पुणे- अवघ्या १० लाखाचा जुना चेन बुलडोझर घेऊन टेंडर अगोदरच काम केल्याचा बनाव करून महापालिकेला सुमारे १० कोटीचा चुना संगनमताने लावल्याचा आरोप करीत या संदर्भातले कामा नंतर आलेले टेंडर स्थायी समितीने रद्द करावे आणि संगनमत करणाऱ्या तीन अभियंत्यांवर आयुक्तांनी तातडीने निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी आज कॉंग्रेसचे माजी गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली आहे . आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अरविंद शिंदे यांनी सांगितले कि, आपण या संदर्भात महापालिका आयुक्त यांना लेखी पत्र दिले असून महापौर आणि स्थायी समितीं अध्यक्ष यांनाही भेटून या प्रकरणाची माहिती देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत . पहा नेमके शिंदे यांनी या संदर्भात नेमके काय सांगितले आहे .
आदिवासी भागातील १ लाख २१ हजार गरोदर महिलांना, ६ लाख ५१ हजार लाख बालकांना मिळणार मोफत दूध भुकटी
मुंबई, दि. 29 : राज्यातील आदिवासी भागातील सुमारे 1 लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना आणि 6 लाख 51 हजार बालकांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत या दूध भुकटीचे वाटप होणार आहे.
लॉकडाऊन काळात राज्यातील दूधभुकटीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या अतिरिक्त दूध भुकटीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महानंद मार्फत उत्पादित होणारी ही अतिरिक्त दूध भुकटीचा वापर आदिवासी भागातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बालकांना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघांने (महानंद) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे. दूध भुकटीचे वितरण करण्याची ठिकाणे कळविण्यासंदर्भात महानंदने आदिवासी विकास विभागास कळविले आहे.
राज्यातील 16 जिल्ह्यातील आदिवासी भागातील 1 लाख 21 हजार स्तनदा माता व गरोदर महिलांना प्रति दिन 25 ग्रॅम आणि 6 लाख 51 हजार बालकांना प्रति दिन 18 ग्रॅम दूध भुकटीचे वितरण अमृत आहार योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी एक वर्षासाठी सुमारे 5750 मेट्रिक टन दूध भुकटी लागणार आहे. ही संपूर्ण योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत (महानंद) एक वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.
मित्राची वाट पाहणाऱ्या तरुणाचा कोयत्याने वार करून खून
- गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली.
पुणे-तुळजापूर येथून आलेल्या नागेश दगडू गुंड (वय 37,केरूळ ,ता,तुळजापूर जि,उस्मानाबाद) याचा कोयत्याने वार करून खून केल्याचे आज उघडकीस आले. नागेश गुंड हा ३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री साडेआकरा वाजता स्वारगेट येथे आला असता अज्ञात इसमाने त्याच्याकडे लुटमारीच्या उद्देशाने पैशांची मागणी केली .गुंड याने प्रतिकार केला असता त्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला.पोलीस आणि नागरिकांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले.त्याचा आज मृत्यू झाला . या घटनेचा तपास केला असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून बाहेर आलेल्या ऋषीकेश जयराज कामठे (वय 34, रा. कोथरुड) याने खून केल्याचे उघडकीस आले व त्याला आज अटक करण्यात आली.
नागेश हा बदली कार चालक म्हणून काम करत असे. लॉकडाऊनमुळे तो गावी गेला होता. काम मिळाल्यानंतर पुण्यात येत असे. औन्ध येथील बदली चालक म्हणून काम मिळाले होते. त्यामुळे तो तुळजापूरवरून पुण्यात आला होता. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट बस स्थानक परिसरात उतरला. त्याला घेऊन जाण्यासाठी मित्र कमलाकर घोडके येणार होते. म्हणून तो वाट पहात थांबला होता. यावेळी अचानक दुचाकीवर एकजण चोरीच्या उद्देशाने आला. त्याने मोबाईल हिसकवला. पण नागेश यांनी विरोध केल्यानंतर त्याने तीक्ष्ण हत्यारे वार केले होते. यात रक्त स्त्राव होऊन नागेश यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. यावेळी त्यांना हा खून सराईत गुन्हेगार कामठे याने केला असल्याचे समजले. त्याची माहिती काढण्यात येत होती. त्यावेळी तो कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे असल्याचे समजताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
ऋषीकेश कामठे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 16 गुन्हे दाखल आहेत. तो कोथरुड पोलीस ठाण्याच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो काही महिन्यांपूर्वी बाहेर आला होता. यानंतर देखील तो गुन्हे करत होता. त्याने येरवडा हद्दीत देखील एका जबरी चोरीचा गुन्हा केला आहे. तो सिंहगड रोड पोलिसांच्या एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. त्याला पुढील कारवाई करण्यासाठी स्वारगेट पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या पथकाने केली आहे.
शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात
मुंबई दि. २८: शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमानिमित्ताने दि. १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत त्या नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांना संसर्ग झाला. २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल होऊन औषधोपचार घेतले. दि. २८ सप्टेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कोविड -१९ चे निदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यानधारणा करावी. तसेच आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर
मुंबई दि. 28 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली.
5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सन 2020-21 साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केली आहे.
उषा मंगेशकर यांनी आतापर्यंत मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा , जय संतोषी मां, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर , इन्कार अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली. मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या रसिकांनी डोक्यावर घेतल्या. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीते, भक्तिगीते अतिशय लोकप्रिय आहेत.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी उषाताईंचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल, उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या कलाकारास राज्य शासनातर्फे सन 1992 पासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात येते. संगीतकार राम – लक्ष्मण, उषा खन्ना, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका सुमन कल्याणपूर, आशा भोसले, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
उत्तमनगर भागातील सराईत गुंड तडीपार
पुणे- उत्तमनगर भागातील सोनू उर्फ बाबा दिलीप शिंदे (वय ३४,रा,नाणेकर गॅरेज समोर वडारवस्ती ,न्यू कोपरेगाव ता.हवेली) याला परिमंडळ ३ च्या पोलिसांनी एक वर्ष तडीपार करण्याचा आदेश वडील.सोनू याच्यावर उत्तमनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचे काही गुन्हे दाखल आहे घटक व तीक्ष्ण हत्याराने मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत.
प्रा. प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर
पुणे : येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक प्रमोद चव्हाण यांना पीएचडी जाहीर झाली आहे. तामिळनाडू येथील सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अभिमत विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देऊन गौरविले आहे. प्रमोद चव्हाण यांनी टेक्नॉलॉजी विद्या शाखेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये ‘लेअर्ड सॉफ्टवेअर आर्किटेक्चर फॉर हेटेरोजिनीअस डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम्स युजींग हायब्रीड कम्युनिकेशन चॅनेल्स’ या विषयावर प्रबंध सादर केला. प्रा. डॉ. रमा देवी, प्रा. डॉ. मुरुगन महालिंगम, डॉ. मुकुल सुतावणे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, अधिष्ठाता प्रा. प्रतिभा चव्हाण आदींनी त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई, दि.२८ : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
लता दीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यांनाही हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील. असे सांगून श्री. सामंत यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
‘भारतातली लोकशाही मेली’; राहुल गांधीं
- कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल
केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे. मात्र, या तिन्ही कायद्यांना शेतकरी विरोध करत असून शेतकऱ्यांचं देशभर आंदोलन सुरु आहे. हे विधेयक संसदेत सादर केलं तेव्हापासूनच विरोधक आक्रमक आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी विरोधक जागेवर बसले नव्हते असं म्हटलं होतं. उपसभापतींच्या दाव्याचं खंडन करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे.
दरम्यान, ही विधेयकं मंजूर करताना राज्यसभेत प्रचंड गदारोळ होता. प्रचंड गोंधळातच ही विधेयकं मंजूर झाली. यावर भूमिका मांडताना राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी असा दावा केला होता की, विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाहीत. मात्र, या संदर्भात इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने राज्यसभा टिव्हीच्या चित्रफितीवरून वृत्त प्रसिद्ध केलं. यामध्ये उपसभापतींच्या दाव्याच्या उलट दिसत आहे. या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही दाबला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी वृत्त ट्विट केलं आहे.
बजाज अलियान्झ लाइफच्या ‘स्मार्ट असिस्ट’ सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित व संपर्क विरहीत सेवा
करोनाच्या उद्रेकाच्या काळात विमा सल्लागाराला भेटण्यावरून चिंतित आहात? मात्र, आता तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीला भेटण्याची भीती वाटण्याची गरज नाही, कारण तुमची ही भेट समोरासमोर करण्याची गरज नाही. कोविड- 19 मुळे ग्राहकांची सुरक्षा व स्वास्थ्याला प्राधान्य देण्याच्या हेतूने व्यवसायांची आपल्या ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत आमूलाग्र बदलली आहे. संपर्कविरहीत आणि सुरक्षित सेवा कधी नव्हे इतक्या महत्त्वाच्या झाल्या आहेत आणि नवे तंत्रज्ञान कंपन्यांना ग्राहकाला सुरक्षितपणे सेवेचे वितरण करण्यास मदत करत आहेत.
बजाज अलियान्झ लाइफने विमा क्षेत्रात ‘स्मार्ट असिस्ट’ ही क्रांतीकारी आणि अशाप्रकारची पहिलीच सुरक्षित व संपर्कविरहीत सेवा लाँच केली आहे. ग्राहकांना त्यांच्या जीवनध्येयाचा प्रवास सुरू ठेवता यावा यासाठी बजाज अलियान्झ लाइफची स्मार्ट असिस्ट सेवा ग्राहकांना व्हर्च्युअल मदत करते, विशेषतः पहिल्यांदाच डिजिटल सेवा वापरणाऱ्यांना सध्याच्या समोरासमोर होणाऱ्या भेटी आव्हानात्मक झाल्या असताना जास्त मदत करत आहे. या सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित स्क्रीन शेयरिंग सेवेच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी तसेच उत्पादनांची माहिती मिळवणे, उत्पादनांची माहितीपुस्तकिता आणि फायद्यांची विस्तृत माहिती मिळवणे, खरेदीमध्ये मदत मिळवणे, जीवन विमा क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञांशी संवाद साधणे अशा विविध सेवांबाबतीत रियल टाइम व्हर्च्युअल सहाय्य मिळवून देते. विशेष म्हणजे, सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करून हे सर्व केले जाते.
स्मार्ट असिस्ट सेवा बजाज अलियान्झ लाइफच्या विक्री प्रतिनिधींद्वारे वापरल्या जाणाऱ्या आयएनएस टॅब या अपवर उपलब्ध आहे. ग्राहकाला लिंक पाठवली जाते, जी त्याने मंजूर करून त्यावर क्लिक केल्यास को- ब्राउजिंग सेशन सुरू करता येते. हे सर्व रियल टाइममध्ये व ग्राहकाला त्याच्या जीवन ध्येयाचा प्रवास सुरू करण्यासाठी आवश्यक उत्पादन पूर्णपणे समजून घेत केले जाते. त्याचबरोबर ग्राहकाला फायलिंग प्रक्रियेदरम्यान कोणते बदल करायचे असल्यास इन- बिल्ट चॅट विंडोमधून कळवता येईल व दुरुस्त करता येईल. ही क्रांतीकारी सेवा ग्राहकांचा डिजिटल अनुभव उंचावते, शिवाय पूर्णपणे सुरक्षित तरीही मानवी वातावरणात संपर्कविरहीत सेवा देते.
प्रत्येक ग्राहकाच्या गरजा आणि जीवन- ध्येये वेगवेगळी असल्यामुळे स्मार्ट असिस्ट समस्या निराकरणाचा ग्राहकाभिमुख दृष्टीकोन ठेवून काम करते. त्याशिवाय, ही सेवा कोणत्याही प्रकारच्या उपकरणावरून वापरता येणारी असून को- ब्राउजिंग सेशनसाठी अप इन्स्टॉलेशनची गरज पडत नाही. ही सेवा कोणत्याही वेब ब्राउजरमधून उघडता येते. बजाज अलियान्झ लाइफची स्मार्ट असिस्ट सेवा बजाज अलियान्झने ग्राहकांना त्यांच्या जीवनध्येयांच्या प्रवासात मदत करण्यासाठी हाती घेतलेल्या स्मार्ट उपक्रमांच्या मालिकेतील सर्वात अद्यावत सेवा आहे.
सोनाली जाधव ठरल्या कोथरुडमधील पहिल्या महिला प्लाझ्मादात्या
आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
पुणे- कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याने; त्यातच पुण्यात सध्या चार हजारांहुन अधिक कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. मात्र, प्रत्यक्षात 200 रुग्णांनाच पूरेल इतका प्लाझ्मा साठा उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मादान उपक्रमास महिलांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, मतदार संघातील सोनाली जाधव यांनी रविवारी प्लाझ्मा दान केला आहे. सोनाली या कोथरुडमधील पहिल्या महिला प्लाझ्मादात्या ठरल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात प्लाझ्माची मागणी वाढली आहे. मात्र, कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर प्लाझ्मादानासाठी फारसे कोणी पुढाकार घेत नसल्याचे चित्र होते. शहरातील काही रक्त्पेढ्यांकडे प्लाझ्मासंकलनाचे काम सुरु असले तरी, प्लाझ्मादात्यांचा शोध घ्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी रुग्णालयातील कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांनाच प्लाझ्मादानासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे.
त्यामुळे शहरातील प्लाझ्माची वाढती गरज ओळखून भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्लाझ्मादानाचा उपक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. पाटील यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. तसेच, मतदार संघातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या कोरोना योद्ध्यांना प्लाझ्मादानासाठी आवाहन केले होते.
या उपक्रमाअंतर्गत प्लाझ्मादान करु इच्छिणाऱ्यांसाठी आ. चंद्रकांदादा पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात अँटीबॉडी टेस्टची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली होती. त्याला मतदारासंघातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता या उपक्रमात महिलाही सहभागी होत असल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील अनेक महिलांनी अँटीबॉडी टेस्टसाठी श्री. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अँटीबॉडी टेस्ट करुन घेत आहेत.
यामध्ये मतदार संघातील महिला सोनाली जाधव यांची गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी प्लाझ्मादानासाठी अँटीबॉडी टेस्ट केली होती. यानंतर प्लाझ्मादानाच्या अनुषंगाने सोनाली यांच्या अहवाल सकारात्मक आल्याने, रविवारी त्यांनी प्लाझ्मादान केला. यावेळी त्यांच्यासोबत कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, प्रभाग क्रमांक 12 च्या नगरसेविका हर्षाली माथवड, भारतीय जनता पक्षाचे कोथरुडचे सरचिटणीस दिनेश माथवड, विठ्ठल बराटे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
सोनाली यांच्या या पुढाकाराचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले असून, शहरात ज्या महिलांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, त्यांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मादान करावा. जेणेकरुन प्लाझ्मादानातून दोन रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होईल.
दरम्यान, प्लाझ्मादानाच्या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 90 जणांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली असून, त्यापैकी आजपर्यंत 40 दात्यांनी प्लाझ्मादान केला आहे.
कर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली
पुणे :सक्रीयपणाने सरकार निर्णय घेत असल्याने मोरेटोरियाम विषयावर पुढील 2 ते 3 दिवसात सरकार नक्की धोरण जाहीर करेल तसेच आर्थिक गुंतागुंतीचे अनेक प्रश्न यामध्ये असल्याने सरकारला जरा कालावधी देण्यात यावा अशी विनंती महाधिवक्ता तुषार मेहता न्यायालयाला केल्याने न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होईल असे जाहीर केले. सरकार आणि रिसर्व बँक त्यांचे कर्जवसुलीबाबतचे आर्थिक धोरण लवकरच ठरणार आहे.
रिझर्व्ह बँक व सरकारने धोरण ठरउन त्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले की त्याच्या प्रती याचिकर्ते व त्यांच्या वकिलांना द्याव्यात म्हणजे मुद्देसूद निर्णय व विचार नक्की करणे सगळ्यांना सोयीचे ठरेल, गुरुवार पर्यंत प्रतिज्ञापत्राच्या प्रती प्रतिवादींनी देण्यात याव्यात असेही न्यायालयाने सांगितले. पुढील सुनावणी पर्यंत कर्ज भरले नाही म्हणून एखाद्या गुंतवणुकीला नॉन परफॉरमिंग असेट असे घोषित करण्यावर असलेली स्थगिती कायम राहील असेही न्या भूषण यांनी स्पष्ट केले.
करोना संकटात सर्वसामान्य छोट्या व मध्यम व्यापार व्यावसायीक कर्जदारांकडून कर्जहप्ते स्थगितीवरील व्याज आकारणे म्हणजे आर्थिक शोषण आहे. केवळ मोठे उद्योग नाही तर लघु उद्योजक हे व्यापार जगताचा कणा आहेत असे म्हणत पुण्यातील दोन लघु व्यावसायीक विजयसिह दुबल आणि भाऊसाहेब जंजिरे यांनी अॅड. असीम सरोदे, सुहास कदम, मंजू जेटली यांच्या मदतीने थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी जेष्ठ वकील राजीव दत्ता यांनी सुनावणी तहकूब करावी व पूढील तारीख देण्यात येईल याला संमती दर्शवली.
थकीत हप्त्यांवर व्याज वसूल करणे म्हणजे व्याजावर व्याज घेण्याचा प्रकार आर्थिक शोषण व प्रामाणिक कर्जदारांना शिक्षा करणारा अन्याय आहे असे देशातील कोट्यवधी लघु व मध्यम व्यापार करणाऱ्यांचे दुःख पुण्यातील व्यापारी विजय दुबल व भाऊसाहेब जंजिरे यांनी याचिकेतून मांडले आहे.
लोन मोरेटोरियम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकांवर सुनावणी सुरु आहे त्यामध्येच लघु व मध्यम व्यापाऱ्यांची व त्यांच्या परिवारांची व्यथा मांडणारी हि याचिका समविष्ट करण्यात आली आहे.
याचिकाकर्ते विजयसिंह दुबल म्हणाले की, लोनवर चक्रवाढ पद्धतीने व्याजावर व्याज द्यावे लागणार हे थेट आर्थिक शोषण आहे. यामुळे अनेक मध्यम व लघु व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल अशी व्यवस्था खरे तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करण्याचे अधिकार सरकारला आहेत. सरकार बँकांना व्याजावरील व्याज आकारण्यापासून रोखू शकते. आता केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक मिळून काय धोरण ठरविणार यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
दरम्यान कर्ज वसुलीसाठी बँकेकडून सतत कर्जधारकांना फोन केले जातात, अपमानजनक भाषा वापरली जाते यावर बंधने आणावीत याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता ‘ आज आम्ही कोणताच आदेश पारित करणार नाही ‘ असे न्यायालयाने सांगितल्याची माहिती ऍड असीम सरोदे यांनी दिली
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक वर्दळी तसेच वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या आणखी 300 रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे. यामध्ये वीजखांबावर असलेल्या 200 आणि सिमेंट क्रॉन्क्रिटच्या चौथऱ्यावर असलेल्या 100 रोहित्रांचा समावेश आहे.
दरम्यान, पिंपरी व भोसरी शहरामधील रोहित्रांच्या परिसरातील साफसफाई तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. सोमवार (दि. 28) पर्यंत 1901 रोहित्रांच्या परिसरातील झाडीझुडपे, वेली काढणे, रोहित्रांची तपासणी करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी कामे करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. सद्यस्थितीत पिंपरीमध्ये 2884 तर भोसरीमध्ये 3173 असे एकूण 6057 रोहित्र आहेत. यापैकी 2299 हे बंदिस्त खोलीमध्ये तर उर्वरित 3758 रोहित्र सार्वजनिक ठिकाणी आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना महावितरणकडून लोखंडी जाळ्यांचे कुंपण घातलेले आहे. तसेच रस्त्याबाजूला, वस्त्यांजवळ, बाजार किंवा नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या 441 रोहित्रांना यापूर्वीच लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात आले आहे. या सुरक्षा आवरणामुळे रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे ऑईल गळती, स्पार्कींग आदींचा परिसरासाठी धोका राहणार नाही. आता आणखी 300 रोहित्रांना हे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे.
महावितरणकडून वर्षभर देखभाल व दुरुस्तीचे काम केली जातात. यामध्ये रोहित्रांची विशेष काळजी घेऊन सर्व प्रकारची देखभाल व दुरुस्ती केली जाते. ही कामे नियमित व जलदगतीने करण्यासाठी यंदापासून तीन वर्षांसाठी पिंपरी चिंचवड शहरासाठी 19 एजन्सीजचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. या एजन्सीजमुळे महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांना आणखी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. तसेच संयुक्तपणे रोहित्राची योग्य देखभाल करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याबाजूच्या रोहित्राखाली छोटे व्यवसाय करणारे किंवा रोहित्राजवळच घराचे किंवा अन्य अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महावितरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संयुक्तपणे कारवाई करणार आहे. महावितरणने याबाबत आग्रही भूमिका घेत महानगरपालिकेकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. विद्युत यंत्रणेजवळ असलेल्या अतिक्रमणाची माहिती महावितरणकडून नियमित स्वरुपात महानगरपालिकेला दिली जाणार आहे. नागरिकांनीसुद्धा रोहित्र किंवा इतर विद्युत यंत्रणेजवळ अनधिकृत बांधकाम करू नये तसेच रोहित्रांच्या कुंपणात सुका किंवा ओला कचरा टाकू नये व या यंत्रणेपासून नेहमी सुरक्षित, सावध व सतर्क राहावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
“इज्जतीत घरी रहा” रॅप साँग प्रदर्शित
कोरोनाच्या कठीण काळात देश आता लॉकडाऊन कडून अनलॉक कडे वाटचाल करत आहे. तरी देखील कोरोनाचे जगावरील संकट कायम आहे, अश्यातच सरकारतर्फे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अश्या सूचना दिल्या जात आहेत, तरी देखील अनेक तरुण आज बाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे युवकांमध्ये प्रचलित झालेले शब्द वापरून तैयार केलेले “इज्जतीत घरी रहा” हे गाणे नुकतेच झी म्युझिक वर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“इज्जतीत घरी रहा” हे बोल असलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन व संकलन अनिल शिंदे यांनी केले असून विकी मगर यांनी है गीत गायले आहे संगीत चिराग आसोपा यानी केले आहे तर प्रोडक्शन ची जबाबदारी अजय शिंदे यांनी सांभाळली आहे.
याबाबत बोलताना दिग्दर्शक अनिल शिंदे म्हणाले की “पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेला रॅपसॉंग हा प्रकार तरुणाईला भुरळ घालताना दिसतो, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उत्तम गाणी आजवर रसिकांसमोर आली, पण रॅपसॉंग हा प्रकार हाताळला गेला नव्हता त्यामुळे हे गाणे केले, आणि त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.”
शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा डॉ. आनंद देशपांडे
पुणे, शहरी, ग्रामीण किंवा गरीब, श्रीमंत यातील अंतर कमी करण्यासाठी तंत्रज्ञान हा पर्याय आहे. त्यासाठी शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे मत पर्सिस्टंट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्ङ्गे (डीईएस) या वर्षीचा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार हरसूल येथील ‘कन्या छायात्रय’ या आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थिनींना शिक्षण, संगोपन आणि सर्वांगिण विकासासाठी काम करणार्या संस्थेला ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात आला.
एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कन्या छात्रालयाच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ. देशपांडे यांनी पुरस्काराच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक लाख रुपयांचा धनादेश देण्याचे जाहीर केले.
डॉ. देशपांडे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, सह-कार्यवाह प्रा. स्वाती जोगळेकर, मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम नेर्लेकर, ङ्गर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, कन्या छात्रालयचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, सचिव ऍड विनीत महाजन, कोषाध्यक्ष प्रा. हेमंत गोलविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदिवासींची पारंपरिक शिकवण सर्वापर्यंत पोहोचली पाहिजे, ग‘ामीण संस्कृतीची ओळख होण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी गावाकडे पाठवावे, पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकांवर भर द्यावा आणि रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाला प्राधान्य द्यावे, असेही डॉ. देशपांडे यांनी पुढे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज म्हणाले, ‘स्वातंत्र्य प्राप्तीला ७० हून अधिक वर्षे झाली तरी आदीवासी भागात अपेक्षित मदत पोहोचलेली नाही. सर्वांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. वंचित समाजातील घटकांपर्यंत मदत मिळावी यासाठी शाळा निर्माण केल्या पाहिजेत.’
कन्या छात्रालयाचे अध्यक्ष रत्नपारखी म्हणाले, ‘गेली ३९ वर्षे संस्थेच्या माध्यमातून ७०० हून अधिक आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो. विविध क्षेत्रांत विद्यार्थिनी चांगली कामगिरी करीत आहेत. ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत ही शाळेची माजी विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क‘ीडा संकुल आणि आणखी एक वसतिगृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.’
डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी प्रास्ताविक भाषण केले. सह-कार्यवाह प्रा. स्वाती जोगळेकर यांनी परिचय करून दिला, आजीव सदस्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
