पुणे- आरबीएल बँकेकडूनप्रतिबंधक हेल्थकेअर सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील महानगरपालिका आणि ग्रामीण समित्यांना पाच मोबाइल वैद्यकीय व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत. या मोबाइल मेडिकल व्हॅन पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बारामती गाव समिती, सासवड गाव समिती आणि नागपूर महानगरपालिका अंतर्गत कोरोना प्रभावित भागात एक महिन्यासाठी उपलब्ध असतील. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र व ग्रामीण भागात राहणारे लोक त्यांच्या स्थानिक दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरबीएल बँकेने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मोबाईल मेडिकल व्हॅन तैनात करण्याचा निर्णय घेतला. या भागात मोबाइल क्लिनिक म्हणून या व्हॅन काम करतील. दररोज किमान १०० रुग्ण किंवा त्याहून अधिक तपासणी करण्याची क्षमता असून कोरोना पॉझिटिव्ह शोधणे आणि इतर वैद्यकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्हॅनची मदत होईल.व्हॅनमध्ये डॉक्टर, सहाय्यक कर्मचारी आणि औषधे तसेच हँड सॅनिटायझर्स, पीपीई किट, स्टेथोस्कोप, इन्फ्रा-गन, रक्तदाब कफ किंवा बीपीएम, कपड्याचे मुखवटे, ऑक्सिमीटर, ड्रेसिंग मटेरियल आणि ग्लूकोमीटर या सुविधांनी सज्ज आहेत. उपचार आणि औषधे दोन्ही मोफत दिले जातील. सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. बारामतीमध्ये आरबीएल बँक आणि ग्लोबल शापर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आर्थिक मंचा एक उपक्रम म्हणून महिला आणि तरुण मुलींना विनामूल्य सॅनिटरी पॅड आणि मास्कदेखील वितरीत करणार आहेत. आरबीएल बँकेच्या स्वयंसेवी संस्थांद्वारे फेस मास्कचे उत्पादन आणि वितरण, कर्मचार्यांना पेरोल गिव्हिंग प्रोग्राम, प्रवासी समुदायांसाठी मदत कार्य आणि व्हर्च्युअल कर्मचारी स्वयंसेवक कार्यक्रम यासह इतर सहाय्यक उपक्रमांचा एक भाग आहे.आरबीएल बँकेच्या एचआर, सीएसआर आणि अंतर्गत ब्रँडिंगच्या प्रमुख शांता वॅलरी गांधी म्हणाल्या, “आरबीएल बँकेचे ध्येय ‘कम्युनिटी इज द कॉज’ हे आहे. आम्ही एक सामाजिक जबाबदार संस्था आहोत आणि आव्हानात्मक काळात समुदायांना आधार देण्यावर विश्वास ठेवतो. कोरोनि विरुद्ध लढा देणे ही काळाची गरज आहे. साथरोगाविरूद्ध लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, ‘‘ आरबीएल बँकेने पुणे, महाराष्ट्रात मोबाइल वैद्यकीय व्हॅन पुरवून कोविड मदत कार्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. जे आपत्कालीन परिस्थितीत उपचार आणि चाचणी घेऊ शकत नाहीत, अशा वंचितांना विशेषत: गरीब लोकांसाठी साहाय्यभूत ठरेल. आरबीएल बँकेच्या सीएसआरचा भाग म्हणून या कृतीचे आम्ही कौतुक करतो. सर्वांच्या मदतीने आपण एकत्रितपणे लढून कोरोनाविरूद्धची लढाई जिंकू, असा विश्वास आहे.
शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे-शेखर गायकवाड
शेखर गायकवाड यांचे मत; ऊस तंत्रज्ञानावर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनतर्फे चर्चासत्र
पुणे : “महाराष्ट्रात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने घेण्याचा प्रयत्न झाला, तर शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो. साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, तंत्रज्ञानाचा वापर वाढला, तर आपले शाश्वत शेतीचे उद्दिष्ट्य साध्य होईल. साखर व ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (डब्ल्यूआयएसएमए-विस्मा) आणि डेक्कन शुगर टेक्नलॉजीस्ट असोसिएशन (डीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगरकेन टेक्नॉलॉजी’वर (ऊस तंत्रज्ञान) आयोजित चर्चासत्रात ‘ऊसाच्या पिकाचे नियोजन करण्यात खेतीबडी तंत्राचा वापर’ विषयावर गायकवाड बोलत होते. प्रसंगी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे, विलास रबडे, ‘विस्मा’चे सचिव अजित चौगुले, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष श्रीपाद गंगावती, ‘खेतीबडी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय नायर, मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. रिचा पवार-नायर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्रीनिवासा रेड्डी आदी उपस्थित होते. ऋषिकेश शिंदे यांनी समन्वयन केले. यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी आपले प्रश्न विचारून शंकानिरसन केले.
शेखर गायकवाड म्हणाले, “कारखाने आणि शेतकऱ्यांच्या संवादासाठी व्हिडीओ तंत्रज्ञान वापरावे. ‘खेतीबडी’ या नवतंत्रज्ञानाचा चांगला वापर करून घ्यावा. त्यासाठी त्यांनी कारखान्याशी करार करावेत. शेतकऱ्यांनी नियोजन करून ठरलेल्या कारखान्यांना योग्य वेळेत ऊस दिला, तर उत्पादन चांगले होऊ शकते. कारखान्यांवरील गाड्यांची गर्दी, शेतकऱ्यांना उशिरा मिळणारे पैसे यावर नवीन तंत्रज्ञान शोधून तो लाभ तात्काळ कसा देता येईल, यावरही या क्षेत्रातील तंत्रज्ञ उपाय शोधत आहेत. ‘डीएसटीए’मध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञ काम करत असून, त्यांनी पुढील ५० वर्षांच्या ऊसशेतीचे नियोजन केले तर फायद्याचे ठरेल. या दोघांमध्ये समतोल साधण्याची जबाबदारी साखर आयुक्तालयावर आहे.”
डॉ. रिचा नायर यांनी कारखानदार आणि शेतकरी यांना साखर उद्योगाचे तांत्रिकीकरण करून जास्तीत जास्त लाभ कसा होईल, याबाबत चर्चा केली. उसाचे उत्पादन, त्यात तंत्रज्ञानाचा वापर याविषयी त्यांनी सादरीकरणाच्या साहाय्याने उपयुक्त मार्गदर्शन केले. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांची नोंदणी, पिकाची माहिती, ऊस वाढीसाठी उपाय, पिकाचे वेळापत्रक, कृषी तज्ज्ञांशी संवाद, हवामान अंदाज, सल्ला व मार्गदर्शन, नवीन योजना आदी गोष्टी ‘खेतीबडी’ या ऍपवर उपलब्ध असल्याचे विनय नायर यांनी सांगितले. यशवंत घारपुरे म्हणाले, “तंत्रज्ञानाचा वापर वाढवला तर शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट होईल, पण त्याबरोबरच खर्च कमी केला तर तेच उत्पन्न तिप्पट होईल.” अजित चौगुले यांनी आभार मानले. विलास रबडे यांनी प्रास्ताविक केले.
कोरोनाविरुद्धच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत सर्वांचा सहभाग हवा- मुख्यमंत्री
मुंबई दि.१३ : आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा आरक्षण प्रश्नी सरकार गंभीर असून सर्वांना सहभागी करून घेत कायदेशीर लढाई अधिक चिवटपणे लढू व मार्ग काढू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सणासुदीच्या काळात सर्वधर्मियांनी दाखविलेल्या संयमाबद्दल धन्यवाद दिले. कोरोनाचे संकट वाढत असताना पुनश्च हरिओम म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनाशी दोन हात करण्याच्या प्रक्रियेत शासन आता सर्वसामान्यांना सहभागी करुन घेणार आहे. यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात आरोग्य, महसूल यांच्यासह इतर शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके नेमण्यात येणार असून ही पथके किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कुणाला काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
आरोग्याच्या नवीन सवयी लावून घ्या
ते पुढे म्हणाले, कोरोना विरुध्दच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्वाचे असून प्रत्येकाने आरोग्याविषयक छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यात बाहेर जातांना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे, बंदीस्त जागेऐवजी हवा खेळती असणाऱ्या ठिकाणी थांबणे, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् मध्ये समोरासमोर न बसता अंतर राखणे, सार्वजनिक वाहतूक किंवा स्वच्छतागृहांचा वापर करतांना काळजी घेणे यासह आरोग्य विभागाककडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करायला हवे. राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आतापर्यंतच्या महाभयानक अशा संकटाचा सामना आपली पिढी करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या पुढील काळातही अशी संकटे येण्याचा इशारा दिला आहे. त्या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी हा अनुभव आपल्या कामी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्याच्या सुविधा वाढविल्या
कोरोना संकटावर मात करण्यासाठी संसर्गाची साखळी तोडतानाच आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी शासन विविध पावले उचलत असून राज्यातील रुग्णालयातील खाटांची संख्या साडेसात हजारावरून ३ लाख ६० हजारापर्यंत वाढविण्यात आली आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्धता ही प्राथमिकता ठरविण्यात आली असून ऑक्सिजन उत्पादनांच्या ८० टक्के उत्पादन रुग्णालयांना उपलब्ध करुन देणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. तसेच विविध भागात जम्बो हॉस्पिटलसारख्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मराठा समाजाने संयम राखावा-मुख्यमंत्री
मराठा आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, राज्यातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण दिले होते. या आरक्षणाला कायम राखण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यात शासन कुठेही कमी पडलेले नाही. मराठा आरक्षणविषयी न्यायालयीन लढ्यात मागील सरकारने दिलेले वकील कायम ठेवतानाच त्यांना अतिरिक्त वकील देण्यात आले होते. तसेच इतर राज्यांप्रमाणे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या बेंचसमोर व्हावी अशी मागणी राज्याने केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करताना मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यांच्या बाबतीत मोठ्या बेंचच्या समोर जाताना आरक्षणाला अशी स्थगिती दिलेली नाही. न्यायालयाच्या या निकालावर काय करता येईल यासाठी राज्य शासन विचार करीत असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाले आहे, त्यांनी देखील यात कुठलेही राजकारण न आणता सरकारच्या बरोबर असून सहकार्य करू, असे सांगितले आहे. मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच राज्य शासन मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी
राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मोहीम कोरोना संकटकाळात सुरु आहे. याअंतर्गत आतापर्यंत साडेएकोणतीस लाख शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना शेतमालाला मिळणाऱ्या भावाच्या चिंतेतून मुक्त करण्यासाठी ‘विकेल तेच पिकेल’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत कुठल्या पिकाला कुठल्या भागात बाजारपेठ उपलब्ध राहणार आहे. तसेच बाजारात कुठल्या दर्जाचे पीक अपेक्षित आहे, याचा अभ्यास कृषि विभागाकडून करण्यात येईल आणि त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा हमखास भाव मिळू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा नाशिवंत शेतमाल जास्त काळ टिकविण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करण्यात येणार असून त्यामुळे मागणी असणाऱ्या बाजारात शेतमाल विकण्यास शेतकऱ्यांना मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोरोना काळात राज्यातील विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. कुपोषित बालकांना आणि गरोदर आणि स्तनदा मातांना एका वर्षाकरिता मोफत दूध भुकटी देण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांसाठी १०० टक्के खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु करण्यात येत आहे. शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली असून आतापर्यंत पावणे दोन कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी शक्य त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना ७०० कोटींची मदत देण्यात आली आहे. पूर्व विदर्भात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातील बाधितांसाठी तातडीची मदत म्हणून १८ कोटी देण्यात आले आहेत. या पूरग्रस्तांना गतवर्षीच्या कोल्हापूर-सांगली येथील पूरबाधितांना देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे मदत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजीचा मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनसोबत नवा करार
पुणे : रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजीचा मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनसोबत नवा करार झाला. या करारानुसार, दहा हजारांहून अधिक नवीन रूग्णांना जन्मजात टेक्सास (अमेरिका) येथील आययूजीओ केअर प्लॅटफॉर्म प्रदान करण्यात येणार आहे. रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजीने समुदाय आधारित आरोग्य सेवेसाठी नाविन्यपूर्ण मोबाइल हेल्थ आणि टेलिमेडिसिन सोल्यूशन्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने अमेरिकेतल्या उत्तर टेक्सासमधील १० हजारपेक्षा जास्त पात्र वैद्यकीय रूग्णांना वर्तणूक आरोग्य एकत्रीकरण (बीएचआय) आणि प्रिंसिपल केअर मॅनेजमेन्ट (पीसीएम) नुसार आययूजीओ केअर रिमोट पेशंट मॉनिटरिंग (आरपीएम), क्रॉनिक केअर मॅनेजमेंट (सीसीएम) प्रदान करण्यासाठी मॅक्सलिंक हेल्थसोबत करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती ‘मॅक्सलिंक’चे अध्यक्ष विजयकुमार सेठी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुजाता कुमारस्वामी व रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. लिसा क्रॉसले यांनी दिली.
विजयकुमार सेठी म्हणाले, “मॅक्सलिंक ग्रुपने पुण्यात कार्यरत राहून टेक्सास (अमेरिका) येथील नागरिक सुजाता कुमारस्वामी यांचा हेल्थकेअर कॉर्पोरेशन मधील प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या साथीनं जानेवारी २०१८ मध्ये मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनची स्थापना केली. आजमितीस त्याठिकाणी ११० परिचारिका काम करत असून आमच्या हेल्थकेअर कॉर्पोरेशनमार्फत आरोग्यविषयक सोयीसुविधा पुरवल्या जातात. मॅक्स-लिंक केअर टीम ३६५ ही थेट रुग्णालये, आरोग्य योजना, फिजिशियन प्रॅक्टिससाठी संप्रेषण सेवेत भागीदार आहे. आम्ही रुग्णांना नियोजित फोन आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची देखरेख, दररोजचे मूल्यांकन आणि त्यांना औषध व्यवस्थापन प्रस्तावित करतो. मॅक्सलिंक हेल्थकेअर कॉर्पोरेशनकडून प्रत्येक रुग्णाची देखभाल केली जाते. रुग्णाला आवश्यक असलेली सर्व नियमित लँडलाईन्स किंवा सेल फोन आहेत ज्याद्वारे आमचे आरएन केअर कोऑर्डिनेटर, नर्स केस मॅनेजर आणि फार्मासिस्ट फोनवरून रुग्णाचे म्हणणे समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करू शकतात, प्रेरणा देऊ शकतात, रुग्णाची देखरेख करू शकतात आणि संभाव्य आरोग्यासंबंधीचे धोके ओळखून त्याचा अहवाल नोंदवू शकतात.”
डॉ. लिसा क्रॉसले म्हणाल्या, “अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये असलेल्या १०,००० पात्र वैद्यकीय रूग्णांपर्यंत आमचे आययूजी केअर प्लॅटफॉर्म आणण्यासाठी आम्ही ‘मॅक्सलिंक हेल्थ’ सोबत कार्य करत आहोत, याचा आम्हाला आनंद झाला. रुग्णांचे समाधान वाढवण्यासाठी आणि निकालांमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टरांचा सराव आणि विमा प्रदात्यांसह मॅक्सलिंक कार्य करते आणि या सर्व मेट्रिक्स यशस्वीरित्या सुधारण्यासाठी रिलिकचे आययूजीओ केअर प्लॅटफॉर्म सिद्ध झाले आहे. उत्तर टेक्सासमधील विद्यमान कंत्राटे मॅक्सलिंक आम्हाला या नवीन भूगोलमध्ये वेगाने विस्तारण्याची परवानगी देतील. आम्ही आधीच बायोमेट्रिक देखरेखीची साधने पाठवली आहेत आणि मॅक्सलिंक ग्राहकांसाठी ऑनबोर्डिंग रूग्ण सुरू केले आहेत.”
आम्ही मॅक्सलिंक आरोग्याच्या डॉक्टर आणि विमा प्रदाता ग्राहकांकडे त्यांचे आययूजीओ केअर प्लॅटफॉर्म आणण्यासाठी रिलिक हेल्थ टेक्नॉलॉजीसह भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. आम्ही फक्त त्यांच्या सर्वोत्कृष्ट-क्लास सॉफ्टवेअर सोल्यूशन्ससाठीच नव्हे तर या नवीन आणि वाढत्या आरोग्य सेवेतील ज्ञान आणि त्यांच्या तज्ज्ञांसाठी भागीदारी करण्याचे ठरवले आहे,’ असे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुजाता कुमारस्वामी यांनी सांगितले.
मॅक्सलिंक हेल्थ केअर हे टेली हेल्थकेअर, लोकसंख्या व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक समाधानासाठी आहे. मॅक्सलिंक हेल्थ प्रतिबंधित चाचण्या, लसीकरण, निदान चाचण्या आणि समर्पित नोंदणीकृत परिचारिका (आरएनएस आणि प्रमाणित कल्याण तज्ज्ञांचे पथक) यांच्यासह कल्याण कार्यक्रमांमध्ये सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिबंधात्मक सेवा-कार्यक्षम आणि व्यस्त संवाद पद्धती प्रदान करते. मॅक्सलिंक हेल्थ बाबत अधिक माहिती https://maxlinkhealth.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
‘लोक बिरादरी’तर्फे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान
पुणे : लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे, किट्रॉनिक्स इंडिया आणि जंहागीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर झाले. लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणेचे ज्येष्ठ सदस्य आणि सल्लागार विश्वस्त ऍड. गोविंद मोहोळकर (काका) यांना नुकतीच (१५ ऑगस्ट) देवाज्ञा झाली. मोहोळकर काकांच्या रूपाने ट्रस्टने एक पित्रुतूल्य नेतृत्व गमावले असून, या रक्तदान शिबिरातून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्याचे शिल्पा तांबे यांनी सांगितले. यावेळी मोहोळकर काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सौ. मोहोळकर, त्यांची कन्या मनाली आणि कुटुंबीयांनीही रक्तदान करून काकांना श्रद्धांजली वाहीली. सध्याच्या परिस्थितीत रक्तपेढ्यांमध्ये जाणवणारी रक्ताची कमतरता आणि रक्तदानाबद्दलच्या गैरसमजुती, शाशंकता ह्या पार्श्वभूमीवरही ६० पेक्षा जास्त इच्छुक रक्तदात्यांनी नाव नोंदवले. आरोग्यविषयक प्रत्यक्ष तपासण्यांनंतर ४४ रक्तदात्यांचे रक्त मिळवण्यात यश आले ही सुद्धा सद्य परिस्थितीत मोठी बाब आहे. या प्रसंगी किट्राॅनिक्स इंडीयाचे कार्यकारी संचालक राजेश कुलकर्णी, दिपा कुलकर्णी आणि सुधांशू सोमण ह्यांच्या समवेत लोकबिरादरीचे सदस्य सभासद आणि जहांगीर हाँस्पीटलचे कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची संपूर्ण काळजी घेण्यात आली आणि शिबीर यशस्वीपणे पार पडले, असे मंडळाचे सदस्य चारूदत्त बोधे यांनी सांगितले.
‘नवीन शैक्षणिक धोरणात विज्ञानाचे स्थान’वर मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी चर्चासत्र
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे ‘नवीन शैक्षणिक धोरणात विज्ञानाचे स्थान’वर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. उद्या रविवारी (दि. १३) सायंकाळी ५.४५ ते ७.१५ या वेळेत हे चर्चासत्र गुगल मीटद्वारे होणार आहे. राज्याचे माजी शिक्षण संचालक डाॅ. वसंत काळपांडे, महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. बाळकृष्ण बोकील, महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीचे निवासी संपादक श्रीधर लोणी मार्गदर्शन करणार आहेत.



नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात विज्ञानाविषयी नेमके काय धोरण आहे? ते समजावून घेण्यासाठी हे चर्चासत्र आयोजिली असून, हे सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष विनय र. र. सूत्रसंचालन करणार आहेत. meet.google.com/mrg-fepe-gdv या गुगल लिंकवरून आपण या चर्चासत्रात सहभागी होऊ शकता, असे चर्चासत्राचे समन्वयक अशोक तातुगडे यांनी कळविले आहे.
राज्यातील वाहनचालकांना कुठल्याही परिवहन कार्यालयातून शिकाऊ व पक्के लायसन्स मिळाले पाहिजे
पुणे-परिवहन विभागामध्ये सर्व सर्वसामान्य वाहनचालकाला केंद्रबिंदू मानून राज्यातील वाहनचालकांना कुठल्याही परिवहन कार्यालयातून शिकाऊ व पक्के लायसन्स मिळाले पाहिजे यासाठी सर्वसामान्यांना समजेल अशी सोपी पद्धती असावी पण त्याचबरोबर वाहनचालकाची चाचणी कडक असावी शिकाऊ लायसन ची परीक्षा पूर्वतयारी करताना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या डिजिटल स्वरूपातील प्रश्न वली वापर करावा परिवहन विभागाचे काम डिजिटल स्वरूपात व पेपर लेस पद्धतीने करण्यात यावे मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षकांनी कुशल व प्रशिक्षित वाहन चालक निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत वाहन चालकाला केंद्रबिंदू मानून रस्ता सुरक्षा बद्दल जनजागृती मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी करावी परिपूर्ण वाहन चालक निर्माण करावे अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, यशवंत कुंभार यांनी येथे दिली .
ते म्हणाले,’ महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचे आयडीटीआर पूने येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या संदर्भात अडचणी आम्ही त्यांच्या कानावर घातल्या ज्यास त्यांच्याकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला ,सदर प्रसंगी अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, अश्विनी स्वामी सहाय्यक परिवहन अधिकारी पुणे, सुरेश आव्हाड मोटार वाहन निरीक्षक पुणे ,संभाजी होलमूखे मोटार वाहन निरीक्षक पुणे, पुणे शहर सचिव निलेश गांगुर्डे पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार बापूसाहेब देशमुख अरविंद इंदलकर धडाडीचे कार्यकर्ते विवेक माळवदे आदी मान्यवर सदर प्रसंगी उपस्थित होते
“पॅनकार्ड क्लब येथे गैरप्रकार व नासधूस करणाऱ्यांचा बंदोबस्त त्वरित करा” – खासदार वंदना चव्हाण
पुणे-महाराष्ट्र सरकार ने Maharashtra Protection of Depositors (in Financial Establishment) Act 1999, खाली पॅनकार्ड क्लबची संपूर्ण मालमत्ता जप्त केली व डेप्युटी कलेक्टर, MPID मुंबई यांची नेमणूक सदर जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी केली असून सुद्धा, या मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे व त्यातून चितांजनक प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येताच त्वरित खा. चव्हाण यांनी पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याची मागणी केली.
जप्त मालमत्तेमध्ये, “United 21, 5 Star Hotel” आणि “Area 51 Discotheque” पुण्यातील या मालमतेचा देखील समावेश आहे.
काही समाजकंटकांकडून सदर मालमत्तेची चोरीच्या हेतूने तोडफोड करण्यात आली व ही बाब खा. चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पुणे पोलिसांकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार लावून धरली. याआधी देखील जाळपोळ, तोडफोड, आणि चोरीची अनेक प्रकरणे या ठिकाणी घडून गेल्याचे निदर्शनास आले. खा. चव्हाण यांच्या केलेल्या मागणीला यश येवून पोलिसांनी काही जणांना अटक देखील केली.
Area 51 चा घुमट आणि इतर भागाला आग लावण्यात आली होती व United-21, 5-Star hotel ची काच फोडून आतील अल्युमिनम फ्रेम ची चोरी घडली आहे. युट्युब वर यासर्व प्रकारचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे.
खा. चव्हाण यांच्या मागणीनुसार पोलिसांनी कारवाई करूनसुद्धा अजून देखील तेथील गैरकृत्य थांबलेले नाहीत. याठिकाणी सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे, ही संपूर्ण वास्तू समाजकंटकांना खुली असून याठिकाणी अनेक गैरप्रकार घडत आहेत. यामुळे, सदर जागेचे मूल्यांकन देखील कमी होत आहे.
8 सप्टेंबर 2020 ला, पुणे पोलीस कमिशनर ना देखील पत्र लिहून संबंधित गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे.
सदर वास्तू ही आता डेप्युटी कमिशनर (MPID) मुंबई यांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे, त्यांच्याकडे सदर ठिकाणी सुरक्षारक्षक नेमून त्वरित घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालावा अशी विनंती खा. चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.
विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक,पत्नी,पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार
पुणे दि.12:- खेळातील पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार,. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार. (इयत्ता १० वी व १२ वी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले पाल्य), पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक/पत्नी/पाल्य. IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे पाल्य, यशस्वी उद्योजकांना पुरस्कार मिळविणारे, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळविणारे या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना एकरकमी रु. 10 हजार व रु. 25 हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
विशेष गौरव पुरस्कार मिळणेबाबतचा विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून संबंधित माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2020 पूर्वी सर्व कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल आर आर जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.
माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार
पुणे दि.12:- शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये पुणे जिल्हयातील माजी सैनिक / विधवांच्या पाल्यामधून इ. 10 वी. व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुण उत्तीर्ण झालेल्या एक-एक पाल्यांची निवड एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. पुणे जिल्हयातील संबंधित माजी सैनिक/ विधवांनी त्यांच्या पाल्यांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेला विहीत नमुन्यातील अर्ज 20 सप्टेंबर 2020 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल आर आर जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.
‘शुगरकेन टेक्नॉलॉजी’वर ‘टीटीए’तर्फे रविवारी चर्चासत्र
पुणे: टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए), वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (डब्ल्यूआयएसएमए) आणि डेक्कन शुगर टेक्नलॉजीस्ट असोसिएशन (डीएसटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगरकेन टेक्नॉलॉजी’वर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. १३) सकाळी १० वाजता हे सत्र लाईव्ह होणार असून, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड प्रमुख पाहुणे असणार आहेत. या सत्राचा विषय ‘ऊसाच्या पिकाचे नियोजन करण्यात खेतीबडी तंत्राचा वापर’ असा आहे. त्यामध्ये कारखानदार आणि शेतकरी यांना साखर उद्योगाचे तांत्रिकीकरण करून जास्तीत जास्त लाभ कसा होईल, याबाबत चर्चा केली जाणार आहे. माहितीच्या आधारे उसाचे एकरी उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांची नोंदणी, माहितीचे संकलन व प्रक्रिया, उसाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाची टक्केवारी वाढवणे, दुभाषी संवादाचे महत्व आणि इतर मुद्द्यांवर या सत्रात चर्चा होणार आहे. ‘खेतीबडी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय नायर, मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. रिचा पवार-नायर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्रीनिवासा रेड्डी आदी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे यांनी दिली आहे.
प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशायकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावर चार दिवसीय परिषद १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत
पुणे, १२ सप्टेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१९ मधील यशस्वितांच्या १२ व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावरील चार दिवसीय परिषद दि. १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे.
हा सत्कार व प्रोत्साहन सोहळा आणि परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे माजी न्या.एल.नरसिंमा रेड्डी, लाला बहाद्दुर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिस्ट्रेशनचे संचालक डॉ. संजीच चोपडा, लोकसभेचे माजी महासचीव अनूप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अॅनॅलिसेसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, भारतातून पहिला आलेला प्रदिप सिंग याचा सत्कार होणार आहे. त्याला ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या सोहोळ्याचा समारोप १९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी पॉडिचरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्री श्याम सरेन, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा व भारताचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित राहतील. या प्रसंगी यूपीएससी परिक्षेमध्ये भारतात तिसरी आलेली प्रतिभा वर्मा हिचा सत्कार होणार आहे. व तिला २१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या १६ ते १९ सप्टेंबरपर्यंत चालणार्या चार दिवसांच्या परिषदेमध्ये १६ सप्टेंबर रोजी पहिले सत्रः यूपीएससी प्रिलियम, दुसरे सत्रः यशस्वीतांच्या यशाची यशोगाथा हे आहेत. १७ रोजी तिसरे सत्रः यूपीएसच्या मुख्य परिक्षेची तयारी, चौथे सत्रः यशाचा मंत्र आणि पाचवे सत्रः राज्यातील टॉपरशी संवाद हे आहेत. १८ रोजी सहाव्या सत्रात यूपीएससीच्या मुलाखतीची तयारी, सातवे सत्रः यूपीएससी व सीएसई परिक्षेचे बदलते स्वरूप समझून घेणे आणि आठव्या सत्रात यूपीएसीच्या तयारीसाठी इंटरनेटचा परिणाम कारण उपयोग करून घेणे या विषयावर विचार मांडले जातील. तसेच १९ सप्टेंबर रोजी आयोजित नवव्या सत्रात यूपीएससी परिक्षेचे नियंत्रक या विषयांवर भारतातील व महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून आपले विचार मांडतील.
या सेवेत प्रवेश करणारे हे विद्यार्थी भारताच्या प्रशासकीय सेवेचा महत्वाचे अधिकारी म्हणून भाग होणार आहेत. प्रशासकीय सेवा, विधिमंडळाने पारित केलेले कायदे हे योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा द्यावी, या हेतूने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
भारतातील, तसेच, महाराष्ट्रातील यूपीएससी-एपीएससी परिक्षार्थींना या यशस्वितांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच, त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रेरणा आहे. या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एकमेव अशी संस्था चालविली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे.
हा कार्यक्रम https://www.mitsog.org, www.mitwpu.edu.in <http://www.mitsog.org, www.mitwpu.edu.in> & www.bharatiyachhatrasansad.org या वेब साईट वर online असेल.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व मिटसॉगच्या सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी दिली.
पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 73 हजार 266;एकुण 8 हजार 173 रुग्णांचा मृत्यू
पुणे विभागातील 2 लाख 34 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
विभागात कोरोना बाधित 3 लाख 15 हजार 860 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि. 12 :- पुणे विभागातील 2 लाख 34 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 15 हजार 860 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 73 हजार 266 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.22 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 15 हजार 975 रुग्णांपैकी 1 लाख 70 हजार 800 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 317 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 858 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 147 रुग्णांपैकी 13 हजार 937 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 611 आहे. कोरोनाबाधित एकूण 599 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 438 रुग्णांपैकी 16 हजार 621 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 909 आहे. कोरोनाबाधित एकूण 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 370 रुग्णांपैकी 11 हजार 622 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 950 आहे. कोरोनाबाधित एकूण 798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 930 रुग्णांपैकी 21 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 479 आहे. कोरोनाबाधित एकूण 1010 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 8 हजार 193 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 750, सातारा जिल्ह्यात 800, सोलापूर जिल्ह्यात 608 , सांगली जिल्ह्यात 936 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1099 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 20 हजार 261 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 15 हजार 860 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
‘कोविड-19’च्या उपचारांसाठी आरबीएल बँकेतर्फे पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन्सची देणगी
· पुणे व नागपूरमधील प्रतिबंधित क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम
· डॉक्टर्स, सहाय्यक कर्मचारी, औषधे व संरक्षक किटसह सुसज्ज वैद्यकीय व्हॅन
पुणे- : आरबीएल बँकेने आपल्या ‘प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सीएसआर’ उपक्रमांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील महानगरपालिका आणि ग्रामीण समित्यांना पाच मोबाईल वैद्यकीय व्हॅन देणगीदाखल दिल्या आहेत. याकामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून सहाय्य करण्यात आले आहे.
या मोबाईल वैद्यकीय व्हॅन पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बारामती गाव समिती, सासवड गाव समिती आणि नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत कोविड-19 प्रभावित भागांत एक महिन्यासाठी उपलब्ध असतील.
‘कोविड-19’मुळे प्रतिबंधित भागांत व ग्रामीण भागांत राहणारे लोक त्यांच्या स्थानिक दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. त्यांच्या सोयीसाठी आरबीएल बँकेने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मोबाईल वैद्यकीय व्हॅन तैनात करण्याचा निर्णय घेतला. या व्हॅन संबंधित भागांत ‘मोबाईल क्लिनिक’ म्हणून काम करतील. ‘कोविड-19’च्या ‘पॉझिटिव्ह केसेस’ ओळखण्यासाठी आणि इतर वैद्यकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्हॅन दररोज 100 हून अधिक लोकांपर्यंत जातील व त्या नागरिकांच्या चाचण्या घेण्यात येतील. या व्हॅनमध्ये डॉक्टर, सहाय्यक कर्मचारी असतील, तसेच औषधे, हँड सॅनिटायझर्स, पीपीई किट्स, स्टेथोस्कोप, इन्फ्रा-गन, रक्तदाब मोजण्याचे उपकरण, कपड्याचे मास्क, ऑक्सिमीटर, ड्रेसिंगचे मटेरियल आणि ग्लुकोमीटर यांनी या व्हॅन्स सज्ज असतील. नागरिकांना यामधून वैद्यकीय उपचार आणि औषधे विनामूल्य दिली जातील. सामाजिक अंतर आणि स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन या व्हॅन्समध्ये केले जाईल.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ची ना-नफा तत्यावरील उपक्रम असलेली संस्था ‘ग्लोबल शेपर्स’ हिच्यासह ‘आरबीएल बॅंक’ बारामतीमध्ये महिलांना व तरूण मुलींना सॅनिटरी पॅड्स व मास्क यांचे विनामूल्य वितरण करणार आहे. लोकांना मदत करण्याच्या आरबीएल बॅंकेच्या उपक्रमांपैकी हा उपक्रम आहे. त्याचबरोबर, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘फेस मास्क’चे उत्पादन व वितरण, कर्मचाऱ्यांना पेरोल देणे,
परराज्यातील कामगारांना मदत पुरविणे आणि व्हर्च्युअल कर्मचारी स्वयंसेवक कार्यक्रम यांसह इतर उपक्रमही बॅंक राबवीत आहे.
आरबीएल बँकेच्या एचआर, सीएसआर व अंतर्गत ब्रँडिंगच्या प्रमुख शांता वल्लरी गांधी म्हणाल्या, “आरबीएल बँकेचे ध्येय ‘कम्युनिटी अॅज द कॉज’ (समाजाच्या हितासाठी) हे आहे, आम्ही एक सामाजिकदृष्ट्या जबाबदार संस्था आहोत आणि आव्हानात्मक काळात समाज घटकांना आधार देण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. ‘कोविड-19’विरुद्ध लढा देणे ही काळाची गरज आहे. या लढ्यात सार्वजनिक-खासगी भागीदारी महत्त्वाची ठरेल, असा आम्हाला वाटते. म्हणूनच, या रोगाशी लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांशी सहयोग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची ही भागीदारी प्रशंसनीय स्वरुपाची व कार्य पुढे नेणारी आहे.”
पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यावेळी म्हणाल्या, ‘‘आरबीएल बँकेने पुण्यात मोबाईल मेडिकल व्हॅन पुरवून कोविड मदतकार्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आपत्कालीन परिस्थितीत चाचणी व उपचार करू न शकणाऱ्या वंचितांना, विशेषत: गरीबांना या मदतीचा खूप उपयोग होईल. या व्हॅन आणि त्यांतील डॉक्टर, कर्मचारी यांना कोविडविरुद्धच्या लढ्यातील आघाडीवरील योद्धे व नायक असेच म्हणावे लागेल. आरबीएल बँकेने ‘सीएसआर’चा भाग म्हणून केलेल्या या मदतीचे आम्ही कौतुक करतो. आपल्याला या साथीविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढवावी लागेल आणि आपण अशाच प्रकारे जिंकू शकू.’’
शिवसेनेचे महाराष्ट्रात गुंडाराज…सरकारची भूमिका संशयास्पद-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा आरोप
मुंबई दि. १२ सप्टेंबर- शिवसेना सत्तेच्या नादात आपली मूळ भूमिका विसरली असून आता शिवसेनेचे गुंडाराज सुरू झाले आहे. पोलिसांची भूमिकासुद्धा याठिकाणी संशयास्पद वाटतेय. ज्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली, हल्लेखोरांनी त्यांचा डोळा फुटला तसेच त्यांच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज असूनही या प्रकरणातील हल्लेखोरांना जामीन मिळतो, याचा अर्थ ठाकरे सरकारची भूमिका संशयास्पद असून या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.


दरम्यान निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांविरुध्द अधिक कडक कलमे लावावीत व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हल्लेखोराविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली. त्यानंतर घरात घुसुन मारहाण करणा-या ठाकरे सरकारचा निषेध असो..तानाशाही नही चलेगी..दादागिरी नही चलेगी…देशासाठी सेवा करणा-या अधिका-यांना मारहाण करणा-या हल्लेखोराविरुध्द कठोर कारवाई करा..अश्य़ा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख व विरोधी पक्ष नेते यांची फोनवरुन चर्चा झाल. याप्रकरणात कायद्यानुसार योगय ती कारवाई करण्याचे आश्वासन यांनी दिले. अखेर सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हल्लेखोरावंर कायद्यानसुर कडक कारवाई करण्यात येईल व राजकीय दबावाखाली पोलिस कारवाई करणार नाही असे आश्वासन दिले व ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर भाजपचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली. हल्लेखोरांविरुध्द अधिक कठोर कलमे लावण्याचे आश्वासन पोलिसांनी पाळले नाही तर भाजपा याविरोधात अधिक उग्र आंदोलन केरल असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे नौदलाचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी एका व्यंगचित्र पोस्ट केल्याप्रकरणी काल त्यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यांना मालाड पूर्व येथील संजिविनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आणि आमदार अतुल भातखळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकतीची विचारपूस केली. याप्रकरणी न्याय मिळवून देण्याचे आश्वसानही दरेकर यांनी त्यांना यावेळी दिले.
त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, झालेला प्रकार हा अतिशय दुदैर्वी आहे.ठाकरे सरकारचा जो कारभार सध्या सुरू आहे त्यामुळे या राज्यात भयाचं, भीतीचं वातावरण या राज्यात निर्माण झालयं. ज्यांनी हल्ला केला त्यांना लगेच जामीन मिळाला. तसेच ज्यावेळी ज्या निवृत्त नौदल अधिका-यांवर हल्ला झाला त्याचवेळी पोलिस तत्परतेने त्यांना अटक करण्यासाठी गेले. अश्याप्रकारचे गुंडाराज या राज्यात सुरू आहे, अशी टिकाही दरेकर यांनी यावेळी केली.
निवृत्त नौदल अधिकारी ज्यांचे या देशासाठी योगदान आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सैनिकांचा सन्मान केला. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांच्याप्रती सातत्याने आदर व्यक्त केला. परंतु आता सत्तेच्या नादात शिवसेना मूळ भूमिका विसरली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राज्यात जर खरच कायद्याचे राज्य असेल तर अधिका-यांना दिवसाढवळ्या माराहाण करणा-या आरोपींना कुठल्याही परीस्थितीत जामीन मिळता नये व त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्याची भारतीय जनता पार्टीची आग्रही मागणी असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.
यावेळी भाजपचे विनोद शेलार,नगरसेवक विनोद मिश्रा, नगरसेविका सुनिता यादव, प्रभाग समिती अध्यक्षा प्रितम पंडागळे,
अँड. ज्ञानमूर्ती शर्मा, राणी द्विवेदी, अँड. सिध्दार्थ शर्मा आदी उपस्थित होते.
या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचे निवेदन निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांच्या मुलीने पोलिस स्थानकात दिले.
