Home Blog Page 1912

अल्पसंख्याक शाळांमध्ये पायाभूत सुविधा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून ” धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना ” सन 2022-23 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

सन 2022-23 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खाजगी शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी विहित अटी व शर्तींची पुर्तता करुन सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001 यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जाचा विहित नमुना तसेच याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासन निर्णय क्र. अविवि-2015/प्र.क्र.80/15/का.6,दि.07.10.2015 मध्ये व महाराष्ट्र शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै, 2022 राहील. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतिमरित्या पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 राहील याची संबंधितांनी नोंद घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विधान परिषद उपसभापती पदाच्या कार्यकालास आज तीन वर्षे पूर्ण

0

महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

मुंबई, ता. २३ : महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या स्थापनेपासून ५५ वर्षानंतर एका सामान्य परिवारातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला म्हणजेच डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली. या श्रेष्ठतम निवडीचे श्रेय आणि संपूर्णपणे मार्गदर्शन जाते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे यांना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विद्वतापूर्ण, अभ्यासू, संयमशील आणि एका विशिष्ट वैचारिक उंची असलेल्या भाषणांनी शिवसेनेची आणि सामाजिक प्रश्नांची बाजू त्यांनी गेली २० वर्षे मांडली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या, पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख, मुख्य प्रतोद अशा विविध पक्षाच्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या आहेत. आज त्यांच्या विधान परिषद उपसभापती पदाच्या कारकीर्दीला दिनांक २४ जून २०२२ रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. या निमित्ताने त्यांनी या काळात केलेल्या विविधांगी कामांचा आणि त्यांच्या अनेक विषयांवरील बैठकांच्या माध्यमातून सकारात्मक रीतीने झालेल्या अंमलबजावणीचा हा धावता आढावा.

त्यांनी या तीन वर्षांत महिला अत्याचार, उसतोड कामगार, गिरणी कामगार, शेतकरी महिला, शेतमजूर, राज्यातील विविध देवस्थाने,यावर काम केले.
बीड जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात गर्भाशय टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात तपासणी करण्याबाबत त्यांचे काम लक्षणीय आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये आवश्यक त्या सुधारणा आणि आदिवासी भागातही ही योजना लागू करण्याबाबतही त्यांनी आढावा घेतला .
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांच्या नावे जमीन व्हावी व त्यांना मदत देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. महसूल विभागासोबत आकारी पड जमिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विवाह नोंदणी व पती पत्नी दोघांच्या नावे जमीन होण्यास मोहिमांचीही शिफारस त्यांनी आरोग्य व महसुलविभागास केली. महाराष्ट्रातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोककला कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा या विषयावरील बैठक, महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेली बैठका घेतल्या.
पंढरपूर, शिर्डी, लेण्याद्री, कार्ला येथील एकविरा मंदिर आदी ठिकाणी भाविकांसाठी पायाभूत सुविधाांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून या तेथील विकास कामांना गती मिळाली.
भटके विमुक्त आणि उसतोड कामगारांबाबत, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना ओळखपत्र देण्यासंदर्भात, कल्याणच्या नाट्यगृहात सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत, राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा , कोविड परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या व उपाय योजना या विषयांवरही त्यांनी अविरत काम केले .
कोविड काळानंतर नंतर शाळा सुरु करताना घ्यावयाची काळजी आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षणबाबतचे इतर विषयावर त्यांनी पुढाकार घेतला.
शाश्वत विकासाची उद्दिष्टांबाबत केंद्र सरकारने केलेला कृती कार्यक्रम या आणि अशा अनेक विषयांवर राज्य सरकारसोबत वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला आहे.

उपसभापती कार्यालयाकडून याचा एक अहवाल लवकरच प्रकाशित होणार आहे.

विदर्भातील स्वयंसेवी संस्थांसोबत आदिवासी भागात वन हक्क कायदा अंमलबजावणी आणि रोजगार हमी योजनेच्या कामात आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य स्तरावरील परिषद त्यांनी घेतली. या परिषदेला रोजगार हमी मंत्री आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांना याबाबत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

महिला दक्षता समित्या आणि जात पंचायतीच्या विषयांवर डॉ. गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र शासनाने विशेष शासन निर्णय आणि परिपत्रक देखील प्रसारित केले. तर कोविड काळात बालकांची घ्यायच्या काळजी आणि संरक्षण बाबत मार्गदर्शक सूचना नव्याने तयार करून सामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या गेल्या ही बाब विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल.

सन २०२१ मध्ये स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये कोविड काळात वैधव्य आलेल्या महिलांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून विधान भवनात प्रकाशित केलेल्या ‘स्वयंसिद्धा’ अहवालाच्या माध्यमातून राज्य शासनाला या महिलांचे प्रश्न आणि त्यावर आवश्यक उपाय योजना याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पालघर, नासिक, धुळे, जळगाव, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर (संगमनेर), उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, जालना, कल्याण – नवी मुंबई महापालिका या सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन कोविड काळातील विधवा एकल महिलांसाठी शासकीय स्तरावरील उपाय योजना बाबत विविध विभागांशी संवाद साधून आढावा बैठका घेण्यात आल्या
मराठवाडा विभागात तर विभागीय आयुक्त स्तरावर याबाबत तत्काळ दखल घेत प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात मदत व पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.* यामुळे मराठवाडा विभागात या कामाला विशेष गती प्राप्त होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात येत असून त्यामुळे शासकीय अधिकारी आणि सर्व शासन यंत्रणा एका सामाजिक जबाबदारीच्या भावनेने या प्रश्नाकडे पाहत आहेत.

रायगड जिल्ह्यातील ३ हजार आदिवासी कुटुंबाना त्यांच्या वन जमिनींचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम ताईंचा पुढाकार अत्यंत महत्वाचा ठरला असून पेण परिसरातील आदिवासी भागात कार्यरत असलेल्या साकव संस्थेच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात या आदिवासी महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या जमिनींच्या उताऱ्यांचे वाटप डॉ. गोऱ्हे यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हेरवाड ग्राम पंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदी ठरावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देऊन या गावांचे अभिनंदन डॉ. नीलम ताई यांनी केले. या गावाला महिलांच्या सोयी सुविधांसाठी विकासनिधी म्हणून तातडीने ११ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. इतकेच नव्हे तर राज्यभरातील स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन पुण्यात याविषयी एक परिषद घेऊन हा विषय सर्व गावांनी अनुकरण करण्याचे आवाहन केले. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने यावर एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीना आवाहन केले आहे.*

डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत सातत्याने आघाडीवर राहून काम करीत आहेत, हे वास्तव आहे. त्यांच्यामुळे वृत्तवाहिन्यांवर मांडल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेला वजन प्राप्त होत होते. बहुतांश संतुलित परंतु आवश्यक तेव्हा आक्रमकपणे त्यांनी शिवसेनेवरील टीकेचा प्रतिवाद केला. शिवसेनेत राहूनही विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवले, हे राजकारणातील सौहार्दही विशेष उल्लेखनीय म्हणता येईल. राजकारणाबरोबरच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, महिलाविषयक प्रश्नांची जाण असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या लोकप्रतिनिधी विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी विराजमान झाल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रश्नांची तड लागणे आज काही प्रमाणात का होईना शक्य झाले आहे. :

खरंतर अनेकदा सामाजिक क्षेत्रातून राजकारणात गेलेले लोक समाजकारणाकडे पाठ फिरवतात. परंतु डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे प्रश्न हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू ठेवला आणि त्यासाठी सातत्याने राज्यभर धावपळ करीत आहेत. स्त्रीआधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम विशेष महत्त्वाचे आहे आणि त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधी विधिमंडळात असणे नेहमीच अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी दिलासादायक राहिले आहे. स्त्रियांसंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले आहे हीच त्यांची राज्याच्या राजकारणातील वेगळी ओळख आहे.

दिवे घाट लिलया पार …कर्हेकाठी सवंत्सरनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा

0

सासवड / सूर्यकांत भिसे

एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम l
आणिकाचे काम नाही आता ll

पुण्यनगरीचा दोन दिवसाचा निरोप घेवून संत सोपानदेवांच्या सवंत्सरनगरीकडे मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदुंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट लिलया पार केला . सोहळ्याचे पुरंदर तालुक्यात मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले . रात्रो आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सवंत्सरनगरीत विसावला .


नित्यनेमाने पहाटे श्रींची विधीवत पूजा , अभिषेक व आरती करण्यात आली . त्यानंतर माऊली व संत तुकाराम महाराजांचा सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला . शिंदेछत्री येथे माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत करण्यात आले . माउलींच्या दर्शनासाठी हजारो वानवडी , हडपसर परिसरातील भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती . विविध संस्था , संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले .
हडपसर येथे सुमारे तास विश्रांती घेवून सोहळा वडकीनाल्याकडे मार्गस्थ झाला . पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती . हडपसर ते वडकी या वाटचालीत अरुंद रस्ता व पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने वारकऱ्यांना वाटचालीत त्रास झाला . त्यातच दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाने काही वेळ हजेरी लावल्याने वारकऱ्यांची एकच तारांबळ उडाली .


दुपारी २ वाजता सोहळा वडकी येथे पोहोचला . वडकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अरुण गायकवाड , उपसरपंच दिलीप गायकवाड , ग्रामसेवक माधव वाघ यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलीसह सोहळ्याचे स्वागत केले .
वडकी येथून दुपारी ३ वाजता सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला . साडेतीनच्या दरम्यान सोहळा दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचला . रथाला वडकी , फुरसुंगी परिसरातील चार बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या . टाळ मृदुगांचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली . या सोहळ्या बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वैष्णवासंगे घाट चढण्याचा आनंद लुटला .

पाऊस पडून गेल्याने वातावरण उत्साही होते . सह्याद्रीच्या पर्वतरांगा जणू हिरवा शालू नेसून माउलीसह वैष्णवांचे स्वागत करीत होत्या असेच वाटत होते . वडकी येथे दिवेघाटाच्या पायथ्याशी समीर आंबेकर यांनी हजारो भाविकांना चहा , खिचडी व महाप्रसाद देवून वैष्णवांची सेवा केली . सह्याद्रीच्या पर्वतरांगात टाळ मृदुंगासह विठ्ठल नामाचा जयघोष दुमदुमत होता . सात किलोमीटरचा दिवेघाट पार करुन अश्वांसह माऊलींचा सोहळा सायंकाळी ५ वाजता झेंडेवाडीफाटा येथे पोहोचला . पुरंदर तालुक्याच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे , आ संजय जगताप , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते , भाजपचे बाबाराजे जाधवराव , प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड , तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्यासह पुरंदर तालुका वासीयांनी माऊलीसह सोहळ्याचे स्वागत केले .

भाग गेला शीण गेला ,
अवघा झालाशी आनंद ll

असे म्हणत अवघड दिवेघाट चढून माथ्यावर आलेल्या लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनी माउलींच्या सोहळ्या बरोबर चालून वारीचा आनंद घेतला . या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती . पोलिसांनी घाटातील वाहने पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली . त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला . माऊलीसह वैष्णवांनी झेंडेवाडी फाट्यावर विसावा घेतला . त्यानंतर मार्ग सोपा करीत सोपान देवांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांचा मेळा सवंत्सर नगरीकडे मार्गस्थ झाला . रात्रो आठ वाजता हा सोहळा कर्हेकाठी सवंत्सरनगरीत विसावला . सोहळ्याचा येथे दोन दिवस मुक्काम आहे .

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

कोरोना, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन याचा घेतला आढावा

सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मुंबई दि २४: राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका , ती तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही त्यांनी निर्देश दिले.

मास्क सक्तीची वेळ येऊ नये

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क चालणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लोकल रेल्वे प्रवासात मास्क सक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

राज्यातील कोरोना स्थितीबद्दल आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण आहे. राज्यात साधारणतः २५ हजार रूग्ण आहेत. त्यापैकी ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पाच टक्के रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सीजनवर एक टक्के तर आयसीयूमध्ये अर्धा टक्के रुग्ण आहेत. व्हेंटीलेटरवर आजमितीस २५ रुग्ण आहेत असे सांगून वर्धक मात्रा वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी नाशिक, पुणे, अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी देखील कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.

मुंबई महापालिकेचे प्रशासक डॉ आय. एस चहल यांनी सांगितले की, मुंबईत दररोज २० हजाराच्या वर चाचण्या करण्यात येत असून आज २४७९ रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या १३ हजार ४०० इतकी आहे. मुंबईत सध्या १२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील नाले सफाई तसेच मलेरियचा प्रादुर्भाव याविषयी माहिती घेऊन सूचनाही केल्या.

आपत्तीत यंत्रणांनी सतर्क राहावे

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत देखील मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी आढावा घेतला . यावेळी विशेषतः कोकण विभागातील तयारी आणि सज्जता याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांनी माहिती दिली . दरड प्रवण नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळीच देण्यात याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी, महाड, खेड आणि चिपळूण परिसरांबाबत आतापासूनच विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची तसेच अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी उपाययोजना, सॅटेलाईट- रेडीओ संपर्क यंत्रणा, तसेच मोबाईल चार्जिंगकरिताही व्यवस्था, पाटबंधारे विभागाची पाणी सोडण्याबाबत तसेच आपत्कालीन परिस्थितीत सायरनद्वारे सूचना देण्याची यंत्रणा, वापरण्यात येणाऱ्या बोटींची चाचणी याविषयी माहिती देण्यात आली.

वारकऱ्यांची काळजी घ्या

आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारीत वारकरी मंडळी देहभान हरपून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करण्यात यावी. विशेषतः मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा याबाबतीत जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पेरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा

राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात १३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास २३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांची उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी २५ जून ते १जुलै हा कृषी संजीवनी सप्ताहही आय़ोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावांगावामध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले.

औरंगाबाद पाणीपुरवठा कामे वेगाने करा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेऊन ती अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच अन्य विभागांचे सचिव उपस्थित होते.

पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने लेखा विषयक कार्यशाळेचे आयोजन

0

पुणे दि.२४: प्रशासकीय कामकाजात लेखा व आस्थापना शाखेचे कामकाज अत्यंत महत्वपूर्ण असल्याने लेखा व आस्थापना विषयक कामकाजात तत्परता व अचूकता महत्वाची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनंसपर्क विभागाचे लेखा उपसंचालक रवींद्र साळुंके यांनी आज येथे केले.

पुणे विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने लेखा विषयक कार्यशाळेचे येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. साळुंके बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) डॉ. राजू पाटोदकर, पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सातारा जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती अधिकारी सचिन गाढवे आदी उपस्थित होते.

उपसंचालक साळुंके म्हणाले,  लेखा व आस्थापना कामकाज करताना वेळोवळी नोंदी, प्रलंबित परिच्छेदाचा गतीने निपटारा, रोख नोंदवही, कार्यालयातील नोंदवह्या, सेवापुस्तक अद्ययावत असणे गरजेचे आहे. कार्यालय प्रमुखांनी वेळोवळी रोख नोंदवही व कार्यालयातील इतर नोंदवह्यांची तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध नियमावली, शासन निर्णय आणि नियमांचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही श्री.साळुंके यांनी केले.

उपसंचालक डॉ. पाटोदकर म्हणाले, लेखा व आस्थापना विषयक कामकाजात अचूकता येण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा प्रधान सचिव दीपक कपूर यांनी निर्देश दिले होते.  त्यानुसार या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणात लेखा व आस्थापनाविषयक बाबींसंदर्भात मार्गदर्शन होईल आणि कामकाज सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय खरेदीप्रक्रियेसाठी खरेदी धोरण अभ्यासावे- रमेश कुलगोड
माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी रमेश कुलगोड यांनी दुसऱ्या सत्रात ऑनलाईन खरेदी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाचे खरेदी धोरणाचा चांगला अभ्यास करणे महत्वाचे आहे. खरेदी प्रक्रियेत वेळोवेळी येणाऱ्या शासन निर्णयांची माहिती गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन खरेदी प्रक्रिया कशी राबवावी, जेम पोर्टलवरून खरेदी, लेखा आक्षेपांचा निपटारा करणे, वित्तीय अधिकार, वित्तीय अधिकार मर्यादा, आयकर विषयक बाबी, देयके सादर करताना घ्यावयाची काळजी याबाबतही त्यांनी माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना श्री. कुलगोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणाला पुणे, सोलापूर व सातारा जिल्हयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

बंडखोर आमदारांची कार्यालये होऊ लागली लक्ष्य-बंडोबांच्या फोटोंना काळे फासण्याचे प्रकार-कोल्हापुरात ठाकरेंच्या समर्थनार्थ प्रचंड मोर्चा

0

कुर्ल्यात मंगेश कुडाळकरांचे कार्यालय फोडले; नगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे

शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापूरकर मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. तर अहमदनगरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसले त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे शहरात असलेल्या एका पोस्टरवर काळे फासले. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांचे कुर्ल्यातील कार्यालयावर दगड फेक करून त्यांचे फोटोचे बोर्ड तोडण्यात आले.संतप्त शिवसैनिकांनी कुडाळकर यांच्या कार्यालायावर चाल केल्यानंतर कार्यालयाच्या दर्शनी भागावर नामफलक आणि कुडाळकर यांचा फोटो होता त्यावर लोखंडी काठीने घाव घालत त्यांचा फोटो फोडला त्यानंतर नावाचीही तोडफोड केली.

कुडाळकर कुर्ला, नेहरुनगरचे आमदार

शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार मंगेश कुडाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेतआमदार मंगेश कुडाळकर यांनी स्पष्ट केले होते की, गुवाहटीला जाण्याआधी सकाळपर्यंत माझा विचार नव्हता, मात्र काही कारणाने जावे लागत आहे, पण त्यांनी ठोस कारण तेव्हा सांगितले नव्हते. आमदार मंगेश कुडाळकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटाच्या गटात सामील झाले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला. आज मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर चाल करून त्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली. तर नगरमध्ये बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी शिवसैनिक संतप्त झाले होते त्यांनी घोषणाबाजीही केली.

अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न व्यवसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

0

पुणे, दि. 24: अन्न व औषध प्रशासन व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अग्रिकल्चर (एमसीसीआयए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपहारगृह, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायिक, मिठाई, फरसाण, खाद्यतेल उत्पादक व दुध प्रकिया व्यवसायिकासाठी ‘फोर्टीफिकेशन, रिपर्पोज युज्ड कुकिंग ऑइल (आरयुसीओ) अभियान, सरप्लस फुड अँड हायजिन रेटींग’ याबाबत जागृती करण्यासाठी एमसीसीआयएच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, एमसीसीआयएच्या अन्न प्रकिया समितीचे अध्यक्ष आनंद बोरडीया, एफएसएसएआय पूर्व विभागाचे संचालक कर्नल श्री. दहीतुले आदी उपस्थित होते.

यावेळी केएचपीटीचे जालिंदर शिंदे यांनी फोर्टीफिकेशनबाबत, सहायक आयुक्त श्री.देसाई यांनी आरयुसीओ तर अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी ‘हायजिन व सरप्लस फुड’ बाबत संगणकीय सादरीकरण करून मार्गदर्शन केले. यापुढेही अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

व्यवसायिक प्रतिनिधी श्रीकृष्ण चितळे, रवी बुधानी, किशोर सरपोतदार यांनी उपस्थितीत केलेल्या शंकांचे प्रशासनाकडून निरसन करण्यात आले. यावेळी विविध व्यवसायिकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहायक आयुक्त सं. भा. नारगुडे, बा. म. ठाकुर, सी. ए. देसाई, श्री. रा. करकले, र.भि. कुलकर्णी, सु. श. क्षीरसागर, ग. पां. कोकणे, रा. र. काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी वि. अ. उनवणे. अ. ग. गायकवाड, सो. ह. इंगळे आदी उपस्थित होते.
**

महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन

0

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला दोन वर्षांपूर्वी साठ वर्षे पूर्ण झाली. या हीरक महोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ने तीन महत्त्वपूर्ण खंडांची निर्मिती केली आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रांत गेल्या सहा दशकांत काय प्रगती झाली, काय राहिले याची वस्तुनिष्ठ नोंद घेणारे हे खंड आहेत. सोमवार, 27 जून 2022 रोजी ‘ग्रंथाली’ व ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या खंडांचे प्रकाशन दुपारी 1.00 वा. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात होणार आहे.

यावेळी मराठी भाषा सचिव भूषण गगराणी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘विज्ञान-तंत्रज्ञानात हीरक महोत्सवी महाराष्ट्र’ (संपादक विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान); ‘मोहरा महाराष्ट्राचा’ (संपादक रमेश अंधारे); ‘मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान’ (संपादक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. अजय देशपांडे) असे हे तीन महत्त्वपूर्ण खंड आहेत.

संग्राह्य असणाऱ्या या तीन खंडाच्या संचाची मूळ 3,000 रुपये असून ‘ग्रंथाली’ने केवळ 1,500 रुपयांत उपलब्ध केला आहे, असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी म्हटले आहे. प्रकाशनाचा हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार असल्याचे कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी कळवले आहे.

गेल्या ४८ तासात तब्बल १६० च्यावर शासनआदेश संशयास्पद-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र

0

मुंबई, दि. २४ जून – राज्यातील महाविकास आघाडी सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घेत आहेत. गेल्या ४८ तासात तब्बल १६० च्यावर शासनआदेश जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे व हस्तक्षेप करावा, अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रानुसार, गेल्या तीन दिवसांत राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.
यापरिस्थितीच महविकास आघाडी सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. हा प्रकार संशय वाढविणारा आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या तत्कालिन गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी विनंतीही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आपल्या पत्रात पाठविलेल्या केली आहे

‘सनस्टोन’चे ‘अॅडव्हान्टेज’ आता पुण्यातील तीन विद्यापीठांमध्ये उपलब्ध

पुणे-: भारतात उच्च शिक्षणाची सेवा पुरविणाऱ्या संस्थांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या आणि २५ शहरांतील ३०हून अधिक संस्थांमध्ये अस्तित्व असणाऱ्या ‘सनस्टोन’ या संस्थेने पुण्यातील तीन विद्यापीठांमध्ये आपली सेवा पुरविण्याचे ठरविले आहे. ही महाविद्यालये ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’द्वारे (एआयसीटीई) मान्यता मिळालेली आहेत, तसेच महाराष्ट्र राज्य सरकारशी संलग्न आहेत. आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – पीजीडीएम; अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ; आणि पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन ही ती विद्यापीठे होत.

याबरोबरच ‘सनस्टोन’चे ‘अॅडव्हान्टेजेस’ आता आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – पीजीडीएममधील पीजीडीएम अभ्यासक्रमांमध्ये उपलब्ध होतील; तसेच अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए हे अभ्यासक्रम आणि एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनचे पीजीडीएम इन मार्केटिंग फॉर डिजिटल बोर्ड व पीजीडीएम इन फायनान्स फॉर न्यू-एज इकॉनॉमी या अभ्यासक्रमांमध्येही उपलब्ध होतील.

‘सनस्टोन’च्या ‘अॅडव्हान्टेजेस’मुळे उद्योग-संबंधी शिक्षण आणि कौशल्याधारीत अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यास विद्यार्थी सक्षम होतात आणि ते महाविद्यालयीन स्तरावरच नोकरीसाठी सज्ज होतात. या समावेशामुळे विद्यार्थ्यांना सनस्टोनच्या एक हजाराहून अधिक रिक्रूटर्सचे मजबूत नेटवर्क आणि २ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अनेक नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी त्यांना मिळू शकतात.

उच्च शिक्षणाची आकांक्षा असलेले अनेक विद्यार्थी राज्यभरातून पुण्यात येत असतात. उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यावर सरकार सतत भर देते, तसेच त्याकरीता प्रयत्नही करते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील शिक्षणप्रणाली स्वतःमध्ये सुधारणा करत आहे. अलीकडच्या काळात, सरकारने युवकांना उच्च-शिक्षण घेता यावे म्हणून काही नाविन्यपूर्ण योजना आणल्या आहेत.

‘सनस्टोन’चे सह-संस्थापक आणि सीओओ पीयूष नांगरू हे या प्रसंगी म्हणाले, “पुण्यातील तीन विद्यापीठांमध्ये ‘सनस्टोन’चे ‘अॅडव्हान्टेज’ देताना आम्हाला आनंद होत आहे. उत्साही व क्षमता असणाऱ्या तरुणांची मोठी संख्या भारतातील अनेक शहरांमध्ये आहे. त्यांना मिळणाऱ्या शिक्षणातील गुणवत्तेची व संधींची तफावत कमी करणे आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता पूर्ण करण्यात मदत करणे, हे ‘सनस्टोन’मध्ये आमचे उद्दिष्ट आहे.

‘सनस्टोन’च्या ‘एज’मुळे विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रमांची प्रमाणपत्रे मिळवून उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाचा पुरेपूर लाभ करून घेणे, उद्योगांमध्ये व प्रकल्पांमध्ये शिकाऊ उमेदवारी करण्यासाठी नावनोंदणी करणे, उच्च-मागणी असलेली तांत्रिक कौशल्ये शिकणे आणि स्वतःसाठी एक व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार करणे यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात.

अधिक समग्र आणि सर्वसमावेशक शिक्षणासाठी, ‘सनस्टोन’च्या ‘अॅडव्हान्टेजेस’मधून जीवन कौशल्ये व सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण, स्वारस्य आधारित क्लबमध्ये प्रवेश, क्रीडा संमेलने व सांस्कृतिक उत्सव, विद्यार्थी विनिमय कार्यक्रम, सनस्टोन विद्यार्थी नेटवर्कच्या समृद्ध डिजिटल समुदायामध्ये प्रवेश आणि इतर बरेच काही प्रदान केले जाते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

0

पुणे, दि.२४: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागरचनेस विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ४ व परिशिष्ट ४ (अ) सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आली आहे.

गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या –  परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

0

मुंबई, दि. २४ : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब  यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात १३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दि. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी केले.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे २५०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील  दि. २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. तर ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲपद्वारे, खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे, असेही परिवहन मंत्री.ॲड.परब यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत, असेही ॲड. परब यांनी सांगितले.

येथून सुटणार गाड्या…आगार बसस्थानक वाहतुकीची ठिकाणे

मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफ परेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी, परळ सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी, कुर्ला नेहरूनगर, बर्वे नगर/सर्वोदय हॉ.(घाटकोपर), टागोरनगर विक्रोळी, घाटला (चेंबूर), डी.एन नगर अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर बांद्रा, सायन पनवेल आगार, उरण आगार ठाणे-१, ठाणे-१    भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकरवाडी/चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव), ठाणे २, भांडूप (प.) व (पू.), मुलुंड (पू.), विठ्ठलवाडी, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली (प.) व (पू.), नालासोपारा, वसई, वसई आगार, अर्नाळा, अर्नाळा आगार.

स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून सदृढ आरोग्यदायी समाजाची निर्मिती करुया-विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया

0

पुणे, दि. २४: पंढरपूरच्या वारीमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अंगी स्वच्छता भावना वाढीस लागण्यासाठी प्रतिकात्मक रुपात स्वच्छता दिंडीचे आयोजन केले असून सदृढ, आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी या दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवले जाईल, असा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२’ च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागचे सहसचिव अभय महाजन, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, मिलींद टोणपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

श्री. लोहिया म्हणाले, १०० वर्षापूर्वी संत गाडगेबाबांनी स्वच्छतेबाबत दिलेली शिकवण आपण अंमलात आणत आहोत. प्लास्टिकमुक्ती, हागणदारीमुक्ती स्वच्छता मोहिमेबाबत शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाच्या महामारीत सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटले आहे. आता सर्वांनी मिळून स्वच्छता मोहिमेला अधिक व्यापक करायचे आहे. परिसर स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चागंले राहते. आरोग्य चांगले राहिल्यास मनाची सुदृढता निर्माण होवून आपल्या हातून सामाजिक बांधिलकीची जोपासना होते. कोणत्याही योजना लोकाच्या माध्यमातून राबविल्यास त्यावेळी यश दिसून येते.

डॉ. रामोड म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज व संत श्री सोपान महाराज पालखी पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असून त्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा समजली जाते. या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, आरोग्याची अडचण सोडविण्यासाठी स्वच्छ पाणी, महिला व पुरुषांकरीता स्वतंत्र शौचालय, राहण्याची व्यवस्था आदी सेवा-सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने ३१ आरोग्य पथके गठित करुन सेवा देण्यात येत आहे. पालखी मार्गावर ५६ ठिकाणी पाण्याचे स्त्रोताद्वारे तसेच जवळपास ७५ टँकर अधिग्रहित करून पाण्याची सुविधा केली आहे. स्वच्छता दिंडीद्वारे स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचेल.

श्री. कलशेट्टी म्हणाले, निर्मलग्राम कार्यक्रमांतर्गत २००५ या वर्षी स्वच्छता दिंडीची सुरुवात झाली. शाश्वत विकास कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टपुर्तीसाठी शासन काम करीत आहे. ग्रामविकास विभागाने मोबाईल शौचालय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गावातील लोकांसाठी शंभर टक्के निर्मलवारी करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हागणदारीमुक्त गावाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्तीच्यादृष्टीने जनजागृती करण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून स्वच्छतेबाबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

श्री. महाजन म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनामध्ये भक्तीची भावना घेवून वारीमध्ये वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या भावनेचा आदर करुन पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून  स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. लोककलावंतच्या माध्यमातून स्वच्छतेचे संदेशाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. स्वच्छतेचा संदेश वारकरी गावागावात पोहचवितात. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिंडीमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे.

श्री. प्रसाद यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले की, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२’ तसेच आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. निर्मलवारीच्या संकल्पना मागील सात वर्षापासून सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छ वारी व्हावी, यासाठी नियोजन करीत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने वारीच्याबाबतीत सहा प्रकारचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये कचरामुक्त वारी, हागणदारीमुक्त वारी करण्यात येणार आहे. दिंडीच्या माध्यमातून गावामध्ये पालखी जाण्यापूर्वी व गेल्यानंतर स्वछता केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेले शंभर टक्के हागणदारीमुक्त वारीबरोबरच निर्मलवारीची संकल्पना साध्य करण्यात येणार आहे.  शाश्वत विकासाची माहिती देण्यात येणार असून राज्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत योजना पोहचविण्यास मदत होणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेवकासाठी मोटारसायकल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वारीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी कॅराव्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी वारकऱ्यांना योजनांची माहिती होण्यासाठी प्रचार प्रसिद्धी साहित्य, वारीमध्ये दिंडी प्रमुखांना वाटप करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार किटचे अनावरण करण्यात आले.

जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च  क्षेपणास्त्राची ओदीशाच्या किनारपट्टीवरून  डीआरडीओ  आणि भारतीय नौदलाने घेतलेली चाचणी यशस्वी

0

ओदिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून  (आयटीआर ) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ ) आणि भारतीय नौदलाने, 24 जून 2022 रोजी  भारतीय नौदलाच्या जहाजातून, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या  कमी पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च  क्षेपणास्त्राची (व्हीएल -एसआरएसएएम) घेतलेली चाचणी यशस्वी झाली. व्हीएल-एसआरएसएएम, हे क्षेपणास्त्र  जहाजातून चालवली जाणारी एक  शस्त्र प्रणाली आहे ,जवळच्या पल्ल्यातील सागरी धोक्यासह  विविध हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीत आहे.रडारवर दिसू नये अशी यंत्रणा असलेल्या हवाई  धोक्यांचाही यात समावेश आहे.

या क्षेपणास्त्र  प्रणालीच्या  प्रक्षेपणादरम्यान  ,हवाई धोका म्हणून सोडण्यात आलेल्या एका  अतिजलद विमान प्रतिकृतीचा  या क्षेपणास्त्र प्रणालीने यशस्वरीत्या वेध घेतला.

चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राद्वारे  तैनात केलेल्या अनेक मार्ग निरीक्षण  साधनांचा वापर करून निकोप स्थिती मापदंडांसह प्रक्षेपकाच्या उड्डाण मार्गाचे परीक्षण करण्यात आले.  डीआरडीओ आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चाचणी प्रक्षेपणाचे निरीक्षण करण्यात आले.

या यशस्वी प्रक्षेपण चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ , भारतीय नौदल आणि उद्योगांचे  अभिनंदन केले आहे. या प्रणालीने एक कवच प्रदान केले असून ते हवाई धोक्यांपासून भारतीय नौदलाच्या जहाजांची संरक्षण क्षमता आणखी वाढवेल, असे ते म्हणाले.

नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी ,व्हीएल-एसआरएसएएमच्या यशस्वी प्रक्षेपण  चाचणीबद्दल भारतीय नौदल आणि डीआरडीओची प्रशंसा केली  आहे आणि ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली  विकसित केल्यामुळे  भारतीय नौदलाची संरक्षणात्मक क्षमता आणखी बळकट होईल, असे त्यांनी  सांगितले.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे  अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी यशस्वी प्रक्षेपण चाचणीत सहभागी चमूची प्रशंसा केली. या चाचणीने भारतीय नौदलाच्या जहाजांवर स्वदेशी शस्त्र प्रणालीचे एकीकरण   सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. हे भारतीय नौदलाचे बळ अधिकाधिक वाढवणारे ठरेल आणि पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड ठरेल, असे ते म्हणाले.

जगात क्रीडा क्षेत्रातील अव्वल 10 देशांमध्ये भारताला  स्थान मिळवून देण्यासाठी  ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया – अनुराग ठाकूर

0

केवडिया -केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी क्रीडा परिसंस्था बळकट  करण्यासाठी आणि भारताला क्रीडा क्षेत्रातील जगातील अव्वल  10 देशांमध्ये  स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रित दृष्टिकोन बाळगण्याचे  आवाहन केले.

गुजरातमधील केवडिया येथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठाकूर म्हणाले, “राज्य आणि केंद्र सरकारने  ‘टीम इंडिया’च्या भावनेने एकत्रितपणे धोरणे आखणी, पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच कार्यक्रम  आणि स्पर्धांचे आयोजन केले तर खेळ आणि खेळाडूंची प्रगती होईल. म्हणूनच राज्याच्या सीमांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय परिषदेला  उपस्थित असलेल्या राज्यांच्या  क्रीडा मंत्र्यांना  आणि अधिकाऱ्यांना ही परिषद  ज्ञानाचे आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणून पाहण्याचे आवाहन केले आणि देशातील क्रीडा परिसंस्थेला बळकट करण्यासाठी सामायिक  दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी प्रत्येक राज्याच्या सर्वोत्तम पद्धती सर्वांसमोर मांडण्याचे  आवाहन केले. “खेळांचा विकास  करण्याचा प्रयत्न करताना सर्व राज्यांना अनेक समान अडचणींना सामोरे जावे लागते आणि चर्चेद्वारे काही सामाईक उपाय  शोधले जाऊ शकतात.” असे ते म्हणाले.

ते म्हणाले की खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा आयोजित करण्याच्या व्यवहार्यतेवर चर्चा  करून खेलो इंडिया स्पर्धेचा विस्तार करण्यावर परिषदेत  विचारविमर्श केला जाईल.आर्चरी लीग, हॉकी लीगच्या  धर्तीवर खेलो इंडिया लीग स्पर्धेचा इतर  अनेक खेळांपर्यंत विस्तार करण्याचाही प्रस्ताव आहे.  जास्तीत जास्त स्पर्धा आयोजित केल्या तर खेळाडूंना त्यांची गुणवत्ता दाखवण्याची आणि आणखी प्रगती करण्याची संधी मिळेल.” असे ते म्हणाले.

खेलो इंडिया योजनेचे इतर विविध पैलू उदा.- खेळाच्या मैदानांचे जिओ-टॅगिंग, राज्यांमधील प्रशिक्षण केंद्रे/अकादमी, क्रीडा स्पर्धांमधून  प्रतिभावान खेळाडू  निवडणे  आणि विकास, महिला, दिव्यांग , आदिवासी आणि ग्रामीण भागात खेळांना प्रोत्साहन , स्वदेशी खेळ आणि त्यांचे महत्त्व, डोपिंगविरोधी शिक्षण आणि जनजागृत , क्रीडा सहाय्यक व्यावसायिकांसाठी परिसंस्था  तयार करणे यासह इतर मुद्द्यांवर  परिषदेदरम्यान चर्चा केली जाणार आहे.

गुजरातचे क्रीडा मंत्री हर्ष संघवी यांनी आपल्या प्रारंभिक  भाषणात सांगितले की, “येथे उपस्थित असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकजण एका विशिष्ट राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे आला आहे. आपल्या वेगवेगळ्या समस्या आणि वेगळे सामर्थ्य असू शकते, परंतु मला विश्वास  आहे की परिषद संपल्यावर आपण एक टीम ‘टीम इंडिया’ म्हणून काम करायला सज्ज  असू.”

15 राज्यांचे युवा कार्य आणि क्रीडा मंत्री, क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी, आणि केंद्र  सरकारचे युवा व्यवहार सचिव संजय कुमार आणि 33  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत.