Home Blog Page 1622

तरुणींमध्ये आदित्य ठाकरेंची क्रेझ ,आदित्य दिसताच पडला त्याच्याभोवती गराडा

0

पुणे-आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला आहे. अनेकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमलेल्या तरुणी ‘आदित्य आदित्य’ म्हणत जल्लोष करत आहेत. दरम्यान, आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी , विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नीलम ताई, चंद्रकांत दादा, दादा भेटले, राजकारण विषयी काही झाले नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

 पुण्यात आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने

0

पुणे -विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते एकत्र येताना दिसत आहे. असंच काहीसं चित्र पुण्यात आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने आल्यानंतर पहायला मिळालं.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे पुण्यात असून त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेत आरती केली. दुसरीकडे भाजपा नेते चंद्रकांत पाटीलदेखील पुण्यात असून यावेळी त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.दरम्यान पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार होती तेव्हा आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. यावेळी चंद्रकांत पाटील तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत पालखीजवळ आले असता, चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आधी दर्शन घेऊन येण्यास सांगितलं.आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली. दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकमेकांशी बोलतानाही दिसले.

पुण्यात मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात

0

पुणे-पुण्यात मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नाशिक ढोल, बाप्पांचा जयघोष आणि डिजेच्या तालावर थिरकणारी भक्तांच्या पावलाने अवघा रंग एक झाला, असे चित्र आहे.सकाळी दहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणूक सुरू झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.नारायण पेठेतील भोलेनाथ मित्र मंडळाच्या गणाधीशाची आरती राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी केली माजी उपमहापौर दीपक मानकर आणि कार्यकर्त्यांनी यावेळी अजित पवार यांचे स्वागत केले.

कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मनाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमद्धे नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बॅंड, कामायणी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके आहेत. रमणबाग, रुद्र गर्जना, आणि कलावंत ही तीन ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली आहेत. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली गणरायची मूर्ती हे वैशिष्ट्य आहे.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

श्री तांबडी जोगेश्वरी या मनाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारा वादानाचा गाडा आणि न्यू गंधर्व बॅंड पथक आहे. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल तशा पथके तसेच विष्णू नाद हे शंख वादकांचे पथक, पारंपरिक पेहेरवतील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीत आहेत.

गुरुजी तालिम मंडळ

मनाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्ति रथातून निघाली आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल राखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा वादानाचा गाडा आहे.

तुळशी बाग मंडळ

फुलांच्या आकर्षक सजवटीने साकारलेल्या श्री गाजमुख रथामद्धे तुळशी बाग मंडल या मनाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे. लोणकर बंधुचा सनई आणि नगारा वादन अग्रभागी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ त्या मागे आहे.

केसरी वाडा गणपती

मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बीडवे बंधू यांचा नगारा वादानाचा गाडा आहे. फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथामद्धे गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी रविवारी राष्ट्रवादीचे ब्लु प्रिंट सह अधिवेशन

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे रविवारी (ता. ११) होणार आहे. विरोधी ऐक्यासाठी दिल्लीत सुरू झालेले भेटीगाठींचे सत्र पाहता या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपला धक्का देण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीची ब्लू प्रिंट मांडण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मनोमिलन करण्यासाठी संयुक्त कार्यक्रम हे पाटना, कोलकाता तसेच मुंबई येथे घेतले जावेत, अशी सूचनाही राष्ट्रवादीमधून पुढे आल्याचे कळते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन तालकटोरा स्टेडियममध्ये रविवारी (ता. ११) होणार आहे. या अधिवेशनात राजकीय त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक, कृषी विषयक, महिला सक्षमीकरण, परराष्ट्र संबंध यावरील ठरावही संमत केले जाणार असले तरी त्यात विरोधी पक्षांच्या एकजुटीची आवश्यकता आणि रुपरेषेची मांडणी महत्त्वाची असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी, शनिवारी (ता. १०) पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होणार असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

विरोधी ऐक्यासाठी किमान समान कार्यक्रमाचे सूतोवाच शरद पवार यांनी अलीकडेच केले होते. त्यापार्श्वभूमीवर सूत्रांनी सांगितले, की राजकीय विचारसरणीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समानता आहे. जेडीयू, सप यांच्यात आणि काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद नाहीत. माकप सरचिटणीस सीताराम येचुरी ऐक्याबाबत व्यवहार्य भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तेलंगण राष्ट्र समिती पक्षही काँग्रेसशी तडजोडीच्या मनस्थितीत आहे. परंतु ‘आप’, तृणमूल यांचे काँग्रेसशी मतभेद आहेत. ओडिशामध्ये भाजपला शिरकाव करू देणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री नवीन पटनाईकांना भाजपशी थेट संघर्ष नको आहे. त्यामुळे हा सर्व विरोधाभास बाजूला ठेवून सर्वांना एकत्र आणण्यासाठी किमान समान कार्यक्रम आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटल्याचे या सूत्रांनी सांगितले.

मोदी सरकारची पोलखोल पुस्तिका !

पंतप्रधान मोदींच्या घोषणा आणि त्यांच्या अंमलबजावणीची नेमकी वस्तुस्थिती यातील विरोधाभास मांडणारी पुस्तिका या अधिवेशनात प्रसिद्ध करून सरकारला घेरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला २०२२ पर्यंत ब्रॉडबॅन्ड सेवेने जोडणे, प्रत्येकाला शौचालय देण्याची घोषणा, २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याची योजना यासारख्या सरकारच्या घोषणा, माहिती आणि संसदेतील उत्तरे या आधारे सरकारची पोलखोल केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

नदीच्या पात्रात उतरू नका-

0

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात पाऊस परतला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री उशीराने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. हवामान विभागाने जिल्ह्याला मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा दिला आहे.खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ८५६ क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री. १२:०० वा. १,७१२ क्यूसेक्स करण्यात येत आहे. असेखडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प सहाय्यक अभियंता, श्रेणी १-यो.स.भंडलकर यांनी कळविले आहे..नदी पात्रात जनावरे,वाहने असल्यास ती तात्काळ हलविण्यात यावीत असेही त्यांनी म्हटले आहे .

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून एकूण २९.०८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. चारही धरणांत पावसाला सुरूवात झाल्याने खडकवासला धरण रात्री १०० टक्के भरले. त्यामुळे रात्री ११ वाजता ४२८ क्युसेक वेगाने धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले.तो नंतर वाढवूनवाढवून रात्री. १२:०० वा. १,७१२ क्यूसेक्स करण्यात आला पावसाचे प्रमाण पाहून धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले होते. मात्र, धरणांच्या परिसरात पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी या धरणातून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांसह नदीतही श्रींचे विसर्जन करता येणार आहे.



विसर्जन मिरवणुकीस विलंब होऊ नये याची दक्षता घ्या-पोलीस आयुक्त

0

पुणे – पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक विलंब न होता वेळेत संपविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न नक्की असेल.विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्त वेळ खंड पडू नये किंवा रेंगाळू नये याकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी सांगितले. तसेच स्पीकरबाबत, आवाजाच्या मर्यादेच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्‍यक आहे, नागरीकांची तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.मिरवणुक सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 8000 पोलीस कर्मचारी, 1200 CCT, SRPF आणि होमगार्डच्या अतिरिक्त कंपन्यांसह स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.

विसर्जन मिरवणुक सोहळ्यातील बंदोबस्ताची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरीक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा उपस्थित होते. कोरोनामुळे विसर्जन मिरवणुक झाली नव्हती. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला. अनंत चतुर्दशी दिवशी (ता. 9) शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रथेप्रमाणे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

गुप्ता म्हणाले, ‘विसर्जन मिरवणूकीत रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन मंडळांनी करावे. उच्चक्षमतेचे स्पीकर किंवा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास आणि नागरीकांनी तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दागिने, मोबाइल हिसकावणे, छेड काढणे असे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत.

मेट्रोच्या पुलामुळे देखाव्यांची उंची मोजली जाणार

खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलामुळे मिरवणुकीतील देखाव्यांची उंची फुटांपेक्षा कमी असावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुवारी ( सप्टेंबर) मध्यरात्रीपासून विसर्जन मिरवणूकीत मंडळाचे रथ विसर्जन मार्गावर दाखल होतात. देखाव्यांची उंची पोलिसांकडून मोजण्यात येणार आहे. त्यामुळे खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलाच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी नमूद केले.

असा असेल मुख्य मिरवणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त

– अतिरीक्त पोलिस आयुक्‍त – 4

– पोलिस उपायुक्त – 10

– सहाय्यक पोलिस आयुक्त – 21

– वरिष्ठ पोलिस निरीक्षक – 55

– पोलिस उपनिरिक्षक/सहाय्यक पोलिस निरीक्षक – 379

– पोलिस कर्मचारी – 4 हजार 579

बंदोबस्तासाठी बाहेरुन बोलाविण्यात आलेले अधिकारी कर्मचारी

– सहाय्यक पोलिस आयुक्‍त – 4

– वरिष्ठ पोलिस निरीक्षक – 10

– सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक – 50

– पोलिस कर्मचारी – 250

– एसआरपीएफ कंपन्या – 02

– गृहरक्षक दल – 259

अनंत चतुर्दशी दिवशी (ता.9) गणेश विसर्जन होणारी मंडळे/घरगुती गणपती

– सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे – 2 हजार 969

– घरगुती गणपती – 2 लाख 22 हजार 977

आत्तापर्यंत झालेले गणेश विसर्जन सद्यस्थिती

– 1 ते 7 सप्टेंबर पर्यंत गणेश विसर्जन झालेली सार्वजनिक मंडळे – 333

– 1 ते 7 सप्टेंबर पर्यंत विसर्जन झालेले घरगुती गणपती – दोन लाख 4 हजार 653

विसर्जन मिरणुकीतील पोलिस बंदोबस्ताची वैशिष्ट्ये

– विसर्जन मिरवणुकीचे पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण

– विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

– गर्दीच्या ठिकाणी वृद्ध, महिला, बालकांवर विशेष लक्ष

– चोरी, छेडछाड टाळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रीय

– विसर्जन मार्गावर नागरिकांसाठी मदत केंद्र

इथे साधा संपर्क

– संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तु आढळल्यास त्वरीत संपर्क साधा – 112 ( पोलिस नियंत्रण कक्ष)

– अग्निशामक दल – 101

यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार असून, शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास विक्रम कुमार पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. शहरातील सगळ्या घाटांवर सुरक्षेसाठी लाईफ गार्ड उपस्थितीत असणार असून, घरगुती गणपती विसर्जनासाठी शहरात फिरते हौद असणार उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिरती शौचालयांची उभारणीदेखील करण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशी दिवशी (ता.9) गणेश विसर्जन होणारी मंडळे/घरगुती गणपतींच्या संख्येत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या 2 हजार 969 तर, घरगुती गणपती 2 लाख 22 हजार 977 इतके आहेत. आत्तापर्यंत 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन झालेली सार्वजनिक मंडळे – 333 असून, 1 ते 7 सप्टेंबरपर्यंत विसर्जन झालेले घरगुती गणपतींची संख्या दोन लाख 4 हजार 653 इतकी आहे.

पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा

0

मुंबई, दि. 8 : पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः पश्चिम कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते.  त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कालही ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडेदेखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘के आसिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’, ‘बनी’ सर्वोत्कृष्ट  तर ‘मोऱ्या’ कथा, अभिनय दिग्दर्शनासह अव्वल !

0

उत्तर प्रदेशमधील सहाव्या ‘के आसिफ – चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ २०२२ मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित-दिग्दर्शित ‘बनी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे दिग्दर्शित “मोऱ्या” या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट कथा, अभिनय आणि दिग्दर्शन अश्या महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

भारतातील ‘के आसिफ – चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ जाणकार रसिकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होत आहे. गेली सहा वर्षे हा महोत्सव उत्तर प्रदेशातील प्रख्यात लेखक दिग्दर्शक आणि निर्माते के. असिफ यांच्या नावे हा महोत्सव त्यांच्या जन्मभूमीत आयोजित करण्यात येतो. जगभरातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी यानिमित्ताने येथील दर्दी रसिकांसाठी पर्वणी ठरत आहे.

‘बनी’चा फर्स्टलूक ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये करण्यात आला, आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये ‘बनी’च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. ढाका येथील प्रसिद्ध ‘सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध ‘माद्रिद’ आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील ‘फोर्ट स्मिथ’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, पाकिस्तानातील ‘गंधार इंडिपेंडेंट’ चित्रपट महोत्सव, तसेच फरीझाबाद येथील ‘अयोध्या’ चित्रपट महोत्सवासाठी ‘बनी’ची निवड झाली आहे. बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे.

‘शहराचा रोज घाण होणारा चेहरा जीवावर उदार होऊन, कोणत्याही मुलभूत सोई – सुविधांविना आपलं आरोग्य पणाला लावून नरकयातना भोगत गल्ल्या-गटारांची साफसफाई करणाऱ्या सिताराम जेधे उर्फ ‘मोऱ्या’ची हृदयस्पर्शी कथा’ “मोऱ्या” या चित्रपटातून रेखाटण्यात आली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता अशी त्रिसूत्री सांभाळणाऱ्या जितेंद्र पुंडलिक बर्डे यांची ही पहिलीच कलाकृती असून ‘ढाका येथील ‘सिनेमेकिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’-(CIFF) सोबत, ‘लव्ह & होप आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ बार्सिलोना मध्ये निवडला गेला आहे. या चित्रपटाच्या टीझरचे प्रदर्शन ‘कान्स महोत्सवात’ करण्यात आले होते, तेव्हाच चित्रपटाचा टिझर पाहून अनेक चित्रपट रसिक – समीक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

भारतातील एका महान चित्रपट कलावंताच्या नावे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ असल्याने हे पुरस्कार आमच्याकरिता विशेष महत्वाचे असल्याचे ‘बनी’चे निर्माते शंकर धुरी आणि ‘मोऱ्या’चे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता जितेंद्र पुंडलिक बर्डे यांनी व्यक्त केले.

जल्लोषात लाँच झाला हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनीत ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर!

0

लेखक-दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर आज कलाकारांच्या हस्ते मुंबईतील विशेष कार्यक्रमात औपचारिकरीत्या लाँच करण्यात आला.

औपचारिक प्रक्षेपणाची तयारी करत ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी काल कलाकारांच्या चाहत्यांसाठी दुबईसह देशभरातील १० शहरांमध्ये एका विशेष प्रिव्ह्यूचे आयोजन केले होते. अशा प्रकारे चित्रपट प्रमोट करण्यासाठी पुढाकार घेत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामुळे एक दिवस अगोदरच या चित्रपटाचा जोरदार प्रचार होण्यास मदत झाली असून, टीझरच्या प्रचंड यशानंतर अपेक्षाही वाढल्या आहेत.

‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत असून, शहरी भागांसोबतच सोशल मीडियावर अविश्वसनीय प्रेम आणि कौतुक होत आहे. ‘विक्रम वेधा’मध्ये अनुक्रमे सैफ अली खान आणि हृतिक रोशन विक्रम आणि वेधा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. सैफ अली खान विक्रमच्या भूमिकेत एका सरळमार्गी शूटिंग पोलिसाच्या व्यक्तिरेखेत जीव ओतताना दिसणार आहे, तर वेधा नावाच्या गुंडाच्या भूमिकेत हृतिक रोशन आहे.

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना त्यांच्या ट्रेलरमधील परफॉर्मन्ससाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘विक्रम वेधा’ या अ‍ॅक्शन-थ्रीलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. ‘विक्रम वेधा’ची स्टोरी वेगवेगळ्या नाट्यमय वळणांनी भरलेली असून, एक कठोर पोलीस असलेला विक्रम (सैफ अली खान) खतरनाक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघाल्याचं पहायला मिळणार आहे. चोर-पोलिसांच्या या पाठशिवणीच्या खेळात वेधा प्रमुख कथाकाराच्या रूपात कथांच्या मालिकेद्वारे विक्रमला विचार प्रवृत्त करून नैतिक संदिग्धता सोडवण्यास मदत करतो.

‘विक्रम वेधा’ची प्रस्तुती गुलशन कुमार, टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने फ्रायडे फिल्मवर्क, जिओ स्टुडिओज आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, भूषण कुमार, एस. शशिकांत आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे.

‘महाराष्ट्राची सणयात्रा’ प्रेक्षक मंत्रमुग्ध

0

पुणे-महाराष्ट्रातील पारंपारिक सणांची महती आणि माहती दृकश्राव्य तसेच नृत्य व संगीत या द्वारे सादर करणारा विलोभनीय कार्यक्रम ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये, बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला. कालच्या संस्कारांना आजच्या तांत्रिक माध्यमाद्वारे उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचविणारी ही कलाकृती होती.

स्वरांश एंटरटेंमेंट निर्मित व प्रभा एंटरप्राइजेस संयोजित- महाराष्ट्रची सणयात्रा आपल्याला भगवान राम-कृष्ण, ज्ञानोबा-तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक कालखंडांची सैर करून त्या कालखंडाशी आणि परंपरेशी एकरूप करते. ही यात्रा निसर्गाचे महत्व सांगते तसेच स्त्रीपूजेचे. ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मराठी सणांवर आधारित सुमधुर गाणी, नेत्रदीपक नृत्य, माहितीपर संहिता, आणि ह्या सगळ्या धाग्याची एक सुरेल वीण असलेला नाट्यमय सूत्र-संचलन.

नूतन वर्षारंभ म्हणजे गुढी पाडव्यापासून सुरु होणारी ही यात्रा, पुढे रामनवमी, अक्षय्य तृतिया, मंगळागौर, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी, बुद्ध पौर्णिमा, शिवजयंती ते अगदी महिला दिन अशा व इतर अनेक सण-समारंभांना स्पर्श करत महाराष्ट्राचे नखशिखांत दर्शन घडवून आणते. गाण्यांना आणि सणांना अनुसरून केलेले पोशाख, कार्यक्रमाला साजेशी रंगमंच सजावट आपल्याला केवळ कार्यक्रमाच्या कालावधीपुरते नाही तर पुढे देखील त्या भावविश्वात रमवून ठेवते.

याची संकल्पना व दिग्दर्शन शैलेश लेले यांची असून, संहिता व सूत्र संचालन रवींद्र खरे यांनी केली आहे. याचे सर्जनशील दिग्दर्शन कौस्तुभ देशपांडे यांनी केले असून गायक प्रणाली काळे, हरिष वांगीकर, मोहित थत्ते, श्रुती देवस्थळी, केदार जोग, सिद्धिदा गोडबोले हे आहेत. ऋतुजा पवार, प्रसाद ओझरकर, सिद्धांत हिंगमिरे, गौरी देशपांडे यांनी नृत्य सादर करून कार्यक्रम अधिक दर्जेदार बनवला.

ध्वनी योजना प्रशांत उरुणकर यांची असून नेपथ्य उपेंद्र इंगळीकर, प्रकाश योजना: तेजस देवधर व शुभम परदेशी आणि प्रोजेक्शन गणेश धुमाळ यांची आहे.

‘इंद्रधनू’ रौप्य महोत्सव;२०० युवा कलाकारांचा सहभाग 

0

पुणे-युवा व नवोदित कलाकारांसाठी पुणे फेस्टीव्हलमध्ये दरवर्षी ‘इंद्रधनू’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बुधवार दि. ७ सप्टे. रोजी सायं. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे  येथे झालेल्या इंद्रधनू कार्यक्रम संपन्न झाला. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद यास मिळाला. यंदा या उपक्रमाचे २५वे वर्ष आहे. रवींद्र दुर्वे याचे संयोजन करीत आहे.

१६ ते 25  वर्षे वयोगटातील युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमात यंदा २०० हून अधिक युवा कलाकारांनी सहभाग घेतला. शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यामध्ये ; कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथकली, कुचीपुडी व ओडिसी नृत्य तसेच तबला, बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलीन, सतार, सरोद, कीबोर्ड वादन, सिंथेसायझर, गंधर्व गायन, नकला, एकपात्री  प्रयोग, पोवाडे, भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीते, सुगम संगीत, पाश्चिमात्य नृत्य अशा वैविध्यपूर्ण कला प्रकारांनी सारे भवन भारून गेले होते. प्रारंभी इंद्रधनू कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सर्वांचे स्वागत केले व युवा कलाकारांना शुभेचा दिल्या आणि कौतुक केले.

पुणे फेस्टिव्हलचे मुख्यप्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, सिस्का आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत. इंद्रधनूचे प्रयोजक मराठी बांधकाम व्यावसयिक संघटना व गेरा डेवलपमेंट प्रा.लि हे आहेत.

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’मध्ये तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावले. .

0

पुणे – ३४व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरूणांपासून चाळीशी ओलंडलेल्या महिला आणि पुरुषांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रासिकांना तृप्त केले. तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावून गेले.

पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ अशी हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धा  गेले ८ वर्षे भरविली जाते.यंदाचे ९वे वर्षे आहे. १५ ते ४० आणि ४१ व पुढील वयोगटातील महिला व पुरूष अशा ४ गटात ही स्पर्धा घेतली जाते. शनिवार दि. २७ ऑगस्ट व रविवार दि. २८ ऑगस्ट असे २ दिवस सकाळी १० पासून संध्याकाळी ७ पर्यंत कराओके ट्र्ँक्सवर या स्पर्धांची प्रथम फेरी हार्मनी स्टुडिओ, डेक्कन येथे घेतली गेली. यंदाच्या  वर्षी ४ ही वयोगटात मिळून १६० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यंदाचे वर्षी ही नेहमीप्रमाणे नगर, मुंबई, व बीड अशा ठिकाणांहून स्पर्धक आले होते.

 संगीत विशारद, पं. किरण परळीकर, डॉ. विद्याताई गोखले, संगीत विशारद सौ. सीमाताई येवलेकर व झी सारेगमपचा प्रथम विजेता व आजचा नामवंत गायक मंगेश बोरगांवकर अशा ४ शास्त्रीय संगीत विशारद व तसेच सुगम संगीतामधील तज्ञ परिक्षकांनी परिक्षण केले.

 सूर, ताल, प्रेक्षकांचा प्रतिसाद, व सादरीकरण अशा प्रमाणे विभागून गूण दिले गेले. १६० स्पर्धेकांमधून एकूण ३० स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. अंतीम फेरी दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये वाद्यवृदांसहित संपन्न झाली. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्पर्धेच्या अंतिम फेरीला प्रारंभ झाला. यावेळी या स्पर्धेच्या संयोजक अॅड. अनुराधा भारती, प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते व या स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक निलेश नवलाखा, हाँटेल राजेशाहीचे निलेश दमीष्टे, परीक्षक मंगेश बोरगावकर, पं. किरण परळीकर आणि अतुल गोंजारी उपस्थित होते.

प्रत्येक गटात पहिला, दुसरा व तिसरा अशी ३ व उत्तेजनार्थ ४ अशी एकूण १६ बक्षिसे देण्यात आली व  या १६ स्पर्धकांमधून सर्वोत्तम सादरीकरणासाठी ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’(महिला) व ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ (पुरुष) अशी २ विशेष बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते प्रसन्न केतकर हे उपस्थित होते. बक्षीस वितरण पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसन्न केतकर, अॅड. अनुराधा भारती यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमा अंतर्गत ‘स्वतंत्र थिएटरस’ तर्फे स्व. दिलीप कुमार यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्यावर चित्रीत असलेल्या गाण्यांच्या मेडलीवर डान्स सादर करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन अॅड. अनुराधा भारती व उमेद पाटील यांनी केले.

विजेत्यांची नावे

४० वयोगटाखाली महिला

प्रथम पारितोषिक – डाँ.अनघा गुमास्ते,

द्वितीय पारितोषिक – प्रणीती परबत,

तृतीय पारितोषिक – प्रतीक्षा डुडे,

उत्तेजनार्थ – सुझी मँथ्यू

४० वयोगटावरील महिला

प्रथम पारितोषिक-किशोरी तांबोळी

द्वितीय पारीतोषिक-रोशन शेख

तृतीय पारितोषिक-जिना शहा,

उत्तेजनार्थ-दुर्गा नगरकर

४० वयोगटाखालील पुरूष

प्रथम पारितोषिक- राहुल दुधवडे

द्वितीय पारितोषिक- अजिंक्य देशपांडे,

तृतीय पारितोषिक- अमेय तळणीकर

उत्तेजनार्थ- प्रतिक चोखंदरे

४० वयोगटावरील पुरूष

प्रथम पारितोषिक- डॉ. अजय नितुरकर,

द्वितीय पारितोषिक -प्रमोद शेजवलकर,

तृतीय पारितोषिक- विजय खापेकर

उत्तेजनार्थ- निरंजन मागीकर

सर्वोत्तम सादरीकरण

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’(महिला)- रोशन शेख

‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ (पुरुष)- राहुल दुधवडे

हसायचे कशासाठी ? हसायाचे निरामय आयुष्यासाठी…….

0

पुणे – सध्या ताणतणाव वाढत आहेत. आपल्यासाठी मोबाइल आला पण त्यानेही वाढवले फक्त टेन्शनच ! कोणाचा मोबाईल आला तरी टेन्शन अन   नाही आला तरी टेन्शन……नेटवर्कच नाहेचे. त्यात सोशल मिडिया नावाच्या एक नवा प्रकार लोकप्रिय झालाय पण त्यावरही आलेले अनेक संदेश टेन्शन वाढवण्यात भरच टाकत असतात. एकूण काय तर कितीही सोयी सुविधा असल्या तरी रोजच्या जीवनातले टेन्शन कमी होण्याऐवजी वाढतच आहे. हे टेन्शन कमी करण्याचा एकमेव अन बिना खर्चाचा एकमेव मार्ग म्हणजे हसणे…..हसणे हा जसा आनंद देणारा आहे तसाच तो मनाची मशगत करून आयुष्य निरामय करणार प्रकार आहे. हसणे ही केवळ एक प्रक्रिया नाही तर तो शास्त्रिय (सायन्टेफिक) प्रकार आहे, अशा शब्दात रोजच्या जीवनात हसण्याचे महत्व आज

 ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये हयासदान फाऊंडेशनने हास्योत्सव एकपात्रींचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. बालगंधर्व रंगमंदीरात झालेल्या या कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी कार्यक्रम आयोजित करणा-या मकरंद टिल्लू, मंजिरी धामणकर,  चैताली माजगावकर – भंडारी, दिलीप हल्याळ आणि महेंद्र गणपुले या हास्यवीरांचा सन्मान केला आणि कार्यक्रमाचा आनंदही घेतला. यावेळी फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्यसंयोजक डॉ. सतीश देसाई, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे. यावेळी उपस्थित होते. बाहेर जोरात पाऊस कोसळत असतानाही बालगंधर्व रंगमंदीरात हास्यप्रेमीनी गर्दी करून हास्याची कारंजी उडवली.

कार्यक्रमासाठी कलमाडींची एन्ट्री झाल्यावर सर्व कलाकारांनी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचे विविध हास्य प्रकारांनी स्वागत केले. पुणे फेस्टिव्हमध्ये सतरा वर्षापूर्वी कलमाडी यांनी एकपात्री कलाकारांना संधी दिल्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व एकपात्री कलाकार एकत्र आले आहे असे नमूद केले. कार्यक्रम सादर करणारी चैताली माजगावकर – भंडारी हीने पुणे फेस्टिव्हलमध्ये झालेली पहिली हास्यकलाकार स्पर्धा जिंकल्यानंतर तिने एकपात्री कलाकार म्हणून करीयर करण्याचा निर्णय घेतला अशी महिती मोहन टिल्लू यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरूवात मकरंद टिल्लू यांनी पापड असो की माणसं पावसळ्यात कोमजतातच, पण कार्यक्रमाला गर्दी महत्वाची नसते तर दर्दी महत्वाचे असतात असे सांगून पहिलीच टाळी घेतली, हसणे हा केवळ एक प्रकार नाही तर हसणे हा शास्त्रशुद्ध (सायन्टेफिक) प्रकार असल्याचे सांगितले. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचलनाची सूत्रे घेतानाच ‘तुम्हारे घर कि शान न जाती की रूदबा कम हो जाता, जो गुस्से कहाँ तुमने वो हसके कह जाता.’असा शेर ऐकवत सुरूवात केली. हास्य ही फक्त माणसालच मिळालेली दैवी देणगी असल्याचे स्पष्ट करताना प्राण्यांना कधी हसताना बघितले का ? जर प्राणीही हसू शकले असते तर…? असा मिश्किल प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी काही किस्से सांगितले.

आपल्या सनी बरोबर चैताली माजगावकर हिने थेट प्रक्षागृहातून एन्ट्री केली. तिने रामदास पाध्येंसारखी शब्दभ्रम ही कला अवगत केली आहे. सनी सोबत तिने गप्पा मारल्या अन सर्वांनाच पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची आठवण झाली. त्यात तिने सनीच्या तोंडी घातलेले बीपी म्हणजे काय ? बी पी म्हणजे बावळटपणा अन सीए म्हणजे कम्प्लिट आराम या कोट्यांनी हसण्याचे फवारे वाढायला लागले. यानंतर फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मदर टेरेसा, नरेंद्र मोदी, अमिताबबच्चन, दिलीपकुमार, हेमामालिनी ते ललिता पवार यांच्यापर्यंत अनेकांचे त्यांनी घेतलेले अनुभव सांगून आपण अशा माणसांकडून काय शिकायचे अन कसे शिकायचे हे नमूद केले.

दिलीप हल्याळ यांनी करोनाचा चॅप्टर सर्वांनी विसरून जावा यासाठी आपण बंपर लाफ्टर घेऊन आलो आहे असे सांगून पहिल्या वाक्यापासून रसिकांची दाद मिळवली. अनेक विनोद रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला घडत असतात. ते कसे टिपायचे याचे रोजच्या जीवनातील अनेक दाखले त्यांनी दिले. एक ज्येष्ठ नागरीकांचा मोबाईल फोनबद्दलचा अनुभव कथन केला. वय वाढले की म्हतारपण येतेच पण त्यांना म्हतारे म्हणू नका कारण ते महा…तारे असतात असा संदेश देत एखादे मूल दत्तक घेण्याऐवजी आजीआजोबांना दत्तक घ्या असे सांगून सर्वांनाच एका वास्तव्याची जाणिव करून दिली. हिंदी चित्रपटातील गाणी कशी आणि किती निरर्थक असतात याचे अनेक दाखले महेंद्र गणपुले यांनी दिले. तसेच विविध प्रकारचे तोंडाने आवाज काढून दाखवले.

याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण केल्याचा आरोप करत शिवसेना -राष्ट्रवादी- कॉंग्रेस वर राजकीय हल्ले सुरु .. ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब म्हणाले सुशोभिकरण वृत्त चुकीचे …

0

मुंबई- मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभिकरण केल्याचा वाद सुरू करत आता शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वर आज राजकीय हल्ले सुरु झाले. राजकीय वर्तुळातून या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राम कदम जे शिवसेनेचे ठाकरे कुटुंबाचे कधी काळी जवळचे होते त्यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे , शरद पवार आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करणारे ट्वीट करत या तथाकथित कबरीचे फोटो शेअर केले आहेत .एवढेच नव्हे तर दिवसभर आज त्यांनी या विषयाकडे लोकांचे लक्ष वळविले आहे त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्वीत मध्ये या सेनेला नाव सुचवा म्हणत 5 ऑप्शन हि दिले आहेत . 1) पेंग्विन सेना 2) याकूब बचाव सेना 3} हफ़्ता वसूली सेना 4) मुंबई लुटारू सेना 5) पनौती सेना असे हे ऑप्शन दिले आहेत .

एकीकडे भाजपाकडून यासंदर्भात शिवसेनेवर आरोप केले जात असताना शिवसेनेकडून २०१५मध्येच भाजपा सरकारच्या काळात ती कबर का बांधली गेली? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असताना आता मेमनची कबर असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनीच यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुशोभिकरणाचा दावा फेटाळून लावला आहे.

याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदम यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. यानंतर कबरीवर लावलेले लाईट्स काढण्यात आले. त्यासंदर्भात भाजपाने केलेल्या आरोपांना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
आदित्य ठाकरेंचा प्रतिप्रश्न
. “ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केलं? दफन केलं गेलं तेव्हा सरकार कोणाचं होतं?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. तसेच, “आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं आहे.” अशा शब्दांत त्यांनी सुनावलं आहे.“राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते. आज जे आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचं हे योग्य नाही.”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, “सत्य परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे. जेव्हा त्याचं दफन झालं तेव्हा मोठी सुरक्षा दिली होती, खूप गर्दी करून दफन करणयात आलं. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केलं तसं का नाही केलं? ते कब्रास्थान खासगी आहे. दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं नक्की? ही ट्रस्ट प्रायव्हेट आहे हे त्यांना माहित नाही का?” असे सवालही आदित्य ठाकरे यांनी केले.“निवडणुक जवळ आल्या आहेत असे विषय पुढे येतायत. औरंगाबादवरून देखील असे विषय पुढे येत होते शेवटी माध्यमातून सत्य समोर आलं. आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणं गरजेचं असत. बोलायला काहीही बोलू शकतात. २०१५ मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा आमचं किती ऐकलं जात होतं.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सुशोभिकरणाचं वृत्त चुकीचं?
दरम्यान, या सर्व वादावर ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या बातमीत कोणतंही तथ्य नाही की याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावण्यात आले. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं”, असं ते म्हणाले.

व्हायरल व्हिडीओ जुना?
“लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात, तो ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या मोठ्या कब्रिस्तानातच नाही, तर सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे”, असं स्पष्टीकरण खातिब यांनी दिलं.“याकूब मेमनविषयी आम्हाला कोणत्याही सद्भावना नाहीत. त्याने देशाचं फार मोठं नुकसान केलं होतं. आम्ही त्याच्या कबरीसाठी या सगळ्या सुविधा का देऊ? याकूब मेमनच्या कबरीव्यतिरिक्त तिथे इतर १७ कबरीदेखील आहेत. तुम्ही जाऊन पाहा. तिथे काळ्या रंगाचं मार्बल होतं. ५-७ वर्षांपूर्वी तिथे नुकसान झालं होतं. कबरीतली माती बाहेर येत होती. त्यामुळे त्यांच्या काही दूरच्या नातेवाईकांनी अर्ज दाखल केला आणि तिथे दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली”, असा दावा खातिब यांनी केला आहे.कबरीच्या बाजूला लाईट का लावले?
दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीवर लाईट का लावण्यात आले? असा प्रश्न विचारला असता खातिब यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिलं आहे. “रात्रीच्या वेळी जेव्हा प्रेतयात्रा येते, तेव्हा त्या भागात मृताचे नातेवाईक गोळा होतात. तिथे अंधार असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या भागात लाईट लावण्यात आले होते. याकूब मेमनच्या कबरीसाठी नाही. पण त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आम्ही त्या लाईट काढून टाकल्या”, असं खातिब म्हणाले.

ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या ओपीडीचे उद्घाटन

0

पुणे, दि. 8 – जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ब्रिजलाल जिंदाल कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटन भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगींवार यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले.
डीईएसच्या परिषद आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस अधीक्षक तुषार दोशी, डीईएसचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. शरद आगरखेडकर, प्राचार्या स्नेहल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांधेदुखी, हाडांची दुखणी, श्वसनाचे विकार, मेंदूचे विकार, लहान मुलांचे आजार आणि सर्वसाधारण शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारे फिजिओथेरपीचे अद्ययावत उपचार याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. समाजातील सर्व आर्थिक स्तरातील रुग्णांना परवडतील असे किफायतशीर दर आकारण्यात येणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 7 ही ओपीडीची वेळ आहे.

आरोग्याची देखभाल मोठ्या रुग्णालयांच्या आवाक्याबाहेर जात असताना, अशा प्रकारच्या बाह्यरुग्ण विभागांची उपयुक्तता अधिक आहे. आरोग्याबाबत लहान मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. असे मत डॉ. बंगींवार यांनी व्यक्त केले. समाज माध्यमे आणि सायबर क्क्राइम या संदर्भात दोशी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कुंटे म्हणाले, ‘‘हे ओपीडी केंद्र समाजसेवेचे नवे दालन ठरेल. परंपरा आणि इतिहासाला सुसंगत अत्युत्तम गुणवत्तेचे, अधिकाधिक रोजगार निर्मिती करणारे आणि समाजसेवेची संधी देणारे शिक्षण देण्यासाठी डीईएस कटिबद्ध आहे.’’ हर्षदा सोनवणे यांनी सूत्रसंचालन आणि रेणुका नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.