मुंबई, दि. ३ :- महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
“महात्मा बसवेश्वर यांनी वर्ण, जात, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा भेदाभेदांना कडाडून विरोध केला. त्यांनी प्रागतिक समाज रचनेचे विचार मांडले. स्त्रियांच्या समानतेचा पुरस्कार केला. अनुभवमंटपद्वारे लोकशाही विचार प्रणाली विकसित केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
प्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जी.बी.एंटरटेंन्मेंट निर्मित हा चित्रपट येत्या शुक्रवारी ६ मे ला चित्रपटगृहांत दाखल होत आहे. लगन चित्रपटातून अज्या आणि नांदिनीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या जोडीसोबत स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रेमाला प्रेमानेच जिंकता येऊ शकतं हा विचार घेऊन हा चित्रपट केल्याचे दिग्दर्शक अर्जुन गुजर सांगतात. ही फ्रेश जोडी आणि चित्रपटाचं संगीत प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास ही ते व्यक्त करतात.
‘लगन’चे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते सय्यद मुस्तफा, भारत गुजर, रत्नमाला पवळ, मोहिनी गुजर, गहिनाथ गुजर आहेत तर चित्रपटाचे सहनिर्माते बिभीषण पवार, बळे साहेब, कैलास गुजर, किशोर काकडे,नितीन भारती, सपकाळ फोजी, शाहजी डोके, सोमिनाथ डोके, मुन्ना शेख, विठ्ठल पाटोळे,बिभीषण गुजर, विष्णू गुजर, नामदेव गुजर, अंगद गुजर, गणेश गुजर आहेत. छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.
मुंबई, दि. ३:-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापुर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल अशी कामगिरी केली आहे. “महाराष्ट्र कन्ये”चा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
परळी – बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे.
बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघात ग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली.
धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली, आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) इथला असल्याचे सांगितले.
त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती ते पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला, धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली; धनंजय मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या.
सदर तरुणास अंबाजोगाई कडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघात ग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली, त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली, तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे, अशी माहिती देऊन त्यांना धीर दिला, तसेच त्यांनाही अंबाजोगाई ला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.
पुणे, दि. ३: राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष करून महिलांनी आवर्जून भेट द्यावी,असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन सर्व चित्रमय फलकांवरील माहिती जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी देशमुख, माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते उपस्थित होते.
डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना काळात शासनाने महत्वाचे निर्णय घेतले. डॉक्टर मंडळींचा टास्क फोर्स तयार करून वैद्यकीय सेव जलदगतीने देण्याचा प्रयत्न केला. कोरोना नियंत्रणासोबतच इतरही विकासकामे केलीत, तसेच नवनवीन योजना सुरू केल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या या प्रदर्शनात सर्व योजनांची माहिती मिळते. सचित्र माहिती असल्याने ती सर्वसामान्यांना अतिशय उपयुक्त अशी आहे. त्यामुळे गावागावातील नागरिक, महिला,युवक यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनाला महिलांनी स्वतः भेट देत माहिती घ्यावी व इतर महिलांनाही समाज माध्यमातून आवाहन करावे, सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती घ्यावी. योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल,असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रमजान ईद आणि अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छाही दिल्या. श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी ३६० अंश सेल्फी घेतली.
तत्पूर्वी डॉ.गोऱ्हे यांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
औरंगाबाद -औरंगाबादेत मुस्लिम समाजाविषयी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एमआयएमचे औरंगाबाद खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. राज्य सरकारने राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला नाही तर राज ठाकरेंनी ज्या मैदानात सभा घेतली त्याच मैदानात एमआयएम त्यापेक्षा मोठी सभा घेईल व राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर देईल, असा इशारादेखील इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
आम्ही वाट पाहत आहोत! औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तासाभरात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र, अद्याप पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. एवढे प्रक्षोभक भाषण केल्यानंतरही सरकार अद्याप गप्प का, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भविष्यात मनसेसोबत जायची वेळ आल्यास अडचण नको, म्हणूनच राष्ट्रवादीकडून कारवाई केली जात नाही का, असादेखील सवाल त्यांनी केला. तसेच, आता लवकरात लवकर गुन्हा दाखल न झाल्यास आम्हीदेखील त्याच मैदानावर, त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ. तेव्हा आमच्यावर कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न गेल्या 70 वर्षांपासून देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. मात्र, काही शक्तींकडून सध्या देशाला कमकुवत केले जात आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेला बंधुभाव व एकतेला तडे देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुस्लिमांना नमाज पठण करण्यापासून रोखले जात आहे. मशिदींना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप जलिल यांनी केला. तसेच, हा द्वेष संपावा व देशात बंधुभाव आणि खुशहालीचे वातावरण रहावे, यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली आहे, असे त्यांनी सांगितले. तसचे, देशाला एकसंध ठेवण्यासाठी मुस्लिम नेहमीच प्रयत्नशील राहतील, असेही जलिल म्हणाले.
राज ठाकरेंची ‘ती’ लायकी राहिली नाही! दरम्यान, औरंगाबादच्या सभेपुर्वी इम्तियाज जलिल यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, राज ठाकरेंनी त्याची दखल घेतली नाही. याविषयी इम्तियाज जलिल यांना विचारले असता ते म्हणाले, आता राज ठाकरेंना इफ्तारसाठी बोलवण्याची त्यांची लायकी राहिली नाही. आपल्या प्रक्षोभक भाषणामुळे त्यांनी आपली लायकी दाखवून दिली आहे.
आईच्या आठवणीने जलील भावूक दरम्यान, आज देशभरात ईद साजरी केली जात आहे. औरंगाबादमध्येदेखील इदगाह मैदानावर उत्साहात ईद साजरी करण्यात आली. मैदानात खासदार इम्तियाज जलील यांनी सर्वसामान्यांसह नमाज अदा केली. यावेळी आईच्या आठवणीने जलील भावूक झाले. दोन महिन्यांपुर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सर्वांसोबत ईद साजरी करत आहे. मात्र, आज आई आपल्यासोबत नाही, हे सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
दोन वर्षांत अनेक लोक गमावले कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांत अनेक लोक गमावले. दोन वर्षांनंतर आज प्रथमच सर्वांसोबत ईद साजरी करत आहे. त्यामुळे यंदाची ईद ही विशेष आहे. मात्र, प्रथमच आईशिवाय ईद साजरी करत आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. यावेळी सर्व देशवासियांना ईदच्या शुभेच्छा देत आपण सर्व जनतेच्या शांती व भल्यासाठी प्रार्थना केली. ईस्लाममध्ये भेदाला थारा नाही. माणुसकी हाच ईस्लामचा धर्म असल्याचे पैगंबरांनी सांगितले आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी असल्याची ओरड म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
रडगाणे बंद करा, आणि पेट्रोलवरील जिझिया रद्द करा!:मुख्यमंत्री ठाकरे यांना भाजपचे आव्हान पुणे- बाबरी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची पळपुटी आणि बेगडी भूमिका उघड झाल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी पक्षाची लाज आणखी चव्हाट्यावर न आणता राज्यासमोरील प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे आणि पेट्रोल डिझेलवरील राज्याचा अबकारी कर कमी करून नागरिकांना दिलासा कधी देणार ते सांगावे, असे आव्हान भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी आज उद्धव ठाकरे यांना दिले. मुख्य प्रश्नांना बगल देत भावनिक मुद्द्यांवर जनतेला झुलवत ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यासमोरील प्रश्नांवर बोलावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे खोटारडे आहेत. आपल्या खोटेपणाला भावनिक मुलामा देऊन जनतेची दिशाभूल करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना वेठीस धरण्यातही ते मागेपुढे पाहात नाहीत. विचारांशी बांधील राहून शिवसेनेला सत्तेपर्यंत नेणाऱ्या बाळासाहेबांना भोळे ठरवून शिवसैनिकांच्या मनातील त्यांची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. ‘शिवसेनेचा भोंगा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय राऊत यांनीही अलीकडेच, बाळासाहेबांची मते आज संदर्भहीन असल्याचे विधान केले होते. भावनिक मुद्द्यांवर मुख्यमंत्री शिवसैनिकांची फसवणूक करू शकतील, पण राज्याच्या जनतेला ते फसवू शकणार नाहीत. त्यामुळेच, भावनिक राजकारणाचे थोतांड थांबवा, आणि पेट्रोल डिझेलवरील जिझिया कर रद्द करून जनतेस दिलासा कधी देणार ते सांगा, अशा शब्दांत श्री. बापट यांनी ठाकरे यांना धारेवर धरले. केंद्र सरकारकडून जीएसटीची २६ हजार कोटींची थकबाकी असल्याची साफ खोटी माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या पाळीव भोंग्यांकरवी राज्यभर पसरविली. मात्र, त्यात कोणतेच तथ्य नसल्याचे स्पष्ट होताच, प्रकरण अंगाशी येण्याच्या भीतीने मूग गिळून गप्प बसत हिंदुत्व आणि बाबरीच्या मुद्द्यावर लक्ष वळविण्याचा खेळ सुरू केला. राज्य सरकारला जीएसटीच्या परताव्यापोटी केंद्राकडून येणे असलेली रक्कम २६ हजार कोटींची नाही, त्यापैकी १३ हजार ६२७ कोटी रुपये अगोदरच राज्याला मिळाले असून उर्वरित रक्कम राज्याला देण्याची मुदत जुलै अखेरपर्यंत आहे. त्यामुळे ती थकबाकी ठरत नाही. उलट राज्य सरकारच केंद्र सरकारला कोळसा व रेल्वे थकबाकीपोटी ११ हजार कोटी रुपये देणे लागते. राज्य सरकारने ही रक्कम थकविल्याचे उघड होताच ठाकरे यांनी मौन पाळले असून अंगलट येणाऱ्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्याकरिता बेगडी हिंदुत्वाची झूल पांघरली, असा आरोप श्री. गिरीश बापट यांनी केला. जीएसटीचा परतावा आजपर्यंत कधीही केंद्र सरकारने थकविलेला नाही. जीएसटी कौन्सिलमध्ये ठरल्यानुसार राज्याला वेळेवर परताव्याची रक्कम मिळत असते. मुळात, पेट्रोल-डिझेलवरील राज्याची भरमसाठ कर आकारणी आणि जीएसटीचा परतावा हे दोन भिन्न मुद्दे आहेत. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कराच्या रूपाने जनतेस लुबाडत असल्याच्या मुख्य मुद्द्याला उत्तर देण्याची वेळ आल्यास बोबजी वळेल हे ठाऊक असल्यामुळेच ठाकरे आता भावनिक मुद्द्यांवर भर देऊन जनतेला मूर्ख बनवू पाहात आहेत. पण महाराष्ट्राची जनता अशा बेगडी मुखातून बाहेर पडणाऱ्या थापांना बळी पडणार नाही, असे ते म्हणाले. ठाकरे यांचे जीएसटीचे रडगाणे हा चोराच्या उलट्या बोंबा असून त्या आता थांबवा व जनतेचे प्रश्न सोडवा, असा इशाराही त्यांनी दिला.
एकीकडं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग विषद करणारं छायाचित्र प्रदर्शन.. तर दुसरीकडं 100 हून अधिक कलाकारांनी रेखाटलेली छायाचित्रं आणि शिल्पं.. तर दुसर्या ठिकाणी खाद्य जत्रा.. शाहू मिलच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या कामगारांनी इथल्या विविध दालनांना भेटी देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.. आपल्या जीवनातील अमूल्य वेळ ज्यांनी शाहू मिलच्या वास्तूत व्यतीत केला, त्यांचा सहवास मिळाल्यामुळं शाहू मिलची वास्तूही गहिवरली असेल.. निमित्त होतं.. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कामगार दिनानिमित्त शाहू मिलच्या कामगारांच्या सत्कार सोहळ्याचं..
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापुरात सुरु असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त ‘कृतज्ञता पर्व’ साजरं होत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या शाहू मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा 1 मे महाराष्ट्र दिनी म्हणजेच कामगार दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, आज आपण जिथं बसलो आहोत, त्या ठिकाणी आपण आपलं आयुष्य घालवलंय. शाहू महाराजांचं स्मरण करुन त्यांनी स्थापन केलेल्या या मिलमध्ये तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीनं शाहू महाराजांचं नाव सार्थ करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही मिल बंद होताना पहावं लागलं.. पण सुदैवानं सुमारे 20 वर्षानंतर तुम्हा सर्वांना ही मिल परत एकदा उघडलेली पहायला मिळाली. त्या काळी फक्त तुमच्यासाठी खुली असणारी ही मिल आता सगळ्यांसाठी खुली होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया.
श्री शाहू छत्रपती मिलची वास्तू अतिशय सुंदर असून इतक्या विस्तीर्ण जागेत अशी देखणी वास्तू पहायला मिळणं कठीण आहे. 100 वर्षांचा काळ लोटला तरीही अजुन ही वास्तू सुस्थितीत आहे. या इमारतीचं वैभव पाहता महाराजांनी आपल्या पुढच्या पिढ्यांवर टाकलेला विश्वास सार्थ करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. विश्वासाला जागण्याची कोल्हापुरची परंपराच आहे आणि आपण कोल्हापुरकरांनींच ती पार पाडायला हवी. आज ही शाहू मिल ज्या स्वरुपात आहे, तिचं गतवैभव परत एकदा तिला मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, लेकरांना हा वारसा अधिक संवर्धित करुन द्यायचा आहे.. तो आपण करु… आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण मिळून करु.. आणि आपल्या शाहू मिलचं नाव आणखी उज्वल होण्यासाठी प्रयत्न करु…आधी ही वास्तू शाहू महाराजांनी स्थापन केलेली कापड (टेक्सटाईल) मिल होती.. आता आपण याठिकाणाला समृध्द स्वरुप तयार करण्यासाठी प्रयत्न करु.. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मदतीने या शाहू मिलला आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न करुया.. ! असं हृदयस्पर्शी आवाहन करुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कामगार दिनाच्या सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या.
दि. ५ मे रोजी उद्योजक डॉ. मिलिंद कांबळे यांना विशेष पुरस्कार
पुणे – छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षाचा प्रारंभ, शुक्रवार दि. ६ मे २०२२ पासून होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात गुरुवार दि. ५ मे रोजी सायं. ५.३० वाजता, पत्रकार भवन हॉल (पहिला मजला) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांना विशेष पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षते खाली हा समारंभ होईल. पगडी, मानपत्र, शाल व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संवाद पुणे आणि समर्थ युवा फौंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व समर्थ युवा फौंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज (जून २६, इ.स. १८७४ – मे ६, इ.स. १९२२) कोल्हापूर संस्थांचे छत्रपती व थोर समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच यंदा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्ष प्रारंभ निमित्त गौरविले जाणार आहे असे सुनील महाजन व राजेश पांडे म्हणाले.
डॉ. मिलिंद कांबळे हे सिव्हील इंजिनियर व उद्योजक असून, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना २००५ मध्ये त्यांनी पुण्यात केली. ते संस्थापक अध्यक्ष आहेत. सन २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन दलित समाजातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांची व समाजाची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेचा कारभार देशातील सर्व २९ राज्ये व ७ परदेशांमध्ये पसरला आहे.
नागपूर दि.2 मे : जुना जरीपटका भीम नगर झोपडपट्टी या भागातील नागरिकांचे अतिक्रमण हटवताना रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाबाबत नवा प्रस्ताव सादर करण्याची सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केली.
या परिसरातील जुन्या अतिक्रमणाला हटवताना रेल्वे बोर्डाला नवा प्रस्ताव पाठविण्यात यावा. उन्हाळ्यात लोकांना बेघर करू नये. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त व संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधावा. त्यानंतर नवा प्रस्ताव दयावा. नव्या प्रस्तावाचा पाठपुरावा नवी दिल्ली मध्ये रेल्वे मंत्रालयात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनोज कुमार, राम जोशी यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते.
भीम नगर झोपडपट्टी व जुना जरीपटका रेल्वे लाईनच्या बाजूला असणारे अतिक्रमण काढतांना पुनर्वसनाबाबतही विचार झाला पाहिजे. तसेच सध्या उन्हाच्या दिवसात त्यांना या जागेवरून हटविण्यात येऊ नये, पुनर्वसनाचे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
महानगरपालिकेत आज झालेल्या या बैठकीचा संदर्भ देऊन रेल्वेने पुन्हा एकदा नवा प्रस्ताव पाठवावा. याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांची आपण बोलणी करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी रेल्वे कंत्राटी कामगारांच्या समस्या संदर्भातील चर्चा केली. तसेच इटारसी रेल्वे पुलासंदर्भातील कामाचा आढावा घेतला. कामावरचे कंत्राटी कामगार काढताना मानवीय दृष्टिकोणातून विचार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाकडून अशा वेळी येणारे पत्र व सूचना याबाबत रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने प्रतिसाद देण्याबाबतही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ईसाई दफनभूमीसाठी लीजवर जमीन देणार
आजच्या बैठकीत भांडेवाडी येथे इसाई दफनभूमी संदर्भात जागा देण्याच्या प्रश्नावर महानगरपालिका व संबंधित विविध सामाजिक संघटनांची बैठक घेण्यात आली. अनेक संघटना यामध्ये सहभागी असून त्यांनी देखील या संदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे जागेवरचे आरक्षण हे दफनभूमीसाठी ठेवण्यात यावे. मात्र ही जमीन महानगरपालिकेच्या मालकीची असेल व महानगरपालिके मार्फत दफनभूमीसाठी लीजवर देण्यात येईल, असे चर्चेअंती स्पष्ट निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
मुस्लिम लायब्ररी भोवतालील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोमीनपुरा परिसरात मुस्लिम लायब्ररी सुरू आहे. या ठिकाणी अनेक मुले अभ्यासासाठी येतात. सर्वसामान्यांसाठी वर्तमानपत्रांचे वाचन करण्यासाठी या जागेचा उपयोग होतो. मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. तसेच या लायब्ररीचा लीज कालावधी संपला आहे. मात्र ही एक ऐतिहासिक लायब्ररी असून या ठिकाणच्या कार्य लक्षात घेता त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासन घेईल. मात्र सोबतच ही जागा देतांना आजुबाजूचे अतिक्रमण हटविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आवश्यकतेनुसार या ठिकाणी बांधण्यात येणार्या संरक्षण भिंतीसाठी व लायब्ररी साठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली.
पुणे : मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख… श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर दिसणारे विलोभनीय रुप… मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरीता देवीभक्तींनी गर्दी केली. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोग-याच्या हजारो फुलांचा सुगंध दरवळत होता. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला. फुलांची आरास आणि आंबा महोत्सव पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. सामाजिक संस्थांना आंबे प्रसाद म्हणून देणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
पुणे-जितेंद्र भुरुक यांनी गायलेली गाणी मी ऐकली आहे आणि त्यांचा आवाज किती अद्भूत आहे हे त्यावेळी लक्षात आले. एक करिश्मा किशोर कुमार होते आणि एक करिश्मा जितेंद्र भुरुक आहेत. त्यांच्या सादरीकरणात जादू असते. त्यांचे नशीब किशोर कुमारांसारखे नसले तरीही आवाज त्यांच्यासारखा आहे. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. प्रगतीच्या दिशेने हा प्रवास असाच पुढे जात राहो, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी व्यक्त केली. गायक जितेंद्र भुरुक यांच्या सत्कारावेळी ते बोलत होते. गायक किशोर कुमार यांची ८९ गाणी सलग ११ तास गाऊन आणि एकाच दिवशी ५ वेगवेगळ्या थिएटरमध्ये १३५ गाणी सादर करून विश्वविक्रम केल्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी (१ मे) झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार इनोक डॅनिअल, अभिनेता स्वप्नील जोशी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी उपमहापौर दीपक मानकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, गिनीज फाउंडेशनचे अध्यक्ष पवन सोळंकी, तबलावादक पद्मश्री सुरेश तळवलकर, अभिनेता प्रवीण तरडे, समाजसेविका शोभा धारीवाल, मनिष साबडे आदी यावेळी उपस्थित होते. भुरुक यांना ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’तर्फे यावेळी मानपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले व सत्कार समितीतर्फे शिंदेशाही पगडी आणि शेला देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जनरल पोस्ट ऑफिसतर्फे जिंतेद्र भुरुक यांच्या नावे पोस्ट तिकीट काढण्यात आले असून त्याचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. गिनीज फाउंडेशनचे सोळंकी या रेकॉर्डबद्दल माहिती देताना म्हणाले, आतापर्यंत आमच्याकडे तीन हजारांहून अधिक रेकॉर्डची नोंद झालेली आहे. मात्र लाइव्ह बँडसह गाण्यांचा रेकॉर्ड करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. या प्रयोगाबद्दल एकून आम्ही आधी चक्रावलो. परंतु, जेव्हा तो यशस्वी झाला तेव्हा आम्हा सगळ्यांना आनंद झाला. पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणाले, कलेतून भावनांपर्यंत पोहोचता येते. कला ही प्रत्येकाच्या मनावर राज्य करते आणि जितेंद्र भुरुक आपल्या कलेतून हेच काम करीत आहे. आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र भुरुक म्हणाले, गाणे हा माझा श्वास आहे. किशोरदांची गाणी न गाता जगणे माझ्यासाठी कठीण आहे. या रेकॉर्डसाठी माझे सहकारी, मित्र, वाद्यवृंद, आर्टिस्ट या सगळ्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांचामुळेच हे शक्य झाले. त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. या सोहळ्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे आणि यापुढे काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मानकर यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सत्कार सोहळ्यानंतर जितेंद्र भुरुक यांच्या ‘गीत गाता हूँ मैं’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
‘कामगार अस्तित्व रॅली’त राज्यभरातून लाखो कामगार सहभागी
पिंपरी, 2 मे – ” महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. कामगारांना न्याय मिळाला नाही. ही देशाची मोठी शोकांतिका आहे. कामगार दारात आला की मंत्र्यांच्या कपाळावर अट्या पडतात. पण, कंपनीचा मालक आला की त्यांच्यापुढे पायघड्या घातल्या जातात. सहा-सहा महिने आंदोलने करुनही कामगारांना न्याय मिळत नाही. मालकांना मात्र न्याय मिळतो. अधिका-यांच्या हातात देश गेला आहे. मंत्री त्यांना पाहिजे ते काम अधिका-यांकडून करुन घेतात. त्यांना समाजाचे काही घेणेदेणे नाही”, असा घणाघात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले कामगारदिनी केला.
धार्मिक आरोप-प्रत्यारोप, राजकीय दंगा थांबवून श्रमिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे कामगारदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भव्य ‘कामगार अस्तित्व रॅली’ काढली. राज्यभरातून हजारो कामगार या रॅलीत सहभागी झाले होते. संत तुकारामगर येथे झालेल्या सभेला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश जेधे, अनिल कोंडे, उद्योजकांचे अध्यक्ष दिपक पाटील, राहुल शितोळे, अनिकेत भोसले, एकनाथ गायकवाड, साहेबराव भोसले, अमोल कार्ले, सिद्धार्थ कारखे, स्वानंद राजपाठक, उत्तमराव वाघमारे, दत्ता गायकवाड, सतिश एरंडे, नंदू खैरे, विलास ठोंबरे, हनुंमत जाधव, संजय साळुंखे, विठ्ठल ओझरकर, आबा खराडे, शंकर गावडे, दिपक पलंगे, संतोष टाकळे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगारांना मार्गदर्शन करताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, ”अनेक कारखान्यांमध्ये कामगारांवर अन्याय झाला. कामगारांच्या मागण्यासाठी आंदोलनासह न्यायालयीन लढाई देखील लढलो. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तरी, त्याच्या अमंलबजावणीस कंपन्यांकडून टाळाटाळ केली जाते. आंदोलन करायचे म्हटले तर उद्योजक कंपनीच्या गेटवर आंदोलन करुन देत नाहीत. न्यायालयात कामगारांच्या बाजूने निकाल लागला. तर, वरच्या न्यायालयात पाठविले जाते. पोलीस सहकार्य करत नाहीत. कामगारांच्या याचिकांवर न्यायालयात 25 -25 वर्षे तारखा पडतात. निकाल लागायला मोठा विलंब होतो. निकाल लागल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अंमलबजवणी करत नाहीत, हे कामागरांचे दुर्देव आहे. रॅलीला कामगारांनी मोठा प्रतिसाद देऊन कामगारअभी जिंदा है, कामगार एक तळपती तलवार असल्याचे सरकारला दाखवून दिले”.
”या देशाला क्रातिकांराचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशभक्त जन्मले. पण, स्वातंत्र्यानंतर देशाच्या 75 वर्षानंतर एकही नेता श्रमिकांसाठी जन्माला आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. राजकारण्यांनी समाजाचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय देण्याऐवजी लोकांना धर्मांत गुंतवूण ठेवले जात आहे. मृत्यू हा अढळ, अटळ आहे. मृत्यूनंतर आपण कोणत्या धर्मात जातोल, याची कल्पना नाही. धर्मा-धर्माच्या नावाखाली द्वेष पसरुन मतांचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी धार्मिक वादात गुंतून राहू नये. मतासाठी पैसे, दारु घेणे बंद करावे. त्याशिवाय नागिरकांना स्वातंत्र्याचा अर्थ कळणार नाही. समाजाने त्यागाची मूर्ती व्हावी. राजकाण्यांपुढे लोटांगण घालू नका, एकत्रित, एकजुट रहावे” अशी अपेक्षाही यशवंत भोसले यांनी केली. तसेच ”कोरोनामुळे आंदोलने थांबली होती. येत्या 15 दिवसात पोलिसांची परवानगी घेऊन कामगारांवर अन्याय करणा-या कंपन्यांच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
”तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीची सुरक्षा करणा-या कामगारांना किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी मिळत नाहीत. याबाबत मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कामगारांना किमान वेतन, साप्ताहिक सु्टटी देण्याचे आदेश दिले. पण, देवस्थानचे अध्यक्ष असलेले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. सनदी अधिका-यांना ठेकेदांरासोबत बैठका घ्यायला वेळ आहे. पण, श्रमिकांबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करायला वेळ नाही. न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखविली जाते. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हाधिका-यां विरोधात औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. आई तुळजाभवानीच्या आर्शिवार्दाने कामगारांना नक्की न्याय मिळेल”, असा विश्वास यशवंत भोसले यांनी व्यक्त केला.
राज्यभरातून 3 हजार कामगार रॅलीत झाले सहभागी
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संत तुकारामनगर येथील कार्यालयापासून सकाळी 10 वाजता भव्य रॅलीला सुरुवात झाली. हजारो कामगार रॅलीत सहभागी झाले होते. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. संत तुकारामगर पोलीस चौकी समोरुन -नेहरुनगर चौक-कामगारनगर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात रॅली आली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तेथून पिंपरी चौक-कामगारनगर-नेहरुनगर-संत तुकाराम महाराज पोलीस चौकीसमोरुन संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान येथे रॅलीची सांगता झाली. सुमारे 300 दुचाकी, टेम्पो, ट्रक, कार, अॅटो या वाहनांच्या माध्यमातून 3 हजार कामगार या रॅलीत सहभागी झाले होते. सुमारे अडीच तास ही रॅली चालली. संत तुकारामनगर येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले.
नाशिक –एकीकडे अत्यंत प्रगत तर दुसरीकडे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शेती आपल्याला दिसते. हे चित्र बदलायचे असेल तर कृषी विद्यापींठांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ते मातीत अवतरायला हवे. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची देशाच्या कृषी क्षेत्राची राजधानी म्हणून नवीन ओळख निर्माण करा, असे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. ते आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित वर्ष सन 2017, 2018 व 2019 च्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि विभागाचे आयुक्त धीरज कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, हा देश अनादी काळापासून शेतीप्रधान आहे. इथल्या शेतकऱ्याची भारताचाच नाही तर देशाबाहेरही अन्नदाता म्हणून ओळख आहे. त्यामुळे हा देश सदैव शेतकऱ्यांच्या ऋणात आहे. महाराष्ट्रात शेतीचे नवनवीन प्रयोग होत आहेत. काही प्रयोगांना जी.आय. टॅगिंगही मिळाले आहे. सेंद्रिय शेती व बाजाराच्या मागणीप्रमाणे पीकपद्धतीचा अवलंब केल्याने चारपटीने उत्पन्नात वाढ झाल्याची, शेतीमाल अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात प्रत्यक्ष निर्यात झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. एवढच नाही तर हे प्रयोग पाहण्यासाठी उत्तराखंड येथील शेतकऱ्यांनाही आपण आमंत्रित केल्याचे यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले. उद्योगांनी इथल्या गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी आपल्यासोबतचे अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना द्यायला हवे. आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेत घरात जसे नव्या जन्माचा आनंद आपण घेतो तसा आनंदोत्सव अनुभवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना केले.
यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हा नव्या शेतीचा खरा मुलमंत्र असून ते आत्मसात करण्याबरोबरच शेजारी गुजरात व देशात काही ठिकाणी सुरू असलेल्या नैसर्गिक (प्राकृतिक) शेतीचे प्रयोगही आपण पहायला हवेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी मधील कमीत कमी जमीनीत करता येण्यासारखा आत्याधुनिक व्हर्टीकल फार्मिंगचा प्रयोगही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.
कोरोनाकाळात संपूर्ण देशाला वाचवण्याचं कार्य आमच्या अन्नदाता शेतकरी बांधवांनी केले आहे. साखर कारखान्यांसाठी इथेनॉल निर्मिती फायदेशीर व अधिक लाभाची असल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार खूप योजना राबवत आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी होते, राहील अशी ग्वाही यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दिली.
शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान ; कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल होऊ शकत नाही, असे असले तरी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार. तसेच संपूर्ण विश्वात जो युगानुयुगे अन्नदाता म्हणून आपले कर्तव्य निभावतोय त्यांचा सन्मान म्हणजे शासनाचा खऱ्या अर्थाने बहुमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपल्या देशाची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे. त्यामुळे देशातील अन्नदाता शेतकरी राजाच हा देशाचे खरे वैभव आहे. या वैभवाचं मोल एखाद्या पुरस्काराच्या रकमेतून होवू शकत नाही याची आपणा सर्वांना जाणीव आहे, या पुरस्कारांची रचना दशकभरापूर्वीची आहे, आता त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी कृषी विभागास करतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोविड कालखंडातून जग अजूनही बाहेर पडलेले नाही. परंतु कितीही संकटे आली आणि गेली, मात्र आमचा शेतकरी राजा मात्र ताठ कण्याने उभा होता, तो थांबला नाही, कोरोनात कोलमडणारा संपूर्ण विश्वाचा डोलारा या अन्नदात्याने आपल्या खांद्यावर घेतला. आपल्या सरकारनेही त्याला भक्कम पाठबळ दिले. शहरी लोकांसाठी शेतकरी जीवनाची कल्पना करणे अवघड आहे, गेल्या दोन वर्षांच्या संकटकाळात संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम काम करत होते. शेतकरी मात्र वर्क फ्रॉम होम काम करत असता तर? या प्रश्नांची कल्पनाच आपल्याला जेव्हा असह्य करून सोडते, तेव्हा अपोआपच अन्नदात्याचे महत्व अधोरेखित होते.
संपूर्ण लॉकडाऊनमध्ये अहोरात्र शेतात संपूर्ण कुटुंबासह जर कुणी अनलॉक राहिला असेल तर तो आमचा अन्नदाता शेतकरी राजा होता. त्यानेच प्रत्येकाच्या घरांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला, फळे पोहचवली आहेत. त्यामुळे जेव्हा संकटं उभी ठाकतात तेव्हा आमचा शेतकरी न डगमगता संकटांशी दोन हात करतो, जिंकतो. मी जेव्हा केव्हा राज्यात दौऱ्यावर जातो तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांना आवर्जून भेटत असतो. त्यात मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी मला दिसतात. आजीपासून नातीपर्यंतची पिढी शेतात काम करतांना दिसते. आपण सर्वजण भविष्याचे नियोजन करत असतो. पण शेतात काम करणाऱ्या आजीला नेहमीच नातीच्या रात्रीच्या जेवणाची भ्रांत असते. अशा परिस्थितीतही पद्मश्री राहीबाई पोपेरे सारख्या काही महिला शेतकरी चाकोरीबद्ध शेतीची जीवनशैली बाजुला सारून बीज बॅंकांची संकल्पना आत्मसात करतात. नवनवे प्रयोग करतात, तेव्हा कौतुकाची संकल्पनाही त्यांच्या या कार्यासमोर तोकडी वाटायला लागते, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. ते म्हणाले, शेतीत नवनवे प्रयोग करत असताना आपण परदेशी वाणावर अवलंबून होतो. थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला मागे वळून पाहताना ‘जुनं तेच सोनं’ म्हणायची वेळ आलीय. असे म्हणतात शेती ही शेतकऱ्यालाच समजते, पण आम्हाला त्यांचे अश्रु नक्कीच समजतात. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्त केले. त्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. आता हळूहळू अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महामार्गांच्या विस्तारीकरणातून शेतीचे अर्थकारण थेट पाणंद रस्त्यांपर्यंत विकसित करण्याचा मानस आहे. ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना आम्ही बाजार संशोधनातून अधिक सक्षम करणार आहोत. शेतकरी सुखात रहायला हवा, त्याचे जगणे सुसह्य करणे हे शासन म्हणून आमचे कर्तव्य तर आहेच, तसेच त्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुणे, दि.२: समाज माध्यमाचा निवडणूक जनजागृती कामकाजात प्रभावीपणे वापर करण्याचा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोजित समाज माध्यम कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मृणालिनी सावंत आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, समाज माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यात यावी. संदेश अधिक प्रभावी ठरण्यासाठी ट्विटर वर कमी शब्दात आकर्षक मजकूर पोस्ट करा. समाज माध्यमे दैनंदिन वापर करुन अद्यावत ठेवा. समाज माध्यमे काळजीपूर्वक हाताळा. जिल्हानिहाय समाज माध्यमांचे गट करुन माहितीचे आदान प्रदान करत रहा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
माध्यम कार्यशाळेत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर पोस्ट करण्याविषयी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.