Home Blog Page 2398

लहान मुलांसाठी अ‍ॅनिमेशनचे अद्भुत विश्व… मजेशीर, आश्चर्यकारक कथा आणि पात्रांचा पुरेपूर खजिना…

0

मुंबई: प्रसारण व्यवसाय, जाहिरात करण्यासह ‘इन १० मीडिया नेटवर्क’ वेगाने टेलिव्हिजन करमणूक क्षेत्रात उदयास येत आहे. बालदिनाचे औचित्य साधून इन १० मिडीया नेटवर्कने नवीन प्रीमियम हिंदी चॅनेल, “गुब्बारे – मस्ती के फुवांरे” लाँच करून मीडिया आणि करमणूक क्षेत्रात आपले स्थान मजबूत केले आहे. सध्या, नेटवर्कद्वारे “इपिक टीव्ही – इंडिया का अपना इंफोटेनमेंट”, “शोबॉक्स – अपना संगीत, अपना स्वैग” आणि “फिलामची – फिल्मों का लालची” हे चॅनेल्स सुरु आहेत.

२ ते १४ वर्षे वयोगटातील तरुण दर्शकांसाठी “गुब्बारे” रोमांचक अ‍ॅनिमेशन मालिका आणि चित्रपटांद्वारे मनोरंजन आणि मजेदार-शिक्षण देते. जीवनातील अंतहीन आनंद आणि उत्तेजन देणारे ‘मस्ती के फुवांरे’ ब्रँड टॅगलाइन म्हणून जादू, खट्याळ आणि आनंदोत्सव आहे.

नुकत्याच केलेल्या बीएआरसीच्या आकडेवारीनुसार, शहरी हिंदी भाषिक बाजारपेठेमध्ये दर्शकांच्या दृष्टीने मुलांचे मनोरंजन हा एक अग्रगण्य शैली आहे.

नवीन चॅनेलच्या लॉंचिंगवेळी इन १० मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पिट्टी म्हणाले, “इन १० मीडिया नेटवर्कमध्ये, आम्ही उद्योग-व्यवसायाच्या शिखरावरती जाण्यासाठी आमचा ठसा रणनीतिकपणे वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्या देशात, बहुतेक घरांमध्ये मुलांच्या करमणुकीसाठी दूरदर्शन हे प्राथमिक दृश्य मंच आहे. चॅनेलच्या विशिष्ट आणि उत्साहवर्धक प्रोग्रामिंगद्वारे गुब्बेरियन बालदिन साजरा करण्यासाठी आणि मुलांशी आत्मीयता निर्माण करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.”

गुब्बारे मुलांसाठी पौष्टिक मनोरंजन देतात आणि ब्रँडला त्यांच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करतात. यासह सामग्रीची उच्चस्तरीय ‘गुब्बारे किड्स क्लब’ यासारख्या विपणन उपक्रमांद्वारे गुंतवणूकीची समन्वय, ब्रँड्सना मुलांशी व्यस्त राहण्यासाठी आणि परस्परसंवादाची पातळी तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग प्रदान करते. सामग्रीकडे नव्याने दृष्टीकोन केल्यामुळे जाहिरातदारांना नवीन पात्र आणि शोसह संरेखित करण्याची संधी मिळते.

मुलांसाठी गुब्बारे चॅनेलमध्ये २४-तास नाविन्यपूर्ण साहसी, रोमांचक, आकर्षक, आणि विनोदी कथा इत्यादी देशांमधील स्पॅनिशिंग किस्से, देशातील सध्याच्या प्रोग्रामिंगमध्ये भारतीय अ‍ॅनिमेशनचे मिश्रण समाविष्ट आहे. अप्पू – द योगिक हत्ती, लव्ह यू गणेश, छोटा हातिम आणि सेव्हन मॉन्स्टर्स, तसेच बिल्ला जासूस, मार्कस खिलाडी, माय भूत फ्रेंड्स, लिओ अँड टिग, द दबंग गर्ल्स, अच्चूटो यांनी चॅनलवरील भारतीय प्रेक्षकांची ओळख करून दिली. मालिकेव्यतिरिक्त, चॅनेल शनिवार व रविवार रोजी अ‍ॅनिमेटेड चित्रपट देखील प्रसारित करेल.

गुब्बारे – हा सशुल्क चॅनेल ‘अपना एपिक व्हॅल्यू पॅक’ चा भाग असेल. हे संपूर्ण भारतातील सर्व प्रमुख डीटीएच आणि केबल ऑपरेटरवर उपलब्ध असेल.

IN10 मीडिया नेटवर्क बद्दल

इन 10 मीडिया नेटवर्क ही मीडिया आणि करमणूक उद्योगातील विविध व्यवसायांची मूळ कंपनी आहे. क्रिएटिव्ह समुदायामध्ये खोलवर रुजलेली मुळे आणि प्रीमियम सामग्रीसह दीर्घ संबद्धतेसह, ईपीआयसी टीव्ही, शोबॉक्स, फिलामची, गुब्बारे, ईपीआयसी ऑन, डॉकूबे, जुगरनॉट प्रॉडक्शन्स आणि प्लॅटनिस्टा गेम्स यासह – त्याच्या पट्ट्यातील व्यवसाय प्लॅटफॉर्म ओलांडून सायकल. उद्योजक आदित्य पिट्टी यांच्या नेतृत्वात, आयएन 10 मीडिया नेटवर्कचे प्रयत्न जागतिक स्तरावरील ब्रँड तयार करण्यावर आहेत. अधिक माहितीसाठी https://www.in10media.com/ ला भेट द्या.

गुब्बारे बद्दल

2 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या करमणुकीच्या गरजा भागवण्यासाठी 2020 मध्ये “गुब्बारे” सुरू करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या अ‍ॅनिमेटेड पात्र तसेच कथांद्वारे आनंद, हसू आणि मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 24 तासांचे हिंदी किड्स चॅनेल भारतीय प्रेक्षकांच्या तरुण सदस्यांपर्यंत गुणात्मक सामग्री आणण्यासाठी  मूळ आणि अधिग्रहित मालिका आणि चित्रपट यांचे एक मनोरंजक मिश्रण प्रदान करत आहे.

राज्यातील विहीरींच्या संवर्धनासाठी धोरण आखावे-आमदार शिरोळे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी

0

पुणे: राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गिरीप्रेमींसाठी किल्ले, गड भटकंतीसाठी खुले केले याबद्दल आभार मानण्यासाठी आमदार शिरोळे यांनी गिरीप्रेमी उमेश झिरपे आणि एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांच्यासमवेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत पर्यटन खात्याने प्रस्तावित केलेल्या जी.आर. मसुद्यात साहसी क्रीडा प्रकार आणि साहसी पर्यटन यात गल्लत करण्यात आली आहे.ती दूर करून साहसी क्रीडा प्रकार क्रीडा खात्याकडे ठेवावा आणि साहसी पर्यटन हा विषय पर्यटन खात्याकडे वर्ग करावा, असे आमदार शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले. तसेच राज्यातील नदी संवर्धन, विहीरींचे सर्वेक्षण यावर सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली. पुणे शाहर आणि राज्यातील अस्तित्वात असलेल्या विहीरींचे संरक्षण व्हावे, नवीन विहीरींचे संवर्धन याकरिता कायमस्वरूपी धोरण ठरवावे अशा मागणीचे निवेदन आमदार शिरोळे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले.

नदीकाठी असलेल्या मंदिरांमधील निर्माल्याचे खत करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे, त्यातून मंदिरांना उत्पन्न मिळेल आणि नदीत होणारे प्रदूषण टळेल. नदी आणि नदीकाठच्या जैववैविध्य ठेव्याचे जतन होईल. मंदिरातील निर्माल्याचे खत पवित्र भावनेने शेतकरी घेतील, असेही निवेदन आमदार शिरोळे यांनी दिले. यावर विचार करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

उत्साहाच्या चाहुली…दिवाळी आली (लेखिका :पूर्णिमा नार्वेकर)

0

केवढी ही गर्दी, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, या गर्दीत कुठे येतोय करोना…दादरच्या रानडे रोडवरची तुडुंब गर्दी पाहून मनातल्या मनात मी पुटपुटले. गेल्याच आठवड्यात या रानडे रोडवर अगदी शुकशुकाट होता आणि आता पाहा, माणसांनी नुसता फुलला आहे. दिवाळीची चाहूलही लागलीय (मोती साबणाची जाहिरात सुरू झाली ना). गेल्या आठवड्यातील सुरक्षित अंतर काय ते ट्रेनमध्ये आता इंचभरही नव्हतं. ‘गर्दी’ या विषयावर व्हाट्सअपवर एक जोक फिरत होता – करोनाने बहुधा स्वतःलाच क्वारंटाईन करून घेतलं आहे १४ दिवस! खरंच की त्याचा प्रत्यय रानडे रोडवर पदोपदी येत होता. पाडव्यापासून ते दसऱ्यापर्यंत सगळे सण या करोनामुळे बंदिस्त वातावरणात पार पडले, मात्र लोकांचा संयम सुटला आणि दिवाळीच्या खरेदीसाठी हळूहळू गर्दी होऊ लागली…अर्थात मास्क लावून आणि सोबत सॅनिटायझर घेऊनच.दसऱ्यानंतर काही दिवसांनी  बाजारातील मंदी मंदावली आणि उत्साहाची झळाळी यायला लागली. ऑनलाईन दिवाळी धमाक्याचा दसऱ्यानंतरच शुभारंभ झाला होता. रांगोळी शिकविण्याच्या ऑनलाईन क्लासेसची दुकानं थाटली गेली. अमेझॉन, मिन्त्रा, फ्लिपकार्ट…दिवाळी बम्पर सेलचा धुमधडाका सुरू झाला. ज्यांना बाहेर जाऊन खरेदी करता येत नाही त्यांच्या तर पथ्यावरच पडलं. लॉकडाऊनपासून तरुण मंडळी, गृहिणी ते जेष्ठ नागरिक सर्वच टेक्नोसॅव्ही झाले आहेत. फोन घेण्या आणि करण्यापुरता मर्यादित वापर करणाऱ्या आजीबाई सुद्धा आता ऑनलाईन कुठे काय मिळते, काय काय ऑफर्स आहेत ते बघून नातीला सूचना करू लागल्या आहेत. ऑनलाईन जाहिरातबाजीला यंदा करोनामुळे सोन्याचे दिवस आले आहेत.दिवाळी फराळाच्या ऑनलाईन ऑर्डर्सचे व्हाट्सअपवर दिवसाला किमान ३-४ तरी नवीन मेसजेस येतातच. तयार भाजणी पीठ, लाडू पीठ, अनारसा पीठ, तोरण, कंदील, पणत्या…सध्या करोनाऐवजी या मेसेजेसची सर्व ग्रुपवर रेलचेल आहे. बाहेर न पडता दिवाळी साजरी करायची या अपरिहार्यतेने बहुतेकांनी आपापल्या परीनं पर्याय शोधून काढले, मग त्यात ‘साहित्य फराळ’ मागे कसा राहील. दिवाळी व दिवाळी अंक यांचं नातं अतूट आहे व त्यात खंड पडू द्यायचा नाही, यासाठी काही प्रकाशकांनी दिवाळी अंक ऑनलाईन प्रकाशित केले आहेत. सालाबादप्रमाणे पेपर स्टॉलवर दिवाळी अंक दिमाखात विराजमान झाले आहेत म्हणा. दिवाळी पहाटचे कार्यक्रम यावर्षी ऑनलाईन होणार असून सुरांची मैफल याची डोळां रंगणार आहे. दिवाळी पहाटेनिमित्त होणाऱ्या पारंपरिक वेशातील मिरवणुकीस यावेळी काट मारली गेली तरी काही जणांनी ऑनलाईन सेलिब्रेशनचा पर्याय शोधून काढलाच. प्रत्यक्ष भेटता येत नसलं म्हणून काय झालं, दरवर्षी प्रमाणे नटूनथटून परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटीगाठी होणार आहेत…त्याची जय्यत तयारीही चालू आहे. एकूण दिवाळी आणि दिवाळी पहाट युनिक पद्धतीने कशी साजरी करायची यावर  मित्रमैत्रिणींच्या तसेच फॅमिली ग्रुपमध्ये जोरदार चर्चासत्र झडते आहे. त्यास भर म्हणून ऑनलाईन खरेदीची पार्सलं कधीचीच घरी येऊन पडली आहेत.’वर्क फ्रॉम होम’मुळे कामाचा व्याप असला तरी महिलावर्ग आनंदी आहे, कारण मनासारखा दिवाळी फराळ करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नवनवीन रेसिपी बनवून तयार झालेले घरचे बल्लवाचार्य त्यांच्या दिमतीला आहेतच! बिनआवाजाचे फटाके एकच दिवस का होईना पण वाजवता येणार आहे ना, यावर घरातील बच्चे कंपनी खूष आहे. दुःखाचे, भीतीचे सावट सरून सर्वत्र उत्साहाचे दीप तेवू लागले आहेत. रानडे रोडच्या गर्दीतून वाट काढताना माणसांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा उत्साह मी न्याहाळत होते. हे चैतन्य पाहून मनोमन देवाजवळ एकच प्रार्थना केली – करोना कायमचाच आता क्वारंटाईन होऊ दे आणि आशेच्या किरणांचे दीप घरोघरी उजळू दे देवा…शुभ दीपावली.

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

चतुशृंगी देवस्थानच्या वतीने ऑनलाईन लक्ष्मीपूजनाची सुविधा

0

पुणे-श्री चतुशृंगी देवस्थान ट्रस्टतर्फे भविकांसाठी ऑनलाईन लक्ष्मीपूजनाची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे माहिती कार्यकारी विश्वस्त देवेंद्र अनगळ यांनी कळविले आहे.

पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींची मर्यादित संख्या आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुरक्षितता यांचा विचार करून पारंपरिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लक्ष्मीपूजन करता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

शास्त्रोक्त, समंत्रक, लक्ष्मी पूजन पूजा ऑनलाईन सांगितली जाणार असून प्रत्यक्षिकांसह पूजा करून घेतली जाणार आहे.
मंदिराचे कुलोपाध्याय श्री श्रीराम शास्त्री कानडे हे पूजा सांगतील
त्यानुसार आपल्या घरी किंवा व्यावसायिक ठिकाणी मुहूर्तावर शास्त्रोक्त पूजा करता येणार आहे. त्यासाठी या
https://www.facebook.com/groups/chattushringidevasthanofficials लिंकवर क्लिक करावे.

राज्यातील अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष पंधरवडा

0

मुंबई : शासकीय किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना विविध शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी सवलतींच्या लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र गतिमान पद्धतीने देण्यासाठी राज्यभरात दि. १४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष पंधरवडा मोहीम राबविण्यात येत आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांकडे संस्थेतून बाहेर पडताना जातीचे प्रमाणपत्र नसते. त्यामुळे त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत; तसेच त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या दि. ६ जून २०१६ च्या शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त संस्थांमध्ये दाखल असलेल्या पात्र अनाथ मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते.

आता ही प्रमाणपत्रे गतीने देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून विभागीयस्तरावर दि. १४ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये विशेष पंधरवडा राबविण्यात येत आहे. यादृष्टीने संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान अनाथ प्रमाणपत्रासंबंधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कोकण विभागातील जिल्ह्यातील अनाथ बालकांना विभागीय उपायुक्त, महिला व बालविकास, कोकण विभाग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-८० यांच्यामार्फत अनाथ प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी बृहन्मुंबईतील नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, दुसरा टप्पा, पहिला मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ (दूरध्वनी क्र. ०२२-२५२३२३०८) येथे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर, ११७, बीडीडी चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई-१८ (दूरध्वनी क्र. ०२२-२४९२२४८४) येथे संपर्क साधावा. नागरिकांनी ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२२-२५३३०७५२, पालघर- दूरध्वनी क्र. ०२५२५-२५७६२२, सिंधुदूर्ग – दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८८६९, रायगड – दूरध्वनी क्र.०२१४१-२२५३२१ तर रत्नागिरी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना दूरध्वनी क्र. ०२३५२- २२०४६१ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बालक अनाथ असल्याची खात्री जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम नोंदवहीचा दाखला यापैकी एका पुराव्यानुसार करण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही संबंधित बालगृह, संस्था, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्ह्याची बाल कल्याण समिती यांनी करुन परिपूर्ण प्रस्ताव महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार विभागीय स्तरावरुन पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरीत केले जाईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार भामा-आसखेडचे लोकार्पण -भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

0

पुणे-शहरातील पूर्व भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार्‍या भामा-आसखेड योजनेचे काम पूर्णत्वास आले असून, लवकरच राज्याचे माजी मु‘यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक योगेश मुळीक, सुनिता गलांडे, संदीप जर्‍हाड, राहुल भंडारे, शितल शिंदे, ऐश्‍वर्या जाधव, मुक्ता जगताप, स्वीकृत नगरसेवक आशाताई जगताप, विशाल साळी, सामाजिक कार्यकर्ते महेश गलांडे, ज्ञानेश्‍वर शिंदे, मोहन शिंदे सरकार, अरविंद गोरे, आशुतोष जाधवयांच्या समवेत आज भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भामा-आसखेड प्रकल्पाला भेट देऊन पाहाणी केली.
मुळीक पुढे म्हणाले, ‘राजकीय अडथळे, पुनर्वसनाचा तिढा, न्यायालयातील दावे यामुळे या योजनेचे काम रेंगाळले. परंतु त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग‘ेस पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये नसलेली एकवाक्यता आणि त्यांनी उभा केलेला शहरी-ग‘ामीण वाद कारणीभूत आहे. मात्र देवेंद्र ङ्गडणवीस यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे प्रकल्पग‘स्तांचे समाधान करता आले, तसेच करंजविहिरे, आळंदी, कुरूळी, वाकी-वाडा या प्रकल्पांमुळे बाधित गावांमध्ये पुणे महापालिकेला विकासकामे करता आली. त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पाणी या कुरूळी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून केळवाडीतील ८० मीटर जलवाहिनीचे काम पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणार्‍या चाचण्या घेण्यात येतील. त्यामुळे वडगावशेरीकरांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.’

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘या योजनेसाठी ४४७ कोटी ६० लाख रुपयांची प्रकल्पीय मान्यता घेण्यात आली होती. आजपर्यंत केंद्र सरकारने १७१ कोटी सात लाख रुपये, राज्य सरकारने ६८ कोटी ४० लाख रुपये आणि पुणे महापालिकेने ११२ कोटी ४९ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. योगेश मुळीक स्थायी समितीचे अध्यक्ष असताना प्रकल्पग‘स्तांच्या पुनर्वसनासाठी पुणे महापालिकेने ८० कोटी रुपयांचा निधी आणि १०५ कोटी रुपये विविध कामांसाठी उपलब्ध करून दिले. प्रकल्प पूर्ण होण्याच्या कालावधीत सत्ताधारी पक्ष बदलले तरी सुद्धा ८० टक्क्यांहून अधिक निधीची तरतूद भाजप सत्तेत असताना झाली आहे.’
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भामा-आसखेडचा प्रकल्प पूर्ण होत आहे. या प्रकल्पातून दरवर्षी २.८ टीएमसी (अब्ज घनङ्गूट) पाणी मिळणार आहे. त्यामुळे कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर या भागाचा २०४१ पर्यंतचा पाण्याचा प्रश्‍न मिटणार असून, या भागातील नागरिकांची टँकरमाफियांच्या कचाट्यातून सुटका होणार आहे. नागरिकांना नियमित, पुरेसा, शुद्ध पाणीपुरवठा होणार असून, या भागाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.’

बार्टी संस्थेसाठी निधी उपलब्ध; जुने उपक्रमही सुरूच-प्रधान सचिव श्याम तागडे

0
मुंबई, दि. 13 : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मार्फत विविध प्रकल्प राबविले जातात. त्या प्रकल्पातील कामानुसार या संस्थांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यात येते. त्यामुळे ‘बार्टी’ व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच कोवीड परिस्थितीमुळे या दोन्ही संस्थांद्वारे राबविण्यात येणारे काही कार्यक्रम व उपक्रम शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे सध्या स्थगित असले तरीही बार्टी संस्थेस शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असल्याने पुढील कार्यवाही सुरु आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी स्पष्ट केले आहे.

        सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या बार्टी व समता प्रतिष्ठानमधील कर्मचारी कपात, निधीची उपलब्धता व प्रकल्पासंदर्भात माध्यमांमध्ये उपस्थित होत असलेल्या प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने स्पष्टीकरण केले आहे.

      बार्टी व समता प्रतिष्ठानध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येतात. या प्रकल्पासाठी संबंधित विषयातील जाणकारांची सेवा बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात येते. तसेच विशिष्ट प्रकल्प पूर्ण झाला की, या नियुक्त्या रद्द केल्या जातात. सध्या नवीन कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच जुने उपक्रम सुरूच आहेत.

      त्यामुळे बार्टी व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा अथवा निधी दिला नसल्याचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे असल्याचे विभागाने म्हटले आहे.

शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक कामकाजाकरीता तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

0

पुणे :- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक निवडणूक -2020 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून निवडणूक कामकाजाकरीता पुणे येथे तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
विभाग स्तरावरील पाच जिल्हयासाठी तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण कक्ष पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये तक्रारींचे निरसन करण्यासाठी दोन दुरध्वनी बसविण्यात आलेले असून दूरध्वनी क्रमांक 020-26361050, 020-26362627 हे व इ-मेल आयडी punegtelection2020@gmail.com असा आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग, दुसरा मजला, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.17 यांचे कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षामध्ये तक्रारींचे निरसन करण्यासाठी तीन दुरध्वनी बसविण्यात आले असून दुरध्वनी क्रमांक 020-26137233, 020-26137234, 020-26137235 हे व ई-मेल आयडी tgelection2020@gmail.com असा आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 352

0

पुणे विभागातील 4 लाख 85 हजार 879 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 15 हजार 764 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 85 हजार 879 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 15 हजार 764 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 352 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 533 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 30 हजार 112 रुग्णांपैकी 3 लाख 12 हजार 690 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 373 आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.72 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 471 रुग्णांपैकी 44 हजार 386 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 456 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 560 रुग्णांपैकी 38 हजार 837 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 199 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 984 रुग्णांपैकी 43 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 653 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 637 रुग्णांपैकी 46 हजार 306 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 671 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 77 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 622, सातारा जिल्ह्यात 175, सोलापूर जिल्ह्यात 185, सांगली जिल्ह्यात 71 तर कोल्हापूर जिल्ह्यात 24 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 342 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 873 ,सातारा जिल्हयामध्ये 211, सोलापूर जिल्हयामध्ये 126, सांगली जिल्हयामध्ये 91 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 41 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 25 लाख 63 हजार 644 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 15 हजार 764 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

रस्ते व विविध प्रकल्पासाठी आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठी महापालिकेला जाचक अटींतून वगळा – आबा बागुलांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

0

पुणे -शहरामध्ये एचसीएमटीआर,कचऱ्याचा प्रश्न, रास्ता रुंदीकरण करण्यासाठी जागा संपादन करणे व पुणे शहरातील विविध प्रकल्प आणि  विकासाबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबत काल पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी प्रदीर्घ चर्चा करत पुणे शहरात आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठी  महापालिकेला जाचक अटींतून वगळण्याची मागणी केली.

सुमारे २००० किमी असलेल्या पुणे शहराच्या १९८७ व २०१७ च्या विकास आराखड्यामध्ये वापरात असलेली जागा(एझेस्टिंग लँड युझ ) व वापरण्यात येणारी जागा (प्रपोज लँड युझ ) असे वर्गीकरण असून वापरण्यात येणाऱ्या जागेचे भूसंपादन करणे अत्यंत गरजेचे आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय कमकुवत होत असल्याने जागेचे भूसंपादन होत नाही. व टीडीआर चे दर कमी जास्त होत असताना महानगरपालिकेची भूसंपादन प्रक्रिया अतिशय संत गतीने होते. २०१३ च्या सुधारित कायद्यानुसार भूसंपादन करताना रोख रकमेकडे जमीन धारकाचा कल आहे. त्यामुळे भूसंपादनाला मोठी अडचण निर्माण होत असून नवीनभूसंपादन  कायद्यातील  अधिसूचने नुसार कलम 19 ची घोषणा करन्यापूर्वी महानगरपालिकेला संपादन मूल्याच्या 30% रक्कम मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करावी लागते.ही रक्कम अंतिम निवाड़ा घोषित होईपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे अशीच पडून राहते व त्याचे कुठलेही व्याज महापालिकेला मिळत नाहीं.

या उलट कलम 19 ची घोषणा होताच अंतिम निवाड़ा घोषित होईपर्यंत, संपादन मूल्यावर वार्षिक 12 ते 15 % व्याज महापालिकेला अधिकचे भरावे लागते.

त्यामुळे सामान्य करदात्यांनी प्रमाणिकपने भरलेल्या करावर चालणाऱ्या महापालिकेवर करोडो रुपयांचा  आर्थिक भुरदंड पडत आहे. पुणे शहरातील  मोठे विकास प्रकल्प व प्रमुख रस्ते रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेमुळे  अडकून पडले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास अडचण निर्माण होत आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे खात्याला भूसंपादन करत असताना ३० टक्के आगाऊ रक्कम भरण्यावर सवलत दिली आहे. त्याप्रमाणे पुणे शहरात रस्ता रुंदीकरण करण्यासाठी व शहराच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांसाठी आरक्षित जागेचे  भूसंपादन करत असताना सदर 30% रक्कम निवाड़ा घोषित होण्यापूर्वीच भरण्याच्या  जाचक अटीतून महापालिकेला वगळावे अशी मागणी आबा बागुल यांनी केली असून यासंदर्भात प्रस्ताव शासनाला पाठवा यावर तातडीने निर्णय घेण्याचे  ठामपणे आश्वासन महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले .   

बिहारच्या विषयावरुन शिवसेनेची भूमिका दुटप्पी -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टिका

0


मुंबई – महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत भाजपा एक नंबरचा पक्ष होता व शिवसेना तिसर्‍या नंबरवर होती, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला मग तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला नाही का… शिवसेना व भाजपची युती असताना कमी संख्या असूनही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा जनतेचा अपमान झाला नाही का… आणि आता नितिश कुमार यांचा पक्ष तिसर्‍या नंबर असतानाही ते मुख्यमंत्री होणार असतील, तर तिथल्या जनादेशाचा अपमान झाला असे बोलणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत व शिवसेना यांची भूमिका दुटप्पी आणि सोयीची असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत आणि त्यांच्या मुखपत्रातील अग्रलेखाचे आश्चर्य वाटते कि शिवसेना आणि शिवसेना नेते आपल्या भूमिका एवढ्या जलद गतीने सामनातून बदलत आहेत असे सांगताना दरेकर म्हणाले की, दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांनी सांगितलं कि नितिश कुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री केले तर त्याचे सारे श्रेय शिवसेनेला जाईल. पण आज संजय राऊत त्यांचे मुखपत्र सामनातून लिहितात की, जर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले तर तिथल्या जनतेचा, जनाधाराचा अपमान होईल ही शिवसेनेची भूमिका दुतोंडी नाही काय असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
हिवाळी अधिवेशनाबाबत सरकार पळ काढतेय
महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढतोय आणि अशा या सगळ्या विषयांवर जनतेचा आवाज विधिमंडळात उठवण्याची वाट महाराष्ट्रातील जनता पाहतेय. पण या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका या सरकारची दिसत आहे. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशाचा कालावधी ठरवू असे सांगणारे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी कोरोनाचा आधार घेत हे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका प्रविण दरेकर यांनी केली.
दोन महिन्यानंतर एसटीचे भवितव्य काय
कोकणात निसर्ग वादळाच्याबाबतीत सरकारने जी मदत जाहिर केली ती अजूनही कोकणवासियांना पूर्ण मिळालेली नाहीत, त्यामुळे सरकारच्या फक्त घोषणाच होत आहेत, प्रत्यक्षात काहीच होत नाही असे स्पष्ट करताना दरेकर म्हणाले की,एसटीची सध्याची अवस्था कठिण असतानाही परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचा-यांचे दोन महिन्याचे पगार दिले ते चांगले आहे, पण दोन महिन्यांच्या पगारांनी हा प्रश्न सुटणार नाही. आजचे मरण दोन महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे. मग २ महिन्यानंतर एसटीचं भवितव्य काय याचाही आघाडी सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमुद केले.

कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वेक्षण कार्यक्रमात लोकसहभागावर भर द्या -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे, दि.12: कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती, शिक्षण देणे व सुसंवाद साधणे महत्वाचे असून यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये लोकसहभागावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरोग शोधणे, निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार व विकृती प्रतिबंधासाठी डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 अखेर सक्रिय कुष्ठरोग शोध व नियमित सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यादृष्टीने जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरोग्य सेवा(कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. हुकूमचंद पाटोळे तसेच सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी मागील वर्षी झालेल्या कामाची राज्य व जिल्हा पातळीची तुलनात्मक माहिती घेवून डॉ. देशमुख म्हणाले, वेळेत औषधोपचार घेतल्यास कुष्ठरोग हमखास बरा होतो. म्हणून प्राथमिक अवस्थेतच कुष्ठरुग्ण शोधून निदान झालेल्या रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून द्यावेत. यामध्ये रुग्णाच्या सहवासितांची माहिती घेऊन त्यांची तपासणी व नोंदी अचूकपणे घ्याव्यात. याकामी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन झालेल्या कामाची माहिती प्रशासनाला सादर करावी. कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे तसेच याकामी सहभागी आशा व स्वयंसेवकांना तालुकानिहाय सविस्तर प्रशिक्षण द्यावे, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.

या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील 31 लाख 22 हजार 233 तर शहरी भागातील 8 लाख 9 हजार 715 अशा एकूण 39 लाख 32 हजार 52 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. याकामी 1 हजार 579 आशा व स्त्री स्वयंसेविका तर 697 आरोग्यसेवक व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ हुकूमचंद पाटोळे यांनी यावेळी दिली.
0000

डिजिटल प्रसारण माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश समाधानकारक – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई, दि. 12 : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब समाधानकारक आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच काढण्यात आली असून केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे यावर नियंत्रण असणार आहे.

देशातील विविध माध्यमे कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली व त्यांच्या नियमांच्या अखत्यारित राहून काम करत असतात. ओटीटी प्लॅटफोर्मस्‌वर मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या संस्थेचे नियंत्रण नसते. मध्यंतरी महाराष्ट्राच्या सायबर सेलने अश्लीलता व महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या निर्मिती संस्थांवर कारवाई करत भा.द.वि.297, 67, 68, (9) च्या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही  व्यावसायिक दबावाखाली येऊन स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही ह्याची काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या ह्या अधिसूचनेमुळे अशा सर्व गोष्टींवर निर्बंध घालणे शक्य होईल.

तसेच या अधिसूचनेनुसार विविध वेबसीरिज चॅनल्स तसेच अन्य ओटीटी मंच चित्रपट, लघुपट, निवेदन पट अशा प्रकारच्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमावर या मंत्रालयाचे नियंत्रण असणार आहे.

त्यामुळे या माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमावर मजकुरावर नियंत्रण ठेवता येईल. पोर्नोग्राफी अथवा अश्लीलता याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जाईल, असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी

0

नवी दिल्ली, दि. १२ जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. जलसंपत्ती नियमनात राज्याने दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकाविले असून विविध क्षेत्रात एकूण ६ पुरस्कार पटकाविले आहेत.

सांगली जिल्ह्याला नदी पुररूज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार 11 व 12 नोव्हेंबर असे दोन टप्यात उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. यावेळी विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळाले.

जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात पुन्हा अग्रेसर

या कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख बॅरी. विनोद तिवारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन यासाठी ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा, 2005’ अन्वये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते, प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, अधिनियमाने विहित केलेल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती यांचा सर्वकष विचार करुन केंद्र शासनाने देशातील ‘सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण’ या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे.

नदी पुररूज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला

नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार प्रदान  करण्यात आले. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दीडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र, मध्यंतरीच्या काही दशकांत ही नदी कोरडी होती व या नदीचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने कार्य केले. राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रूंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले.

याशिवाय अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसऱ्या क्रमांकांचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला

जलसंधारणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीना ही यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील अनोरे ग्रामपंचायतीने दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. राज्यमंत्री श्री. कटारिया यांच्या हस्ते सरपंच तुकाराम पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जलसंधारणात उत्कृष्ट कार्यासाठी देशातील काही व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अनिकेत लोहिया यांना पश्चिम विभागात जलयौध्दयाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी राजभवन उजळणार

0

मुंबई, दि. 12 : या दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन परिसर पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी उजळणार आहे.

स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह बांबूपासून आदिवासी महिलांनी तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाशकंदील भेट दिले.

राजभवन येथील स्थायी कर्मचारी राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी असे आवाहन करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते.

त्यानुसार विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी आकाशकंदील तयार करून राजभवन येथे पाठविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी, असे आवाहन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केले आहे.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.