Home Blog Page 2049

पुणे महापालिकेची प्रभागरचना रद्द

0

पुणे:पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली होती. यानुसार १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर देखील करण्यात आली होती.

मात्र आता प्रभागरचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.ओबीसी आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न लांबला आहे. राज्य सरकारने नुकताच अध्यादेश काढून मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे पुण्यासह चौदा महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचनाही रद्द करण्यात आली आहे, तसा आदेश नुकताच पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारला निवडणुका, आरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेचे नियोजन करण्याचे सर्व अधिकार आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना रद्द केली आहे. तसा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला.

पुण्यातील हवेली तालुक्याचे विभाजन करून दोन तहसिलदार कार्यालय होणार

0

पुणे : जिल्ह्यातील हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे.वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्यभीमराव तापकीर आणि ॲड. अशोक पवार यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरिकीकरण, विकास पाहता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्यासंदर्भात लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीस उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी -चिंचवड येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय व अपर तहसिल कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले.

क दमवाक वस्ती येथील दुर्घटनेबाबत राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य डॉ. वावा यांनी घेतला आढावा

0

मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वनकुटुंबियांना तातडीने मदत देण्याचे निर्देश

पुणे, दि. 14 –  कदमवाक वस्ती येथे  ड्रेनेज लाइनचे काम करत असताना 2 मार्च रोजी चार कामगारांच्या गुदमरून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी आढावा घेतला. त्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांशीही चर्चा करून सांत्वन केले. कुटुंबीयांना तात्काळ मदत देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी संजय आसवले,  सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, डॉ.सुधाकर पानीकर, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, सरपंच श्रीमती गौरी गायकवाड,  दक्षता समितीचे सदस्य ॲड. सागर चरण, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के,  ग्रामसेवक अमोल घोळवे आदी उपस्थित होते.

श्री. वावा म्हणाले, कदमवाक वस्ती येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला तातडीने मदत झाली पाहीजे. त्यांना आर्थिक मदतीसोबतच पक्के घर, रोजगार याबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

ग्रामपंचायत कर्मचारी संख्या, कर्मचारी विमा योजना, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी,तात्पुरते कर्मचारी,त्यांचे वेतन आदींचाही त्यांनी आढावा घेतला.

पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कुटुंबियांना मदत करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी माहिती दिली.

यावेळी पोलीस, ग्रामपंचायत तसेच महसूल यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही आमचा लढा सुरूच राहणार –

0

मुंबई-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा एक पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून आणि वक्फ बोर्डावरील सदस्याचे कसे दाऊशी संबंध आहेत, हे दर्शवून नवा बॉम्ब टाकला. याशिवाय, सरकारी वकील अॅड. चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे न देता सीआयडीकडे दिल्याने विरोधी पक्ष भाजपाने सभात्यागही केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ मूळातच जो पेनड्राईव्ह मी दिला. त्यामध्ये स्पष्टपणे कट दिसतोय. कशाप्रकारे गिरीश महाजनांकडे रेड करायची. त्या रेडमध्ये काय काय ठेवायचं आणि हे घडलय. जे त्या सीडीमध्ये दिसतय ते सगळं घडलय. एवढच नाही तर अनेक प्रकरण त्यामध्ये आहेत, ती सगळी घडली आहेत. प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या नेत्याचं, मंत्र्यांचं नाव हे वकील घेत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे पोलीस याची चौकशी कशी करणार, त्यांच्यावर दबावच येणार आहे. म्हणून आम्ही अतिशय स्पष्टपणे ही मागणी केली होती, की हे प्रकरण सीबीआयला द्यायला पाहिजे. आज खरंतर उत्तर देताना वळसे पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि मुरब्बी व्यक्ती देखील, सारखा अडखळत होता. याचं कारण त्यांना मनातून माहीत होतं की आपण जे उत्तर देतोय ते चुकीचं देतोय. जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे. आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत. ही सगळी चौकशी सीबीआयला गेली, तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे.”

पेनड्राईव्ह बॉम्बप्रकरणी सीआयडी चौकशी होणार; कुणालाही पाठिशी घालणार नाही- गृहमंत्री वळसे पाटील

0

मुंबई-देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणाची संपुर्ण चौकशी सीआयडीमार्फत करणार आहोत. कुणालाही पाठीशी घालणार नाही. अशी स्पष्टोक्ती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात दिली. पण याव फडणवीसांनी सपशेल नाराजी व्यक्त करीत सीबीआय चौकशीची मागणी केली.

फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर उत्तर देताना सभागृहात गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाला आणि गुन्‍हा 2022 मध्‍ये दाखल होतो आहे. आता याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. ज्या पोलिस दलाचा फडणवीसांना अभिमान आहे. त्यावर आता विरोधकांना विश्वास नाही का? असा सवाल वळसे पाटलांनी उपस्थित केला आहे. या निमित्त मला आपल्याला एक सांगायाचं आहे, की आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना ३३ हजार विहिरींचा जलयुक्त शिवारांचा आपण एक पेनड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात एक ६.५ जीबीचा एक पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला. आज परत आपण पेनड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? ”असा सवाल यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. पेन ड्राईव्‍हमध्‍ये फडणवीस यांनी त्यात सगळी माहिती दिली नाही. काही राखून ठेवली आहे. सुशांत सिंग प्रकरण मुंबईत घडून गुन्‍हा बिहारमध्‍ये दाखल केला, आणि प्रकरण सीबीआयकडे दिले. असे वळसे पाटील म्हणाले.

तपास तर व्हायलाच हवा

प्रविण चव्‍हाण यांनी सरकारी वकीलपत्राचा राजीनामा दिला आहे, तो आम्‍ही स्‍वीकारला आहे. आम्‍ही तपास सीआयडीकडे देणार आहोत. प्रकरणामागे नेमके कोण हे तपासावे लागेल, नवाब मलिक पाच वेळा आमदार झाले तेव्‍हा नवाब मलिक यांना टार्गेट केले जात नाही मात्र केंद्र सरकारच्‍या विरोधात बोलण्‍यामुळे मलिकांवर कारवाई झाली. असे म्हणत वळसे पाटील यांनी भाजपवर टीका केली.

वक्फ बोर्डावर दाऊदची माणसे! फडणवीसांनी पुन्हा फोडला पेनड्राईव्ह बाँम्ब , विधानसभा अध्यक्षांना केले पुरावे सादर

0

मुंबई-राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात व्हिडिओ बाँम्ब फोडल्यानंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा पेन ड्राईव्ह बाँम्बचा धमाका केला. वक्फ बोर्डावर दाऊदची माणसे घेतली ती राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नियुक्त केल्याचा आरोप त्यांनी केला.

महाविकास आघाडी आणि वक्फ बोर्डावर गंभीर आरोप केले. या पेन ड्राईव्हमध्ये असलेल्या व्हिडिओत दोन पात्र आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदसैर लांबे, ह्यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलं असून, तो दाऊदचा माणूस असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

ते म्हणाले, मी पेनड्राईव्ह देतो. आता या पेनड्राईव्ह मध्ये दोन पात्र आहेत. एक मोहम्मद अर्शद खान आणि दुसरे डॉ. मुदसैर लांबे. त्यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केले. लांबे यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. मग त्यांनी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिला होता.

डॉ लांबे यांनी या महिलेच्या पती विरोधात चोरीची तक्रार केली अन् तो तुरुंगात गेला. डॉ. लांबे आणि मोहम्मद अर्शद खान यांच्यात झालेल्या संवादात वक्फ बोर्डामध्ये पैसे कसे कमवायचे अशी चर्चा होती याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, “आता अरशद खान सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे मोबाईल देखील त्यांच्या ताब्यात आहे. आता विनंती एवढीच आहे. हे मांडल्याबरोबर डिलीट होऊ देऊ नका, लगेच कळवा. मी संपूर्ण संवाद दिलेला आहे, त्यामुळे डिलीट झाला तरी अडचण नाही, परंतु कळवा आणि तो मोबाईल जप्त करा. मला एवढच सांगायचं आहे. चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डात नियुक्त केली आहेत का?” असं म्हणत महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला.सरकारने आता तरी जागे व्हायला हवे. दाऊदची माणसे सरकारमध्ये असतील ते या महाराष्ट्राचे काही खरे नाही असेही ते म्हणाले.

पेनड्राईव्हमध्ये हा संवाद

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराया था. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दारुद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.

अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वकफ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वकफ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा

अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.

डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

अर्शद खान: अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.

पुण्याचे पाणी,महापालिकेचा आणि स्थायी समितिचा कारभार..विधानसभेत ऐरणीवर.

0

पुणे महापालिकेच्या दादागिरीमुळे ग्रामीण भागाला कमी पाणी मिळतय राहुल कुल यांची तक्रार

मुंबई-आ.राहुल कुल म्हणाले, धरणातील पाण्यासाठी पुणे महापालिका करते दादागिरी …साडेअकरा टीएमसी ऐवजी 22 टीमसी पाणी वापरते… जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटलांनी यावेळी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण केले ..5 वर्षे स्थायीच्या समितीने काय केले असा सवाल केला ,राहुल कुल तुम्ही महापालिकेत जोर लावला तर तुमचा प्रश्न 5 वर्षात सुटला असता असे ते म्हणाले .. त्या नंतर सिद्धार्थ शिरोळे यांना उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, पुण्याला पाणी आम्ही कधीच कमी पडू देणार नाही .त्याची काळजी करू नका .पुणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत प्राप्त निवेदनांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

पुणे जिल्ह्यातील मावळ व मुळशी तालुक्यात सहा धरणे आहेत या धरणातील पाणी  दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यास मिळाल्यास दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे तसेच तलावांचे फेर सर्वेक्षण करावे, अशी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडण्यात आली. लक्षवेधीत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, धीरज देशमुख, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रती जलवर्षासाठी कृष्णा खोऱ्याबाहेर पाणी वळवण्यासाठी सरासरी व महत्तम मर्यादा ठरवून दिली आहे. कृष्णा खोऱ्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता २ ऑगस्ट २०२८ अन्वये भावे समिती गठित करण्यात आली आहे. तसेच समितीच्या अहवालावर अभ्यास करून पुढील धोरण ठरविण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. तज्ज्ञ समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यावर कार्यवाही होईल. तसेच खडकवासला प्रकल्पांतर्गत जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या मूळ मंजूर प्रकल्पीय अहवालामध्ये एकूण ६५ तलावांचा समावेश असून त्यापैकी ४५ तलावांना सध्या पाणी सोडण्यात येते. मंजूर प्रकल्प अहवालामध्ये समावेश नाही अशा तलावांबाबत उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी क्षेत्रीय व महामंडळ स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त निकषानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन

0

पुणे, दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तसेच तालुका पातळीवर  मंगळवार 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांमध्ये जागृतीच्यादृष्टीने वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या फसवणूकीपासून सावधानता बाळगण्याबाबत संदेश तसेच ग्राहक हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये याबाबतचे संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स यावेळी उभारण्यात येणार आहेत.  लोककला व पथनाट्याचे सादरीकरणही यावेळी करण्यात येणार आहेत.

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

0

मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे, दि. 14 : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केए’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकासाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी –चिंचवड, नवीन इमारत, मोशी येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. तसेच यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील त्यांनी 16 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 वा.पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 17 मार्च रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी 17 मार्च रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 17 मार्च रोजी दुपारी 2.30 वा. पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. डीडी जमा केला त्याच त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर संबंधीत अर्जदार लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

दुचाकीची यादी 21 मार्च रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 21 मार्च रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे मॅसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून मिळणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवह अधिकारी यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 18 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

0

पुणे दि. 14 : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या 18 वाहनांचा जाहीर ई-लिलाव पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 23 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईनरित्या आयोजित करण्यात आला आहे.

लिलावातील वाहने पाहणीसाठी 11 मार्च ते 22 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड आवारात उपलब्ध आहेत. यामध्ये बस, ट्रक, डी. व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव तहसिलदार व पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.

जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 14 ते 20 मार्च या कालावधीत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे. नाव नोंदणीनंतर 14 ते 21 मार्च या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 प्रत्येक वाहनासाठी 50 हजार रकमेचा ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड’ या नावे अनामत रक्कमेचा धनाकर्ष, ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी, मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.

लिलावाच्या अटी व नियम 11 मार्चपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

विलेपार्ले परीक्षा केंद्रावरील रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. 14 : मुंबईतील विलेपार्ले येथे रसायनयशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपद्वारे प्रसारित झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करीत आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी इयत्ता बारावीची रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटली अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमात आहेत. याबाबतची वस्तुस्थिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितली. इयत्ता बारावीची प्रश्नपत्रिका एसएससी बोर्डाच्या नियमानुसार १० मिनिटे अगोदर म्हणजे १०.२० वा. प्रश्नपत्रिका वाचनासाठी वाटप करण्यात येते व प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिखाण १०.३० वा. सुरू करण्यास सांगितले जाते. विले-पार्ले केंद्र क्रमांक ३६०१, मुंबई येथील केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर १०.२४ वा. प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला. या विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेच्या भागाची छाननी केली असता व्हॉट्सअॅपद्वारे काही भाग प्राप्त झाल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करत आहेत. अध्यक्ष, एसएससी बोर्ड यांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजेच १०.२० वा. नंतर मोबाईलवर आढळलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून प्रश्नपत्रिकेचा काही भाग प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रसायनयशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

0

मुंबई, दि. 14 : थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केली असून थकीत बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित रक्कम सहा महिन्याचे हप्ते करुन भरल्यास थकबाकीवरील सर्व व्याज आणि दंड माफ करण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.

मेहकर (जि.बुलढाणा) तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरण कंपनीने थकबाकी न भरल्यामुळे घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या संदर्भाने सदस्य संजय रायमुलकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुधारित वितरण क्षेत्र योजने (RDSS)च्या माध्यमातून राज्यात १.६६ कोटी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. मेहकरच्या ग्रामीण भागातील ११४ घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी न भरल्याने खंडित करण्यात आला होता. या खंडीत वीजपुरवठ्याची पुनर्जोडणी करण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना २०२२ जाहीर केली असून या योजनेचा लाभ थकबाकीदारांना घेता येईल असे सांगून  वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही अनधिकृत जोडण्या केल्याचे आढळून आल्यावर संबंधित उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरु असून अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे; प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार – इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि. 14 : इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतीगृहे सुरु करण्यात येणार असून या वसतीगृहांचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्याच्या संदर्भाने  सदस्य समाधान अवताडे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्यातून राज्यातील इतर मागासवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी प्रत्येकी १८ प्रमाणे ३६ वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गतच्या वसतीगृहांसाठी जमीन उपलब्ध झालेल्या नागपूर, अहमदनगर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले, त्यांनी काढलेल्या त्रुटींची देखील पूर्तता करण्यात आली असली तरी केंद्राने अद्याप या प्रस्तावांना मान्यता दिलेली नाही. चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये जागा किंवा इमारतींच्या उपलब्धतेविषयी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. दरम्यान, राज्य शासनाने ७२ वसतीगृहे बांधण्याची घोषणा केली असून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याचेही श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

येत्या उन्हाळ्यात पीएमडीटीए तर्फे 8 चॅम्पियन सिरीज, 4 सुपर सिरीज, आयटीएफ वरिष्ठ व आंतरक्लब टेनिस स्पर्धांचे आयोजन 

0


पुणे, 14 मार्च: कोविडच्या साथीमुळे सुमारे दोन वर्षांसाठी टेनिसचा सराव आणि स्पर्धांना मुकल्यानंतर पीएमडीटीए यांच्या वतीने व एमएसएलटीए यांच्या सहकार्याने सुमारे डझनभर राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून यामुळे पुन्हा एकदा एका व्यस्त वेळापत्रकाचा आनंद घेता येणार आहे.    पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, भारतीय टेनिसचा केंद्रबिंदू असलेल्या पुणे जिल्ह्यात 8 चॅम्पियन सिरीज(7 दिवसीय) टेनिस स्पर्धा, 4 सुपर सिरीज टेनिस स्पर्धा आणि 1 आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय एप्रिलमध्ये पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने लेव्हल 4 आयटीएफ कोचिंग स्कुल आणि एसपी गोसावी मेमोरियल आंतरक्लब टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.  याचबरोबर 10 वर्षाखालील पीएमडीटीए राज्य मानांकन टेनिस स्पर्धा व याच कालावधीत वरिष्ठ टेनिस स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे.   
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, टेनिस विश्वाच्या पुनरागमनामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत असून पुणे आणि महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात पावसाळ्यापूर्वीपर्यंत पार पडणाऱ्या सलग स्पर्धांमुळे आमच्या खेळाडूंना लय गवसण्यासाठी व त्याचबरोबर लागोपाठच्या स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले मानांकन सुधारण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. 
स्पर्धेची यादी खालीलप्रमाणे: सोमवार, 18 एप्रिल, 2022 या आठवड्यात: 12 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा; 16 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा; 
सोमवार, 25 एप्रिल, 2022 या आठवड्यात 
18 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा; 
सोमवार, 2 मे 2022 या आठवड्यात आयटीएफ वरिष्ठ टेनिस स्पर्धा; 12 वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा; 
18 वर्षाखालील  चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा; 
सोमवार, 9 मे, 2022 या आठवड्यात 
14  वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा; 
सोमवार, 23 मे, 2022 या आठवड्यात 
16वर्षाखालील सुपर सिरीज टेनिस स्पर्धा; 
सोमवार, 30 मे, 2022 या आठवड्यात 14वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा; 

सोमवार, 6 जुन, 2022 या आठवड्यात 
12 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा; 
16 वर्षाखालील चॅम्पियन सिरीज( 7दिवसीय) टेनिस स्पर्धा. 

‘वंचित विकास’तर्फे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन सुरु

0

पुणे : वंचित विकास संस्थेतर्फे विपरीत परिस्थितीवर मात करून ‘पुनश्च हरिओम’ करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरु झाले. मंगळवारपर्यंत (दि. १५) सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. नगरसेविका ऍड. गायत्री खडके व माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रसंगी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात छोट्या व्यावसायिकांना वंचित विकास संस्थेकडून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी अर्थसाह्य केले होते, त्यांचे तसेच छोट्या व्यावसायिकांच्या (प्राधान्याने स्त्री व्यावसायिकांची) उत्पादनांचे प्रदर्शन भरविले आहे. एकूण २५ स्टॉल असून यामध्ये खाद्यपदार्थ, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, ज्वेलरी, पर्स, बॅग्ज, हार्बल कॉस्मेटिक्स, सेंद्रिय भाजी, धान्य, गिर गाईचे तूप, मेंदी इ. चा समावेश आहे. तसेच ई-वेस्ट व सामाजिक संस्थेची माहिती देणारे स्टॉल आहेत.

व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत वंचित विकास संस्थेने त्यांना आधार दिला आहे. आता कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर हे व्यावसायिक जिद्दीने उभे राहताहेत, ही आनंदाची बाब आहे. पुणेकर नागरिकांनी अशा छोट्या व्यावसायिकांच्या प्रदर्शनाला प्रतिसाद देऊन, त्यांच्याकडून उत्पादने खरेदी करावीत व त्यांना हातभार लावावा, असे आवाहन ऍड. गायत्री खडके व माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.