पुणे-ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून काँग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी समाचार घेतला. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असे आव्हान त्यांनी कॉंग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना दिले.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ढिलाई आणि बेपर्वाई कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे व त्यासाठी मुळात एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले असताना त्यासाठी महाविकास आघाडीने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना महासाथ, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयात आघाडी सरकार स्वतः काही जबाबदारी पार पाडायचे टाळून केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे. राज्यातील प्रश्न सोडविण्याची मुख्य जबाबदारी आघाडी सरकारची असताना त्यासाठी कोणताही पुढाकार घेताना आघाडी सरकार दिसत नाही. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून मोदी सरकारने जनतेला दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकार मात्र शक्य असून असा दिलासा देत नाही. केवळ केंद्र सरकारनेच कर कमी करून आणखी दिलासा द्यावा अशी अपेक्षा आघाडीचे नेते व्यक्त करतात. अशा रितीने राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायची आघाडी सरकारची अपेक्षा असेल तर या सरकारला राज्यात सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आघाडी सरकारने सत्ता सोडून राष्ट्रपती राजवट स्वीकारावी आणि मगच केंद्र सरकारकडून प्रत्येक कामाची अपेक्षा करावी.
…तर राष्ट्रपती राजवट स्वीकारून सगळाच कारभार केंद्राकडे द्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना आव्हान
तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण व नोंदणीबाबत तृतीयपंथीय संस्थांशी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांची चर्चा
पुणे दि.22: तृतीयपंथीयांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, तृतीयपंथीयांसाठी पुण्यात आधारश्रम सुरु करणे तसेच तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण व नोंदणीबाबत तृतीयपंथीय संस्थांशी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी चर्चा केली.
सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या बैठकीला समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तसेच पुणे जिल्ह्यातील बिंदु क्वीर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे तृतीय फाऊंडेशन व मंगलमुखी फाऊंडेशनचे प्रतिनिधी मयुरी बनसोड, भूमी फाऊंडेशनचे श्री. कैलास पवार, महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे लखन ओव्हाळ, संजय टाकळकर तसेच समुपदेशक कृपाली बिडये उपस्थित होते.
श्रीमती संगिता डावखर म्हणाल्या, शासनाच्या निर्देशानुसार पुणे येथे तृतीयपंथीयांसाठी आधारश्रम सुरु करणे व तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी तसेच प्रशिक्षणाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. पुणे जिल्हयातील तृतीयपंथीय संस्थांशी जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी त्वरीत संपर्क साधून माहितीची नोंदणी करणेबाबत तसेच ट्रान्सजेंडर पोर्टलवर ओळखपत्र व ओळखप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्यात यावे, तसेच आधारकार्ड व संजय गांधी निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधींची नक्कल करताना पंतप्रधानांचा व्हिडिओ सचिन सावंतांनी केला शेअर, म्हणाले – भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संसदेमधील कलाविष्कार
मुंबई-आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने विरोधकांनी एकच गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे जाधवांना माफी देखील मागावी लागली. मात्र यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करत असल्याचे दिसत आहे. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत असे ट्विट सचिन सावंतांनी केले आहे.
सचिन सावंत ट्विटमध्ये म्हणाले की, ‘विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत.’
काय आहे प्रकरण?
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजेच्या प्रश्नावर बोलताना कोरोना काळ आल्याने वीज माफीचे आश्वासन पूर्ण झाले नाही असे म्हटले. यानंतर भास्कर जाधव यांनी पुनरुच्चार करून पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरच संतप्त देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी. त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे असा आक्रामक पावित्रा फडणवीस यांनी घेतला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आपला आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली. यानंतर नितीन राऊतांना माफी मागावी लागली.
सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार
मुंबई, दि. 22 : मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच विविध समाजमाध्यमे देखील महत्त्वाची आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी येत्या काळात समाजमाध्यमांचा अधिकाधिक वापर करुन शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे काम करीत अचूकता आणि गतिमानतेवर भर द्यावा, असे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव दीपक कपूर यांनी केले.

श्री. दीपक कपूर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी संचालक (प्रशासन) श्री. गणेश रामदासी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. कपूर यांचे स्वागत केले तर डॉ. पांढरपट्टे यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर यांचेसह विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित बैठकीत श्री. दीपक कपूर म्हणाले की, समाजमाध्यमांमध्ये मोठी ताकद असून विविध जागतिक, राष्ट्रीय घडामोडींमध्ये याचा वापर कसा होतो ते दिसून आले आहे. शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करीत असताना सर्व अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करण्याची गरज आहे. समाजमाध्यमांवरील शासनविषयक किंवा आपल्या विभागाशी संबंधित पोस्ट्सवर तत्काळ प्रतिसाद दिल्यास शासनाच्या सकारात्मक प्रतिमानिर्मितीला त्याचा मोठा लाभ होणार आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजना, शासनाचे जनहिताचे निर्णय, घोषणा, उपक्रमांची माहिती तत्काळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.
शासनाच्या समाजमाध्यमांवरील मजकूर हा प्रसारमाध्यमांसाठी बातमीचा स्त्रोत व्हायला पाहिजे हे सांगताना अचूक, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती देणे हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बातम्यांचा मूळ गाभा आहे, त्यादृष्टीने कमी वेळेत अधिक गतीने माहितीचे प्रसारण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही श्री. दीपक कपूर यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना मावळते सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दोन वर्षांच्या कालावधीतील कार्याचा आढावा घेतला. इतर सर्व विभागांपेक्षा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाचा अनुभव आपणासाठी वेगळा होता, असे सांगताना त्यांनी अहोरात्र सजग राहून काम करणाऱ्या या विभागाने कोरोना काळात केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. डॉ. पांढरपट्टे यांची रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागात मृद व जलसंधारण सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
श्री. दीपक कपूर यांच्याविषयी…
भारतीय प्रशासन सेवेच्या 1991 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले श्री. दीपक कपूर हे सध्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे महासंचालक तथा सचिव (माहिती व जनसंपर्क) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
श्री. कपूर यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक या पदांवर काम केले आहे.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या विभागाचे सचिव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर श्री. दीपक कपूर यांनी उल्लेखनीय सेवा केली आहे.
गिरणी कामगारांसाठी मुंबईत प्राधान्याने घरे उपलब्ध करुन देणार – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड
मुंबई-गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. ज्या गिरणी कामगारांनी 2016 च्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केला होता व ज्यांनी या घरासाठी पैसे भरले होते, त्यांना ते पैसे व्याजासह परत करुन त्यांना प्राधान्याने मुंबईत घर उपलब्ध करुन दिले जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
गिरणी कामगारांच्या घरांबाबत विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड बोलत होते.
गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले, ज्या गिरणी कामगारांनी या घरासाठी पैसे भरले आहेत. त्यांना ते पैसे व्याजासाह परत केले जातील. मुंबईत म्हाडाची घरे ज्यावेळी उपलब्ध होतील. त्यावेळी त्यांना प्राधान्याने घरे उपलब्ध करुन दिली जातील.
गिरणी कामगारांसाठी म्हाडामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगीतले .
सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, कपील पाटील, विनायक मेटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले
मुंबई, दि. 22 : बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंड करण्यासंदर्भातही तरतूद करण्यात आली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत हे विधेयक मांडताना सांगितले.
राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारास आळा बसावा यासाठी असलेल्या शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी संयुक्त समितीची नेमणूक करण्यात आली होती. शक्ती फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना जरब बसावी यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी व सुधारणा करण्यात आली आहे. या संबंधितचे विधेयक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत मांडले.
महिलेवरील ॲसीड हल्ला गुन्ह्यात आजन्म कारावास, द्रव्यदंडातून महिलेवर उपचार करण्यात येणार. महिलेच्या विनंयभंग प्रकरणी नवीन कलम ३५४ ड प्रस्तावित करण्यात आले. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात कलम ३७६ मध्ये सुधारणा करून मृत्युदंडदेखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लैंगिक अपराधांच्या बाबतीत ३० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहाच्या सदस्याकडून तसेच जनतेकडून याबाबत सूचना आणि सुधारणा मागविण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधेयक मांडताना सांगितले.
आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 22 : आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणातेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आरोग्य विभागातील पदे शंभर टक्के भरली जावीत ही शासनाची भूमिका आहे. ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. यात परीक्षापद्धतीत बदल करावा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, याबाबत सांगोपांग विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
परीक्षा घेण्यासाठी संस्था निश्चित करताना विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला होता. सामान्य प्रशासनाच्या निकषांनुसार सर्व तपासणी करण्यात आली होती. संबधित संस्था काळ्या यादीत नसल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
परीक्षासंदर्भात चौकशी सुरु असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई होईल. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही, त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही असेही श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, आदिंनी सहभाग घेतला.
००००
कॅलीग्राफी तज्ञ, ‘थिंक पाॅझिटिव्ह’ मासिकाचे संपादक, पॉझिटिव्ह कट्टाचे संस्थापक प्रभाकर भोसले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
पुणे-कॅलीग्राफी तज्ञ, ‘थिंक पाॅझिटिव्ह’ मासिक व दिवाळी अंकाचे संपादक, पॉझिटिव्ह कट्टाचे संस्थापक प्रभाकर भोसले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.भोसले यांच्या वडिलांना आणि कुटुंबाला सैन्यदलात काम करण्याची पार्श्वभूमी आहे. सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेत त्यांच्या आजोबांनी काम केले आहे.
प्रभाकर भोसले यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. कॅलीग्राफी आणि टायपोग्राफीमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले आहे. ते गेली २७ वर्षे विविध मिडीयांसोबत डिझाइन आणि कॅलिग्राफीचे काम करत आहेत. वेगवेगळ्या इव्हेंट आणि पुस्तकांसाठी तसेच दैनिकातील पुरवण्यांसाठी आजपर्यंत सुमारे २५ हजारहून जास्त कॅलीग्राफी शिर्षके केली आहेत. संपादकिय आर्टिस्ट या पोस्टवर सकाळ पुणे येथे १६ वर्षे आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. गेल्या १२ वर्षापूर्वी स्वत:चा डिझाइन स्टुटिओ चालू केला आहे. आजपर्यंत हजारो पुस्तकांचे डिझाइन प्रभाकर भोसले यांनी केले आहे. दैनिक भास्कर, दिव्यमराठी, सकाळ, पुढारी, प्रभात या दैनिकासाठी तसेच अनेक मासिके, नियतकालिकांसाठी विविध प्रोजेक्टसाठी कॅलिग्राफी, डिझाइन आणि कॉन्सेप्टस् कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. जर्मनी हॅम्बर्ग येथील गार्सिया मिडीयाचे संस्थापक मारिओ गार्सिया ज्यांनी जगभरातील ५०० पेक्षा जास्त न्यूजपेपरची डिझाइन केली आहेत त्यांच्या गार्सिया मिडीया या कंपनी सोबत दोन वर्षे काम केले आहे. न्यूजपेपर डिझाइन, मासिके आणि विविध ब्रँड प्रमोशनमध्ये त्यांचा हातखंडा आहे. सकाळमधील प्रसिद्ध ग्राफिटी या सदरासाठी हजारो ग्राफिटींचे सुलेखन आणि शेकडो ग्राफिटींचे लेखन त्यांनी केले आहे. ग्राफिटीचे अनेक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके सादर केली आहेत. अमेरिकेत मिनियापोलीस आणि कॅलिफोर्निया येथे मराठी कॅलीग्राफि पेंटींगची प्रदर्शने केली आहेत.
थिंक पाॅझिटिव्ह या दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. गेल्या सात वर्षात थिंक पॉझिटिव्ह दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय क्रमांकाचे २१ पुरस्कार मिळाले आहेत. थिंक पॉझिटिव्हच्या माध्यमातून सगळ्यांनी सकारात्मक राहावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. एप्रिल 2021 मध्ये थिंक पॉझिटिव्ह हे मासिकही चालू केले आहे.
अनेक शाळांमधून त्यांनी “पॉझिटिव्ह कट्टा” चालू केला असून त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. सकारात्मकता वाढीसाठी या कट्ट्याचा उपयोग होत आहे.
भास्कर जाधवांनी अंगविक्षेप करत केली पीएम मोदींची नक्कल,नंतर मागितली माफी
मुंबई-हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल करताच मोठा गदारोळ उडाला. पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून वातावारण इतके तापले की सभागृहाचे कामकाज 30 मिनिटे स्थगित करण्यात आले. शिवसेनेचे आमदार नितीन राऊत यांनी 15 लाखांची आठवण केली. तर भास्कर जाधव यांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. त्यावरूनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप आमदार संतप्त झाले.
नितीन राऊत यांनी वीजेच्या प्रश्नावर बोलताना कोरोना काळ आल्याने वीज माफीचे आश्वासन पूर्ण झाले नाही असे म्हटले. यानंतर भास्कर जाधव यांनी पुनरुच्चार करून पंतप्रधानांची नक्कल करून दाखवली. यावरच संतप्त देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी. त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे असा आक्रामक पावित्रा फडणवीस यांनी घेतला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आपला आक्षेप नोंदवून कारवाईची मागणी केली.
विरोधक आक्रमक झाल्याचे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस आणि इतर भाजप आमदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजप आमदारांनी काहीही ऐकून घेतले नाही. उलट जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते म्हणून भास्कर जाधव यांना समज द्यायला हवा अशी मागणी फडणवीस यांनी केली
यानंतर भास्कर जाधव स्वतः पुन्हा उभे राहिले. त्यांनी आपण केलेल्या विधानाने भाजप आमदारांची मने दुखावल्याने दिलगिरी व्यक्त केली. तसेच आपले शब्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला अंगविक्षेप असे दोन्ही मागे घेत असल्याचे सांगितले. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांचा राग शांत झाला नाही. आमदार भास्कर जाधव माफी मागत नाहीत. त्यांना या घटनेचे गांभीर्य देखील नाही. ते ही गोष्ट हसण्यावर नेत आहेत असा आरोप फडणवीस यांनी केला.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सभागृहात अपमान झाला. उद्या कुठल्याही मोठ्या नेत्याचा अपमान होऊ शकतो. त्यावेळी सुद्धा असेच म्हटले जाईल का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. यानंतर उडालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आणि भास्कर जाधव यांनी माफी मागितली.

वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज कनेक्शन तो़डण्याची मोहिम स्थगित करा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची आग्रही मागणी
मुंबई, दि.२२ डिसेंबर- गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात न देता ऐन रब्बी हंगामात विज कनेक्शन तोडण्याची मोहिम महावितरण कंपनीकडून सुरु करण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज जोडणी तो़डण्याची सुरु केलेली मोहिम तातडीने स्थगित करावी तसेच वीज जोडणी धोरण २०२० मध्ये शेतकरी हिताचे बदल करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेमध्ये नियम २८९ अन्वेय विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सूचना मांडली. यावेळी आपली भूमिका मांडताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मागेल त्याला कृषीपंप कनेक्शन, असे आश्वासन दिले असताना, शेतक-यांना नवीन कनेक्शन न देता, उलट जुने कनेक्शन तोडण्याचा सपाटा आघाडी सरकारने लावला आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय व वीज बिले न देता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषी पंप विज जोडण्या तोडण्यात आल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही. कारण सरकार एका बाजूला विदेशी मद्यावरील 50 टक्के कर कमी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे कृषी पंप वीज जोडण्या तोडणाऱ्या राज्य सरकारच्या या बेदरकार धोरणाविरुद्ध राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे असे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी 50 टक्के वीज बिल माफीची घोषणा केली असताना शेतकऱ्यांना अवाजवी जादा वीज देयके देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही दरेकर यांनी केला
शेतक-यांना लागणा-या कृषी पंपासाठी यापूर्वी 3 एचपीसाठी 3 हजार व 5 एचपी 5 हजार रुपये आकारण्यात येत होते,मात्र वीज बिलात वाढ करुन आता 3 एचपीसाठी साडेचार हजार व 5 एचपीसाठी सहा हजार पाचशे रुपये एवढे जादा वीज बिल आकारले जात आहे. महावितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना वा जाहीर सूचना दिली नसताना त्यांची वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची बाब दरेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.
राज्यात डिसेंबरपर्यंत पावसाळा लांबल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून विविध नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आगामी रब्बी हंगामाकडून आशा निर्माण झाली आहे. पण रब्बीच्या हंगामात पिकांना पाण्याची गरज असताना कृषी पंपाची जोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेती पंपाच्या थकीत विज बिलांपैकी 67 टक्के विजबिल माफ केल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली. परंतु त्यांची अंमलबजावणीही सरकारने केली नाही व शेतक-यांची वीज जोडण्या सरसकट तोडण्यात आल्याचेही दरकेर यांनी स्पष्ट केले. तसेच शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडून सुरु असणारी वीज बिलाची सक्तीने होणारी वसुली आणि कृषी वीज जोडण्या तोडण्याची सुरु केलेली मोहिम तातडीने स्थगित करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई, दि 22 : गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या काळात 51 प्रकरणात 1 कोटी 21 लाख 79 हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत सांगितले.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्ष नेते विधानसभा सदस्य देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य लक्ष्मण पवार, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, सुनील प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
श्री. थोरात म्हणाले की, गोदावरी नदी पात्रातील जागेचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसीलदार यांच्या समवेत पंचनामा केल्यानंतर वाळुमाफियांनी नियमांचे उल्लंघन करुन आधुनिक साधनांच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करुन नदी पात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंत खड्डे केलेले नाही. नदीला पूर आल्याने 17 वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकूण 5 टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाबरोबर समन्वयाने काम करण्यात येईल. तसेच वेगवेगळ्या राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 970 आरोपी अटक करण्यात आले असून 46 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. लवकरच खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष यांच्याशी सुध्दा या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल.
राज्यपालांच्या हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान
मुंबई, दि. 21 : देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
जन्नत फिल्म्स संस्थेचे प्रमुख रईस खान यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना शहीद – ए – आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. इंग्लंड येथील समाज सेविका डॉ. परिन सोमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
हुतात्म्यांच्या योगदानाची तुलना कशाशी करता येत नाही. आपापल्या क्षेत्रात देशासाठी केलेले निःस्वार्थ काम ही देखील देशसेवाच असते असे सांगून गरीब, उपेक्षित व दिव्यांग व्यक्तींसाठी केलेले कार्य हे देखील देशप्रेमच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा दुर्लभ सिंह, हुतात्मा यश दिगंबर देशमुख, हुतात्मा विजय बापू सोनावणे व हुतात्मा परमवीर अब्दुल हमीद यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला, तसेच सीमेवर लढताना अपंगत्व आलेले दिव्यांग सैनिक कमांडो सुनील जोधा, कमांडो मनिष पीव्ही व नायक दीपचंद यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यपालांच्या हस्ते पार्श्वगायक उदित नारायण, गायिका डॉ जसपिंदर नरूला, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेते अश्मित पटेल यांसह ४० व्यक्तींना शाहिद ए आझम प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.
बिल्डरसाठी ९० कोटीची उधळण; संभाजी पुलावरील विसर्जन परंपरेला निर्बुध्दपणे छेद देणाऱ्या महापालिकेचा चेहरा उघड
पुणे- एकीकडे मेट्रोच्या मार्गिकेची आखणी करतानाच ज्यांना संभाजी पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाते हे लक्षात घेण्याची आवश्यक्यता वाटली नाही आणि आता ते लक्षात आणून दिल्यावर यावर आता कोट्यावधी खर्च होतील म्हणून पहिलीच निर्बुद्ध पणे आखलेली मेट्रोची मार्गिका कायम ठेवण्यासाठी पण केलेल्या महापालिकेने दुसरीकडे मात्र एका बिल्डर साठी चक्क ९० कोटीचा रस्ता करण्याचे टेंडर काढल्याचे वृत्त आहे .यामुळे महापालिकेचा दुटप्पी चेहरा उघड होत आहे.
महापालिका प्रशासनाने बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग; तसेच अस्तित्वात नसलेला २४ फुटी रस्ता सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) तयार करण्यासाठी ९० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या ठिकाणी विकसित करण्यात येणारा रस्त्या नव्याने आखण्यात आला असून, सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा निर्णय आता गुरुवारी सर्वसाधारण सभेत होणे अपेक्षित आहे . मंगळवारी मुख्य सभेत घडलेल्या संभाजी पुलावरील मेट्रोच्या निर्बुद्ध मार्गीकेमुळे झालेल्या गोंधळामुळे सभा तहकूब झाली आणि या प्रकल्पाबाबतचे अनेक ‘हिशेब’ फसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, या ठिकाणी उपाययोजनांची मागणी करण्यात येत होती. या चौकात मोठे व्यापारी संकुल उभे राहत आहे. त्यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी या व्यापारी संकुलासाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी तातडीने ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार करण्याबरोबरच या व्यापारी संकुलाच्या पाठीमागून जाणारा प्रस्तावित रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ९० कोटी रुपयांच्या निविदा ‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित करण्यासाठी काढण्यात आली आहे.
गंगाधाम चौकामध्ये उड्डाणपूल, भुयारी मार्ग; तसेच अस्तित्वात नसलेला २४ फुटी करण्यासाठीची निविदा मंगळवारी प्रकाशित झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये या निविदांवरून जोरदार फटाके फुटले. त्यानंतर या निविदेची ‘खोली आणि व्याप्ती’ सर्वसामान्यांसमोर उघड झाली. व्यापारी संकुलाच्या पाठीमागून डोंगराच्या कडेने २४ फूट रस्ता नव्याने तयार करण्यासाठी शहर सुधारणा समिती, स्थायी समितीने हा प्रस्ताव मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेपुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव डिसेंबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर होता. त्यावर मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत निर्णय अपेक्षित होता. मात्र, संभाजी पुलावरील मेट्रोमार्गावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झडल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ते गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणारा प्रस्तावित २४ मीटर रस्ता कलम २०५ अन्वये आखण्यात येत आहे. या रस्त्याची अंतिम मंजुरी ही मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण मिळणे अपेक्षित होते. अगदी त्याच दिवशी महापालिका प्रशासनाने हा रस्ता विकसित करण्याच्या निविदा प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे जो रस्ता अस्तित्वातही नाही, त्या रस्त्याच्या निविदा प्रकाशित करण्याची तारीख ही त्या रस्त्याल्या मंजुरी मिळणाऱ्या मुख्य सभेच्या तारखेच्याच दिवशीच यावी, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय आहे, असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. ही सभा तहकूब झाल्याने दोन दिवसानंतर होणाऱ्या सभेत आता या रस्त्याच्या मंजुरीवर निर्णय अपेक्षित आहे.
संबधित गृहप्रकल्पाला अगदी मुंबई दिल्ली पासून शुभाशीर्वाद असल्याने येथे केलेले खोदकाम नष्ट केले डोंगर आणि नव्याने उभारले डोंगर , नव्याने बिल्डरनेच केले रस्ते , शिवाय येथील सुरुंगाच्या स्फोटाने अगदी रस्त्याच्या पलीकडील इमारतींना गेले तडे या सर्वाकडे अगदी पोलिसात ,आणि वरिष्ठ पातळीवर स्थानिक नागरिकांनी अर्ज करूनही काहीही उपयोग झालेला नाही . कित्येक शेकडो कोटींच्या या गृहप्रकल्पाने असंख्य नियम , कायदे पायदळी तुद्विल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .
पिंपरी चिंचवडला गुंठेवारी सुरु;पुण्याला आणि पीएमआरडीएलाच का वावडे ? खर्डेकरांचा सवाल
पुणे मनपा आणि पी एम आर डी ए शासन आदेशाची अंमलबजावणी कधी करणार?
पुणे- पिंपरी चिंचवड महापालिकेने गुंठेवारी सुरु करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरु केले असून पुणे महापालिका आणि पीएम आर डीए ला आता हवे तरी काय ? गुंठेवारी ची अंमलबजावणी करण्यासाठी कसले वावडे आहे ? कसला मुहूर्त शोधताय ? असा थेट सवाल भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिकेचे विक्रम कुमार आणि पीएमआरडीए चे सुहास दिवसे यांना केला आहे
या दोन्ही अधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात खर्डेकर यांनी म्हटले आहे कि,’महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम 2001 ) व यात सुधारणा करण्यासाठी 15 मार्च 2021 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील काही मुद्द्यां बाबतीत राज्यातील विविध महापालिका प्रशासनाने काही स्पष्टीकरण / खुलासा राज्य सरकार कडून मिळावा असे पत्र लिहिले होते. पुणे मनपा ने देखील याबाबत राज्य सरकार कडून आदेश निर्गमित व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला होता. या सर्व विषयात भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व मी सातत्याने आपल्याकडे व शासनाकडे पाठपुरावा करत होतो. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने सुधारित अधिनियम निर्गमित केले असून या आदेशानुसार गुंठेवारी पद्धतीने झालेला विकास नियमित करण्यासाठी सुधारित प्रशमन शुल्क व सुधारित विकास शुल्क निश्चित केला आहे. मात्र यास दोन महिन्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी अद्याप पुणे मनपा आणि पी एम आर डी ए ने प्रकरणे दाखल करून घेण्यास सुरुवात केलेली नाही.
तरी या आदेशाच्या अधीन राहून त्वरित गुंठेवारी ची प्रकरणे दाखल करून घ्यावीत व शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुंठेवारी नियमितिकरण आभावी त्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा.ह्या सर्व विषयात पुणे मनपा व पी एम आर डी ए ‘स ही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार असून विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होईल. तरी आपण त्वरित प्रकरणे दाखल करून घेऊन छाननी करून नियमितिकरण करावे अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
खर्डेकर यांनी सोबत पिंपरी चिंचवड महापालिकेचा आदेश जोडला आहे. तो पुढे पहा ….
पिंपरी चिंचवड पालिकेचा आदेश 👇
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका हद्दीतील दि . ३१/१२/२०२० पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यात सुधारणा करून अधिनियम दि .१२ मार्च २००१ पारित केला असून निश्चितीसाठी शासन आदेश क्र . ठेवा – २०२१-४५ / २०८१ / नवि -३० दि . १८/१०/२०२१ पारित केलेला आहे . या निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत मि आवाहन करणेत येते की , सदर शासन निर्णयानुसार दि .३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महापालिकेकडे अर्ज करणेत यावेत.
नियमितीकरणासाठीची माहिती मनपाच्या वेबसाईटवर http://www.pcmcindia.gov.in उपलब्ध आहे . तसेच सविस्तर अर्जाचे नमुने आवश्यक कागदपत्रे या बाबतची सविस्तर माहिती गुंठेवारी बांधकामे नियमितीकरण General Information ( सर्वसाधारण माहिती ) मध्ये ( unauthorised structure regularizations ) या लिंकवर उपलब्ध आहेत मंदर अर्ज महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात स्विकारण्यात येणार आहेत . तसेच नागरीक स्वत : ही ऑनलाईन अर्ज कर शकतात . “सदरचे अर्ज विहित कागदपत्रासह दि . २०/१२/२०२१ पासून दि .२१ / ०२ / २०२२ पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत . तरी नागरीकांनी बांधकामे गुंठेवारी कायदयान्वये नियमित करण्यासाठी वरील मुदतीत लायसन्स इंजिनिअर / ला . आर्किटेक्ट मार्फत अर्ज सादर करावेत . दि .२१ / ०२ / २०२२ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अशी बांधकामे निष्कासनास पात्र राहतील .
▶️अ ) खालील अनधिकृत बांधकामे नियमित करणासाठी पात्र नाहीत …
१ ) Blue line निळया पुररेषेखालील बांधकामे / नदी पात्रातील बांधकामे
( २ ) विकास आराखड्यातील आरक्षणामधील बांधकामे
३ ) विकास आराखड्यातील रस्त्यामधील बांधकामे
( ४ ) रेड झोन मधील बांधकामे
( ५ ) बफर झोनमधील बांधकामे ,
( ६ ) धोकादायक बांधकामे
७ ) सरकारी जागेवर झालेली बांधकामे
८ ) शेती झोन / ग्रीन बेल्ट मधील बांधकामे
( ९ ) ना विकास झोन मधील बांधकामे
१० ) नाला क्षेत्रातील बांधकामे
▶️ब) खालील प्रकारची बांधकामे नियमितीकरणास पात्र ठरतील ..
१ ) रहिवास व वाणिज्य क्षेत्रातील बांधकामे
( २ ) दि .३१ / १२ / २०२० पूर्वी बांधून पूर्ण झालेले बांधकाम
३ ) चटई क्षेत्र निर्देशाकाच्या मर्यादित राहून केलेले बांधकाम ( निर्देशाकांपेक्षा अधिकचे बांधकाम स्वतःहुन निष्कासित केल्यास असे बांधकाम नियमितीकरणास पात्र राहील . )
▶️क ) बांधकामे नियमितीकरणासाठी खालील कागदपत्रे आवश्यक राहतील . :
१ ) विहित नमुन्यातील अर्ज .
( २ ) मालकी हक्कासाठी ७/१२ उतारा व तत्सम कागदपत्रे
३ ) बांधकाम दि . ३१/१२/२०२० पुर्वी बांधुन बांधकाम पूर्ण झालेबाबत करसंकलन विभागाचा दाखला
४ ) मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडुन स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी दाखला , ( २ मजल्यापेक्षा जास्त मजल्यांची इमारत असल्यास )
५ ) पाणीपुरवठा थकबाकी नसलेला दाखला
६ ) जलनि : सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला
७ ) अर्जासोबत नकाशा सादर करताना इमारतीचा प्लॉन , क्� “७ ) अर्जासोबत नकाशा सादर करताना इमारतीचा प्लॉन , क्रॉस सेक्शन , इलिव्हेशन , मार प्लॉन / लोकेशन प्लॉन , खिडक्या व दरवाजे तक्ता व इतर माहिती नकाशात दर्शविणे आवश्यक राहील . नकाशावर मालक व मा . आर्किटेक्टची स्वाक्षरी बंधनकारक राहील
ड ) गुंठेवारी नियमितीकरणाची पद्धती . या वेब पोर्टलवरील General Unauthorised structure महानगरपालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in Information ( सर्वसाधारण माहिती ) मध्ये regularisation या Link वर नागरीक , ला आर्किटेक्ट मार्फत महानगरपालिकेच CFC Centre वर किंवा स्वतः अनिलाईन अर्ज करु शकतील . महानगरपालिका त्यांनी Primary छाननी करून CFC Centre मदर अर्ज पुढे संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याची स्थळ पहाणीसह तांत्रिक छाननी होईल . त्यानंतर मंजूर झाल्यावर आवश्यक ते प्रिमीयम / अधिमुल्य भरणा केल्यावर संबंधित कार्यालयातर्फे नियमितीकरण दाखला व नकाशावर स्वाक्षरी करून दाखला देणेत येईल प्रस्तुत प्रकरणी अर्जासाठी रक्कम रु . १०० / – इतके शुल्क” CFC Centre वर आकरण्यात येईल . इ ) गुंठेवारी अधिनियमानुसार नियमित न होणारी बांधकामे निष्कासनास पात्र राहतील .
असे आयुक्त राजेश पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
परीक्षा फी भरणार , कंत्राटी कामगारांना मुदतवाढ देणार – स्थायी समितीचे निर्णय
दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार
पुणे-पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागांच्या शाळांतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून चार हजार ३९२ विद्यार्थी या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रती विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रती ५२५ रुपये परीक्षा शुल्क भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
रासने पुढे म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. वाणिज्य शाखा ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रती ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कात्रज-आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटणार
कात्रज येथील संतोषनगर आणि आंबेगावातील पोतदार शाळेसमोर जलवाहिनी क्रॉसिंग करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे परवाना शुल्क आणि अनामत रक्कम म्हणून तेरा लाख तीस हजार रुपये हस्तांतरित करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयामुळे कात्रज-आंबेगाव परिसरातील पाण्याच्या चार टाक्या भरणार आहेत. त्यामुळे कात्रज, आंबेगाव परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे.
आरोग्य विभागातील १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ
कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची तयारी आणि लसीकरणासाठी आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्या कर्मचार्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, फीजिशियन, अतिदक्षता विभाग फीजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक अशा १९९ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. या आधी २११ कर्मचार्यांना मुदत वाढ देण्यात आली होती.
रासने पुढे म्हणाले, आरोग्य विभागात वर्ग एक ते चारच्या ११७८ पदांना मान्यता आहे. परंतु सध्या ८२३ कर्मचारी कार्यरत असून ८५५ पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही पदे भरता येतील.
प्राणी संग्रहालयातील कर्मचार्यांना सहा महिने मुदतवाढ
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांना स्थायी समितीने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही पदे कायमस्वरुपी भरायची आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पद भरतीची कार्यवाही होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
–
