Home Blog Page 1950

विधान परिषदेसाठी भाजपचा सहावा उमेदवार अपक्ष सदाभाऊ खोत

मुंबई -विधान परिषदेच्या रिंगणात भाजपने खरे तर पक्षाने पाच उमेदवार घोषित केलेत. त्यातल्या चार अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले असून, पाचव्या जागेसाठी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज आज भरला गेला. तर सहाव्या जागेसाठी भाजपने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिलाय. सदाभाऊ यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे.

पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधले एक लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचारी संपामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. शेतकरी तसेच अनेक मुद्यावर ते आवाज उठवत असतात. त्यांना आमदार मतदान करतील. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील आमदार देखील सदाभाऊंना मत देतील, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे.

विजयासाठी हवी 27 मते

  • विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात.
  • भाजपचे 106, आघाडीचे 152, अपक्ष 13 आणि छोटे पक्ष 16 असे 287 आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत.
  • मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने 5 वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.

भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर

नवाब मलिक, अनिल देशमुखांचा मतदानाचा अर्ज कोर्टाने फेटाळला,मविआला झटका

मुंबई-राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी-आजी मंत्र्यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एका दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केला होता. या निकालाविरोधात हे दोन्ही नेते आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.आज मलिक आणि देशमुख यांच्याबाबत पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मविआला झटका बसला आहे. निवडणुकीत ही दोन्ही मते मिळवण्यासाठी मविआकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात मविआचे दोन्ही नेते उच्च न्यायालयात जाणार असले तरी उद्याच मतदान असल्याने मविआसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मतदानासाठी एका दिवसाचा जामीन देण्यास ईडीचा विरोध
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मतदानासाठी एका दिवसाचा जामीन देण्यास ईडीने ​​​​​विरोध केला. ईडीने 1951 कलम 62(5) या कायद्याचा हवाला दिला. कायद्यानुसार, एखादा व्यक्ती तुरुंगामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. या कायद्यान्वये कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका ईडीने विशेष न्यायालयापुढे मांडली.

अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून, ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याचे ईडीने सांगितले. नवाब मलिकदेखील अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपांमुळे कोठडीत असल्याने या दोन्ही नेत्यांना मतदानासाठी बाहेर जाता येणार नाही, अशी भूमिका ईडीने मांडली. न्यायालयाने ती मान्य करत दोन्ही नेत्यांचे अर्ज आज फेटाळून लावले.

भाजपने कंबर कसली
राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास 4 हजार 200 मते आवश्यक आहेत. पण, सध्या 500 मतांचे मूल्य असलेल्या 5 लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने भाजप आणि मविआ या दोन्ही बाजूकडे चिंता आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना 10 जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी एअर लिफ्ट करून मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे.


राष्ट्रपतीपदाची निवडणुक:18 जुलै रोजी मतदान

0

नवीदिल्ली – निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यानुसार, उमेदवारांना 29 जूनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर 18 जुलै रोजी निवडणूक होईल. गरज भासल्यास 21 जुलै रोजी निकालाची घोषणा केली जाईल. आयोगाने या निवडणुकीतील सर्वच प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. ते 2017 मध्ये या पदावर विराजमान झाले होते. कोविंद देशाचे 15 वे राष्ट्रपती आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएची स्थिती गतवेळसारखीच मजबूत आहे. पण, यावेळी त्यांनी आंध्र प्रदेश व ओडिशाकडून समर्थन मागितले आहे. यूपीएची नजर राज्यसभेच्या 16 जागांवर आहे. या जागांवर येत्या 10 तारखेला निवडणूक होणार आहे.

राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम काय?

नोटिफिकेशन जारी – १५ जून २०२२
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून २०२२
अर्ज छाननी – ३० जून २०२२
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै २०२२
मतदानाचा दिवस – १८ जुलै २०२२
मतमोजणी – २१ जुलै २०२२

यामुळे मजबूत आहे एनडीए

एनडीएला बहुमताचा जादुई आकडा गाठणे फार अवघड नाही. त्यांना बीजेडीचे नवीन पटनायक व वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींच्या पाठिंब्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांशी चर्चाही केली आहे. पण, दोघांनीही उमेदवाराचे नाव पाहून निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या मागील निवडणुकीत एनडीची कामगिरी खूप चांगली झाली. रामनाथ कोविंद यांना 65.35 टक्के मतदान मिळाले होते. एनडीए यावेळीही त्याची पुनरावृत्ती करण्याच्या विचारात आहे.

राज्यसभा निवडणुकीमुळे पेच फसला

राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेत राज्यसभेचे सदस्य सहभागी होतात. त्यामुळे 10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांपैकी 16 जागांवर होणाऱ्या निवडणुकीवर सर्वांची नजर आहे. 57 पैकी 41 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित 16 जागांवर महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक व हरियाणात निवडणूक होणार आहे. या जागा कुणाच्या ताब्यात जातील हे सांगणे सध्या अवघड आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धा :अ‍ॅथलेटिक्समध्ये मुलींना विजेतेपद,रिलेसह तीन सुवर्ण, एक कांस्यपदक

0

पंचकुला, ९ (Day 7)
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये मुलींनी सुवर्णपदक पटकावले. २०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आज पुन्हा सुवर्णपदक उंचावले. दुसरी स्पर्धेक अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले. मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हरियानाच्या संघाने विजेतेपदकाचा चषक मिळवला. मध्य प्रदेश आणि तामीळनाडूला अनुक्रमे उपविजेतेपद मिळाले.
मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. मुलींमध्ये हरियानाला चमक दाखवता आली नाही. तमीळनाडू आणि कर्नाटकच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.
मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ४ बाय ४०० मीटरमध्ये ४. ०२. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची हरियानात मान उंचावली. यात ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिक नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली. सुदेष्णाने १०० मीटर धावण्यात नोंदवलेली (११.७९ सेकंद) वेळ तिचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तिने २०० मीटरमध्ये २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवली.

४ बाय १०० मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदक घेतले आहे. त्यात साक्षी चव्हाण (औरंगाबाद), सुदेष्णा शिवणकर (सातारा), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा रिलेचा संघ होता. मंगळवारी यांच्या संघाने मैदान गाजवले होते.

दुखापतीतून पदकाकडे
मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.

पुण्यात जप्त केलेले 2000 किलो पेक्षा जास्त ड्रग्ज नष्ट

पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांच्याकडून जप्त केलेले 2439 किलो अंमली पदार्थ नष्ट

पुणे , दि. 9 जून 2022

सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42054 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ, 1710845 गोळ्या, 72757 कफ सिरपच्या बाटल्या आणि 16336 इंजेक्शनच्या कुपी नष्ट केल्या. अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करी विरुद्ध एक मजबूत संदेश देण्यासाठी 8 जून 2022 रोजी समन्वयित पद्धतीने या अमली पदार्थांची विल्हेवाट संपन्न केली. या  कार्यक्रमाची अध्यक्षता माननीय केंद्रीय अर्थमंत्री, श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी भुषावली तसेच देशभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या दुरुपयोग आणि तस्करीविरूद्ध मजबूत संदेश देण्यासाठी आभासी पद्धतीने या समन्वयित कार्यवाहीमध्ये भाग घेतला.


याच कार्यवाहीचा एक भाग म्हणून, पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2439 किलो ड्रग्जची  पूर्व-चाचणी विल्हेवाट लावली. हा सर्व जप्त मुद्देमाल मेसर्स. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव यांच्या परिसरात अत्याधुनिक प्लाझ्मा गॅसिफिकेशन आधारित भस्मीकरण सुविधेवर दि. ८ जून २२ रोजी नष्ट करण्यात आला. डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे आणि डॉ. सोनाली काळे, समन्वयक, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे यांनीही या कार्यवाहीला हजेरी लावली.


माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिकार्‍यांचे अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढा देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल कौतुक केले आणि मुक्तांगण पुनर्वसन केंद्रासारख्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, जे तरुणांसोबत मोठ्या प्रमाणावर काम करतात, अंमली पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.


मुंडे-महाजन-खडसे-फुंडकरांनी भाजपाला बहुजन चेहरा दिला होता … पंकजा मुंडे यांना नाकारणे अन्यायकारक

मुंबई: राज्यातील भाजपच्या प्रमुख ओबीसी चेहऱ्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला फटकारले आहे. एक काळ असा होता की, महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात असे. पण मुंडे-महाजन-खडसे-फुंडकरांनी या पक्षाला बहुजन चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याबद्दल शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. मला अडगळीत टाकण्यात आलं होतं, अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला साथ दिली. त्यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझं राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल. काही दिवसांपूर्वी लोक चर्चा करत होते की, ‘एकनाथ खडसे संपले’, ‘ते आता विधिमंडळात परत पाय ठेवत नाहीत’. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. त्यासाठी मी या दोघांचाही ऋणी असल्याचे खडसे यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांनी भाजपला चांगलेच फटकारले. कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे. एकेकाळी भाजपपासून महाराष्ट्रातील बहुजन समाज दूर होता. त्या काळात फरांदे सर, अण्णा डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर आणि प्रमोद महाजन या नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलला.

महाराष्ट्रात भाजपचे आज जे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला. अशा परिस्थितीत आज पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट नाकारणं हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. ज्यांनी पक्षासाठी काहीच केले नाही, ज्यांचं काही योगदान नाही, ते अचानक येतात आणि पदावर बसतात. ज्यांनी उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची केलं, त्यांना बाजूला ठेवले जाते. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचा विचार झाला पाहिजे होता, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे. तर भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर शिवेसनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.

माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला” मॉल ” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला ….!!

0

मॉल म्हणजे काय तर मोठी इमारत किंवा कनेक्ट इमारतींची मालिका ज्यामध्ये विविधवस्तू एकत्र मिळणाऱ्या दुकानाची मालिका… ज्यात हॉटेल्स पण असेल असे ठिकाण… जगात 19 व्या शतकात बांधकामात अनेक प्रयोग झाले.. रचनात्मक शहर उभी राहिली… भारतात ब्रिटिशांनी त्यांच्या शैलीत अनेक इमारती बांधल्या… पण देशात पहिल्यांदा शहराच्या मध्यभागी भव्य गोलाकार मार्केट उभं करून शहरातले सगळे रस्ते जोडण्याची अभिनव कल्पना सुचली ती लातूरकरांना… सालं होतं 1917 .. देशभरात ब्रिटिशांची सत्ता होती मात्र लातूरवर निजामशाहीची हुकूमत होती, ब्रिटिशांबरोबर तह करून आपलं राज्य चालविणाऱ्या निजाम काळात लातूर मधल्या तत्कालीन व्यापाऱ्यांच्या डोक्यात अशा मार्केटची कल्पना सुचली की, सगळ्या गोष्टी लोकांना एकत्र मिळाव्यात मग त्याची रचना पक्की झाली… मध्यभागी देवींची प्रतिष्ठापना.. त्यामागे आपल्या पाठीशी आदीशक्तीचं पाठबळ आहे ही धारणा प्रत्येकाच्या मनात असावी… गंगमोहरं, राकेशमोहरं, ही कोणतीही भावना डोक्यात न घेता.. 8 जून 1917 रोजी लातूर मध्ये गंजगोलाईची स्थापना करण्यात आली.. त्याचे उदघाटन निजाम काळातील सुभेदारी म्हणजे आयुक्त कार्यालय गुलाबर्गा स्थित होतं त्याचे सुभेदार होते राजा इंद्रकरण… त्यांच्या हस्ते झाले आणि आजच्या व्याखेप्रमाणे देशातला पहिला ” मॉल ” लातूरात उभा राहिला.


गंज हा उर्दू शब्द आहे त्याचा अर्थ होतो वस्तू बाजार (आणि मराठवाड्यात मोठं गोल भांडे असते दूध वगैरे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी त्यालाही गंज म्हणतात) अशी गोल वस्तू बाजार असलेली बाजार पेठ उभी राहिली.. त्याला 16 रस्त्यांनी जोडण्यात आले…या सोहळा रस्त्यावर ठोक व्यापारी दुकान बसविली गेली.. एक रस्ता फक्त सोनारासाठी म्हणजे सराफ लाईन , दुसरा रस्ता फक्त कापड दुकान ती कापड लाईन, एक लाईन अन्नधान्याची भुसारलाईन… असे 16 रस्ते सोळा ठोक व्यापाराच्या लाईन.. असं देशात कुठे आहे का? तर आहे पण लातूरची गंजगोलाई उभी राहिल्या नंतर दिल्लीत 1921 ला ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले.. कमी जागेत अधिक दुकानें दळणवळणासाठी सोयीस्कर ठरतात म्हणून ही रचना केली… पुढे 1925 मध्ये रायपूरलाही गोल मार्केट ब्रिटिशांनी वसविले.

लातूरची गोलाई एतद्देशीय लोकांनी त्यांच्या कल्पनेतून उभी केली. या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या जागेची मागणी त्याकाळी लातूरची पेशकारी औशावरून चालायची, तिथले पेशकार सुजामत अली यांच्या मदतीने हैद्राबाद निजाम दरबारी मागणी पोहचवली व जागा उपलब्ध करून घेतली.. पुढे 1945 ला परदेशावरून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूरचनाकाराच्या मदतीन कच्ची गोलाई पक्की झाली…!!
1905 ला लातूरला तहसील दर्जा मिळाला त्यापूर्वी नळदुर्ग हे तहसील कचेरीचे ठिकाण होते. 1923 ला मिरज लातूर रेल्वे सुरु झाली आणि लातूरची वाढ व्यापारी केंद्र म्हणून झाली… या व्यापारी पेठेची ख्याती देशभर पसरली त्यातून गंजगोलाई आणि तीचे वैशिष्ट्य देशभर पसरले… गंजगोलाई हे लातूरच्या इतिहासातील सोनेरी पान आहे… आणि लातूर करांच्या मनामनात गोलाई बद्दल अभिमान आहे. ते लातूर करांच्या अभिमानाचे प्रतिक आहे… अशा या गंजगोलाईचा आज वर्धापन दिन आहे… चला लातूर संस्कृतीचा अभिमान ठेवू या… देशभर तो अधिक तेजाने पसरवू या…!!

@युवराज पाटील

 वांद्रे येथे इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर, 16 गंभीर जखमी

0

मुंबई- वांद्रे  परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक तीन मजली इमारत कोसळली . या घटनेत एकाच मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले .स्थानिकांनी सांगितलं की, 2 दिवसांपूर्वी बिल्डरनं या इमारतीला लागून असलेलं घर पाडलं होतं. त्यामुळे या इमारतीचा आधार काढल्यामुळं ही इमारत कोसळली.मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तसेच, अजुनही मलब्याखाली काही लोक अडकल्याची भितीही त्यानं व्यक्त केली.

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं.सदर घटनेबाबत अधिक माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितलं की, “मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागांत तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या मजल्यावर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील 17 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या 17 जणांपैकी घटनेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर 16 लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 23 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र बचावकार्य अद्याप सुरुच आहे. अजुनही काही लोक मलब्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.”वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात उत्तर प्रदेश, बिहारमधून कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेल्या मजुरांची मोठी वस्ती आहे. दोन दिवसांपूर्वीच तीन मजली इमारतीच्या शेजारी बांधलेलं घर तोडण्यात आलं असून, या तीन मजली इमारतीचा आधार काढल्यानं ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती डीसीपींनी दिली.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कामासाठी कुठेतरी जात असताना त्याच्या डोळ्यांसमोर इमारत कोसळली. त्यानं घटनेचं गांभीर्य ओळखून इतरांच्या मदतीनं तात्काळ बचावकार्य सुरु केलं.

सोनिया गांधींचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह

0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अजूनही कोरोना संक्रमित आहेत.त्यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली. निर्धारित वेळेनंतर पुन्हा एकदा त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल, मात्र तोपर्यंत त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, कोरोनामुळे सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी मिळालेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटीसवर सोनिया गांधी यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. बुधवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसने सांगितले की, सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होतील, कारण त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, आम्ही नियमांचे पालन करतो. आमच्या अध्यक्षांना बोलावले तर त्या नक्कीच हजर होतील. आम्हाला कसलीही भीती आणि दहशत नाही, आम्ही भाजपसारखे नाह

राज्यसभा निवडणूक:तुरुंग, कोविड, गंभीर आजारामुळे ४ मतांची अनिश्चितता

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी एकीकडे चुरस निर्माण झाल्याने, दुसरीकडे चार आमदारांच्या मतदानाविषयी अनिश्चितता दिसून येते आहे. . कोरोना लागण झाल्याने सक्तीचे विलगीकरण, न्यायालयीन कोठडीतील आमदारांना मतदानास कायद्याची मनाई आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेले आमदार अशा विविध समस्यांनी मतदानात काहीजणांना अडथळे आलेले आहेत . कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक,चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगतापहे आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना १० जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी एअर लिफ्ट करून मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे दोन माजी-आजी मंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर काल बुधवारी सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी निकाल होईल.राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास ४ हजार २०० मते आवश्यक आहेत. पण, सध्या ५०० मतांचे मूल्य असलेल्या ४ लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने दोन्ही बाजूकडे चिंता आहे. शरद पवार यांनी बुधवारी लखनऊ ते विरार अशी फोनाफोनी केली. त्यानंतर समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना फोन करून आघाडीला पाठिंबा देण्याची सूचना केली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची आघाडीच्या शिष्टमंडळाने बुधवारी विरार येथे भेट घेतली. तसेच शरद पवार यांनीदेखील ठाकूर यांना फोन केला. बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत ३ आमदार आहेत.


वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे प्रशासनाला निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पालखीमार्ग व पालखीतळांना भेट
पुणे, दि. ८: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, दौण्ड- पुरंदर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, हवेली प्रांताधिकारी संदेश शिर्के, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक संजय कदम, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने, पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मनपा क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, पुरेसा औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. कोविड तपासण्यांची व्यवस्था करण्यात आली असून खबरदारी म्हणून जास्तीत जास्त नमुने घेण्यात यावेत, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी यावेळी दिले.

पालखीमार्गाच्या साईडपट्टया भरुन घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत २० तारखेच्या आत पूर्ण करुन घ्यावे. दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. तेथील विसाव्याच्या लगतच्या शेतकऱ्यांनी संरक्षक जाळ्या (कंपाऊंड) केलेले आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा यासाठी प्रशासनाने संबंधित खातेदारांशी संपर्क साधून व्यवस्था करावी.

सासवड पालखीतळ येथे पावसाचे पाणी साचते त्यामुळे या पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम सुरू असून ते गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सासवड नगरपरिषदेला दिल्या. कऱ्हा नदीवरील पुलाचे कामही पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जेजुरी पालखीतळ नवीन तयार करण्यात येत असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार काम सुरू आहे. वाल्हे पालखीतळासाठी वेगळी प्रवेश कमान आणि प्रस्थान कमानीचे काम सुरू आहे. नीरा पालखीतळाच्या बाजूचे मजबुतीकरणाचे (पिचींग) काम सुरू आहे. नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठड्यांची दुरूस्ती तात्काळ करुन घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

हवेली तालुक्यात ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरुपात सिमेंट काँक्रेटचे स्टेज बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पालखीपूर्वी पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.

घाटामध्ये मेडिकल वेस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई
दिवे घाटामध्ये रात्री वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये दिवसा तसेच रात्री गस्त घालण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात घटना आढळल्यास नागरिकांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी घाटमार्गावर अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक रंगविण्यात यावेत, असेही निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम राबवा-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

पुणे, दि. 8: समाजातील वाढती बालविवाहाची कुप्रथा रोखणे हे सर्वांचे कर्तव्य असून सदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी बालविवाह रोखण्याची मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत बाल लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मितेश घट्टे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिराशे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येते. आयोग महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्य करते. त्याचप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामामध्ये मध्ये गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका असून गावातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोणाच्या दबाबाला बळी न पडता बालविवाह आदी कुप्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. प्रसाद म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे यांनी महिलांच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवशाली इतिहास पुणे जिल्ह्याला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या क्षेत्रात गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, रोखण्यासाठी प्रयत्न करावे. गावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी प्रत्येक गर्भवती महिलांची नोंदणी करावी. यासाठी सरपंच, पोलीस पाटील यांनी लक्ष द्यावे. ग्रामपंचायतीच्या मदतीने सूचना बॉक्स उपलब्ध करुन देण्यात यावे. गावात भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असेही ते म्हणाले.

अप्पर पोलीस आयुक्त श्री. चव्हाण म्हणाले, सर्वांनी मिळून मनात संकल्प केला तर या प्रश्नावर मात निश्चित मात करता येईल. आपल्या परिसरात होणाऱ्या गर्भलिंग निदानचाचण्या, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यास निश्चितपणे अशा घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. समाजातील कुप्रथेस प्रतिबंध घालणाऱ्या मोहिमेस पोलीसांचे नेहमीच सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.

अप्पर पोलीस आयुक्त श्री. घट्टे म्हणाले, समाजातील अशा चुकीच्या घटनांवर पोलीस विभागाचे लक्ष आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करुन आपल्या गावातील घटत्या स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराला आळा बसेल याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

यावेळी चाईल्ड लाईन संस्थेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आदी पदाधिकारी उपस्थित होते. बालविवाह रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

मंत्रालयाच्या प्रवेशपास खिडक्यांवर टपाल स्वीकारण्यासाठीची तात्पुरती व्यवस्था बंद

0

मुंबई, दि. 8 : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गृह विभागाच्या दि.१६ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकान्वये मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालय प्रवेश पास प्रक्रिया बंद करण्यात आली होती. या विभागाच्या दि. ३० ऑगस्ट २०२१ च्या परिपत्रकान्वये सामान्य जनतेच्या सुविधेसाठी मंत्रालय गार्डन गेट प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.

अभ्यागतांना प्रवेशपास देण्यासाठी राबविण्यात येणारी Visitor Pass Management System (VPMS) दि. १८ मे, २०२२ पासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. प्रवेशपास ठिकाणी टपाल स्वीकृतीकरिता केलेली व्यवस्था बंद करण्यात आली असून टपाल प्रत्यक्षात मंत्रालयात स्वीकारले जाणार आहे. यानुसार सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी तसेच मंत्रालयीन नियंत्रणाखालील सर्व विभाग व कार्यालयांनी टपाल शक्यतो ईमेलद्वारे पाठवावे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. 18 मे 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना पुरस्कार

0

मुंबई, दि. 8 : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना २०२०-२१ चे उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सातारा आणि सिंधुदुर्ग (Award for Excellence), वाशिम आणि ठाणे (Certificate of Excellence) तर सोलापूर (Letter of Appreciation) या जिल्ह्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उद्या ९ जून २०२२ रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी संबंधित जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव पदावरील सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी २०२०-२०२१ (Award of Excellence in District Skill Development Planning-DSDP) या पुरस्कार स्पर्धेत देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. त्यातून प्राथमिक स्तरावर ३० जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील ५ जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे आहेत. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसाम्रगी व कुशल मनुष्यबळाची मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून जिल्ह्याचा वार्षिक कृत्ती आराखडा राज्यातील सर्व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समित्यांमार्फत तयार करण्यात आला आहे.

मागील वर्षीप्रमाणे सन २०२२-२३ करीता सुद्धा आपण स्वत: पुढाकार घेवून जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करावा आणि त्याची यथोचित अंमलबजावणी करून जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता क्षेत्रामध्ये महत्तम संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले आहे.

उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडे तयार करुन स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व जिल्ह्यांचे अभिनंदन मंत्री श्री. टोपे यांनी केले असून यापुढील काळात या आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यांनी जास्तीत जास्त युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले आहे.