Home Blog Page 2553

पुणे विभाग नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यास सज्‍ज

पुणे विभागातील पुण्‍यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍हे येणा-या नैसर्गिक आपत्‍तीशी मुकाबला करण्‍यास सज्‍ज असून गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्‍हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात येत आहे. मागील वर्षी सातारा, सांगली आणि कोल्‍हापूर या जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी झाल्याने या वर्षी महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्‍य या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, गृह मंत्री अनिल देशमुख यांनी तसेच यापूर्वी उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागाचा आढावा घेवून आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या.

विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी विभागातील तसेच जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्‍ह्यातील सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली. सन 2019 मध्‍ये पुणे विभागातील 38 तालुकयातील 727 गावांमधील 2 लाख 6 हजार 452 कुटुंबे अतिवृष्‍टीमुळे बाधित झाली होती. पुणे विभागातील सांगली व कोल्‍हापूर जिल्‍ह्यांसाठी प्रत्‍येकी 2 एनडीआरएफ ( राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण पथक) टीम पुरविण्‍याबाबत विनंती करण्‍यात आली आहे. यंदा ‘कोरोना’चे संकट असून नैसर्गिक आपत्‍ती उद्भवल्‍यास सक्षमपणे मुकाबला करता यावा, यासाठी काटेकोर नियोजन करण्‍यात आले आहे.

पुणे विभागातील सर्व जिल्‍ह्यांच्‍या व महानगरपालिकांच्‍या मान्‍सूनपूर्व आढावा बैठका झालेल्या आहेत. पुणे जिल्‍ह्याची 20 मे रोजी, सातारा जिल्‍ह्याची 30 एप्रिल रोजी, सांगली जिल्‍ह्याची 6 मे रोजी, सोलापूर जिल्‍ह्याची 15 मे रोजी आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्याची 27 एप्रिल रोजी मान्‍सूनपूर्व आढावा बैठक झाली. पुणे महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांची 21 मे रोजी, पिंपरी-चिंचवड मनपाची 17 मे रोजी, सांगली-मीरज-कूपवाड मनपाची 30 एप्रिल रोजी, सोलापूर मनपाची 21 एप्रिल रोजी तर कोल्‍हापूर मनपाची 12 मे रोजी बैठक झाली. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील तसेच महानगर पालिकेकडील नियंत्रण कक्षामध्‍ये आवश्‍यक ती साधन सामग्री उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. पुणे जिल्‍ह्यात 8 बोटी, 40 लाईफ जॅकेट, 40 लाईफ बॉईस, 7 सर्च लाईट तर रोप 16 आहेत. सातारा जिल्‍ह्यात 5 बोटी, 40 लाईफ जॅकेट्स 40 लाईफ बॉईस, 30 सर्च लाईट तर रोप 10 आहेत. सांगली जिल्‍ह्यात 51 बोटी, 65 लाईफ जॅकेट, 46 लाईफ बॉईस, 25 सर्च लाईट, 34 सेल्‍फी हेल्‍मेट, 58 मेगा फोन तर फ्लॉटींग पंप 20 आहेत. सोलापूर जिल्‍ह्यात 3 बोटी, 44 लाईफ जॅकेट, 29 लाईफ बॉईस, 40 सर्च लाईट, 40 सेल्‍फी हेल्‍मेट, 30 मेगा फोन तर फ्लॉटींग पंप 2 आहेत. कोल्‍हापूर जिल्‍ह्यात 17 बोटी, 200 लाईफ जॅकेट, 306 लाईफ बॉईस, 20 सर्च लाईट, 100 रोप, 50 सेल्‍फी हेल्‍मेट, 21 मेगा फोन तर फ्लॉटींग पंप 7 आहेत. सांगली तसेच कोल्‍हापूर जिल्‍ह्याला यांत्रिकी बोटी, फायबर बोटी सर्व साहित्यासह खरेदी करण्‍यास निधी उपलब्ध करुन देण्‍यात येणार आहे. रिअल टाईम डाटा सिस्‍टीम (आरटीडीएस) यंत्रणा 30 जून पूर्वी कार्यान्वित करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. एनडीआरएफ ( राष्‍ट्रीय आपत्‍ती निवारण पथक) टीमच्‍या दोन पथकांपैकी एक सांगलीसाठी व एक इस्‍लामपूर येथे 1 जुलै ते 15 ऑगस्‍टपर्यंत (25 जवान व 5 बोटीसहीत) ठेवण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. गतवर्षीच्‍या पुराचा विचार करुन धरणातील पाणी साठा आणि विसर्ग या संदर्भात आवश्‍यक तो निर्णय शासन स्‍तरावर घेण्‍यात येणार असल्‍याने त्‍यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

पुणे विभागातील जिल्‍ह्यांमध्‍ये मागील वर्षी झालेला पाऊस आणि पावसाची सरासरी (कंसात) पुढीलप्रमाणे होती. पुणे जिल्‍हा 1116.77 मि.मी. (सरासरी 752.78मि.मी.), सातारा 1330.54 मि.मी. (834.26 मि.मी.), सांगली 710.97 मि.मी. (सरासरी 418.41 मि.मी.), सोलापूर 331.12 मि.मी. (सरासरी 488.81 मि.मी.) आणि कोल्‍हापूर 2042.83 मि.मी. (सरासरी 1772.37 मि.मी.)

कृष्‍णा खोरे महामंडळातील धरणांची साठवणूक क्षमता (टीएमसी) व 6 जून 2020 रोजी असलेला धरणाचा साठा (कंसात) पुढीलप्रमाणे आहे. कोयना 105.25 टीएमसी (28.62 टीएमसी), धोम 13.50 टीएमसी (3.69 टीएमसी), कण्‍हेर 10.10 टीएमसी (2 टीएमसी), वारणावती 27.52 टीएमसी (4.81 टीएमसी), दुधगंगा 23.98 टीएमसी (6.01 टीएमसी) राधानगरी 7.77 टीएमसी (0.73 टीएमसी), उरमोडी 9.96 टीएमसी (5.79 टीएमसी)आणि तारळी 5.85 टीएमसी (2.29 टीएमसी) इतका आहे.

भीमा खोरे महामंडळातील धरणांची पाणी साठवणूक क्षमता आणि (कंसात) 6 जून 2020 रोजी उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. वरसगांव 12.82 टीएमसी (2.74 टीएमसी), पानशेत 10.65 टीएमसी (3.17 टीएमसी), पवना 8.51 टीएमसी (2.95 टीएमसी), मुळशी 18.47 टीएमसी, (2.17 टीएमसी), चासकमान 7.58 टीएमसी (1.24 टीएमसी), भामा आसखेड 7.67 टीएमसी (2.71 टीएमसी), भाटघर 23.50 टीएमसी (6.51 टीएमसी), निरा देवघर 11.73 (2.57 टीएमसी), वीर 9.41 टीएमसी (2.93 टीएमसी), माणिकडोह 10.17 टीएमसी (0.84 टीएमसी), डिंभे 12.49 टीएमसी (3 टीएमसी), घोड 5.47 टीएमसी (निरंक),उजनी 53.57 टीएमसी (उणे 9.47 टीएमसी).

मागील वर्षी अतिवृष्‍टीमुळे सांगली जिल्‍ह्यात 4 तालुकयातील 104 गावांमधील 87 हजार 909 कुटुंबे बाधित झाली होती. कोल्‍हापूर जिल्‍ह्यात 12 तालुक्‍यातील 386 गावांमधील 1 लाख 2 हजार 557 कुटुंबे, सातारा जिल्‍ह्यात 5 तालुकयातील 65 गावांमधील 1 हजार 976 कुटुंबे, सोलापूर जिल्‍ह्यात 7 तालुकयातील 102 गावांमधील 6 हजार 396 कुटुंबे तर पुणे जिल्‍ह्यात 10 तालुकयातील 70 गावांमधील 7 हजार 614 कुटुंबे बाधित झाली होती.

अतिवृष्‍टीचा गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा सर्व यंत्रणा सज्‍ज आणि दक्ष आहेत. ‘कोरोना’चे संकट असले तरी महसूल, पोलीस, आरोग्‍य, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग या सर्व यंत्रणा परस्‍पर समन्‍वय साधून नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यात यशस्‍वी होतील, असा विश्‍वास आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

कोकणातील चक्रिवादळामुळे उद्ध्वस्त घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये द्यावेत -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

शासनाने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली
दापोली, मंडणगड येथील भागांची केली पाहणी
दापोली, दि.८:- निसर्ग वादळाच्या तडाख्याने कोकणची मोठी हानी झाली असून कोकणाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याची आवश्यकता आहे. वादळाच्या तडाख्यामुळे येथील व्यवसाय, बागा, आंबा, नारळ, सुपारी,काजूंच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे कोकणातील उद्ध्वस्त झाडांना राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत आलेल्या झाडांप्रमाणे मदत देण्यात यावी तसेच वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक घराच्या मदतीत (स्टॅंडर्ड नॉर्म) प्रमाणित नियमांमध्ये तीन पटींची भर राज्य शासनाने घालून पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये आर्थिक मतद देण्यात यावी अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. तसेच शासनाने कोकणाला दिलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. तुटपुंजी मदत देऊन शासनाने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ही मदत उभारी देण्यासाठी काही कामाची नाही. याकरिता शासनाने कोकणाला जास्तीत जास्त वाढीव मदत द्यावी अशी मागणीही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज केली.
निर्सग चक्रिवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दोपोली तालुक्यांचे या चक्रिवादळात प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी माजी आमदार विजय नातू यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाप्रमुख मकरंद म्हादलेकर, श्रीराम इदाते, स्मिता जावकर, उदय जावकर, जया साळवी, इकबाल परकार आदी उपस्थित होते.उपस्थित होते. याप्रसंगी श्री.दरेकर यांनी दापोली तहसीलदार कार्यालय येथे शासकीय अधिका-यांसमवेत बैठक घेतली याप्रसंगी महसूल, पोलिस, कृषी, वैद्यकीय व विद्युत वितरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी चक्रिवादळाच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद साधताना श्री.दरेकर म्हणाले,निसर्ग वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेले एक झाड पुढील पंधरा ते वीस वर्षे उत्पन्न देणार होतं. हे झाड कोसळल्याने सुमारे १५ वर्षाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कोल्हापुरात मदत करण्यात आली, त्याच धर्तीवर जनावर, झाड, घर यांचे नुकसान लक्षात घेऊन तशी मदत कोकणात देखील करावी. प्रत्येक आंब्याला किंवा झाडाला जसा आपल्या (नॅशनल हायवे) राष्ट्रीय महामार्ग हद्दीत झाड गेल्यानंतर भविष्यात पंधरा वर्षे ते झाड काय उत्पन्न देणारे होतं त्याचा आधारित मदत केली जाते त्याच प्रमाणे निसर्ग चक्रिवादळामुळे कोसळलेल्या झाडांना मदत द्यावी. तसेच या भागातील लाखो घरे पूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत, त्या उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी स्टॅंडर्ड नॉर्म प्रमाणे रुपये ९० हजार देऊन चालणार नाही. तर त्या ठिकाणी प्रत्येक घराच्या मदतीत स्टॅंडर्ड नॉर्ममध्ये तीन पटींची अधिक भर राज्य शासनाने घालावी. पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये देण्यात यावे. त्यांचा अंतर्भाव पंतप्रधान आवास योजनेमध्ये होणे अपेक्षित असल्याने कोकणाला जी मदत देण्याची आवश्यकता आहे याबाबत अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन इथले जनजीवन सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जी मदत लागेल ती आम्ही मिळवून देऊ. तसेच राज्य शासनामार्फत जी तातडीची मदत द्यायची आहे ती मदतीसाठी आम्ही आग्रही राहू पण येथील नागरिकांचे विस्कळित झालेले जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करावे अशी विनंतीही सरकाराला करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
श्री.दरेकर यांनी सांगितले की, रत्नागिरी दौऱ्या दरम्यान निसर्ग चक्रिवादळाने प्रभावित झालेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आढावा घेण्यात आला. हे करताना केवळ नाममात्र दौरा करून लोकांशी बोलायचे फोटो काढायचे आणि निघुन जायचे या दृष्टीने आम्ही आलो नाहीत. तर,कोकणाला निसर्ग वादळाने झोडपले असून येथील गावे उध्वस्त केली आहेत त्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत.
वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आम्ही एकत्रित फिरण्याऐवजी आमदार व भाजपा नेत्यांच्या नेतृत्वाखाली तीन ते चार लोकांचे पथक तयार करून अधिकाधिक गावांची पाहणी करून आढावा घेण्यात आला आहे. अशाप्रकारे जास्तीजास्त गावांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करित आहोत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती समोर येईल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर या बांधवांना आणखी ताकदीने मदत करण्यात येईल. तसेच कोकणाला जास्तीत जास्त आर्थक मदत मिळवूनच देऊ व त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करु असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
निसर्ग वादळाच्या तडाख्याने बाधित झालेल्या नुकसाग्रस्तांसाठी ७५ कोटींची घोषणा करण्यात आली ती अत्यंत तुटपुंजी आहे. रायगडला १०० कोटी देण्यात आले आहेत पण त्यापेक्षाही जास्त नुकसान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले आहे. त्यामुळे २५ आणि ७५ कोटींची मदत दाढेलाही पुरणार नाही अशी टीका करताना श्री दरेकर म्हणाले, चक्रिवादळाच्या तडाख्यात अनेक गावांचे नुकसान झालं आहे आणि जे अधिक प्रमाणात ग्रासले आहेत त्यामध्ये हरणे, तांझ, अंजर्ली या गावांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर आमदार भाई गिरकर यांनी लाटघर,करंजगाव, तामसतीर्थ या गावांची पाहणी केली . तर आमदार प्रसाद लाड यांनी मुरुड, पालंदे या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर आमची तीन पथके मंडणगडला एकत्रित येऊन तेथील परिस्थितीतचा आढावा घेण्यात आला. विरोधी पक्षाचा हा दौरा म्हणजे केवळ दिखावा करायचा नाही. तर या ठिकाणच्या वादळग्रस्त लोकांना दिलासा तात्काळ देण्याची आवश्यकता आहे तो देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री दरेकर यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य करण्याता येत आहे. कोकणातील लोकांना घरांचे पत्रे, कौल ,अन्नधान्य त्याचबरोबर दिव्यांची व्यवस्था उद्या पर्यंत पोहोचणार आहे. तहसीलदार नुकसानीच्या खर्चाचा अधिकृत आकडा घेऊन आमच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवाकार्य मोठ्याप्रमाणावर करून इथल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. निसर्ग चक्रिवादळ आले तेव्हा विरोधी पक्ष नेत्या या नात्याने सर्वप्रथम अलिबाग रायगड येऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. येथील परिस्थितीची तीव्रता लक्षात आल्यावर सरकारचे लक्ष वेधलं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अलिबागला यावे लागले. अशाप्रकारे विरोधी पक्ष म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत कोकणसाठी आवश्यक उपाययोजनांची आग्रही मागणी करतोय. या मागणीची पूर्तता व्हावी म्हणून आमचे सात ते आठ आमदार या ठिकाणच्या तालुक्यांमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. अशाप्रकारे कोकणवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न दौऱ्याच्या माध्यमातून राहणार असल्याचे श्री दरेकर यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 275;पुणे जिल्ह्यात ॲक्टीव रुग्ण 3 हजार 178

पुणे विभागातील 7 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 12 हजार 418 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 8 :- पुणे विभागातील 7 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 हजार 418 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 275 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 245 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 651 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 234 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 204 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 128, सातारा जिल्ह्यात 10, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 19 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 631 कोरोना बाधीत रुग्ण असून 331 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 272 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1295 कोरोना बाधीत रुग्ण असून 666 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 514 आहे. कोरोना बाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 161 कोरोना बाधीत रुग्ण असून 90 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 65 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 680 कोरोना बाधीत रुग्ण असून 426 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 246 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 1 हजार 633 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 98 हजार 257 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 376 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 85 हजार 658 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 12 हजार 418 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि. 8 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज

नियमांचे पालन व योग्य खबरदारी घेतल्यास वाघोली लवकरच कोरोनामुक्त होईल

  • जिल्हाधिकारी नवल किशोर राम
    पुणे दि. 8 : पुणे जिल्हयातील वाघोली परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत. याबरोबरच नागरिकांनीही याबाबत स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या नियमांचे पालन करीत खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाच्या संकटावर निश्चितपणे मात करु तसेच आगामी काळात यादृष्टीने खबरदारी घेतल्यास व आपले वाघोली गाव व परिसर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला.
    जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज वाघोली ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेसोबतच ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सरपंच वसुंधरा उबाळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी राम यांनी वाघोली व परिसरातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, गावातील कोणत्या भागात रुग्ण वाढीचे प्रमाण वाढत आहे व त्याची कारणे काय आहेत, बाहेरील जिल्हयातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भांतील सुरु असलेली कार्यवाही, जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, मास्कचा व सॅनीटायझरचा वापर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.
    वाघोली परिसरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी स्थानिकांचा पुढाकार महत्वाचा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, वाघोली परिसरात कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना सोबतच स्वयंशिस्त महत्वाची आहे. विलगीकरण प्रक्रीया काटेकोरपणे राबविली गेली पाहिजे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही याची काळजी ज्याप्रमाणे प्रशासकीय पातळीवर घेतली जाते तशीच काळजी नागरिकांनीही घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट लगेच संपणारे नाही त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
    पुणे शहर पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यात येत आहेत. नागरिकांनीही वैयक्तिकरित्या या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. तसेच प्रतिबंधित उपाययोजना करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, तसेच सोबतच मास्क, सॅनीटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग आदींचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले.
    मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वाघोलीत कोरोना संसर्गाबाबत प्रतिबंधाकरीता समाजमाध्यमांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी मास्क, सॅनेटायझर व इतर उपकरणांचा नियमितपणे वापर करावा. तसेच अनावश्यक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी असे आवाहन त्यांनी केले.
    जिल्हाधिकारी राम यांनी भारतीय संस्कृती दर्शनच्या आयुर्वेदिक हॉस्पीटल येथे भेट देवून त्याठिकाणी असणा-या सोईसुविधांबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्ष तसेच प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक उपस्थित होते.

‘बॉम्बे डे’ या गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीजच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरुवात

महाराष्ट्र शासनाने काही नियम आणि अटी पाळून लॉकडाऊन ५.० मध्ये चित्रपट, मालिका आणि
वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिल्यामुळे बऱ्याच प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या प्री-प्रॉडक्शनच्या कामाला आणि, निर्मात्यांनी शूटिंगला सुरुवात केली आहे आणि यामध्ये गुन्हेगारीवर आधारित ‘बॉम्बे डे’ या आगामी वेब सिरिजचं नाव प्रथम स्थानावर आहे.

भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित ‘बॉम्बे डे’ या वेब सिरिज चा मुहूर्त सोहळा नुकताच नितिन चंद्रकांत देसाई यांच्या ‘एन. डी. फिल्म स्टुडिओ’ येथे संपन्न झाला. नितीन चंद्रकांत देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या हस्ते चित्रीकरणाचा शुभारंभ झाला.

1 फाईव्हफिल्म्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘बॉम्बे डे’ ही गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज सत्य घटनेपासून प्रेरित आहे. ही गोष्ट आहे मुंबईमधल्या एका मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनची, ज्याचा एन्काऊंटर विजय साळसकर यांनी केला होता. त्या काळात विजय साळसकर यांनी बऱ्याच कुख्यात गुंडाचे एन्काऊंटर केले होते, पण हा एन्काऊंटर मुंबई मधला सर्वात मोठा एन्काऊंटर ठरला. त्यांना कोणी मदत केली? नक्की कोण कोण यामध्ये सहभागी होते? यात कोणत्या राजकारण्याचा संबंध होता का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं
वेब सिरिजच्या माध्यमातून मिळणार आहेत.असा दावा करण्यात आहे.

या वेब सीरिजमधून अनुपम खेर, जूही चावला, अनिकेत विश्वासराव, इक्बाल खान, शक्ती कपूर, आणि संदीपा धार हे विविध व्यक्तिरेखा साकारणार आहेत . प्रसाद पांचाळ हे कार्यकारी निर्माते आहेत तर धरम सावलानी हे लाईन प्रोड्यूसर आहेत आणि चारू खाबडे या मार्केटिंग आणि इंटिग्रेशनच्या प्रमुख आहेत. ही वेब सिरीज नोव्हेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांचा पुढाकार

पुणे:
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे यासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांनी  ऑन लाईन पिटीशन  दाखल केली आहे.जनतेच्या भावना व्यक्त व्हाव्यात यासाठी ‘चेंज डॉट ओआरजी ‘ या संकेतस्थळावर ही पिटीशन दाखल केली असून त्यावर नागरिकांनी संमती दर्शक प्रतिसाद द्यावा ,असे आवाहन केले आहे. 

‘चेंज डॉट ओआरजी ‘ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. डॉ. अमोल देवळेकर यांनी ही ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

याबाबत डॉ. अमोल देवळेकर यांनी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली असून सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आहे. 
‘ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान आहेत.राज्यातील गेल्या सहा महिन्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय .या वयात राज्यपाल महोदयांच्या प्रकृतीवर अतिरिक्त ताण येणाऱ्या सर्व घटना आहेत.अगदी प्रातःविधी आधी शपथविधी,सारखेच चहापाण्यास येणारी मंडळी हे सगळे प्रकार राज्यपाल महोदयांच्या आरोग्यास घातक आहेत.राज्यपाल पदाच्या महानतेला न शोभणारी चिखलफेक मनाला दुःखी  करते .शिवराम हरी राजगुरूंच्या या राज्यात भगतसिंग नाव धारण केलेल्या व्यक्तीची सत्तालोलुप राजकारणाच्या पोटी इतकी अवहेलना नको.  हे सगळे तमाम मराठी माणसांना वेदनादायी आहे तेव्हा लवकरात लवकर त्यांना दिल्लीत सन्मानपूर्वक परत बोलवावे ही नम्र विनंती ! ‘,असे डॉ अमोल देवळेकर यांनी  त्यांच्या आवाहनात नमूद केले आहे. त्यांची याचिका (पिटीशन) ही  ‘चेंज डॉट ओआरजी  ‘ या संकेतस्थळावर ही पिटीशन दाखल झाली आहे. त्यावर नागरिक संमतीदर्शक प्रतिसाद देत असून आपापली मतेही व्यक्त करीत आहेत .http://chng.it/w8ywxDbV या संकेतस्थळावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पावसाळ्यातील वीजसुरक्षा

0

येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल. कोरोना विषाणूच्या सावटात यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून सावध राहण्याची अधिक गरज आहे. त्याचप्रमाणे घरातील वीज उपकरणे व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जाणते अजाणतेपणी झालेली क्षुल्लक चूक सुद्धा विद्युत अपघातासाठी कारणीभूत ठरू शकते

पाणी विजेचे वाहक – खबरदारी महत्वाची!

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.

फ्यूज तार म्हणून तांब्याची तार धोक्याची

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

जुनाट वायरिंग व अर्थींग तपासणे आवश्यक

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.

सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावधान

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

महावितरणचे अभियंते व जनमित्रांची कसोटीच

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

वीजपुरवठा खंडित होण्याची विविध कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. याशिवाय मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईट किंवा ट्वीटरद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्याची सोय आहे. महावितरणकडे वीजग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. तसेच ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.

लेखक – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण पुणे.

डबा… जेवणाचा आणि खाऊचा (लेखिका:पूर्णिमा नार्वेकर)

0

‘वहिनी  जूनपासून शॉप सुरू होणार ना’ – सोनलचा मेसेज.

‘हो गं. आठवणीने डबा घेऊन ये. बाहेर काहीही मिळणार नाही खायला’…इति मी.

‘हो वहिनी, डबा आणणारच आहे मी.’ 

सोनल आणि माझ्यामधील हा मेसेज संवाद. हळूहळू लॉकडाऊन उठणार आहे. दुकानं चालू होणार तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतही काही टक्के वाढ होणार. ऑफिसमधील कँटीन, बाहेरील वडापाव किंवा सँडविचची गाडी, रेस्टॉरंट यापैकी काहीही चालू होणार नसल्यानं कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला घरून डबा घेऊन जाणं मस्टच आहे. 

मुंबईत करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली तसे लगोलग बऱ्याच प्रायव्हेट सेक्टरमधील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम चालू केले. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो या विचाराने डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबा सर्व्हिस बंद केली; एक कारण अजून की मुंबईची रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या रेल्वेवरच तर डबेवाल्यांची मोठी भिस्त. त्यांच्यासाठी रेल्वेत खास डबाही राखीव! बऱ्याचशा कंपन्या आणि रेल्वे बंद झाल्यावर डबेवालेही डबे सर्व्हिस बंद करून गावी निघून गेले. घाटकोपरला राहणारे डबेवाले उर्जित आवरी यांनी सांगितले, “आम्ही तरी काय करणार…रेल्वेच बंद झाली. करोनाचे रुग्ण वाढायला लागले…त्यामुळे आता हातात कामही नाही, म्हणून 80 टक्के डबेवाले गावी निघून गेले आहेत. काही जण होते मुंबईत पण मे मध्ये सगळेच बहुदा गावी गेले. मी पण माझ्या गावी राजगुरूनगरला आलो. मधेच सगळं बंद झालं त्यामुळे मार्च महिन्याचेही पैसे आम्हाला मिळाले नाहीत. कसा काय मुंबईत निभाव लागणार? त्यापेक्षा गावी गेलेलं बरं म्हणून कुटुंबासोबत गावी आलो. आता परत कधी सगळं चालू होतंय याकडे आम्ही डोळे लावून बसलोय…”

प्रभादेवीला राहणारे आणि त्याच परिसरात घरगुती डबा सर्व्हिस पुरवणारे श्री. फाळके म्हणाले की लॉकडाऊनमुळे ऑफिसचे डबे सध्या बंद आहेत पण नेहमी घरी डबा मागवणारेही खूप लोक आहेत. ते सध्या घरी येऊन डबा घेऊन जातात म्हणून आम्ही डबा बंद नाही केलाय. असाच अनुभव दहिसरमधील ‘सुस्वाद’च्या निमकर यांचा आहे. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांचीही डबा सर्व्हिस बंद झाली होती. पण 7- 8 दिवसांनी नेहमीच्या ग्राहकांचे फोन यायला लागले. मग त्यांनी पुन्हा डबा सर्व्हिस चालू केली. मिरारोड ते कांदिवलीपर्यंत सध्या फक्त सकाळचा डबा ते घरपोच देत आहेत. याआधी सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचा डबा ते देत होते; पण आता शक्य नसल्याने फक्त एक वेळचाच देत आहेत. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही असेच काहीसे अनुभव आलेत. बॉम्बे सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्टात काम करणाऱ्या एका मैत्रीणीने  सांगितले की हल्ली रोज अगदी आठवणीने डबाच काय पण सुका खाऊही न्यावा लागतो आहे. लॉकडाऊन लागल्यावर कँटीन बंद झाले कारण बरेचसे आपापल्या गावी निघून गेले. कँटीनमधील 2-3 मुलं आणि बाकी स्टाफ राहिला आहे. त्यांच्यासाठी पोळी-भाजीचा डबा आम्ही कामावर येणारे कर्मचारी घेऊन येतो. आणि एक वेळ स्वतः ते डाळ-भात करून खातात. बाहेर काहीही मिळत नाही म्हणून आमच्या साहेबांनी त्या मुलांसाठी सुका खाऊही आणून दिला आहे. 

विमा कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या एका मैत्रिणीने ही परिस्थिती बिकट आहे असंच सांगितलं. कँटीन पूर्णपणे बंद. काही मुलं जी घरी जाऊ शकली नाहीत ती, सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, माळी अशी मिळून 30-40 जणं आहेत. कँटीन बंद, ज्यामुळे त्यांच्या जेवणाचे हाल. मग आम्ही त्यांना रेशन भरून दिलं. त्यामुळे निदान डाळ-भातावर तरी दिवस ढकलला जातोय. आम्ही मात्र सगळे कर्मचारी नेमाने घरून डबा घेऊन येतो. साधा चहा सुद्धा मिळत नाही हो. 

घरचा डबा…सगळ्यांच्या कथेतून आणि व्यथेतून घरच्या डब्याचं महत्त्व जाणवलं. शाळेत असताना नाही का आपण खाऊचा आणि पोळी-भाजीचा डबा घेऊन जात होतो. तेव्हा त्या डब्याचं आणि त्यातील खाऊचं किती अप्रूप असायचं! फास्टफूडच्या जमान्यात डब्याचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं. ‘मिळतं की बाहेर सगळं, कशाला तो डबा घेऊन फिरायचं’ ही मानसिकता वाढीस लागली होती. करोनाच्या लॉकडाऊनने पुन्हा एकदा घरच्या डब्याचं महत्त्व अधोरेखित केलं. बाहेर जाताना न्यायलाच हवा आता डबा…जेवणाचा आणि खाऊचाही!

© पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरु

पुणे, दि. 08 जून 2020 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 240 वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता येत्या काही दिवसांत उर्वरित वीजबिल भरणा केंद्र सुरु होणार आहेत.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणचे पुणे परिमंडलातील वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. तसेच 23 मार्चपासून मीटर रिडींग व छपाई केलेल्या कागदी वीजबिलांचे वितरण बंद करण्यात आले. त्यामुळे वीजग्राहकांना मासिक वीजवापराएवढे सरासरी वीजबिल मोबाईल ‘एसएमएस’द्वारे तसेच अॉनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. वीजग्राहकांना पाठविण्यात आलेले सरासरी वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीजग्राहक व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपात आरोग्याची काळजी घेऊन वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडून महावितरणला देण्यात आली आहे. ही काळजी घेऊन महावितरणने पुणे शहरातील 207 पैकी 54, पिंपरी चिंचवड शहरातील 96 पैकी 46 आणि मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी, वेल्हे या तालुक्यांमध्ये 239 पैकी 140 वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये महावितरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर सहकारी बँका व पतसंस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये वीजबिल भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कर्मचारी व वीजग्राहक यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेणेव फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे नियम पाळणे तसेच सॅनिटाईजरची सोय उपलब्ध करून देणेबाबत केंद्रचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वीजग्राहकांना पाठविण्यात आलेल्या मोबाईल ‘एसएमएस’द्वारे किंवा केवळ ग्राहक क्रमांकाच्या आधारे वीजबिल भरून घेण्याची सूचना केंद्रचालकांना देण्यात आली आहे. वीजग्राहकांनी वीजबिल उपलब्ध नसल्याने वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवावा किंवा जुने वीजबिल दाखवावे. ते सुद्धा उपलब्ध नसल्यास फक्त ग्राहक क्रमांक सांगितला तरी वीजबिलाची रक्कम भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासोबतच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची वेबसाईट www.mahadiscom.in तसेच मोबाईल अॅप व इतर पर्यायांद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध आहे.

अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर…मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई. अभिनेता सोनू सूद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख होते. दरम्यान, या भेटीनंतर साेनू याने माध्यमांशी बोलताना आमच्यात काहीही गैरसमज नसल्याचे सांगितले. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

सोनू याने लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केली होती. सेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत कलगीतुरा रंगला होता. सेनेकडून या भेटीवर काहीही प्रतिक्रिया आली नाही.

महाराष्ट्र वगळता गुजरातसह 17 राज्यांत आजपासून उघडणार मॉल, मास्कविना पूजास्थळी प्रवेश नाही

0

नवी दिल्ली. देशात अनलॉक-१ ला ७ दिवस पूर्ण झाले आहेत. ७५ दिवसांनंतर सोमवारपासून हॉटेल, रेस्टोरंट, शॉपिंग सेंटर, आर्थिक कारभारासह धार्मिक विधी सुरू होतील. केंद्राचे दिशानिर्देश मिळताच दिल्ली, गुजरातसह १७ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत सोमवारी कंटेनमेंट झोनबाहेरील मॉल सुरू होतील. महाराष्ट्रात अद्याप मॉल उघडण्यास परवानगी नाही. केरळात मंगळवारी मॉल उघडतील.

९ राज्यांनी मॉल सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. ७ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत जूनमध्ये मॉल बंदच राहतील. पूजा-उपासना होत असलेली ८२० स्मारके सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्रालयाने केली. सर्वाधिक १११ स्मारके यूपीत सुरू होतील, तर कर्नाटकात ७५, महाराष्ट्रात ६५, मध्य प्रदेशात ६०, गुजरातेत ७७ स्मारक स्थळे सुरू होतील. या स्थळावर पूजा-उपासनेसाठी संख्या निर्धारित राहील व मास्क आवश्यक राहील. देशात पुरातत्व विभाग ३६९१ स्मारके-स्थळांचे संरक्षण करतो.

या राज्यांतील मॉल सुरू होणार

शॉपिंग सेंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांच्या मते, सोमवारपासून आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, प. बंगाल, उत्तराखंड, यूपी, तेलंगण, राजस्थान, पंजाब, पुद्दुचेरी, कर्नाटक व हरियाणातील मॉल सुरू होतील. पंजाबमध्ये मॉलसाठी टोकन पद्धत लागू राहणार आहे.

या राज्यांत निर्णय नाही : हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा राज्य.

या राज्यांत ३० जूनपर्यंत बंद राहतील मॉल : महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, दमण-दीव या राज्यांत या महिन्यात मॉल बंद राहतील.

केंद्र सरकारची एसओपी : एसीचे तापमान २४ अंशांपेक्षा कमी ठेवता येणार नाही, मंदिरात घंटा वाजवण्यास बंदी

हॉटेल : डिजिटल पेमेंट होईल : स्पर्शाविना चेक-इन आणि चेक-आऊटची व्यवस्था करावी लागेल. खोल्यात ठेवण्यापूर्वी सर्व सामान निर्जंतुक केले जाईल.

मॉल : एसी २४ ते ३० अंश, आर्द्रता ४० ते ७० % ठेवावी लागेल. एलिव्हेटरवर मर्यादित संख्या निश्चित करावी लागेल. फूड कोर्टमधील निम्मी आसने रिकामी राहतील.

– मास्कविना पूजास्थळी प्रवेश नाही. मूर्ती-ग्रंथांना स्पर्श करता येणार नाही. घंटा वाजवण्यावर बंदी. बसून पूजा करण्यासाठी घरातून चटई न्यावी लागेल. प्रसाद, तीर्थ शिंपडण्यावर बंदी.

रेस्तराँमध्ये बसून खाण्याऐवजी टेक अवेला उत्तेजन. होम डिलिव्हरी करणारे पार्सल दारात ठेवतील. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.

आतापर्यंत १० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

0

मुंबई, दि. ७ : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 7 जून 2020 या काळात 10 लाख 78 हजार 121 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. आज दिवसभरात 68 हजार 442 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 39 हजार 473 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,710 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 1 मे 2020 ते 31 मे 2020 या काळात 1 लाख 20 हजार 547 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 10 हजार 763 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, ॲड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.7 जून 2020 रोजी राज्यात 82 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 41 आरोपींना अटक करण्यात आली असून 17 लाख 34 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासून दि.7 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 7,452  गुन्हे नोंदविण्यात आले असून 3,450 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 675 वाहने जप्त करण्यात आली असून 18 कोटी 99 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला

कोरोनाग्रस्त रुग्णांची लूट करून खाजगी रुग्णालयांनी वसूल केलेली लाखोंची बिले राज्य शासनाने परत करावीत

0

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

औरंगाबाद :- कोरोनाच्या काळात राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनारोग्य योजनेतंर्गंत समाविष्ट करण्यात येईल असा निर्णय घेतला होता .मात्र,प्रत्यक्षात तसे घडले नसून सर्व सामान्य गोरगरीब जनतेला लाखोंची अवाजवी बिल देऊन त्यांची लूट केली जात आहे. सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असून ज्या रुग्णांनी २५ हजार पासून १० लाख ते १५ लाख रक्कमेची बिल भरली आहेत त्यांच्या बिलांची (रिअम्बर्समेंट) परतफेड तातडीने व्हावी अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या रुग्णांकडून लूट करून जी बिले वसूल केली आहेत ती बिले राज्य शासनाने परत करावी यासाठी आम्ही टोकाचा आग्रह धरणार असून प्रसंगी आंदोलन करावे लागले तरीही रस्त्यावर उतरु असा जोरदार पवित्रा दरेकर यांनी आज औरंगाबाद मध्ये दिला.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद हे संवेदनशील शहर म्हणून समोर आहे. तरी,कोरोनाची परिस्थिती व उपाययोजना पुरेशा आहेत का, रूग्णालय उपलब्ध आहेत का, रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन मनुष्यबळ आहे का याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी श्री. दरेकर यांनी आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हाधिकारी, आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सविस्तर बैठक घेऊन चर्चा केली व आढावा घेतला.
त्यानंतर दरेकर यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार डॉ.भागवत कराड, माजी मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, प्रदेश प्रवक्ते शिरिष बराळकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर,ग्रामीण अध्यक्ष विजय अवताडे सरचिटणीस विजय औटी, अल्पसंख्याक उपाध्यक्ष इजाद देशमुख, जिल्हाउपाध्यक्ष संजय अंबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरेकर यांनी यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने काय केले याचा लेखाजोखा आणि तपशीलवार आकडेवारी जाहीर केली. दरेकर म्हणाले की, कोरोनाचाप्रत्येक रुग्ण हा महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये समाविष्ट केला जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले होते. तरी खाजगी रुग्णालय अवाजवी पैसे आकारतात. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शेकडो उदाहरणे देता येतील. मुंबईमधील बोरिवली येथे सलीम शेख नावाच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ९ लाख ६० हजार रुपयांचे बिल तर कांदिवली येथील रुग्णाला पावणे दोन लाखांचे बिल आकारण्यात आले. सामान्य लोक हे बिल भरू शकत नाहीत. ही परिस्थिती केवळ मुंबईत नसून ठाणे, नगर आणि औरंगाबाद येथेही निदर्शनास आली आले. हा सर्वसामान्यांवर केलेला अन्याय आहे. तरी, यापुढे जे खासगी रुग्णालयात जातील त्यांना तात्काळ जेथे ॲडमिट आहेत तेथे जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात यावेत किंवा स्पेशल इंडिव्हिज्युअल केस म्हणून जन आरोग्य मध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे श्री दरेकर यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी दरेकर यांनी सांगितले की, औरंगाबाद येथे मनुष्यबळाचा अभाव आहे. जाहिराती देऊनही डॉक्टर उपलब्ध होत नाही. मुंबईला डॉक्टरांना जास्त पैसे दिले जातात तरी यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याची सूचना दरेकर यांनी दिल्या.
सामना वृत्तपत्रामधून विरोधी पक्षावर वारंवार टीका होते. याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, संजय राऊत हे चर्चेत राहण्यासाठी काय बोलतील आणि काय अग्रलेख लिहितील याचा नेम नाही. ते कधी राज्यपालांवर टीका करतात नंतर तेच जाऊन राज्यपाल चांगले व्यक्तिमत्व आहेत सांगून त्यांचे कौतुक करतात व त्यांना नमस्कारही करतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून त्यांचीही प्रशंसा करतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये.हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात आज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मृत्यू दरही वाढतोय.रुग्णांचा कधी रुग्णवाहिका नसल्याने मृत्यू होतो, तर रुग्णालयाच्या दारात नेल्यावर ऑक्सिजन लावायला बेड नसल्याने मृत्यू होतो तर कधी व्हेंटिलेटर नसल्याने रुग्ण दगावतो. केवळ व्यवस्था उभी नाही म्हणून बऱ्याच अंशी मृत्यू झाल्याचे लक्षात येते. अशाप्रकारे,मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादूर्भावला प्रशासनाचा हेळसांडपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत आहे. राज्य सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवित असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. आकडे लपविण्याच्या नादात आज लोकांचे जीव जात आहेत. धारावीत आजही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण सरकार कोरोनाच्या तपासणींची संख्या कमी करित आहेत, त्यामुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास सरकारमध्ये विसंवाद असून सरकारमधील तीन पक्षात एकमत नाही त्यांनी कधीही सामुदायिक बसून चर्चा केलेली नाही किंवा विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही त्यामुळेच राज्यात ही कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोरोनाची परिस्थिती हाताळताना केंद्र सरकारने काय केली अशी ओरड होत असून त्यावर बोलताना दरेकर म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला एक खंबीर प्रधानमंत्री लाभला.कोरना सारखे संकट देशात आले असताना आज देश मोदींच्या शब्दावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून ताकदीने उभा आहे. त्यांच्या नेतृत्वात हा देश या संकटातून बाहेर येईल. आत्मनिर्भर या संकल्पनेच्या माध्यमातून देश पुन्हा उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उद्योग धंदा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच एमएसएमइ च्या माध्यमातून सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसाठी भरीव मदत करण्यात आली आहे. साधारणतः ३ लाख कोटींचे भांडवल उभे करण्यात आले असून ५० हजार कोटींची तरतूद केली आहे.त्यामुळे देशातील उद्योगधंदे सुरळीत करण्यासाठी एमएसएमइ च्या माध्यमातून उद्योगधंद्यांना मोठ्याप्रमाणावर दिलासा आणि आधार देण्यात आला आहे. छोटे उद्योगधंदे करणाऱ्यांना दहा हजार देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे विविध उपाययोजना आखून अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत करण्यासाठी व दिलासा देण्यासाठी जी काही गरज आहे ती मदत आणि दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केल्याचेही श्री.दरेकर यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक वर्षपूर्ती निमित्ताने पक्षाच्या सर्व सदस्यांनी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आखला आहे. त्याची माहितीही दरेकर यांनी यावेळी दिली. कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.
घाटी रुग्णालयाची केली पाहणी
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील कोरोना सेंटरची पाहणी केली. तेथील वैदयकीय व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

मावळ तालुक्यातील भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये वर्षा पर्यटनासाठी मनाई

  • जिल्हाधिकारी नवल किशोर राम
    पुणे, दि. 7 : मावळ तालुक्यातील भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये वर्षा पर्यटनासाठी मनाई असल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
    पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या सर्वात जास्त पाऊस होणा-या तालुक्यामध्ये असणा-या भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठया प्रमाणात नागरिक वर्षापर्यटनासाठी येत असतात. पाऊस सुरु झाल्यानंतर मुंबई व राज्याच्या इतर जिल्हयातून अनेक पर्यटक वर्षापर्यटनासाठी येत असतात. मावळ तालुक्यातील भुशी डॅम व लोणावळा परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गड किल्ले परिसर व वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर येथे दर शनिवार, रविवार व सुट्टीच्या मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. यापूर्वी धरण परिसरात व इतर भागात नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणा-या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
    या धरण क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने भुशी डॅम व इतर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून अचानक पाण्याचा विसर्गात वाढ होत असते. अचानक पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने पाण्यात पर्यटक वाहून मयत होण्याच्या घटनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक पर्यटक यांच्याकडून मद्यपान व हुल्लडबाजीच्या घटना देखील मोठया प्रमाणात घडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे व इतर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या कारणामुळे मागील दोन वर्षामध्ये भुशी धरण व इतर धरणामध्ये बुडून जीवित हानी झालेली आहे. यावर्षी कोरोना आजाराच्या अनुषंगाने व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घालणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
    आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30 (2) (3) (4) अन्वये जिल्हयात भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी बंदी करण्यात येत आहे. या आदेशाचा कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
    0000

अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

0

मुंबई, दि. ७: कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

गृह विलगीकरणासाठी काय करावे लागेल..

  • त्यासाठी सदर रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक आहे.
  • ज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचे आहे त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाईन) सोय असणे आवश्यक आहे.
  • या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.
  • काळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.
  • मोबाईलवर आरोग्य सेतू कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
  • सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.
  • गृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्या व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी..

काळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे.

रुग्णाला धाप लागली, श्वासोच्छावासास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल असे लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

गृह विलगीकरण कधीपर्यंत..

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसानंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.