Home Blog Page 1619

अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी भारतात रस्ते आणि महामार्ग प्रकल्पात गुंतवणूक करावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

0

मुंबई-भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्प, गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या खाणीसारखे आहेत, असं सांगत अधिकाधिक उद्योजकांनी त्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आहे. 19 व्या  भारत- अमेरिका आर्थिक परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. भारत-अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सने ही परिषद आयोजित केली आहे.  भारत आणि अमेरिका ही जगातील दोन मोठी लोकशाही राष्ट्रे असून दोघांमधील द्वीपक्षीय संबंध अतिशय मजबूत आहेत. दोन्ही देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र असून, आपण परस्परांच्या विकासासाठी बरेच योगदान देऊ शकतो. दोन्ही देशांनी वेळोवेळी अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक आघाडीवर, परस्पर विश्वास, आदर आणि सहकार्याचे प्रदर्शन केले आहे. यंदा ह्या परिषदेची संकल्पना, -“पुढच्या 25 वर्षांसाठीचा नवा अजेंडा” अशी असून, त्यातून,  आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठीचा एक आराखडा तयार केला जाणार आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

आपल्याला नव्या मार्गांची आखणी करतांना, काही चौकटी बाहेरचा विचार आणि नव्या सृजनशील उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे,असे ते म्हणाले. केंद्र सरकार राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्पाच्या माध्यमातून पायाभूत विकासात, 1.4 ट्रिलियन गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही देशभरात, 10,000 किमीचे 27 ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत, आणि त्यासाठी 5 लाख कोटी म्हणजे 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ह्या प्रकल्प गुंतवणुकीत, किरकोळ गुंतवणूकदारांनाही सहभागी होता यावं यासाठी आम्ही, इन्व्ही आयटी (InvIT) सारखे काही गुंतवणूक स्नेही, अभिनव  उपक्रम देखील राबवत आहोत. आम्ही आमच्या उत्पादनांची संरचना अशाप्रकारे करतो आहोत, जेणेकरुन, किरकोळ गुंतवणूकदारांना त्यातून चांगले परतावे मिळू शकतील, जे मुदतठेवीवरील व्याजदरांपेक्षा अधिक असतील, असेही गडकरी म्हणाले.

आज भारत, इलेक्ट्रिक वाहने, मग, त्या दुचाकी असोत, तीचाकी अथवा चारचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठ ठरला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी, सौर आणि पवन उर्जेवर आधारित चार्जिंग यंत्रणा उभरण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या संकल्पनेवर देखील आम्ही काम करत असून सौर ऊर्जेतून मिळणाऱ्या वीजेवर आधारित या महामार्गांवर ट्रक आणि बसेस सारख्या मोठ्या वाहनांचे  बॅटरी चार्जिंग देखील शक्य होईल, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली.

पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता – प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

0

लम्‍पी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता

मुंबई दि, १२: राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यातील शेतकरी / पशुपालकांकडील पशुधनाचा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झाल्यास अशा शेतकरी / पशुपालकास सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीमधून नुकसान भरपाई देण्यात यावी. याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात यावी. जिल्हा नियोजन समितीकडील सन २०२२ – २३ मधील उपलब्ध निधीमधून लम्पी नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री, मानधन व इतर अनुषंगीक बाबींवर खर्च करण्यासाठी प्रति जिल्हा रु. १ कोटींचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने उपलब्ध करुन द्यावा.

पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी एकूण ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत. तसेच पशुधन विकास अधिकारी, गट – अ ची २९३ रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस होऊन नियमित स्वरुपात भरेपर्यंत अथवा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीकरीता रु. ५० हजार प्रती माह मानधनावर बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत, असे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले.

राज्यात उद्यापासून कुष्ठ, क्षय रुग्ण शोध मोहीम

0

मुंबई दि. 12 : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज दिल्या. कुष्ठ आणि क्षय रोगांचे लवकर निदान होऊन लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठ रोग आणि क्षय रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या.

आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. आर. एस. आडकेकर, उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, अलर्ट इंडिया संस्थेचे डॉ. व्हिन्सेंट अँथोनी, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे डॉ. विवेक पै, महाराष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. रचना विश्वजीत, कुष्ठपीडित संघटना सचिव अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.

कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियानाबाबत

राज्यात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियान सुरू करण्यात येणार आहे.

याअंतर्गत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

राज्यातील सुमारे पावणे दोन कोटी घरांना भेटी पथकाद्वारे दिल्या जाणार आहेत.

यासाठी सुमारे 65 हजार पथके तयार करण्यात आली आहेत. येत्या चौदा दिवसात सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल.

ग्रामीण भागातील 20 तर शहरी भागातील 25 घरांना दररोज भेटी दिल्या जातील.

लवकर निदान व लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे

त्वचेवर फिकट, लालसर चट्टा येणे, त्वचेवर गाठी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, मनगटापासून हात आणि घोट्यापासून पाय लुळा पडणे, त्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणे, हात पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे.

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’

0

मुंबई, : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता पडू नये यासाठी स्थानिक पातळीवर समस्यांचा निपटारा व्हावा. नागरिकांना प्रशासनाकडून सुशासनाचा अनुभव यावा त्यांची कामे गतीने आणि पारदर्शकपणे व्हावीत यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नुकतीच सुशासन नियमावली समितीची बैठकही घेतली होती. त्याचबरोबर विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाचे काम अधिक गतिमान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.

१० सप्टेंबर पर्यंतच्या तक्रारींचा होणार निपटारा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होऊन सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी हा ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय झाला. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र,  विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर दि. १० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या १४ सेवांचा समावेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे,  प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या  लाभार्थ्योची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून),दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

निपटारा झालेल्या प्रकरणांचे प्रमाणपत्र घेणार

प्रलंबित प्रकरणांपैकी कितीचा निपटारा झाला आणि निपटारा न झालेल्या प्रकरणांविषयी सेवा पंधरवडा समाप्तीनंतर दि. ५ ऑक्टोबर रोजी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. सेवा पंधरवडयातील कामकाजाचा प्रगती अहवाल प्रमाणपत्रासह १० ऑक्टोबर पर्यंत शासनास सादर करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

0

मुंबई-राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर २०२२ मध्ये संपत आहे.  मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रीया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता या निवडणुका सप्टेंबर पूर्वी पार पडणार नसल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९१ ब व कलम ७५ ब मधील प्रशासक नियुक्तीचा महत्तम कालावधी हे परंतूक वगळणे आवश्यक आहे.  यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करणार

सर्वसमावेशक धोरण निश्चित

राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील.

अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. प्रकारची ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई प्रचलित धोरणानुसार शासनस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येते.

शासनाचे पुरग्रस्तांचे पुनर्वसन बाबतचे सदरचे धोरण निश्चित होऊन जवळपास 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असून सध्याची आर्थिक, भौतिक व सामाजिक परिस्थिती तसेच शासनाची प्रचलित धोरणे विचारात घेता, पुरामुळे तसेच इतरही नैसर्गिेक आपत्तींमुळे बाधित तसेच या प्रकारची नैसर्गिक व आपत्तीप्रणव असलेल्या गावाचे, वाडीचे,तांड्याचे तातडीने नवीन ठिकाणी स्थलांतरीत करुन पुनर्वसन करण्याकरीता सर्वसमावेशक असे धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.

अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या बाधित गावाचे, वाडीचे, तांड्याचे तसेच या प्रकारची नैसर्गिक आपत्ती  प्रणव असलेले गावाचे नवीन ठिकाणी स्थलांतरीत करुन पुनर्वसन करण्याकरीता त्या ग्रामीण भागातील पात्र लाभधारकांच्या पुनर्वसनाकरीताचे निकष, पुनर्वसित गावठाणामध्ये उपलब्ध करुन द्यावयाच्या नागरी सुविधा व त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करावी यासंदर्भात देखिल निर्णय घेण्यात आला.

विक्रीकरन्यायाधिकरणाच्याखंडपीठांना मुदतवाढ

विक्रीकर  न्यायाधिकरणाच्या  नव्याने  स्थापन करण्यात आलेल्या मुंबई, पुणे, नागपूर खंडपीठांना ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

तसेच मुंबईतील खंडपीठ पुणे येथे स्थलांतरीत करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.   या तीन खंडपीठांकरिता निर्माण करण्यात आलेल्या  एकूण ४१ नियमित व बाह्ययंत्रणेच्या १२ सेवा अशा एकूण ५३ पदांनाही मुदतवाढ देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.

मुंबई विक्रीकर कायदा व मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणासमोर प्रलंबित असलेली व नव्याने दाखल होणाऱ्या अपिल प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी न्यायाधिकरणाची ३ नवीन खंडपीठे मुंबई, पुणे व नागपूर येथे २ वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्याचा निर्णय १९ सप्टेंबर २०१७ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला होता.

यामुळे महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाकडे  प्रलंबित  प्रकरणे निकालात निघतील, तसेच थकीत कराची वसूली होऊन महसूली उत्पन्नात वाढ होणे अपेक्षीत आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या १ हजार ४९८ कोटी ६१ लाख रुपये खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हा प्रकल्प आदिवासी क्षेत्रात असून गोदावरील नदीच्या उपनद्यांवर आहे.  नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर सिंचन क्षेत्रास याचा लाभ होईल. यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील सिंचनाच्या पाण्याची तूट भरून निघेल.

सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा    मान्यता निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठी १६ नियमित व ४ पदे बाह्य यंत्रणेद्धारे अशा २० पदांना देखील मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण ९७ लाख ८६ हजार खर्च येणार आहे. बहुसंख्य पक्षकारांना ५ लाखांवरील दिवाणी दावे तसेच विवाह याचिका, लँड रेफरन्स ही प्रकरणे दाखल करण्यासाठी नाशिकच्या न्यायालयात जावे लागत असल्याने पक्षकारांची आणि वकीलांचे हाल होतात आणि पक्षकारांना न्याय मिळण्यास अडचणी निर्माण होतात म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे

संगणकीकरण करणार

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या नव्या योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यास आज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

एकंदर १२ हजार सहकारी संस्थांना याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या हिश्याची १५६ कोटी ५५ लाख रक्कम २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात उपलब्ध करून देण्यास आणि त्यासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ५१ कोटी ८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील.

नाबार्डच्या पुढाकाराने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.  तथापि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना संलग्न असलेल्या बहुतांश कृषी पतपुरवठा सहकारी संस्थामध्ये अद्यापही संगणक प्रणाली नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सभासदांना विविध प्रकारच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरेल.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे.

भारताचा आत्मा जागृत करण्याचे काम संतांनी केले-ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डाॅ.गो.बं.देगलूरकर

0

लोकमंथन २०२२ पूर्वरंग’ चे  आयोजन : ‘लोक में शक्ती आराधन’ नृत्य सादरीकरण

पुणे : भारताचा आत्मा मुळातच असा आहे की तो केवळ जागृत करण्याची गरज असते, ते काम संतांनी केले. समाजाला एकत्र बांधण्यासाठी महाराष्ट्रातून संत बाहेर पडले आणि देशातील विविध राज्यांमध्ये फिरले. समाजाचे संघटन करणे समाजात आपण एक आहोत, अशी जाणीव निर्माण करणे यासाठी वारीची निर्मिती झाली. असे मत ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.

संस्कार भारती पश्चिम प्रांत आणि प्रबोधन मंच यांच्यावतीने ‘लोकमंथन २०२२ पूर्वरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील बालशिक्षण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. नितीश भारद्वाज, कार्याध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, प्रबोधन मंचाचे संयोजक हरिभाऊ मिरासदार, सहसंयोजक  किशोर शशितल यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मुकुंद दातार यांचे पंढरपूरची वारी -संत साहित्यातील राष्ट्रीय भावना या विषयावर व्याख्यान झाले. तसेच संस्कार भारतीच्या माध्यमातून ‘लोक में शक्ती आराधन’ या विषयावरील नृत्यविष्कार सादर झाला.
डॉ.गो.बं. देगलूरकर म्हणाले, वारी करताना ती सजगपणे केली पाहिजे. समाजाला जागृत आणि एकत्रित ठेवण्यासाठी वारी आली. कोणत्याही संतांनी कर्म सोडून वारी करा असे म्हटले नाही, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुकुंद दातार म्हणाले, महाराष्ट्राचे साक्षात दर्शन म्हणजे वारी. मराठी लोक जीवनाचे, समूह जीवनाचे ते प्राण तत्व आहे. १५०० वर्षे ही परंपरा अखंडितपणे चालू असून जगाच्या इतिहासातील वारी हा एक चमत्कार आहे. कोणतीही लोक चळवळ इतकी वर्ष चालू राहिलेली आपल्याला दिसत नाही.

ते पुढे म्हणाले, राष्ट्र जगण्यासाठी संस्कृती टिकवावी लागते आणि संस्कृती टिकवण्यासाठी जनमानसात परमार्थ रुजवावा लागतो. वारकरी संप्रदाय ही जीवन निष्ठा आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सतीश कुलकर्णी म्हणाले, ‘लोकमंथन २०२२’ हा केंद्र शासनाच्या माध्यमातून दर तीन वर्षांनी घेतला जाणारा कार्यक्रम  ईशान्य भारतात गुवाहाटी मध्ये श्रीमद्शंकरदेव कलाक्षेत्र येथे आयोजित केला गेला आहे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या परिषदेत प्रबोधन मंचाच्या वतीने पंढरपूर च्या वारी विषयावर डॉ मुकुंद दातार यांचे व्याख्यान व संस्कार भारतीचे  वतीने 15 न्रुत्यांगनांची न्रुत्य प्रस्तुती देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या धर्तीवर ‘लोकमंथन पूर्व रंग २०२२’ चे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.

प्रास्ताविक विनायक गोगटे यांनी केले. त्यात त्यांनी लोकमंथन कार्यक्रमाचा उद्देश व या अगोदर झाले ल्या कार्यक्रमाचे व्रुत्त दिले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सतीश कुलकर्णी यांनी आभार मानले.

धर्मावर घाला घालणाऱ्यांना मुळासकट उखडून देण्याची धमक… सह्याद्रीच्या ‘नरसिंहाची शिवगर्जना’

0

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशीदीबद्दल न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने दिलेल्या निकालानंतर ज्ञानवापी मशीद पुन्हा चर्चेत आली आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातील टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदूद्वेष्टा, धर्मांध राजा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाने आपल्या अमानुष अत्याचाराने रयतेला घाबरून सोडले होते. या टीझरमध्ये औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील दमदार एंट्री पहायला मिळते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो..!” अशा कडक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सुनावले. सह्याद्रीच्या ‘नरसिंहाची ही शिवगर्जना’ प्रदर्शित झालेल्या शिवप्रताप गरुडझेपच्या या टीझर मधून पहायला मिळते आहे.

सर्वांच्या अंगावर काटा आणणारा हा टीझर असून औरंगजेबाचा कपटी अवतार आणि छत्रपती महाराजांचा धैर्यशील बाणा यात पहायला मिळतो आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर अभिनेते यतीन कार्येकर क्रुर मुघलशासक औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवार ५ ऑक्टोबरला शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय म्हणजे आग्रा भेट आणि औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून राजगडच्या दिशेने महाराजांनी केलेली कूच. १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. या संकटात महाराज किंचितही डगमगले नाहीत. रक्ताचा थेंबही न सांडता ते काही दिवसांनी आई जिजाऊंच्या चरणी सुखरूप राजगडावर पोचले

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते तर आहेत. रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे. गीतकार हृषिकेश परांजपे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार शशांक पोवार, रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत शशांक पोवार यांचे आहे. क्रिएटिव्ह कन्सल्टंट प्रशांत खेडेकर तर क्रिएटिव्ह सुपरवायझरची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर आहेत. साहसदृश्ये रवी दिवाण तर वेशभूषा मानसी अत्तरदे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे. रंगभूषा राहुल सुरते तर केशभूषा जयश्री नाईक यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन क्रिएटिंग पिक्चर्सचे आहे.

रायगडावर ताक विकणा-या ‘कमल’ ला पुणेकरांतर्फे  १ लाखाची शैक्षणिक मदत 

0

परदेशात शिक्षण घेऊन पुण्यात आलेल्या करण तावरे, रोहन काळे यांचा पुढाकार ; हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर जगदीश्वर मंदिराशेजारी धनगर पाडयावर राहणा-या व गडावर ताक विकणा-या कमल शिंदे या मुलीला शिक्षणासाठी पुणेकरांतर्फे १ लाख रुपयांची आर्थिक शैक्षणिक मदत देण्यात आली. शिक्षणाच्या माहेरघरापासून काही मैलांवर असलेल्या रायगडाच्या परिसरात ही मुलगी व तिचे कुटुंब रहात असून तिला शिक्षणाची खूप आवड आहे, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे तिला शिक्षणाकरिता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण घेऊन पुण्यात आलेल्या करण तावरे व रोहन काळे यांनी पुढाकार घेत ही आर्थिक मदत दिली आहे. 
गंज पेठेतील महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाडयाच्या प्रांगणात ही मदत देण्यात आली. यावेळी हवेलीच्या पहिल्या महिला तहसीलदार तृप्ती कोलते, करण तावरे, रोहन काळे, विराज तावरे, रायगडजवळील ग्रामस्थ मनोहर औकिरकर, संदीप ढवळे,संतोष शिंदे, रमेश औकिरकर आदी उपस्थित होते. एक लाख रुपयांचा धनादेश कमल शिंदे हिला सुपूर्द करण्यात आला. 
तृप्ती कोलते म्हणाल्या, महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना आजच्या स्त्रियांनी कितीही वंदन केले, तरी देखील त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड होणार नाही. त्यामुळे आपण ज्या मुली किंवा स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना मदत करण्यासाठी समाजामधून दातृत्व पुढे येण्याची गरज आहे. रायगडावर सेवा देणा-या कुटुंबातील मुलीला मदत देणे, हे देखील असेच दातृत्वाचे उदाहरण आहे. शिक्षणासाठी मुलींना जिथे जिथे झगडावे लागत असेल, तेथे आजच्या तरुणाईने पोहोचायला हवे. 
करण तावरे म्हणाले, प्रशासकीय सेवेतील महिलांकडे बघून अनेक मुली घडतील. त्यामुळे अशा महिलांचा आदर्श आताच्या मुलींसमोर हवा. जेथे जेथे शिक्षणासाठी आर्थिक, साहित्यरुपी गरज असेल, तेथे आम्ही ती पोहोचविण्याचा नक्की प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले. रोहन काळे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत अनेक मुली शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात महिलांनी स्वकर्तृत्वावर पुढे येण्याची गरज आहे. मात्र, मुलींची ही जडणघडण होत असताना शिक्षणाच्या वयात त्यांना आवश्यक ती मदत द्यायला हवी. कमल ला भविष्यात डॉक्टर होण्याची इच्छा असून तिला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.

वॉशरूमला गेलो, तरी नाराजीची चर्चा:अजित पवारांचे खडेबोल

0

मुंबई-

मी वॉशरूमला गेलो, तरी माझ्या नाराजीची चर्चा होते. मी वॉशरूमला जायचे नाही का, असे म्हणते विरोधी पक्षनेते अजित पवार यांंनी नाराजी नाट्यावर पडदा टाकला. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सभेला गर्दी जमवण्याची वेळ यावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी केली.

लंपी रोग ते नाराजी नाट्य, मुख्यमंत्र्यांची सभा या साऱ्यावर अजित पवारांनी आज विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

काय म्हणाले पवार?

अजित पवार म्हणाले की, “मी अधिवेशनादरम्यान वॉशरूमला गेलो होतो आणि इकडे अजित पवार उठून बाहेर गेल्याची चर्चा रंगू लागल्या. मला राजकारणात येऊन 31 वर्ष होत आली. मी राष्ट्रीय पातळीवर जातो, उपस्थित राहतो, पण मी मार्गदर्शन करत नाही. वेळेअभावी मला राष्ट्रीय अधिवेशनात बोलता आले नाही. मी नाराज नसून मला बोलण्यापासून कुणी अडवले नाही राज्यामध्ये कुठे सभा, अधिवेशन असेल तर नक्कीच बोलेल.

यामुळे बोलणे टाळले

राष्ट्रवादीचे दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच दिल्लीत पार पडले, त्यात अजित पवारांना बोलू न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती, त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नेत्यांनी आणि प्रांताध्यक्ष यांनी बोलणे अपेक्षित असते, त्यामुळे मी तिथे बोलणे टाळले. परंतु माध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. वास्तविक मला तिथे कोणी बोलू नका असे कोणीही सांगितले नाही. मीच माझी भूमिका घेतली. मी एकटाच बोललो नाही असे नाही, सुनिल तटकरे, वंदना चव्हाण यांच्यांसह अनेक जण तिथे बोलले नाही.” असे पवार म्हणाले.

लंपीबद्दल चिंता व्यक्त

पुढे लंपी स्किन जनावरांच्या आजाराबाबत माहिती देताना पवार म्हणाले की, “सध्या देशपातळीवर विशेषत: पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यात तसेच महाराष्ट्रामध्येही ‘लंपी स्किन डिसीस’ हा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा हा आजार असून, याची काळजी आपल्याला घेणे गरजेचे आहे. कारण इतर राज्यात अनेक जनावरे दगावली आहेत.”

अभ्यास सुरू

पुढे अजित पवार म्हणाले की, “ज्या जनावरांना लंपी आजार झाले त्याचे दूध पिल्यानंतर माणसाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? याचा अभ्यास सध्या सुरू आहे. म्हशीला हा आजार होत नाही, मात्र बैल, गायी तसेच वासरूंना हा आजार होतो, अशी माहिती आमच्याकडे आली” असल्याचेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांवर मोठा परिणाम

“देशपातळीवर या आजाराची लस सध्या दोनच कंपनी तयार करतात. त्यात एक कंपनी महाराष्ट्रात आणि दुसरी हैदराबादमध्ये आहे. मात्र, सध्या सर्व लसी केंद्राने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना महत्वाचा व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे आहे. कारण, दुधाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ होत आहे. जनावरे दगावली तर याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे.” असेही पवार यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

ओडिसात पहिल्यांदा नोंद

ऑगस्ट 2019 मध्ये भारतात पहिल्यांदा या आजाराची नोंद ओडिसा राज्यात झाली. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार मार्च 2020 मध्ये गडचिरोलीत झाला. मात्र, आता तो आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजाराचा मानवावर परिणाम होत नसल्याचेही पवार म्हणाले.

1 ऑक्टोंबरपासून गाळप सुरू

पुढे यंदाच्या साखर हंगामाबाबत माहिती देताना पवार म्हणाले की, 16 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे. त्यानंतर येत्या 1 ऑक्टोंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस तोडणी कामगार तोडणीसाठी बैलांचा वापर करतात आणि अशा वेळी जर हा आजार फोफावला तर याचा फटका साखर हंगामात देखील पाहायला मिळू शकते, त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

हे राज्याचे दुर्दैव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये जाहीर सभा होणार असून, त्यात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हे राज्यात पहिल्यांदा घडत आहे. आज अंगणवाडी सेविका सभेसाठी गेल्या मग त्या अंगणवाडीतील मुलांनी काय करायचे. गर्दी जमवण्याकरीता ही जर परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असले तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे फार गंभीरते सरकारने घेतले पाहिजे. ते कदाचित सांगतील की, कुणीतरी आदेश काढलेत. आम्ही पण सरकारमध्ये होतो, परवानगी शिवाय कोणीही परस्पर आदेश काढत नसल्याचेही पवार म्हणाले.

बीपीसीएलने जिंकला सप्लाय चेन लीडरशीप पुरस्कार

0

मुंबई१२ सप्टेंबर २०२२ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महारत्न पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि भारतातील दुसऱ्य क्रमांकाच्या सर्वात मोठ्या उर्जा पीएसयू कंपनीने ईएलएससीच्या (एक्सप्रेस, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन) चौदाव्या आवृत्तीत लीडरशीप पुरस्कार मिळवला आहे. कंपनीने एकाच प्लॅटफॉर्मवरून क्रुड ऑइल प्राप्ती आणि उत्पादन वितरणामध्ये मल्टी रिफायनरी पीआयएमएसचा (एमपीआयएमएस) समावेश असलेले क्रॉस फंक्शनल अलायन्स राबवल्याबद्दल बेस्ट इन क्लास क्रॉस फंक्शनल कोलॅबरेशन विभागात हा पुरस्कार मिळवला आहे.

ताज लँड्सएंडमुंबई येथे झालेल्या १४ व्या ईएलएससी लीडरशीप पुरस्कार सोहळ्यात टीम एससीओने हा पुरस्कार जिंकला.

याप्रसंगी आय/सीचे (एससीओ) मुख्य व्यवस्थापक श्री. आर. श्रीकुमार म्हणाले, ‘या पुरस्काराने बीपीसीएल टीमला अतिशय आनंद झाला आहे. ‘शांतपणे काम करा आणि आपल्या यशाचा आवाज होऊद्या’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. आम्ही स्वतंत्र प्राप्ती आणि वितरणाच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाण्याचा भविष्यवेधी मार्ग स्वीकारला व त्यासाठी जागतिक पातळीवर सर्वसमावेशक अस्पेनटेक मल्टी- रिफायनरी एम- पीआयएमएस मॉडेलचा (एमपीआयएमएस – मल्टी प्रोसेस इंडस्ट्री मॉडेलिंग सिस्टीम) योग्य वापर केला. एमपीआयएमएसद्वारे अमलबजावणी केल्यामुळे आम्हाला सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि उत्पादनाची मागणी व लॉजिस्टिक्ससह क्रुड खरेदीच्या योग्य ट्युनिंगसाठी पर्याय दर्शवणे शक्य झाले.’

सप्लाय टेन समिट ही लीडरशीपवर केंद्रित परिषद साखळी पुरवठा आणि प्राप्ती धोरण सुधारण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही परिषद विविध संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, बाजारपेठेच्या समीकरणांवर होणारा परिणाम लक्षात घेत एकत्र येण्यासाठी, सद्य व भविष्यकालीन पुरवठा साखळीशी संबंधित नवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी व ऑपरेशन्ल लीडर्स तयार करण्यासाठीचे व्यासपीठ ठरत आहे.

प्रत्येक रिफायनरीसाठी योग्य क्रुड मिक्स तयार करणे, पेट्रोलियम उत्पादनांचा अविरत पुरवठा होईल याची काळजी घेणे आणि रिफायनरीच्या आर्थिक गणितांचा वापर करणे ही सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन (एससीओ) टीमसाठी गुंतागुंतीची समस्या असते.

केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा:चंद्रकांतदादा पाटील

0

गणपती रंगवा स्पर्धेतील विजेत्या बालकलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

पुणे – पंतप्रधान

यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हा देशाचा आत्मा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

गणेशोत्सव काळात लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघात ‘गणपती रंगवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोथरुड मधील अनेक बाल मित्रांनी सहभाग घेतला. यातील उत्कृष्ट बालकलाकारांना शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शर्वरी जेमेनिस, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. वर्षाताई डहाळे‌, भाजपा कोथरुड मंडल सरचिटणीस आणि स्पर्धेच्या संयोजिका प्रा.अनुराधा येडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, स्पर्धेचे पर्यवेक्षक रमणबाग शाळेचे सुरेश वरगंटीवार, पत्रकार सचिन जोशी, मूर्तिकार योगेश मालुसरे, व्हिजन शाळेच्या कला शिक्षिका सौ. ज्योत्सना कुंटे, सौ.वैशाली बोडके, सौ.कन्याकुमारी आढाव,भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, पुणे शहर सरचिटणीस अभिजीत राऊत, कोथरुड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, शिवराम मेंगडे, मिताली सावळेकर, कल्याणी खर्डेकर, रामदास गावडे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, “आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुकुल शिक्षण पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व होते. या पद्धतीमुळे आपल्या मुलांना सर्व कलांचे शिक्षण मिळत होते. मात्र, ब्रिटिशांनी ही शिक्षण पद्धती मोडीत काढली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कौशल्याभिमुख शिक्षण देणारी ही शिक्षण पद्धत आणली असून, केंद्र सरकारचे हे नवं शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा आहे. ज्यामुळे आपल्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळण्यासह सर्वांगिण विकास होईल.”

ते पुढे म्हणाले की, “आज आपल्या पुणे शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत. जी आताच्या तरुण पिढीलाही माहिती नाहीत. त्यामुळे आगामी काळात ही सर्व ठिकाणे शोधून त्यांची नवीन पीढिला ओळख व्हावी, या उद्देशाने लहान मुलांसाठी ‘मामाच्या गावाला जाऊ या!’ नावाने छोटी सहल आयोजित केली जाईल. त्याचप्रमाणे आपली नवीन पीढि संस्कारक्षम घडवी या उद्देशाने मातृवर्गासाठी ‘आईच्या गोष्टी’ ही स्पर्धा आयोजित केली जाईल,” अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली.

सिनेअभिनेत्री शर्वरी जेमेनिस म्हणाल्या की, “श्री गणेश ही विद्येच्या देवतेसह ६४ कलांचा अधिपती आहे. प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार दडलेला असतो, आणि ही कलाच त्या माणसाला शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे आपल्यातील कला ओळखण्यासाठी एक व्यासपीठ मिळणं अतिशय महत्त्वाचे असतं. त्याची प्रतिमा लहान मुलांनी रंगवावी ही अतिशय अभिनव कल्पना आहे. दादांसारखे व्यक्तीमत्त्व असे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहेत, ही आपण सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाबत आहे.”

स्पर्धेच्या संयोजिका आणि शाहू कला क्रीडा अकादमीच्या अध्यक्षा प्रा.अनुराधा येडके यांनी स्पर्धेमागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राज तांबोळी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्विततेसाठी चंद्रकांत पवार, जितेंद्र खरे, शुभदा येडे, शिवाली गरुडकर, आत्मजा पाणेकर, प्रीती पोतदार, नाजनीन शेख, आरती मराठे, अथर्व गरुडकर, मयूर पुरोहित, आर्यन आधवडे, शाज तांबोळी, संस्कृती माझिरे, जुई मुजुमले इत्यादिंनी विशेष सहकार्य केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना पुरोहित हिने केले. तर बिना कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अखंडित संस्कृती हे भारताचे वैभव : डॉ. गो. बं. देगलूरकर

0

‘आर्यांचे आक्रमण :
अगा जे घडलेची नाही ! ‘ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे :

‘आर्यांचे आक्रमण :
अगा जे घडलेची नाही ! ‘ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार ,दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुण्यात झाले.विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या मराठी प्रकाशन विभागातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.मिशेल डॅनिनो या फ्रेंच-भारतीय लेखकाच्या पुस्तकाचा सुहासिनी देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे.

हा कार्यक्रम भारत इतिहास संशोधक मंडळात ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट,अनुवादक सुहासिनी देशपांडे, शैलेंद्र बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दीप्ती खरे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी बोलताना डॉ. गो. बं.देगलूरकर म्हणाले, ‘ आर्यावर अनेकांवर संशोधन केले आहे. भारताला इतिहासच नाही, असे पाश्चिमात्य विद्वान समजत असत. आपल्यात न्यूनगंड पसरविण्याचा प्रयत्न झाला.सरस्वती नदीच्या काठी प्रगत मानवी संस्कृती होती. ही सरस्वती संस्कृती आहे, असे आपण म्हटले पाहिजे.मिशेल डॅनिनो यांनी त्यांच्या लिखाणात या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. आपले वैभव आपल्या संस्कृतीत आहे.

भारतीय संस्कृती खंडीत झाली नाही. त्याबाबत आपण जागरूक असले पाहिजे. हिंदू धर्माचे मोठेपण स्वामी विवेकानंदांनी जगासमोर मांडले , हे अतुलनीय आहे.आर्य हा वंश नाहि,संस्कृती आहे. त्या दृष्टीने हा अनुवाद महत्वाचा आहे. शालेय अभ्यासक्रमात अवांतर वाचनासाठी हा अनुवाद लावला पाहिजे ‘.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रदीप रावत म्हणाले, ‘ आर्य भारतात बाहेरून आले, ही मांडणी मॅक्समुलरपासून सुरू झाली. इतिहास काळ सुरू झाल्यापासून भारतात जी संस्कृती आहे ,तिचे अस्तित्व महत्वाचे आहे. आर्य, अनार्य म्हणण्यापेक्षा भारतात जे आहेत, ते हिंदू आहेत, असेच म्हटले पाहिजे.वेदांपासून, सिंधू -सरस्वती ची उत्खनने हे पुरावे आहेत. आपल्याला प्राचीन वारसा मिळालेला आहे.

आपल्यात काही दोष होते, ते टाकून दिले आहेत.आज प्रबोधन युगात हिंदुंच्या पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू आहे. हिंदू समाज कात टाकत आहे, असेही रावत म्हणाले.

अभय बापट म्हणाले, ‘आर्य बाहेरून आलेले नाहीत.विद्रोही मंडळींच्या या संकल्पनेवर घाव संशोधकांनी घातलेले आहेत. आपण सर्व इथलेच आहोत, हीच समरसता आहे. विवेकानंदांना समरस,बलवान समाज अपेक्षित आहे .समाजात सर्वत्र यावर चर्चा झाली पाहिजे’.

सुधीर जोगळेकर यांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.

सुहासिनी देशपांडे म्हणाल्या, ‘मिशेल डॅनिनो यांची ही शोधयात्रा या पुस्तकाद्वारे मराठीत आली आहे.ज्यांना धर्मांतरण करायचे होते, त्यांनी आर्य हे बाहेरून आले, असा भ्रम केला. आर्य हे विशेषण आहे. आर्य विरुद्ध द्रविड हा वाद ब्रिटिशांनी सुरू केला.आपण बाहेरून आलेलो नाही, हे पुढील पिढयांना सांगण्याची गरज आहे

अजितदादांच्या नाराजीची दिल्लीच्या अधिवेशनात चर्चा …

0

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज दिल्लीत अधिवेशन पार पडले. त्यात अजित पवारांच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यामुळे अजितदादांचा पारा चढला आणि ते थेट व्यासपीठावरून उतरून निघून गेले. या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे तिथे उपस्थित सर्वचजण अवाक झाले.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना परतण्याची विनंती केली. पण त्यानंतरही ते व्यासपीठावर आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यानी एकच गदारोळ केला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सुप्रिया सुळे अजितदादांची समजूत काढण्यासाठी गेल्या. तोपर्यंत शरद पवारांचे समारोपाचे भाषण सुरू झाले. यामुळे अजित पवारांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही.

अजित पवार यांचा स्वभाव तडकाफडकी आहे. याचा अनुभव अनेकदा पक्षातील पदधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही येत असतो. अजित पवार राष्ट्रीय अधिवेशनातून दोनदा बाहेर पडल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले होते.

आजच्या अधिवेशनासाठी देशभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. हे अधिवेशन काही महाराष्ट्रापुरते नव्हते, राष्ट्रीय अधिवेशन असल्याने महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आपले मत मांडले. केरळमधील आणि लक्षद्वीप येथील खासदारांनी भाषण केले. राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे मी भाषणाबद्दल काही बोललो नाही, असे मत अजित पवार यांनी यानंतर व्यक्त केले.

शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित! ; आ.माधुरी मिसाळ

0

केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांचा बुधवारपासून तीन दिवस दौरा

पिंपरी । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा उमेदवार निवडणून येणार, असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरुर लोकसभा मतदार संघात तीन दिवस दौरा करणार आहेत. दि.१४, १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ असे तीन दिवस संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत. त्या प्रवास योजनेची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार मिसाळ बोलत होत्या.
यावेळी संयोजक श्री. ॲड. धर्मेंद्रजी खांडरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पिं. चिं.शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार मिसाळ म्हणाल्या की, शिरुर, बारामती, शिर्डी अशा तीन मतदार संघाचे क्लस्टर केले असून, त्याची जबाबदारी रवि अनासपुरे व सुनील कर्जतकर यांच्याकडे आहे. हडपसर, आंबेगाव, मंचर, जुन्नर , शिरुर आणि भोसरी विधानसभा मतदार संघनिहाय केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे.
भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देशातील १४४ लोकसभा मतदार संघांची यादी केली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ मतदार संघांचा समावेश आहे. या सर्व मतदार संघांमध्ये भाजपा विजयश्री खेचून आणण्याच्या दृष्टीने पुढील अडीच वर्षांचे नियोजन केले आहे. मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये प्रवास योजनेची कमिटी नियुक्ती केली आहे. प्रभारी, संयोजक, सोशल मीडिया, कल्याणकारी योजना आदी विविध स्तरांवर समितीच्या नियुक्ती केल्या आहेत.
प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा…
संघटनात्मक बांधणीमुळेच भाजपाने यशस्वी वाटचाल ठेवली आहे. आगामी दीड वर्षांत शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नदी सुधार प्रकल्प, पुणे-नाशिक महामार्ग, रेड झोन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग आदी विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार मिसाळ यांनी म्हटले आहे.
असा असेल दौरा
केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंग यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात संघटनात्मक आणि सार्वजनिक असे एकूण २१ कार्यक्रम होणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवाद, लाभार्थींची चर्चा, भाजपा परिवारातील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद, हुतात्मे- महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील लोकांशी संवाद, तीर्थक्षेत्र भीमाशंकर भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक, महामार्ग समस्या पाहणी आदी कार्यक्रम नियोजित केले आहेत.

विश्वशांती, दहशतवाद मुक्तीसाठी शिवभक्तांकडून वैश्विक महारुद्राभिषेक

0

पुणे : हर हर महादेवचा जयघोष… रुद्र मंत्रपठण… शिवभक्तीचा जागर अशा भक्तिमय वातावरणात जगभरातील एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी ऑनलाईन महारुद्राभिषेक केला. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांना अभिवादन, तसेच विश्वशांतीचा प्रसार आणि दहशतवाद मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी हा रुद्राभिषेक झाला. वाराणसी येथील काशी विश्वनाथ, बारा ज्योतिर्लिंग आणि देशभरातील शिवालयात रुद्रमंत्राचा नाद दुमदुमला.
महारुद्राभिषेकाचे संयोजक व वयम संस्थेचे संस्थापक गौरव त्रिपाठी यांच्यासह जगभरातील शिवभक्तांच्या वतीने उडुपी येथील युवा उद्योजक, आत्मा फाउंडेशनच्या संचालक रश्मी सामंत यांनी काशी विश्वनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे संपर्क प्रमुख मनोहर ओक, लंडन येथील अलेक्स हॅन्की व शिवभक्त पवार यांनी रुद्राभिषेक केला. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन सहभागी होत जगभरातील शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी ३.३० ते ४.३० या कालावधीत महारुद्राभिषेक झाला. १४१ देशांतील हिंदूंनी यात सहभाग घेतला. 
माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, श्री ओंकारेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त धनोत्तम लोणकर, भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या कार्याध्यक्ष प्रियंका शेंडगे-शिंदे आदी उपस्थित होते. बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्यासह क्रिएटिव्ह कार्व्ह प्रायव्हेट लिमिटेडचे पवन सराफ, समसारा कॅपिटलचे मनीष जालान, पार्टेक्स एनव्हीचे संस्थापक गुंजन भारद्वाज, इनोप्लेक्सस कन्सलटिंग सर्व्हिसेसचे अमित आननपरा यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.

भारत शांतता, एकात्मता आणि विकासावर भर देत असल्याचा संदेश विश्वाला देण्याचा प्रयत्न यातून केला गेला. विश्व हिंदू परिषदेचे महासचिव स्वामी विज्ञानानंद महाराज यांच्या कल्पनेतून हा महारुद्राभिषेक साकार झाला. १२९ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या या शांती संदेशाचे, तसेच अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे स्मरण याद्वारे करण्यात आले, असे मनोहर ओक यांनी नमूद केले.
धनोत्तम लोणकर म्हणाले, “काशी विश्वनाथ मंदिरासह हा महारुद्राभिषेक ओंकारेश्वर मंदिरातही झाला, याचा आनंद आहे. ओंकारेश्वर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असून, पुणेकरांनी यात सहभागी नोंदवला. समाजातील वाईट शक्तींना संपवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल.”
भारतीय संस्कृती सहिष्णू असून, एकात्मता, बंधुभाव त्याचा गाभा आहे. संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविण्याचे काम अनेकदा भारताने केले आहे अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या भारतीय संस्कृतीत रुद्राभिषेकाला अतिशय महत्व असून, विश्वाला दहशतवादमुक्त करण्यासाठी प्रार्थना केली.

–  ॲलेक्स हॅन्की, लंडनहून आलेले शिवभक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या ‘डिजिटल इंडिया’मुळे भारतातील लोकांनीही मोठ्या प्रमाणावर हा महारुद्राभिषेक सोहळा पाहिला. श्री काशी विश्वनाथ मंदिर प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी या सोहळ्याच्या यशासाठी सहकार्य केले. सर्व सहयोगी व्यक्तींचे आभार मानतो.

– गौरव त्रिपाठी, संयोजक व संस्थापक वयम संस्था