Home Blog Page 1961

तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन ‘युजीसी’च्या निकषानुसार वाढविण्याचा निर्णय

0

आकृतिबंध पूर्ण झालेल्या विद्यापीठांतील
नॅक मानांकन असणाऱ्याच महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णय

मुंबई, दि. ७ : राज्यातील महाविद्यालयातून तासिका (सीएचबी) तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यापीठांचे आकृतिबंध तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन असणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के पद भरतीला परवानगी दिली जावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणतीही तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रीया व तासिका तत्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या दरमहा मानधनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘व्हीसी’च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुधीर तांबे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार किरण सरनाईक, आजी आमदार अमरसिंह पंडीत, संजय खोडके, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनचे (मुप्टा) सुनिल मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच महाविद्यालयातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील तासिका तत्वावर (सीएचबी) शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषानुसार वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो ‘सीएचबी’ तत्वावर शिकविणाऱ्या प्राध्यापकांना होणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांचे आकृतीबंध तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देताना आकृतिबंध पूर्ण झालेल्या मात्र ‘नॅक’ (राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद) मानांकन मिळविणाऱ्या महाविद्यायालयातचं ५० टक्के पद भरतीला मान्यता देण्यात येणार आहे. राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या दर्जात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता कामा नये अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.


हाफकिनने कोविड चाचणी प्रमाणीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून करुन घ्यावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 7 : हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्था आणि रिसॉल्व्ह डायन्गोस्टिक कंपनीने कोविड चाचणी करता येईल असे ‘सलाईव्हा सॉल्व्ह किट’ तयार केले आहे. या किटच्या माध्यमातून कोविड चाचणी करता येणार असून हाफकिनने कोविड चाचणी प्रमाणीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून करुन घ्यावे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

हाफकिन प्रशिक्षण, संशोधन संस्थेने तयार केलेल्या कोविड किटबाबतचे सादरीकरण आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालक सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह हाफकिन संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, कोविड चाचणी किट कसे असावे याबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काही नियम ठरविले आहेत. यानुसार हे किट काम करते का हे तपासून घेणे आवश्यक आहे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे किट वापरताना काही अडचणी येतात का याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

राज्यात कोविड टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून या फोर्सकडेही हे किट किती उपयुक्त आहे याबाबतचा अहवाल घेण्यात यावा. येणाऱ्या काळात हे किट मुंबईतल्या सेंट जॉर्ज, कस्तुरबा हॉस्पीटल येथे पाठविण्यात यावे. तसेच हे किट कसे आहे, हॉस्पीटलमध्ये उपलब्ध केल्यावर डॉक्टरांना या किटद्वारे रुग्णांची कोविड तपासणी करता येऊ शकेल का हे सर्व तपासून घेण्यात यावे असे निर्देशही श्री.देशमुख यांनी दिले.

अधिक दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा ईशारा

पुणे, दि. 7: रासायनिक खतांच्या अंतिम खत विक्री दरामध्ये 1 एप्रिल 2022 पासून सुधारणा करण्यात आलेली असून निश्चित दरापेक्षा अधिक दराने विक्री करत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी कळवले आहे.

युरिया खताची किंमत प्रतिबॅग 266.50 रुपये निश्चित असून डिएपी खताची प्रतिबॅग किंमत इफको, जीएसएफसी, आरसीएफ, कृभको, आयपीएल, झुआरी पीपीएल/एमसीएफएल, कारोमंडल, स्पीक, चंबळ या नाममुद्रेची 1 हजार 350 रुपये तर एनएफएल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग 1 हजार 200 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

एमओपी खताची किंमत जीएसफसी, आरसीएफ, आयपीएल, चंबळ या कंपनीच्या प्रतिबॅगची विक्री किंमत 1 हजार 700, एनएफएल 1 हजार 100 तर कोरोमंडलची 1 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.  दीपक फर्टिलायझर्सच्या 24:24:00 खताची किंमत 1 हजार 900 रुपये, कोरोमंडलच्या 24:24:0:85 खताची किंमत 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

20:20:0:13 या खताची इफको कंपनीच्या खताची प्रतिबॅग किंमत 1 हजार 400, दीपक फर्टिलायझर्स, कोरोमंडल- 1 हजार 450 रुपये, जीएसएफसी- 1 हजार 325 रुपये, आरसीएफ 1 हजार 150 रुपये, कृभको- 1 हजार 300 रुपये, आयपीएल- 1 हजार 320, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, चंबळ, एनएफएल- 1 हजार 470 रुपये, स्पीक-1 हजार 475 रुपये यापेक्षा अधिक दराने एका बॅगेची विक्री करता येणार नाही.

झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या 19:19:19 या खताची प्रतिबॅग किंमत 1 हजार 575 रुपये, 10:26:26 या खताची इफको, दिपक फर्टिलायझर्स, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल कंपनीच्या खतांची किंमत प्रतिबॅग 1 हजार 470 रुपये तर जीएसएफसी- 1 हजार 440 रुपये प्रतिबॅग, 12:32:16 या रासायनिक खताची जीएसएफसी कंपनीच्या खताची 1 हजार 450 रुपये तर इफको, दीपक, कृभको, झुआरी पीपीएल/ एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल- 1 हजार 470 रुपये, 14:35:14 या कोरोमंडल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

14:28:00 या दीपक फर्टिलायझर्सच्या खताची किंमत 1495 रुपये, 15:15:15 या आरसीएफच्या खताची किंमत 1 हजार 500 रुपये, 16:20:00:13 या खताची जीएसएफसी कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 125, आयपीएल-1 हजार 250 रुपये, आणि कोरोमंडल 1 हजार 400 रुपये,  आयपीएल कंपनीच्या 16:16:16 खताची किंमत 1 हजार 475 रुपये, 28:28:00 या खताची झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 700, कोरोमंडल कंपनीच्या बॅगची किंमत 1 हजार 900 रुपये अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

जीएसएफसी कंपनीच्या अमोनिअम सल्फेट खताची किंमत 1 हजार 100 रुपये, 15:15:15:09 या खताची आयपीएल कंपनीची बॅग- 1 हजार 450, कोरोमंडल- 1 हजार 375 रुपये, कोरोमंडलच्या 17:17:17 खताची किंमत 1 हजार 210 रुपये, दीपक फर्टिलायझर्सच्या 08:21:21 या 40 कि. ग्रॅ. च्या बॅगची किंमत 1 हजार 850 रुपये तर 09:24:24 या खताच्या 40 कि. ग्रॅ.च्या बॅगची किंमत 1 हजार 900 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

कोणी विक्रेता जादा दराने खत विक्री करताना आढळल्यास जिल्हा स्तरावरील सनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 020-25537718,25538310  भ्रमणध्वनी क्र. 9158479306, 9423874067, इमेल आयडी dsaopune@gmail.comadozppune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बोटे (भ्र. क्र. 9422384384) यांनी केले आहे.

महिनाभरात लसीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश 

पुणे, दि.7: कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड तपासणी, लसीकरण, सर्वेक्षण यावर विशेष भर देणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा डोस घेणे बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे येत्या महिनाभरात लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

पुणे ग्रामीण कोविड व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिरुरचे प्रांताधिकारी संतोष देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांच्या संख्येत ५ जूनअखेर संपलेल्या आठवड्यात आधीच्या आठवड्याच्या तुलनेत  ५० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना तपासणी, लसीकरणाचे तालुक्यांनी केलेल्या नियोजनुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी. कोविड प्रतिबंधासाठी ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

 कोविड लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. लसीची दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या साडेसहा लाख लाभार्थ्यांचे येत्या महिनाभरात संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. १२ ते १४ वयोगट तसेच १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

आगामी वारीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वारीमार्गावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोविड रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणीवर अधिक भर देणे आवश्यक असून त्यासाठी नमुन्यांची संख्या वाढवणे; चाचणी सकारात्मक आलेल्या रुग्णांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग करुन तपासण्या करणे; इन्फ्लुएंझा सदृश्य आजार (आयएलआय) तसेच अतीतीव्र श्वसनमार्ग आजार संसर्ग (सारी) याबाबतचे सर्वेक्षणाची व्यवस्था बळकट करणे याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे.

प्रत्येक तालुक्यात किमान एक कोविड काळजी केंद्र (सीसीसी) उभे करण्याचे नियोजन करण्यात यावे. ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन चांगले  असून भविष्यातही तो पुरेसा राहील याकडे लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील लसीकरण, कोरोना तपासण्या, ऑक्सिजन पुरवठा आदींबाबत आढावा घेण्यात आला.

डॉ. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लसीकरण, तपासण्या वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. सर्व तालुक्यात किमान एक कोविड केअर सेंटरचे नियोजन करावे असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

शांताबाई – एक शब्द लेणे’ तून रसिकांनी अनुभविल्या समग्र शांताबाई

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावीतने कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पुणेः मागे उभा मंगेश… हे शाम सुंदरा… तोच चंद्रमा नभात… अशा प्रेम गीतांपासून ते विरहगीतांपर्यंत आणि लावणीपासून ते परमेश्वराच्या आराधनेत निखळ आनंद देणाऱ्या व रसिकांच्या मनात रुणझुणत ठेवणाऱ्या चौफेर गीतांचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. यावेळी सुरेश राऊत यांनी शांताबाईंच्या गीतांप्रमाणेच त्यांचे सुंदर शिल्प साकारले.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘शांताबाई – एक शब्द लेणे’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. यावेळी जयंत भीमसेन जोशी, उर्मिला कराड, मीरा शिंदे, राजन लाखे, डॉ.न.म.जोशी आनंद सराफ, अनुराधा मराठे, गीतांजली हट्टंगणी, नितीन दलाल, दिपक कुलकर्णी, गोपाळ शिंर्गे, उल्हास कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले. यावेळी सुरेश राऊत यांनी शांताबाई शेळके आणि लता मंगेशकर यांचे लाईव्ह शिल्प साकारले.  
कार्यक्रमाची सुरूवात मागे उभा मंगेश या अभंगाने झाली. त्यानंतर तोच चंद्रमा नभात… मीही अशी भोळी कशी ग…या प्रेम गीतांनी रसिकांना पुन्हा भुरळ पाडली. तर घण रानी… माझ्या सारंग राजा सारंग, माजे रानी माजे मोगा अशा विविध गीतांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी स्वाती पेंडसे, रेवती सुपेकर व अभिजित वाडेकर यांनी गायन केले. पराग पांडव (तबला), अदिती गराडे (हार्मोनियम), सुहास गाडगीळ (बासरी व व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. प्राजक्ता वैद्य यांनी निवेदन केले. 
उर्मिला कराड म्हणाल्या, इतक्या प्रतिभावंत व्यक्तीचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य समजते. त्यांच्या सहवासातील साधेपणा खूप काही शिकवणारा होता. शांताबाईंच्या सहज सुंदर व्यक्तीमत्वाप्रमाणे त्यांच्या निर्मळ गीतांनी प्रत्येकाच्या मनातील गाभारा आजही तेवत ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले.    

कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 7 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी सतर्क राहणे आवश्यक असून यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, सध्या कोविडचे रुग्ण दररोज वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना सतर्क राहण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी द्याव्यात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी बृहत आराखडा तयार केला जातो. या बृहत आराखड्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात काय सुधारणा करणे आवश्यक करणे याचा अभ्यास केला जातो. विद्यापीठामार्फत सर्वसमावेशक असा जेथे शासकीय, खाजगी आणि अभिमत विद्यापीठ एकत्रितपणे राबवू शकतील असा आराखडा असणे आवश्यक आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणारी वर्ग-1 आणि वर्ग-2 साठीची पदभरती करण्यात येत आहे. ही पदभरती पूर्ण झाल्यावर नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी रुजू करण्यात यावेत. तसेच वर्ग-3 भरती ही वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत आणि वर्ग-4 शी पदभरती बाह्यस्त्रोताद्वारे जेथे आवश्यक आहे करण्यात येत आहे या कामांना सुद्धा गती देणे आवश्यक असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राची हरियाणात सुवर्ण-रौप्य लूट; पाचव्या दिवशी तेरा पदके

0

मुंबई, दि. 7 : हरियाणातील पंचकुला येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. पाचव्या दिवशी पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके खेळाडूंनी पटकावली. त्यात बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, कब्बडी, सायकलिंग आदी क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला हरवले. कब्बडीत मुलांच्या संघाला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यांचा हरियाणाकडून १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळाले.

ट्रॅक सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मंगेश ताकमोगेने व मुलींमध्ये पूजा दानोळेने याच प्रकारात रौप्य पदके पटकावली.

अॅथलेटिक्समध्ये उंच उडीत – अनिकेत माने (२.०७ मी., हरोली, कोल्हापूर) याने सुवर्ण पदक पटकावले. तर आर्यन पाटीलने (उत्तेखोल, रायगड) याच प्रकारात (२.०४मी.) रौप्य जिंकले. सातारच्या सुदेष्णा शिवणकरने १०० मीटर धावण्यात सुवर्ण कमाई केली. मुलींमध्ये याच प्रकारात वडगाव शेरीच्या (पुणे) अवंतिका नरळेने रौप्य पदकावर नाव कोरले.

कुस्तीत ५१ किलो फ्री स्टाईल – नरसिंग पाटील (सुवर्ण, कोल्हापूर), रोहित पाटील (रौप्य, कोल्हापूर). या दोघांचीच शेवटची कुस्ती झाली.

मुलींमध्ये ४९ किलो गटात अहिल्या शिंदेने कांस्य पदक जिंकले. ६५ किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्याच शुभम पाटीलने सुवर्ण पदक उंचावले. ७१ किलो गटात संकेत पाटीलने (कोल्हापूर) कांस्यची कमाई केली. एकंदरीत महाराष्ट्राच्या पैलवानांनी हरियानातील खेलो इंडियाचा आखाडा गाजवला.

देशाच्या विकासात युवकांचे महत्त्वाचे योगदान- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

‘विकास तीर्थ बाईक रॅली’ चा शुभारंभ
मुंबई, दि. ७ जून- देशाच्या विकासामध्ये व मोदीजी यांच्या सरकारमध्ये युवक व विद्यार्थ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे युवा मोर्चाने विकास तीर्थ बाईक रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या यशस्वी ८ वर्षपूर्ती कामगिरी जनेतपुढे जावी या उद्देश्याने आयोजित केलेला हा अभिनव उपक्रम प्रशंसनीय आहे. युवा वर्गाच्या प्रति मोदीजी यांचे सरकार कसे समर्पित आहे, युवा वर्गाच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कसे वचनबध्द आहे हे या निमित्ताने अधोरेखित होणार आहे असे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या यशस्वी ८ वर्ष पूर्ती निमित्ताने महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘विकास तीर्थ बाईक रॅली’ चा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विकास तीर्थ बाईक रॅलीचां शुभारंभ भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय,नरिमन पॉइंट, येथे करण्यात आला.
युवकांचा विकासासाठी मोदीजी यांच्या सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात प्राधान्य दिले आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून विक्रांत पाटील यांनी नेहमीच विविध अभिनव उपक्रम राबविले. भाजपाच्या सेवा पर्वाच्या माध्यमात युवा वर्गाचाही महत्त्त्वाचा सहभाग आहे. गेली आठ वर्षं संकल्पांची आणि पूर्ततांची होती. या कार्यकाळात सेवा, चांगलं प्रशासन आणि गरीब कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. या महत्वाच्या योजनाच्या यशस्वीतेबाबत युवा मोर्चाने आखलेला उपक्रम स्तुत्य असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

स्वतः बदललात तरच वातावरण बदलेल- पद्मश्री राहीबाई पोपेरे

एमआयटी डब्ल्यूपीयूत अर्थ शास्त्र -२०२२ 

पुणे,  ७ जून : “काळी माती आपली आई आहे. तिचा र्‍हास होत आहे. ती टिकविण्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करून जुन्या पध्दतीचे बीज वापरून विषमुक्त अन्नधान्य पिकविले तर सुदृढ पिढी घडू शकेल. प्रत्येकाने देशी गाय आपल्या घरात आणावी. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड थांबवून निसर्गाने दिलेलं देणं जतन करावे.” असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीच्या स्कूल ऑफ सस्टनेबलिटीस्टडिज व निनॉक्स नेचर क्लब यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अर्थ-शास्त्र २०२२ ( Earth Shastra 2022 ) या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे  संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.  टेर पॉलिसी सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, अ‍ॅग्रो टुरिझमचे प्रणेते पांडुरंग तावरे आणि बांबू उत्पादक व संशोधक संजिव करपे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, फॅकल्टी ऑफ सस्टनेबलिटी स्टडिजच्या संचालिका डॉ. अनामिका बिस्वास व सहयोगी प्राध्यापक डॉ.पंकज कोपर्डे व डॉ. प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते.
श्रीमती राहीबाई पोपेरे म्हणाल्या, “मी कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. मी एक ऊसतोड कामगारच होते.परंतू माझे वडिल आणि निसर्ग यांनीच मला शिकविले. आज शेतीमध्ये सेंद्रिय खते  आणि हायब्रिड अशा अन्नधान्य व भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे मानवी जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहे. आणि नवीन पिढीसुध्दा याला अपवाद नाही. त्याकरिता पारंपारिक वाण वापरून उत्पादन केल्यास जमीनीचा र्‍हासपण कमी होईल आणि दर्जेदार उत्पादन होऊन सुदृढ अशी नवीन पिढी घडेल . ”  
श्री.राजेंद्र शेंडे म्हणाले, “पूर्वीच्या काळी शेती पारंपारिक पध्दतीने करून चांगल्या प्रतिचे उत्पादन केले जात होते. सेंद्रीय खताचा वापर करून जमीनीचा कस वाढविला जात होता. एकमेकांना उपयोगी पडेल अशा पध्दतीने काम करत तोच शाश्‍वत विकासाचा पाया होता. भविष्यात शाश्‍वत विकासाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने शिका, त्यावर काम करा आणि उच्चदर्जाची निर्मिती केली तरच भारत आत्मनिर्भर बनेल.”  
श्री.संजिव करपे म्हणाले, ‘ आज बांबू शेतीला चांगले दिवस आले आहेत. यातून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढले आहेच व इतर लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालेला आहे. आता या बांबूचा उपयोग फर्निचर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सायकली, कपडे, बोर्ड, चप्पल, सीट कव्हर, बांबूची घरे बनविले जात आहेत.”  
श्री.पांडुरंग तावरे म्हणाले, “शेतीला पर्यटनाची जोड दिल्यामुळे शेतकर्‍यांचा शाश्‍वत विकास होईल. खेडेगावाची संस्कृती परंपरा ही या पर्यटनाच्या माध्यमातून माहित होऊन तेथील शेतीमध्ये उत्पादित झालेल्या मालाची विक्री यातून त्यांना रोजगार मिळू शकेल. आणि गावाचा विकास होईल. गाव आत्मनिर्भर बनेल.”  
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “शेती, कृषी पर्यटन आणि बांबूची शेती यावर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतकरी समृध्द झाला, की समाज समृद्ध होईल. त्यातून देशाचा विकास होईल. प्रत्येकाने निसर्ग तत्त्वाचे पालन केल्याने विकासाबरोबरच समाजात सुख, समाधान आणि शांती नांदेल.”  
यावेळी मनोज अनपट, अनपटवाडी, शांताबाई वरवे, तिकोना पेठ, किशोर फडतरे, निंबोडी व वैशालीताई, वडगाव, जुन्नर या सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
   डॉ. पंकज कोपर्डे यांनी प्रास्ताविक केले. निधी धामणे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. अनामिका बिस्वास यांनी आभार मानले.

हमीपत्रानंतर सारसबाग चौपाटी सुरू..अश्विनी कदमांची यशस्वी मध्यस्थी ..

पुणे-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत ते सील केले होते. रस्त्यावर टाकण्यात आलेले टेबल, खुर्च्यांसह अन्य साहित्य महापालिका प्रशासनाने कारवाई वेळी जप्त केले होते. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले होते. पथारी संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनी व्यावसायिकांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सारसबाग परिसरात वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतला होता. व्यावसायिकांनी अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र दिल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली जाईल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली होती.रस्त्यावर टेबल, खुर्च्या ठेवण्यात येणार नाही. शेड टाकण्यात येणार नाही, असे हमीपत्र घेऊन व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हमीपत्र मिळाल्यानंतर प्रशासनाकडून रस्ता रुंद करण्यात आला असून सध्या केवळ रस्त्याची दहा फूट जागा वापरण्यास व्यावसायिकांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे वॉकिंग प्लाझा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले आहे.

 सारसबाग येथील नियोजित ‘वॉकिंग प्लाझा’ तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॅालसमोर व्यावसायिकांनी फरशी टाकून केलेला रस्ता रूंद करण्यात आला आहे. रस्त्यालगतची केवळ दहा फूट जागा व्यावसायिकांना वापरण्यास परवानगी मिळणार आहे. शेड न उभारण्याचे तसेच खुर्च्या हटवून रस्ता मोकळा करण्याचे हमीपत्र व्यावसायिकांकडून घेत व्यवसायायाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सारसबाग चौपाटी परिसरात वॉकिंग प्लाझा सुरू होण्याची शक्यता आहे.

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात अरुण गवळी गॅंगचे कनेक्शन ..? संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक?

0

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात 8 शार्प शूटर्सनी मिळुन मुसेवालाची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे. यापैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली असून तो पुण्याचा रहिवासी आहे. 29 मे रोजी मुसेवालाच्या शूटिंगमध्येही त्याचा सहभाग होता.

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर येत होते. लॉरेन्स गँगचा कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यात आता गवळी टोळीचे नाव समोर आल्याने लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

संतोष जाधव याला खास मुंबईहून पंजाबला बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा सौरभ महाकाळही आला होता. गवळी सध्या महाराष्ट्रातील तुरुंगात आहे. या नव्या खुलाशानंतर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी माहितीचे आदान-प्रदान केले असून या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पंजाब पोलिसांनी सहकार्यही मागितले आहे.

मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 राज्यांतील 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यामध्ये पंजाबमधील तरनतारन येथील जगरूपसिंग रूपा व मनप्रीत मन्नू, हरियाणातील सोनीपत येथील प्रियवर्त फौजी व मनप्रीत भोलू, महाराष्ट्रातील पुणे येथील संतोष जाधव व सौरव महाकाल, सीकर, राजस्थान, भटिंडा, पंजाब येथील सुभाष बानुदा, हरकमल सिंग राणू यांचा समावेश आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची रविवारी, 29 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या. त्यापैकी 7 गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या होत्या. गोळी झाडल्यानंतर 15 मिनिटांत मुसेवालाचा मृत्यू झाला. बोलेरो आणि कोरोला वाहनांनी पाठलाग केल्याने थार जीपमधून जात असलेल्या मुसेवाला याचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यावेळी मुसेवाला यांच्यासोबत एकही बंदूकधारी नव्हता.

आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन

पुणे, दि:६- उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयामार्फत वजने व मापे यांचे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केलेल्या आणि आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनाविरुद्ध ग्राहकांनी संपर्क करुन तक्रार नोंदविण्याचे आवाहन सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र विभागाने केले आहे.

मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलिंडर वितरीत करणाऱ्या कामगाराकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येते. सन २०२०-२१ मध्ये एकूण २७३ आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून त्यामध्ये रुपये २३ लाख ९२ हजार ५०० दंड वसूल करण्यात आला आहे.

ग्राहकांनी असे नियमांचे उल्लंघन होताना आढळल्यास कार्यालयाच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२/०२०-२६१३७११४, व्हॉटस ॲप क्रमांक ९८६९६९१६६६, ईमेल आयडी dclmms_complaints@yahoo.in , aclmpune@yahoo.in येथे संपर्क करुन तक्रार करावी, असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सर्व कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

पुणे दि.७- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ साठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून त्यासंबंधितची कामे अंतिम टप्प्यात आहे. पालखी तळ व इतर अनुषंगिक सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मौजे उरळी देवाची येथील साईड पट्टयांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेल्या चरांची दुरुस्ती, लोणी काळभोर येथील मोऱ्यांची दुरुस्ती, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सर्विस रोडची दुरुस्ती, दौंड ते निरा रस्त्याच्या साईड पट्टयांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापुर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता, करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामे वेगाने करण्यात येत आहेत.

जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि दोन्ही महानगरपालिकेतर्फे महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधांसह स्त्रीरोग तज्ञांची सुविधा देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. सर्व उपविभागीय अधिकारी यांची समन्वय अधिकारी आणि तहसिलदार यांची उपसमन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अनुषंगिक कामांचा त्यांच्याकडून दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गावनिहाय संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पाणी पुरवठ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.

परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी् मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे.

पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्केण खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षीत ठेवण्यात येणार आहेत. पालखी व्यवस्थापनाबाबत माहितीसाठी पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे.

खेलो इंडिया स्पर्धा: कब्बडीत मुलींचे रूपेरी यश मुलांच्या संघाला कांस्य पदक

0

पंचकुला, ७
कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रूपेरी यश मिळवले. हरियानासोबत सुवर्णपदकासाठी झालेली लढत त्यांना जिंकता आली नसली तरी दुसरे स्थान पटकावले. हरियानाकडून (४८-२९) १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्य पदक मिळाले.
येथील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला कबड्डीत मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरियानाच्या पूजाच्या चढायांपुढे महाराष्ट्राचा निष्प्रभ ठरला. एक-दोन पकडी वगळता महाराष्ट्र संघाला फार प्रभाव दाखवता आला नाही.
सामन्यात पहिल्या चढाईत पहिला बोनस पॉईंट हरियानाने घेतला. महाराष्ट्रानेही पहिल्या चढाईत गुण मिळवला. पुन्हा हरियानाचीही चढाई यशस्वी ठरली. टाईम आउटला स्कोर चारच्या बरोबरीत होता. हरियानाच्या पूजाने चढाईत दोन गुण मिळवले. दुसऱ्या टाईम आऊटला महाराष्ट्र ६ तर हरियाना ७ गुणांवर होता. इथपर्यंत लढाई दोलायमान होती. परंतु पूजाची दुसरी चढाईही महाराष्ट्रावर भारी पडली. त्यात दोन पॉईंट गेले. यशिकाच्या यशस्वी चढाईने स्कोर ९-९ झाला.
पूजाने पु्न्हा तीन गुण घेतले. पहिल्याच हापमध्ये महाराष्ट्र ऑलआउट झाला. परिणामी हरियानाला (१८-१२) सहा गुणांची आघाडी मिळाली. पूजाच्या चढाईने पहिल्या हापला हरियाना (२५)-महाराष्ट्र (१५) १० गुणांनी पिछाडीवर पडला.
महाराष्ट्राची हरजीत व यशिका, मनिषा बोनस गुण घेत राहिले. परंतु महाराष्ट्राला पकडी करता आल्या नाही.
दुसऱ्या हापमध्ये टाईम आऊटला हरियानाने (३३ गुण) आघाडी घेतली. महाराष्ट्राचे १९ गुण होते.

सामन्यात सात मिनिटे उरली असताना महाराष्ट्राला पु्न्हा एका ऑलआउटला सामोरे जावे लागले. परिणामी हरियानाला २१ गुणांची भरभक्कम आघाडी मिळाली. त्यांच्या पूजाची एकही चढाई गुणांविना गेली नाही. शेवटी १९ गुणांनी महाराष्ट्राचा पराभव झाला.

कब्बडीतील विजेते (मुले)
सुवर्ण – हिमाचल प्रदेश
रौप्य – हरियाना
कांस्य – महाराष्ट्र व उत्तर प्रदेश

मुली
सुवर्ण – हरियाना
रौप्य – महाराष्ट्र
कांस्य – आंध्र प्रदेश व तामीळनाडू

‘खाद्य सुरक्षा मानांकनात महाराष्ट्र तिसरा’ जागतिक अन्न सुरक्षा दिवशी पुरस्काराने सन्मानित

0

मुंबई, दि. 7 : खाद्य सुरक्षेच्या बाबतीत राज्याचे उत्तम कामगिरी केली असून आज जागतिक अन्न सुरक्षा दिनी तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्याबद्दल राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे  झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विभागाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले आहे.

राज्याने ‘इट राईट‘ या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील अकरा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यात बृहन्मुंबई, पुणे, मिरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.

खाद्य सुरक्षेसंदर्भात अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध उपाय योजना केल्या जातात. यात खाद्य परवाने, टेस्टींग सुविधा, प्रशिक्षण आणि ग्राहकाच्या हितासाठी केलेल्या कामांच्या आधारावर हे मानांकन (FSSAI) अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणातर्फे दिले जाते. राज्याने गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध आखणी करत उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी पंधराव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याने यावर्षी सरळ तिसरे स्थान पटकावले आहे.

मोठ्या वीस राज्यांच्या स्पर्धेत तमिळनाडूने पहिला, गुजरात दुसरा तर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळविला आहे. हे मानांकन  देत असतांना राज्याने केलेली पदभरती, परवाने वितरण, अनुपालन, हेल्प डेस्क, आणि खाद्य विक्रेत्यांच्या तपासणीची संख्या याचाही विचार केला गेला. हे मानांकन देण्यासाठी समिती नेमण्यात आली होती ज्यात खाद्य तपासणी तज्ज्ञ, पोषण आहार तज्ज्ञ यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.

नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल उपस्थित होते. मोठी वीस राज्य, छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आयुष आहार या उपक्रमाच्या ‘लोगो‘ चे अनावरण आणि माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.