Home Blog Page 2400

‘अर्नब इज बॅक ’… आशिष शेलार

0

कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानले आहेत. ट्विट करत त्यांनी न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “धन्यवाद आदरणीय सुप्रीम कोर्ट…कायद्याचं राज्य कायम आहे. न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही”. आशिष शेलार यांनी यावेळी #Arnabisback हा हॅशटॅगही दिला आहे.

 अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही अंतरिम जामीन देण्यात आला आहे. ५० हजारांच्या जामिनावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढे सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलं. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

येवलेवाडी, पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये शिवभोजन थाळी सुरू

0

मुंबई, दि. 11 : पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी, पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजून घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. त्यानुसार येवलेवाडी पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत 1 नोव्हेंबरपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी, पिसोळी येथे चार ते साडेचार हजार कुष्ठरोग्यांची वसाहत आहे.  याठिकाणी कुष्ठरोग्यांना शिवभोजन थाळी सुरू करण्यासंदर्भात माजी सरपंच मच्छिंद्र दगडे व  सामाजिक कार्यकर्ते  डेव्हिड वंगार हे वर्षभर प्रयत्न करत होते. कुष्ठरोग्यांना हाताने स्वयंपाक करता येत नसल्यामुळे त्यांना तयार जेवण उपलब्ध होणे आवश्यक होते. विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या वसाहतीत शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात कळविले. त्यानंतर येथील वसाहतीत शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. पुण्याचे  जिल्हा  पुरवठा अधिकारी यांनाही  यासंदर्भात निर्देश देण्यात आले.

शिवभोजन  थाळी  सुरू करण्यात आल्यामुळे कुष्ठरोग्यांची मोठी सोय झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड वंगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत.

शुभेच्छांसाठी केवळ सोशल मिडीया वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0

मुंबई दि ११: दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत: देखील केवळ सोशल मिडीया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे , घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहे हे विसरू नका.
युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. त्याठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधन सामुग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडताहेत. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल हे ध्यानी घ्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी , पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, तुमचा -आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे कृपया विसरू नका एवढीच विनंती. त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. या कर्मचाऱ्यांत आपली आई , वडील, भाऊ बहिण, नातेवाईक, मित्र कुणीही असू शकते. त्यांच्यावरचा ताण न वाढू देणे आणि घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला प्राधान्य द्या.

हा सण मोठा असला तरी आपल्या परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात कोरोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल. त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे उत्साह दाखवतांना त्यांचाही विचार मनात राहू द्या असेही मुख्यमंत्री म्हणतात.
आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता या हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या हा सण साजरा करू शकते. हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या,ज्यांना शक्य आहे त्यांना अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणे, संगीत तसेच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मी यांच्यासाठी उघडा , कोरोनासारख्या रोगासाठी नव्हे असे देखील मुख्यमंत्री म्हणतात.

बेरोजगार तरुणीचे पालकत्व स्वीकारत मनसे उमेदवार रुपाली पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

0

पुणे, 11 नोव्हेंबर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदार संघातील अधिकृत उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात एका बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने विधानभवन येथे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. रुपाली पाटील यांनी सोशल डिस्टनसिंगचे नियम पालन करत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

सध्या बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला असताना केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष त्याच्या सोडवणुकीसाठी काहीच पावले उचलताना दिसत नाहीत. त्यामुळे बेरोगारीच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रुपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

अनुराधा घुगे या बेरोजगार तरुणीचे पालकत्त्व स्वीकारत तिच्या हस्ते उमेदवारी अर्ज भरीत त्यांनी सर्वच बेरीजगार पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसासाठी पदवीधर सन्मान योजना लागू करावी, सर्वच शिक्षण संस्थांमध्ये कमवा व शिका योजना राबवावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.

बेरोजगार तरुणी अनुराधा घुगे म्हणाली, माझे आई-वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. खूप काबाडकष्ट करून त्यांनी मला शिक्षण दिले. मात्र आता इतके उच्च शिक्षण घेतल्यानंतर ही कुठेही नोकरी मिळत नाहीय. आज
उतारवयात माझ्या आई-वडिलांची त्या कामातून सुटका करण्याची जबाबदारी माझी होती, मात्र नोकरी मिळत नसल्याने मी त्यांच्यावर भार बनले आहे. ताईंनी मला नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. माझ्याप्रमाने सर्वच पदवीधरांसाठी त्या चांगले काम करू इच्छित आहेत, तरी सर्व पदवीधरांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे.

पदवीधरांच्या प्रश्नासाठी भाजपाचे उमेदवार विधानपरिषदेत एकजुटीने काम करतील

0

प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील याची ग्वाही

पुणे- पदवीधरची जागा केवळ एक अपवाद वगळता परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाची राहिली आहे. गेल्या १२ वर्षात पदवीधरांच्या विषयात बरेच काही केले. आगामी काळातही पदवीधरांचे प्रश्र्न सोडवण्यासाठी भाजपाचे उमेदवार काम करतील, अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे संग्राम देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर श्री. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, रणजित पाटील, सिद्धार्थ शिरोळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप कांबळे, बाळा भेगडे, उपमहापौर सरस्वती शेडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी,योगेश टिळेकर, अमल महाडिक, , विलास मिथगिरी, शहर संघटन मंत्री राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, पुणे पदवीधरची जागा परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाचीच राहिली आहे. गेली १२ वर्षे मी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या काळात पदवीधरांचे अनेक प्रश्र्न सोडवले. यात प्रामुख्याने यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी राज्य स्तरावर मार्गदर्शन केंद्र सुरू करावेत, यासाठी पाठपुरावा करुन हा विषय मार्गी लावला. मी स्वत: कोल्हापूरमध्ये विद्याप्रबोधिनी नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. त्याचबरोबर पदवीधर मतदार याद्यांचा जो घोळ सातत्याने व्हायचा, त्यासाठी दिल्लीत जाऊन या विषयाची सोडवणूक केली.

ते पुढे म्हणाले की, संग्राम देशमुख यांच्यासह भाजपाचे तीन पदवीधर उमेदवार आणि अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार हे सर्वजण शिक्षकांच्या आणि पदवीधरांचे प्रश्न मांडतील. तसेच आगामी काळात आरक्षणातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार भत्ता सुरू करणे, अंतरवासिता कायदा (अॅप्रन्टिसशीप अॅक्ट)मध्ये सुधारणा करून घेणं आदी विषयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार सर्वांना सोबत घेऊन काम करतील.

अर्णब यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; महाराष्ट्र सरकारला फटकारले

0

सरकारने जर कोणाला लक्ष्य केले तर आम्ही त्याच्या संरक्षणासाठी आहोत; सर्वोच्च न्यायालयाने उद्धव सरकारला फटकारले

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जस्टिस चंद्रचूड़ यांच्या बेंचने अर्णब आणि इतर दोघांना 50 हजार रुपयांच्या बॉण्डवर अंतरिम जामी मंजूर केला. तसेच, कोर्टाने पोलिस आयुक्तांना जामीन आदेश तत्काळ कार्यान्वित करण्यास सांगितले.

यासोबतच, कोर्टाने उद्धव सरकारला फटकारले की, जर राज्य सरकारांनी एखाद्या व्यक्तीला लक्ष्य केले तर त्यांना असे वाटले पाहिले की, आम्ही (सर्वोच्च न्यायालय) त्यांचे रक्षण करू.

दरम्यान, ‘अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी,’ असा युक्तिवाद गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या वतीने युक्तिवाद करताना हरिश साळवे म्हणाले की, ‘अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे, त्यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली, अशीही शंका आहे,’ असे हरीश साळवे म्हणाले.

या अटींवर मिळाला जामीन

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, अर्णब गोस्वामी आणि इतर दोघे पुराव्यांशी छेडछाड करू शकणार नाहीत. यासोबतच त्यांना या प्रकरणातील तपासात पूर्ण सहयोग करावा लागेल.

कोर्टाच्या 5 कडक टिप्पण्या

> आपली लोकशाही कमालीची लवचिक आहे. महाराष्ट्र सरकारने या सर्वांकडे दुर्लक्ष करायला हवे.

> एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अंकुश ठेवल्यास ते न्यायाचे दडपण असेल.

> महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात कस्टडीत घेऊन चौकशी करण्यात गरज आहे काय?

> आपण वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मुद्द्याशी झगडत आहोत.

> जर घटनात्मक न्यायालयांनी हस्तक्षेप केला नाही तर आपण विनाशाच्या मार्गावर आहोत.

मुख्यमंत्र्यांना अटक करणार का ?

युक्तिवादादरम्यान अर्णब आणि अन्वय नाईक यांचा थेट काहीही संबंध नव्हता, असे साळवे यांनी म्हटले आहे. ‘मागच्या महिन्यात महाराष्ट्रामधील एका व्यक्तीने आत्महत्या केली. यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांमुळे आपल्याला वेळेत पगार मिळाला नाही असे म्हटले होते. मग तुम्ही काय मुख्यमंत्र्यांना अटक करणार?,’ असा प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला. यासोबतच, साळवे यांनी अर्णब आणि अन्वय यांच्यामध्ये कोणतेही खासगी संबंध नसल्याचेही सांगितले आहे. एखाद्या कराराच्या आधारावर आत्महत्येला प्रोत्साहन दिले असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवादही त्यांनी यावेळी केला.

काय आहे प्रकरण?

2018 मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्याच्या आईला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपात अर्णब आणि इतर दोन जणांना रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. नंतर कोर्टाने त्यांना 18 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. अर्णब सध्या तळोजा कारागृहात बंद आहे.

अर्णबप्रकरणी राम कदम गृहमंत्र्यांना भेटले

भाजप आमदार राम कदम यांनी मंगळवारी अर्णबच्या अटकेवरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून, अर्णब प्रकरणी पोलिसांना योग्य तपास करण्याचे निर्देश देण्याचा विनंती केली.

पत्रात लिहीले, ‘अटकेदरम्यान अर्णब यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले आणि त्यांना मारहाणही झाली. ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण केली, ते सूड बुद्धीने कारवाई करत आहेत. अर्णबसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे जनतेच्या मनात रोष आहे.’

हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

कोकण रीजनचे पोलिस महासंचालक संजय मोहिते यांनी मीरा भायंदर वसई विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांना पत्र लिहून आत्महत्या प्रकरणाचा घाईने तपास करणाऱ्या इंस्पेक्टर सुरेश वराडेवर कार्रवाई करण्याची शिफारस केली. कमिश्नर म्हणाले, पत्र मिळाल्यानंतर वराडे यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. वराडे यांनीच अलीबाग पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्या प्रकरणाची क्लोजर रिपोर्ट फाइल केली होती.

फेक टीआरपी प्रकरणी घनश्याम सिंह अटक

यादरम्यान, मुंबई टीआरपीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे डिस्ट्रीब्यूशन हेड घनश्याम सिंहला मंगळवारी अटक करण्यात आले. सिंह रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सहायक असिस्टेंट वाइस प्रेसिडेंटदेखील आहेत. सिंह यांच्या अटकेसोबतच आतापर्यंत याप्रकरणी 12 जणांना अटक झाली आहे.

पुणे विभागातील आजची ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 160

0

पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 13 हजार 775 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.11 :- पुणे विभागातील 4 लाख 83 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 13 हजार 775 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 160 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 478 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.04 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 28 हजार 957 रुग्णांपैकी 3 लाख 11 हजार रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 943 आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.54 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 155 रुग्णांपैकी 43 हजार 874 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 660 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 223 रुग्णांपैकी 38 हजार 577 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 860 रुग्णांपैकी 43 हजार 461 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 729 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 580 रुग्णांपैकी 46 हजार 225 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 696 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 659 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 823 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 450, सातारा जिल्ह्यात 177, सोलापूर जिल्ह्यात 111, सांगली जिल्ह्यात 56 तर कोल्हापूर जिल्ह्यात 29 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 18 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 720 ,सातारा जिल्हयामध्ये 32, सोलापूर जिल्हयामध्ये 113, सांगली जिल्हयामध्ये 107 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 34 हजार 865 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 13 हजार 775 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 10 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
***

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’मध्ये पुणेकरांची राज्यात आघाडी

0

गेल्या सात महिन्यांत पर्यावरणस्नेहींमध्ये 19 हजारांनी वाढ

पुणे, दि. 11 नोव्हेंबर 2020 : पर्यावरणस्नेही पुणेकर वीजग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणचे राज्यभरातील 1,79,587 ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक 43,974 वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यानंतर कल्याण परिमंडल -18,634 व भांडूप परिमंडलातील 18,089 ग्राहकांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या सात महिन्यांत ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे परिमंडलात तब्बल 18,999 ग्राहकांची वाढ झाली आहे. याच कालावधीत एकूण 16 परिमंडलांमध्ये ‘गो-ग्रीन’ योजनेत 75,669 ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. त्यात पुणेकरांचा वाटा देखील सर्वाधिक आहे. महावितरणची पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त ग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले आहे.

महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तात्काळ ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळस्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील 24,696 तर पिंपरी चिंचवड शहरातील 12,779 तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, हवेली व वेल्हे तालुक्यातील 6499 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे व पर्यावरणपुरक कामात योगदान दिले आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MIT शाळेची CBSE NOC रद्द करण्या संदर्भात नोटीस द्या : मंत्री कडू

0

शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांच्याशी MIT शाळेच्या पालकां समवेत विविध प्रश्नां संदर्भात मेधा कुलकर्णी यांची भेट आणि चर्चा.. मंत्री कडू यांच्या कडून त्वरित आदेश , CBSE NOC रद्द करण्याची नोटीस
पुणे- कोथरूड च्या माजी आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांनी पालकां समवेत बच्चू कडू यांची भेट घेऊन चर्चा केली.
माननीय शिक्षण राज्य मंत्री बच्चुभाऊ कडु यांनी कोथरूड येथील MIT शाळेची CBSE NOC रद्द करण्या संदर्भात नोटीस देण्याचे आदेश दिले असून कोणत्याही SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांला CBSE ची सक्ती करता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.
शाळेने ह्या वर्षी सर्व SSC बोर्ड इंग्रजी माध्यम एकदम बंद करून विद्यार्थ्यांना CBSE प्रवेश घ्या किंवा शाळा सोडून जा असे सांगितले होते.
शाळेने SSC बोर्ड बंद केल्यामुळे गेले ६ महिने SSC बोर्ड इंग्रजी माध्यमाचे साधारण ८००-९०० विद्यार्थी या मुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत .
गेले २.५ वर्षे शाळा विद्यार्थ्यावर CBSE लादण्याचा तालिबानी प्रकार करत आहे. त्या विरोधात वेळोवेळी पालकांनी आवाज उठवला होता. शाळेने पहिली पासून एक एक वर्ष CBSE सुरु करावे आमची मुले SSC बोर्ड मधून पास होऊन द्यावीत एवढीच पालकांची न्याय मागणी होती.
पण शाळेने मनमानी कारभार करत switch over category मधून शासनाची फसवणूक करून CBSE ची मान्यता मिळवली आणि पूर्ण SSC बोर्ड इंग्रजी माध्यम एकदम बंद केले.
” महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या बोर्डातून नाव कमी करण्याची सक्ती शाळा कशी करू शकते” असा सवाल प्राचार्य मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
राज्याचे शिक्षण खाते यावर आता तातडीने पुढील कारवाई करून, शाळेवर प्रशासक नेमून शाळेला SSC बोर्ड इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास भाग पाडतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी तातडीने संचालक जगताप यांना आदेश दिले असून कोणत्याही विद्यार्थ्यांस बोर्ड बदलण्याची सक्ती केली जाऊ नये यासाठी नोटीस बजावावी अन्यथा CBSE बोर्डाची NOC रद्द करण्यासंदर्भात कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.
रवी गादिया, मनोहर हुम्बर, विनायक कुंभार, संजय जोशी, प्रकाश परमार, गजेंद्र पाटील हे पालक उपस्थित होते.

नृत्य, गप्पा गोष्टीने रंगणार बालदिन दिवाळी

0

पुणे : संवाद पुणे आणि अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालदिनानिमित्त ‘बालदिन दिवाळी’चे आयोजन करण्यात आले आहे. गमतीजमती, बालकविता, नृत्य, गप्पा, गोष्टी आदी कार्यक्रमाने हा बालदिन रंगणार आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (14 नोव्हेबर) दुपारी 12.30 वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघात पार पडणार आहे. अशी माहिती संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित असणार आहेत. चारूहास पंडित, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे मुलांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती सुनील महाजन यांची आहे, तर नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे. भार्गवी ईटकर, शौर्या थोरवे, आराध्या जराड हे बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पडद्यामागच्या तंत्रज्ञांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रित बालक व पालकांसाठी आहे. कार्यक्रमात सुरक्षित अंतर पाळले जाणार आहे. तसेच मास्कचा वापर केला जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

किरणोत्सव…

0

किरणोत्सव हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई चा अनोखा सोहळा . सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर दुसऱ्या दिवशी छातीवर आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात. साधारण दिडशे मीटर हून अधिक अंतर कापून ही किरणे महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप गणेश मंडप मध्य मंडप अंतराल मंडप गर्भागार अशा रस्त्याने देवीच्या भेटीला येतात तेव्हा मंदिरातले सर्व विद्युत दिवे बंद केले जातात या सोनेरी किरणांच्या प्रकाशात जगदंबेचं दुर्गा सप्तशती च्या प्राधानिक रहस्यात दिलेलंर तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची हे वर्णन सार्थ ठरते . या किरणांचा स्पर्श होताच मोठा घंटानाद करून सहावी आरती केली जाते . गेली कित्येक शतके अव्याहत सुरू असलेला सुंदर व अलौकिक उत्सव . काल मंगळवार दि. १० नोव्हेंबर 2020 रोजी सुर्याची किरणे आई जगदंबेच्या छातीपर्यंत पोहचून डावीकडे लुप्त झाली.

महापालिका शाळेतील शिक्षकांना ‘कोरोना ड्युटी’तून सुट्टी !

0

पुणे-कोरोनाच्या कामकाजासाठी नेमलेल्या महापालिकेच्या शिक्षकांना ‘कोरोना ड्युटी’मधून सुट्टी देण्यात आली असून पुन्हा आपापल्या शाळांमध्ये पुर्ववत नेमणूका दिल्या आहेत. परंतु,दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढले आहेत.

शहरात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर महापालिकेला कोरोना कामकाजामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू लागली होती. कोरोना नियंत्रण, विविध कोविड सेंटर, सर्वेक्षण आदी कामांकरिता बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स तसेच प्राथमिक विभागाच्या उप शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. पालिकेने तयार केलेल्या विविध पथकांमध्ये या शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता.

सध्या कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. घरोघर सर्वेक्षणाच्या 25 पेक्षा अधिक फेऱ्या झालेल्या असून रुग्णसंख्याही घटली आहे. राज्य शासनाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरु करण्याचे संकेत दिल्याने पालिकेलाही शाळा सुरु करण्याची तयारी करावी लागणार आहे.

शाळा सुरु झाल्यास शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना कोरोना ड्युटीमधून मुक्त करण्याची मागणी शिक्षण विभागाने केली होती. त्यामुळे आता सर्व शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे.

५०० कलावंतांच्या कुटुंबियांना दिवाप्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप (व्हिडीओ)

0

पुणे- दिवा प्रतिष्ठान आणि दीपक मानकर मित्र परिवार यांच्या वतीने ५०० मराठी कलावंतांच्या कुटुंबियांना मोफत दिवाळी फराळाच्या वाटपाला आज पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक दीपक मानकर , राष्ट्रवादीच्या सांकृतिक विभागाच्या अध्यक्षा प्रिया बेर्डे , अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे , मराठी चित्रपट महामंडळा चे अध्यक्ष मेघराजराजे भोसले , ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला काळे,सुरेश देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला . यावेळी दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर , अध्यक्ष करण मानकर , महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे , बाळासाहेब दाभेकर , विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल गाढवे आणि मयूर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्चच्या अखेरीस जेव्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाने पुण्याला घेरले तेव्हा अनेकांच्या कुटुंबांची परिस्थिती हलाखीची होऊ लागली . तेव्हा पासून ते आजतागायत दिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि दीपक मानकर मित्र परिवाराच्या मदतीने राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती आपल्या प्रास्ताविकात हर्षवर्धन मानकर यांनी दिली. अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि मेघराजराजे भोसले यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. प्रवीण तरडे यांनी दीपक मानकर राजकारण ,पक्ष न पाहता हे नेहमी मदतीला धाऊन येणारे नेते असल्याचे नमूद करत आता ते आपल्या देऊळ 2 या चित्रपटात गायक म्हणून पडद्यावरही दिसतील असे सांगून त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला . आणि मानकर परिवार नेहमीच मराठी सिनेमा नाटक आणि कलाकारांच्या पाठीशी कशा पद्धतीने भक्कम पणे उभा राहिला . याचे किस्से सांगितले. योगेश सुपेकर यांनी मिमिक्री सादर करीत आभार मानले.

हेल्मेट सक्ती त्यावरील दंडात्मक कारवाई थांबवावी-आमदार शिरोळे

0

पुणे: दुचाकी वाहनचालकाने हेल्मेट न घातल्यास त्याच्याकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या कारवाईस ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी सूचनाआमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना केली आहे.

हेल्मेटचा वापर व्हावा यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे पण त्याची सक्ती केली जाऊ नये, अशी भूमिका आमदार शिरोळे यांनी पोलीस आयुक्त आणि वाहतूक उपायुक्तांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. पुण्यात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला जात आहे.ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. सध्या कोरोना साथीच्या काळात कारवाईला तातडीने स्थगिती दिली जावी, दंड माफ करावा, अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत, असे शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेल्मेटचा दंड, मास्कचा दंड असे विविध प्रकारचे दंड आकारणे सद्यस्थितीत नागरिकांना परवडणारे आहे का ? याचाही सरकारने विचार करण्याची वेळ आली आहे, अशीही भूमिका आमदार शिरोळे यांनी मांडली आहे.

सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

0

मुंबई, दि. 10 : प्रत्यक्ष कार्यस्थळावर काम करत असताना येणाऱ्या अडचणी तसेच वीज कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनने सादरीकरणात केलेल्या सूचनांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्वागत केले. भरती प्रक्रिया व फील्डस्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या असोसिएशनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही डॉ. राऊत यांनी दिली.

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता व तीनही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक यांची फोर्ट येथील एमएसईबी सुत्रधारी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली.

प्रत्यक्ष मैदानात काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत, थकीत वीज बिल वसुलीसाठी कोणते उपाय करायला हवेत, याबद्दल प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्यांना काय वाटते, हे सादर करण्याची संधी मंत्री डॉ.राऊत यांनी सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनला आज दिली.

असोसिएशनने कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सादर केलेल्या सूचनांचा विचार करून कार्यवाही केली जाईल, असे डॉ. राऊत यांनी सादरीकरणानंतर सांगितले. तसेच कंपनीचा महसूल वाढविण्यासाठी व ग्राहकांकडून थकीत बिल कशाप्रकारे वसुल करता येईल यासाठी केलेल्या सूचना विशेष आवडल्याचे डॉ. राऊत यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन कालावधीत महावितरण कंपनीने वीज जोडणी न तोडणे व हप्त्यांत वीज बिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना दिली आहे. लॉकडाऊनमुळे वीज वसुली न झाल्यामुळे महावितरणला आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरणा सुविधा नसल्यामुळे अडचण होते. ग्राहकांची ही अडचण सोडवण्यासाठी गाव पातळीवर एटीएम सेंटर उभारण्यात यावे. ‘माझी कंपनी, माझी जबाबदारी’, ही संकल्पना राबवून प्रथम महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपले वीज बिल बँकेच्या माध्यमातून भरणा करावे आदी सूचना यावेळी असोसिएशनकडून मांडण्यात आल्या.

“आम्हाला आजवर केवळ आलेल्या सिस्टीममध्ये आमच्या सूचना देण्यास सांगण्यात येत होते. एखाद्या वेळेस संचालकांपर्यंत आमच्या सूचना लेखी स्वरूपात सादर करू शकलो होतो. मात्र डॉ. राऊत हे ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सकारात्मक आणि सक्रिय आहेत. त्यांनी स्वतः आम्हाला ऊर्जा क्षेत्रात अपेक्षित सुधारणा आणि उत्पादन खर्च कसे कमी करता येईल याबद्दल सादरीकरण करायला सांगितले. असे पहिल्यांदाच घडतेय की मंत्री स्वतःहून आम्हाला सूचना मागतात,” अशा शब्दात सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अभियंत्यांकडून आलेल्या सूचनांचे सादरीकरण झाल्यावर प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी असोसिएशनचे विचार कंपनीच्या हितवर्धनाचे असून ही कंपनीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.