Home Blog Page 2176

गिरणी कामगारांसाठी मुंबईत प्राधान्याने घरे उपलब्ध करुन देणार – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

0

मुंबई-गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. ज्या गिरणी कामगारांनी 2016 च्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केला होता व ज्यांनी या घरासाठी पैसे भरले होते, त्यांना ते पैसे व्याजासह परत करुन त्यांना प्राधान्याने मुंबईत घर उपलब्ध करुन दिले जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

गिरणी कामगारांच्या घरांबाबत विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड बोलत होते.

गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले, ज्या गिरणी कामगारांनी या घरासाठी पैसे भरले आहेत. त्यांना ते पैसे व्याजासाह परत केले जातील. मुंबईत म्हाडाची घरे ज्यावेळी उपलब्ध होतील. त्यावेळी त्यांना प्राधान्याने घरे उपलब्ध करुन दिली जातील.

गिरणी कामगारांसाठी म्हाडामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगीतले .

सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, कपील पाटील, विनायक मेटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले

0

मुंबई, दि. 22 : बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंड करण्यासंदर्भातही तरतूद करण्यात आली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत हे विधेयक मांडताना सांगितले.

राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारास आळा बसावा यासाठी असलेल्या शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्त समितीची नेमणूक करण्यात आली होती. शक्ती फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना जरब बसावी यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी व सुधारणा करण्यात आली आहे. या संबंधितचे विधेयक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत मांडले.

महिलेवरील ॲसीड हल्ला गुन्ह्यात आजन्म कारावास, द्रव्यदंडातून महिलेवर उपचार करण्यात येणार. महिलेच्या विनंयभंग प्रकरणी नवीन कलम ३५४ ड प्रस्तावित करण्यात आले. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात कलम ३७६ मध्ये सुधारणा करून मृत्युदंडदेखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लैंगिक अपराधांच्या बाबतीत ३० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून तसेच जनतेकडून याबाबत सूचना आणि सुधारणा मागविण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधेयक मांडताना सांगितले.

आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 22 : आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणातेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आरोग्य विभागातील पदे शंभर टक्के भरली जावीत ही शासनाची भूमिका आहे. ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. यात परीक्षापद्धतीत बदल करावा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, याबाबत सांगोपांग विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

परीक्षा घेण्यासाठी संस्था निश्चित करताना विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला होता. सामान्य प्रशासनाच्या निकषांनुसार सर्व तपासणी करण्यात आली होती. संबधित संस्था काळ्या यादीत नसल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

परीक्षासंदर्भात चौकशी सुरु असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई होईल. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही, त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही असेही श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, आदिंनी सहभाग घेतला.

००००

कॅलीग्राफी तज्ञ, ‘थिंक पाॅझिटिव्ह’ मासिकाचे संपादक, पॉझिटिव्ह कट्टाचे संस्थापक प्रभाकर भोसले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

0

पुणे-कॅलीग्राफी तज्ञ, ‘थिंक पाॅझिटिव्ह’ मासिक व दिवाळी अंकाचे संपादक, पॉझिटिव्ह कट्टाचे संस्थापक प्रभाकर भोसले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.भोसले यांच्या वडिलांना आणि कुटुंबाला सैन्यदलात काम करण्याची पार्श्वभूमी आहे. सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेत त्यांच्या आजोबांनी काम केले आहे.

प्रभाकर भोसले यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. कॅलीग्राफी आणि टायपोग्राफीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले आहे. ते गेली २७ वर्षे विविध मिडीयांसोबत डिझाइन आणि कॅलिग्राफीचे काम करत आहेत. वेगवेगळ्या इव्हेंट आणि पुस्तकांसाठी तसेच दैनिकातील पुरवण्यांसाठी आजपर्यंत सुमारे २५ हजारहून जास्त कॅलीग्राफी शिर्षके केली आहेत. संपादकिय आर्टिस्ट या पोस्टवर सकाळ पुणे येथे १६ वर्षे आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. गेल्या १२ वर्षापूर्वी स्वत:चा डिझाइन स्टुटिओ चालू केला आहे. आजपर्यंत हजारो पुस्तकांचे डिझाइन प्रभाकर भोसले यांनी केले आहे. दैनिक भास्कर, दिव्यमराठी, सकाळ, पुढारी, प्रभात या दैनिकासाठी तसेच अनेक मासिके, नियतकालिकांसाठी विविध प्रोजेक्टसाठी कॅलिग्राफी, डिझाइन आणि कॉन्सेप्टस् कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. जर्मनी हॅम्बर्ग येथील गार्सिया मिडीयाचे संस्थापक मारिओ गार्सिया ज्यांनी जगभरातील ५०० पेक्षा जास्त न्यूजपेपरची डिझाइन केली आहेत त्यांच्या गार्सिया मिडीया या कंपनी सोबत दोन वर्षे काम केले आहे. न्यूजपेपर डिझाइन, मासिके आणि विविध ब्रँड प्रमोशनमध्ये त्यांचा हातखंडा आहे. सकाळमधील प्रसिद्ध ग्राफिटी या सदरासाठी हजारो ग्राफिटींचे सुलेखन आणि शेकडो ग्राफिटींचे लेखन त्यांनी केले आहे. ग्राफिटीचे अनेक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके सादर केली आहेत. अमेरिकेत मिनियापोलीस आणि कॅलिफोर्निया येथे मराठी कॅलीग्राफि पेंटींगची प्रदर्शने केली आहेत.

थिंक पाॅझिटिव्ह या दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. गेल्या सात वर्षात थिंक पॉझिटिव्ह दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय क्रमांकाचे २१ पुरस्कार मिळाले आहेत. थिंक पॉझिटिव्हच्या माध्यमातून सगळ्यांनी सकारात्मक राहावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. एप्रिल 2021 मध्ये थिंक पॉझिटिव्ह हे मासिकही चालू केले आहे.

अनेक शाळांमधून त्यांनी “पॉझिटिव्ह कट्टा” चालू केला असून त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. सकारात्मकता वाढीसाठी या कट्ट्याचा उपयोग होत आहे.

भास्कर जाधवांनी अंगविक्षेप करत केली पीएम मोदींची नक्कल,नंतर मागितली माफी

0

मुंबई-हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल करताच मोठा गदारोळ उडाला. पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून वातावारण इतके तापले की सभागृहाचे कामकाज 30 मिनिटे स्थगित करण्यात आले. शिवसेनेचे आमदार नितीन राऊत यांनी 15 लाखांची आठवण केली. तर भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. त्यावरूनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप आमदार संतप्त झाले.

नितीन राऊत यांनी वीजेच्या प्रश्नावर बोलताना कोरोना काळ आल्याने वीज माफीचे आश्वासन पूर्ण झाले नाही असे म्हटले. यानंतर भास्कर जाधव यांनी पुनरुच्चार करून पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरच संतप्त देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी. त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे असा आक्रामक पावित्रा फडणवीस यांनी घेतला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आपला आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली.

विरोधक आक्रमक झाल्याचे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस आणि इतर भाजप आमदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजप आमदारांनी काहीही ऐकून घेतले नाही. उलट जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते म्हणून भास्कर जाधव यांना समज द्यायला हवा अशी मागणी फडणवीस यांनी केली

यानंतर भास्कर जाधव स्वतः पुन्हा उभे राहिले. त्यांनी आपण केलेल्या विधानाने भाजप आमदारांची मने दुखावल्याने दिलगिरी व्यक्त केली. तसेच आपले शब्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला अंगविक्षेप असे दोन्ही मागे घेत असल्याचे सांगितले. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांचा राग शांत झाला नाही. आमदार भास्कर जाधव माफी मागत नाहीत. त्यांना या घटनेचे गांभीर्य देखील नाही. ते ही गोष्ट हसण्यावर नेत आहेत असा आरोप फडणवीस यांनी केला.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सभागृहात अपमान झाला. उद्या कुठल्याही मोठ्या नेत्याचा अपमान होऊ शकतो. त्यावेळी सुद्धा असेच म्हटले जाईल का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. यानंतर उडालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आणि भास्कर जाधव यांनी माफी मागितली.

वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज कनेक्शन तो़डण्याची मोहिम स्थगित करा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची आग्रही मागणी

0

मुंबई, दि.२२ डिसेंबर- गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात न देता ऐन रब्बी हंगामात विज कनेक्शन तोडण्याची मोहिम महावितरण कंपनीकडून सुरु करण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज जोडणी तो़डण्याची सुरु केलेली मोहिम तातडीने स्थगित करावी तसेच वीज जोडणी धोरण २०२० मध्ये शेतकरी हिताचे बदल करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

विधानपरिषदेमध्ये नियम २८९ अन्वेय विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सूचना मांडली. यावेळी आपली भूमिका मांडताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मागेल त्याला कृषीपंप कनेक्शन, असे आश्वासन दिले असताना, शेतक-यांना नवीन कनेक्शन न देता, उलट जुने कनेक्शन तोडण्याचा सपाटा आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय व वीज बिले न देता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषी पंप विज जोडण्या तोडण्यात आल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही. कारण सरकार एका बाजूला विदेशी मद्यावरील 50 टक्के कर कमी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे कृषी पंप वीज जोडण्या तोडणाऱ्या राज्य सरकारच्या या बेदरकार धोरणाविरुद्ध राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे असे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी 50 टक्के वीज बिल माफीची घोषणा केली असताना शेतकऱ्यांना अवाजवी जादा वीज देयके देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही दरेकर यांनी केला

शेतक-यांना लागणा-या कृषी पंपासाठी यापूर्वी 3 एचपीसाठी 3 हजार व 5 एचपी 5 हजार रुपये आकारण्यात येत होते,मात्र वीज बिलात वाढ करुन आता 3 एचपीसाठी साडेचार हजार व 5 एचपीसाठी सहा हजार पाचशे रुपये एवढे जादा वीज बिल आकारले जात आहे. महावितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना वा जाहीर सूचना दिली नसताना त्यांची वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची बाब दरेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.

राज्यात डिसेंबरपर्यंत पावसाळा लांबल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे गेल्‍या दोन वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आगामी रब्बी हंगामाकडून आशा निर्माण झाली आहे. पण रब्बीच्या हंगामात पिकांना पाण्याची गरज असताना कृषी पंपाची जोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेती पंपाच्या थकीत विज बिलांपैकी 67 टक्के विजबिल माफ केल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली. परंतु त्यांची अंमलबजावणीही सरकारने केली नाही व शेतक-यांची वीज जोडण्या सरसकट तोडण्यात आल्याचेही दरकेर यांनी स्पष्ट केले. तसेच शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडून सुरु असणारी वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज जोडण्या तोडण्याची सुरु केलेली मोहिम तातडीने स्थगित करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

0

मुंबई, दि 22 : गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकाने एप्रिल ते  ऑक्टोबर या काळात 51 प्रकरणात 1 कोटी 21 लाख 79 हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत सांगितले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते विधानसभा सदस्य देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य लक्ष्मण पवार, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, सुनील  प्रभू यांनी  प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

श्री. थोरात म्हणाले की,  गोदावरी नदी पात्रातील जागेचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसीलदार यांच्या समवेत पंचनामा केल्यानंतर वाळुमाफियांनी नियमांचे उल्लंघन करुन आधुनिक साधनांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन नदी पात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे केलेले नाही. नदीला पूर आल्याने 17 वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण 5 टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाबरोबर समन्वयाने काम करण्यात येईल. तसेच वेगवेगळ्या राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 970 आरोपी अटक करण्यात आले असून 46 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. लवकरच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष यांच्याशी सुध्दा या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल.

राज्यपालांच्या हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान

0

मुंबई, दि. 21 : देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

जन्नत फिल्म्स संस्थेचे प्रमुख रईस खान यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना शहीद – ए – आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले.  इंग्लंड येथील समाज सेविका डॉ. परिन सोमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

हुतात्म्यांच्या योगदानाची तुलना कशाशी करता येत नाही. आपापल्या क्षेत्रात देशासाठी केलेले निःस्वार्थ काम ही  देखील देशसेवाच असते असे सांगून गरीब, उपेक्षित व दिव्यांग व्यक्तींसाठी केलेले कार्य हे देखील देशप्रेमच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा दुर्लभ सिंह, हुतात्मा यश दिगंबर देशमुख, हुतात्मा विजय बापू सोनावणे व हुतात्मा परमवीर अब्दुल हमीद यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला, तसेच सीमेवर लढताना अपंगत्व आलेले दिव्यांग सैनिक कमांडो सुनील जोधा, कमांडो मनिष पीव्ही व  नायक दीपचंद यांचा सन्मान करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते पार्श्वगायक उदित नारायण, गायिका डॉ जसपिंदर नरूला, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेते अश्मित पटेल यांसह ४० व्यक्तींना शाहिद ए आझम प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.

बिल्डरसाठी ९० कोटीची उधळण; संभाजी पुलावरील विसर्जन परंपरेला निर्बुध्दपणे छेद देणाऱ्या महापालिकेचा चेहरा उघड

0

पुणे- एकीकडे मेट्रोच्या मार्गिकेची आखणी करतानाच ज्यांना संभाजी पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाते हे लक्षात घेण्याची आवश्यक्यता वाटली नाही आणि आता ते लक्षात आणून दिल्यावर यावर आता कोट्यावधी खर्च होतील म्हणून पहिलीच निर्बुद्ध पणे आखलेली मेट्रोची मार्गिका कायम ठेवण्यासाठी पण केलेल्या महापालिकेने दुसरीकडे मात्र एका बिल्डर साठी चक्क ९० कोटीचा रस्ता करण्याचे टेंडर काढल्याचे वृत्त आहे .यामुळे महापालिकेचा दुटप्पी चेहरा उघड होत आहे.

महापालिका प्रशासनाने बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग; तसेच अस्तित्वात नसलेला २४ फुटी रस्ता सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तयार करण्यासाठी ९० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या ठिकाणी विकसित करण्यात येणारा रस्त्या नव्याने आखण्यात आला असून, सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा निर्णय आता गुरुवारी सर्वसाधारण सभेत होणे अपेक्षित आहे . मंगळवारी मुख्य सभेत घडलेल्या संभाजी पुलावरील मेट्रोच्या निर्बुद्ध मार्गीकेमुळे झालेल्या गोंधळामुळे सभा तहकूब झाली आणि या प्रकल्पाबाबतचे अनेक ‘हिशेब’ फसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, या ठिकाणी उपाययोजनांची मागणी करण्यात येत होती. या चौकात मोठे व्यापारी संकुल उभे राहत आहे. त्यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी या व्यापारी संकुलासाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी तातडीने ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार करण्याबरोबरच या व्यापारी संकुलाच्या पाठीमागून जाणारा प्रस्तावित रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ९० कोटी रुपयांच्या निविदा ‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित करण्यासाठी काढण्यात आली आहे.

गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग; तसेच अस्तित्वात नसलेला २४ फुटी करण्यासाठीची निविदा मंगळवारी प्रकाशित झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये या निविदांवरून जोरदार फटाके फुटले. त्यानंतर या निविदेची ‘खोली आणि व्याप्ती’ सर्वसामान्यांसमोर उघड झाली. व्यापारी संकुलाच्या पाठीमागून डोंगराच्या कडेने २४ फूट रस्ता नव्याने तयार करण्यासाठी शहर सुधारणा समिती, स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेपुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर होता. त्यावर मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत निर्णय अपेक्षित होता. मात्र, संभाजी पुलावरील मेट्रोमार्गावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झडल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ते गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणारा प्रस्तावित २४ मीटर रस्ता कलम २०५ अन्वये आखण्यात येत आहे. या रस्त्याची अंतिम मंजुरी ही मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण मिळणे अपेक्षित होते. अगदी त्याच दिवशी महापालिका प्रशासनाने हा रस्ता विकसित करण्याच्या निविदा प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे जो रस्ता अस्तित्वातही नाही, त्या रस्त्याच्या निविदा प्रकाशित करण्याची तारीख ही त्या रस्त्याल्या मंजुरी मिळणाऱ्या मुख्य सभेच्या तारखेच्याच दिवशीच यावी, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय आहे, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. ही सभा तहकूब झाल्याने दोन दिवसानंतर होणाऱ्या सभेत आता या रस्त्याच्या मंजुरीवर निर्णय अपेक्षित आहे.

संबधित गृहप्रकल्पाला अगदी मुंबई दिल्ली पासून शुभाशीर्वाद असल्याने येथे केलेले खोदकाम नष्ट केले डोंगर आणि नव्याने उभारले डोंगर , नव्याने बिल्डरनेच केले रस्ते , शिवाय येथील सुरुंगाच्या स्फोटाने अगदी रस्त्याच्या पलीकडील इमारतींना गेले तडे या सर्वाकडे अगदी पोलिसात ,आणि वरिष्ठ पातळीवर स्थानिक नागरिकांनी अर्ज करूनही काहीही उपयोग झालेला नाही . कित्येक शेकडो कोटींच्या या गृहप्रकल्पाने असंख्य नियम , कायदे पायदळी तुद्विल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .

पिंपरी चिंचवडला गुंठेवारी सुरु;पुण्याला आणि पीएमआरडीएलाच का वावडे ? खर्डेकरांचा सवाल

0

पुणे मनपा आणि पी एम आर डी ए शासन आदेशाची अंमलबजावणी कधी करणार?

पुणे- पिंपरी चिंचवड महापालिकेने गुंठेवारी सुरु करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरु केले असून पुणे महापालिका आणि पीएम आर डीए ला आता हवे तरी काय ? गुंठेवारी ची अंमलबजावणी करण्यासाठी कसले वावडे आहे ? कसला मुहूर्त शोधताय ? असा थेट सवाल भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिकेचे विक्रम कुमार आणि पीएमआरडीए चे सुहास दिवसे यांना केला आहे
या दोन्ही अधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात खर्डेकर यांनी म्हटले आहे कि,’महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम 2001 ) व यात सुधारणा करण्यासाठी 15 मार्च 2021 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील काही मुद्द्यां बाबतीत राज्यातील विविध महापालिका प्रशासनाने काही स्पष्टीकरण / खुलासा राज्य सरकार कडून मिळावा असे पत्र लिहिले होते. पुणे मनपा ने देखील याबाबत राज्य सरकार कडून आदेश निर्गमित व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला होता. या सर्व विषयात भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व मी सातत्याने आपल्याकडे व शासनाकडे पाठपुरावा करत होतो. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने सुधारित अधिनियम निर्गमित केले असून या आदेशानुसार गुंठेवारी पद्धतीने झालेला विकास नियमित करण्यासाठी सुधारित प्रशमन शुल्क व सुधारित विकास शुल्क निश्चित केला आहे. मात्र यास दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी अद्याप पुणे मनपा आणि पी एम आर डी ए ने प्रकरणे दाखल करून घेण्यास सुरुवात केलेली नाही.
तरी या आदेशाच्या अधीन राहून त्वरित गुंठेवारी ची प्रकरणे दाखल करून घ्यावीत व शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुंठेवारी नियमितिकरण आभावी त्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा.ह्या सर्व विषयात पुणे मनपा व पी एम आर डी ए ‘स ही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार असून विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल. तरी आपण त्वरित प्रकरणे दाखल करून घेऊन छाननी करून नियमितिकरण करावे अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

खर्डेकर यांनी सोबत पिंपरी चिंचवड महापालिकेचा आदेश जोडला आहे. तो पुढे पहा ….

पिंपरी चिंचवड पालिकेचा आदेश 👇

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका हद्दीतील दि . ३१/१२/२०२० पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यात सुधारणा करून अधिनियम दि .१२ मार्च २००१ पारित केला असून निश्चितीसाठी शासन आदेश क्र . ठेवा – २०२१-४५ / २०८१ / नवि -३० दि . १८/१०/२०२१ पारित केलेला आहे . या निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत मि आवाहन करणेत येते की , सदर शासन निर्णयानुसार दि .३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महापालिकेकडे अर्ज करणेत यावेत.
नियमितीकरणासाठीची माहिती मनपाच्या वेबसाईटवर http://www.pcmcindia.gov.in उपलब्ध आहे . तसेच सविस्तर अर्जाचे नमुने आवश्यक कागदपत्रे या बाबतची सविस्तर माहिती गुंठेवारी बांधकामे नियमितीकरण General Information ( सर्वसाधारण माहिती ) मध्ये ( unauthorised structure regularizations ) या लिंकवर उपलब्ध आहेत मंदर अर्ज महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात स्विकारण्यात येणार आहेत . तसेच नागरीक स्वत : ही ऑनलाईन अर्ज कर शकतात . “सदरचे अर्ज विहित कागदपत्रासह दि . २०/१२/२०२१ पासून दि .२१ / ०२ / २०२२ पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत . तरी नागरीकांनी बांधकामे गुंठेवारी कायदयान्वये नियमित करण्यासाठी वरील मुदतीत लायसन्स इंजिनिअर / ला . आर्किटेक्ट मार्फत अर्ज सादर करावेत . दि .२१ / ०२ / २०२२ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अशी बांधकामे निष्कासनास पात्र राहतील .
▶️अ ) खालील अनधिकृत बांधकामे नियमित करणासाठी पात्र नाहीत …
१ ) Blue line निळया पुररेषेखालील बांधकामे / नदी पात्रातील बांधकामे
( २ ) विकास आराखड्यातील आरक्षणामधील बांधकामे
३ ) विकास आराखड्यातील रस्त्यामधील बांधकामे
( ४ ) रेड झोन मधील बांधकामे
( ५ ) बफर झोनमधील बांधकामे ,
( ६ ) धोकादायक बांधकामे
७ ) सरकारी जागेवर झालेली बांधकामे
८ ) शेती झोन / ग्रीन बेल्ट मधील बांधकामे
( ९ ) ना विकास झोन मधील बांधकामे
१० ) नाला क्षेत्रातील बांधकामे
▶️ब) खालील प्रकारची बांधकामे नियमितीकरणास पात्र ठरतील ..
१ ) रहिवास व वाणिज्य क्षेत्रातील बांधकामे
( २ ) दि .३१ / १२ / २०२० पूर्वी बांधून पूर्ण झालेले बांधकाम
३ ) चटई क्षेत्र निर्देशाकाच्या मर्यादित राहून केलेले बांधकाम ( निर्देशाकांपेक्षा अधिकचे बांधकाम स्वतःहुन निष्कासित केल्यास असे बांधकाम नियमितीकरणास पात्र राहील . )
▶️क ) बांधकामे नियमितीकरणासाठी खालील कागदपत्रे आवश्यक राहतील . :
१ ) विहित नमुन्यातील अर्ज .
( २ ) मालकी हक्कासाठी ७/१२ उतारा व तत्सम कागदपत्रे
३ ) बांधकाम दि . ३१/१२/२०२० पुर्वी बांधुन बांधकाम पूर्ण झालेबाबत करसंकलन विभागाचा दाखला
४ ) मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडुन स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी दाखला , ( २ मजल्यापेक्षा जास्त मजल्यांची इमारत असल्यास )
५ ) पाणीपुरवठा थकबाकी नसलेला दाखला
६ ) जलनि : सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला
७ ) अर्जासोबत नकाशा सादर करताना इमारतीचा प्लॉन , क्� “७ ) अर्जासोबत नकाशा सादर करताना इमारतीचा प्लॉन , क्रॉस सेक्शन , इलिव्हेशन , मार प्लॉन / लोकेशन प्लॉन , खिडक्या व दरवाजे तक्ता व इतर माहिती नकाशात दर्शविणे आवश्यक राहील . नकाशावर मालक व मा . आर्किटेक्टची स्वाक्षरी बंधनकारक राहील
ड ) गुंठेवारी नियमितीकरणाची पद्धती . या वेब पोर्टलवरील General Unauthorised structure महानगरपालिकेच्या  http://www.pcmcindia.gov.in Information ( सर्वसाधारण माहिती ) मध्ये regularisation या Link वर नागरीक , ला आर्किटेक्ट मार्फत महानगरपालिकेच CFC Centre वर किंवा स्वतः अनिलाईन अर्ज करु शकतील . महानगरपालिका त्यांनी Primary छाननी करून CFC Centre मदर अर्ज पुढे संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याची स्थळ पहाणीसह तांत्रिक छाननी होईल . त्यानंतर मंजूर झाल्यावर आवश्यक ते प्रिमीयम / अधिमुल्य भरणा केल्यावर संबंधित कार्यालयातर्फे नियमितीकरण दाखला व नकाशावर स्वाक्षरी करून दाखला देणेत येईल प्रस्तुत प्रकरणी अर्जासाठी रक्कम रु . १०० / – इतके शुल्क” CFC Centre वर आकरण्यात येईल . इ ) गुंठेवारी अधिनियमानुसार नियमित न होणारी बांधकामे निष्कासनास पात्र राहतील .
असे आयुक्त राजेश पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

परीक्षा फी भरणार , कंत्राटी कामगारांना मुदतवाढ देणार – स्थायी समितीचे निर्णय

0

दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार

पुणे-पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागांच्या शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून चार हजार ३९२ विद्यार्थी या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रती विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रती ५२५ रुपये परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
रासने पुढे म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. वाणिज्य शाखा ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रती ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कात्रज-आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटणार
कात्रज येथील संतोषनगर आणि आंबेगावातील पोतदार शाळेसमोर जलवाहिनी क्रॉसिंग करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे परवाना शुल्क आणि अनामत रक्कम म्हणून तेरा लाख तीस हजार रुपये हस्तांतरित करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयामुळे कात्रज-आंबेगाव परिसरातील पाण्याच्या चार टाक्या भरणार आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.

आरोग्य विभागातील १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ
कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची तयारी आणि लसीकरणासाठी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्या कर्मचार्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, फीजिशियन, अतिदक्षता विभाग फीजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक अशा १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. या आधी २११ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली होती.
रासने पुढे म्हणाले, आरोग्य विभागात वर्ग एक ते चारच्या ११७८ पदांना मान्यता आहे. परंतु सध्या ८२३ कर्मचारी कार्यरत असून ८५५ पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही पदे भरता येतील.
प्राणी संग्रहालयातील कर्मचार्यांना सहा महिने मुदतवाढ
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांना स्थायी समितीने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही पदे कायमस्वरुपी भरायची आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पद भरतीची कार्यवाही होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 21 : मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापाननंतर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. पत्रकारपरिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.

ओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असून मुख्यमंत्री अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आढावा बैठका होत असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ आणि पगारातही वाढ देण्यात आली आहे. एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवेत रुजू व्हावे. टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांनी आणू नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  श्री. पवार यांनी केले.

देशातील इतर राज्यांशी तुलना करता राज्यात मद्यावरील 300 टक्के कर होता. तो कमी केला आहे.

विद्यापीठांचे कुलगुरू नेमण्यात राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रश्नच नसून याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून राज्य शासनाला पाच नावे सुचविण्यात येणार असून त्यापैकी दोन नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून राज्यपालांकडूनच कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

सरकार अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि उत्तरे देण्यास तयार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून चहापानाला सर्वांना बोलावले होते, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

परीक्षा घोट्याळ्याची निष्पक्ष चौकशी करणार

गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे.  कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू असून पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

महापौरांना ५ वर्षात समजले नाही का, संभाजी पुलावरून मिरवणूक जाते …

0

हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्यांच्याच चुकांमुळे 131 वर्षांची गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा खंडित होण्याची वेळ -संभाजी पुलाला जोशी पुल पर्याय होऊच शकत नाही

पुणे- मेट्रोचे काम सुरु होऊन ७ वर्षे झाली गेल्या ५ वर्षात मुरलीधर मोहोळ हे दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्ष होते आणि ३ वर्षे महापौर आहेत . ५ वर्षात त्यांना समजले नाही कि संभाजी पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाते तेव्हाच त्यांनी या नियोजनाला का नाही आक्षेप घेतला .हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा ठेका मिरविताना तुम्ही ? भाजपचे देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो DPR केला त्यात या चुका झाल्या आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे हे पुणेकरांच्या समोर आणण्यासाठी आज सभागृहात बोलू देण्याची आमची मागणी होती परंतू हे सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणूनच महापौरांनी आम्हाला सभागृहात बोलू दिलं नाही.” असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. आज ज्येष्ठ नगरसेवक आणि कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल , विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ ,वसंत मोरे ,साईनाथ बाबर ,पृथ्वीराज सुतार आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली .

ते म्हणाले,'”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराच्या विकासाला विरोध नाही तसेच मेट्रोला देखील विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली पुण्याच्या परंपरेला नष्ट करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.गणेशोत्सव” म्हणजे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव… पुणे शहरातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीची भुरळ केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. मात्र पुणे शहराच्या या वैभवाला गालबोट लागतेय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे शहरातील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ही छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल) येथून जाते. गेल्या 131 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे चालू आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज पुलावरून प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलामुळे ही परंपरा खंडीत होणार आहे. या मेट्रोच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या मेट्रो पुलाची उंची न वाढवता काम सुरू ठेवून पुणे शहराची परंपरा मोडीत काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहेत असा आरोप या तीनही पक्षांच्या वतीने करण्यात आला. याबाबत आज महाविकास आघाडीतील पक्षांनी प्रश्न उपस्थित केले असता महाविकास आघाडीचा मेट्रो प्रकल्पास विरोध असल्याचे हास्यास्पद वक्तव्य माननीय महापौरांनी केले आहे. माननीय पालक मंत्री आदेशाने मेट्रोचे काम सुरु झाले असे माननीय महापौर महोदयांनी सांगितले, जर हे खरे असेल तर महापौरांनी सप्टेबर मध्ये काम थांबवताना कोणत्या अधिकारांत मेट्रोचे काम थांबवले होते. पुणे शहराच्या अस्मितेच्या या प्रश्नावर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी केली असता भर सभागृहात महापौरांचं खोटं वक्तव्य उघडं पडेल म्हणून भारतीय जनता पक्षाने चर्चा घडू दिली नाही. पुणेकरांच्या प्रतिनिधींना सभागृहात बोलण्याची संधी न देता महापौरांनी मोदी सरकारच्या हुकूमशाही पॅटर्न पुणे महानगरपालिकेत राबवला आहे.

एकीकडे त्यांच्याच नेत्यांचा आदेश आणि दुसरीकडे त्यांच्याच नगरसेवकांची नाटकी आंदोलने या दुटप्पी धोरणाचा निषेध ,म्हणाले महापौर मोहोळ (व्हिडीओ)

राष्ट्रवादी म्हणजे डबल ढोलकी – या घाणेरड्या राजकारणाला पुणेकर थारा देणार नाही

पुणे : मेट्रो निवडणुकीपूर्वी सुरुहोईल आणि भाजपला त्याचे श्रेय मिळेल म्हणून तिळपापड होऊ पाहणाऱ्या राष्ट्रवादी , आणि कॉंग्रेस शिवसेनेची नगरसेवक मंडळी काही गणेश मंडळाचे कार्यकर्ते हाताशी धरून दिशाभूल करणारी नाटकी आंदोलने करत असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे .अजित पवार हे त्यांचेच नेते आहेत त्यांनी पोलीस बंदोबस्तात संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचे काम सुरु ठेवा असे आदेश दिलेले आहेत . असे असताना ते काम थांबवा , त्या मेट्रोच्या पुलामुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार आहे असे सांगत ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, दिपाली धुमाळ ,प्रशांत जगताप ,वसंत मोरे , साईनाथ बाबर ,पृथ्वीराज सुतार आदी नगरसेवक मंडळींनी सभागृहात गोंधळ घालीत कामकाज होऊ दिलेले नाही हे योग्य नाही त्यांच्या मुले ३०० विषयांवर निर्णय होऊ शकला नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे .

यावेळी मोहोळ म्हणाले, ”अजित पवारांनी पोलीस देखरेखीत पुणे मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतीत स्पष्ट उल्लेख मेट्रोनं पुणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. जेव्हा संभाजी पुलावरचं मेट्रोचं काम थांबवण्यात आलं त्यानंतर या कामावर आक्षेप घेणाऱ्या शहरातील गणेश मंडळांसोबत महापालिका प्रशासनाची बैठक झाली. गणपती मिरवणूक या पुलावरुन जाताना मेट्रोमुळे अडचण येईल म्हणून हे काम रोखण्यात आलं होतं. मात्र मेट्रोचं काम सुरु राहील, असं या बैठकीत ठरलं. तेव्हा गणेश मंडळं या निर्णयावर तयारही झाली होती. तरीही मेट्रोचं काम सुरु होऊ नये म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी पुलावर जाऊन आंदोलनं केलीत. ज्यानंतर गणेश मंडळांनी मेट्रो कामाबाबतीत सुचवलेले पर्याय आणि मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. ज्यानंतर बैठकीत ठरलेल्या बाबींची माहिती मेट्रोकडून एक पत्र लिहून पुणे महापालिकेला देण्यात आलीये. एकीकडे उपमुख्यमंत्री मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात गोंधळ घालतात.”

मेट्रोच्या तांत्रिक विभागाकडून दोन पर्याय पुणे महापालिकेला सुचवले आहेत.

१. आता जर पुलाची उंची २१ फूटाहून ३० फूटापर्यंत न्यायची असेल. तर आता बांधकाम झालेले नदीपात्रातील १७ पिलर पाडावे लागतील. त्याला २७ कोटी अतिरिक्त खर्च येईल. हे काम पुन्हा व्हायला त्या वेळेपासून पुढे दिड वर्षाचा कालावधी लागेल.
२. जर या पुलाची उंची ४० फूट वाढवायची असेल, तर नदीपात्रातील एकुण ३८ पिलर पाडावे लागतील. ७९ कोटी त्यासाठी खर्च येईल. अधिकचे दोन वर्ष मेट्रोचं काम करायला लागतील.

मात्र, पुणे महापालिकेनं त्यानंतर मेट्रो अधिकारी आणि गणेश मंडळ यांच्याशी या पर्यायांवर चर्चा केली. हे पर्याय खर्च आणि वेळ यांबाबतील सुयोग्य नव्हते. त्यामुळे महापौरांनी मेट्रोच्या कामाला हरकत नसल्याचं स्पष्ट केलं.

गणेश मंडळांचा प्रश्न घेऊन आम्ही उपमुख्यमंत्र्यांना घालू साकडे -पण पुण्यातल्या या राजकारणाचे काय ?

0

पुणे- संभाजी पुलावरून मेट्रोचा पुल हा गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरत असल्याने आज मंडळे आणि सभागृहात विरोधकांनी आंदोलन केल्याने कामकाज होऊ दिले नाही . या विषयावर आम्ही नेहमीच सहयोगाची भूमिका पत्करली आहे . पुण्याची संस्कृती परंपरा याबाबत आम्हालाही अभिमान आहेच या साठी आम्ही उपमुख्य मंत्री आणि नगरविकास मंत्री यांची भेट घेऊन यावर काय मार्ग काढता येईल यासाठी चर्चा करू असा आमचा पवित्रा असतानाही आज महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल , पृथ्वीराज सुतार , वसंत मोरे , साईनाथ बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करत ,आन्दोलन सुरूच ठेवले आणि महापालिकेचे कामकाज ठप्प पाडले हि बाब चुकीची आहे आणि राजकारण करून दिशाभूल करणारी आहे असा आरोप महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केला आहे.

ते म्हणाले ,’ महानगर पालिकेची सर्वसाधारण झाल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊ. यावर काही उपाय काढता येईल का? यासाठी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन सर्व पक्षांचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असा उपाय सुचविला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यात रस नव्हता. केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही आम्ही दोन्ही नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यास तयार आहोत.