Home Blog Page 2430

दादर शिवाजी पार्क ते चैत्यभूमी महिला अत्याचार विरोधात भाजपा चा मोर्चा

0


महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
मुंबई दि. १२ – महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मालिका दिवसेंदिवस वाढतच आहेत. सरकारला मात्र याची तसूभरही चिंता नाही. अश्या असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही अशी घोषणा करत आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आज भाजपाने मुंबई येथे दादर चौपाटी ते चैत्यभूमी असा मोठा मोर्चा काढला.
राज्यातील माता भगिनींचा आवाज कुंभकर्णरुपी झोपलेल्या ठाकरे सरकारपर्यंत पोहचविणे व या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले. या सरकारला विद्यार्थ्यांची चिंता नाही, शेतकरी, श्रमिक, दलित, पीडित व्यक्तींची चिंता नाही. या सरकारला महाराष्ट्रातल्या माता-भगिनींचीही चिंता नाही म्हणून शरमेने मान खाली जाते अशी टिका करतानाच महिला अत्याचारांच्या घटना रोखल्या पाहिजेत आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी या मोर्चाच्या वतीने केली आहे
राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
मुंबई येथे शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा काढलेल्या मोर्चात खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनिल राणे,आमदार तमिल सेल्वन, आमदार मनिषा चौधरी, आमदार विद्या ठाकूर, चित्रा वाघ यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदि सहभागी झाले होते.

अभिनेत्री खुशबूचा कॉंग्रेसला टाटा अन भाजप प्रवेश

0

नवी दिल्ली -अभिनेत्री ते राजकीय नेत्या असा प्रवास करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसला रामराम देऊन भाजपात प्रवेश केला आहे. सोमवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्या म्हणाल्या की, ‘कालांतराने मला समजले की, देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीची आवश्यकता आहे.’

काँग्रेस पक्षातील दिग्गजांवर लावले आरोप
राहुल गांधींच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणा-या खुशबू यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता. “पक्षामध्ये वरिष्ठ स्तरावरील काही व्यक्ती, ज्यांचा जमिनीवरील परिस्थितीशी काहीही संबंध नाही, ते निर्णय घेत आहेत. माझ्यासारख्या लोकांना पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, पण आमचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न होतोय” असे खुशबू सुंदर यांनी पत्रात म्हटले होते.

2014 मध्ये केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश
खुशबू सुंदर सहा वर्षे काँग्रेसमध्ये होत्या. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी 2010 साली त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम
खुशबू सुंदर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठया स्टार आहेत. त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1980 मध्ये ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्या ‘लावारिस’ (1981), ‘कालिया’ (1981), ‘नसीब’ (1981), ‘बेमिसाल’ (1982), ‘मेरी जंग’ (1985), ‘तन बदन’ (1986) आणि ‘दीवाना मुझसा नहीं’ (1990) या चित्रपटांमध्ये झळकल्या.

कृषी कायद्यांमुळे सामान्य शेतकऱ्यांचा फायदा होणार -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

0

चौफुला-मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. या कायद्याच्या विरोधात राजकीय हेतूंनी सुरु असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भाजपाने शेतकरी संपर्क मोहीम सुरु केली आहे. सामान्य शेतकरी या कायद्याविरोधातील अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. नव्या कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा किसान मोर्चातर्फे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आयोजित केलेल्या वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर यात्रा कार्यक्रमात मा. पाटील बोलत होते. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे , यात्रेचे संयोजक , किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेवनाना काळे , आ . राहुल कुल , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. मा. पाटील म्हणाले की , मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. मात्र यामुळे बाजार समित्यांवरील अवलंबून असणाऱ्या अनेक हितसंबंधी मंडळींचे अर्थकारण बिघडणार आहे. म्हणून या कायद्याविरोधात ओरड सुरु झाली आहे. या कायद्याचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने शेतकरी संपर्क मोहीम हाती घेतली आहे. शिवार संवाद सारख्या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना या कायद्याचे फायदे समजावून सांगितले जातील. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री डॉ . अनिल बोन्डे यांनी नव्या कृषी कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत शेतीचे उत्पादन वाढविण्याबाबत बोलले गेले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबाबत कोणीच बोलत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने या कायद्याच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कोठेही आपला शेतीमाल विकता यावा यासाठी मनमोहन सिंग सरकारने कायद्याचे प्रारूप तयार केले होते. या बाबत नेमलेल्या राज्यांच्या समितीचा तेंव्हाच पणन मंत्री म्हणून मी प्रमुख होतो. आता मात्र काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी या कायद्यांना विरोध करत आहेत. यावेळी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात अंकुश शेंडगे आणि अंकिता बारवकर यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कामगारांचा पगारासाठी कारखान्यासमोर ठिय्या

0

शिरूर : गेल्या आठ महिन्यांपासूनचा पगार मिळावा या व इतर मागण्यांसाठी न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी आज काम बंद ठेवून कारखान्यासमोर ठिय्या दिला. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार यावेळी कामगारांनी केला.कामगार नेते महादेव मचाले, आत्माराम पवार, सुनिल जगताप, शिवाजी कोकडे, यशवंत शेंडगे, शिवाजी शेंडगे, कांतीलाल साळुंके आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बहुतांश कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे कारखान्याचे दैनंदीन कामकाजही काहीसे विस्कळीत झाले. पगार मिळण्याच्या मागणीसाठी कामगार सकाळीच कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळ आलेत्यानंतर तेथेच ठिय्या मारला. कारखाना प्रशासनाशी कामगार प्रतिनिधींची दोन वेळा चर्चा झाली, परंतू सायंकाळी उशिरापर्यंत त्यातून मार्ग निघू शकला नाही.

घोडगंगाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना कामगारांनी दिलेल्या निवेदनात, सात महिन्यांचा पगार मिळावा, पगारवाढीच्या १५ टक्के फरकाची रक्कम (माहे जुलै २०१५ ते मे २०१७) मिळावी, रिटेन्शन अलाऊंन्स मिळावा, भविष्य निर्वाह निधीची नोव्हेंबर २०१९ पासूनची व विमा पॉलिसीची पाच महिन्यांपासूनची़ तसेच कामगार सोसायटी कपातीची रक्कम भरावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

कामगार नेते महादेव मचाले म्हणाले कि,’पगारासह अनेक प्रलंबित मागण्यांबाबत अनेकदा मागणी करूनही दखल घेतली न गेल्याने अखेर सर्वच कामगार एक होऊन आंदोलनात सहभागी झाले. कर्मचाऱयांना २०१५ पासून ओव्हर टाईमची रक्कम दिली नाही. ड्रेस कोड दिला तथापि चार वर्षापासून नवीन कपडेच मिळालेले नाहीत. कर्मचाऱयांच्या पगारातून कपात केलेली इतर बॅंकांच्या कर्जाची रक्कम वर्ग केली जात नाही. सामान्य कामगारांच्या मागण्यांबाबत कारखाना प्रशासनाने सहानुभूतीने विचार करावा’

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालकप्रवीण शिंदे म्हणाले कि,’ कामगारांच्या पगाराबाबत कारखाना प्रशासन गंभीर आहे. त्यासाठी प्राधान्याने नियोजन केले जात आहे. तथापि, कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बॅंकांकडील कर्ज मिळण्यात उशिर झाला. शिवाय कारखाना प्रशासनातील दहा कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा झाल्याने दैनंदीन कामकाज विस्कळीत झाले. या अचानकच्या अडचणींतूनही मार्ग काढला असून, आज – उद्याच पगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे’

कारखान्याच्या अध्यक्षांची भूमिका

सद्यस्थितीत साखर कारखानदारी अडचणीत असून, याला यापूर्वीच्या भाजप सरकारची धोरणे कारणीभूत आहे. कारखानदारी समोरील अडचणीत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखानाही अपवाद नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून कारखान्यांचे प्रश्न मार्गी लागत असताना आणि कारखानदारी पुन्हा उभारी घेत असताना कामगारांनी संयमी भूमिका घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले.

पगार व इतर मागण्यांसाठी कामगारांनी चर्चेऐवजी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याबद्दल ॲड. पवार यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “घोडगंगाने मोठी गुंतवणूक करून सहवीजनिर्मीती प्रकल्प उभारला. परंतू, यापूर्वीच्या सरकारने वीजखरेदीचा करार करण्यास उशीर केल्याने कारखान्याचे मोठे नूकसान झाले. कर्जाचे हप्ते वेळेत जाऊ शकले नाहीत आणि व्याजाचा मोठा भूर्दंड कारखान्याला सहन करावा लागला. आता अजितदादांनी पुढाकार घेतल्याने कारखानदारी पूर्वपदावर येत आहे. दादांच्या माध्यमातूनच राज्य सहकारी बॅंकांनी कारखान्याला कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यातून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठीच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यातून शेतकी खात्याला प्रथम निधी देताना उसतोड कामगारांना ॲडव्हान्स द्यावा लागणार आहे. कामगारांचे पगार देखील दिलेच पाहिजे. त्यात टप्प्याटप्प्याने मार्ग काढताना काही रक्कम लगेचच दिली जाईल. परंतू त्यासाठी आततायी भूमिका घेऊन आपली रोजीरोटी असलेल्या संस्थेसमोर ठिय्या देणे चूकीचे आहे. कामगारांनी संयम ठेवून प्रशासनाशी चर्चा करावी.”

पवार पुढे असेही म्हणाले की, कारखाना सुरू होणे, सुस्थितीत चालणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. प्राधान्य कशाला द्यावे लागणार आहे, हे देखील सुजाण कामगार वर्गाला माहिती आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत कुणीही चूकीची भूमिका घेऊ नये. आपल्या घरातील प्रश्न आपण घरात बसून सोडवू. चव्हाट्यावर मांडून नव्हे़; तर आपापसातील समन्वयातून ते सुटणार आहेत.”

नऱ्हे परिसरात 15 ठिकाणी भूमिगत वाहिन्या तोडल्या; वीजपुरवठा विस्कळीत

0

पुणे,  : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाकडून (पीएमआरडीए) सुरु असलेल्या नऱ्हेमधील अभिनव कॉलेज परिसरातील रस्त्याच्या खोदकामामध्ये गेल्या आठ दिवसांत महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या 15 ठिकाणी वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. परिणामी या परिसरातील सुमारे 600 ते 700 वीजग्राहकांचा दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच महावितरणची वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासह रुंदीकरणाचे काम सुरु आहे.

याबाबत माहिती अशी, की महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरात पीएमआरडीएकडून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी खोदकाम सुरु आहे. यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दररोज दोन ते तीन प्रमाणे आतापर्यंत एकूण 15 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. या परिसरात सुमारे 500 ते 600 निवासी सोसायट्या आहेत. परंतु खोदकामात वीजवाहिन्या तोडल्या जात असल्याने दररोज 3 ते 4 सोसायट्यांचा वीजपुरवठा खंडित होत आहे आणि त्याचा सुमारे 600 ते 700 वीजग्राहकांना फटका बसत आहे. भूमिगत वाहिन्या तोडल्यानंतर पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. तसेच ग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. यासोबतच वीजग्राहकांचा महवितरणला रोष सहन करावा लागत आहे.

वस्तुतः रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण व रुंदीकरणाच्या कामात मध्यभागी येणारे वीजखांब, वाहिन्या, रोहित्र आदी वीजयंत्रणा स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमाप्रमाणे पीएमआरडीएकडून महावितरणकडे प्रस्ताव पाठविणे आणि महावितरणकडून देण्यात आलेल्या इस्टिमेटप्रमाणे कंत्राटदार नेमून वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याची जबाबदारी पीएमआरडीएची आहे. मात्र सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्त्याचे कामे सुरु आहेत. त्यातच दररोज भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या जात असल्याने वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महावितरणकडून पीएमआरडीएला कळविण्यात आले आहे. खोदकामाची रितसर परवानगी घेतल्यानंतर संबंधीत कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांना खोदकामातून धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. मात्र कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता खोदकाम होत असल्याची स्थिती अद्याप कायम आहे.

बेजाबदार रिपोर्टिंग करणाऱ्या माध्यमांनविरुद्ध बॉलीवूडची दिल्ली उच्च न्यायालयात धाव.

0
  • आमिर खान प्रोडक्शन्स, ,अजय देवगण फिल्म्स,धर्मा प्रोडक्शन्स,रेड चिलीज एंटरटेनमेंट यांच्या सह ४० कंपन्यांचा सहभाग.

दिल्ली -सुशांत सिंग राजपूत प्रकरणा नंतर बॉलीवूड विरुद्ध उठलेला धुराळा अद्याप खाली बसण्याचे नाव घेत नाही . बॉलीवूड हि आमली पदार्थांची कर्मभूमी असून तिला बदनाम करण्याचे प्रकार विविध वृत्तवाहिन्या व सोशल मीडियातून करण्यात आले . या प्रकारामुळे बॉलीवूड मधील अनेक निष्कलंक कलावंत खडबडून जागे झाले असून बेजाबदार रिपोर्टिंग करणाऱ्या माध्यमे तसेच सोशल मीडियावर बेजबाबदारपणे बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात बॉलीवूडमधील 4 निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

बॉलीवूड संबंधित लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करुन मीडिया ट्रायल्स थांबवाव्यात अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. ज्या लोकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम, 1994 हा कायदा लागू होतो. त्यांनी जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे तो काढून टाकावा असं तक्रारीत म्हटलं आहे.

बॉलीवूड गलिच्छ आहे, तेथे घोटाळे होतात, ते नशा करतात, बॉलीवूडमधली घाण साफ करण्याची गरज आहे. अरेबियातली सगळी अत्तरं ओतली तरी बॉलीवूडमधली घाण आणि दुर्गंधी साफ होणार नाही, भारतातली ही सर्वांत घाणेरडी इंडस्ट्री आहे? कोकेन आणि एलएसडीमध्ये बॉलीवूड बुडालं आहे… अशा प्रकारची वक्तव्यं या माध्यमांतून झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या तक्रारदार लोकांमध्ये बहुतांश प्रसिद्ध लोकांची नावं दिसून येतात

द प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया,द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन,द फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सील,स्क्रीनरायटर्स असोसिएशन,आमिर खान प्रोडक्शन्स,अॅडलॅब्स फिल्म्स,अजय देवगण फिल्म्स,आंदोलन फिल्म्स,अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क,अरबाझ खान प्रोडक्शन्स,आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स,बीएसके नेटवर्क अँड एंटरटेनमेंट,केप ऑफ गुड फिल्म्स,क्लीन स्टेट फिल्म्स,धर्मा प्रोडक्शन्स,एमी एंटरटेनमेंट अँड मोशन पिक्चर्स,एक्सेल एंटरटेनमेंट,फिल्मकार्ट प्रॉडक्शन्स,होप प्रॉडक्शन,कबिर खान फिल्म्स,Luv फिल्म्स,मॅगफिन पिक्चर्स,नडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट
वन इंडिया स्टोरीज,आर. एस. एंटरटेनमेंट,राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स,रेड चिलीज एंटरटेनमेंट,रिलायन्स बिग एंटरटेनमेंट,रिल लाइफ प्रोडक्शन्स
रोहित शेट्टी पिक्चर्स,रॉय कपूर प्रॉडक्शन्स,सलमान खान व्हेंचर्स,सोहेल खान प्रॉडक्शन्स,सिख्या एंटरटेनमेंट,टायगर बेबी डिजिटल,विनोद चोप्रा फिल्म्स
विशाल भारद्वाज फिल्म,यशराज फिल्म्स, डीएसके लिगल कंपनीने फिर्यादींतर्फे तक्रार दाखल केली आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 52 हजार 91

0

पुणे विभागातील 4 लाख 8 हजार 495 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 73 हजार 341 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.12 :- पुणे विभागातील 4 लाख 8 हजार 495 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 73 हजार 341 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 52 हजार 91 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 6 हजार 864 रुग्णांपैकी 2 लाख 68 हजार 526 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 31 हजार 282 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 611 रुग्णांपैकी 33 हजार 533 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 847 रुग्णांपैकी 30 हजार 282 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 171 रुग्णांपैकी 35 हजार 383 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 268 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 848 रुग्णांपैकी 40 हजार 771 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 527 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 703 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 720, सातारा जिल्ह्यात 316, सोलापूर जिल्ह्यात 256, सांगली जिल्ह्यात 277 तर कोल्हापूर जिल्ह्यात 134 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 5 हजार 13 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 790 ,सातारा जिल्हयामध्ये 422, सोलापूर जिल्हयामध्ये 260, सांगली जिल्हयामध्ये 546 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 995 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 20 हजार 294 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 73 हजार 341 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार; वाळू व्यवसायिक जखमी

0

पुणे-  काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदिवसा गोळ्या घालून बिल्डरची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यवसायिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.अगोदरच शहरात मटका बेकायदा दारू धंदे ,चोऱ्या माऱ्या यांनी थैमान घातले असताना आता बराच अवधी बंद पडलेला फायरिंग चा ट्रेंड पुन्हा सुरु झाल्याचे जाणवत आहे.

मयुर हांडे (वय 32) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्राथमिक माहितीनुसार जखमी मयुर हांडे हे वाळू व्यावसायिक आहेत. बांधकामासाठी लागणारी वाळू पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. आज दुपारच्या सुमारास ते वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकातून जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिस आणि गुन्हे शाखेचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार — अमित देशमुख

0

मुंबई दि. 12 : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

दादासाहेब फाळे चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांना करण्यात आले. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालिका आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, आज मुंबई देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्हयांमध्ये विविध माध्यमांसाठी चित्रीकरण सुरु असते. अशा वेळी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. या योजनेच्या विस्तारीकरणामुळे अधिकाधिक चित्रीकरण महाराष्ट्रात होऊ शकेल. येणाऱ्या काळात या योजनेचे विस्तारीकरण करताना पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयात करण्याबाबतचा विचार करण्यात यावा. आणि याठिकाणी ही योजना अंमलात आणली गेल्यावर उर्वरित महाराष्ट्रातही एक खिडकी योजना राबविण्यात येईल.

राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.त्यांच्या चित्रिकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी (Ease of doing business)चित्रिकरणासाठीच्या आवश्यक असणाऱ्या 30 हून अधिक परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी सात दिवसांच्या आत देण्यात येते. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या परवानगी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत असून निर्मात्यांना अटी शर्तीचे पालन करुन तसेच चित्रीकरणासाठी शुल्क भरुन परवानगी देण्यात येते.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

0

मुंबई, दि. 12 – मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल  घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणेकरून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असे निर्देश त्यांनी दिले.

अखेर मुंबईची वीज सेवा पूर्ववत! ग्रीड फेल्युअरमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह अनेक भागात झाला होता वीजपुरवठा खंडीत

0

ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला.

कोणकोणत्या भागात वीज गायब?

  • दादर
  • लालबाग
  • परळ
  • प्रभादेवी
  • वडाळा
  • ठाणे
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • बोरिवली
  • मालाड
  • कांदिवली
  • पेण
  • पनवेल
  • उरण
  • कर्जत
  • खालापूर

या बाबत बेस्ट इलेक्ट्रिसिटीने ट्विटमध्ये असे म्हटले की, टाटाकडून येणार्‍या विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे शहरातील कार्यालये, लोकल रेल्वे ठप्प झाली असून रुग्णालयांनाही याचा फटका बसला आहे. ग्रिड बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असल्याची पुष्टी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट [बेस्ट] च्या प्रवक्त्याने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 400 केव्हीची लाइन खराब झाली आहे. यामुले एमआयडीसी, पालघर, डहाणू भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झाला. राज्य सरकारने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपडेट्स…

  • वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईतील कॉलेजमध्ये सोमवारी होणाऱ्या अंतिम वर्षांच्या ऑनलाइन परीक्षा स्थगित करण्यात आल्या.
  • मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणारी सुनावणी देखील थांबवण्यात आली.
  • मुंबईच्या रुग्णालयांतील वीजपुरवठा गेल्यामुळे व्यवस्था ढेपाळली. शहरातील 6 कोविड रुग्णालयांत जनरेटरद्वारे काम सुरू करण्यात आले.
  • राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

शाळा सुरु झाल्यानंतर’एसएमएस’स्वच्छतेचे;पालन अधिक गरजेचे

0

लॉकआउटनंतरची शाळा व्यवस्थापन प्रणाली’वर आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर 
पुणे : “वेगाने संसर्ग होणाऱ्या कोरोनामुळे आपले नियमित जीवन विस्कळीत झाले. जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत. ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत सुधारित जीवन क्रम स्वीकारताना आपली दमछाक होते आहे. जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळा ऑक्टोबर उलटला तरी कधी सुरु होतील, याबाबत स्पष्टता नाही. पण शाळा सुरु झाल्या, तर सॅनिटाझर, मास्कचा वापर, सोशल डिस्टेनसिंग (एसएमएस) आणि शाळा परिसर,वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, संबंधित सर्व घटकांची स्वच्छता याचे काटेकोरपणे पालन करणे अधिक गरजेचे असणार आहे,” असा सूर ‘लॉकआउटनंतरची शाळा व्यवस्थापन प्रणाली’वर आयोजित कार्यशाळेत निघाला.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व ‘मार्गदर्शक पुस्तिका कोविड लॉक आउट नंतर मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली’ या पुस्तकाचे लेखक प्रा.राजेंद्रकुमार सराफ, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ सुजाता कोडग, वैद्य प्रशांत सुरु,शिक्षणतज्ज्ञ डॉ. मिलिंद नाईक यांनी मार्गदर्शन केले. शाळा उघडल्यानंतर व्यवस्थापन, पालक, विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मनातील भीती,दडपण यासह त्यांच्या आरोग्याचा धोका, कोविड संक्रमणाचे केंद्र शाळा होऊ नये, शाळा ते घर या प्रवासातील सुरक्षितता अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.

डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, “हळूहळू एकेक गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. मात्र, शाळा सुरु करण्याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. काही देशांनी आधी शाळा सुरु केल्या व मग इतर गोष्टी सुरु करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जागृती केली. परंतु, आपल्याकडील परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. तेव्हा त्याला लक्षात घेऊन आपल्याला शाळा सुरु करताना सुविधांची निर्मिती करावी लागेल. व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना चांगले आणि सुरक्षित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यादृष्टीने अनेक शाळा प्रयत्नही करत आहेत. पालकांनी मनातील नाहक भीती काढून काळजीपूर्वक आपल्या पाल्याना शाळेत पाठवले, तर शाळादेखील सर्व प्रकारची काळजी घेऊन शिक्षण पुन्हा सुरु करण्यास तयार आहेत.”

प्रा. राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, “प्रवेशद्वाराजवळ नोंदणी, तपासणी कक्ष उभारावे लागतील. स्पर्शविरहित हातपाय धुण्यासाठी व्यवस्था,दफ्तरविरहित शाळा, विलगीकरणाची सोय उभारावी लागेल. मास्कचा वापर अनिवार्य करावा लागेल. चक्राकार उपस्थिती, मोकळ्या जागेतील वर्ग सुरु करण्यासह सणवार, सामूहिक प्रार्थना, खेळ याविषयी नियोजन करावे लागेल. वर्गात गुंतवून ठेवावे लागेल. पुस्तकविरहित आधुनिक शिक्षण तंत्राचा वापर वाढवावा लागेल. शुद्ध हवा, पाणी, स्वच्छ परिसर,उपयुक्त औषधी, स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध कराव्या लागतील. ग्रामीण व छोट्या शाळेचे प्रश्न हे वेगळे आहेत व त्याकरता विशेष विचार करावा लागेल. शिक्षक हे समाजाला आदरणीय आहेत व ते नवीन व्यवस्थापन प्रणाली सर्व भागधारकांच्या सहकार्याने सहज अमलात आणू शकतील ” 
“कोरोनाच्या या महामारीत शाळा अधिक जोखीम असणाऱ्या आहेत. शाळा सुरु होण्यापुर्वी आपत्ती व्यवस्थापन योग्यरीत्या करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. स्पर्शविरहित पाण्याचा वापर, सॅनिटायझर स्टॅन्ड, अंतर राखण्यासाठी बैठक व्यवस्था करावी लागेल. मोकळ्या जागेत शाळेचे वर्ग भरविण्याचा चांगला पर्याय आहे. त्यासाठी शाळेकडे मोकळी जागा हवी. शाळेशी संबंधित सर्व घटकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोविड समिती’ची स्थापना हवी. विद्यार्थी-शिक्षक वेगवेगळ्या भागात राहतात. त्यांची मानसिकता तयार करणेही तितकेच गरजेचे आहे,”असे मत सुजाता कोडग यांनी मांडले.

वैद्य प्रशांत सुरु म्हणाले, “शिक्षकांना शाळा व्यवस्थापनाशी समन्वय ठेवून स्वतःची काळजी घेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचे आहे. सोबतच त्यांना या धोक्यापासून दूर ठेवायचे आहे. शाळेचे नियमित निर्जंतुकीकरण करावे लागेल. वर्गातील बसण्याची व्यवस्था वर्तुळाकार करावी लागेल. विद्यार्थ्यांना वर्गात बसताना  एकमेकां पासून अंतर ठेवावे लागेल. मुलांच्या हाता पायाची स्वच्छता, वापरण्याचे व पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसरात चिखल होणार नाही,याची काळजी घेणे आदी गोष्टी कराव्या लागतील.”

प्रा सराफ यांनी लवकरच या कार्यशाळेच्या आधारावर मार्गदर्शक पुस्तिका कोविड लॉक आउट नंतर शाळा व्यवस्थापनाची नवीन प्रणाली लिहूण प्रकाशित करण्यात येईल असे सांगितले. या कार्यशाळेत १०० च्यावर शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सहभागी शिक्षक शाम धुमाळ, श्रीमती मीनाक्षी पवार, श्रीमती अश्विनी भुजबळ, राजेश तायडे, अभयकुमार वनकर, श्रीमती सुनिता थोरात व श्रीमती शामला देसाई इत्यादिनी आपली मते सूचना व प्रश्न सांगितलेत व त्यावर चर्चा झाली. प्रा. विनय र र यांनी समारोप केला.

महिलांवरील अत्याचार… आता, भाजपचे महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन

0

महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

पुणे-
राज्यात महाविकास आघाड सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनयभंग, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या घटना घडत आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सरकारला झोपू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला अत्याचाराविरोधात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखालील ‘आक‘ोश’आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री. पाटील बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, माजी मंत्री अनिल बोंडे, आमदार मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माजी मंंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, दीपक पोटे आरती कोंढरेराजेश येनपुरे, दीपक येनपुरे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, ‘हाथरसची घटना क्लेशदायकच आहे, पण महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अन्याचाराबाबत सरकारने डोळे झाकले आहेत. सरकार महाराष्ट्राला लुटायला बसले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत असंवेदनशील आहे. महिलांवरील गुन्ह्याच्या तपासाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केली, मग राज्य सरकार कायदा करण्यात मागे का आहे.’
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ’मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. गृहमंत्री फ़ोटो सेशनमध्ये व्यस्त आहेत. महिलांवर न्याय द्यायला सरकारला वेळ नाही. खरं तर सरकार स्थापन करण्याचा कौल भाजपला होता. परंतु शिवसेनेने गद्दारी केली. हे तत्वहीन सरकार आहे. सरकारला बदल्या करण्यात स्वारस्य आहे. परंतु महिलांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नाही. या सरकारच्या विरोधात आज शहरात आठ ठिकाणी आंदोलन करण्यात आले.’
खासदार बापट म्हणाले, ‘महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे सरकार राजकारण करीत आहे. महाराष्ट्रात अत्याचार झालेल्या महिलांना भेटायला मंत्र्यांना वेळ नाही. केवळ विरोधी पक्षनेते आणि भाजपचे पदाधिकारी भेटी देऊन धीर देत आहेत. या झोपलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आंदोलन तीव‘ करावे लागणार आहे.’
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे म्हणाल्या, ‘हाथरस येथील घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. परंतु महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात त्या बोलत नाही. राज्यात महिलांना सुरक्षितता देता येत नसेल तर सरकारने खुर्ची खाली करावी.’

कोथरूड मतदारसंघात कर्वे पुतळा येथे आंदोलन झाले. चंद्रकांतदादा पाटील,महापौर मुरलीधर मोहोळ,मेधा कुलकर्णी,पुनीत जोशी उपस्थित होते. शिवाजीनगरमध्ये गुडलक चौक येथे आमदार सिद्धार्थ शिरोळे,
दत्तात्रय खाडे, रवी साळेगावकर यांनी आंदोलन केले.

पर्वतीत उत्सव चौक सातारा रोड येथे उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, जितू पोळेकर यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. हडपसर मुंडवा केशव नगर चौक येथे माजी आमदार, योगेश अण्णा टिळेकर, संदीप दळवी यांच्या उपस्थितीत आंदोलन झालेवडगाव शेरी विमाननगर गणपती मंदिर चौक नर्गसेवक
योगेश मुळीक, संतोष खांदवे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.

निखळ आनंदाचा ‘व्‍यंग कॉर्नर’

0

व्‍यंगचित्र म्‍हणजे नेमकं काय असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो. ‘हसवता-हसवता वाचकाला विचार करायला भाग पाडणे’ हे व्‍यंगचित्राचं महत्‍त्वाचं काम असंही काहींना वाटतं. पण व्‍यंगचित्रांच्‍या अनेक लिखीत-अलिखीत बाबींपैकी ही एक महत्‍त्‍वाची बाब म्‍हणता येईल.   व्‍यंगचित्रकार हे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्‍याने त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांवर त्‍या-त्‍या क्षेत्राचा प्रभाव पडू शकतो. व्‍यंगचित्रकार भरत सावंत मात्र याला अपवाद ठरतात. भारतीय सैन्‍य दलातून निवृत्‍त झालेले सावंत आपल्‍या व्‍यंगचित्रांतून सामाजिक प्रबोधनावर भर देतांना आढळून येतात. त्‍यांचे ‘व्‍यंगकॉर्नर’ हे पुस्‍तक प्रकाशित झालं आहे. यामध्‍ये सव्‍वाशेहून अधिक व्‍यंगचित्रे आहेत. त्‍यांची सैन्‍यदलाची पार्श्‍वभूमी पहाता, या पुस्‍तकात सैन्‍यदलातील शिस्‍त, वक्‍तशीरपणा, धाक, नागरी जीवनाशी जुळवून घेतांना येणाऱ्या अडचणी  यावर आधारित व्‍यंगचित्रे पहावयास मिळतील अशी अपेक्षा होती. ती भविष्‍यकाळात पूर्ण होईल,अशी आशा करुया.

                पुस्‍तकाच्‍या मुखपृष्‍ठावर फेसबुक, व्‍हॉट्सअप आणि ट्वीटर यांना मानवी रुपांत दाखवण्‍यात आले आहे. या ‘थ्री इडियट्स’नी ‘आमचा वापर चांगला केला तर ठीक… अन्‍यथा आम्‍ही थ्री इडियट्स’ असा इशारा दिला आहे. सोशल मिडीया हे दुधारी शस्‍त्र असून त्‍याचा विवेकपूर्ण वापर करण्‍याचा सल्‍ला व्‍यंगचित्रकार भरत सावंत देतात. ‘व्‍यंगकॉर्नर’ या पुस्‍तकात सद्यस्थितीवर मार्मिक टीका करणारी विविध व्‍यंगचित्रे आहेत. हेल्‍मेट जनजागृती, पेट्रोल दरवाढ, जीएसटी, शाळांचे डोनेशन, दप्‍तराचे ओझे, भिकारी, व्‍यसनाधिनता, रस्‍त्‍यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाळणाघर, वृध्‍दाश्रम, राजकारण या विषयांचाही त्‍यात समावेश आहे. निवडणूक मतदान जनजागृतीवरही प्रबोधनपर व्‍यंगचित्रमाला आहे. याशिवाय हिंदी चित्रपट गीतांवरील व्‍यंगचित्रमालाही वाचकांना आवडेल, अशीच आहे.

                भरत सावंत यांना महाविद्यालयात असतांनाच व्‍यंगचित्रांचा छंद जडला. अनेक व्‍यंगचित्रकारांचे प्रेरणास्‍थान असणारे श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार  बाळासाहेब ठाकरे हे त्‍यांचेही आदर्श. ‘कुंचला आणि पलिते’ या व्‍यंगचित्र पुस्‍तकाचाही त्‍यांच्‍यावर खूप प्रभाव पडला. या पुस्‍तकात श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि त्‍यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्‍या व्‍यंगचित्रांचा समावेश आहे. याशिवाय ‘मार्मिक’मधून अनेक व्‍यंगचित्रकारांची व्‍यंगचित्रे पाहून या कलेविषयी आकर्षण निर्माण झाले. ठाण्‍याच्‍या ज्ञानसाधना कॉलेजमधून बारावी पास झाल्‍यावर सावंतांनी जे.जे. स्‍कूल ऑफ आर्टसमध्‍ये जाऊन व्‍यंगचित्रकलेबाबत विचारणा केली. परंतु, तेथे असा काही अभ्‍यासक्रम नसल्‍यानं त्‍यांची निराशा झाली. पण ते नाउमेद झाले नाही. त्‍यानंतर त्‍यांनी व्‍यंगचित्रकारद्वय विवेक मेहेत्रे आणि सुरेश क्षीरसागर यांच्‍याकडून व्‍यंगचित्रकलेचं प्रशिक्षण घेतले. ‘मार्मिक’मध्‍ये 1992 मध्‍ये त्‍यांचे पहिले व्‍यंगचित्र प्रसिध्‍द झाले. त्‍यानंतर सामना, पुढारी, रामप्रहर आणि इतर दैनिकांसह दिवाळी अंकांत प्रसिध्‍द झाले. व्‍यंगचित्रकारिता आणि पत्रकारिता सुरु असतांनाच ते 1994 मध्‍ये भारतीय सैन्‍यात भरती झाले. सैन्‍यात असतांनाही त्‍यांनी आपली कला जोपासली. बंदूक, लेखणी आणि कुंचला या तिन्‍हींवर त्‍यांनी हुकूमत गाजवली. व्‍यंगचित्रे ही निख्‍खळ आनंद व मनोरंजनात्‍मक दृष्टिकोनातून रेखाटलेली असल्‍याचे त्‍यांनी मनोगतातच स्‍पष्‍ट केलं आहे. व्‍यंगचित्रे ही हसता-हसता किंवा नर्मविनोदीपणे व्‍यंगात्‍मक सत्‍य सांगून जात असतात आणि हीच रेषा पकडून ही व्‍यंगचित्रे रेखाटण्‍यात आलेली आहेत. त्‍यांच्‍या वाटचालीत पत्‍नी सौ. आशा भरत सावंत आणि मुलगा यश यांचे खूपच सहकार्य लाभल्‍याचं नमूद करतात. ‘दैनिक सामना’च्‍या ‘मी पाहिलेले बाळासाहेब’ या ऑनलाईन ब्‍लॉग स्‍पर्धेत ‘व्‍यंगचित्रकारांचे भीष्‍म पितामह बाळासाहेब’ या सावंत यांनी लिहीलेल्‍या ब्‍लॉगचा दुसरा क्रमांक आला. त्‍याबद्दलही त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आलं.

                ‘व्‍यंगकॉर्नर’ या पुस्‍तकात शिक्षणपध्‍दतीवर टीका करणारे बेरोजगार जसे भेटतात तसेच पेट्रोलपंपावर काळ्या पाईपाऐवजी पारदर्शक पाईप बसवण्‍याचा आग्रह धरणारा ‘जागरुक ग्राहक’ही भेटतो. चश्‍मा लावलेला नसतांना दिसणारं कमी वजन आणि चश्‍मा लावल्‍यानंतर दिसणारा वाढलेला आकडा यातील तफावत म्‍हणजे चश्‍म्याचं वजन असा सोयीचा अर्थ काढून मनाचं समाधान करणारी महिलाही नकळतपणे  हसवून जाते. लहानपणी बाळाला पाळणाघरात ठेवणारे मॉम-डॅड आणि भविष्‍यात त्‍यांना वृद्धाश्रमात रहावं लागण्‍याची येणारी वेळ वाचकांनाही आत्‍मपरीक्षण करायला लावते. एकूणच हे पुस्‍तक निखळ मनोरंजन करुन वाचकांना अंतर्मुखही करतं.

व्‍यंगचित्रकार- भरत सावंत

मुखपृष्‍ठ रचना – मनोज्ञा मेहेत्रे

प्रकाशक-उद्वेली बुक्‍स, ठाणे

पृष्‍ठं- 116

किंमत- 200 रुपये

राजेंद्र सरग

9423245456/ 9309854982

सहकारनगरमध्ये सुरू केलेल्या आठवडे बाजारास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन

पुणे – शहरातील ग्राहकांना थेट शेतातून ताजी भाजी स्वस्त दरात मिळावी. तसेच कोणत्याही दलाल आणि अडत्याशिवाय शेतकऱ्यांना माल विकता यावा, शेतकऱ्यांचा माल मध्यस्थांविना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने नगरसेवक महेश वाबळे यांनी सहकारनगर, शिंदे हायस्कूल शेजारी, तळजाई रस्ता येथे सुरू केलेल्या आठवडे बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आठवडे बाजाराचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस व एमएनजीएल चे संचालक राजेश पांडे याच्या हास्ते झाले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्रीपादजी ढेकणे उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे पर्वती विधानसभा अध्यक्ष जितेंद्र पोळेकर ,हरिष परदेशी, संगिता चौरे,गणेश लगस,राजेश चिटणीस ,कैलास मोरे ,नितीन लगस,भानुदास ढोबळे ,अशोक ओमबासे हे उपस्थित होते.

या बाजारांमध्ये पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील शेतकरी मालाची विक्री करण्यासाठी आले होते. या शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासोबतच धान्य, कडधान्य आणि फळेही विक्रीसाठी आणली होती यामुळे शहरातील नागरिकांना त्यांचा घराजवळ ताजा शेतमाल मिळू लागला. त्याशिवाय कोणीही मध्यस्थी नसल्याने भाजीपाला आणि धान्याचे दरही कमी होते. त्यामुळे शहरातील नागरिक या बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता दर शनिवारी सकाळी सात ते सायंकाळी सात हा बाजार सुरू राहील असे नगरसेवक महेश वाबळे यांनी सांगितले.

आठवडी बाजार हा केवळ बाजार नसून ही एक चळवळ आहे. या बाजाराला प्रभागातील नागरिकांबरोबरच परिसरातील अनेक ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या बाजारामुळे ग्राहकांना रास्त दरात भाजीपाला व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यास मदत होईल.