Home Blog Page 2467

अजूनही ऍम्ब्युलन्स वेळेवर देऊ शकत नाही …राजीनामे द्या अन घरी निघा .. ब्रिगेडचा इशारा (व्हीडीओ )

0

पुणे- सहा महिने होत आलेत कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असताना ,लुटारू वैद्यकीय व्यावसायिकांनी लुटमार सुरु ठेवली असताना , गोर गरिबांचे जीव जात असताना , शेकडो कुटुंबे उध्वस्त होत असताना ,शेकडो कोटी रुपयांच्या योजनांच्या गप्पा मारणाऱ्या मंत्री ,सत्ताधारी पदाधिकारी ,आणि रुबाबाने फिरणाऱ्या आय ए एस अधिकाऱ्यांनी अजूनही आपण ऍम्ब्युलन्स वेळेवर देऊ शकत नाही याची जबाबदारी गुमान स्वीकारून राजीनामे देऊन खरे तर घरी निघायला हवे अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केली आहे .

ते म्हणाले ,’ पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जी पणा आहे. कारण परवा सुद्धा जम्बो कोवीड सेंटरच्या बाहेर एक माणूस तडफडून उपचाराविना मृत्यू पावला होता… त्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका व राज्य सरकारची आहे. पुण्यात लोकांना बेड उपलब्ध होत नाहीत, ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला खाजगी हॉस्पिटल सामान्य लोकांना लाखो रुपयांना लुटत आहे हा ठरवून केलेला सांघिक भ्रष्टाचार आहे.महापालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे. महानगरपालिकेचे गोळ्या-औषधं साठी किती ‘टेंडर’ निघाले आणि त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णाला मिळाल्या का याचा तपास झाला पाहिजे.परवा जंबो कोविड सेंटरच्या बाहेर एक माणूस तडफडून मृत्यूमुखी पावला. आज तरुण पत्रकार करणाचा मुळे मृत्यू झाला याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुण्याच्या पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्यावा… व पुण्यातील मनपाचे निष्क्रिय आरोग्य प्रमुख यांची तत्काळ बदली करावीपत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला जबाबदार धरून पालकमंत्री, पुण्याचे खासदार, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

इतिहासात सर्वाधिक घरातच बसणारे मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंचा उल्लेख होईल -दरेकर (व्हिडीओ)

0

मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. राज्यांमध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना मुख्यमंत्र्यांना मात्र मातोश्री बाहेर निघायला वेळ नाही. प्रशासनावर मुख्यमंत्र्यांची पकड नाही मुख्यमंत्री उद्घाटन करतात मात्र तिथेच सुविधा सोई सुविधा नसतात भाजपकडून अनेकदा कोरोना संकटात अनेक ठिकाणी रूग्णवाहिका ,ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते, मात्र या पत्राची कुठलीही दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही आहे. टीव्ही ९ मराठीच्या पत्रकाराचा ॲम्बुलन्सअभावी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने,या ढिसाळ कारभाराबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घरी पाठवण्याची मागणी खासदार किरीट सौमय्या यांनी केली आहे.याचबरोबर सौमय्या यांनी राज्यसरकार मधील सर्व मंत्र्यांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केलं आहे.  
पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा आज मध्यरात्री दुर्देवी मृत्यू झाला त्यांना आवश्यक वेळी साधी रूग्णवाहिका सुद्धा उपलब्ध होऊ शकली नाही आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मुख्यमंत्री मातोश्री वर बसून राज्याचा कारभार करू पाहत आहेत मात्र मातोश्रीवर बसून राज्याचा कारभार करता येत नाही. त्यासाठी बाहेर पडावे लागते, फिरावे लागते. असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.   

पुण्याचे पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांची बदली नाही ,पिंपरीला कृष्णप्रकाश

0

पुणे- एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वाक्षरी केली. पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तसेच,नाशिकला विश्वास नांगरे पाटील यांच्या जागी नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर, विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.

मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावाटने वाढ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

0

नागपूर – : गणेशोत्सवात विजेची मागणी १४००० ते १६००० मेगावाट दरम्यान होती, आता राज्यभरात पावसाचा वेग कमी झाला आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथिल झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावाटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावाट क्षमतेचा संच क्रमांक ८ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावाट क्षमतेचे संच क्रमांक ४ व ५ मधून वीज उत्पादन सुरु झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ.राऊत यांनी दिले आहेत. राज्यभर पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरण समोर असून युद्धस्तरावर कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   
केंद्र शासनाने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य शासनाने “मिशन बिगीन अगेन” अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, उद्योगाची चाके देखील वेग घेत आहेत. एकूणच कोविड-१९ आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजजीवनाची मंदावलेली गती आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मशीदीत जाण्यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांना अटक (व्हिडीओ)

0

औरंगाबाद-एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. जलील यांना मशीदीत जाण्यापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांनी मशीद उघडून नमाज अदा करण्याची घोषणा केली होती.

इम्तियाज जलील यांना पोलिसांनी नमाज अदा करण्यासाठी जातानाच ऐनवेळी अडवले. यावेळी पोलिसांशी बोलताना जलील म्हणाले, आताच आम्ही लोकांना अपील केले की शांतता राखा. आता नमाज अदा करण्यासाठी जात आहोत. आम्ही शांततेने नमाज अदा करण्यासाठी जात आहोत. आमच्यासोबत 25 पेक्षा कमी कार्यकर्ते आहेत. फक्त 5-7 मिनिटे द्या. आम्ही नमाज अदा करू आणि निघून जाऊ.”

पण पोलिसांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. सरकारी नियम आहेत त्यानुसार ही कारवाई केली जात आहे असे पोलिसांनी म्हटले. त्यावर आम्ही सुद्धा सरकारला हेच सांगण्यासाठी आणि अपील करण्यासाठी करत आहोत असे जलील म्हणाले. यानंतर त्यांना अटक करून नेण्यात आले. त्यांच्यासोबत एमआयएमचे नगरसेवक आणि मागच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार नासेर सिद्दीकी सुद्धा होते. त्यांना देखील जीपमध्ये बसवून नेण्यात आले .कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी नाही. आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याचे म्हणाले होते.

दादा ..ओ ..दादा .. सांगा तरी …पुण्यातल्या गलथानपणामुळे झालेत तरी किती मृत्यू ?

0

पुणे- केवळ एका पत्रकाराचाच नाही तर पुण्यात किती जणांचे गलथानपणामुळे मृत्यू झालेत .. असा प्रश्न आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना विचारला जाऊ लागला आहे.  

तुम्ही काहीही करा ,तुम्ही हाथमोजे घाला , भारीतल्या भारीत मास्क घाला , कोणाचाही आक्षेप नाही. पण अँब्यूलन्सची पुण्यात होणारी गैरसोय , उपलब्ध न होणारे बेड , महामारीच्या नावाने होणारी लुटमार या प्रकरणी प्रश्न विचारायला  येणाऱ्या  पत्रकारांना पुण्याच्या विधानभवनाबाहेर रस्त्यावर तास न तास उभे करून ठेवणारे तुम्ही पहिलेच दादा , पत्रकारांच्या माईक्सवर सॅनिटायझर चे फव्वारे मारणारे तुम्ही पहिलेच दादा …तुम्ही तुमची  काळजी नक्कीच घ्यायला हवी ,आम्हीही आमची काळजी नक्कीच घ्यायला हवी . पण भारतात या रोगाचा शिरकाव जर होऊ द्यायचाच नाही ,याची दक्षता फेब्रुवारीतच घेतली असती तर आज हजारो जीव वाचले नसते का हो ? लाखो कुटुंबे  उध्वस्त झाली नसती ना …. पण ते सारे होऊन गेल्यावरही … पुण्यातील आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा सुरूच राहिला , शेखर गायकवाडसारख्या आयुक्तांची तुम्ही बदली केली . पण या बदलीने तुम्ही नेमके काय साधले हो ? महापालिकेचे किती हॉस्पिटल्स बंद आहेत ? किती सुरु आहेत ? किती आरोग्य सेवक कामावर राबतात,अन त्यांना आपण किती पगार देतो ?त्यातल्या किती जणांची नौकरी परमानंट आहे? ,अन किती दांड्या मारून घरी बसलेत ?  या प्रश्नांचे हि उत्तरे  कोणी द्यायला नको काय ? या कारभारावर कोणाचा अंकुश आहे हो दादा ? इथले महापौर राब राब राबताना दिसतात शिवाय आरोग्य यंत्रणेवर शेकडो कोटीच्या ढीगभर गप्पा होतात . पण महामारीला रोखण्यात यंत्रणेला यश आले नाही . आता एका पत्रकाराच्या मृत्यू नंतर तुम्ही म्हणे चौकशीचे आदेश दिलेत .. कोण करणार हि चौकशी , ज्यांच्यावर जबाबदारी होती, तेच करणार ? तेच अहवाल देणार ? कोणाला जबाबदार धरणार ? बरे सुरुवातीपासूनच  झालेला ढिसाळ कारभार त्याचे काय ? त्याने किती बळी घेतलेत ? किती संसारे उध्वस्त झालीत ? याची कोण चौकशी करणार ? किती जणांच्या नौकऱ्या गेल्यात , किती जणांचा पगार थांबला  याची कोण चौकशी करणार ? दादा , तुम्ही राजकारणातले दादा .. समाजकारणातले दादा … ठरवले तर काहीही करू शकता ? काय करायची ती व्यवस्था करा .. पण खरे सांगा , पुण्यातल्या गलथान कारभाराने नेमके किती बळी गेलेत …. ? भले कोणा जबाबदार बड्या धेंडांवर वर कारवाई नाही केली तरी …,पण कोरोना योद्धा असलेल्या ,मरण पावलेल्या  किती जणांच्या कुटुंबाना २५ लाख ,५० लाख , 1 कोटी दिलेत ते सांगायला तरी पुढे या … येणार ना, दादा … ?

पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी सौरभ राव आणि विक्रम कुमार यांना अहवाल देण्याचे आदेश

0

पुणेपत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांना,महापालिका आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल मागितला आहे.

पत्रकारांनी पांडुरंग यांच्यावर उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले. सर्वसामान्य नागरिकांना या जम्बो सेंटरमध्ये पाणीही मिळत नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडसही मिळत नाही. मंगळवारी रात्री 10 पर्यंत पांडुरंग यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड मिळाला नाही. 100 कोटी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी अँबूलन्स न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमध्ये आरोग्य यंत्रणा उपलब्ध नाही. पांडुरंगचे कुटुंब मोठ्या दुःखात आहे. सर्वाधिक मृत्यू पुणे शहरात होत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही पांडुरंगच्या मृत्यू प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे.

पांडुरंगच्या आठवणीने पत्रकारांनाही अश्रू अनावर

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यांच्या आठवणीने आज अनेक पत्रकारांना अश्रू अनावर झाले. 100 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार होत नसतील तर हे हॉस्पिटल उभारून काय उपयोग झाला, असा सवाल अनेक पत्रकारांनी उपस्थित केला.

रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरणार

0

नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA)ची नियुक्ती केली आहे.

आरआरबी एनटीपीसी २०२० भरतीः आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.

आरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

वयोमर्यादा: सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८-३३ वर्षे आहे; ओबीसीसाठी ते १८-३६ वर्षे आहे आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी ते १८-३८ वर्षे आहे.

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनाने निधन

0

पुणे- टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे. सलाम पुणे ,तसेच मायमराठी डॉट नेट च्या वतीने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

मिळालेल्या माहितीनुसार त्याची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह अली होती,त्यानंतर तो विश्रांतीसाठी गावी गेला,पुन्हा थोडी तब्येत बिघडली,तेव्हा swab टेस्ट केली,ती पोझिटिव्ह आली,मग कोपरगावच्या हॉस्पिटल मध्ये गेला,तिथे 40 हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले,तेव्हा तिथे ऍडमिट न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला.इथे प्रकृती खालावत गेली…खासगी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता.अखेर काल संध्याकाळी मंगेशकर मध्ये बेड उपलब्ध झाला.
तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती. ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही.जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता…..

दीड वाजता केला शेवटचा मेसेज
पांडुरंग यांची प्रकृती खालावली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास आधी पत्रकारांच्या एका ग्रुपवर पांडूरंग यांनी “मला वाईट वाटते, मला न्या” असा मेसेज केला होता. पत्रकारांनी त्यांना जंबोतून बाहेर काढून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण कुचकामी यंत्रणेमुळे योग्य उपचार मिळू न शकल्याने पहाटे मृत्यू झाला.

घटनाक्रम
– पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले.

– 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली.

– दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र, तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमध्ये अँटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली.

– रविवारी 30 जुलैला रात्री त्यांना अँम्ब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमध्ये भरती केले. जंबो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ‘आयसीयु’मध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.

– मंगळवारी रात्री 2 जुलैला त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिअॅक अँम्ब्युलन्सची गरज होती. अशी अँम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रात्री अकरा वाजता अँम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण, त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण, त्या अँम्ब्युलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा- सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला अँम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण, तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.

– दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयुमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कार्डिअॅक अँम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती

आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

0

पुणे-राज्य सरकारने सोमवारी (31 ऑगस्ट) ‘अनलॉक 4’ ची नियमावली जारी केल्या. त्यामध्ये आंतरजिल्हा रस्ते प्रवासासाठी लागणारी ई पास रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ आता राज्यात आंतरजिल्हा रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीच्या आधारावर मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीचा पर्याय देखील प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे.

इतर राज्यात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक सुरू असली तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे 22 मार्चपासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या राज्यात 200 रेल्वे गाड्या सुरु आहेत. या गाड्यांमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य नागरिकांना परवानगी नव्हती. मात्र, आता राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही रेल्वेने प्रवास करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणे आवश्यक आहे. प्रवाशांना 2 सप्टेंबरपासून रेल्वे बुकिंग करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. मात्र हा प्रवास करत असताना काही नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून प्रवास करावा लागेल. ज्यांचे तिकीट आरक्षित झाले आहे केवळ त्यांनाच या रेल्वेतून प्रवास करता येईल. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.

केंद्र सरकारने ‘अनलॉक 2’ नंतर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु केल्या. तेव्हापासून मुंबईहून जवळपास 200 रेल्वे गाड्या सूटत आहेत. मात्र, या गाड्यांना महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर थांबा नव्हता. मात्र, आता या गाड्यांना महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरही थांबा असणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार

0

मुंबई, दि. 1 :- अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर. सर्वांना सुखी ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य दे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात सुबत्ता येऊ दे. महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ आम्हा सर्वांना दे…” असं साकडं घातलं आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणानं, नियमांचं पालन करीत, कोरोनासंसर्ग वाढणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांचे आभार मानले आहेत.

अनंत चतुर्दशीनिमित्त यंदा विसर्जन मिरवणूक न काढता गणेशभक्तांनी आपापल्या घरी, सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंडपात किंवा नेमून दिलेल्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं गणेशमुर्तींचं विसर्जन केलं. पुण्यात दरवर्षी तीस तास चालणारी मिरवणूक यंदा टाळण्यात आली. मानाच्या गणेशमंडळांनी यंदा तीन तासात गणेशमूर्तींचं भक्तीभावाने विसर्जन केले. गणेशभक्तांची ही कृती बुद्धीदेवतेच्या भक्तांना साजेशी होती. मुंबई, पुण्यासह राज्यातील गणेशमंडळांनी सामाजिक जाणीवेतून रक्तदान, प्लाझ्मादान, आरोग्य शिबिरांचं आयोजन करुन गणेशोत्सव साजरा केला. त्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व गणेशभक्तांचे, गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणरायांना निरोप देत असताना श्रीगणपती बाप्पांनी पुढच्यावर्षी लवकर यावं, अन्‌ ते येतील तेव्हा महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झालेला असेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मुख्य मंदिरामध्ये गणेश कुंडामध्ये विसर्जन

0

पुणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना करीत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण यांसह पोलीस दलातील अधिकारी देखील उपस्थित होते. प्रख्यात सनई वादक प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड यांनी गणरायाचरणी वादनसेवा अर्पण केली. तर, प्रभात बँडच्या मोजक्या वादकांनी सादरीकरण केले. 

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा आॅनलाईन पद्धतीने अनुभविला. लेकरांनो तुमच्या वरचं संकट घेऊन चाललोय… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिरात काढण्यात आली. गणेशाने कोरोनारुपी राक्षसाचा वध केल्याचे दृश्य रंगावलीत साकारण्यात आले. 

अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील बहुतांश गणेश मंडळांनी केले. तसेच अनेक पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन केले. त्याबद्दल ट्रस्ट सर्वांचे आभारी आहे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत झाली आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागला आहे. यावर्षी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सवाच्या काळात मंदिरामध्ये गेले नाहीत. तसेच आॅनलाईन पद्धतीने सुमारे दीड कोटी भाविकांनी दर्शन घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.  

उजनी धरण भरले १०१ टक्के

0

इंदापूर : पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण सोमवारी १०१.३३ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे.संपूर्ण वर्षभर वरील तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने, पंधरा औद्योगिक वसाहती, अनेक नगर परिषदा, महानगरपालिका व गावांना या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकरी कुटुंबे, शेतमजूर आणि उद्योजकांचा प्रपंच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने ही धरणे भरली असून, धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे सोमवारी उजनी धरण १०० टक्के भरले. मागील वर्षी ऑगस्ट सुरुवातीला उजनी धरण १०० टक्के भरून विसर्ग चालू होता. यंदा मात्र उजनी शंभर टक्के भरण्यास ऑगस्टअखेर उजाडला आहे.

उजनी धरणाची सद्य परिस्थिती

एकूण पाणीपातळी ४९६.९०० मीटर

एकूण पाणीसाठा ३३४३. ६२ दलघमी
( एकूण पाण्याचा टीएमसी ११८.०७ )

उपयुक्त पाणीसाठा १५४०.८१ दलघमी
(उपयुक्त पाण्याचा टीएमसी ५४.४१)

एकूण उजनी धरण भरलेली टक्केवारी १०१.५६ टक्के

_______________________________________

उजणीतून सोडलेला विसर्ग

*सिना – माढा उपसा सिंचन – २६२ क्युसेक

*भीमा सिना बोगदा – ९०० क्युसेक

*मुख्य कॅनॉल – ८०० क्युसेक

आता तरी मराठी निर्मात्यांचे अनुदान सरसकट पद्धतीने द्या – नव्या महामंडळाची मागणी

0

मुंबई-मराठी चित्रपट सृष्टीत विविध विचारांचे सूर उमटू लागले असून नव्याने गेल्या वर्षी स्थापन झालेल्या मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने, शासनाकडे, आता तरी कोणाची एकाधिकारशाही, लॉबीला मानू नये असे सांगत केवळ सिलेब्रिटी म्हणजे चित्रपट क्षेत्र नाही या क्षेत्रातील अनेक गोरगरीब कलावंतांची ,ज्यांना विशिष्ट लोकांचा आशीर्वाद मिळू शकत नाही अशा तंत्रज्ञ आदी लोकांची लॉकडाऊन काळात मोठ्या अपेष्टा झाल्या आहेत . या क्षेत्रात पाय रोवू पाहणारे अनेक निर्माते लॉकडाऊन मध्येच संपून जाऊ नयेत शासनाने आता तरी मराठी चित्रपटांच्या अनुदानाचा विषय सरसकट मार्गी लाऊन या क्षेत्राला आधार द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले.

मराठी चित्रपट निर्मात्यांचे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक मराठी चित्रपट निर्माते कर्जबाजारी झाले आहेत. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत मराठी चित्रपट व्यवसाय वाचविण्यासाठी आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना शासकीय अनुदान मिळविण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. याच अनुषंगाने अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब गोरे आणि अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने सादर केले. तसेच मराठी चित्रपट निर्माते आणि कामगारांच्या विविध समस्या त्वरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांना विनंतीही करण्यात आली. मराठी चित्रपट अनुदान योजने अंतर्गत अनुदाना करीता ज्या चित्रपटांचे प्रस्ताव सादर केले आहेत त्या प्रस्तावांना परिक्षण न करता सरसकट अनुदान द्यावे. तसेच मराठी चित्रपट अनुदान योजने मध्ये सुद्धा अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.सध्याचे नियम आणि अटींची पूर्तता करणे अत्यंत कठीण झाले आहे. कोणत्याही मराठी चित्रपट ला सेंन्साॅर समंत झाला की त्या चित्रपटाला अनुदान योजने करीता पात्र ठरविले पाहिजे. परंतु महाराष्ट्र शासनाने फक्त एकाच ठराविक संघटनेचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र मागणी करणे अयोग्य आहे.या नियमांमुळे सदर संघटनेतील विशिष्ट लॉबी एकाधिकारशाही गाजवते आणि मराठी चित्रपट निर्मात्यां कडुन जास्तीत जास्त पैसे घेते. ही बाब अन्यायकारक असून कोणत्याही संघटनेची मक्तेदारी सरकार दरबारी नसावी.अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या सभासदांना सुध्दा मराठी चित्रपट अनुदाना करीता ग्राह्य धरावे असा जी.आर. सांस्कृतिक मंत्रालयाच्या संबंधित विभागाने त्वरीत पारीत करावा.
सेलिब्रिटी म्हणजे संपूर्ण कला चित्रपट क्षेत्र नाही त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे या करीता तंत्रज्ञ आणि कामगारांची शासनाने नोंद करावी.वृध्द कलाकारांचे मानधन वाढवून त्यांची नोंद करण्याची पद्धत सोपी करून शासनाने त्वरीत नोंद करावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले. त्यानंतर सदरचे निवेदन पत्र देऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर चर्चा करताना सुळे यांनी प्रत्येक मागणी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.तसेच त्यावर काही उपाय अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाकडे आहेत का याचीही माहिती घेतली आणि लवकरच या मागण्यासाठी स्वत: जातीने लक्ष घालून योग्य निर्णय घेतला जाईल , असे आश्वासन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. या चर्चेतून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल आणि मागण्या मान्य होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी स्पष्ट केले आहे .

येत्या ३ दिवसात कर्नाटक,केरळ,तमिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता

0

धरणे भरली जिथे ,तिथे पूर नियंत्रणाकडे लक्ष देण्याची गरज

नवी दिल्ली -गुजरात आणि पश्चिम राजस्थानात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून तुरळक ठिकाणी अति जोरदार वृष्टी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 19 केंद्रांवर (बिहारमध्ये 7, उत्तरप्रदेशात 3, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 2, तर आसाम, झारखंड, मध्यप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 1) तीव्र पूरस्थिती दिसत आहे तर 30 केंद्रांवर (बिहारमध्ये 14, उत्तरप्रदेशात 7, आसाममध्ये 5, ओदिशामध्ये 2, तर गुजरात आणि राजस्थानात प्रत्येकी 1) सर्वसामान्य पूरस्थितीपेक्षा अधिक पातळी आहे.

24 मोठ्या धरणांमध्ये (मध्यप्रदेशात 6, उत्तरप्रदेशात 3, आंध्रप्रदेश, गुजरात, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2, तर ओदिशा, राजस्थान व तेलंगणामध्ये प्रत्येकी 1 धरण) पाण्याची आवक किती होणार याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे- त्याचे तपशील पुढील लिंकवर पाहता येऊ शकतील-  http://cwc.gov.in/sites/default/files/cfcr-cwcdfb31082020_5.pdf

पश्चिम राजस्थान आणि कच्छमध्ये सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर त्यात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. 02 आणि 03 सप्टेंबर 2020 रोजी वायव्य भारत आणि पश्चिमी हिमालयीन क्षेत्रात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. द्वीपकल्पीय भारतात 1 सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. 02 आणि 03 सप्टेंबर 2020 रोजी कर्नाटकच्या अंतर्गत क्षेत्राचा दक्षिण भाग, केरळ आणि तामिळनाडूमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ओदिशामध्ये अंगुल जिल्ह्यात ब्राह्मणी नदीवरील रेंगाली धरण अद्यापि पूर्णपातळीच्या वरून वाहतच आहे. ओडिशामध्येच केंदुझार जिल्ह्यात येत्या 4 दिवसात मुसळधार (65.5 ते 115.5 मिमी) पाऊस पडेल असा अंदाज आहे. धरणक्षेत्रातील अशा जोरदार पावसामुळे पाण्याची आवक होण्यात अचानक वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर बारीक नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने, महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात भंडारा आणि पौनी येथे वैनगंगा नदीची पाणीपातळी उतरू लागली असली तरी अद्यापि ती तीव्र पूरपातळीवरूनच वाहत आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्पात होणारी पाण्याची आवक कमी होत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून विसर्ग करण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीची पातळी वाढत आहे. वर्धा नदीच्याही पाण्यामुळे वैनगंगा नदीप्रवाहात भर पडत असून त्यांच्या एकत्रित प्रवाहामुळे तेलंगणामध्ये जयशंकरभूपालपल्ली जिल्ह्यात गोदावरी नदीवरील लक्ष्मी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

पावसात लक्षणीय घट झाल्याने नर्मदा नदीच्या उगमाजवळच्या प्रवाहात घट झाली आहे. मात्र मध्यप्रदेशात होशंगाबाद जिल्ह्यात ती अद्यापि तीव्र पूरपातळीवरूनच वाहत आहे. इंदिरासागर, ओंकारेश्वर आणि सरदार सरोवर धरणांत अद्यापि पाण्याची जोरदार आवक होत आहे. सरदार सरोवर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात गरुडेश्वर येथे तसेच भरूच जिल्ह्यात भरूच येथे तीव्र पूरस्थिती उद्भवली आहे.

पाऊस कमी झाल्याने छत्तीसगड आणि ओदिशामधील महानदी आणि तिच्या उपनद्यांची पातळी उतरणे तसेच मोठ्या धरणांच्या पाणी आवकप्रमाणात हळूहळू घट होणे अपेक्षित आहे. मात्र, ओदिशातील संबळपूर, भद्रक, जाजापूर, कटक, अंगुल, मयूरभंज व केंदुझार या जिल्ह्यांत तर छत्तीसगडमधील रायपूर आणि चाम्पा जिल्ह्यांत परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे.

मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील गांधीसागर, राजस्थानात चित्तोड जिल्ह्यात राणाप्रताप सागर आणि झालावार जिल्ह्यातील कालिसिन्ध धरण या धरणांत चंबळ नदी व तिच्या उपनद्या हळूहळू पाण्याची आवक करीत आहेत. या धरणांतून पाण्याचा विसर्ग झाल्याने राजस्थानातील धोलपूर जिल्ह्यात धोलपूर येथे चंबळ नदीची पातळी झपाट्याने वाढत असून ती धोक्याच्या पातळीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे.

येत्या 3 दिवसात, कर्नाटकच्या अंतर्गत क्षेत्राचा दक्षिण भाग, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कावेरी खोऱ्याच्या वरच्या भागात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश धरणांत 90% पेक्षा अधिक पाणीसाठा असल्याने, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस होऊन पाणीपातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

येत्या 3-4 दिवसात वरील सर्व राज्यांत व जिल्ह्यांत काटेकोरपणे सावधगिरी बाळगली पाहिजे. धरणांमध्ये आवक वाढल्याने परिस्थितीकडे बारीक लक्ष ठेवले गेले पाहिजे. यापैकी कोणत्याही पाणीसाठ्यातून नियमानुसार व गरजेनुसार विसर्ग करताना प्रमाणित कार्यान्वयन प्रणालीनुसार दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच प्रवाहाच्या खालच्या भागांना वेळीच आगाऊ सूचना दिल्या जाणे आवश्यक आहे. या भागांतील रेल्वेमार्ग, रस्ते, पूल यांवर सर्वाधिक लक्ष ठेवणे व दुर्घटना टाळण्यासाठी रहदारीचे नियमन करणे गरजेचे आहे. नदीजवळील कमी उंचीचे सेतू आणि रेल्वेरूळ बुडण्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. संबंधित सर्व जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन शिबिरे उभारताना कोविड-19 परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.