Home Blog Page 2478

सेवा मित्र मंडळा तर्फे ऑनलाईन महागणेशोत्सवात’ नानाविध कार्यक्रमांची पर्वणी

0

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन ; राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

पुणे:- श्री गणेश पुराण, स्वराज्याचे शिलेदार प्रेरणापर्व, गणेशोत्सव माझा, घेऊ भरारी यांसारख्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी सेवा ऑनलाइन महागणेशोत्सव सजणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसले, तरी देखील ऑनलाइन स्वरुपात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांकरीता अनुभविता येतील असे कार्यक्रम शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आखण्यात आले आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरीदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला वैभव वाघ, तन्मय तोडमल, विक्रांत मोहिते, अमेय थोपटे, कुणाल जाधव, गणेश सांगळे उपस्थित होते.

सेवा मित्र मंडळाचे यंदा ५५ वे वर्ष असून कोरोनाचा काळ असला, तरी देखील उत्सव तर होणारच आणि तोही ऑनलाईन पद्धतीने व्यापक स्वरुपात या संकल्पाने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचे स्वरुप देश-विदेशात पोहोचविणारी सोशल माध्यमे वापरुन यंदाचा उत्सव साजरा होत आहे.

उत्सवाचे उद्घाटन दिनांक २२ ऑगस्ट दुपारी ४ वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला घेऊ भरारी – चला उद्योजक बनूयात हा कार्यक्रमात दिनांक २३ ते ३० ऑगस्ट अनुभवी तज्ज्ञ, उद्योजक, युथ आयकॉन्स तरुणाईशी दररोज सायंकाळी ७.३० वाजता संवाद साधणार आहेत. याचे उद्घाटन खासदार गिरीष बापट करणार आहेत. यामध्ये आगामी दशक शेती व्यवसायाचे, शेतक-यांचे याविषयावर अभिनेते प्रविण तरडे, उद्योजकीय व्यक्तीमत्व घडविताना या विषयावर आमदार रोहित पवार, फळ-भाजीपाला प्रक्रिया-एक नवीन संधी याविषयावर संजय ओरपे, व्यवसाय आणि मार्केटिंग याविषयावर जगभर मसालाकिंग नावाने धनंजय दातार, ब्रँड डेव्हलपमेंट याविषयावर अ‍ॅडगुरु व दिग्दर्शक रवी जाधव आणि घेऊ भरारीमध्ये खासदार अमोल कोल्हे हे देखील संवाद साधणार आहेत.

दिनांक २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे श्री गणेश पुराण याविषयावर कीर्तन होणार आहे. तर, गणेशोत्सव माझा या कार्यक्रमातून दिनांक २३ ते १ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांचे मनोगत हा संवादात्मक उपक्रम दररोज दुपारी १२.३० वाजता गणेशभक्तांना घरबसल्या अनुभविता येणार आहे. संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मुक्ता टिळक करणार आहेत.

स्वराज्याचे शिलेदार प्रेरणापर्व या कार्यक्रमातून युवा शिवशाहीर सौरभ कर्डे हे स्वराज्याच्या शिलेदारांची प्रेरणाकथा दिनांक २३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री ९ वाजता सांगणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने करणार आहेत. या उपक्रमात युवा शिवशाहीर सौरभ कर्डे दररोज एका स्वराज्याच्या शिलेदाराची प्रेरणागाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत.
https://www.facebook.com/SevaMitraMandal या फेसबुक पेजवरुन हे कार्यक्रम विनामूल्य गणेशभक्तांना पाहता येणार आहेत. तरी नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सीबीआयला यश का नाही ?

0

पुणे- पूर्वीच्या काळात पोलिसांचा धाक तर होताच ,पण सीआयडी म्हटले तरी भल्याभल्यांची टरकत.. सीबीआय तर बहुधा कोणाला माहितीही नसावे आणि इडी तर लोकांना आता अलीकडे माहिती पडले असावे . तर .. मुद्दा हा कि सीआयडी नावाचीच दहशत होती . वेगवेगळे वेषांतरे करून , स्वतःची ओळख लपवून , कित्येक महिने एखाद्या वेगळ्याच रुपात वावरत हे सीआयडी गुन्हेगारांचा खेळ खल्लास करून टाकीत . सीआयडी तर सोडा आता सीबीआय चा हि धाक उरलाय का ? हा प्रश्न विचारावा लागेल अशी स्थिती आहे. ज्याच्या हाती ससा तोच पारधी .. तसे ज्याची सत्ता त्याचेच पोलीस, त्याचीच सीआयडी आणि त्याचेच सीबीआय अशी स्थिती झाल्यावर होणार तरी काय ? त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध घेण्यात सीबीआयला यश का नाही? हा प्रश्न हि तसा दुर्लक्षित ठरणाराच आहे. बरे दाभोलकरच का ? असे असंख्य मृतात्मे आहेत ज्यांना न्याय याच स्थितीमुळे मिळू शकलेला नाही . जेव्हा देशातला नागरिक मेंढराप्रमाणे हाकेल तिकडे पळेल , अत्याचारी का असेना पण शक्तीधारी व्यक्तीला सलाम ठोकेल , राज्य कोणाचेही असेना ,त्याला त्याचे घेणे देणे नसेल , आणि तो केवळ आपली जहागीरदारी कशी राहील यात रमणार असेल तर सीबीआय तरी काय करू शकणार आहे? ती हि याच समाजात याच वृत्तीच्या सावलीत वाढलेली माणसे आहेत .

बरे सामान्य माणूस किंवा सामान्य गुन्हेगार असता तर आजवर सीबीआयनेच काय ,पोलिसांनी किंवा सीआयडी ने त्यांचा कधीच पर्दाफाश करून टाकला असता . जिथे राठी हत्याकांडातील आरोपी पकडले जातात ,’सात च्या आत घरात ‘ ची जक्कल सुतार केस चातुर्याने सोडविली जाते असं पुणे नावाचं नामांकित शहर आहे, आणि तिथे दाभोळकर नावाचं एक वादळ आहे ते असे इतक्या सहजासहजी कोणा सामान्य माणसाला संपविता येईल ? जिथे दाभोळकरांचा खून केला गेला ते ठिकाण जंगलात नाही , तिथून जवळच भली भली कार्यालये,भल्या भल्यांची निवासस्थाने असलेला भाग आहे. सीसीटीव्ही आणि अनेक नजरांचे जाळे इथे कायमचेच विखुरलेले असते .तरीही एवढी हिम्मत … अशा ठिकाणी दाभोळकरांची हत्या करणे . हे सोपे आणि सामान्य माणसांचे काम निश्चितच नव्हतेच . ज्या दाभोलकरांनी महाराष्ट्र च नव्हे तर देशातल्या अंधश्रद्धेला उखडून फेकून, नवा, मेंढरांप्रमाणे नसेल असा स्व विचारी असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला,त्यासाठी अनेक आव्हाने पेलली , अनेक वादळांना ते सामोरे गेले, त्या दाभोळकरांना असे ठार मारणे सहजसोपे निश्चित नाही . नक्कीच यासाठी मोठे लागेबांधे असावेत . व्यवस्थेतील फितुरांच्या मदतीचा आसरा घेतला असावा . आणि खरे मारेकरी नंतर दाभोळकर यांच्याच पाठीमागे धाडण्याचे कारस्थान देखील झाले असावे अशा कल्पना , टाळता येऊ शकणाऱ्या नाहीत . एकामागे एक पुरावे नष्ट करण्याचे कारस्थान झाले नसेल कशावरून ?

या साऱ्या चर्चा ,शक्याशक्यता ,संशय याला खरेतर काहीही अर्थ एवढ्या वर्षांनंतर उरत नाही . जिथे सीबीआय खुन्यांच्या सूत्रधारापर्यंत वर्षानुवार्षे पोहोचू शकत नसेल . तिथल्या कायदा सुव्यव्स्थेबाद्द्ल मत व्यक्त करणेही धाडसाचेच ठरेल . काही तरी मर्यादा हवी कि नको , एका प्रकरणाचा तपास पुराव्यानिशी किमान ५ वर्षात लावू शकला नाही तर … अशा अधिकाऱ्यांना काय फुकट देशाने पोसत बसायचे काय ? आणि त्यांनी हि जोरात मोठ्या तोऱ्यात मिरवत बसायचे काय ? अशा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करीत ठोस कारवाई व्हायलाच हवी . आणि त्यासाठी त्यांना राजकीय दबावापासून प्रथम मुक्त करायला हवे … करू शकतो काय हे कोणी ? आंदोलने .. लिखाणे आपण लाख करू, पण वास्तविकता बदलण्यासाठी प्रथम तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला कायदेशीर स्वातंत्र्य , आणि दबाव विरहीत वातावरण आणि संरक्षण देणं सर्वाधिक महत्वाचं आहे. जोपर्यंत हे मिळणार नाही , तोपर्यंत अशा बड्या बड्या केसेस मध्ये खऱ्या खुऱ्या गुन्हेगारांना लटकावता येणार नाही हि वास्तविकता आहे .. आणि ती आपण स्वीकारली पाहिजे .

बाकी राहिलं .. आता पोलिसाचा काय , सीआयडी ,सीबीआयचा काय जो काही धाक असेल तो राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल . हे स्पष्ट असताना आता बड्या बड्या केसेस मध्ये तरी खऱ्याखुऱ्या तपासाची अपेक्षा बाळगावी काय ? हा खरा प्रश्न आज आ वासून पुढे उभा आहेच .त्याचे उत्तर हि फारसे अवघड कोणाला वाटणार नाही .

  • शरद लोणकर

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

0

मुंबई, दि. 19 :- सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या विज्ञानवादी, सुधारणावादी विचारांची चळवळ पुढे घेऊन जात अघोरी प्रथा व अंधश्रद्धांचं समाजातून समूळ उच्चाटन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त (२० ऑगस्ट) आदरांजली वाहिली आहे.दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. दाभोलकर वैद्यकीय तज्ञ होते. आंतरराष्ट्रीय किर्तीचे कबड्डीपट्टू, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू होते. ते विचारवंत होते. लेखक होते. पत्रकार होते. महत्वाचं म्हणजे ते सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते. बुद्धीवादी, विज्ञानवादी, सुधारणावादी, चिकित्सक समाजाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी जीवनभर निष्ठेनं कार्य केलं. अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ उभी केली. अशिक्षित, अज्ञानी, दुर्बल घटकांचे शोषण करणाऱ्या अनिष्ठ रुढी, अघोरी प्रथा, समाजविघातक अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन केले. जनजागृती केली. विचारांचा विरोध विचारांनीच केला पाहिजे, या दृढ विश्वासातून ते निष्ठेने काम करीत राहिले. त्यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची झालेली हत्या हे दुर्दैवं असून व्यक्तीच्या हत्येने त्यांचे विचार कधीही संपत नाहीत, हा इतिहास आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दाभोलकर यांना आदरांजली वाहून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने हॅंड्स फ्री सॅनिटायझर यंत्र भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न.

0

पुणे-नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर यांच्या माध्यमातून प्रभाग १३ मधील लक्ष्मीनारायण नगर (श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर )१४ हॅंडसफ्री सॅनिटायझर यंत्र भेट देण्यात आले त्यावेळी श्री.खर्डेकर बोलत होते.
या प्रसंगी नगरसेवक जयंत भावे,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,कोथरूड मंडल महिला आघाडी अध्यक्ष हर्षदाताई फरांदे,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे व सोसायटीचे श्री. खंडागळे,श्री.पेटकर,श्री. तांबे श्री.पेंढारकर,श्री. हेंद्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची माहिती देताना सांगितले की रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम चे वाटप,मास्क वाटप,सॅनिटायझर स्टॅंड वाटप,गरजूंना शिधा वाटप,थर्मामीटर व थर्मल गन वाटप,७५००० ज्येष्ठांना लॉकडॉउन काळात घरपोच जेवणाचे डबे यासह चंद्रकांतदादांनी हिंजेवाडी येथे उभारलेले १०५ बेड्स चे कोव्हिड केयर सेंटर महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय असल्याचे सांगितले.
नगरसेवक जयंत भावे व कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.
भाजप चा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या मदतीसाठी तत्पर असल्याचे या दोघांनीही सांगितले.

अजून कोरोना चे संकट संपले नसून येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढण्याचीच भिती व्यक्त केली जात आहे ,गणेशोत्सवात विशेष काळजी घेण्याची गरज असून नागरिकांनी गाफील न राहता मास्क चा वापर करणे,दोन व्यक्तीमधे सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायझर चा वापर ( सतत हात धुणे ) करणे गरजेचे आहे असे यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

जांभूळवाडी तलाव पुर्ण क्षमतेने भरला, नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या हस्ते ओटीभरण व जलपूजन

0

पुणे- : शहरात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे व छोटी धरणे तुंडुब भरली आहेत. दक्षिण पुण्यातील नागरिकांसाठी आकर्षणबिंदू ठरलेला आंबेगाव खुर्द जांभूळवाडी तलाव पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागला असून याची पाहणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक ४० च्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी तलावाला भेट दिली. यावेळी उपस्थित महिलांसमवेत कोंढरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात तलावाचे ओटीभरण व जलपूजन करण्यात आले.

जांभूळवाडी तलाव हा आकाराने लहान असला तरी सध्या पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. कोळेवाडी, जांभूळवाडीतील डोंगर भागातून वाहणारे जरे, ओढे, नाले हे तलावाचे पाणी भरण्याचे मुख्य नैसर्गिक स्त्रोत आहेत. तलाव शंभर टक्के भरल्याने तलावातील अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या पुर्वेकडील पुलाखालून वेगाने ओढ्यात जात असल्याने आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक परिसरातून जाणारा ओढा तुंडुब भरून वाहू लागला आहे. मात्र पावसाच्या पाण्याबरोबरच उतारावरून वाहून येणारी माती व गाळ यामुळे तलावाच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम झाला असून प्रदूषण सुद्धा वाढले आहे. 

या पार्श्वभूमीवर नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी तलावाचे प्रदूषण कमी करण्यास प्राधान्य दिले जाणार असून आगामी काळात खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, नगरसेवक गणेश ढोरे यांच्या माध्यमातून तलावाचे सुशोभीकरण करून तलावाचे पाणी परिसरातील नागरिकांना वापरात येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी शालन जांभळे, मालन जांभळे, स्वाती शिरोळे, वृषाली जांभळे, अश्विनी कोंढरे, दीप्ती सुतार, पल्लवी कोंढरे, वर्षा नरसाळे, हेमा वाघमारे, मिनाबाई ओव्हाळ तसेच जनहित विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुधिर कोंढरे, मारुती जांभळे, विजय शिरोळे, किशोर कोंढरे, सुधिर कोंढरे, बापूराव जाधव, अमोल कोंढरे, महेंद्र कोंढरे उपस्थित होते.

राजीव गांधी यांना महापौरांकडून अभिवादन

0

पुणे- भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सद्भावना दिनानिमित्त उपस्थित सर्वांना सद्भावना शपथ दिली.
याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे,महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार,शिवाजी दौंडकर ,राजेंद्र मुठे , अनील मुळे,आदी मान्यवर उपस्थित होते

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 46 हजार 199, एकुण 4 हजार 762 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
कोरोना बाधित 1 लाख 78 हजार 490 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि. 20 :- पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 78 हजार 490 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 46 हजार 199 आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 762 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.4 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील 1 लाख 32 हजार 293 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 लाख 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 431 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 150 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.13 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 8 हजार 275 रुग्ण असून 4 हजार 658 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 348 आहे. कोरोनाबाधित एकूण 269 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 14 हजार 473 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 हजार 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 983 आहे. कोरोना बाधित एकूण 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 7 हजार 309 रुग्ण असून 3 हजार 721 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 339 आहे. कोरोना बाधित एकूण 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील 16 हजार 140 कोरोना बाधीत रुग्ण असून 8 हजार 579 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 98 आहे. कोरोना बाधित एकूण 463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 234 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 724, सातारा जिल्ह्यात 346, सोलापूर जिल्ह्यात 287, सांगली जिल्ह्यात 294 तर कोल्हापूर जिल्ह्यात 583 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 53 हजार 96 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 78 हजार 490 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 19 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


गणेशोत्सवानंतर ३ सप्टेबर पासून पीएमपीएमएल सेवा सुरू…

0

पुणे -शहरात १ जुन पासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्याने शहरात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. ज्या नागरिकांकडे खाजगी वाहने नाहीत,अशा चाकरमान्यांची विशेषत: कष्टकऱ्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्र आणि मध्य भागातील पेठाचा भाग सोडून पीएमपीएमएल ची सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने आज दि. २० ऑगस्ट २०२० रोजी कॉन्फरन्स हॉल, महापौर कार्यालय येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकी मध्ये श्री गणेशोत्सवाच्या कालावधी मध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सवा नंतर म्हणजेच दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी पीएमपीएमएल बस सेवा सु्रू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.


महामंडळाकडील एकूण १३ डेपोच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख रस्ते उपनगरे येथे गर्दीचे वेळी सकाळ / सायंकाळी पीएमपीएमएल शटल सेवा सुरू करण्याचे आयोजन आहे. अधिक गर्दीच्या मार्गांना या मध्ये प्राधान्य दिले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसन क्षमतेच्या ५०% प्रवाशांनाच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी बसेसमध्ये सीटवर मार्कींग पेटींग करण्यात आलेले आहे. तसेच महत्वाचे स्थानकावर वर्तुळ पेंट करण्याचे काम चालू आहे.
सदर बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे,स्थायी समितीअध्यक्ष हेमंत रासने , पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार , सभागृह नेता धीरज घाटे , पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ,अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएमएल राजेंद्र जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.

व्यायाम शाळा(जिम) सुरू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

0

पुणे- महाराष्ट्रातील इतर उद्योग धंद्याप्रमाणे व्यायामशाळा(जिम) या पुन्हा सुरू करण्यासाठी, तसेच व्यायामशाळेतील लॉकडाऊन काळातील वस्तू व सेवा कर, मलमत्ता कर, विज बिल आणि इतर कर पूर्णपणे माफ करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड आणि HRT चे मालक प्रसन्ना कांबळे यांनी अॅड तोसिफ  शेख, अॅड क्रांती सहाने, अॅड स्वप्नील गिरमे, अॅड सुरेश जाधव यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
३१ जुलै २०२० रोजी केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ०५ ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. पण महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या नियमावलीला केराची टोपली दाखवली महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे दारूचे दुकान, मॉल्स, लॉज धनदांडग्यांच्या पुढे नमते घेऊन सुरू केले होते. यात वैयक्तिक आर्थिक हित जोपासले असल्याची चर्चा महाराष्ट्रात दिसून येत आहे. जवळपास चार ते पाच महिन्यापासून जिम बंद असताना देखील  मोठ्या प्रमाणात वीज बिल आल्याची तक्रार बर्‍याच जणांकडून महाराष्ट्रात करण्यात  येत आहे.
महाराष्ट्रातील जिम सुरू नसल्याने आणि त्यांना दुसरा पर्यायी उत्पन्नाचे साधन नसल्याने कित्येक जिम मालक आत्महत्या केल्याची उदाहरणे महाराष्ट्रात घडली असल्याची चर्चा आहे. जिम बंद असताना भाडे देणे शक्य नाही तसेच जीम मधील बरीच उपकरणे निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यावसायिकांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व जिम व्यावसायिकांना नुकसानाचे आपत्ती निर्वाह निधी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आणि लॉकडाऊन काळातील वस्तू व सेवा कर(GST) मालमत्ताकर पूर्णपणे माफ करावे असे मागणे याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे.

“कोरोना संपवायचा असेल तर व्यायाम शाळा सुरू करण्याची गरज आहे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल”-  अॅड तोसिफ शेख

“सरकारने व्यायाम शाळा सुरू करून व्यायामशाळेतील होणारे सामाजिक आर्थिक भान जपावे त्यामुळे आरोग्य विषयक सुधारणा आपोआप होईल” –  अॅड क्रांती सहाने

“केंद्र सरकार(पश्चिम बंगाल) वेश्या व्यवसायाला परवानगी देत असेल महाराष्ट्र सरकार दारू विक्रीसाठी परवानगी देत असेल तर महाराष्ट्रामध्ये व्यायाम शाळा सुरू करण्यासाठी सरकारला परवानगी द्यायला काय अडचण आहे?”  सतीश गायकवाड

सेना ,कॉंग्रेस चा विरोध दुर्लक्षून राष्ट्रवादीच्या खासदार विसर्जनाच्या मुद्द्यावर भाजपशी सहमत

पुणे- कॉंग्रेसचे नेते आबा बागुल , शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार ,विशाल धनवडे यांनी घरच्या घरी विसर्जन आणि फिरते हौद या भाजपच्या  आणि पुण्याच्या महापौरांच्या भूमिकेला  विरोध करत हौदात सामाजिक अंतर राखत व नियम पाळून नेहमीप्रमाणे गणेश विसर्जन व्हावे अशी  मागणी लावून  धरली असताना राष्ट्रवादी च्या खासदार वंदना चव्हाण यांनी मात्र भाजपची आणि महापौरांच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारे पत्रक काढले आहे. नागरिकांना   काही लोकांकडून सार्वजनिक हौदांची मागणी होत आहे. परंतु माझी आपणांस विनंती आहे.महानगरपालिकेने सूचना दिल्याप्रमाणे घरीच विसर्जन करावे असे आवाहन करणारे पत्रक आज प्रसिद्धीस दिल्याने महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येऊन या प्रकाराचा राजकीय लाभ उठवत राष्ट्रवादीच्या  खासदारांनी दिलेल्या योग्य प्रतिसादाबद्दल महापौरांच्या गटाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे. 

हीच ती वेळ आहे, शहाणे होण्याची आणि जबाबदारीने वागण्याची !!

नेमके काय म्हटले आहे ,राष्ट्रवादी च्या खासदार वंदना चव्हाण यांनी आपल्या पत्रात हे जसेच्या तसे वाचा …..

समस्त पुणेकर नागरिकांस,

स.न.वि.वि.

आशा करते कि आपण सर्व खुशाल आहात !

पुणे शहरात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शहरातील सर्वच वातावरण मंगलमय होऊन जाते आणि हे बघायला व अनुभवायला पुण्यातील नागरिकच नव्हे तर इतर गावातील, राज्यातील आणि विविध देशातील नागरिकसुद्धा ह्या काळात आपल्या शहराला भेट देत असतात.    

यंदा २२ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. एका वेगळ्या वातावरणात ह्या वेळेस गणरायाचे आपल्याला स्वागत करायला लागणार आहे. ह्यावेळेस तर विघ्नहर्त्याचे पूजन अजूनच मनोभावे होणार आहे. संपूर्ण देशाला कोरोनाने ग्रासलेल्या शहरांपैकी सर्वात उच्चांक गाठलेले आपले शहर आहे. या अती सूक्ष्म विषाणूने जगभरातील मानव जातीला चांगलाच धडा शिकवला आहे.

अनेक पुणेकरांनी या महामारीत आपले जीव गमावले, अनेकांच्या उत्पन्नाची साधने बंद झाली, अनेकांना फार मोठ्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले अजूनही परिस्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही – अश्या वेळेला अतिशय जबाबदारीने काही बंधने स्वतःवर घालून घेणे गरजेचे आहे.

सार्वजनिक गणेश मंडळानी स्वतःहून पुढाकार घेऊन यंदा मंडप उभारणार नाही असे ठरवले आहे – एक पुणेकर या नात्याने त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.

महानगरपालिकेने घरात पुजलेली गणेशमूर्ती आपल्या घरीच विसर्जित करा असे आवाहन केले आहे याला काहीं विरोध करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विरोध अवाजवी व नागरिकांच्या आरोग्याला घातक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती तसेच त्यावर असलेल्या विषारी रासायनिक रंगामुळे नदीत प्रदूषण होते हे सिद्ध झालेले आहे आणि म्हणूनच शासनाने गणेश मूर्तींचे विसर्जन नदीत अथवा वाहत्या पाण्यात करू नये या अनुषंगाने कायदा केला.

 आपल्या शहरातून वाहणारे पाणी पुढे दुसऱ्या गावात पिण्यासाठी वापरले जाते याचे भान असल्याने महापालिकेने नदीपात्राजवळ ठिकठिकाणी विसर्जनासाठी हौद उभारले – या निर्णयाला पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींनी व नागरिकांनी कृती संदेश दिला. आज कोरोना सारख्या महामारीला सामोरे जाताना पुन्हा एकदा पुरोग्रामीकृतीची गरज भासत आहे. काही लोकांकडून सार्वजनिक हौदांची मागणी होत आहे. परंतु माझी आपणांस विनंती आहे – आपण सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव जबाबदारीने पार पाडावा यासाठी काही सूचना निवेदनाद्वारे करीत आहे :

१)  शाडू मातीच्या मूर्तीचे पूजन करावे, जेणेकरून मूर्तीचे विघटन नैसर्गिकदृष्ट्या होते.

२) प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती असल्यास महानगरपालिकेने सूचना दिल्याप्रमाणे घरीच विसर्जन करावे.

३)   घरी गणरायाची होणारी आरास देखील पर्यावरणपूरक वस्तू, साधन सामुग्रीने करावी.

४) जमल्यास सर्वात उत्तममार्ग की, आपल्या घरी असलेल्या धातूच्या मूर्तीचे पूजन करावे, सोबत एखाद्या सुपारीचे पूजन करावे.

५)  सार्वजनिक ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे आणि गेल्यास शासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे व अटींचे पालन करावे.

कोरोनाच्या महामारीबरोबरच जागतिक तापमानवाढीचे संकट आपल्याला भेडसावत आहे. आपल्या भावी पिढीला आरोग्यदायी जीवन द्यायचे असल्यास हीच ती वेळ आहे, शहाणे होण्याची आणि जबाबदारीने वागण्याची !!

मी मनोकामना करते कि हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे आणि पुन्हा एकदा आपले जीवन सुरळीत होऊ दे.

कळावे,

आपली,

वंदना चव्हाण

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. २० : चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.

सन २०१५ ते सन २०१९ या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी २.२५ पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त १.४५ पट अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत. तसेच एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी किंवा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

१ लाख ४५ हजार जागांसाठी आतापर्यंत २ लाख ५५ हजार अर्ज

आयटीआय प्रवेशप्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येते.

प्रवेश प्रोत्साहन अभियान

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपद्वारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. प्रवेश अर्ज मोबाईलद्वारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली. 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जीवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री.मलिक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या त्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार

0

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात प्रशिक्षण झालेल्या ५४२ उमेदवारांना नेमणूक देणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस दल भरती प्रक्रियेच्या २०१४ व १६ या वर्षातील पात्र पण निवड न झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती प्रक्रिया करून त्यांची सुरक्षारक्षक म्हणून निवड केली होती. त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आले होते. मात्र त्यापैकी ५४२ जणांनी नेमणूक स्वीकारली नाही.

या ५४२ पैकी ५५ जणांनी महामंडळाकडे नेमणूक मिळावी याकरिता अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने गृहमंत्री महोदय यांच्यासमवेत पोलीस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची सविस्तर बैठक नुकतीच संपन्न झाली. महामंडळाने या उमेदवारांवर प्रशिक्षणासाठी खर्च केलेला आहे. तो पाहता तसेच या उमेदवारांच्या नोकरीची निकड पाहता या सर्वांना महामंडळात नेमणूक देण्याचे चर्चेअंती ठरले.

त्या ५४२  पैकी जे उमेदवार नेमणुकीसाठी अर्ज करतील, त्यांना महामंडळात नेमणूक दिली जाईल, अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांना अभिवादन

0

मुंबई, दि. २० : भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना ‘सद्भावना’ दिनानिमित्त प्रतिज्ञाही दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, मुख्य सचिव संजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, स्व.राजीव गांधी यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, युवा नेते, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणक क्रांती, डिजिटलक्रांती विचारपूर्वक घडवून आणली. ग्रामीण भागात दूरध्वनीसेवा पोहोचवली. पंचायतराज व्यवस्था भक्कम केली. नवोदय विद्यालयांची पायाभरणी केली. युवकांना अठराव्या वर्षी मतदानाचा हक्क दिला. देशाला आधुनिक विचार, जागतिक व्यासपीठांवर सन्मान मिळवून देण्याचं काम केलं. त्यांच्या रुपाने देशाला युवा, कर्तबगार, दूरदृष्टीचं, सुसंस्कृत नेतृत्वं लाभलं होतं. महान देशाचे महान पंतप्रधान म्हणून राजीव गांधी नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. 

राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिवस साजरी होत आहे. तसेच ५ सप्टेंबरपर्यंत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला सद्‌भावना दिनाच्या व सामाजिक ऐक्य पंधरवड्याच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने वंश, धर्म, प्रदेश, भाषा असा कुठलाही भेद न राहता देशात एकता, समता, बंधुता, सौहार्दाची भावना वाढीस लागेल, हिंसाचारमुक्त समाजाच्या निर्मितीस मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोरोना संकटकाळात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना हे ज्यामुळे शक्य झालं त्या डिजिटल क्रांतीची सुरुवात स्वर्गीय राजीव गांधींनी केली होती याची जाणीव ठेवून त्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, अशी भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान

0

स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २० : नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री श्री.शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते.  

यावेळी मंत्री श्री.शिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले.     

दरम्यान,आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.

पश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे.

२५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे.  शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राखले आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक 46 पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील 29 अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर 53 शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 27 शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील 500 शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील 154 शहरांचा समावेश होता. 

2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 46 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 10 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये राज्यातील 27 अमृत शहरांचा सहभाग होता.

महापालिकेच्या ऑनलाईन मुख्य सभेत पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या ‘

0
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/298790831401326/

पुणे- आजच्या पुणे महापालिका मुख्य सभेत नेमके झाले तरी काय ? प्रत्यक्ष पहा ..ऐका …