५ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३६,१७३ (१०६९)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: १०५ (२)

मालेगाव मनपा: ७११ (४४)

अहमदनगर: ५३ (५)

अहमदनगर मनपा: १९

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २९० (३६)

जळगाव मनपा: ११३ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५३५ (१०३)

पुणे: ३१२ (५)

पुणे मनपा: ४८०५ (२४५)

पिंपरी चिंचवड मनपा: २३० (७)

सोलापूर: २२ (१)

सोलापूर मनपा: ५४५ (३४)

सातारा: २०४ (५)

पुणे मंडळ एकूण: ६११८ (२९७)

कोल्हापूर:२०६ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ६३

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १४२ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५५ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११९७ (४२)

जालना: ५४

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १४०७ (४३)

लातूर: ६४ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २९

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८५ (५)

लातूर मंडळ एकूण: २२० (७)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३४२ (१५)

अमरावती: १३ (२)

अमरावती मनपा:  १४३ (१२)

यवतमाळ: ११३

बुलढाणा: ३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६८९ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४६२ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: ३९

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: १३

नागपूर मंडळ एकूण:  ५४५ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण:  ४७ हजार १९० (१५७७)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २६९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३४५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार ४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ओबीसींना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी २७ टक्के आरक्षण मिळावे – मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि.२३ :- वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असुनही केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमधील १५ टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांच्याकडे केलेली आहे.

श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, शासनाने मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण बेकायदेशीररित्या कमी केले तर ते उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी ६६,३३३ जागांमधून केंद्रीय कोट्यातील १५ टक्के प्रमाणे ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा आरक्षित असायला पाहिजे परंतु केवळ ३७१ जागा नावापुरत्या ओबीसींना आरक्षित करून देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी केवळ ३.८ टक्के एवढी आहे. त्या खालोखाल १३८५ जागा एस.सी (१५ टक्के) व  ६६९ (७.५ टक्के) जागा एस.टी ला त्यांच्या आरक्षणानुसार आरक्षित ठेवलेल्या आहेत. तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय कोट्यातून ७ हजार १२५ जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनारक्षित जागांची  टक्केवारी ७३.७ टक्के एवढी असल्याचे श्री. भुजबळांनी निदर्शनास आणुन दिले आहे.

मंडल आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी २७ टक्के, एस.सी १५ टक्के व एस.टी ७.५ टक्के असे घटनात्मक आरक्षण आहे. परंतु आरक्षणाचे सर्वनिकष, सुचना तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून  केंद्रीय  मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी फक्त ३७१ जागा ओबीसींसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. ओबीसींच्या वाट्याच्या २२०७ जागांसह एकुण ७ हजार १२५ जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओबीसी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे भुजबळांचे म्हणणे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे २७ टक्के आरक्षण देवून महाराष्ट्रासह देशातील केंद्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षणाच्या २ हजार ५७८ जागांवर त्यांना प्रवेश देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी श्री. भुजबळ यांनी केली आहे.

समन्वयाच्या अभावामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर – विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका

0

मीरा-भाईंदर मधील कोरोना परिस्थितीची घेतला आढावा
भाईंदर दि.२३:- राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळत असताना राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. मुख्य सचिव आणि आयुक्तांमध्ये समन्वय नाही. तसेच जिल्हा स्तरावरही जिल्हाधिकारी, आयुक्त आणि उप-आयुक्त यांची मनमानी काम करण्याची पद्धतही काही वेगळीच आहे. अशाप्रकारे आरोग्य यंत्रणेत अव्यवस्था असून ‘समन्वयाचा अभाव आणि अनियंत्रण’ हे कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज मीरा भाईंदर येथील कोरोनोची परिस्थिती तसेच शासना मार्फत पुरविल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या टेंभा येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. तेथील डॉक्टर,वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेतली तसेच रुग्णांच्या व्यवस्थेची विचारपूस केली. त्याचप्रमाणे गोल्डन नेक्स्ट या ठिकणच्या मोठ्या इमारतीत मध्ये सुरु करण्यात आलेल्या क्वारांटाईन सेंटरला भेट दिली. तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी प्रसंगी मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, उप महापौर हसमुख गेहलोत,स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, पालिकेचे सभागृह नेते रोहिदास पाटील,भाजपचे नगरसेवक ध्रुव किशोर पाटील, भाजपचे अमरजित मिश्रा आदी उपस्थित होते.
याप्रंसगी पत्रकारांशी संवाद साधताना श्री.दरेकर म्हणाले,राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती ओढवली असताना काही गोष्टी या घटना स्थळी मैदानात उतरल्यावरच समजतात.कार्यक्षेत्रात उतरल्यावर या विषयांचे खोल गांभीर्य लक्षात येते.तुलनात्मक पाहता मीरा भायंदर येथे कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी असून आतापर्यंत बारा रुग्ण दगावले आहेत.एकंदर येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु मीरा भाईंदर येथे सर्व यंत्रणांमध्ये अव्यस्था आहे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून मीरा भायंदर येथील व्यवस्था नीट मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त, महापौर,लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी यांचे समवेत बैठक घेणे आवश्यक होते. परंतु,जिल्हाधिकारी येथे फिरकले नाही. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी इकडे येऊन समाजातील लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केल्यावर त्यांना या परिस्थिती बाबत अधिक माहिती मिळाली असती. या माहितीच्या आधारे नियंत्रण करणे सोपे झाले असते. मात्र तसे घडले नसल्याचा खेद श्री.दरेकर यांनी व्यक्त केली.
कोरोनाशी लढण्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर, लोकप्रतिनिधी, पक्ष प्रमुख आदीं सोबत विचारविनिमय होणे आवश्यक आहे. ही सर्व मंडळी ऑन फिल्ड काम करत असल्याने यांच्याकडून अधिक माहिती मिळते.यामुळे व्यवस्था आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होते तरी जिल्हाधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या घटकांना सोबत घेऊन बैठक आयोजित करण्यास सांगणार असल्याचे श्री.दरेकर यांनी स्पष्ट केले.

उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसताहेत; कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू

0

मुख्यमंत्र्यांचा मुंबई पालिका रुग्णालय डॉक्टर्सशी संवाद

मुंबई, दि २३ : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो असा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, डीन, डॉक्टर्स यांच्याशी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन उपसंचालक डॉ. तात्याराव लहाने देखील सहभागी होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश व प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत तसेच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल अशी पाउले उचलत आहोत.

पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसेच सुसज्ज कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सुविधाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत विविध ठिकाणी आयसीयू व आयसोलेशन बेड्सची सुविधा आपण निर्माण केली आहे. या सुविधांचा उपयोग करण्याची वेळ येऊ देखील नये परंतु आपले नियोजन चांगले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू सारख्या आजारांमुळे रुग्ण वाढतील. त्यावरही तातडीने उपचार करावे लागतील यादृष्टीने पालिकेने तयारी ठेवावी. मला तुमच्याकडे पाहून हुरूप येतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही साथ ओसरल्यावर तुम्ही या विजयाचे खरे शिल्पकार असणार आहात यात काही शंकाच नाही.

राखीव खाटा- बिल आकारणी याबाबत शासन आदेशानुसार खाजगी रुग्णालयांना सेवा देणे बंधनकारक – विभागीय आयुक्त

शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार
— विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे,दि.23- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाला खाजगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज केले. रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुशंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज विधानभवनातील (कॉन्सिल हॉल) झुंबर हॉलमध्ये बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला, या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. दिलीप कदम आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या आदेशात जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार खाजगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे असे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिला.
पुणे शहरात विविध अंदाजानुसार कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून नियोजन करावे लागणार असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्णालयाने शासनाकडे अद्ययावत व वस्तूस्थितीदर्शक माहिती सादर करावी, जेणेकरून व्यवस्थापन करणे सुलभ होईल. खाजगी रुग्णालय व प्रशासन मिळून पुणेकरांसाठी एकत्रित काम करूया व पुण्याला कोरोनामुक्त करूया, प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे आवश्यक असून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण मिळून ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वासही डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त केला.
पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरबाबतही डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालये मिळून काम करू व यातून आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका आयुक्त श्री गायकवाड यांनी रुग्णालयांनी बेड व्यवस्थापन व्यवस्थित हाताळल्यास अडचण निर्माण होणार नाही व प्रत्येक गरजू रुग्णाला तातडीने उपचार देणे सुलभ होणार आहे.
पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच कोरोनाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृतीसाठी डॉक्टरांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी पुण्यातील खाजगी रुग्णालय व्यवस्थापाचे प्रमुख, डॉक्टर तसेच कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 3 हजार 15

पुणे विभागातील 3 हजार 159 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 6 हजार 487 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 23 :- पुणे विभागातील 3 हजार 159 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 487 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 15 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 5 हजार 367 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 770 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 334 आहे. कोरोनाबाधित एकूण 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 353, सातारा जिल्ह्यात 40, सोलापूर जिल्ह्यात 24, सांगली जिल्ह्यात 8, कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 241 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 548 कोरोना बाधीत रुग्ण असून 224 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 284 आहे. कोरोना बाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 70 कोरोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 228 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 68 हजार 668 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 58 हजार 801 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 779 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 52 हजार 403 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 487 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 27 लाख 40 हजार 696 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 68 लाख 40 हजार 875 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 636 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
(टिप : – दि.23 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

विनाशिधापत्रिकाधाकांना प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5 किलो तांदूळाचे मोफत वितरण – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि. 23 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत वित्तीय सहायक पॅकेजअंतर्गत केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधाकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत वित्तीय सहायक पॅकेज अंतर्गत जे विस्थापित मजूर, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत. अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर अशा प्रकारच्या व्यक्तींना प्रती माह 5 किलो तांदूळ देय आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी 27 मे 2020 पर्यंत संबंधित गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक,अध्यक्ष, ग्राम दक्षता समिती यांचेकडे उपलब्ध करुन दिलेला अन्नधान्य मागणी साठीचा विहित नमुन्यातील अर्ज भरुन जमा करावा. अर्जासोबत मोबाईल क्रमांक व आधार कार्डाची झेरॉक्स आधार कार्ड नसल्यास ओळखीबाबत इतर पुरावा अर्जासोबत सादर करावा. अर्जाचे छाननी नंतर पात्र लाभार्थ्याना 1 जून नंतर मोफत धान्य वाटप करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, भानुदास गायकवाड यांनी दिली आहे.

शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे आवाहन

0

महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

मुंबई, दि. २३:  महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक “सैनिक” बनून आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतूकास्पद आहे.

हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करताना दिसत आहे. आपणासारखे कोविड योद्धे आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ  मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपुजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील.  हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत ?  ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रजू झाल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रात २१ हजार ७५२ लोकांचे कोविड योद्धा म्हणून अर्ज

परिचारिका, फार्मासिस्ट, डॉक्टर, सामान्य स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, पॅरामेडिक, इतर वैद्यकीय व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञानक्षेत्र, शिक्षक, संरक्षण सेवा, सुरक्षा रक्षक, सैन्य वैद्यकीय संस्थेतील लोक अशा विविध क्षेत्रातून मुंबईसह महाराष्ट्रात २१ हजार ७५२ लोकांनी “कोविड योद्धे” होण्यासाठी अर्ज केले आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांची संख्या १२ हजार १०३ आहे तर इतर क्षेत्रातील ९ हजार ६४९. यात ३ हजार ७१६ कोविड योद्ध्यांनी रेड झोनमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

मुंबईसाठी ३७६६ अर्ज

महाराष्ट्रात कोविड योद्धासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ३७६६ अर्ज मुंबईसाठी आहेत. यात वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या १७८५ आहे तर इतर क्षेत्रासाठी १९८१ अर्ज आले आहेत.  मुंबईमध्ये उपचारासाठी ज्या जम्बो सुविधा निर्माण करण्यात येत आहेत त्यात काम करण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योद्धांना  बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही सुरु आहे.

कोविड योद्धा म्हणून काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योद्धांना सलाम करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांना व्यक्तिशः पत्र लिहुन आभार व्यक्त केले आहेत.

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

0

करिअर निवडीसाठी उपयुक्त या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. २३ : करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून १० हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. राज्यातील 9 वी ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टल चा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो, संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रमुख टेरी डुरीयन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पोर्टल तयार केल्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंचालक समन्वय विकास गरड, यांनी केली. हे करिअर पोर्टल http://www.mahacareerportal.com वर उपलब्ध आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड केयर सॉप्टवेअरचे प्रकाशन

पुणे,दि.22: पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉप्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या या सॉफ्टवेअरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शैलेंद्र पाठक यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार आहे.
या सॉफ्टवेअरबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व श्री.पाठक यांनी सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी या सॉफ्टवेअरच्या निर्मितीबाबत समाधान व्यक्त केले.

*****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

पुणे, दि.22 : कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते  बोलत होते.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,  ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त लावावी लागणार आहे. वैयक्तिक मास्कचा वापर, योग्य आंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांच्यात जनजागृती करावी लागणार आहे. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कोणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही श्री.पवार यांनी केल्या.

सद्यस्थितीत आपण सर्वजण विविध अडचणींचा मुकाबला करत आहोत. मात्र, या काळात अधिक काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काम करावे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे आज आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. या काळात शासन, प्रशासन, विविध यंत्रणा अनेक आघाड्यांवर लढत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक तथा साथरोग नियंत्रण चे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, प्रयोगशाळा चाचणी आणि रुग्णालय भरतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विविध अंदाजानुसार येत्या काही आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. स्थलांतरित मजूर किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींबाबत निश्चित भूमिका घ्यावी लागणार आहे. लोक आपापल्या गावी जात आहेत. स्थलांतरित मजूर तसेच हॉटस्पॉटमध्ये येणाऱ्या व्यक्तींना त्या-त्या जिल्ह्यात 14 दिवसांकरता क्वारंटाईनमध्ये ठेवावे.  ज्यांच्या घरी क्वारंटाईन करणे शक्य आहे. त्यांना घरगुती क्वारंटाईनची अनुमती द्यावी. अशी सुविधा नसल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे. क्वारंटाईन कालावधीमध्ये ज्यांना लक्षणे दिसतील त्यांचीच तपासणी करण्यात यावी. क्वारंटाईन नंतरचा 14 दिवसाचा कालावधी हा सेल्फ रिपोर्टिंग कालावधी आहे. या काळात या व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्याने आरोग्य व्यवस्थेस कळविणे आवश्यक असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी शासनाकडून निधी ससून रुग्णालयात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल असे श्री.पवार यांनी सांगितले. ससून रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी तपासणी केंद्राचा इतर साथीचा आजारासाठीही उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन

पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या हॉस्पीटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसे इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत करता येण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शैलेंद्र पाठक यांनी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. या सॉफ्टवेअरबाबत श्री.पाठक यांनी सविस्तर माहिती दिली.

विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आयुक्त शेखर गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्तण एस. चोक्कलिंगम यांनी कोरोनाबाबतच्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाचे आज २९४० नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४४ हजार ५८२ -आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२२ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद  शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७  पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८  रुग्ण आहेत तर ३१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)

ठाणे: ३६६ (४)

ठाणे मनपा: २२३४ (३३)

नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)

उल्हासनगर मनपा: १४४ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)

पालघर:१०७  (३)

वसई विरार मनपा: ४५१ (१४)

रायगड: २९९ (५)

पनवेल मनपा: २८२ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ९३ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४४)

अहमदनगर: ४९ (५)

अहमदनगर मनपा: २२

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २८६ (३६)

जळगाव मनपा: १०९ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)

पुणे: २८३ (५)

पुणे मनपा: ४४९९ (२३१)

पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २०४ (४)

पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०)

कोल्हापूर:१७५ (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ६२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १३५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११६५ (४२)

जालना: ४६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३)

लातूर: ५८ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २६

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (४)

लातूर मंडळ एकूण: २११ (६)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३३६ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा:  १३६ (१२)

यवतमाळ: ११३

बुलढाणा:३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६७२ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४५७ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: २८

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ९

नागपूर मंडळ एकूण:  ५२४ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण:  ४४ हजार ५८२  (१५१७)

(टीप आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २५९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार १५४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.