Home Blog Page 2385

पदवीधर आणि शिक्षक निवडणूक:विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक; कुठे-किती टक्के मतदान?

0

पुणे- : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले.  यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.

नगरसेविका अश्विनी कदम, आणि राष्ट्रवादीचे पर्वती विभागाचे नेते नितिन कदम यांनी स्वतः मतदान करून मतदारांना संपर्क साधत मतदानासाठी आवाहन केले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ

जिल्हा : कोल्हापूर

पदवीधर मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ४५५१५
स्त्री :१५४४९
एकूण :६०९६४
मतदान टक्केवारी :६८.०९ %

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ७९८०
स्त्री : २६२९
एकूण : १०६०९
मतदान टक्केवारी:८६.७७ %

कुठे किती मतदान ?

कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के तर शिक्षकसाठी 67.36 % मतदान झाले.

औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचे आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावे लागणार आहे.औरंगाबाद पदवीधर मतदार संघात सुमारे 61 टक्के मतदान झाले.

नागपूर पदवीधर मतदारसंघात सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाले. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.

शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक

पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकात संध्याकाळी पाच पर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 99.31% मतदान झाले.

रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

0

मुंबई, दि. १ : स्वयंसेवी संस्था, शासकिय यंत्रणेतील सर्व घटक यांनी त्यांच्या स्तरावर पुढाकार घेऊन नियमांचे पालन करुन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. थोर व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी व इतर तत्सम कार्यक्रमाच्या दिवशी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

डॉ. शिंगणे यांनी मुंबई व ठाणे येथील रक्तपेढीच्या प्रतिनिधी यांची तातडीने बैठक घेतली. बैठकीला मुंबई व ठाणे येथील 30 रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या कालावधीत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी वेळोवेळी जनतेला रक्तदानासाठी आवाहन केल्यानंतर जनतेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आता अनलॉक काळात नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताची मागणी वाढते आहे. तसेच थॅलेसेमिया, कॅन्सर रुग्णांसाठी सुद्धा नियमित रक्ताची गरज आहेच. यास्तव अनलॉकच्या कालावधीतही रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदात्यांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणे गरजेचे आहे.

डॉ. शिंगणे म्हणाले, राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रक्त उपलब्धततेसाठी कार्यआराखडा तयार करुन प्रयत्न करावेत. रक्तपेढ्यांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. सर्व रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताची गरज भागविण्यात येईल, असेही डॉ.शिंगणे यांनी सांगितले.

रक्तपेढीचे प्रतिनिधी यांनी आपल्या अडीअडचणी बैठकीमध्ये मांडल्या. रक्तदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करुन रक्तसंकलन वाढविण्यात येईल, अशी ग्वाही प्रतिनिधींनी यावेळी दिली.

“बायकोला हवं तरी काय”….?

0

४ डिसेंबर पासून एम एक्स प्लेयर वर “बायकोला हवं तरी काय” दिसू लागणार आहे. सिरीजचे सर्व भाग विनामूल्य पाहता येणार आहेत.प्रियदर्शन जाधव हा या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शकाची भूमिका निभावत आहे. तसेच श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी हे प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

एका पत्नीला आपल्या पतीमध्ये काय हवं असत? रुबाबदार दिसणारा अभिनेता, सिंघम सारखा पोलीस अधिकारी, शांतता प्रिय अध्यात्मिक गुरू किंवा दबदबा असणाऱ्या राजकारण्यासारखा कोणीतरी. आणि मग अशा अनेक गगनउंची गाठलेल्या अपेक्षांसह, प्रत्येक पत्नीला असे वाटते की देवाने तिच्याच पती मध्ये हे सर्व गुण का नाही दिले.
अशीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल “बायकोला हवं तरी काय” ही एक विनोद आणि मनोरंजनाने परिपूर्ण वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. एक सामान्य गृहिणी (श्रेया बुगडे) आपल्या भक्तीने श्रीकृष्णाला (निखिल रत्नपारखी) प्रसन्न करते आणि त्या बदल्यात परमेश्वराकडे तिच्या नवऱ्याला, तिच्या नजरेतल्या सर्वोत्कृष्ट जीवनसाथीच्या प्रतिमेनुसार अपग्रेड करायची मागणी करते हे वेबसिरीजच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतंय.

प्रियदर्शन जाधव याने या ६ भागांच्या वेबसिरीजमध्ये दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून तो वेबसिरीज बद्दल सांगताना म्हणाला, ” प्रत्येकाला आयुष्यात आपण अपग्रेड व्हायला हवं असं नेहमीच वाटत. नवीन गाडी मध्ये अपग्रेड करावा अस वाटत, मोठ घर घेऊन अपग्रेड व्हावं अस वाटत… पण काय होतं जेव्हा आपण आपल्या साथीदाराला “अपग्रेड” करायला जातो? या कथेतून हाच हास्यवर्धक, मनोरंजनाचा कल्लोळ श्रेया, अनिकेत आणि निखिलच्या परफेक्ट टायमिंगसह गोड संदेश देत आपल्या भेटीला येत आहे आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना सिरीज पाहताना ही तितकाच आनंद मिळेल.

श्रेया बुगडे पुढे म्हणाली, “माझे पात्र एका साध्या गृहिणीचे आहे जिला आपल्या पतीसाठी आणि स्वतःसाठी सर्वात चांगल अस सगळं हवं असण्याची इच्छा आहे. मी सीरिज बद्दल एवढेच सांगू शकते की प्रत्येक वेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हणतात तेव्हा नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील आणि मी याची हमी देते की या सर्व गोष्टींच्या शेवटी स्वतः भगवान श्री कृष्णाला ही प्रश्न पडेल नक्की ‘बायकोला हवं तरी काय’.

एमएक्स प्लेयरने अनेक वेगवेगळ्या विषयांच्या कलाकृतीचा नजराणा देत, समांतर, आणि काय हवं, पांडू आणि इडियट बॉक्स सारख्या बहु-शैलीतील मराठी वेब सीरिजद्वारे प्रेक्षकांना आजवर आकर्षित केले आहे. “बायकोला हवं तरी काय” या नवीन सिरीजच्या स्वरूपात हास्य आणि मनोरंजनाची पर्वणी सुरू होतेय ४ डिसेंबर पासून एम एक्स प्लेयर वर. या सिरीजचे सर्व भाग विनामूल्य पाहता येणार आहेत.

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्योजकांनी ब्रँड अम्बॅसिडर बनावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

वेब माध्यमातून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते. यावेळी ‘मिशन एंगेज’ या पुस्तिकेचे तसेच डिजिटल आर्ट या डिजिटल  प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही.

महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येते आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे ११३ वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असते. हे तुम्हाला सांगता येईल. यामुळे महाराष्ट्रात देशभरातून नव्हे परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे दूत व्हावे, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सला 113 वर्ष  झाली आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. ते म्हणाले,  इंडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत जुने स्नेहबंध आहेत. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल, याबाबत आपण चर्चा करत असू. पण आता हे स्वप्न आपल्याला सत्यात आणण्याची संधी मिळाली आहे. संस्थेने स्वातंत्र्यांच्या आधीचा काळही बघितला आहे.  आता युग बदलले आहे. देशही बदलला आहे. देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे आणि याबरोबरच आपले नाते अधिक घट्ट झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. पण या संकटातही पुढे कसे जायचे याचा आपण मार्ग शोधतो आहोत. चेंबरशी संलग्न आपण सर्व हे महाराष्ट्राच्या परिवाराचा भाग आहात. त्यामुळे परिवारातील आपल्या दोघांचेही उद्द‍िष्ट एक आहे. यातून आपल्याला राज्याला पुढे न्यायचे आहे.

अडचणीचा काळ सुरु आहे. पण या काळात नोटबंदीत जसा पैसा गायब झाला, तसा गायब झाला नाही. आता चक्र फिरू लागले आहे. त्यामुळे आता आत्मविश्वासाने पुढे जाऊया. त्यासाठी आम्ही ईझ ऑफ डुईंग बिझनेस सारख्या संकल्पना राबवित आहोत. त्यामध्ये तुम्हा उद्योजकांकडून आणखी सूचना याव्यात. नवीन काही करू शकतो का, त्याबाबत संकल्पना मांडण्यात याव्यात.

परवाना पद्धती सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी पद्धतीही राबवित आहोत. दरम्यानच्या काळात आपण ६० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. जूनमध्ये झालेल्या या करारांनुसार संबंधित उद्योजकांचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी लक्ष घातले जात आहे. यातून महाराष्ट्रात एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास आहे. त्यासाठी आपण एकत्रित काम करताना मिशन एंगेज महाराष्ट्र हे अभियान उपयुक्त ठरेल. या अभियानातून तुम्हाला महाराष्ट्राचा चेहरा म्हणूनही काम करता येईल. देशातील आणि जगातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात या असे सांगता येईल. गुंतवणूक, उद्योग यांच्यासोबतच आपल्याला रोजगार संधी निर्माण व्हाव्यात यावा भर द्यावा लागेल. सामान्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न सुटला, तरच होणाऱ्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ, खरेदीदार मिळू शकेल. यासाठी आपण महाजॉब्ज पोर्टलची व्यवस्था केली आहे. यातून जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम मिळेल असे प्रयत्न करू. अशा अडचणीच्या काळातही महाराष्ट्राकडून जगापुढे आगळा आदर्श ठेवला जाईल. यात तुमच्या सोबत सरकार पूर्ण ताकदीने राहील. महाराष्ट्र बलवान आहेच. त्याला आपण एकत्र येऊन आणखी बलवान करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठी संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

कृषी आणि आरोग्य क्षेत्रात उद्योगाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या असून इंडियन चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेने यात पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

श्री. देसाई  म्हणाले, जागतिक स्तरावर आरोग्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.  यासाठी आले, हळद यासारख्या आरोग्यासाठी लाभकारक ठरू शकणाऱ्या कृषी उत्पादनांची मागणी वाढते आहे. यामुळे आरोग्य  क्षेत्रातही मोठी संधी निर्माण झाली आहे. या उत्पादनांची  निर्यात केल्यास शेतकरी आणि उद्योजक या दोघांसाठीही फायद्याचे ठरणार आहे.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सुरु करण्यात आलेले एंगेज महाराष्ट्र हे अभियान  यशस्वी होईल, यासाठी लागणारे सहकार्य शासनामार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 249

0

पुणे विभागातील 5 लाख 5 हजार 508 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 35 हजार 760 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 5 लाख 5 हजार 508 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 35 हजार 760 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 249 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 42 हजार 901 रुग्णांपैकी 3 लाख 23 हजार 220 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 373 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.26 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 147 रुग्णांपैकी 48 हजार 587 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 869 रुग्णांपैकी 42 हजार 83 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 185 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 601 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 783 रुग्णांपैकी 44 हजार 635 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 451 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 697 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 60 रुग्णांपैकी 46 हजार 983 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 398 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 679 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 853 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 531 , सातारा जिल्ह्यात 88, सोलापूर जिल्ह्यात 179, सांगली जिल्ह्यात 35 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 192 आहे. पुणे जिल्हयामध्ये 743, सातारा जिल्हयामध्ये 207, सोलापूर जिल्हयामध्ये 145, सांगली जिल्हयामध्ये 42 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 55 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 66 हजार 934 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 35 हजार 760 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

चाटेंचा सौरभ जोग सीईटी परीक्षेमध्ये राज्यात सर्वप्रथम…… ..

0

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये चाटे शिक्षण समूहाच्या सौरभ जोग या विद्यार्थ्याने 100 पर्सेंटाइल स्कोर मिळवत राज्यामधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला व चाटे शिक्षण समूहाची उज्वल यशाची परंपरा कायम राखली.

              चाटे शिक्षण समूहातर्फे विविध परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गोपीचंद चाटे सर व चाटे शिक्षण समूह पुणे विभागीय संचालक प्राध्यापक फुलचंद चाटे सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना प्रा गोपीचंद चाटे सर म्हणाले की कोरोनामुळे मागील काही महिन्यापासून उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये कुठेही विचलित न होता अतिशय संयमीपणे व जिद्दीने सौरभ नी मेहनत घेतली व त्याचे शासकीय अभियांत्रिकी पुणे या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न हे सत्यात उतरविले व इतर विद्यार्थ्यांसमोर ही एक आदर्श निर्माण केला याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

               प्राध्यापक फुलचंद चाटे सर यांनीही ही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये चाटे शिक्षण समूहाच्या शैक्षणिक प्रणालीनुसार सातत्यपूर्ण मेहनत घेतल्याने व वेळोवेळी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभल्याने ऑनलाइन माध्यमातून तयारी करून सुद्धा चाटें च्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांमध्ये अभूतपूर्व असे यश कसे संपादन करता आले यावर प्रकाश टाकला. आपल्या पुढील भविष्यकालीन वाटचालीमध्ये सुद्धा चाटे शिक्षण समूहाची नेहमीच आपणास भक्कम साथ राहील अशीही ग्वाही सरांनी विद्यार्थ्यांना दिली.             

              मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यार्थी व पालक यांनी चाटे शिक्षण समूहाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा. विजय बोबडे यांनी केले यावेळी पुणे विभागातील सर्व शाखा व्यवस्थापक कार्यक्रमास उपस्थित होते.

‘मन हे वेडे’ या गाण्याला उत्तम प्रतिसाद …

0

‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे तसेच ‘तुझं माझं जमतय’ या झी युवावर सुरू असलेल्या मालिकेतील अभिनेता रोशन विचारे यांनी अभिनय केलेल्या ‘मन हे वेडे’ या गाण्याला युट्युबवर अवघ्या ४ दिवसांत २ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे, तसेच विविध वाहिन्यांवर देखील गाण्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मन हे वेडे या गाण्याची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. ‘मन हे वेडे’ हे खूप हळुवार आणि रोमँटिक गाणं आहे. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपल्याला प्रेम व्यक्त करता येत नाही, अशा अनेक गोष्टी असतात ज्या बोलता येत नाहीत. प्रेमात प्रचंड ताकद आहे. मन हे वेडे गाणं अशाच अनेक अव्यक्त भावनांना प्रेमाचा हळुवार स्पर्श करतं, पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाची ती जादू अनुभवायला लावतं. स्मिता शेवाळे आणि रोशन यांनी आपल्या अभिनयातून या भावना अतिशय सुरेख पद्धतीने मांडल्या आहेत.

मन हे वेडे या गाण्यात ऐश्वर्या माने आणि पुजा चाफेकर यांची देखील झलक पहायला मिळणार आहे. निर्मिती प्रमुख वैभव लामतुरे तर कार्यकारी निर्माता म्हणून अमोल घोडके यांनी कार्यभार सांभाळला आहे. मन हे वेडे हे गाणं पुण्यातील नयनरम्य अश्या स्नॅपसिटी, तळेगाव या ठिकाणी चित्रीत झाले आहे.

‘अस्सं माहेर नको गं बाई’ ७ डिसेंबरपासून…

0

लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेर, आणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळाली तर?

अशीच कथा आहे सोनी मराठी वाहिनीवर नवीन येणाऱ्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ मालिकेची. सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणि श्रद्धेमुळे पाणी पडत. सहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहे. अशा आशयाचा एक प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला.

या मालिकेत स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

पुष्कराज आणि स्वानंदी ही जोडी या आधीही काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता हीच जोडी पुन्हा या मालिकेत दिसणार आहे .

‘अस्सं माहेर नको गं बाई’ ७ डिसेंबरपासून सोम.-शनि. रात्री १०:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.2 Attachments

डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी करोनावरची लस दिली जाणार-राजेश टोपे

0

मुंबई-कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होतो आहे. या सगळ्यावर भाष्य करत राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असं त्यांनी म्हटलं आहे.जगभरात विविध कंपन्या करोनाची लस शोधत आहेत. कोणती लस बाजारात आधी येणार? यासंबंधीही प्रश्न विचारले जात आहेत. तर दुसरीकडे करोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे.

उर्मिला मातोंडकरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश

0

राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिलाच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 27 मार्च 2019 रोजी उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिने उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कठोर परिश्रम करूनही तिला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सहकार्य न करण्याचा आरोप करत 10 सप्टेंबर 2019 रोजी काँग्रेसचा हात सोडला. एक वर्ष दोन महिन्यांनंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आहे.

राज्यपालांच्या कोट्यातील नामांकनासाठी 11 इतर लोकांची नावे महाविकास आघाडी सरकारने पाठवली आहेत. राज्यपालांनी या 12 नावांच्या यादीला मंजुरी देणार आहे. उर्मिलाने अलिकडेच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रनोटवर टीका केली होती. ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हाती घेणार अशी चर्चा होती, पण आता याची पुष्टी झाली आहे.

उर्मिलाची चित्रपट कारकीर्द

4 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या उर्मिलाने 1982 सालच्या ‘कलयुग’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 1991 च्या नरसिम्हा चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर 1995 मध्ये रंगीला, 1997 मध्ये जुदाई आणि 1998 मध्ये सत्या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे कौतुक केले. या तिन्ही चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

9 वर्षांनी लहान व्यावसायिकासोबत केले लग्न

उर्मिलाने 2016 मध्ये 9 वर्षांनी लहान काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरसोबत विवाह केला. मोहसिनने जोया अख्तर दिग्दर्शित ‘लक बाय चान्स’ चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ते फरहान अख्तरसोबत मॉडेलिंग करताना दिसले होते.

अभय योजनेमुळे महापालिकेच्या तिजोरीत भर दमदार

0

करदाते समाधानी -महापालिका समाधानी

अवाजवी दंड आणि भरमसाठ व्याजाने फुगत थकत चाललेल्या वादग्रस्त मह्सुलीचा विषय निघतोय निकाली

अभय योजनेत दि. ०२ ऑक्टोबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२०:
१,१२,२९१ मिळकतधारकांकडुन
३५० कोटी जमा
🔺एकुण दि.०१ एप्रिल २०२० ते ३० नोव्हेंबर २०२०:
६,९९,१७१ मिळकतधारकांकडुन
१२०० कोटी जमा
🔺काल एका दिवसात (३० नोव्हेंबर २०२०):
११,२१७ मिळकतधारकांकडुन
४२ कोटी जमा

पुणे – गेल्या आठ महिन्यांपासून करोनामुळे आर्थिक उत्पन्नाचा ताळमेळ ढासळलेल्या महापालिकेस मिळकतकर थकबाकीदारांच्या अभय योजनेमुळे दिलासा मिळाला. यातून तब्बल 341 कोटींचा महसूल मिळाला आहे.योजनेचा मागील दोन महिन्यांत सुमारे 1 लाख 10 हजार 110 मिळकतधारकांनी लाभ घेतला असून पुढील आर्थिक वर्षापासून हे नियमित मिळकतधारक होणार आहेत. त्यामुळे पालिकेस पुढील वर्षापासून सुमारे 300 कोटींचे उत्पन्न वाढणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.दरम्यान स्थायी समितीचे अध्यक्ष रासने यांनी सांगितले कि,अभय योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी विचाराधीन आहे. पालिकेतील पक्षनेते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. पालिकेच्या महसूलवाढीसाठी आणखी योजना राबवून वर्षअखेरपर्यंत पाच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.

शहरातील थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेतून पुणे महापालिकेला दोन महिन्यांत हे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून नोव्हेंबरअखेरपर्यंत पालिकेच्या तिजोरीत बाराशे कोटी रुपये जमा झाले आहेत. पालिका हद्दीतील साडेदहा लाख मिळकतींपैकी सात लाख १८ हजार मिळकतदारांनी करभरणा केला असून, अजूनही तीन लाख मिळकतदार कर भरण्यापासून लांबच आहेत. करोनामुळे यंदा पालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नावर परिणाम होईल, अशी भीती वर्तविण्यात येत होती. मात्र, पुणेकरांनी पालिकेचा कर भरण्यासाठी सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर थकबाकी वसूल करण्याकरिता दंड आणि व्याजावर ८० टक्के सूट देणारी अभय योजना एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांमध्ये एक लाख १० हजार मिळकतदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातही नोव्हेंबरमध्ये लाभ घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, या महिन्यातच २१८ कोटी रुपये पालिकेच्या मिळाले आहेत. अभय योजनेतून तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाल्याने चालू आर्थिक वर्षातील मिळकतकराचे उत्पन्न बाराशे कोटींवर पोहोचले आहे.महापालिकेसह नव्याने समाविष्ट ११ गावांतील मिळकतींची एकत्रित संख्या साडेदहा लाखांच्या दरम्यान आहे. अभय योजनेपूर्वी त्यापैकी सहा लाख मिळकतदारांनी कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पालिकेचा कर भरला होता. अभय योजनेत त्यात आणखी नागरिकांची भर पडल्याने चालू वर्षात पालिकेच्या एकूण मिळकतींपैकी जवळपास ७० टक्के नागरिकांनी कर भरला आहे. लॉकडाउनचा फटका बसूनही नागरिकांनी कर भरण्यास प्राधान्य दिल्याने महापालिकेने नागरिकांचे आभार मानले आहेत.महापालिकेचा मिळकतकर थकविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मिळकतकराची मूळ मागणी आणि त्यावरील दंड-व्याज यांसह संपूर्ण थकबाकीची वसुली केली असती, तर पालिकेला सुमारे पाचशे कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त झाले असते. मात्र, अभय योजनेत कर भरणाऱ्यांना ८० टक्के सवलत देण्यात आल्या आहे.

(सर्व आकडे कोटी रुपयांमध्ये)

वर्ष – प्राप्त महसूल दिलेली सवलत
२०१५-१६ ३७७ ९०
२०१६-१७ ३११ ९०
२०२०-२१ ३५० १७५




आठ महिन्यानंतर पुणे-जम्मूतावी धावणार

0

पुणे- आठ महिन्यानंतर पुणे-जम्मूतावी लोहमार्गावर १ डिसेंबर पासून विशेष ट्रेन धावणार आहे. २१७१ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सात राज्ये व एका केंद्रशासित राज्यातून ही ट्रेन धावणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च पासून पूर्णपणे ठप्प असलेली देशभरातील रेल्वे सेवा निर्बंध शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत आहे. पुणे – जम्मूतावी (झेलम एक्सप्रेस) २२ मार्च पासून बंद होती.

परंतु रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विषेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ डिसेंबर रोजी पुणे – जम्मूतावी दरम्यान विशेष ट्रेन पुणे येथून संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी रवाना होणार आहे. या ट्रेन मध्ये प्रवाशांकरिता १० स्लीपर क्लास, ०५ सेकंड क्लास, ०२ एसी टू टीयर, ०६ एसी थ्री टीयर, असे एकूण २३ डब्बे असणार आहेत.

पुणे-जम्मूतावी ही ट्रेन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली , हरियाणा, पंजाब या सात राज्यांसह जम्मू व काश्मीर या केंद्र शासित प्रदेशातून जाणारी ट्रेन आहे. एकूण ५९ थांबे घेत २१७१ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला किमान ४० तासांचा कालावधी लागणार आहे.

ही ट्रेन दौंड रेल्वे स्थानक येथे येणार नसून त्याऐवजी पुणे-पाटस-सोनवडी-नगर या नूतन लोहमार्गावरील कॉर्ड लाइनवर मार्गक्रमण करणार आहे. सोनवडी (ता. दौंड) स्थानकावर या ट्रेनला दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुणे – जम्मूतावी व जम्मूतावी – पुणे विशेष ट्रेन दररोज धावणार आहे.

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी नाविक पदासाठी भरती

0

दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) नाविक पदासाठी भरती Indian Coast Guard Navik Vacancy 2020 सुरु केली आहे. भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर अर्ज प्रक्रिया सुरू केली गेली आहे.

या पदांवर निवड झाल्यास तरुणांना सुरुवातीच्या लेवल-३ नुसार २१ हजार ७०० रुपये मूलभूत वेतन मिळेल. याशिवाय डीए व इतर भत्तेही देण्यात येतील. तर प्रधान अधिकारी पदाच्या पदोन्नतीनंतर बेसिक पे लेवल-८ नुसार दरमहा ४७ हजार ६०० रुपये होईल.

डीए स्वतंत्रपणे प्राप्त होईल.

ही आहे पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. एससी, एसटी आणि क्रीडा कोटा अंतर्गत तरुणांना ५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २२ वर्षे असावे. एससी आणि एसटी प्रवर्गात जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये ५ वर्षे आणि ओबीसींसाठी ३ वर्षांची सवलत मिळेल.

भारतीय तटरक्षक दलाला दिलेल्या अधिसूचनेच्या शेवटी क्यूआर कोड देण्यात आला आहे. आपल्या स्मार्टफोनमधून हा क्यूआर कोड स्कॅन करून आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आजपासून (ता.३०) अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपण ७ डिसेंबर २०२०रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकता.

पोस्ट तपशील

कुक आणि स्टीवर्ड यांची भरती होईल. एकूण ५० पदांवर भरती होईल.

निवड प्रक्रिया
निवड परीक्षेच्या आधारे केली जाईल. निवड परीक्षेसाठी प्रवेशपत्रे १९ डिसेंबर२०२० ते २५ डिसेंबर २०२० पर्यंत डाउनलोड करता येतील.

कास्टिंग डायरेक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल:अभिनेत्रीचे 2 वर्षे लैंगिक शोषण

0

मुंबई-टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आयुष तिवारीविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप आयुष तिवारीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आयुषने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केल्याचे या अभिनेत्रीने दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नाही तर मागील काही दिवसांपासून पोर्न व्हिडिओ पाठवून तो त्रास देत असल्याचेही तिने म्हटले आहे.

मागील दोन वर्षांपासून आरोपीला ओळखते पीडिता
वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून पीडितेचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी समन्स बजावून आयुष तिवारीला पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. लग्नाचे आमिष दाखवून आयुषने पीडित अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. मात्र, आयुषने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेत आयुषविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडिला आरोपीला मागील दोन वर्षांपासून ओळखत होती. 25 नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलिस ठाण्यात आयुष विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याच्यावर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोर्न व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
दरम्यान, आयुषने या पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्ष बलात्कार केला. मात्र, ऐनवेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पोर्न व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने आरोपी आयुष तिवारीवर लावला आहे.

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले, ‘आयुष अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार करायचा. काही दिवसांपासून तिने आयुषची साथ सोडली. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर तो मोबाइलवर अश्लील क्लिप पाठवत राहिला.’ आरोपी आपल्याला मारहाण करत असल्याचेही पीडितेने म्हटले आहे.

सत्तेसाठी शिवसेनेची मूळ विचाराला तिलांजली-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

मुंबई, दि. ३० : शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे विधान हे शिवसेनेचे सत्तेनंतरचे बदलते स्वरूप स्पष्ट करणारे विधान आहे. यात कहर म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा दाखला त्यात देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ आचार विचाराला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, हे याचेच द्योतक आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अजान पठण स्पर्धेच्या घोषणेवर दरेकर यांनी टिका केली आहे.
अजानमुळे मन:शांती मिळते. त्यामुळे अजानची गोडी लहान मुलांना लागवी यासाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याचे पांडुरंग सपकाळ यांनी सांगितले आहे. ज्याप्रमाणे महाआरती होते तशीच अजान अदा केली जाते. अजानला विरोध करण्याचा प्रश्नच नाही असंही सकपाळ यांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेनेचं स्वरुप बदलत आहे. शिवसेनाप्रमुख प्रत्येक धर्म प्यारा असे बोलले असतील, परंतु त्यांची पालखी उचला असं ते कधी बोलले नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी त्यांच्या आचार विचारावर टीका केली.पण सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. तसेच मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला तसेच नेतृत्वाला तिलांजली देण्याकडे वाटचाल सुरु केली आहे हे याचेच द्योतक आहे, असेही दरेकर यांनी नमुद केले आहे.