Home Blog Page 2170

पोलिस म्हणतात, असे अनेक आमदार पाहिलेत!

0

आमदाराच्याच प्लाॅटवर म्हणे गुंडांचा ताबा ..बोला आता .. सामन्यांचे काय ?

मुंबई : असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर एखादा पोलिस अधिकारी थेट आमदाराला देऊ शकतो? पण असे पुण्यात भाजप आमदारासोबत घडल्याचे आज विधानसभेत स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहखात्यावर बोलताना खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांचीच फिर्याद पोलिस घेत नव्हते, असा आरोप केला. हे कुठले गुंडाराज आहे, असा सवाल त्यांनी केला.पोलिस खात्याच्या ढासळत्या प्रतिमेबद्दल बोलताना फडणवीस यांनी भीमराव तापकीर यांच्याबाबतचा अनुभव सांगितला. तापकीर यांच्या निवासस्थानाशेजारील असलेल्या त्यांच्या प्लाॅटवर बेकायदा ताबा मारण्यात आला. तापकीर याबाबत पोलिस तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलट असे अनेक आमदार पाहिलेत, असे उत्तर त्यांना देण्यात आले. याबाबत तापकीर यांनी वरिष्ठांकडे दखल घेण्याची विनंती केली. तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. शेवटी मला पोलिस आयुक्तांशी बोलावे लागले. तेव्हा तापकीर यांच्यासाठी पोलिस धावून आले, असा किस्सा फडणवीस यांनी सांगितले. एखाद्या आमदाराला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसांचे काय, असे त्यांनी विचारले.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :

➡️ भीमराव तापकीर यांच्या जागेवर अवैध कब्जा गुंडांनी केला आणि ते तक्रार करायला गेले तर असे आमदार खूप पाहिले,असे उत्तर दिले गेले.
आमदारांची ही गत असेल तर सामान्य जनतेचे काय हाल.

➡️ अमरावती येथील दंगल हा एक प्रयोग!
फेक न्युजची फॅक्टरी चालविली गेली.
पाकिस्तानातील फोटो हे त्रिपुरातील भासविण्यात आले.
एक राष्ट्रीय नेता ट्विट करतो आणि कुठलेही नियोजन नसताना 40 हजार लोक रस्त्यावर येतात. हा संयोग असूच शकत नाही.

➡️ दुसऱ्या दिवशी काही प्रतिक्रिया आली,तर पहिल्या दिवशीची घटना डीलिट आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनेवर कारवाई.
जाणीवपूर्वक नाव लिहून भाजपा,अभाविप कार्यकर्त्यांवर कारवाई.
रझा अकादमीवर कारवाई करणार आहे की नाही.

➡️ पोलिस दल सुधारले नाही, तर जगातील सर्वोत्तम पोलिस दलाची बदनामी होईल.
माझ्याकडे काही गोपनीय माहिती आली तर जनतेच्या हितासाठी मांडणे हे विरोधी पक्षनेता म्हणून माझे काम आहे. हा अहवाल मी फोडला नाही, तर तो केंद्रीय गृह सचिवांना दिला.
मविआ नेत्यांनीच तो अहवाल फोडला.

➡️ ज्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली,आज त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे.
खरोखर हा संपूर्ण घटनाक्रम दुर्दैवी आहे.

➡️ महिला अत्याचाराने तर राज्यात सीमा गाठली आहे. जोवर राज्य सरकार लक्ष घालणार नाही,तोवर स्थिती नियंत्रणात येणार नाही.
मनोधैर्य योजनेचा बोजवारा उडाला आहे.

➡️ राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटेसोबत परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाईंड डॉ. प्रीतीश देशमुख हा ५ लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीला देतो.कुणाकुणासोबत त्याचे फोटो?
त्याची ट्विटर टाईमलाईन का डीलिट केली गेली.

➡️ ग्रामविकास विभागात १५०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.
१० वर्ष वा जोवर देशात GST आहे,त्या कालावधीसाठी.
असे कंत्राट देशात कधी पाहिले का?
साऱ्या ग्रामपंचायती नकार देत असताना हे करण्यात आले. अखेर तक्रार झाल्यावर ते रद्द करण्यात आले.

➡️ असे टेंडर काढतात कोण? याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे.
शिवभोजन योजनेत मोठा भ्रष्टाचार.दोन घोट ज्यूस देऊन बालकांचे फोटो काढले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत सुद्धा हा प्रकार. फारच दुर्दैवी आहे.

➡️ सरकारकडून स्वस्तात जमीन आणि त्याचा मोबदला सुद्धा!
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे प्रकरण गंभीर आहे.चार पट मोबदला सरकारच्याच जमीनीवर घ्यायचा,हा तर चांगला गोरखधंदा आहे.

➡️ संभाजीनगरमध्ये सिल्लोडमध्ये एकदम 6 कॉलेजसाठी राज्य सरकारकडून लेटर ऑफ इंटेट एका मंत्र्यांच्या संस्थेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रतिकूल मत दिलेले असताना सुद्धा.प्रकरण उच्च न्यायालयात गेले.कोर्टाने काय सांगितले, ‘आर्बिटरी एक्सरसाईज ऑफ पॉवर’.

➡️ दिवंगत शिक्षकाची बदली आणि वर्षभरापूर्वी निवृत्ती काय चालले आहे राज्यात.कुणाचा पायपोस नाही.
प्रशासनाचा पूर्ण खेळ मांडला आहे.

➡️ कोरोना कुठे कुठे होतो?

  • मंदिरात
  • मंत्रिमंडळ बैठकीत
  • मंत्रालयात
  • अधिवेशनात
  • लॉकडाऊन लावताना
  • पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी न करण्यासाठी कोरोना
  • शेतकर्‍यांना मदत न करण्यासाठी कोरोना
  • कोणत्याही घटकाला मदत नाही, कारण कोरोना
  • विकासाच्या प्रत्येक कामात कोरोना.

➡️ कोरोना कुठे जात नाही?

  • नेत्यांकडील लग्नात
  • सत्ताधारी पक्षांच्या आंदोलनांमध्ये
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्याही बैठकांमध्ये.

➡️ भ्रष्टाचाराचा कळस

  • 18 रुपयांचा मास्क 370 रुपयांत खरेदी
  • 400 रुपयांची पीपीई कीट 2000 रुपयांत
  • 5 लाखांचे व्हेंटिलेटर 18 लाखांत
  • कोविड सेंटर निर्मितीत गाद्या, पंखे, औषधी खरेदीत इतका भ्रष्टाचार की विचारता सोय नाही
  • नवीन वस्तु खरेदीच्या किंमतीपेक्षा भाडे अधिक.

➡️ एप्रिल 2020 : 40,671 मृत्यू
एप्रिल 2021 : 84,262 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 14,164)
 
मे 2020 : 52,596 मृत्यू
मे 2021 : 1,22,084 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 26,031)
 
जून 2020 : 68,852 मृत्यू
जून 2021 : 88,812 मृत्यू (कोरोना मृत्यू दाखविले : 27,101).

➡️ 2021 मधील 6 घटना : 75 हून अधिक मृत्यू
 
9 जानेवारी 2021 : भंडारा (10 बालकांचा मृत्यू)
11 मार्च 2021 : 11 मृत्यू
21 एप्रिल 2021 : नाशिक ऑक्सिजन गळती (24 मृत्यू)
23 एप्रिल 2021 : विरार आयसीयू आग (15 मृत्यू)
28 एप्रिल 2021 : मुंब्रा आगीत (4 मृत्यू)
6 नोव्हेंबर 2021 : नगर 11 मृत्यू.

➡️ पीएम केअर्सला नावं ठेवणार्‍यांनी काय केलं?
 
पीएम केअर्समध्ये प्राप्त निधी: 3076 कोटी (आर्थिक वर्ष – 2019-20)
पीएम केअर्समधून मंजूर निधी: 3100 कोटी (यातील 1000 कोटी राज्यांना)
 
सीएम रिलिफ फंड : 799 कोटी रूपये
सीएम फंडातून दिले : 192 कोटी रूपये (24 टक्के).

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 28 : राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

अकोला येथील महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या डांबरीकरणाच्या प्लँटमध्ये 21 नोव्हेंबर रोजी स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य विनायक मेटे यांनी मांडली. यावर सदस्य गोपीकिशन बाजोरिया, जयंत पाटील यांनीही संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

या मागणीची दखल घेवून कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित कंत्राटदारावर 8 दिवसांत गुन्हा दाखल करू. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येईल, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. राज्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढतोय – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 28 : राज्यातील मराठी उद्योजकांची कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड)  होत असल्याचा राज्याला अभिमान असून मुंबई शेअर बाजारातही आता मराठी टक्का वाढत असल्याचे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेड या कंपनीचा लिस्टिंग समारंभ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे झाला. यावेळी कंपनीचे सीएमडी सतीश वाघ, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, विविध क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई बोलत होते.

आयपीओमधील उज्ज्वल यशाबदल अभिनंदन करुन उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले,  सुप्रिया लाइफसायंन्स लिमिटेडचा प्रवास हा अनेक उद्योजकांना प्रेरणा देणारा आहे. ही मराठी माणसाची कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्याचा राज्याला अभिमान आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील सक्रिय औषध घटक निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या या मराठी बांधवांच्या कंपनीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा विश्वास दाखवला याबद्दल आनंद आहे. देशात सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा मोठा गट असून त्यांच्या वाढीसाठी मुंबई शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारणे सहज झाल्याने या लहान उद्योजकांना त्यांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले आहे, असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

सूचिबद्ध (Listing) कार्यक्रमांच्या माध्यमातून सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा  नक्कीच उपयोग होईल. या व्यासपीठाच्या माध्यमातून सूक्ष्म, मध्यम उद्योगांना थेट भांडवली बाजारामध्ये प्रवेश करता येणार असून त्यांना भांडवलासाठी अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. परिणामी या उद्योगांवर गुंतवणूकदारांचाही विश्वास वाढत आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि मध्यम उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून उद्योगांच्या समृद्धीसाठी समर्थन दर्शविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचेही (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी आभार मानले.

मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

0

मुंबई, दि. 28 :  मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांबाबत शासन कोणती कार्यवाही करत आहे अशी लक्षवेधी सूचना मांडली.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, मुंबई महापालिका क्षेत्रातील  विनाअनुदानित प्राथमिक  शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देणे,सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच सर्व विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतील शाळांप्रमाणे २७ मोफत वस्तू देणे या निर्णयांबाबत  महापालिकेसोबत बैठक घेऊन याबाबतीत निर्णय घेण्यात येतील. तसेच रात्रशाळा योजनाही प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व शाळांना २८ ऑगस्ट २०१५ अन्वये संच मान्यता देण्यात आलेली आहे. संच मान्यतेचे  निकष सुधारणा करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  समिती स्थापन करण्यात आली असून सुधारित निकषांबाबतचा प्रस्तावदेखील मागविण्यात आला आहे. तसेच रात्र शाळेतील इयत्ती पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेही देण्यात येत आहेत. शासनाकडून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू  यांनी सांगितले.

पदभरती, नव्याने इमारतींच्या विकासाद्वारे आरोग्य सेवा अधिक बळकट करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. 28: राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती,नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे  यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित  उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.त्यांनी सांगितले की,  सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू आहे.शंभर टक्के रिक्त जागा भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ञांच्या ८३३५ जागांपैकी ७९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. ३३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी २६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.

२४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे श्री.टोपे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँककडून ५१७७ कोटी रुपये तर  हुडको कडून ३९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यातील जुन्या आणि दुरुस्ती न होणाऱ्या रुग्णवाहिकांऐवजी नवीन एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. वित्त आयोग निधी, खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातूनही रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या लक्षवेधीच्या चर्चेत सर्वश्री प्रविण दरेकर, डॉ.रणजित पाटील, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. 28 : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस वनपरिक्षेत्राचे एकूण क्षेत्र २६७५.१० हे. इतके आहे. कडेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ३ वन परिमंडळ व ५ नियत क्षेत्राचा समावेश आहे. बेकायदा वृक्षतोडीस चाप बसावा, म्हणून कडेगाव-पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.मागील ३ वर्षात अवैध वृक्षतोडीचा १ वनगुन्हा निदर्शनास आला आहे. यामध्ये फॉरेस्ट सर्वे क्रमांक ११६ मधील ग्लिरिसिडिया या प्रजातीच्या वृक्षाच्या ५ वृक्षांना क्षती पोहोचविणेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच माहे नोव्हेंबर २०२१ मध्ये मालकी क्षेत्रात वृक्षतोडीच्या एका घटनेची नोंद करण्यात आली आहे.  ही घटना हिंगणगाव खुर्द येथील असून, यामध्ये १० आंबा या प्रजातीचे वृक्षतोड करणाऱ्या आरोपीस दंड करण्यात आला आहे. तथापि, दि. 8 नोव्हेंबर 2021 दरम्यान वन हद्दीत कोणताही अवैध वृक्षतोडीची बाब कडेगाव पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आली नाही. वनक्षेत्र तसेच वनक्षेत्राबाहेर अवैध वृक्षतोड रोखण्याच्या दृष्टीने गस्तीचे नियोजन असून त्यानुसार वनपरिक्षेत्र स्तरावर कार्यवाही करण्यात येते. तसेच वृक्षलागवडीसाठीदेखील वृक्षलागवड करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि २८ डिसेंबर- विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना उपसभापतीपदावरून दूर करावे, अशा प्रकारची अविश्वास प्रस्तावाची सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेचे सभापतींकडे आज दाखल केली आहे.
अविश्वास प्रस्तावाची सूचना दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, प्रविण दरेकर यांनी सांगितले की, उपसभापती न्यायदानाच्या ठिकाणी बसलेल्या असताना त्या नि:पक्षपाती भूमिका घेत नाहीत. आज सभापतींकडे उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दखल केला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) व म.वि.प. नियम ११ अन्वये तशा प्रकारची प्रस्तावाची सूचना दाखल केली आहे. त्यांनी न्यायाधीशाप्रमाणे वागायचे असते. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. अकोला महापालिकेची लक्षवेधी सूचना आज सकाळी चर्चेला आली होती. परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ही लक्षवेधी सूचना राखून ठेवावी हे आपण उपसभापतींच्या निदर्शनास आणले. परंतु माझी विनंती त्यांनी फेटाळल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे याविषयाची याचिका सुनावणीसाठी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने २१ डिसेंबर २०२१ रोजी याप्रकरणात कोणतीही कार्यवाही न करता चार आठवड्यामध्ये शासनाने आपले म्हणणे मांडण्याचे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचाच अर्थ सदर बाब न्यायालयाच्या अभिनिर्णयाधीन आहे व या प्रकरणी सभागृहात चर्चा करणे हे न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील नियम पुस्तिकेनुसार सदर लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
त्यानंतरही उपसभापती गो-हे यांनी ही लक्षवेधी पुकारली व शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना या लक्षवेधीवर त्यांनी एकट्यालाच बोलू दिले. अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचा परावभ झाला आहे आणि त्याचा राग घेऊन अकोला महापालिका बरखास्त करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. कायदेशीर कारवाईला आमचा विरोध नाही. परंतु विरोधी पक्षनेता हे संविधानिक जबाबदारीचे पद असताना गोपीकिशन बाजोरिया यांचे बोलणे झाल्यानंतर आपण सभागृहात वारंवार बोलण्याची मागणी केली. परंतु उपसभापतींनी विरोधी पक्षनेत्याला जाणीवपूर्वक बोलू दिले नाही. उपसभापती यांची ही कार्यपध्दती विधान परिषदेच्या परंपरेला धरून नाही. अशा प्रकारे सभागृहात दुजाभाव पद्धतीने कामकाज होत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सर्वात महत्वाचा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. याविषयावर लक्षवेधी सूचना द्यायची होती, पण उपसभापतींनी सांगितले की, जो विषय न्यायप्रविष्ट आहे त्यावर आपल्याला चर्चा करता येत नाही. उपसभापती पक्षाच्या प्रवक्त्या असल्याचा भास होत आहे. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) व म.वि.प. नियम ११ अन्वये आणण्यासाठी सभापतींकडे सूचना दाखल केल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

रायगड यथे महिला सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या :विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची निवेदनाची मागणी

0


मुंबई, दि. २८ डिसेंबर – रायगड जिल्ह्यामध्ये एका महिला सरपंचाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना काल घडली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याविषयी तातडीने निवेदन करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधान परिषदेत केली. हा विषय गंभीर असून याप्रकरणाची आपण माहिती घेतली आहे व यादृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, कालच विधानपरिषदेत कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. आज या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात अतिशय तीव्र भावना आहेत. गुन्हेगारांना कशाचीही भीती उरलेली नाही, हेच याघटनेवरून दिसून येते. रायगड मधील महाड तालुक्यातील मौजे आदिस्ते येथील मीनाक्षी मनोहर खिडबिडे या महिला सरपंच होत्या. या सरपंच महिला अतिशय गरीब कुटुंबातील होत्या. जंगलात रस्त्याच्या कडेला काल दुपारी त्यांचा मृतदेह सापडला.त्यांच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. लाकुडफाटा आणण्यासाठी त्या गेल्या होत्या. सायंकाळी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टर नाहीत. बलात्कार झाल्याचा संशय असल्यामुळे महाडचे आरएमओ डॉ. भास्कर जगताप यांनी सेकंड ओपिनियनसाठी मृतदेह जे.जे.रुग्णालयाकडे पाठवला आहे. गावापासून 500 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला होता, अशी माहिती दरेकर यांनी विधान परिषद सभागृहाला दिली.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी २२ ठिकाणी पार्किंग तर २६० बसेसची व्यवस्था

0

पुणे दि.२८: कोरेगावनजिक पेरणेफाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची शासनस्तरावरुन नियोजन सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

जयस्तंभास आकर्षक फुलांची सजावट तसेच  सुशोभिकरण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून कार्यक्रमाचे  थेट प्रसारण करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) मार्फत नियोजन सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बार्टी, समाज कल्याण आयुक्तालय, महावितरण कंपनी, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडून आवश्यक कामे करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येत असून ५ सुसज्ज रुग्णवाहिका  व  १५ इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकूण २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे व तेथून जयस्तंभ येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने ३१ डिसेंबर  व १ जानेवारी रोजी २६० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक मार्गात बदल

चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल.

अहमदनगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावराफाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जडवाहने खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापुर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे  न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी जातील.

सोलापुर रस्त्यावरून आळंदी-चाकण भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो ट्रक) ही वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) वाहने वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटामार्गे अहमदनगरकडे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे अहमदनगर येथे जातील.

आळंदी- शेलपिंपळगाव बहुळ साबळेवाडी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणारी येणारी दोन्ही बाजूकडील सार्वजनिक तसेच  खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक बदल
नाशिककडून येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगाव चाकण चौकातून मोशी व तळेगावकडे जावू शकतील.

देहूरोड येथे मुंबई जुन्या महामार्गाने  येणारी वाहने  सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी-चिंचवडकडे न सोडता सेंट्रल चौकाकडून मुंबई बेंगलोर महामर्गाने सरळ वाकडनाका, चांदणी चौकातून इच्छीत स्थळी जावू शकतील.

मुंबईकडून एक्स्प्रेस महामार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई बेंगलोर महामार्गाने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) वाकडनाका व राधा चौक येथून पुणेकडे जावू शकतील.

मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्याकडे न जाता उर्से  टोल नाका  येथून देहूरोडकडे जाणारा बाह्यवळण रोडने जावू शकतील.

नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी नाशिकफाटा मार्गे पुणे शहरकडे जावू शकतील. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी त्वरित परवानगी द्यावी- आमदार मंगल प्रभात लोढा

0

खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलिस स्थानकातून त्वरीत सोडण्यात यावे

मुंबई-कांदिवली पूर्व द्रुतगती महामार्गावर आकुर्ली रेल्वे स्टेशनसमोर १४ हजार चौरस फूट जागेत भारताचे माजी माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून बसवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असताना महाविकास आघाडी सरकारचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी ऐनवेळी पुतळ्याच्या अनावरणाला परवानगी नाकारली. या संदर्भात खासदार गोपाळ शेट्टी क्रीडामंत्री सुनील केदार यांची भेट घेण्याकरीता जात असताना आजाद मैदान पोलिसांनी त्यांना अटक केली. खासदार गोपाळ शेट्टी यांना त्वरीत सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेच्या शीतकालीन सत्रात केली.

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी केंद्र सरकार कडून सर्व परवानगी प्रकिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना परवानगीविषयी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अनेक पत्रे पाठविली होती. देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर रोजी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरविले होते. सर्व परवानगीसाठी गोपाळ शेट्टी यांनी पाठपुरावा केला, आवश्यक कागद पत्र संबंधित विभागांना पोहचविले. केंद्राकडून सर्व परवानगी मिळाली असून नेमके पुतळ्याच्या अनावरण दिवसाच्या पूर्वसंधेला, म्हणजेच २४ डिसेंबर रोजी सुनील केदार यांनी ही परवानगी नाकारली असून ही दुदैवी बाब आहे. या संदर्भात बैठक घेऊन २४ तासांच्या आत पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणसाठी त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेच्या शीतकालीन सत्रात केली.

मित्रमंडळ चौकातील पूल वाहतुकीसाठी खुला करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा राष्ट्रवादीकडून इशारा

0

पुणे- पर्वती मित्रमंडळ चौकाजवळील आंबिल ओढ्यावरील पुल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नगरसेवक सुभाष जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निअदर्श्ने करण्यात आली यावेळी युवा कार्यकर्त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी खुला करा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला ..यावेळी महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी,श्वेता होनराव,गणेश मोहिते,सुशांत ढमढेरे,प्रेमराज गदादे,अभिजीत उंद्रे,मिलींद कडभाने,राहुल गुंड,संग्राम होनराव,संतोष पिसाळ,निलेश पवार,प्रमोद कोठावळे,प्रशांत क्षीरसागर,नारायण तेलंग,फारुख शेख,मोहसीन काझी,महेंद्र गावडे,सुशिल कचरे,योगेश पवार,सोनाली उजागरे,प्राजक्ता जाधव,रुपाली बिबवे,विश्वास ननावरे,अजित बाठे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

पर्वती मित्रमंडळ चौकाजवळील आंबिल ओढ्यावरील पुल लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा,नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येत्या महिनाभरात तो चालु करण्यात यावा,नाही तर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी विधानसभेच्या वतीने अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादीचे येथील कार्याध्यक्ष दिलीप अरुंदेकर यांनी दिला ,नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले पुलाच्या कामाची निविदेची ६ महिने मुदत असुन हि सदर पुलाचे काम ९ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटुन गेला तरी पुर्ण झाले नाही,प्रशासन हे ढिम्मपणे काम करत असुन नागरिकांची होणारी गैरसोय त्यामुळे होत आहे तरी प्रशासनाची कृती किती लाजीरवाणी आहे. पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले पुणे महानगरपालिकेच्या महत्तवाची पदे भुषविणारे लोकप्रतिनिधी या प्रभागातील असुन हि सदर पुलाचे काम वर्षभर रखडले आहे,तरी भाजपाचे लोकप्रतिनिधी आपले काम चोखपणे करीत नाहीत, त्यामुळे नागरिकांना अशा त्रासाला नाहक सामोरे जावे लागत आहे.नगरसेविका प्रियाताई गदादे म्हणाल्या जनता वसाहतील घरेलु कामगार,विद्यार्थी,नागरिक यांची खुप रेलचेल या रस्त्यावर असते त्यामुळे त्या सर्वांची मोठी गैरसोय होत आहे

पिंपरी-चिंचवड मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे, दि.8 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड, सेक्टर -4, स्पाईनरोड पथ क्रमांक-8, ॲक्वार्ड हॉस्पिटल मोशी प्राधिकरण येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात 2021-22 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे/लाभार्थ्यांचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्रदेखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे. यावर्षी १२ वी, पदविका व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) व्दितीय वर्षात असणारे विद्यार्थी देखील अर्ज वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करू शकतात.

शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम ८०० रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

बाहेरगावाकडील परंतू पुणे पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणा-या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक एम.डी. वाघमारे यांनी केले आहे.

कोण अजित पवार, कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्याचे दाखले मला काय देता

0

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात ,’ तुम्ही मतदारांच्या पाठिंब्याने सभागृहात निवडून आला आहात, तुम्ही कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचे प्रतिनधी नाही, असे म्हटले. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. सभागृहात अजित पवार यांनी आमदारांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर नारायण राणे यांना पत्रकारपरिषद सुरु असताना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर नारायण राणे प्रचंड संतापले. कोण अजित पवार? मी त्याला ओळखत नाही. जनतेच्या पैशांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असणाऱ्याचे दाखले तुम्ही मला काय देता, असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला असेल तर त्यामध्ये गैर काय होते? आदित्य ठाकरे यांना या गोष्टीचा राग का यावा? वाघाची मांजर कधी झाली. त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही. आदित्य ठाकरे तिथून जात असताना एखादा वेगळा आवाज काढला असता तर मग लगेच त्यांना त्या प्राण्याची उपमा लागू होते का, असा सवालही नारायण राणे यांनी विचारला. 

विधीमंडळात सर्वात चांगले काम नितेश राणे करतो. हीच त्यांची पोटदुखी आहे, राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे असा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी केला आहे.नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, ‘सिंधुदुर्गातील शिवसैनिकावरील हल्ल्याचा प्रकरणाचा नितेश राणेंचा काहीच संबंध नाही तसेच या प्रकरणात नितेश राणेंचे नाव जाणिवपूर्वक टाकले जात आहे. राज्याचा अॅडिशनल डीजी, राज्यातील पोलिस तिथे आले. असं काय घडलं की, एवढी यंत्रणा तिथे आली. अशा छोट्या मोठ्या गोष्टी सगळीकडे होत असतात. यासाठी एवढी यंत्रणा का आली? कुठूनही नाव गोवायचं आणि त्यासाठी कलम 307 लावायची. खरचटल्यासाठी ही कलम लावली आहे. नितेश राणेंचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे.’

अदित्य ठाकरेंचा आणि मांजरीचा संबंध काय?
नितेश राणे यांच्या म्याव म्याव प्रकरणावर देखील नारायण राणेंनी भाष्य केले आहे. नितेश राणेंनी कसला आवाज काढला. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. तसेच तो विधानभवनात बोललेला नाही. तो पायऱ्यांवर बसून बोललेला आहे. तसेच पंतप्रधानांची नक्कल केल्यावरुन राणे म्हणाले की, भास्कर जाधवांना जशास तसे उत्तर दिले जाईल.

काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष परब यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीसाठी थेट नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना दोन वेळा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. याच प्रकरणात मुख्य आरोपी सचिन सातपुते याला दिल्लीतून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर आता नितेश राणेंना अटक होणार अशी शक्यता आहे. तत्पूर्वी पोलिसांनी नितेश राणेंना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, ते हजर झाले नाहीत.यानंतर त्यांनी थेट कोर्टात अर्ज दाखल केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी 24 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. राणे यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याच दिवशी जामीनावर मुक्तता करण्यात आली होती .

“मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना जाणीव आहे”, १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी फडणवीसांचा टोला!

0

मुंबई- विधिमंडळात प्रत्येकानंच आपापल्या जबाबदारीचं भान ठेऊन योग्य वर्तनच ठेवायला हवं, सभागृहाचा मान सन्मान न ठेवणाऱ्यांना ४ तास हवे तर ८ तास सभागृहाबाहेर ठेवा ,१२ महिने नका ठेऊ अशा शब्दांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनाही कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचा धागा पकडत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे स्वागत करत पाठींबा दिला पण तो देताना “मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी वर्षभर बाहेर ठेऊ नये याची जाणीव आहे”, असा टोलाहि मारला .

फडणवीस म्हणाले “देशाची लोकसभा असेल किंवा राज्याचं विधानमंडळ असेल, यांच्यावर या लोकशाहीने राज्य चालवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे इथे आपण काय करतो, कसं वागतो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खासगी आयुष्यात आपण कसेही वागू शकू. पण इथे आपण जनतेचे विश्वस्त म्हणून आलो आहोत. त्यामुळे मूल्यांचं आपण पालन केलं पाहिजे. नियमांचं पालन केलं पाहिजे. सभागृहाचा दर्जा सांभाळायला हवा. व्यक्तिगत वर्तन किंवा सामुहीक वर्तनात तो कायम ठेवला पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

कुत्र्या मांजराचे आवाज काढण्यासाठी जनतेने निवडून पाठविलेले नाही याचे भान ठेवा -अजितदादांनी सुनावले

0

मुंबई- ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार होऊन आपण सभागृहापर्यंत पोहोचतो , त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलो तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपले वर्तन लाइव्ह होणार्या बातम्यांद्वारे जनता पाहत असते म्हणत उपमुख्यमंत्र्यांनीआमदारांचे कान टोचले आहे.’असे वागणे म्हणजे लाखो मतदारांचा अपमान केल्यासारखे आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख प्रक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवे’ असे देखील अजित पवार म्हणाले.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केले जात होती. ते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे येताच म्याव-म्याव असा अवाज काढला होता.या प्रकरणावरुन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावरुन आमदारांचे कान टोचले आहे.

विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याविषयी सविस्तर भूमिका मांडली. सभागृहाचे कामकाज सुरळित चालण्यासाठी विधिमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहीजे, अशा शब्दात अजितदादांनी सदस्यांचे कान टोचले.विधिमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधिमंडळ सभागृहाने उच्च मूल्ये प्रस्थापित केली आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहीजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. पण काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे, असे मत अजितदादांनी व्यक्त केले.अजितदादा पुढे म्हणाले की, “सुरूवातीच्या काळात आम्ही निवडून आलो तेव्हा विधिमंडळ कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत नव्हते. आता दोन्ही सभागृहांचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पाहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे. आमदारांना दोन-दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराने करायचे असते. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे.”आगामी‌ काळात आमदारांनी सभागृहात तारतम्य ठेवून बोलावे. सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असे आवाहन अजितदादांनी केले.