Home Blog Page 2461

ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा – मेधा कुलकर्णी

0

पुणे- : ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात कोथरूड च्या माजी आमदार प्रा.सौ.मेधाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वात विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह राज्यातील राज्याचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॅबिनेट मंत्री व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी केली आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील ब्राह्मण संघटनांच्या वतीने समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण केले गेले आहे त्याचा अहवाल यावेळी शासनास सादर करण्यात आला.

ब्राह्मण समाजाने प्रामुख्याने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, इनामी जमिनी खाजगी मालकीच्या करून देणे, पुरोहितांना मानधन देणे, ब्राह्मण समाजाच्या बदनामी विरोधी कायदा करणे, पुण्यातील दादोजी कोंडदेव व भाषाप्रभु श्री राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुनर्स्थापित करणे, ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा देणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारणे इत्यादी मागण्या केल्या आहेत.

या संदर्भात जयंत पाटील यांनी शिष्टमंडळासह मंत्रालयात मंत्री दालनात बैठक घेतली आर्थिक विकास महामंडळ तथा इतर मागण्यांबाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना या बाबतीत कारवाई करण्याची सूचना दिली.बाळासाहेब थोरात यांनी इनामी जमिनी संदर्भात अन्याय होत असलेल्या ब्राह्मण शेतकऱ्यांची यादी तयार करण्याची सूचना देऊन याबाबत पुढील कारवाई लवकरच केली जाईल असे आश्वासन दिले.रामदासजी आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचा ब्राह्मण समाजाच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे व आम्ही मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून मागण्या मान्य करण्याचे अवाहन करू असे मत मांडले.यावेळी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्यासह सुरेश मुळे (जालना), सचिन वाडे(औरंगाबाद), मकरंद कुलकर्णी (कोल्हापूर), विश्वजीत देशपांडे(पुणे), प्रा काकासाहेब कुलकर्णी (सोलापूर), गजानन जोशी (बीड), विशाल शिखरे(नाशिक), संजय भिडे (मुंबई) आदींची उपस्थिती होती

‘पीएमपी’च्या अनुकंपा तत्वारील व रोजंदारी सेवकांना कामावर घ्या : दीपाली धुमाळ

0

पुणे‘पीएमपीएमएल’ अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी पदावरील सेवकांना कामावर घ्या, अशी मागणी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुरुवारी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले.

यावेळी माजी नगरसेवक बाबा धुमाळ, पीएमपीएमएल युनियन प्रतिनिधी सुनील नलावडे उपस्थित होते. कोरोनामुळे संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आली होती.पुणे शहरातही लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.पीएमपीची प्रवासी सेवा बंद असल्याने कर्मचा-यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करुन रोजंदारी सेवकांना कामावर घेतले आहे. परंतु, अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी सेवक आदेशानुसार गेले सहा महिन्यापासून घरी आहेत.काम नसल्यामुळे त्यांना वेतनही नाही. अनुकंपावरील रोजंदारी सेवकांमध्ये बहुतेक कर्मचारी या महिला आहेत. काम बंद असल्याने कर्मचा-यांना आर्थिक फटका बसला आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तसेच काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात, मुलांचे शिक्षण व इतर घर खर्चामुळे त्यांना आर्थिक व मानसिक तणावाखाली जीवन जगत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करुन ‘पीएमपी’तील अनुकंपा तत्वारील व कार्यशाळेतील रोजंदारी पदावरील सेवकांना कामावर रुजु करुन घेण्यात यावे, अशी विनंतीही राजेंद्र जगताप यांना धुमाळ यांनी केली आहे.

११ सुसज्ज रुग्णवाहिका द्या , उपमुख्यमंत्र्यांकडे महिला मंत्री ठाकुरांची मागणी

0

मुंबई दि १० : मेळघाटकरिता ११ सुसज्ज रुग्णवाहिका मिळाव्यात, खावटी कर्ज सरसकट वितरित व्हावे यासह अमरावती जिल्हा बँकेतील रिक्त पदे भरण्यास मंजुरी, तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महिला व बाल विकास मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

दुर्गम भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत अमरावतीतील मेळघाटसाठी ११ सुसज्ज रुग्णवाहिका मिळाव्यात. खावटी कर्जाकरिता पात्र होण्यासाठी मनरेगामधे १०० दिवसांच्या उपस्थितीची अट आहे. सदर नियम मेळघाट भागाकरिता शिथिल करावा व सरसकट कर्ज मिळावे, अशी मागणी श्रीमती ठाकूर यांनी केली.अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेस ‘अ’ दर्जा प्राप्त आहे.

यामुळे आता शासकीय ठेवी घेण्याकरिता सदर बँक पात्र आहे. याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत. तसेच नागरिकांना जलद सुविधा मिळणेकरिता बँकेतील रिक्त पदे भरण्यास तातडीने मंजुरी मिळावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली.अमरावतीतील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे पिकावरील खोडकीड रोगाने मोठे नुकसान झाले आहे. या शेतकरी बांधवांना उभारी देण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यातील विविध मागण्यांसह त्याबाबतची परिस्थिती श्रीमती  ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘रोजगार शोधणारे होवू नका,देणारे व्हा’:व्यवस्थापन,संगणकशास्त्र विद्यार्थ्यांना’सक्सेस मंत्र’!

0

पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी’)  च्या एमबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या  २०२० या शैक्षणिक वर्षाच्या  नव्या तुकडीतील  विद्यार्थ्यांचा   ७ दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅमची समाप्ती ९ सप्टेंबर रोजी झाली. 
‘रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार देणारे उद्योजक व्हा’,असा यशाचा मंत्र व्यवस्थापनशास्त्र,संगणक शास्त्र अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीतील  विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून देण्यात आला. 
भारती विद्यापीठच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’  च्या एमबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या   २०२० या शैक्षणिक वर्षाच्या  नव्या तुकडीतील  विद्यार्थ्यांचा   इंडक्शन प्रोग्रॅम  २ ते ७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची ओळख करून देण्यात आली,अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून सांगण्यात आली. मांयक्रोसॉफ्ट मीट द्वारे हा इंडक्शन प्रोग्रॅम  ऑन लाईन पार पडला.  
   ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’  चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ‘रोजगार शोधणारे होवू नका,रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हा’,असा मंत्र व्यवस्थापनशास्त्र,संगणक शास्त्र विद्यार्थ्यांना या इंडक्शन प्रोग्रॅम मधून दिला . 
  सात दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मधून डॉ पवन अगरवाल (मुंबई ),अतुल गेरा,अनिल सिंग,डॉ.उज्वल भट्टाचारजी,डॉ जयंत ओक,आनंद धर्माधिकारी,वृंदा वाळिंबे,डॉ प्रीतम तिवारी,कीर्ती पाटील यांनी  नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एमबीए ,एमसीए या अभ्यासक्रमांचे २५१ विद्यार्थी उपस्थित होते . ‘आयएमईडी’ च्या  पौड रस्तायेथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.
डॉ अजित मोरे,डॉ प्रवीण माने,डॉ सोनाली खुरजेकर,डॉ नेताजी जाधव,डॉ विजय फाळके,डॉ रजिता दीक्षित,डॉ सोनाली धर्माधिकारी,दीप्ती देशमुख,डॉ इंगवले यांनी संयोजन केले. 

जम्बो रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन करोना रुग्णांना प्रवेश सुरू

0
  • 11 किलो ऑक्सिजनची टाकी
  • शुक्रवारपर्यंत 85 बेड तयार होणार
  • ‘जम्बो’मध्ये पाच दिवसात 66 रुग्ण बरे झाले!

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयात आज 50 ऑक्सिजन बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय शुक्रवारी आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकूण 85 बेड तयार होतील. येथे नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास आज (गुरुवारी) सुरुवात करण्यात आली असून, आज चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.

जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी (8 सप्टेंबर) पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रुबल अग्रवाल ऑक्सिजन बेडची संख्या व रुग्णालयाची एकूण क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे 50 ऑक्सिजन बेड आज कार्यान्वित करण्यात आले. मागील आठवड्यात 2 सप्टेंबरपासून नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र, आता प्रवेश सुरू करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, “या 50 बेड व्यतिरिक्त जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन येथे 11 किलो ऑक्सिजनचा साठा असणारी टाकी सुसज्ज करण्यात आली आहे.”
जम्बोमध्ये बरे झालेल्या 20 रुग्णांना बुधवारी, तर 14 रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन आतापर्यंत एकूण 66 रुग्ण बरे झाले आहेत.

उपचार घेत असलेल्या रुग्णांशी टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क करण्याची सुविधेचा लाभ नातेवाईक घेत आहेत. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो. या सुविधेबद्दल नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

कोरोनारुपी यमाचा सामना करण्यासाठी Armed Forces Medical College ला पुण्यात पाचारण करा – आबा बागुल

0

पुणे- पुणे शहरात कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर एएफएमसीची मदत घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पुणे शहराकडे स्वतः लक्ष घालून तातडीने  एएफएमसीची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे .

ते म्हणाले,’ शहरामध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वयवर्षे ५५ पुढील डॉक्टरांना आपण निर्देश देऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी व तज्ञ् डॉक्टर अश्या अवघड परिस्थितीत हतबल होऊन घरीच बसले आहेत. सद्यस्थितीत शहरामध्ये नवखे डॉक्टर असल्यामुळे त्यांना आयसीयू , सीसीयू मधील रुग्ण हाताळण्याचा अनुभव कमी असून ते घाबरत घाबरत रुग्णांवर उपचार करतात. कोरोनामुळे डॉक्टरांचा रुग्णांशी थेट संपर्क येत नाही. कोणतीही डॉक्टरांची टीम रुग्णांना हात लावून तपासात नाही. त्यामुळे पुणे शहरात मृत्यू दर  वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात शहरात कोरोनाचा फैलाव झपाटयाने होताना दिसत असून देशाची तुलना केली तर पुणे हे कोरोनाचे नंबर एकचे  हॉटस्पॉट झाले आहे.
वयवर्षे ५५ पुढील अनुभवी डॉक्टर सध्या हतबल होऊन घरी असल्याने त्यांची मदत घेऊन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दररोज रुग्णांच्या परिस्थितीचा अहवाल घेऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करून कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवतील. कोरोनाच्या संकट काळात रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी या अनुभवी तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. सद्यस्थितीत डॉक्टर दिवस रात्र काम करत असून त्याला अनुभवी डॉक्टरांची जोड मिळाल्यास पुणे शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होईल याची खात्री वाटते. मार्च महिन्यात कोरोना नवीन होता त्याच्या पायऱ्या आपल्याला माहित नव्हत्या परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नसून कोणत्या प्रकारचा कोरोना रुग्णाला झाला आहे. याचे निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे झाले आहे. कोरोनामुळे नागरिक जास्त दगावत नसून कोरोना झाला या भीतीने जास्त मृत्यू होताना दिसत आहे. या रुग्णांचे काउंसिलिंग करण्यासाठी देखील या डॉक्टरांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल. यासाठी डॉक्टरांची काउंसिलिंग टीम करणे देखील आता गरजेचे झाले आहे. तसेच महाराष्ट्र बाहेर जेथे कोरोना कमी आहे तेथील अनुभवी डॉक्टरांना देखील पुण्यात आणले पाहिजे. त्यासाठी देखील आपण कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल. आपण याच स्थितीत राहिलो तर पुण्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी  एएफएमसीला शहरात त्वरित कार्यरत करावं व वयवर्षे ५५ पुढील अनुभवी डॉक्टरांची  हे संकट रोखण्यास मदत घ्यावी असे आबा बागुल शेवटी म्हणाले. 

महामारीच्या काळातही पथारीवाल्यांची महापालिकेकडून थट्टा

0

पुणे- एकीकडे शेकडो कोटीची अनधिकृत बांधकामे करून अनेक शेठ गलेलठ्ठ होत असताना अशा बांधकामांवर कारवाई करण्या ऐवजी महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख कोरोना सारख्या महामारीच्या काळातही पथारीवाल्यांच्या आणि स्टोल धारकांच्या पाठीशी लागले आहेत त्यांना सळोकी पळो करण्यात आजवरचे हे सर्वात मोठ्ठे अधिकारी ठरत आहेत . आणि दुसरीकडे मात्र  पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना आपण राबविणार असल्याचे पुण्याचे महापौर मोहोळ हे आपल्या पक्षाच्या ,आणि सरकारच्या धोरणा नुसार जाहीर करताना दिसत आहेत . महापालिकेकडून लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात होणारी अशी थट्टा मात्र ग्राहकांच्या भोवती आपला फास आवळताना दिसत आहे . कारण हे अतिक्रमण अधिकारी पथारीवाल्यांना तब्बल ५ हजार रुपये दंड ठोठावून मग खाऊन उरलेला माल पथारीवाल्यांच्या स्वाधीन आहेत आणि जा आत्मनिर्भर योजना येते आहे असे सांगत आहेत .

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत एकीकडे नौकरीला मुकलेले , काम धंदा करू न शकलेले अनेक जन शेत माल आणि अन्य मार्गे पथारीवाले बनून गमावलेले उत्पन्न भरून काढताना दिसत आहेत . पदवीधर आणि अनेक मोठ्या पदावर असलेले रस्त्यावर भाजीपाला विकून उदार निर्वाह करताना दिसून आले . लॉक डाऊन उठल्यावर स्टोल दुकाने सुरु झाली या सर्वांना या अतिक्रमण प्रमुखाचा जोरदार तडाखा बसला आहे. एकीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि गटनेते आबा बागुल , विपक्ष्नेत्या दिपाली धुमाळ ,अश्विनी कदम , अविनाश बागवे ,वनराज आंदेकर ,नंदा लोणकर अशा विविध नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाकडून होणाऱ्या ५ हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईला विरोध करत स्थायी समितीला केवळ १ हजाराचा दंड करा एवढा दंड करू नका असा दिलेला प्रस्ताव कित्येक महिने धूळ खात पडला असताना आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविला आहे आणि आता पथारीवाल्यासाठी आत्मनिर्भर योजना घेऊन आले आहेत.

पुन्हा तेच ..यांना जीव धोक्यात घालणारे कर्मचारी हवेत पण नौकरी फक्त ३ महिन्यासाठी …दिवस रात्र हाजी हाजी करणारी ,तुटपुंजा पगार स्वीकारणारी …

0

पुणे-केवळ काही राजकीय ठेकेदारांची पोटे भरण्यासाठी च नव्हे तर ती गलेलठ्ठ करण्यासाठी गेल्या काही वर्षात कामगार पिळवणूकीचे आगर बनलेल्या पुणे महापालिकेने ३ महिने कालावधी साठी अत्यंत तुटपुंज्या पगारावर आपली भरती प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. शिवाय आता महापालिकेला कोवीड केअर सेंटर मध्ये काम करण्यास माणसे हवी आहेत .एकवट वेतनावर ९० दिवसासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून भरती करण्याचा प्रस्ताव खुद्द महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती कडे पाठविला आहे. येत्या १५ तारखेला असे हाजी हाजी करणारे ,दिवस रात्र राबणारे ,अगदी तुत्पुजा पगार स्वीकारणारे कर्मचारी पुरविणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय स्थायी समितीत होणार आहे.

सहायक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांना काढण्यासाठी सत्ताधारी भाजपने उचलली पावले…

0

पुणे- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला तोंड देताना निष्क्रिय,दुरावस्थेला जबाबदर अधिकारी असा ठपका ठेवीत महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील एका गटाने हालचालींना प्रारंभ केला आहे. स्वीकृत नगरसेवक असलेले पण पक्षात आपला दबदबा तयार करून ठेवलेले गणेश बिडकर यांच्यासह महापालिका कामगार युनियन ची मोट आपल्या हाथी ठेऊ इच्छिणारे राजेंद्र शिळीमकर आणी महापौर पदाच्या शर्यतीत कायम ज्यांच्यावर अन्याय झाला त्या वर्षा तापकीर यांनी यासंदर्भात स्थायी समितीकडे प्रस्ताव दिला आहे .जो येत्या १५ तारखेला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे .

शहरातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधा ,जम्बो सेंटर मधील जम्बो अपुऱ्या सुविधा ,अंशदायी योजनेत गोंधळ,उपलब्ध बेड ची माहिती घेण्यात अनियमितता याबाबत उत्तरे न देणे , नगरसेवकांचे फोन न घेणे असे आरोप त्यांच्यावर ठेवीत त्यांच्यामुळे नागरिकांना गंभीर परिणाम भोगावे लागत असून महापालिकेची प्रतिमा खराब होत असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

एकीकडे शेखर गायकवाड यांनी सुरुवातीला आयुक्तपदाच्या कारकिर्दीत कोरोनावर आक्रमण करण्यासाठी आपली नीती आखून कार्यवाही सुरु केली असताना त्यांची अचानक पूर्वस्थानी म्हणजे साखर आयुक्त पदावर राज्य सरकारने बदली केली . त्यानंतर त्यांच्या जागेवर विक्रम कुमार यांची आणि सौरव राव यांची विभागीय आयुक्त पदांवर नियुक्ती करण्यात आली दरम्यान पुण्याला जिल्हाधिकारी देखील नवे मिळाले . पाच सहा आय ए एस अधिकारी पुण्याला कोरोनावर आक्रमण करण्यासाठी देण्यात आल्या आणि नागरिकांकडून,वाहन चालकांकडून दंड वसुलीत १ नंबर असलेल्या पोलीस आयुक्तांना मात्र येथेच कायम ठेवण्यात आले. ना शेखर गायकवाड यांची बदली करून कोरोना ची तीव्रता कमी झाली , ना पोलिसांकरवी कारवाया करून कोरोनाची तीव्रता कमी झाली . ना जम्बो रुग्णालय पीएम आर डीए मार्फत लाईफ लाईन ला देऊन तिथे सुविधा निर्माण झाल्या . कोरोनासाठी नेमलेल्या असंख्य आय ए एस अधिकारी सेनापती असलेल्या टीम चा पडलेला उजेड लख्खपणे दिसून आला . १२ लाखाची १ देवदूत मोटार १ कोटीला खरेदी करणाऱ्या या आय ए एस लॉबी ने ना पुरेशा आम्ब्युलंस ना पुरेशा शव वाहिका खरेदी केल्या. ना आम्ब्युलांस साठी कोणत्या राजकीय पक्षाची मदत घेतली ना उद्योजकांची … जिथे ज्यांच्या आधिपत्याखाली आरोग्य सेविकांची कायम आर्थिक पिळवणूक होत राहीली , बेरोजगारांना बोगस कामगार म्हणून कायम राबविले गेले .आणि ज्यांना हे सारे मोठ्या कौतुकाचे काम वाटले . तिथे ,अशी मंडळी आता डॉ. अंजली साबणे यांचा ‘बळी ‘ द्यायला निघाली कि काय ? अशी शंका यावी अशी स्थिती दिसते आहे.

मोतेवारचे साथीदार ५ वर्षानंतर गजाआड -सीआयडीची कामगिरी

0

मालमत्ता वसुली कासवगतीने सुरु

पुणे :धनकवडी येथील गुरुकृपा मार्केटिंग पासून घोटाळे सुरु केलेल्या आणि मीडियामध्ये उच्च स्थानी दाखल झालेल्या तथाकथित घोटाळेबहाद्दर महेश मोतेवार च्या ‘समृद्ध जीवन फूडस इंडिया’ कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषणने (सीआयडी) गेल्या ५ वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संचालकांना अटक केली आहे.दरम्यान मोतेवार याच्या आणखी छुप्या साथीदारांचा शोध सीआयडी घेते आहे .
ऋषीकेश वसंत कणसे (वय ३०) आणि सुप्रिया वसंत कणसे (वय ३६, रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीने ३ हजार ७०० कोटी रुपयांची फसवणुक केली आहे. त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तपासात या कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे गैर बँकिंग कंपन्या म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीआयडीकडे तपासाला असलेल्या ४ ही गुन्ह्यात दोषारोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम वाळके, निरीक्षक शैलजा बोबडे, वनिता धुमाळ, हवालदार बाजीराव कुंजीर, प्रशांत पवार, राहुल कदम, निनाद माने, भूषण पवार व कविता नाईक यांनी ही कामगिरी केली.

३ हजार ७०० कोटींची फसवणूक
समृद्ध जीवन फूडस इंडिया या महेश मोतेवार यांच्या कंपनीने देशभरातील विविध राज्यांमध्ये कमिशन एजंट नेमून त्यांच्याकडून गुंतवणुकदार/ ठेवीदारांना अधिक व्याजाचे अमिष दाखवून कोट्यावधींच्या ठेवी स्वीकारल्या व कोणतीही रक्कम परत न करता अंदाजे ३ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत २३३ कोटी ३३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून आरोपीकडून इतर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे,दि.10: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय समन्वय समिती सभा आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार डॉ. राहूल मणियार तसेच समिती सदस्य व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी तसेच कायद्याबाबत नियमित प्रशिक्षणावर भर द्यावा. नागरिकांनीही अशा पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ही कारवाई पोलीस व संबंधित विभागांनी कटाक्षाने राबवावी, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

डॉ.देशमुख म्हणाले, सर्व शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन आदी कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी संबंधित विभागांनी व कार्यालय प्रमुखांनी प्रयत्न करावा. शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता कामा नये. ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने नियोजन करावे, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.

डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी मानले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 70 हजार 102

0

पुणे विभागातील 2 लाख 21 हजार 488 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 99 हजार 397 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.10 :- पुणे विभागातील 2 लाख 21 हजार 488 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 99 हजार 397 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 70 हजार 102 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 807 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.98 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 290 रुग्णांपैकी 1 लाख 63 हजार 71 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 536 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.05 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 20 हजार 530 रुग्णांपैकी 12 हजार 189 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 784 आहे. कोरोनाबाधित एकूण 557 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 133 रुग्णांपैकी 15 हजार 917 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 342 आहे. कोरोनाबाधित एकूण 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 260 रुग्णांपैकी 10 हजार 300 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 184 रुग्णांपैकी 20 हजार 11 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 958 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 513 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 885 सातारा जिल्ह्यात 921, सोलापूर जिल्ह्यात 466, सांगली जिल्ह्यात 979 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 262 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 67 हजार 930 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 99 हजार 397 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोनाची लागण, लक्षण नसल्याने होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय

0

राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान राजकीय नेत्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. तसेच लक्षण नसल्याने त्या होम क्वारंटाइन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ‘मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली. कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात बुधवारी 23 हजार 577 नवीन रुग्ण आढळले. 13 हजार 906 लोक बरे झाले आहेत. तर 380 रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 9 लाख 67 हजार 349 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 6 लाख 86 हजार 462 लोक बरे झाले आहेत. 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 27 हजार 787 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भक्तांविना साईबाबांचा गाभारा सुना, मात्र देणग्यांचा ओघ कायम; लॉकडाऊनच्या साडेपाच महिन्यांत झोळीत 21 कोटी रुपयांचे दान

0

शिर्डी :- कोरोनाच्या दुष्टचक्रात बाजारपेठा बंद राहिल्या, मंदिरे भक्तांविना ओस पडली. मात्र शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिराकडे येणारा देणगीचा ओघ सुरूच आहे. यंदा लॉकडाऊनच्या काळात १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत साई संस्थानला साईभक्तांकडून विविध माध्यमांतून २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी प्राप्‍त झाली. गेल्या वर्षी प्राप्त देणगीचा विचार करता ही रक्कम अत्यल्प आहे. गतवर्षी याच कालावधीत तब्बल २०३ कोटी ३७ लाख ७१,७९५ रुपये देणगी मिळाली होती. म्हणजेच यंदा देणगीमध्ये १८२ कोटी ६१ लाख १७,६४४ रुपये इतकी घट झाली. कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर या महामारीला अटकाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले. यात राज्य व केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार टप्पेवार लॉकडाऊन सुरू झाले. याच दरम्यान शिर्डी संस्थानने १७ मार्चपासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दक्षिणापेटीत येणारी देणगी रक्कम मिळालीच नाही.

गतवर्षी १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीतील देणग्या

१७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत संस्थनला १ कोटी ८९ लाख ७९, १६२ रुपये ऑनलाइन देणगी.

दक्षिणापेटीतून ७५,२९,७८,९२७ रुपये, तर रोख देणगी २८,०६,४७,८०५ रुपये देणगी स्वरुपात मिळाले.

देणगी स्वरूपात ८८६८.१३० ग्रॅम सोने व १९४४८१.४८० ग्रॅम चांदी संस्थानला मिळाली होती.

दक्षिणापेटी रिक्तच… गतवर्षी १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत दक्षिणापेटीतून ७५ कोटी २९ लाख ७८,९२७ रुपये देणगी मिळाली होती. मात्र या वर्षी याच कालावधीमध्ये दक्षिणापेटीत देणगी प्राप्त झाली नाही, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.

जंबो मध्ये मरण:वारसांना 1 कोटी द्या-भाजयुमो

0

पुणे शहरातील जंबो कोविड हॉस्पिटलच्या गलथान कारभारा विरोधात बुधवारी ( दि. 8 ) दुपारी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे धडक मोर्चा काढण्यात आला.

भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक व युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाच्यावतीने महाविकास आघाडी सरकार व PMRDAच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

लाईफ लाईन संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी, जम्बो कोविड रुग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून एक कोटी रुपये द्यावे, जम्बो रुग्णालयाच्या दुरव्यवस्थेला जवाबदार असलेल्या अधिकाऱ्याचा राजीनामा घ्यावा, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

युवा मोर्चा सरचिटणीस निहाल घोडके, संपर्क प्रमुख प्रतिक देसरडा, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष दुषत मोहोळ, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अपूर्व खाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खासदार गिरीश बापट यांनीही या हॉस्पिटलची पाहणी करून नाराजी व्यक्त केली होती. सध्या पुणे महापालिकेतर्फे या जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेस व इतर स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही मंगळवारी स्वतः पीपीई किट घालून या हॉस्पिटलची पाहणी करून रुग्णांची विचारपूस केली होती.