Home Blog Page 1939

स्वतः बदललात तरच वातावरण बदलेल- पद्मश्री राहीबाई पोपेरे

एमआयटी डब्ल्यूपीयूत अर्थ शास्त्र -२०२२ 

पुणे,  ७ जून : “काळी माती आपली आई आहे. तिचा र्‍हास होत आहे. ती टिकविण्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी करून जुन्या पध्दतीचे बीज वापरून विषमुक्त अन्नधान्य पिकविले तर सुदृढ पिढी घडू शकेल. प्रत्येकाने देशी गाय आपल्या घरात आणावी. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड थांबवून निसर्गाने दिलेलं देणं जतन करावे.” असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे येथील बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीच्या स्कूल ऑफ सस्टनेबलिटीस्टडिज व निनॉक्स नेचर क्लब यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अर्थ-शास्त्र २०२२ ( Earth Shastra 2022 ) या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे  संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.  टेर पॉलिसी सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, अ‍ॅग्रो टुरिझमचे प्रणेते पांडुरंग तावरे आणि बांबू उत्पादक व संशोधक संजिव करपे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, फॅकल्टी ऑफ सस्टनेबलिटी स्टडिजच्या संचालिका डॉ. अनामिका बिस्वास व सहयोगी प्राध्यापक डॉ.पंकज कोपर्डे व डॉ. प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते.
श्रीमती राहीबाई पोपेरे म्हणाल्या, “मी कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. मी एक ऊसतोड कामगारच होते.परंतू माझे वडिल आणि निसर्ग यांनीच मला शिकविले. आज शेतीमध्ये सेंद्रिय खते  आणि हायब्रिड अशा अन्नधान्य व भाजीपाला पिकविला जात आहे. त्यामुळे मानवी जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहे. आणि नवीन पिढीसुध्दा याला अपवाद नाही. त्याकरिता पारंपारिक वाण वापरून उत्पादन केल्यास जमीनीचा र्‍हासपण कमी होईल आणि दर्जेदार उत्पादन होऊन सुदृढ अशी नवीन पिढी घडेल . ”  
श्री.राजेंद्र शेंडे म्हणाले, “पूर्वीच्या काळी शेती पारंपारिक पध्दतीने करून चांगल्या प्रतिचे उत्पादन केले जात होते. सेंद्रीय खताचा वापर करून जमीनीचा कस वाढविला जात होता. एकमेकांना उपयोगी पडेल अशा पध्दतीने काम करत तोच शाश्‍वत विकासाचा पाया होता. भविष्यात शाश्‍वत विकासाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने शिका, त्यावर काम करा आणि उच्चदर्जाची निर्मिती केली तरच भारत आत्मनिर्भर बनेल.”  
श्री.संजिव करपे म्हणाले, ‘ आज बांबू शेतीला चांगले दिवस आले आहेत. यातून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढले आहेच व इतर लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालेला आहे. आता या बांबूचा उपयोग फर्निचर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, सायकली, कपडे, बोर्ड, चप्पल, सीट कव्हर, बांबूची घरे बनविले जात आहेत.”  
श्री.पांडुरंग तावरे म्हणाले, “शेतीला पर्यटनाची जोड दिल्यामुळे शेतकर्‍यांचा शाश्‍वत विकास होईल. खेडेगावाची संस्कृती परंपरा ही या पर्यटनाच्या माध्यमातून माहित होऊन तेथील शेतीमध्ये उत्पादित झालेल्या मालाची विक्री यातून त्यांना रोजगार मिळू शकेल. आणि गावाचा विकास होईल. गाव आत्मनिर्भर बनेल.”  
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “शेती, कृषी पर्यटन आणि बांबूची शेती यावर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतकरी समृध्द झाला, की समाज समृद्ध होईल. त्यातून देशाचा विकास होईल. प्रत्येकाने निसर्ग तत्त्वाचे पालन केल्याने विकासाबरोबरच समाजात सुख, समाधान आणि शांती नांदेल.”  
यावेळी मनोज अनपट, अनपटवाडी, शांताबाई वरवे, तिकोना पेठ, किशोर फडतरे, निंबोडी व वैशालीताई, वडगाव, जुन्नर या सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
   डॉ. पंकज कोपर्डे यांनी प्रास्ताविक केले. निधी धामणे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. अनामिका बिस्वास यांनी आभार मानले.

हमीपत्रानंतर सारसबाग चौपाटी सुरू..अश्विनी कदमांची यशस्वी मध्यस्थी ..

पुणे-महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत ते सील केले होते. रस्त्यावर टाकण्यात आलेले टेबल, खुर्च्यांसह अन्य साहित्य महापालिका प्रशासनाने कारवाई वेळी जप्त केले होते. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले होते. पथारी संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनी व्यावसायिकांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सारसबाग परिसरात वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतला होता. व्यावसायिकांनी अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र दिल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली जाईल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली होती.रस्त्यावर टेबल, खुर्च्या ठेवण्यात येणार नाही. शेड टाकण्यात येणार नाही, असे हमीपत्र घेऊन व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हमीपत्र मिळाल्यानंतर प्रशासनाकडून रस्ता रुंद करण्यात आला असून सध्या केवळ रस्त्याची दहा फूट जागा वापरण्यास व्यावसायिकांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे वॉकिंग प्लाझा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी केलेल्या मध्यस्थीला यश आले आहे.

 सारसबाग येथील नियोजित ‘वॉकिंग प्लाझा’ तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॅालसमोर व्यावसायिकांनी फरशी टाकून केलेला रस्ता रूंद करण्यात आला आहे. रस्त्यालगतची केवळ दहा फूट जागा व्यावसायिकांना वापरण्यास परवानगी मिळणार आहे. शेड न उभारण्याचे तसेच खुर्च्या हटवून रस्ता मोकळा करण्याचे हमीपत्र व्यावसायिकांकडून घेत व्यवसायायाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सारसबाग चौपाटी परिसरात वॉकिंग प्लाझा सुरू होण्याची शक्यता आहे.

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात अरुण गवळी गॅंगचे कनेक्शन ..? संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक?

0

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या खून प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात 8 शार्प शूटर्सनी मिळुन मुसेवालाची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे. यापैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली असून तो पुण्याचा रहिवासी आहे. 29 मे रोजी मुसेवालाच्या शूटिंगमध्येही त्याचा सहभाग होता.

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर येत होते. लॉरेन्स गँगचा कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले होते. त्यात आता गवळी टोळीचे नाव समोर आल्याने लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

संतोष जाधव याला खास मुंबईहून पंजाबला बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा सौरभ महाकाळही आला होता. गवळी सध्या महाराष्ट्रातील तुरुंगात आहे. या नव्या खुलाशानंतर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी माहितीचे आदान-प्रदान केले असून या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पंजाब पोलिसांनी सहकार्यही मागितले आहे.

मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 राज्यांतील 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यामध्ये पंजाबमधील तरनतारन येथील जगरूपसिंग रूपा व मनप्रीत मन्नू, हरियाणातील सोनीपत येथील प्रियवर्त फौजी व मनप्रीत भोलू, महाराष्ट्रातील पुणे येथील संतोष जाधव व सौरव महाकाल, सीकर, राजस्थान, भटिंडा, पंजाब येथील सुभाष बानुदा, हरकमल सिंग राणू यांचा समावेश आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची रविवारी, 29 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या. त्यापैकी 7 गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या होत्या. गोळी झाडल्यानंतर 15 मिनिटांत मुसेवालाचा मृत्यू झाला. बोलेरो आणि कोरोला वाहनांनी पाठलाग केल्याने थार जीपमधून जात असलेल्या मुसेवाला याचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यावेळी मुसेवाला यांच्यासोबत एकही बंदूकधारी नव्हता.

आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन

पुणे, दि:६- उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयामार्फत वजने व मापे यांचे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केलेल्या आणि आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनाविरुद्ध ग्राहकांनी संपर्क करुन तक्रार नोंदविण्याचे आवाहन सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र विभागाने केले आहे.

मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलिंडर वितरीत करणाऱ्या कामगाराकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास कारवाई करण्यात येते. सन २०२०-२१ मध्ये एकूण २७३ आस्थापनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून त्यामध्ये रुपये २३ लाख ९२ हजार ५०० दंड वसूल करण्यात आला आहे.

ग्राहकांनी असे नियमांचे उल्लंघन होताना आढळल्यास कार्यालयाच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२/०२०-२६१३७११४, व्हॉटस ॲप क्रमांक ९८६९६९१६६६, ईमेल आयडी dclmms_complaints@yahoo.in , aclmpune@yahoo.in येथे संपर्क करुन तक्रार करावी, असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात सर्व कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

पुणे दि.७- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ साठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून त्यासंबंधितची कामे अंतिम टप्प्यात आहे. पालखी तळ व इतर अनुषंगिक सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मौजे उरळी देवाची येथील साईड पट्टयांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसाव्याच्या ठिकाणी असलेल्या चरांची दुरुस्ती, लोणी काळभोर येथील मोऱ्यांची दुरुस्ती, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सर्विस रोडची दुरुस्ती, दौंड ते निरा रस्त्याच्या साईड पट्टयांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापुर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता, करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामे वेगाने करण्यात येत आहेत.

जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि दोन्ही महानगरपालिकेतर्फे महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधांसह स्त्रीरोग तज्ञांची सुविधा देण्यात येणार आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी ५ किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. सर्व उपविभागीय अधिकारी यांची समन्वय अधिकारी आणि तहसिलदार यांची उपसमन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अनुषंगिक कामांचा त्यांच्याकडून दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गावनिहाय संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पाणी पुरवठ्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी ३७ विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत आणि ७० टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८७ फिरते वैद्यकीय पथक आणि १०८ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.

परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी् मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्याचे नियेाजन आहे.

पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्केण खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षीत ठेवण्यात येणार आहेत. पालखी व्यवस्थापनाबाबत माहितीसाठी पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे.

खेलो इंडिया स्पर्धा: कब्बडीत मुलींचे रूपेरी यश मुलांच्या संघाला कांस्य पदक

0

पंचकुला, ७
कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुलींनी रूपेरी यश मिळवले. हरियानासोबत सुवर्णपदकासाठी झालेली लढत त्यांना जिंकता आली नसली तरी दुसरे स्थान पटकावले. हरियानाकडून (४८-२९) १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्य पदक मिळाले.
येथील ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राला कबड्डीत मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. हरियानाच्या पूजाच्या चढायांपुढे महाराष्ट्राचा निष्प्रभ ठरला. एक-दोन पकडी वगळता महाराष्ट्र संघाला फार प्रभाव दाखवता आला नाही.
सामन्यात पहिल्या चढाईत पहिला बोनस पॉईंट हरियानाने घेतला. महाराष्ट्रानेही पहिल्या चढाईत गुण मिळवला. पुन्हा हरियानाचीही चढाई यशस्वी ठरली. टाईम आउटला स्कोर चारच्या बरोबरीत होता. हरियानाच्या पूजाने चढाईत दोन गुण मिळवले. दुसऱ्या टाईम आऊटला महाराष्ट्र ६ तर हरियाना ७ गुणांवर होता. इथपर्यंत लढाई दोलायमान होती. परंतु पूजाची दुसरी चढाईही महाराष्ट्रावर भारी पडली. त्यात दोन पॉईंट गेले. यशिकाच्या यशस्वी चढाईने स्कोर ९-९ झाला.
पूजाने पु्न्हा तीन गुण घेतले. पहिल्याच हापमध्ये महाराष्ट्र ऑलआउट झाला. परिणामी हरियानाला (१८-१२) सहा गुणांची आघाडी मिळाली. पूजाच्या चढाईने पहिल्या हापला हरियाना (२५)-महाराष्ट्र (१५) १० गुणांनी पिछाडीवर पडला.
महाराष्ट्राची हरजीत व यशिका, मनिषा बोनस गुण घेत राहिले. परंतु महाराष्ट्राला पकडी करता आल्या नाही.
दुसऱ्या हापमध्ये टाईम आऊटला हरियानाने (३३ गुण) आघाडी घेतली. महाराष्ट्राचे १९ गुण होते.

सामन्यात सात मिनिटे उरली असताना महाराष्ट्राला पु्न्हा एका ऑलआउटला सामोरे जावे लागले. परिणामी हरियानाला २१ गुणांची भरभक्कम आघाडी मिळाली. त्यांच्या पूजाची एकही चढाई गुणांविना गेली नाही. शेवटी १९ गुणांनी महाराष्ट्राचा पराभव झाला.

कब्बडीतील विजेते (मुले)
सुवर्ण – हिमाचल प्रदेश
रौप्य – हरियाना
कांस्य – महाराष्ट्र व उत्तर प्रदेश

मुली
सुवर्ण – हरियाना
रौप्य – महाराष्ट्र
कांस्य – आंध्र प्रदेश व तामीळनाडू

‘खाद्य सुरक्षा मानांकनात महाराष्ट्र तिसरा’ जागतिक अन्न सुरक्षा दिवशी पुरस्काराने सन्मानित

0

मुंबई, दि. 7 : खाद्य सुरक्षेच्या बाबतीत राज्याचे उत्तम कामगिरी केली असून आज जागतिक अन्न सुरक्षा दिनी तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्याबद्दल राज्याला सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे  झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विभागाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अभिनंदन केले आहे.

राज्याने ‘इट राईट‘ या उपक्रमातही उत्तम कामगिरी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील अकरा जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. यात बृहन्मुंबई, पुणे, मिरा भाईंदर महानगरपालिका, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.

खाद्य सुरक्षेसंदर्भात अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध उपाय योजना केल्या जातात. यात खाद्य परवाने, टेस्टींग सुविधा, प्रशिक्षण आणि ग्राहकाच्या हितासाठी केलेल्या कामांच्या आधारावर हे मानांकन (FSSAI) अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणातर्फे दिले जाते. राज्याने गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध आखणी करत उत्तम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी पंधराव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्याने यावर्षी सरळ तिसरे स्थान पटकावले आहे.

मोठ्या वीस राज्यांच्या स्पर्धेत तमिळनाडूने पहिला, गुजरात दुसरा तर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक मिळविला आहे. हे मानांकन  देत असतांना राज्याने केलेली पदभरती, परवाने वितरण, अनुपालन, हेल्प डेस्क, आणि खाद्य विक्रेत्यांच्या तपासणीची संख्या याचाही विचार केला गेला. हे मानांकन देण्यासाठी समिती नेमण्यात आली होती ज्यात खाद्य तपासणी तज्ज्ञ, पोषण आहार तज्ज्ञ यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता.

नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल उपस्थित होते. मोठी वीस राज्य, छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आयुष आहार या उपक्रमाच्या ‘लोगो‘ चे अनावरण आणि माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा

0

दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्या आधी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देत असतो. निसर्गाचा हा इशारा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अशी लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नाही तर काही तास आधीही स्पष्ट दिसू लागतात. अशी लक्षणे दिसू लागताच गावकऱ्यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.

दरड कोसळ्यापूर्वी दिसून येणारी सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. डोंगर उतारांना तडे जाणे, तडे गेलेला भूभाग खचू लागणे, घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड होणे, झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे, नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे मोठे होणे, त्यातून गढूळ पाणी येणे, विहीरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ किंवा घट होणे. यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये दिसलेली लक्षणे. अतिवृष्टी होत असताना झऱ्यांची पाणी क्षमता वाढणे, भात खाचरांना भेगा पडणे, जमिनीला हादरे बसणे, संपर्क साधणे निकामी होणे, घरांना तडे जाणे, भिंत कोसळणे, घरांच्या जमिनीखालून पाणी येणे, विहीर वाहू लागणे, बोअरिंगमधून पाणी उसळणे. अशी ही लक्षणे दरड कोसळण्यापूर्वी दिसून येतात.

अशी लक्षणे दिसून आल्यास गावकऱ्यांनी काय करावे?

दरड कोसळण्याची लक्षणे दिसू लागल्यास गावकऱ्यांनी तातडीने धोक्यापासून दूर होण्याचा विचार करावा. जीव वाचवणे महत्वाचे आहे. हा एकमेव विचार ठेवावा. त्यासाठी तात्पुरत्या स्थलांतरास सज्ज व्हा. त्याची तयारी म्हणून शेती, बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसा, औषधे यांची जोडणी करून ठेवावी. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले तसेच जनावरांना हवलण्यास प्राधान्य द्या.

दरड कोसळण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. सह्याद्री परिसर म्हणजे पर्वतमय, भूकंपप्रवण आणि भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे. भूकंपामुळे किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती आणि खडकांमधील सच्छिद्र भूपृष्ठाला तडे जातात. या तड्यांमध्ये पाणी जाऊन नवीन झरे निर्माण होतात. अखेरीस अतिवृष्टीमध्ये या तड्यांपासून दरडी कोसळतात. तसेच नवीन रस्ते, रेल्वेसाठीचे खोदकाम, बोगद्यांची कामे, खाणकामासाठीचे सुरुंग, शेतीसाठी, घर बांधणीसाठीचे सपाटीकरण, जंगलतोड यामुळेही दरडी कोसळतात.

दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असली तरी, ती रोखण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. दरडी थांबण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करता येतात. डोंगर भागात अतिक्रमण करू नका, सापटीकरण टाळावे. डोंगर उतारावर बांबू सारख्या वृक्षांची लागवड करणे. पाण्याचा निचरा लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे.

विद्यार्थ्यांनो तुम्हीही सहभागी व्हा!

शिक्षकांच्या मदतीने गावाचा नकाशा प्राप्त करून डोंगर उतारावर दिसलेली दरडींची लक्षणे आणि त्यावर अधारित धोकादायक परिसराचे नकाशे तयार करु शकता. पुररेषा आखू शकता. गावाच्या पर्यावरणीय समस्यांबाबत निबंध, पथनाट्य, पोवाडे यांच्या माध्यमातून जनजागृती करा, तसेच धोकादायक परिसराचे चित्रीकरण करून पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांना पाठवू शकता.

जिल्ह्यात एकूण 25 गावे दरडग्रस्त आहेत. त्यामध्ये वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 6 गावांचा समावेश आहे. दोडामार्ग तालुक्यात 4, देवगड तालुक्यात 4, सावंतवाडी तालुक्यात 3 आणि मालवण, कणकवली तालुक्यात प्रत्येकी 1 अशी दरड ग्रस्त गावे आहेत.

लक्षात ठेवा निसर्गाने दिलेला इशारा वेळीच ओळखून त्यास दिलेला प्रतिसाद हा तुमच्यासह तुमच्या कुटुंबियांचेही प्राण वाचवू शकतो. वाड वडिलांपासून रहात असलेले घर कसे सोडू असा विचार न करता आपले व आपल्या कुटुंबियांचे प्राण लाख मोलाचे आहेत ही बाब लक्षात ठेवा. दरडीच्या दुर्घटनांमधील जीवित हानी टाळण्यासाठी सजग रहा, सज्ज व्हा.

– हेमंतकुमार चव्हाण, 

माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग.

स्पर्धा,कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

पुणे: महावितरणच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये क्रिकेट, रांगोळी स्पर्धा  तसेच स्नेहमेळा व शैक्षणिक प्राविण्य मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वीजग्राहकांना अविश्रांत सेवा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या आयोजनामुळे नवी ऊर्जा मिळाली.

महावितरणच्या वर्धापनदिनानिमित्त रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्नेहमेळा-२०२२ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश राजदीप, डॉ. सुरेश वानखेडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाद्वारे स्नेहमेळ्याचे उद्घाटन झाले.

दरम्यान दि. ४ ते ५ जून रोजी पुणे परिमंडल अंतर्गत विभागस्तरीय पुरुष व मंडलस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत मंचर विभागाच्या पुरुष संघाने व रास्तापेठ मंडलाच्या महिला संघाने विजेतेपद पटकाविले तर बंडगार्डन विभागाचा पुरुष संघ व गणेशखिंड मंडलाचा महिला संघ उपविजेता पदाचे मानकरी ठरले. तसेच परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत उज्ज्वला सोनार- प्रथम, काजल लिंबोळे- द्वितीय तर अपर्णा मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविले. स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमात क्रिकेट स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघांना चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

उच्च शिक्षणासाठी आयआयटीमध्ये प्रवेश मिळविणारे शिवम अंकुश नाळे, हेमंत सुरेश वानखडे, ऋषिकेश रवींद्र कारंडे, डेलिया तुषार काळे, सृष्टी श्रीकांत गंगावणे, मयांक देविदत्त जोशी, आर्यन माणिक राठोड तसेच शैक्षणिकसह कला व क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे आदित्य राजेश काळे, प्रद्युम्न्य संजय जगनाडे, सोनल चंद्रकांत कानडे, यश सतीश उंडे आणि एमपीएससी स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी झालेले श्री. नीलेश कृष्णाजी सस्ते यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर हिंदी व मराठी गाण्यांच्या संगीत रजनीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी, श्री. संतोष गहेरवार, भक्ती जोशी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब हळनोर यांनी आभार मानले. वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मृद्गंधाच्या वास अत्तर पेक्षाही सुंदर – उल्हास पवार

पुणे -उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पहिल्या पाऊसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या मृद्गंधाचा वास कोणत्याही सुगंधी अत्तर यापेक्षा सुंदर असतो. या मृद्गंधामुळे सगळीकडे  आशेचे वातावरण तयार होते व सुखाचे दिवस आता येतील ही भावना मनाला स्पर्श करते. या पार्श्वभूमिवर कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण यांचा ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्यसंग्रहामुळे केवळ मन आनंदाने फुलते एवढेच नव्हे तर निसर्गाचे संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाला होते अशी भावना ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी आज काढले. तनया–ईशा प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्य संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी तनया–ईशा प्रकाशनचे प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले ‘सध्या वाढत्या शहरीकरणामुळे बेसुमार जंगलतोड होत आहे. त्यातूनच ग्लोबल वॉर्मिंगचे संकट सर्वांनाच भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मृद्गंधा हा निसर्गविषयक महत्व वाढवणारा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.

कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण म्हणाल्या कि वृक्ष, वेली, फुले, शेती, नदी, पक्षी, आकाश, वारा हा सारा निसर्ग असल्यामुळेच आपले जीवन समृद्ध होत असते. निसर्गाची नासाडी न करता निसर्गाचे संवर्धन व्हावे हिच भावना या काव्य संग्रहात प्रतिबिंबित होत आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर बाबर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रुति तिवारी यांनी केले.

कल्याणी ग्रुपने सादर केले भारत १५० मल्टी-पेलोड ड्रोन

पुणे७ जून २०२२: पुणे-स्थित भारतीय उद्योगसमूह कल्याणी ग्रुपची संरक्षण उद्योगक्षेत्रातील कंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेडने भारत १५० हे मल्टी-पेलोडव्हेरिएबल मिशन ड्रोन सादर केले असून हे अनोखे ड्रोन या समूहाने भारतात विकसित केले आहे. एक्स-८ कॉन्फिगरेशन ड्रोनची भारतीय सैन्याकडून लेह-लडाखमधील अतिउंचीवरील प्रदेशांमध्ये आधीच चाचणी घेतली जात असून याने २० किलो पेलोडसह ८.५ किमी कामगिरी बजावली आहे.

हे ड्रोन उभ्या लंब स्थितीत टेक-ऑफ व लॅन्डिंग करणारे (व्हीओटीएल) मनुष्यरहित हवाई वाहन (युएएस) आहे ज्याचे कमाल टेक-ऑफ वजन १५० किलो व रिकामे असताना टेक-ऑफ वजन ५८ किलो आहे.  या क्राफ्टमध्ये भारतात विकसित करण्यात आलेली रेडिओ कम्युनिकेशन व्यवस्था आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम (आयएनएस) आहे ज्यामध्ये अँटी-जॅमिंग आणि अँटी-स्पूफिंग क्षमता आहेत. या क्षमतांनी परिपूर्ण असल्यामुळे हे क्राफ्ट जॅमिंग आणि जीपीएस-नाकारले जाते अशा वातावरणात देखील चालवले जाऊ शकते.

या ड्रोनच्या बॅटरीज ५० किमी ते २०० किमीसाठी कम्युनिकेशन लिंक एन्क्रिप्शन (१२८ एईएस) सह किमान ३० मिनिटे टिकू शकतात.  वापर जसा असेल त्यानुसार टिकून राहण्याची शक्ती वाढवली जाऊ शकते. 

हे ड्रोन जल व धूळ रोधक भारत १५० -३० अंश सेल्सियस ते ६५ अंश सेल्सियस या तापमान श्रेणीमध्येप्रति तास ५० किमीच्या सरासरी वेगासह व वायू झोताला प्रतिकार करण्याच्या १५ एम/एस क्षमतेसह वापरले जाऊ शकते.  टेक-ऑफ जमिनीच्या १००० मीटर वर चालवले जाऊ शकते आणि ५५०० एम एएसएलला काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.

याची रचना स्वायत्त (ऑटोनॉमस) आणि इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या स्थिर असल्यामुळे ते लॉजिस्टिकशोध आणि बचावसिग्नल इंटेलिजन्स आणि कम्युनिकेशन इंटेलिजन्सआयएसआरवॉरहेड ड्रॉपिंगसाठी लॉइटरिंग म्युनिशन इत्यादींसाठी वापरण्यास सुयोग्य आहे.

भारत फोर्ज डिफेन्सचे अध्यक्ष व सीईओ श्री. राजिंदर भाटिया म्हणालेभारत १५० हे अत्याधुनिक मानवरहित हवाई वाहन विकसित केल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. स्वदेशात अशी यशस्वी कामगिरी बजावल्यामुळे आपल्या देशाला स्वावलंबी बनवण्याची आमची वचनबद्धता अधिक दृढ झाली आहे.  हे ड्रोन विविध क्षेत्रांमध्ये विविध कामांसाठी वापरले जाऊ शकते.  आम्हाला आशा आहे की हे ड्रोन खूप चांगली कामगिरी बजावेल आणि लवकरच त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जाऊ लागेल.”   

कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड हा प्लॅटफॉर्म पुढे अजून जास्त विकसित करेलत्याच्या टिकून राहण्याच्यापेलोड क्षमतांमध्ये आयएसआर क्षमतांमार्फत सुधारणा घडवून आणेल. 

खेलो इंडिया युथ गेम्स:बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीची सुवर्ण कामगिरी,तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला हरवून पटकावले पदक

0

पंचकुला, ७
बॅटमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने (मुंबई) तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन गेममध्ये हरवून सुवर्ण पदकास गवसणी घातली. पहिला गेम त्याने २१ विरूद्ध १५ असा तर दुसरा गेम २२ विरूद्ध २० या फरकाने जिंकला. दर्शनमुळे महाराष्ट्राच्या तालिकेत सुवर्ण पदकांच्या संख्येत भर पडली आहे.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनचा अंतिम सामना रंगला. दर्शनच्या आक्रमक फटक्याचा ऋत्विकने तितक्याच लीलया प्रतिकार केला. पहिला गेम हरल्यानंतर त्याने दुसऱ्या गेममध्ये आघाडी घेतली होती. परंतु दर्शनने त्याचा प्रतिकार भेदत सुवर्ण पदक पटकावले.
पहिल्या गेममध्ये सुरूवातीला दर्शनने दोन गुण घेऊन आघाडी घेत खाते उघडले. ऋत्विकने तीन-तीन गुण बरोबरी झाली. मग मात्र, दर्शनने अकरा गुणांपर्यंत आघाडी घेतली. तेव्हा ऋत्त्विक होता ९ गुणांवर. पुढेही आघाडी कायम (१७ विरूद्ध १३) राहिली. हीच गती कायम ठेवत दर्शनने पहिला गेम २१ विरूद्ध १५ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये ऋत्विकने गुण घेऊन शुभारंभ केला. दर्शननेही सलग दोन घेतले. परंतु पुन्हा ऋत्विक आघाडीवर गेला. तो ४ गुणांनी आघाडीवर पोहचला. दर्शनने चांगले फटके मारून बरोबरी साधली. नेट पॉईंट घेण्याच्या नादात त्याने ऋत्विकला तीन पॉईंट दिले. हे कमी म्हणून की काय त्याने मारलेले काही फटकेही नेटमध्ये अडकले. परिणामी दर्शन ९ विरूद्ध १३ असा पिछाडीवर पडला. मात्र, सलग गुण घेत १३-१३ अशी बरोबरी केली.
दर्शनने सलग दोन घेतल्याने स्कोअर १५ झाला. ही आघाडी त्याने मॅच पॉईंटवर आणली. मागून ऋत्विकही २० गुणांवर आला. दर्शनने एक गुण घेतला. त्यानंतर ऋत्विकने मारला फटका फाऊल झाला. आणि दुसरा गेमही दर्शनने २२ विरूद्ध २० असा जिंकून सुवर्ण पदकास गवसणी घातली. दर्शन हा गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करतो. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तो ऋत्विककडून हरला होता. खेलो इंडियात त्याला हरवून सुवर्ण जिंकले.

क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दर्शनला दिल्या होत्या शुभेच्छा
हरियानाच्या मैदानावर महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने (मुंबई) बॅटमिंटनच्या अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सकाळी व्हिडिओ कॉल करून सुवर्णपदकासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. चांगला खेळून सुवर्णपदक घेऊन ये. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मनावर कोणतेही दडपण घेऊ नको, पदक तुझेच आहे. बिनधास्त खेळ, अशा शब्दांत क्रीडामंत्री केदार यांनी दर्शनचे मनोबल वाढवले. दर्शननेही अप्रतिम खेळ करीत पदक जिंकून क्रीडा विभाग व महाराष्ट्राची मान उंचावली. क्रीडा विभागासह मंत्र्यांचे त्याने आभार मानले. या विजयानंतर आपले लक्ष्य सुवर्णपदक असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
सामन्यानंतर भगवा फेटा
सामन्यानंतर तीनही पदकविजेत्या खेळाडूंना भगवे फेटे बांधण्यात आले. या महाराष्ट्रीय आदरातिथ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

जिल्हास्तरीय तांदुळ व डाळ महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. ७:- जिल्हातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे व उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय तांदुळ व डाळ महोत्सव २०२२-२३ चे नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी मोठ्याप्रमाणात या प्रदर्शनास भेट देऊन महोत्सवात तांदूळ, डाळ आदींची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे  ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालक शालिनी कडू यांनी कळविले आहे.

जाहिरातीत वाढतेय अश्लीलता ,संस्कृतीचे भान का विसरावे -खर्डेकरांची प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार

पुणे- हल्ली चर्चेत राहावे , लक्षात राहावे , चटकन पाहावे ,किंवा ऐकावे म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून जाहिराती केल्या जातात ,पण या जाहिराती करताना संस्कृतीचे भान विसरून अश्लीलतेकडे वळलेल्या जाहिरातींना तातडीने बंदी घातली पाहिजे अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे . त्यांनी म्हटले आहे कि,’काही टीव्ही चॅनल्स वर टायटन रागा ह्या घड्याळाची जाहिरात प्रसारित होत आहे. सदर जाहिरातीत एका विवाह सोहोळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र जमले असून सर्वजण नियोजित वधू सोबत लग्नाच्या विविध समारंभात ती काय घालणार यावर चर्चा करत आहेत.यात नियोजित वधू आपल्या बॅचलर पार्टीचा ड्रेस व घड्याळ, कॉकटेल पार्टीचा ड्रेस व घड्याळ, लग्नाच्या दिवशीचे ड्रेस वगैरा दाखवत आहे. यावेळी तिची मावशी तिला विचारते की हनिमून ला काय घालणार आहेस ? यावर एक क्षण थांबून नियोजित वधू
थांबून म्हणते – मावशी “हनिमून ला कोणी कपडे घालते का ?”
माझ्या मते कोणत्याही भारतीय कुटुंबात नियोजित वधू अश्या प्रकारचे वक्तव्य करणार नाही. कदाचित काही पुरोगामी मंडळींना यात काही वावगे वाटणार नाही किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ही याकडे पहिले जाईल, मात्र माझ्या मते याला बंधन घालणे गरजेचे असून योग्य कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी करत आहे. तसेच अनेक जाहिरातींमध्ये स्त्री देहाचे प्रदर्शन केले जाते, याबाबत ही आचारसंहिता तयार केली जावी अशी ही मागणी यनिमित्ताने करत आहे.

या सोबत BRUMEX FORTE च्या सूचक जाहिराती कडे हि खर्डेकर यांनी लक्ष वेधले आहे.ज्यात विजय पाटकर यांनी काम केलेले आहे. टीव्ही वर जाहिराती दाखविताना कौटुंबिक वातावरण लक्षात घेऊन संस्कृती जपूनच अश्लील नसतील अशा जाहिराती करायला हव्यात .असे ते म्हणाले.

शाळा भरली बंद्यांची इच्छा नसताना त्यांची..

0

कारागृहातच वसली पंढरी
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित अभंग-भजन स्पर्धेत ठाणे कारागृहातील बंदीजनांचे सादरीकरण
ठाणे : भजन-अभंग स्पर्धेमुळे पांडुरंगाच्या जवळ जाण्याची संधी मिळाली असून ठाणे कारागृहातच पंढरपूर वसले आहे, अशा भावना स्पर्धेत सहभागी बंदी गणेश सूर्यवंशी याने व्यक्त केल्या.तर नमाज असो वा भजन; परमेश्वराचे चिंतन करण्याचे ते एक साधन आहे. जगात माणुसकी सारखा दुसरा धर्म नाही, असे युसुफ अन्सारी म्हणाला.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ठाणे जिल्हा कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत संतरचनांसह ‘शाळा भरली बंद्यांची इच्छा नसताना त्यांची..’ ही रचना सादर केली.

जिल्हा कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव, तरुंग अधिकारी अविनाश गावित, लहू कानदकर, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, संगीत शिक्षक दर्शन नाईक, शिक्षक गणेश मुटकुळे, एम. डी. भदाने, हमादेव शहाबादकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक बंदी वाल्याचा वाल्मिकी होऊ दे-हर्षद अहिरराव, अधीक्षक, ठाणे कारागृह
परमेश्वराच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे. परमेश्वराचे नामस्मरण केल्यामुळे वाल्याचा वाल्मिकी होतो, हे आपण ऐकले आहे. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभंग-भजन स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक बंदीजनाला मिळू दे आणि कारागृहातून बाहेर जाताना प्रत्येक बंदी वाल्मिकी होऊ दे.
बंदीजनांच्या हाताल काम मिळावे -लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख
तळोजा कारागृहाचा परिसर बघितल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवते की, येरवडा कारागृहातील बंदीजनांना वेगवेगळी कामे करण्याची आणि त्यातून अर्थार्जन करण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. तळोजा कारागृहातील बंदीजनांच्या हाताला काम मिळाल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल. हातांना काम करण्याची सवय राहिल्यामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांना कुठलीही अडचण येणार नाही असे वाटते.
विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र
महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट
स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.