Home Blog Page 2368

टोल कसला घेताय .. डोंबलाचा…?

0

पुणे- देणाऱ्यांचे हाथ हजार … म्हटल्यावर घेणारा आखडणार तरी कसा ? पण जनाची नाही तर मनाची तरी वाटावी सरकारांना .. अशी स्थिती आपल्या राज्यात आहे . सुपारी च्या खांडकापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत राज्याचा वेगळा , केंद्राचा वेगळा जीएसटी घेऊन लुटमार करणाऱ्या सरकारांना स्वतः च्या पैशातून करवून देणे शक्य होत नाही आणि अन्यत्र मात्र उधळपट्टी करता येते . या सारखे दुर्दैव भारतीयांच्या नशिबी येणे साहजिकच आहे.

याच विचारांच्या पार्श्वभूमीवर ….

कोकण भुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी स्थापन केलेल्या कोंकण महामार्ग समन्वय समितीचा  अभ्यासदौरा १७,१८  डिसेंबर रोजी  आयोजित करण्यात आला होता.या समितीत  यादवराव यांच्यासह अनेक तज्ञ,निवृत्त अधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहिले. महामार्गाच्या कामांमधील त्रुटींची पाहणी करुन सविस्तर अहवाल शासनाला देऊन दर्जेदार महामार्गासाठी जनजागृती करून  व्यापक जनआंदोलन उभारण्याचा हा प्रयत्न आहे .चौपदरीकरण झालेला   चांगला महामार्ग कोकण वासियांना मिळाला नाही  तर टोल ही मिळणार नाही’,अशी भूमिका संजय यादवराव यांनी जाहीर केली.   
  संजय यादवराव,यशवंत पंडित,जगदीश ठोसर,एड संदीप चिकणे,सतीश लळीत,विकास शेट्ये,राजू भाटलेकर,युयुत्सु आर्ते,पंडित रावराणे,विलास आंब्रे,राजू आंब्रे यांच्यासह अनेक मान्यवर या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले. खेड ते हातखंबा या टप्प्याचा दौरा १७ डिसेंबरला,हातखंबा ते खारेपाटण या टप्प्याचा दौरा १८ डिसेंबरला  आयोजित करण्यात आला होता.   

  मुंबई कोंकण महामार्गाच्या चारपदरी रुंदीकरणाचे काम गेली  दहा वर्षे रखडत सुरु आहे.कोंकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.यामुळे उन्हाळी सुटीत किंवा गौरीगणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांना पुणे, कोल्हापूरमार्गे कोंकणात यावे लागते.याशिवाय सद्या जे अर्धवट काम झाले आहे, त्यामुळे वारंवार अपघात होऊन निरपराध नागरिक प्राणाला मुकत आहेत.     
पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला  महामार्ग आहे.दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी अभियानास ७ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकण वासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा करण्यात आला .’ कोकणात दर्जेदार कोकण हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,असे कोकण भूमी प्रतिष्ठांनचे अध्यक्ष आणि’समृद्ध कोकण महामार्ग अभियान’चे प्रणेते  संजय यादवराव यांनी सांगितले. 
राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकण वासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन  सुरू करावी , एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगट निर्माण करावा ,वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी ,असेही आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.  

खेड शिवापूर तोल नाक्याचं झालं तरी काय ?

टोलमुक्त महाराष्ट्र च्या भूमिकेचा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना विसर पडतो . मनसे ला नावे ठेवणारी राजकीय पक्ष यात आघाडीवरच असल्याचे दिसून आले आहे. रमेश वांजळे यांनी आंदोलन करून कित्येक वर्षे उलटली .. पण या आंदोलनाला यश आले का हो ? असा प्रश्न विचारला तर … ? त्यानंतरही आंदोलने झाली . खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे भेट दिली , केंदीय मंत्र्यांना फोन लावला ..वगैरे वगैरे .. पण पुढे काय .. काय झालं तरी काय खेद शिवापूर तोल नाक्याचं …

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे चा टोल बंद करण्याची भूमिका आहे कि नाही ?

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे चा टोल सुरु होऊन आता २० वर्षे होत आलीत . माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या टोल बाबत वेळोवेळी आक्षेप नोंदविले . पण या साऱ्यांचं पुढ होतं तरी काय ? हे कधीच कुणाला समजत नाही . डीएसके यांचा अपघात याच रस्त्यावर झाला होता तेव्हा त्यांनी या रस्त्याचे डिझाईन चुकीचे असल्याचा जाहीर आक्षेप घेतला होता . पण त्यावरही पुढे काही झाले नाही .बरे या रस्त्यावर सुरळीत वाहतूक सेवा देण्यासाठीच टोल आहे पण अनेकदा येथे हि वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला सर्वांनींच अनुभवला आहे. तेव्हा त्यांचा टोल तरी किमान परत केला जातो का हो ?

जबाबदाऱ्यांची पूर्तता न करता केलेली टोल वसुली म्हणजे लुटमार , वाटमारी असा निनाय कुठल्या न्यायालयाने आजवर का दिला नाही हेही कोडेच आहे. कुठल्याही टोलनाक्यावर कधीपासून टोल सुरु झाला आता जमा होणारी रक्कम कशी ..कशी वाढते आहे हे संगणकीय पद्धतीने पारदर्शक पणे दाखविणारी यंत्रणा नाहीच . सोयी सुविधाच देत नाही तर १०० /१०० रुपयांनी वाढणारा सेकंदा सेकंदाची टोल रक्कम हे तरी कशी दाखविणार म्हना… काहीही असो , पैसे योग्य घ्या .. आणि जबाबदारी हि योग्य हाताळा… किमान यावर अंकुश ठेवायला राज्यातील कुठलीही व्यवस्था विश्वासार्ह उरलेली नाही हे मात्र निश्चित .

सुमारे ७००० कुटुंबांना MNGL गॅस बंद पाईप लाईनद्वारे पुरवठा करण्यास सुरुवात

0

पुणे- आज बाणेर येथील ॲार्किड टॅावर्स सोसायटी मध्ये MNGL गॅस बंद पाईप लाईनद्वारे पुरवठा करण्यास सुरुवात झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या योजनेचे उदघाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले . आजपर्यंत प्रभागातील सुमारे १०८ सोसायटींमधील सुमारे ७००० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून येत्या दोन महिन्यात जवळपास ७० सोसायटींमध्ये हि सुविधा उपलब्ध होईल. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, MNGL चे एम.डी.सुप्रियो हलदार, संतोष सोनटक्के, चेअरमन सुबोध सायखेडकर, सेक्रेटरी आरती राव, गोविंद सुर्यवंशी, प्रविण कुलंगे, अमोद वाणी, लोकेंद्र सिंग, पलक शहा इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत – कृषीमंत्री दादाजी भुसे

0

मुंबई, दि. 18 : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत.

दापोलीत तेजस्विनी लोणारी …

0

पुणे- पुण्या मुंबईच्या माणसाला दापोलीचं आकर्षण भारी …कर्द्याचा समुद्र किनारा, हरणे बंदर आणि एकुच अलिबाग ते मुरुड जंजिरा आणि तेथून दापोलीचा समुद्र किनारा हा नेहमीच पुण्या मुंबईचा आवडीचा , आनंदी जीवनाचा विषय राहिला आहे . खरे तर या २ मोठ्या शहरातील ताण तणाव घालवायला असंख्य मंडळी येथे येतात .विशेष म्हणजे आता दापोलीत मिडिया ला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं हि दर्शन अलीकडेच झालं. अर्थात सद्या लोकं निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात, पण अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हि स्वतःची तब्येत उत्तम ठेवण्यासाठी  भारतीय पारंपरिक योगा करणे जास्त  पसंत करते. आणि दापोली मध्ये निसर्गाच्या सानिध्यात योगा करताना ती दिसली, त्यावेळीची काही छायाचित्रे.

मुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 18 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्याद्वारे जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१९-२० या वर्षाकरिता पुरस्कार देण्यात येणार आहेत.

क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत. सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

खेळाडू पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष – खेळाडूने पुरस्कार वर्षांसह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. खेळाडुंची मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठ-कनिष्ठ शालेय, राष्ट्रीय शालेय व केंद्र शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि यापैकी उत्कृष्ट तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.वरील प्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली (पु्र्व) मुंबई ४००१०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/२८८७११०५ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

आंजर्ले समुद्रकिनारी पुण्यातील तिघांचा बुडून मृत्यू

0

पुणे : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी पुण्यातून आलेल्या तीन पर्यटकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्यातील औंध येथून दापोली तालुक्यातील आंजर्लेला एका कंपनीतील 14 तरूण मुले शुक्रवारी (18 डिसेंबर) गेली होती. त्यातील सहा जण सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहोण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. त्यातील तीन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, स्थानिक युवकांच्या मदतीने तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पर्यटनसाठी आलेल्या आपल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या मित्रांना धक्का बसला आहे. मृत पावलेल्या तरूणांच्या कुटुंंबांवरही शोककळा पसरली आहे.

अक्षय राखलेकर (वय 25), विक्रम श्रीवास्तव (वय 24), मनोज गावंडे (वय 24) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर रोहित पलांडे, उबेद खान आणि निहाल चव्हाण यांना वाचविण्यात यश मिळाले आहे. त्यांच्यावर आंजर्लेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एका कंपनीत काम करणारी 14 तरूण मुले शुक्रवारी ( 18 डिसेंबर) पर्यटनासाठी आंजर्ले (ता.दापोली) येथे गेली होती. त्यातील सहा तरूणांना समुद्रामध्ये जाण्याचा मोह झाला आणि ते समुद्रात उतरले. मात्र पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बुडायला लागले. तिथल्या एका छोट्या मुलाने ते पाहिले आणि त्याने धावत जाऊन स्थानिक युवकांना माहिती दिली. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांनी मोठ्या शर्थीने या सहा तरूणांना बाहेर काढले. पण दुर्देवाने त्यातील तीन तरूण हे बुडाले.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 584

0

पुणे विभागातील 5 लाख 25 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 52 हजार 747 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 25 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 52 हजार 747 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 584 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 54 हजार 624 रुग्णांपैकी 3 लाख 37 हजार 184 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 865 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 421 रुग्णांपैकी 50 हजार 641 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 36 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 7 रुग्णांपैकी 45 हजार 76 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 257 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 674 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 341 रुग्णांपैकी 45 हजार 316 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 300 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 354 रुग्णांपैकी 47 हजार 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 126 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 986 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 740, सातारा जिल्ह्यात 89, सोलापूर जिल्ह्यात 99, सांगली जिल्ह्यात 38 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 893 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 627, सातारा जिल्हयामध्ये 100, सोलापूर जिल्हयामध्ये 139, सांगली जिल्हयामध्ये 27 व कोल्हापूर जिल्हयामध्ये ० रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 30 हजार 493 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 52 हजार 747 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 17 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

अगोदर ९ हजार कोटी द्या, नंतरच २३ गावे समाविष्ट करा : महापौर मुरलीधर मोहोळ

0

पुणे : पालिकेच्या हद्दीत २०१७ साली समावेश झालेल्या ११ गावांसाठी आधी ९ हजार कोटी द्या. मगच उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पालिकेच्या हद्दीत समावेश करा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. गावे समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध नाही, पण आधीच्याच गावांमधील नागरी समस्या संपलेल्या नसल्याचे महापौर म्हणाले.

पालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविस्ट करण्याच्या हालचाली राज्य शासन स्तरावर सुरू आहेत. याविषयी महापौर म्हणाले, पालिकेच्या हद्दीत २०१७ साली समावेश करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये रस्ते, पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा नाहीत. तेथे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. रस्त्यांची दुरावस्था आहे. त्यातच नव्याने २३ गावांचा समावेश झाल्यास आणखी अडचणी वाढतील. त्यामुळे सरसकट समावेश न करता टप्प्याटप्प्याने करावा.

११ गावांचा विकास आराखडा तयार करून पायाभूत विकास करण्यासाठी ९ हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली. या गावांच्या पायाभूत सुविधा उभ्या करताना पालिकेवर आर्थिक ताण येत असल्याचे मोहोळ म्हणाले. त्यामुळे नवीन गावे समाविष्ट करताना राज्य सरकारने निधी द्यावा अशी आग्रही मागणी मोहोळ यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून गावे समाविष्ट करण्याचा निर्णय…

पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे 23 गावं पुणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात अध्यादेश काढण्याची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट होतील, अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे.

मृत्यमुखी पडलेले डॉक्टर, नर्सेस,स्टाफ,पोलीस व नागरिक यांच्या स्मरणार्थ ‘कोरोना स्मारक’ उभारावे – आबा बागुल

0

पुणे- कोरोना ने मृत्युमुखी पडलेल्यांची स्मृती जपून त्यापासून आगामी वाटचालीस प्रेरणा मिळावी या हेतूने पुण्यात ‘कोरोना स्मारक ‘ उभारावे असा प्रस्ताव कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेपुढे ठेवला आहे. मात्र दुर्दैवाने महापालिकेच्या मुख्य सभा कोरोना आल्या पासून आजतागायत चालविल्या गेलेल्या नाहीत . सातत्याने ओंन लाईन झालेल्या कोणत्याही मुख्य सभेत काहीही कामकाज होऊ शकलेले नाही

दरम्यान या संदर्भात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,’ गेल्या सुमारे ०९ (नऊ) महिन्यापासून जग, देश, महाराष्ट्र आणि पुण्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला त्यात लाखो नागरिक बळी पडले आहेत. ही अत्यंत दुखद व वेदना देणारी बाब आहे. पुणे शहरातही कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव होऊन हजारो पुणेकर मृत्युमुखी पडले. या सर्वाना चांगली वैद्यकीय सेवा द्यावी. या कोरोना विषाणूवर उपचार व्हावे. यासाठी पुणे महानगरपालिकेच्यावतीने त्यांचे डॉक्टर, नर्सेस, स्टाफ यांनी शर्तीचे प्रयत्न केले तसेच खाजगी हॉस्पिटल मधील व राज्यसरकारच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस, स्टाफ व प्रशासनाने देखील खूप प्रयत्न केले, त्यामुळे अनेक जीव वाचले हे देखील सत्य आहे.
मात्र जे रुग्ण कोरोना व्याधीमुळे त्रस्त होऊन त्या व्याधीवर मात करू शकले नाहीत, त्यांना दुर्दैवाने मृत्युला सामोरे जावे लागले हि दुर्दैवी बाब आहे. आता जसा जसा काळ जाईल तसा तसा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील आटोक्यात येण्याची अपेक्षा आहे. त्याच्यावर औषध आल्यानंतर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील कमी येईल अशी आशा आहे. कोरोना कायमचा नष्ट होईल असे नसले तरी त्याचा प्रभाव अगदी एक – दोन वर्षात खूपच कमी होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवरती युद्धात धारातीर्थ पडलेल्या सैनिकांचे जसे आपण स्मारक तयार करतो व श्रद्धांजली वाहतो त्याप्रमाणे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात मृत्युमुखी पडलेल्या पुणेकरांची आठवण राहावी व त्यांना श्रद्धांजली वाहता यावी, यासाठी स्मारक उभारण्यात यावे. पुण्यात पहिला कोरोना रुग्ण ज्या दिवशी सापडला तो दिवस पुण्याच्या दृष्टीने ‘कोरोना दिवस’ म्हणून पाळला तर औचित्यपूर्ण होईल असे आम्हास वाटते.
हे स्मारक केल्यास त्यापासून प्रेरणा घेऊन पुण्याची सार्वजनिक आरोग्यसेवा व संसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा कशी उभी करता येईल. यासाठी कश्या पद्धतीने योजना अमलात आणण्यात येईल. त्याचाही संकल्प वेळोवेळी करता येईल. याविषयी मुख्य सभेने मान्यता द्यावी.
असा ठराव मुख्य सभेस .आबा बागुल व सभासद रफिक शेख यांनी दिला आहे.

महापालिकेच्या शाळांचे अत्याधुनिकीकरण करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

0

पुणे-

केंद्र सरकारच्या वतीने अटल मिशन अंतर्गत देशातील सर्व सरकारी शाळांसाठी मोठी मदत मिळते. याचा सविस्तर अभ्यास करुन आपापल्या प्रभागातील मनपा शाळांचे अत्याधुनिकीकरण करावे, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. कोथरूड मतदारसंघातील एरंडवणे मधील पुणे मनपा संचालित श्रीमती अनुसयाबाई खिलारे माध्यमिक विद्यालयातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे लोकार्पण श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमावेळी पुणे मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, प्रभाग समितीच्या स्विकृत सदस्या मिताली सावळेकर, कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजप सरचिटणीस गिरीश भेलके, कोथरुड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, पुणे शहर भाजपा प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस प्राची बागटे, बाळासाहेब धानवे, मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी यांच्यासह शाळेतल्या मुख्याध्यापिका सौ. नाईक आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, “शाळा, क्रीडांगण, प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून मुलांची सृजनशीलता वाढते. प्रयोगशाळा यातील अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अटल मिशनचा सर्व नगरसेवकांनी सखोल अभ्यास करुन, आपापल्या प्रभागातील शाळांचे अत्याधुनिकीकरण करावे.”

ते पुढे म्हणाले की, “केवळ महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नाहीत, त्यामुळे अनेकजण आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळांमध्ये करतात. हे चित्र बदलण्यासाठी आपण आपल्या सरकारच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट सव्वा लाखाने वाढवला. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्वरुप बदललं. असेच अनेक प्रयोग महानगरपालिका शाळांसाठी करावे लागतील. यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.” असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, नगरसेविका आणि पुणे मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकारातून एरंडवणे येथील सर्वतीर्थ सुधीर फडके भूयारी मार्गाच्या नुतनीकरण कामाचे लोकार्पण श्री‌. पाटील यांनी केले.

महापालिकेतील ‘त्या ‘ संबधितांवर गुन्हे दाखल करा – दिपाली धुमाळ

0

पुणे- कोरोनाने मृत पावलेल्या महापालिकेच्या सेवकांच्या वारसांना केंद्र सरकारकडून ५० लाख आणि महापालिकेकडून ५० लाख रुपयांची मदत जाहीर करून प्रत्यक्षात अशी कोणतीही मदत न केल्याने हि घोषणा फसवी ठरली आहे म्हणून असे सुरक्षा कवच योजना जाहिर करणा-यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्तांना धुमाळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि , मार्च २०२० पासून शहरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भितीदायक होती. शासनाकडून माहे एप्रिल व माहे मे २०२० मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. यावेळी महापालिकेचे सेवक कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत नेमणूकीने कोविड सेंटर्स, विलगीकरण कक्ष व इतर कामे करत होते. तसेच शहरातील कचरा उलचणे व विविध समस्यांचे काम देखील महापालिकेच्या सेवकांकडून करण्यात येत होते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत कामे करताना कोरोनाने आजपर्यंत ४६ महापालिकेच्या सेवकांचा मृत्यु झालेला आहे. अशा मृत पावलेल्या कुटुंबियांवर अचानक हा एक प्रकारचा अपघात असल्याने सत्ताधारी पक्षाकडून सुरक्षा कवच योजनेची घोषणा करण्यात आली. यामध्ये केंद्र शासनाकडून ५० लाखाची आर्थिक मदत व मनपाकडून ५० लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार होती. तसेच कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांच्या वारसाने नोकरीची मागणी केल्यास त्यास २५ लाखाची मदत देण्यात येणार असे घोषित केले होते. या घोषणांची अंमलबजावणी अदयापपर्यंत करण्यात आली नाही. सदर विषयी मुख्य सभेपुढे विषयपत्र ठेवण्यात आले आहे, त्यास मान्यता नाही असे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येते. प्रशासनाकडून तातडीच्या कामासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ६७ (३) (क) अन्वये कार्यवाही करण्यात आली, अशा कामांना कायदयातून पळवाट काढण्यात प्रशासन व सत्ताधारी आग्रही दिसतात. परंतू कोरोनाने मृत पावलेल्या महापालिकेच्या सेवकांच्या वारसांना लाभ देताना कायदा दाखविला जातो, यावेळी मुख्य सभा मान्यता देईल या भरवश्यावर कार्यवाही केली जात नाही, ही बाब खेदाने नमूद करत आहोत.
पुणे महापालिकेच्या कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांना वेळेत मदत न देणे हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय असून ही त्यांची फसवणूक आहे. आम्ही सदर प्रकरणी वारंवार पत्रव्यवहार करत आहोत, परंतू प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही, ही दुर्देवी बाब आहे. एक प्रकारे सत्ताधारी व प्रशासन कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांच्या कुटुंबियांची फसवणूक करत असल्याने मनपा सेवकांसाठी सुरक्षा कवच योजना जाहिर करणा-यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हलचे पुण्यात आयोजन

0

पुणे, दि. १८ डिसेंबर: माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश असेल. 11 आणि 12 जानेवारी रोजी पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे फेस्टिवल माय अर्थ फौंडेशन,सस्टेनाबिलीटी इनिशीएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.

यावेळी एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीयाचे ललित राठी, सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

अनंत घरत म्हणाले कि, हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवकांनी या लघुपट महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन अनंत घरत यांनी केले आहे.

राज्यस्तरीय पुणे पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत myearththree@gmail.com यावर मेल करावा किंवा 9561792055 यावर संपर्क साधण्याचे आवाहन सोमनाथ पाटील यांनी केले.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी व संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा आणि हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात योगदान देण्याचे आवाहन सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे यांनी केले.

कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता हा विषयावर जास्तीत जास्त प्रबोधनात्मक फिल्म्स व्हाव्यात असे मत ललित राठी यांनी व्यक्त केले.

पवारांचा पंटर, खबऱ्या,आपला पगार किती आणि आपण बोलता किती? …,” संजय राऊतांना खरमरीत पत्र

0

सामना च्या अग्रलेखात फेकूचंद असा उल्लेख केल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सत्तेच्या धुंदीत लेखणी विरोधकांवर चालते अशी टीका संजय राऊतांनी केली असून मराठा मोर्चांना मूक म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर आपणास खरंतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो असं म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर आपलं पत्र शेअर केलं आहे. “सामना मी कधी वाचत नाही. सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच,” असं त्यांनी पत्र ट्विट करताना म्हटलं आहे.

काय लिहिलं आहे पत्रात –
खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे.

आपण सामनाच्या अग्रलेखात जी मुक्ताफळं उधळली आहेत ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून लिहित आहे. त्या अग्रलेखात आपण असे लिहिले की, ‘महाराष्ट्रात हुकूमशाही आणि आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे’.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मी धनगरी पेहराव करुन ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण न भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश. मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खांशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन. ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार.

“राज्याच्या प्रतिष्ठेवर दारुची गुळणी करणाऱ्याला जाब विचारताना संजय राऊतांनी दारुची दुकानं उघडून मंदिर बंद ठेवण्याने राज्याची कोणती प्रतिष्ठा वाढली गेली हे ही सांगावे. फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दानगीचं प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? शत्रुगटातील स्त्री असली तरी तिची खणा-नारळाने ओटी भरुन यथोचित सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. का ते ही महाविकास आघाडीत जाऊन विसरले?.

संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या.

शरद पवार यांच्या विषयी मी मध्यंतरी काही विधानं केली. तेव्हा आपला चांगलाच जळफळाट झाला होता. ते साहजिकच आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र सांगतात. माझ्यात सभ्यता आहे आणि अजूनतरी ती मी आपल्याबाबतीत सोडलेली नाही. पण आपली एकूणच पवारांबाबतची हुजरेगिरी पाहता आपल्याला तीच उपाधी मी देखील द्यावी, असं राहून राहून वाटते.

पवारांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि वृक्षमित्रांचा सन्मान

0

पुणे- तळजाई टेकडी येथे राष्ट्रवादी चे नेते खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 80 देशी रोपे लागवड उपक्रम खासदार सौ.वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी वृक्ष मित्रांचा सन्मान खा.चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला . शहर राष्ट्रवादी अर्बन सेलचे समन्वयक नितीन कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी खा. चव्हाण यांनी पर्यावरणाचे संतुलित कसे राखले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.पुण्यातील तळजाई टेकडी, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, शाहू कॉलेज टेकडी या परिसरामध्ये वृक्ष लागवडीस शरद पवार हे मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री असताना चालना दिली होती याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच झाडे रुजली तरचं माणसाचे जगणं फुलेले हाच ध्यास ठेऊन प्रत्येक व्यक्तीने रोपे लागवडीस हातभार लावावा तसेच या सर्व रोपांची जपणूक करून त्यांची विशेष काळजी घेण्याची हमी ही घेण्यात आली.येणाऱ्या काळात प्रत्येकाने एक तरी रोप लावून त्यांचे संवर्धन करून पर्यावरण संतुलित राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कोरोना काळामध्ये ज्यांचा घरामध्ये मृत्यू झाला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवळच्या नातेवाईकांकडून एक वृक्ष लावण्यात आले. याशिवाय आलेल्या प्रत्येकाने एक वृक्ष लावले व अर्बन सेल च्या वतीने त्यांना वृक्षमित्र” म्हणून खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
शहरी प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्बन सेलची निर्मिती करण्यात आली असून येणाऱ्या काळामध्ये शहरी प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणार असल्याचे पुणे शहर राष्ट्रवादी अर्बन सेलचे समन्वयक नितीन कदम यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.
या उपक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह विरोधी पक्षनेत्या दीपाली ताई धुमाळ,अश्विनी कदम (नगरसेविका), डाॅ.सुनील जगताप,विजय बापू टाकले,संतोष नांगरे, इकबाल भाई शेख, समीर पवार,शिल्पा भोसले,राजाभाऊ राजपूत, स्वाती दिवान,राजेश परदेशी,दिपक रासकर, वसंत बारटक्के,विजय गुजर,दीपक भाई शहा,रमेश आवळे,शंकरराव शहाळे, डॉ.शरद कांबळे, संजय शिंदे, दिगंबर कांबळे, हरिभाऊ धुमाळ, स्वागत शेंडगे,नाना चौधरी,सत्यजित जगदाळे,डॉ.सुहास शितोळे,ज्योतिबा उबाळे,डॉ. सुनिता काळे, माऊली कराळे,सुयोग पाटोळे, नानासाहेब ननावरे,चौरे काका इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासप्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 17 : पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे घेतला. विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा, जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव  आशिषकुमार सिंह यावेळी उपस्थित होते.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत 960 कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे 53 टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रकल्प करण्याबाबत नियोजन करण्यासाठी सुकाणू समितीदेखील नेमण्याचा यावेळी निर्णय झाला. यावेळी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शीतल उगले यांनी केले. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे 1500 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु असून त्यात विकासकामांसोबतच सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत असल्याचे, नागपूर येथे मुलींसाठी संत चोखामेळा वसतिगृह उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.