पुणे- पत्रकार अर्णव गोस्वामी यांना आज सकाळी राज्य सरकारने अवैध प्रकारे अटक केली.सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दडपशाही करीत असल्याची टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अभिनव चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर सहभागी झाले होते.
मुळीक पुढे म्हणाले, ‘पालघर येथील साधूंची हत्या आणि अभिनेता सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात अर्णव गोस्वामी यांनी स्पष्टपणे आणि ठामपणे प्रश्न विचारून महाविकास आघाडी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले. म्हणून सूडबुद्धीने सरकारने गोस्वामी यांना अटक केली. गेल्या काही दिवसांत पत्रकारांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवून अवैध पद्धतीने अटक करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आणि ४५ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण करून देणारी आहे. राज्यात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करणार्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.’
अवैध मार्गाने अर्णबला अटक ;पुण्यात भाजपची निदर्शने
“ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा, त्याचा सर्व जगावर ताबा!” – डॉ. पी. एन. कदम यांचे मत
पुणे : “ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा, त्याचा सर्व जगावर ताबा!” आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती हि कमी-अधिक प्रमाणात मानसिक दृष्ट्या तणावात असताना, मनो-नियंत्रण आणि दृष्टिकोन बदल कार्यशाळा ही निश्चितच प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. पी एन कदम यांनी केले.
संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कार्पोरेशन तर्फे ‘ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा त्याचा सर्व जगावर ताबा’ याविषयावर जीवनात अमुलाग्र बदल घडवणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात निवडक 25 लोकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसातील पंधरा तासांमध्ये मन म्हणजे नेमके काय? इथून सुरुवात झालेली ही कार्यशाळा दुसऱ्या दिवशी सायंकाळी वर्तणूक थक्क करणाऱ्या प्रयोगापर्यंत पोहोचली होती. तो अनुभव घेणारे प्रशिक्षणार्थी आनंद शिखरावर पोहोचले होते. प्रयोगातून आणि खेळातून शिक्षण मनासारखा क्लिष्ट विषय शास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवत असताना प्रत्येकाला समजेल अशा सोप्या आणि सुलभ भाषेत हसत-खेळत डॉक्टर कदम यांची शिकवण्याची पद्धत हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. असे संकल्प च्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव व रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्या मुख्य शर्वरी डोंबे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अनेक मान्यवरांनी ही दोन दिवसांची कार्यशाळा अनुभवली. सातारा येथील वंडर सायन्सचे डॉ. किरण जोशी, खुशी जोशी, क्रिएटर थ्री चे डायरेक्टर लव शहा आणि कनिष्का शहा, ऊर्जा फाऊंडेशनचे यशवंत आणि प्रनोती शितोळे, तेजस गुजराथी यांनी यात विशेष सहभाग घेतला होता.
जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याचे प्रभावी शास्त्र या दोन दिवसात शिकायला मिळाले, तसेच आनंदी आणि समाधानी राहण्याची गुरुकिल्ली येथे मिळाली असे बहुतांशी प्रशिक्षणार्थींनी सांगितले. चिंता, भिती आणि ताण-तणाव तसेच आत्मविश्वासाच्या अभावाने येणारे नैराश्य, उदासीनता, नकारात्मकता, आत्महत्येचे विचार हे केवळ दोन दिवसाच्या शिबिरात दूर करण्याचा राजमार्ग या कार्यशाळेतून तयार होऊ शकतो असे मानसोपचारतज्ञ कनिषका शहा यांनी सांगितले.
प्रत्येक जोडप्याने सुखी होण्यासाठी हा संकल्प केलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया वोडाफोनचे सिनियर ऑफीसर अमित हंकारे यांनी व्यक्त केली.
‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!…
अलिबाग पोलिसांनी आज सकाळी अर्णब यांना वरळीतील त्यांच्या घरातून अटक केली. त्यांना सध्या अलिबागला नेण्यात आलं आहे. गोस्वामी यांच्यावर झालेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध केला जात आहे. राज्य सरकार सूड भावनेनं वागत असल्याची टीका होत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनीही या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे. त्यातून त्यांनी अर्णब यांचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य ,आम्ही सुडाचं राजकारण करत नाही-खा. संजय राऊत
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
.
‘महाराष्ट्राच्या कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,’ असं राऊत म्हणाले. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अर्णब यांच्या अटकेचं समर्थन केलं आहे. ‘ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय,’ असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्य सरकारविरोधात आंदोलने करा,अर्णबच्या अटकेनंतर भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन
सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला अटक आणीबाणीची आठवण करून देणारी
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही कृती आणीबाणीबातील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे. भारतीय जनता पार्टी या दडपशाहीचा निषेध करते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर दडपशाही करण्याचा भाजपा निषेध करते. संविधानाच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी या प्रसंगी ठाकरे सरकारचा निषेध केला पाहिजे व घटनात्मक चौकटीत आणि कायदेशीर मार्गानेच काम करण्याचा आग्रह धरला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर या अत्याचाराचा निषेध करतील. त्याचबरोबर लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व सुजाण नागरिकांनी आपापल्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध करावा. राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन, उपोषण, सरकारी कामकाजात असहयोग, सोशल मीडियावर आवाज उठवणे, मोर्चा काढणे, अशा शक्य त्या मार्गाने निषेध करावा.
त्यांनी सांगितले की, अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अडचण झालेल्या ठाकरे सरकारने एका वास्तूविशारदाच्या आत्महत्येचे जुने प्रकरण उकरून काढून गोस्वामी यांना अटक केली. खरे तर या प्रकरणाचा तपास 2018 साली बंद झाला होता. राज्य सरकारला पुन्हा तपास करायचा असेल तरी त्यासाठी घटनेची चौकट आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे पालन केलेच पाहिजे. तपासाच्या नावाखाली अत्याचार करणे ही केवळ मुस्कटदाबी आहे.
ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंची हत्या करणे किंवा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण अशा प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी स्पष्टपणे व ठामपणे प्रश्न विचारून ठाकरे सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले होते. एक निर्भिड आणि रोखठोक पत्रकार म्हणून अर्णब गोस्वामी आपले काम करत असताना ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली त्यावेळी सरकारचे अपयश आणि अत्याचार लपविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांवर वरवंटा फिरविण्यात आला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली गेली. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेऊन ठाकरे सरकारने महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरू केली आहे. पत्रकारांना अटक करून खटले दाखल करण्याचे प्रकार या सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठी कोणत्याही घटनेचे निमित्त केले जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेसची आणीबाणीची हुकुमशाही मानसिकता स्वीकारल्याचे दिसते. पंचेचाळीस वर्षांपूर्वी जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला. आजही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करू.
कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही-गृहमंत्री अनिल देशमुख
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या कारवाईवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं आहे. शिवाय, त्यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे.
लोकशाहीला लाज आणणारे कृत्य – अमित शाह
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली असून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राज्यातील नेत्यांकडून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला जात असताना केंद्रातील नेतेही अटकेच्या कारवाईचा निषेध करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे”.
पोलिसांनी मारहाण केल्याचे अर्णबने सांगितले धावत्या पोलीस व्हॅन मधून …
अलिबागला पोलीसांच्या पिंजरा गाडीतून नेताना अर्णब गोस्वामी यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या ए एन आय च्या प्रतिनिधींना खिडकीतून जोरात ओरडून सांगितलाय पोलीअसानी मला मारलाय म्हणून ….
अन्वय नाईकांच्या पत्नीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, अर्णब माझ्या कुटुंबियांचा गुन्हेगार असल्याचे म्हणत मागच्या सरकारने केस दाबून टाकल्याचा केला आरोप
अन्वय नाईक यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ अर्णब गोस्वामीला अटक होण्यापुर्वीचा असल्याचे दिसतेय. यामध्ये त्या म्हणत आहेत की, ‘सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली हे वाईट आहे. अर्णब गोस्वामी यासाठी खूप ओरडतोय. माझ्या सासुबाईच्या आणि नवऱ्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहे. मागच्या सरकारने ही केस दाबून टाकली. या केससंबंधी मी दारोदारी फिरले. अजुनही मला न्याय मिळालेला नाही. मला न्याय कधी मिळणार. अर्णब गोस्वामी हा माझ्या कुटुंबियांचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक ही झालीच पाहिजे. सर्व महाराष्ट्रातील बांधवांना मी विनंती करते की, त्यांनी नाईक कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी. जे लोक सुशांत सिंह राजपूतसाठी ओरडत आहे त्यांनी नाईक कुटुंबियांसाठीही ओरडावे अशी मी विनंती करते.’ असे अन्वय नाईकांच्या विधवा पत्नी यामध्ये म्हणत आहेत.
अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यामध्ये एक सुसाईट नोट आढळून आली होती. या नोटमध्ये अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकवले आहे. यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.
अर्णब गोस्वामीला २०१८ मधील एका आत्महत्येच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांकडून धक्काबुक्की करत अटक;त्यानंतर राजकीय ट्विटर वॉर सुरु
पहा कशी झाली अटक आणि तातडीने कसे झाले ट्विटर वॉर सुरु
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावरुन राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी अन्वय नाईकला न्याय मिळून देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अर्णब यांना अटक झाल्यानंतर धन्यवाद महाविकास आघाडी सरकार असं म्हटलं आहे. त्याचबरोबरच त्यांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅगही वापरला आहे. “अन्वय नाईकला न्याय मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
फडणवीसांची ट्वीटर अस्त्रे धडाडली
गोस्वामी यांच्या अटकेवरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याचं ते म्हणाले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी अटकेच्या कारवाईचा विरोध करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे”.
अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.मुळचे कावीर येथे राहणारे अन्वय नाईक हे मुंबईत व्यवसायानिमित्त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.या आत्महत्येनंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनी दिली होती.
आचारसंहितेमुळे पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या मोटारी जमा !
पुणे- पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहने जमा करण्यात आली आहेत. दरम्यान सायंकाळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरसावती शेंडगे यांनी दुचाकीवरून निवासस्थानापर्यंत प्रवास केला.येत्या 3 डिसेंबर 2020 पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे.त्यानंतर या पदाधिकाऱ्यांना हि परत मिळतील .
राज्य निवडणूक आयोगाकडून पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामध्ये औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, प्रभाग अध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींनी शासकीय वाहने जमा केली आहेत. खासगी गाड्यावरील नामफलक झाकणे बंधनकारक आहे.
१७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पुणे : शहर पोलीस दलातील १७ पोलीस निरीक्षकांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सार्वत्रिक बदल्यांमध्ये पुण्यात बदली झालेल्या ८ निरीक्षकांचा समावेश आहे. काल पर्यंत ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
पोलीस निरीक्षक, सध्याचे ठिकाण व नवीन पद : राम राजमाने (विश्रामबाग) दत्तवाडी वरिष्ठ निरीक्षक, अरुण वायकर (गुन्हे शाखा) सहकारनगर वरिष्ठ निरीक्षक, राजेंद्र पाटील (विशेष शाखा) चंदननगर, वरिष्ठ निरीक्षक, वैशाली चांदगुडे (गुन्हे शाखा) उत्तमनगर, वरिष्ठ निरीक्षक, वैशाली गंलाडे (विशेष शाखा) कोरेगाव पार्क, विजय पुराणिक (सहकारनगर) विशेष शाखा.
पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांची वाहतूक शाखेत करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.
पुण्यात बदलून आलेले पोलीस निरीक्षक : संजय बोटे (वर्धा) वाहतूक शाखा, उल्हास कदम (वर्धा) समर्थ, संजीवन जगदाळे (नानवीज, दौंड) अलंकार, सुनिल थोपटे (सिंधुदुर्ग) चंदननगर, दत्तात्रय भापकर (लाच लुचपत) आर्थिक गुन्हे शाखा, बाळासाहेब बडे (बीड) कोथरुड, प्रमोद गाडे (सोलापूर) वाहतूक शाखा, सावळाराम साळगांवकर (दहशतवाद विरोधी पथक) वानवडी़.
गुन्हे शाखेअंतर्गत करण्यात आलेल्या बदल्या :
शिल्पा चव्हाण -दरोडा व वाहन चोरी पथक, अनघा देशपांडे – प्रशासन, बालाजी पांढरे – खंडणी विरोधी पथक, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे -युनिट २, सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे -युनिट ५, उपनिरीक्षक अमोल गवळी – तपास व अभियोग कक्ष, उपनिरीक्षक शशिकांत शिंदे – युनिट ४, उपनिरीक्षक अनंत पिंगळे – युनिट २, सहायक निरीक्षक सतीश वाळके – आर्थिक गुन्हे शाखा, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर – आर्थिक , गुन्हे शाखा.
डेक्कनवरील जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांचा छापा
पुणे :मटका ,जुगार अशा अविध धंद्यांनी दक्षिण पुणे आणि उपनगरे ,मध्यवस्ती व्यापली असताना आज डेक्कन जिमखान्यासारख्या परिसरास देखील अवैध धंद्यांनी सोडलेले नाही हे स्पष्ट झाले. डेक्कन जिमखान्यावरील मध्यवर्ती ठिकाणी खुले आमपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने छापा घातला. डेक्कन जिमखाना येथील पोरवाल इमारतीत हा अड्डा सुरु होता.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन डेक्कन पोलिसांनी थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुळे या दोघा मालकांसह तेथील १० नोकरांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरात सध्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुुरु आहे. ही संधी साधत हा जुगार अड्डा सुरु करण्यात आला होता. याबाबतची माहिती युनिट १च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुळे यांनी स्वत:च्या फायद्याकरीता १० जणांना नोकर ठेवून रोलेट टेबल, आंदर बाहर यावर पैसे लावून जुगार घेत असताना व ते खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी तेथून जुगाराच्या साधनांसह २० हजार ५० रुपये जप्त केले आहे.
आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड
मुंबई, दि.३: राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २००० व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७.५६ कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
वनांच्या हद्दीतील रस्तेदुरुस्तीची कामे मार्गी लागण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा
मुंबई, दि. 3 : वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यादृष्टीने वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरीचे अधिकार वन विभागाच्या प्रादेशिक तसेच विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी विनंती श्री. जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तत्पूर्वी वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव (रस्ते) बी. एस. पांढरे, उपसचिव (राज्य महामार्ग) राजेंद्र सहाणे, पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल आदी उपस्थित होते. नागपूर येथून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड तसेच पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती येथून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.
वनक्षेत्रातील राज्य महामार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्गांच्या दुरुस्तीच्या परवानगीचे प्रस्ताव सध्या राज्यस्तरावर पाठवावे लागतात. या प्रक्रियेत मोठा वेळ जात असल्यामुळे रस्ते अधिकच खराब होण्यासह दुरुस्तीची कामे रखडतात आणि त्याच्या खर्चात वाढ होते. त्यामुळे हे दुरुस्तीचे अधिकार प्रादेशिक तसेच विभागीय स्तरावर प्रदान केल्यास कामांना गतीने मंजुरी देणे शक्य होईल, अशी भूमिका मांडून यासंदर्भातील प्रस्तावाचा केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे गतीने पाठपुरावा करावा, असे निर्देश राज्यमंत्री श्री. भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
| बैठकीदरम्यानच श्री. भरणे यांनी श्री. जावडेकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत रस्त्यांच्या दुरुस्तीमध्ये येत असलेल्या अडचणींबाबत माहिती देऊन अधिकारांच्या प्रदानाबाबत विनंती केली. त्यावर याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन श्री. जावडेकर यांनी दिले. |
त्याचबरोबर सध्याचे वनक्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव मुख्य अभियंत्यांनी एकत्रित करून पाठविल्यास त्यांना एकदमच प्रशासकीय मान्यता देता येईल का याबाबत विचार करण्यात येईल. त्यासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. भरणे यांनी दिले.
