Home Blog Page 2464

फुल्ल उजनी तून भीमा नदीत १५ हजार क्‍युसेक विसर्ग

0

सोलापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. धरण परिसरात रविवारी (ता. ६) एकाच रात्रीत तब्बल १०० मिलिमीटर इतका पाऊस झाला. आज (सोमवारी) सकाळी उजनी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून, त्याद्वारे 15 हजार क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. सध्या भीमा नदीत एकूण 16 हजार 600 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, वीर धरणातूनही नीरा नदीत 13 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भीमा नदी काठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारी रात्री मेघगर्जनेसह सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे उजनीत येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 6 हजार तर बंडगार्ड येथून 7 हजार विसर्ग येत आहे. आज सकाळी धरण 111 टक्के भरले आहे. तर धरणात 223 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

पंढरपूर तालुक्‍यालाही रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पंढरपूर शहरातही मुसळधार पाऊस झाला. शहरात तब्बल 70 मिलिमीटर इतका पाऊस झाला. तर भंडीशेगाव मंडलात 65 मिलिमीटर पाऊस झाला. पटवर्धन कुरोली, कासेगाव, भाळवणी, तुंगत, चळे या भागातही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना फायदा झाला आहे

सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्या व वारसांना शासकीय नोकरी द्या-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी

0

मुंबई, दि.७ सप्टेंबर : कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योध्दांना शहिदांचा दर्जा द्यावा. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर सहवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली.
“आपली काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले. असे डॉक्टर, वैदयकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत शासनाने करणे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या कोविड योध्दांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमविता व्यक्ती गमाविल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंतीही दरेकर यांनी केली.
पांडुरंग रायकर यांना ५० लाखाचा विमा द्या
पत्रकार पुण्यात पांडुरंग रायकर यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा त्वरित देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

ऑक्सिजन उत्पादकांनी 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध करुन द्यावा-जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख

0

पुणे,दि. 7: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी तर 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन उत्पादक व ऑक्सिजन सिलेंडर भरणारे उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, अन्न, औषध, प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील, औषध निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त शाम प्रतापराव, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक पी.डी. रेंदाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा.
प्रत्येकाचा जीव बहुमूल्य असून प्रत्येक जीव वाचवणं महत्वाचं आहे. सध्या कोरोना परिस्थिती कठीण असली तरी ऑक्सिजन उत्पादक कंपन्या व सिलेंडर भरणाऱ्या घटकांनी लोकसेवेच्या भावनेतून योग्य ते नियोजन करुन आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी सांगितले.

ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या उत्पादकांशी संवाद साधून डॉ.देशमुख म्हणाले, ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्याकडे भरण्यात आलेले सिलेंडर केवळ वैद्यकीय उपचारासाठी वितरीत करावेत. रुग्णालय व ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या छोट्या उत्पादकांपर्यंत टँकर जलदगतीने पोहोचवण्यासाठी द्रवरुपातील ऑक्सिजन टँकरच्या वाहतूक वितरणादरम्यानच्या त्रुटी उत्पादकांनी दूर कराव्यात व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे.

यावेळी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांचे प्रमुख, ऑक्सिजन सिलेंडर भरणारे उत्पादक व पुरवठादारांनी जाणवणाऱ्या अडचणी मांडल्या. रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासनही उपस्थितांनी दिले.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख

0

पुणे, – पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाच्या संकट काळात कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक होवू नये यासाठी मानवतेच्या भावनेने सर्वांनी मिळून मदत करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केली. तसेच या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी आवाहन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेवून संवाद साधला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक डॉ अमोल म्हस्के, जिल्हा समन्वयक डॉ सागर पाटील, डॉ प्रिती लोखंडे, एम.डी. इंडियाचे प्रतिनिधी अविनाश बागडे उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‌ नांदापूरकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्ह्यात अमंलबजावणीच्या अनुषंगाने रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी २ हजार ६०९, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयांनी २ हजार ३१, पुणे जिल्ह्यतील ग्रामीण भागातील रुग्णालयांनी ६८७ असे एकूण ५ हजार ३२७ रुग्णांला लाभ देण्यात आलेला आहे. यातून असे निदर्शनात येते की, काही रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. परंतु काही रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना अपेक्षित लाभ देण्यामध्ये कमी पडलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी याप्रकरणी गांभीर्याने व संवेदनशीलतेने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी, कोरोना बाधित रुग्णाला मदत करावी, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच आरोग्य मित्र यांच्या समन्वयाने रुग्णालयांनी काम करावे. ही योजना सर्व लोकप्रतिनिधींमार्फत सर्व नागरिकांपर्यत पोहचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या. रुग्णालयांच्या प्रलंबित देयकाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता रुग्णालयांकडून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी रुग्णालयांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आले.

बावधन येथे ५० बेडच्या मोफत कोविड केअर सेंटरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
  • कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अधिक प्रमाणत प्लाझ्मा दान करावे असे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे.

पुणे – बावधन येथे सर्व सुविधायुक्त ५० बेडच्या मोफत कोविड केअर सेंटरचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उद्घाटन करण्यात आले. बावधन च्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील , नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर चालवले जाणार असल्याने समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण ठरणार असल्याचे यावेळी चंद्रकांतदादांनी सांगितले. या कोविड केअर सेंटरमध्ये २४ तास २ डॉक्टर व २ नर्स असणार आहेत. तर २ ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असून रुग्णांना मास्क, सॅनिटायझर दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहा, प्रतिकारशक्ती वाढवणारा काढा अशा सर्व सुविधा देण्यात येणार आहे. तर रुग्णांसाठी बेड, मॅट्रेसेस, बेडशीट, पिलोव्ह, वाफ घ्यायचे भांडे, गरम पाण्याचे भांडे, कोलगेट, ब्रश, टॉवेल, पाणी बॉटल्स, टीश् पेपर, तेल अशा सर्व दैनंदिन वापराच्या वस्तूही पुरवल्या जाणार आहेत. ही सर्व व्यवस्था मोफत केली असून त्याचा भार सरपंच पियुषा किरण दगडे पाटील व नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी उचलला आहे.
   कोरोनाच्या महामारीमुळं सर्वसामान्यांचे हाल झाले असताना गोरगरिब जनतेला मोठी झळ बसली आहे. त्यातच कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णांना भरमसाठ पैसै मोजावे लागत आहेत. त्यामुळे गोरगरिब रुग्णांची सोय होण्यासाठी समाजसेवेचं एक पाऊल म्हणून या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न केला आहे.तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना अधिक प्रमाणत प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे.

महापालिकेची कायमस्वरूपी करोना चाचणी प्रयोगशाळा उभी करा -विशाल तांबे

0

पुणे- कोरोना रोगाचा प्रादुर्भाव बघता पुणे महानगरपालिकेने कायमस्वरूपी अद्ययावत चाचणी प्रयोगशाळा उभारणे ही आता शहराची आणि काळाची गरज बनली आहे. आणि याच करता नायडू हॉस्पिटल च्या आवरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने करोना चाचणी प्रयोगशाळा कायमस्वरूपी उभी करण्यात यावी. अशी मागणी नगरसेवक आणि स्थायी समिती चे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी केली आहे .

या संदर्भात त्यांनी म्हटले आहे कि , शहर मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रदूर्भावाने ग्रस्त आहे. आजमितीस देशातील सर्वात जास्त  कोरोनाग्रस्तांची संख्या ही पुणे शहरात आहे. महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने रुग्णांची चाचणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.यामध्ये आरटीपीसीआर आणि अँटिजिन रॅपिड स्वब टेस्ट या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यापैकी आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट हे बीजे मेडिकल कॉलेज किंवा एन.आय.व्ही किंवा आय.सी.एम.आर यांच्याकडून पुणे महानगरपालिकेस दिले जातात. गेले अनेक दिवस शहरात वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पटीत यापुढील काळात  प्रयोगशाळांकडून रिपोर्ट मिळण्याकरता उशीर होत आहे. किंबहुना ते मिळण्याकरता किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी आजमितीस लागत आहे. रोगाचा प्रादुर्भाव बघता पुणे महानगरपालिकेने कायमस्वरूपी अद्ययावत चाचणी प्रयोगशाळा उभारणे ही आता शहराची आणि काळाची गरज बनली आहे. आणि याच करता नायडू हॉस्पिटल च्या आवरामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने करोना चाचणी प्रयोगशाळा कायमस्वरूपी उभी करण्यात यावी.ज्यामुळे वाढणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव बघता मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआर टेस्टिंग करणे हे महानगरपालिकेला शक्य होणार आहे, आणि या टेस्टिंग मुळे स्वतःच्या प्रयोगशाळेचा उपयोग लवकरात लवकर टेस्ट रिपोर्ट देण्यासाठी होणार आहे. परिणामी शहरांमधला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यामुळे निश्‍चितपणे हातभार लागणार आहे. म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी स्वतःच्या मालकीची प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 63 हजार 209

0

पुणे विभागातील 2 लाख 7 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 2 लाख 77 हजार 911 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, :- पुणे विभागातील 2 लाख 7 हजार 393 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 911 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 63 हजार 209 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 309 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.63 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 13 रुग्णांपैकी 1 लाख 53 हजार 936 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 613 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.75 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 490 रुग्णांपैकी 10 हजार 777 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 704 रुग्णांपैकी 15 हजार 164 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 718 आहे. कोरोनाबाधित एकूण 822 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 25 रुग्णांपैकी 9 हजार 65 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 28 हजार 679 रुग्णांपैकी 18 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 615 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 447, सातारा जिल्ह्यात 827 , सोलापूर जिल्ह्यात 534 , सांगली जिल्ह्यात 763 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 95 हजार 493 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 77 हजार 911 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 6 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

ग्रामपंचायत सुधारणा विधेयक गदारोळात मंजूर (LIVE व्हिडीओ)

0
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/343168363487275/

मुंबई-कोरोनाच्या सावटाखाली आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील गदारोळात ग्रामपंचायत सुधारणा विधेयक मंजूर झाले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला होता. यामुळे सभागृहात घमासान पाहायला मिळाले.

सरकार कोर्टाच्या विरोधात भूमिका घेत आहे – फडणवीस

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पटलावर मांडलेल्या ग्रामपंचायत‌ सुधारणा विधेयकाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, याबाबत कोर्टात सुनावणी सुरू असताना हे विधेयक आणू नका. सरकार कोर्टाच्या विरोधात भूमिका घेत आहे. तसेच कोर्टाने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार नियुक्ती करा, अशी मागणी देखील फडणवीसांनी केली.

खासगी व्यक्ती आम्ही नेमत‌ नाही, सरपंचांना मुदतवाढ देण्याचा नियम नाही

तर फडणवीसांच्या आक्षेपाला उत्तर देताना मुश्रीफ यांनी “राज्यपाल निवडताना काही जाहिरात‌ देता का? त्यासाठी जो सुटेबल असेल तो‌ व्यक्ती‌ नेमतात ना?” असा प्रतिप्रश्न केला. तसेच “खासगी व्यक्ती आम्ही नेमत‌ नाही, सरपंचांना मुदतवाढ देता येत‌ नाही, तसा नियम नाही” असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले.

ग्राम पंचायतींवर प्रशासकाची नेमणूक

नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी, प्रशासकीय अडचणी, महामारी, इत्यादीमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, पंचायतींच्या निवडणुका घेता आल्या नाही तर, राज्य सरकार, पंचायतींचा प्रशासक म्हणून, योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम कलम 151 मध्ये 25/06/2020 रोजी महाराष्ट्र अध्यादेशाद्वारे दुरुस्ती करण्यात आली आहे.

कोरोना आणि वेळोवेळी लॉकडाऊनमुळे ग्रामपंचायती निवडणुका रखडल्या

राज्यातील 19 जिल्ह्यामधील 1566 ग्राम पंचायतींची मुदत एप्रिल 2020 ते जून 2020 दरम्यान, तर 12 हजार 668 ग्राम पंचायतीची मुदत जुलै, 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत आहे. देशातील, तसेच महाराष्ट्रातील सध्याचा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव, तसेच केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी लॉकडाऊन घोषित केल्याने, या निवडणुका रखडल्या. राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्राम पंचायतींच्या निवडणुका केव्हा घेण्यात येतील, याबाबत अनिश्चितता आहे.

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे

0

मुंबई, : रक्तदाना इतकेच प्लाझ्मादानही श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. त्यातून गरजूंचे जीव नक्की वाचवू शकतो. महाराष्ट्रामध्ये जे कोरोनातून बरे झालेले पाच लाख लोक आहेत त्यातील प्लाझ्मादानासाठी  बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या चर्चासत्र मालिकेचा समारोप आज प्रसारित होणाऱ्या भागाने होत आहे. या शेवटच्या भागात आरोग्यमंत्री श्री.टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी कोरोना : प्लाझ्मा आणि सिरो सर्व्हेलन्स याविषयी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्री म्हणाले, प्लाझ्माचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे दहापैकी नऊ केसेसमध्ये प्लाझ्मा दिला गेला ते रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले असा त्यातला अनुभव आहे. आपल्या शरीरातील रक्तातून पेशी बाजूला काढल्या तर जे पिवळे द्रव्य उरते तो प्लाझ्मा. त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मॅकॅनिजम असतात. ज्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असतात.

प्लाझ्मा कोण देऊ शकतो? याविषयी मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री म्हणाले, जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन (HB) १२.५ टक्के असेल, वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा आपल्याला घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो.

प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्या ठिकाणी १:६४ अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो. आमच्या  संकेतस्थळावर  एसबीटीसी (स्टेट ब्लड ट्रन्सफ्युजन कौन्सिल)”  येथे भेट देऊन ज्याला प्लाझ्मा दान करायचाय आणि ज्याला प्लाझ्मा हवाय अशांची नोंद करता येते.

प्लाझ्मा दानासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करता आले पाहिजे. प्लाझ्मा देणे हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास त्याला वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या कार्याला हातभार लागू शकतो. कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यामध्ये आपण हातभार लावावा, असे आवाहन मी जरूर करेन.

राज्य शासन, भारतीय जैन संघटना आणि आमच्या लॅब असे आपण एकत्र येऊन मॉडेल तयार करता येईल. तुमची भूमिका प्रोत्साहन देण्याची आहे. एक चांगली व्यवस्था निर्माण करूया. आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन ज्याला प्लाझ्मा द्यायचाय आणि ज्याला घ्यायचाय त्याने तशी नोंद करावी. जे देणारे आहेत आणि जे घेणारे आहेत अशा दोघांनाही तुम्ही संपर्क करून आमच्याकडे सुपुर्द करा. प्लाझ्मादानामध्ये सुद्धा महाराष्ट्र  एक नंबरचे राज्य होईल. भारतीय जैन संघटनेचे यामध्ये योगदान असावं.

सिरो सर्व्हेलन्सबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री यांनी सांगितले, एखाद्या समूहामध्ये किती संसर्ग झाला आहे याचं प्रमाण समजून येण्यासाठी केलेला अभ्यास आहे. धारावीमध्ये १०० पैकी ५६ लोकांमध्ये आयजीजी अँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ एवढाच आहे की प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची सुरुवात, झाली. सिरो सर्व्हेलन्स मुंबई, पुणे, मालेगाव आता औरंगाबादमध्ये काही प्रमाणात झाला आणखी काही हॉटस्पॉटमध्ये आपल्याला करता येऊ शकतो असा आमचा मानस आहे.

कंगनाच्या मुंबई ऑफिसवर बीएमसीचा छापा

0

अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठे वादंग उठले आहे. तिच्यावर चौफेर बाजुने टीका होऊ लागली आहे. या वादातच आता तिच्या मुंबईस्थित ऑफिसवर महानगर पालिकेच्या काही अधिका-यांनी छापा टाकल्याचे वृत्त आहे. स्वत: कंगनाने त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करुन ही माहिती सार्वजनिक केली आहे. कंगनाने ही सुडाची कारवाई असल्याचे म्हटले आहे.

कंगनाने ट्विटरवर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा व्हिडिओ शेअर करत एकामागून एक तीन ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, बीएमसीची परवानगी आहे त्यानुसार माझ्या मालमत्तेत काहीही बेकायदेशीर नाही, बीएमसीने नोटीस देऊन बेकायदेशीर बांधकाम दर्शविणारे स्ट्रक्चर प्लान पाठवायला हवे, आज त्यांनी माझ्या कार्यालयावर छापा टाकला आणि उद्या ते कोणतीही नोटिस न देता पूर्ण स्ट्रक्चर तोडतील.’

  • माझे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे : कंगना

कंगना पुढे म्हणाली, ‘हे मुंबईतील मणिकर्णिका फिल्म्सचे ऑफिस आहे, मी पंधरा वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत, चित्रपट निर्माता व्हावे, मुंबईत स्वतःचे ऑफिस असावे, हे स्वप्न मी पाहिले होते. पण आता मला हे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. आज अचानक तेथे बीएमसीचे काही लोक आले आहेत’, असे कंगनाने सांगितले.

  • परिणाम भोगण्याची धमकी दिली

तिने लिहिले, ”बीएमसीचे काही लोक जबरदस्तीने कार्यालयात शिरले आणि मोजमाप केले. त्यांनी शेजार्‍यांनाही त्रास दिला. जेव्हा त्यांनी बीएमसीच्या अधिका-यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले, त्या ज्या मॅडम आहेत, त्यांच्या अशा वागण्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागेल. उद्या ऑफिस तोडले जाऊ शकते, असे त्यांनी मला सांगितले आहे.”

कंगना भाजपचा पोपट – वडेट्टीवार

कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून मिळणाऱ्या धमक्या पाहता केंद्र सरकारने तिला वाय प्लस सुरक्षा दिली. याबद्दल तिने गृहमंत्री अमित शहांचे आभार सुद्धा मानले. पण, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मते, कंगना तर भाजपची पोपट आहे. तिला वाय सुरक्षा नको तर चक्क झेड प्लस सुरक्षाच द्या. कंगनासारखे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात असेही ते पुढे म्हणाले.

नगरसेवक राजेश बराटे यांच्याकडून 2 सुलभ शौचालये पाडण्याचे प्रस्ताव

0

पुणे- शहर आणि देशभर स्वछतेला प्राधान्य देणारे केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण असताना ,संपूर्ण शहरात स्वच्छतागृहांची प्रचंड मोठ्ठ्या स्वरूपात कमतरता स्पष्ट दिसत असताना महिला बाल कल्याण समितीने आजवर गेल्या वर्षभरातअसंख्य सुलभ शौचालये पाडण्याचे प्रस्ताव मंजूर केल्याचा धक्कादायक आरोप केला जातो असून आता ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या पाक्षिक सभेत नगरसेवक राजेश बराटे यांनी 2 सुलभ शौचालये पाडण्याचे प्रस्ताव दिले आहेत . सुलभ शौचालये हि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सोयी साठी केली असताना हि शोचालये पाडण्यासाठी मात्र त्यांनी आता घरोघरी शौचालये आहेत . यांची गरज नाही असे कारण देऊन हा प्रस्ताव दिला आहे. मात्र घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी शु आणि सु कुठे करायची ? हा प्रश्न पुण्याच्या महापालिकेने कायमच अनुत्तरीत ठेवला आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील गोसावी वस्ती आकाश मित्र मंडळ तसेच याच प्रभागातील विकास मित्र मंडळ येथील सुलभ शोचालये पाडण्यासाठी 2 प्रस्ताव नगरसेवक बराटे यांनी दिले आहेत . या शौचालयांचा आजूबाजूच्या लोकांकडून गैरवापर होतो . रात्रीच्या वेळी मद्यपी कडून त्याचा गैरवापर होतो .आणि येथून जवळ असलेल्या बिजले चौक आणि मावळे आळी चौकात सुलभ शौचालये आहेत त्यांचा मात्र व्यवस्थित वापर होतो .प्रत्येकाच्या घरी शोचालये देखील आहेत त्यामुळे यांची गरजा उरलेली नाही ती पाडावीत असे या प्रस्तावात म्हटले आहे.

हिल व्ह्यू पार्क ,कार डेपो येथील शौचालय पाडण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त महापालिका यांनी दिला आहे . त्याबाबत जागा पाहणी करण्याचा निर्णय गेल्या सभेत घेण्यात आला होता . हा प्रस्ताव हि आता पुन्हा या सभेत मान्यतेसाठी येतो आहे.

शौचालये पाडण्यामागचे गूढ

खरे तर शहरातील काही शौचालयांचा गैरवापर काही समाज कंटक करीत असतात याबाबतची माहिती अनेकांना असते पण त्यावर कारवाई करण्यास आणि शौचालये स्वच्छ ठेवण्यास कोणीही पुढे येताना दिसत नाही .

तर काही शौचालये गरज असताना गैरवापर नसताना,योग्य वापर असताना हि केवळ आजू बाजूच्या कोणाच्या तरी इमारतीच्या आड येतात ,दुकानांची किंमत कमी करतात अशी शौचालये महापालिकेत कोणाला तरी हाताशी धरून पाडण्याचा घाट घालण्यात येतो किंवा महापालिकेशी संबधित लोक बेनामी बिल्डर असतात ते हि अशी कारस्थाने करतात . वास्तविक पाहता लाईट , स्वच्छता, ठेवून ये जा करणाऱ्या स्त्री -पुरुषांना स्वच्छता गृहांची नितांत गरज पुण्यात आहे .

या पार्श्वभूमीवर आजवर या समितीत येणारे असे प्रस्ताव कायम संशयाच्या भोवऱ्यात कोणाच्या हित संबधातून येत असतात असा आजवर कायम आरोप होत आलेला आहे.

whatsapp द्वारे प्राप्त धोकादायक वीजयंत्रणेच्या 200 तक्रारी निकाली

0

पुणे,  : धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् अॅपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. 7)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात 200 ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील 58 तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडून वीजसुरक्षेसाठी सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, रोहित्रांचे कुंपण उघडे असणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुणे परिमंडलात व्हॉटस् अॅपद्वारे आतापर्यंत 88 ठिकाणी वीजयंत्रणा धोकादायक असल्याची माहिती प्राप्त झाली. महावितरणच्या संबंधीत कार्यालयांकडून 58 ठिकाणचे दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित 30 ठिकाणी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी किंवा शिफ्टींगची गरज परंतु जागेची अडचण आदींमुळे सध्या कार्यवाही सुरु आहे. वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी व्हॉटस् अॅप क्रमांकावर माहिती देण्याच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

व्हॉटस् अॅपच्या मोबाईल क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून धोका असल्याची फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नये. फक्त धोकादायक यंत्रणेचे स्थळ संपूर्ण पत्यासह किंवा गुगल लोकेशनसह द्यावे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे पत्त्यासह माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच अशा तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधून माहिती देता येईल.

पुणे परिमंडलाच्या 7875767123 या व्हॉटस् अॅप क्रमांकावर प्राप्त झालेली धोकादायक यंत्रणेची फोटोसह माहिती किंवा तक्रार तात्काळ संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहे. तसेच यंत्रणेची दुरुस्ती झाल्यानंतरचे छायाचित्र पाठवून संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येत आहे. या उपक्रमाचे अनेक ग्राहकांनी स्वागत केले असून तक्रारींनुसार दुरुस्ती कामे लगेचच पूर्ण केल्याबाबतव्हॉटस् अॅपवर समाधान व्यक्त करीत आहेत.

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर २०२० पर्यंत राज्यात लागू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जायचा आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण ८० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी तर २० टक्के उद्योगांसाठी असे करण्यात आले. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, अशी दक्षता घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कंगना रणौतला हिमाचल प्रदेश सरकारकडून सुरक्षा

0

मुंबई -हिमाचल प्रदेश सरकारकडून अभिनेत्री कंगना रणौतला सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंगनाला सुरक्षा मिळावी, अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली होती. त्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने तिला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. सर्वच स्तरांमधून कंगनावर टीकास्त्र डागण्यात येत आहे. त्यामुळेच हि सुरक्षा देण्यात आली आहे .हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला पूर्णपणे सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

“कंगनाच्या कुटुंबीयांसोबत माझा फोनवर संवाद झाला असून हिमाचल सरकार कंगनाला पूर्ण सुरक्षा देईल. तसंचहिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनादेखील तसे आदेश देण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत जाणार असून हिमाचलच्या मुलीला सुरक्षा देणं यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”, असं जयराम ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्येच तिने मुंबई पोलिसांवरदेखील काही प्रश्न उपस्थित केले होते. इतकंच नाही तर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटून उठला आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करुन कंगनाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

दोन आमदारांसह अधिवेशनासाठी निवडलेले 37 कर्मचारी पॉझिटिव्ह

0

मुंबईत सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे. दोन आमदारांसह अधिवेशनासाठी निवड केलेले मंत्रालयातील ३७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३००० व्यक्तींची उपस्थिती असणारे पावसाळी अधिवेशन कोरोना संसर्गाचा हाॅटस्पाॅट ठरण्याची भीती अनेकांना आहे.

विधिमंडळात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकास कोरोना चाचणी सक्तीची आहे. शनिवारी विधिमंडळात १ हजार ७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाॅझिटिव्हमधील ४ व्यक्ती व्हीआयपी वर्गवारीत येतात. त्यापैकी दोघे आमदार आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या रविवारी चाचण्या झाल्या. त्याचा अहवाल सोमवारी येईल.

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ३५ आमदार आणि ५ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

दुग्धविकासमंत्र्यांसोबत बैठकीत मुख्यमंत्रीही होते

दुग्धविकास आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांना ३ सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या एक दिवस अगोदर मंत्री केदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार यांच्यासमवेत एका बैठकीत सहभागी झाले हाेते.

निवडक व्यक्तींनाच विधिमंडळात प्रवेश

अधिवेशनात शारीरिक अंतर राखले जावे यासाठी मोजक्याच व्यक्तींना विधिमंडळ इमारतीत प्रवेश देण्यात येणार आहे. दोन हजार कर्मचारी-अधिकारी, विधानसभेचे २८८ आणि परिषदेचे ६० आमदार, मंत्र्यांचे खासगी सचिव, विधिमंडळाचे १५० कर्मचारी व ३७ पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार आहे.

२५ टक्के आमदार राहणार अनुपस्थित

ज्येष्ठ व सहव्याधी असणाऱ्या आमदारांनी कामकाजात भाग घेऊ नये, अशी विनंती करण्यात येत आहे. काहींनी चाचणीच्या भीतीने न येण्याचा निर्णय घेतला आहे, तर अनेकांनी मतदारसंघातील काेरोनाच्या परिस्थितीचे कारण पुढे केले आहे. परिणामी २५ टक्के आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विरोधकांनी मतदान घेण्याची मागणी केल्यास अडचण

एकीकडे कोरोनाच्या भीतीने अधिवेशनाला आमदारांची कमी उपस्थिती राहणार आहे, तर दुसरीकडे विधेयके, अध्यादेश, पुरवणी मागण्या यांच्या मंजुरीला विरोधकांनी मतदानाची मागणी केल्यास सरकार अडचणीत येऊ शकते.