Home Blog Page 2434

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांचा घरातून सहभाग

0
  • कोरोनाने आजारी रुग्णांना आराम पडण्यासाठी  मागितली  दुवा !
  • आझम कॅम्पस ‘च्या  ‘फेसबुक लाईव्ह   ‘जुम्मा नमाज’ ला पुण्यात एकविसाव्या  आठवड्यात प्रतिसाद 

पुणे: कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत जुम्मा नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात  आले .  देशभरात कोरोनाने आजारी रुग्णांना आराम पडण्यासाठी    दुवा मागण्यात आली. 
सलग एकविसाव्या आठवडयात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. 
आज ९ ऑकटोबर  रोजी  दुपारी दीड वाजता ‘फेसबुक लाईव्ह’ पठण  करण्यात आले .  मुस्लीम बांधवांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत घरातून सहभाग घेतला.
आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.  
येथे दर आठवड्यात   शुक्रवारी दुपारी दीड वाजता जुम्मा नमाझचे फेसबुक लाईव्ह द्वारे पठण करण्यात येते.आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद,शराफत अली  यांनी या उपक्रमादरम्यान  नमाज पठण केले.तर  आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. 
मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी  सुरु आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात.

देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा गुन्हे दर कमी; शिक्षा होण्याच्या दरातही वाढ – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई, दि. 9 : देशाचा गुन्हे दर (Crime rate) वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र 2018-19 च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. तसेच राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दरही वाढला आहे. 2018 मध्ये हा दर 41.41 होता तो 2019 मध्ये 49 टक्के झाला असून महाराष्ट्र राज्याचा क्रमांक अकरावा आहे. यात कर्नाटक 36.6, मध्य प्रदेश 47.00, गुजरात 45.6, तेलंगणा 42.5 टक्के असा दर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

खुनासंदर्भातील गुन्हे

सन 2019 मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण 4.17 लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तर राज्यात 2019 मध्ये हिंसाचाराचा गुन्हे दर केवळ 36 होता आणि राज्य 11 व्या क्रमांकावर होते. सन 2019 मध्ये देशाचा खुनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये गुन्हे दर 2.2 असा होता. त्यात महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ 1.7 असून महाराष्ट्र राज्य हे 25 व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा 17वा क्रमांक आहे.

स्त्रियांवरील अत्याचार गुन्हे

इतर राज्यांच्या तुलनेत प्रतिलक्ष महिला लोकसंख्येमागे महाराष्ट्र राज्य 13व्या क्रमांकावर आहे. सन 2019 मध्ये बलात्काराचे  राजस्थानमध्ये 5997, उत्तरप्रदेश 3065, मध्य प्रदेश 2485, आणि महाराष्ट्र 2299 असे गुन्हे नोंदविले आहेत. या 2299 गुन्हेगारांपैकी 2274 गुन्हेगार हे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी असे ओळखीचे आहेत तर केवळ 25 गुन्हेगार अनोळखी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हे दर 3.09 असून महाराष्ट्र 22व्या क्रमांकावर आहे. इतर राज्यांचा गुन्हेदर केरळ 11.6, हिमाचल प्रदेश 10, हरियाणा 10.9, झारखंड 7.7, मध्यप्रदेश 6.2 असा आहे.

भा.दं.वि.चे गुन्हे

संपूर्ण देशात 2019 मध्ये भा.दं.वि.चे 32.25 लाख गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर 278.4 असून महाराष्ट्र राज्य 8व्या क्रमांकावर (प्रतिलाख लोकसंख्येनुसार) आहे. यात मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगणा यांचा दर जास्त आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य भा.दं.वि.च्या गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा 9वा क्रमांक आहे. यात महाराष्ट्रात केवळ 910 गुन्ह्याची नोंद आहे. तर उत्तरप्रदेश 25,524, मध्य प्रदेश 3847, बिहार 2976, राजस्थान 2095 असे गुन्हे नोंद आहेत. एकूणच ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्य गुन्हेगारी रोखण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले आहे, असे श्री. अनिल देशमुख यांनी सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 160

0

पुणे विभागातील 3 लाख 95 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 64 हजार 774 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.09 :- पुणे विभागातील 3 लाख 95 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 64 हजार 774 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 160 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 491 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.01 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 1 हजार 392 रुग्णांपैकी 2 लाख 61 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 910 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 917 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.79 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 636 रुग्णांपैकी 32 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 122 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 39 रुग्णांपैकी 29 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 739 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 330 रुग्णांपैकी 33 हजार 784 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 59 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 377 रुग्णांपैकी 38 हजार 522 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 330 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 267 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 39, सातारा जिल्ह्यात 441, सोलापूर जिल्ह्यात 314, सांगली जिल्ह्यात 361 तर कोल्हापूर जिल्ह्यात 112 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 897 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 707, सातारा जिल्हयामध्ये 455, सोलापूर जिल्हयामध्ये 382, सांगली जिल्हयामध्ये 424 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 929 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 66 हजार 170 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 64 हजार 774 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 8 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0
  • कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारसुविधेत सातत्याने वाढ

पुणे, दि. 9 : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना विचारात घेवून त्यानुसार योग्य कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खा. सुप्रिया सुळे, (व्हिसीव्दारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीष बापट, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, आमदार अतुल बेनके, आमदार सिद्धार्थ शिराळे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी शासन, प्रशासन व जनतेच्या सहकार्यातून कोरोनासंकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला. रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावी, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन पुरवठा सुरळीत रहावा, अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.सुभाष साळुंखे म्हणाले, 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार अभियान राबविण्यात येत आहे.पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे ग्रामीण क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

पुणे, दि. 9 : पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे. निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या व ‘स्मार्ट सिटी’ मिशनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ‘स्मार्ट सिटी’ संदर्भातील पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेड’च्या ‘स्मार्टसिटी ॲडव्हायजरी फोरम’ची पाचवी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधानभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अॅडव्हायजरी फोरमचे सदस्य सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे तसेच अन्य पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन करुन कामे वेळेत व्हायला हवीत. देशात पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

प्रकल्प राबविताना लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन ‘स्मार्ट सिटी मिशन’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार कामे  करुन घ्यावीत.  कामात पारदर्शकता ठेवून कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून सुरु असणारी कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

खासदार गिरीश बापट यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासंदर्भात अनेक उपयुक्त सूचना केल्या. या प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेली विविध विकास कामे जलद पूर्ण करावीत, असेही त्यांनी सुचविले.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचे सादरीकरण करुन माहिती दिली.

विक्रमी धान खरेदीसाठी योग्य नियोजन करा – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

0

मुंबई दि. 9 :  सन 2020-21 खरीप व रब्बी हंगामात विक्रमी धान खरेदी अपेक्षित असल्यामुळे धान खरेदी संबंधित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केट फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांना सर्व बाबींचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

मंत्रालयात सन 2020-21 खरीप हंगामातील धान खरेदी बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी मंत्री श्री भुजबळ बोलत होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, सन 2020-2021 मध्ये विक्रमी  धान उत्पादन अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी खरेदीचे नियोजन करावे. यावर्षी विक्रमी धान उत्पादन अपेक्षित असल्याने सद्यस्थितीमध्ये कार्यरत धान खरेदी केंद्रावर ताण येणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत, अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी धान खरेदी केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात यावी. मार्केट फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रे  वाढवावीत. धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धतेबाबतही नियोजन करावे. तसेच या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्राणालीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशा सूचनाही श्री. भुजबळ यांनी दिल्या.

यावेळी  खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार  राजू   कारेमोरे, मनोहर चंद्रीकापुरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, मार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, दिलीप हळदे, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री.राठोड आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 9 : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयूचा शुभारंभ आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलिआयसीयू तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.

राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टेलिआयसीयू सुविधा सध्या सहा जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. राज्यात अन्यत्रदेखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबत सकारात्मक आहेत. ही सेवा राज्यभर सुरु झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांनादेखील विशेषज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडिस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपातर्फे 12 रोजी राज्यभर निदर्शने

0

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत , अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत विविध ठराव संमत करण्यात आले. शेतकरी आणि कामगार हिताचे कायदे मंजूर केल्याबद्दल , रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीचे स्वप्न साकार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत त्याच बरोबर मराठा आरक्षण टिकण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर कृषी व कामगार कायद्यांमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती शेतकरी आणि कामगार वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील , तरूणींवरील , बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर 12 ऑक्टोबर रोजी भाजपातर्फे निदर्शने करण्यात येतील. मुंबईत शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चैत्यभूमीपर्यंत लॉँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचं निधन

0

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील रुग्णालयात पासवान यांनी शेवटचा श्वास घेतला. पासवान याचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

23 ऑगस्टला दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये पासवान यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

 3 ऑक्टोबरला पासवान यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते रुग्णालयात होते. दिल्लीच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते.

‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असं ट्विट चिराग पासवान यांनी केलंय.

बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती. 

दरम्यान, बिहारच्या निवडणुकांच्या आधी पासवान यांचा मृत्यू होणे धक्कादायक असून त्याचा निवडणुकांवर मोठा परिणाम पडेल असे बोलले जात आहे. रामविलास पासवान यांच्या निदानाने देशाने एक मोठा दलित नेता गमावला आहे.

माजी आमदार टिळेकर आणि ‘त्या ‘ महिला नगरसेविकांची अखेर जामिनावर सुटका (व्हिडीओ)

0

पुणे –नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी करत महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याची जबरदस्तीने पूजा करून कार्यालयाच्या साहित्याची नासधूस व टाळा ठोकण्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि चार नगरसेवकांसह 41 जणांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.यातील नगरसेविकांची महिला कारागृहातून तर माजी आमदार टिळेकर व आदींची बार्टी शेजारील कोरोंटाइन सेंटर मधून सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी संबंधितांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी झाली.माजी आमदार टिळेकर यांच्यासह सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, ऋषाली कामठे, वीरसेन जगताप अशी अटक झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी कार्यकारी अभियंता अषित देवप्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीतर्फे ऍड. प्रसाद कुलकर्णी, ऍड. सुधीर शहा, ऍड. के. टी. आरु, ऍड. शैलेश म्हस्के,, ऍड. रवी लाढाणे, ऍड. ऋषिकेश घोरपडे, ऍड. सिद्धार्थ राठोड यांनी कोर्टात कामकाज पाहिले. या प्रकरणात संबंधितांना जामिनावर सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला.कात्रज- कोंढवा रस्ता, बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या स्वारगेट येथील कार्यालयात आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकर यांनी फिर्यादी यांच्या टेबलावरील काच फोडली व कार्यालयातील फाइल फेकून दिल्या. तर कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची नुकसान करून काचा फोडल्या. त्यानंतर टिळेकर यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून येत त्यांना दमदाटी करून ढकलत कार्यालयाबाहेर काढत सरकारी कामात अडथळा आणला होता.

पाण्याच्या राजकारणापायी त्यांनी पाहिल्या कारागृहाच्या उत्तुंग भिंती …

महिला नगरसेविकांना याप्रकरणी 2 रात्री ३ दिवस कारागृहात काढाव्या लागल्याचे समजते . टिळेकर आणि काही कार्यकर्ते मात्र बार्टी शेजारील कोरोंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते .या सर्वांना आज संध्याकाळी उशिरा सोडण्यात आले. यावेळी त्यांचे मोजके कार्यकर्ते बाहेर त्यांच्या प्रतीक्षेत होते . पोलीस उपायुक्त यांच्या उपस्थितीत येथे यावेळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता . कार्यकर्त्यांसह माध्यम प्रतिनिधींना दूरवर राहण्याची सूचना देण्यात आली होती. कोणतेही बडे नेते,पदाधिकारी यावेळी इकडे फिरकले नाहीत .पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलनास गेलेल्या महिला नगरसेविकांनी कारागृहाचा अनुभव घेतल्याने बाहेर पडताच त्यांना रडू कोसळले होते . पण त्यांचे नातलग ,’तुम्हीलोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे भोगलेत ‘ असे सांगून त्यांची समजूत काढताना दिसत होते.

पुणेकरांच्या सुरक्षतेसाठी आणखी 1500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

0

पुणे – शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे अधिक मजबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी काही दिवसांमध्ये संपूर्ण शहरात उच्च क्षमतेचे 1500 कॅमेरा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यास प्राधान्य दिले आहे. पुणेकरांच्या सुरक्षितेसाठी विशेष प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. आयुक्तालयात पत्रकारांनी वार्तालापात ते बोलत होते.

पुणेकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे यासाठी नवीन योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. विविध रस्त्यांसह प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये आणखी वाढ करून सीसीटीव्हींची संख्या 1 हजार 500 पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था भक्कम होण्यास मदत होणार आहे. यापुर्वी लावण्यात आलेल्या नादुरुस्त खॅमेऱ्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची क्षमता काळानुरूप बदलत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच सीसीटीव्ही अपग्रेड करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात आठ दिवसात प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यांच्या पुर्नरचनेसाठी प्राधान्य

वाढत्या लोकसंख्येमुळे पोलिस ठाण्यांच्या हद्दीची पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यासाठी यापूर्वी रचना केलेल्या उपायुक्त (झोन) कार्यालयांना राज्य सरकारची मान्यता घेणे बाकी आहे. त्याचा प्रस्ताव तयार करून पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर नव्याने सर्वेक्षण करून पोलिस ठाण्यांसह झोन तयार केले जाणार आहेत. विशेषतः हडपसर, चतुःशृंगी पोलीस ठाण्याची पुर्नरचना करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज भासणार आहे.

इंटेलियन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ होणार वापर

वाहतूकोंडीवर उपाय म्हणून इंटेलियन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’चा (आयटीएमएस) वापर प्रभावीपणे केला जाणार आहे. शहरात पुढील 25 ते 30 वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून त्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यासाठी पुरेसे अधिकारी, कर्मचारी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीनचिट

0

मुंबई – मुंबई पोलिसांच्या आर्थिक अपराध आणि अन्वेषण विभागाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कोर्टात अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात अजित पवार आणि इतर ६९ लोकांविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांनी वैफल्यग्रस्त होत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांना अश्रू अनावर झाले होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्यामुळे या बँकेला २५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, असा आरोप ठेवण्यात आला होता. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने देखील गुन्हा दाखल करत अजित पवार यांचा जबाब नोंदविला होता. तसेच आर्थिक गुन्हे विभागही समांतर चौकशी करत होते. मात्र आता या प्रकरणात EOW कडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

भाजपचे सरकार असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यात आली होती. त्याच वेळी शरद पवार यांनाही याबाबत ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली होती. शरद पवारांनी जेव्हा स्वतःहून चौकशीला हजर राहण्याची भूमिका मांडली, तेव्हा मात्र ईडीने चौकशी करण्यास नकार दिला. त्याच दिवशी संध्याकाळी अजित पवार यांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती.

नवरात्री व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने रात्री नऊ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्या; पुणे व्यापारी महासंघाची मागणी

0

पुणे- आगामी नवरात्री आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खरेदीसाठी वेळ मिळावा, तसेच दुकानदारांना देखील पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासनाने दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स पुणे (पुणे व्यापारी महासंघ) यांच्यातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या अधिक मास सुरु आहे. या महिन्यात सौभाग्याचे वाण खरेदी करण्याला पसंती दिली जाते. दागिने, भांडी, पूजेचे साहित्य नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

17 ऑक्टोबर पासून हिंदू बांधवांचे नवरात्री आणि दिवाळी हे सण सुरु होत आहेत. या उत्सवात खरेदी होत असल्याने खरेदी-विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते.

दिवाळी नंतर लगेच लग्न सराई सुरु होत आहे. त्यासाठी देखील खरेदीची अनेकांची लगभग सुरु असते. सध्या दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची परवानगी आहे.

शहरातील नोकरवर्ग कामावरून घरी आल्यानंतर त्यांना खरेदीसाठी फार कमी वेळ मिळतो. अनेकदा दुकाने बंद झाल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.

राज्य सरकारने हॉटेल्स आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याच प्रमाणे दुकानांना देखील 17 ऑक्टोबर पासून रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 8 : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री.देशमुख शोकसंदेशात म्हणतात, मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून खर्शीकर यांची कारकीर्द गाजली. आपल्या सहज आणि निखळ अभिनयामुळे मराठी सिनेसृष्टीत नव्वदच्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचित होते. अविनाश खर्शीकर यांनी 1978 ला ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. तुझे आहे तुजपाशी मधला ‘श्याम’ ही भूमिका त्याचबरोबर ‘वासूची सासू, झोपी गेलेला जागा झाला, सौजन्याची ऐशी तैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके विशेष गाजली.

त्याचबरोबर आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सात्विक अभिनयाचा अमीट ठसा त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविला. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये नव्वदच्या दशकातील सिनेमांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

ऊसतोड महिलांसंदर्भातील समितीच्या उपाययोजनांचा कार्य अहवाल पंधरा दिवसात सादर करावा- डॉ.नीलम गोऱ्हे

0

मुंबई. दि. 8 : ऊसतोड महिला कामगारांच्या अवैधरित्या गर्भाशय काढण्याबाबत चौकशी समितीच्या अहवालात सुचविण्यात आलेल्या उपाययोजना अंमलबजावणीबाबतचा कार्य अहवाल पंधरा दिवसात सर्व विभागांनी सादर करावा, असे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे दिले.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला कामगारांच्या अवैधरित्या होणाऱ्या गर्भपाताच्या अनुषंगाने शासनाने चौकशी समिती डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. त्याचा अहवाल दि. 24 ऑगस्ट, 2019 रोजी शासनाला सादर करण्यात आला होता. त्या समितीने सुचविलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तसेच बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत आरोग्य, कामगार, साखर आयुक्त, महिला व बाल विकास विभागांची वेबीनार बैठक घेण्यात आली.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, प्रत्येक गावात ग्राम दक्षता समिती स्थापन करून यामध्ये बचतगटाचा सहभाग घ्यावा. आयुक्त समाज कल्याण यांनी बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांबरोबर  तात्काळ बैठक घ्यावी व अंमलबजावणीबाबत आढावा घ्यावा. तसेच महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशानुसार गट विकास अधिकारी व तहसीलदार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुक्यातील महिला नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य व महिला नागरिक यांची बैठक घेऊन महिलांचे प्रश्न सोडवावे. ऊसतोड महिलांच्या संदर्भात मकाम या संस्थेने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास सर्व विभागाने करावा, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

आरोग्य विभागाच्या संचालक श्रीमती डॉ.अर्चना पाटील यांनी आरोग्य विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामीण स्तरावर कृती दल स्थापन करण्यात आली आहे. किशोरवयीन मुले व मुली यांना आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. तसेच ऊसतोड महिलांचे अवैधरित्या गर्भपात करण्यात येऊ नयेत यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे डॉ.पाटील यांनी यावेळी सांगितले.

बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी ऊसतोड महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत (Health Card) आरोग्य पत्रिका देण्यात येत आहेत. सर्व महिलांची आरोग्य तपासणी नियमित होत आहे व त्याबाबत आरोग्य पत्रिकामध्ये नोंद घेण्यात येत असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त म्हणाले, साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाळणाघर सुरू करण्याचे  प्रस्ताव जिल्हा स्तरावरून मागविण्यात आले आहेत.

समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले, साखर आयुक्त व कामगार आयुक्त यांच्याबरोबर सन्मवय साधून ऊसतोड महिलांना आवश्क असणाऱ्या सुविधा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे.