एक्सीलेटर सेंटर (सेंटर फॉर बिझनेस इनोव्हेशन अॅण्ड आंत्रप्रेन्यूअरशीप) चे उद्घाटन
पुणे, दिः२४, सप्टेंबरः “आत्मविश्वास, कामाची ऊर्जा, शक्ती, समर्पण आणि पॅशन या गुणांच्या जोरावर कोणताही नव उद्योजक यशस्वी होऊ शकतो. संशोधन आणि नेतृत्व तुमच्या रक्ता रक्तात भिनले पाहिजे. तसेच रोज स्वतःमध्ये सुधारणा करावी,”असे विचार लेफ्टनंट जनरल ए. अरूण यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महेन्द्रा राइसच्या इलेक्ट्रिकल व्हेईकल विभागचे व्यवसाय प्रमुख आशुतोष दुग्गल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे ऑनलाइन होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपण पंण्डा, सेंटर फॉर इंडस्ट्री अॅकेडमिया पार्टनरशिप्सचे वरिष्ठ संचालक प्रवीण पाटील आणि डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये नव्याने उघडण्यात आलेल्या एक्सीलेटर सेंटर (सेंटर फॉर बिझनेस इनोव्हेशन अॅण्ड आंत्रप्रेन्यूअरशीप) चे उद्घाटन डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि लेफ्टनंट जनरल ए. अरूण यांच्या हस्ते करण्यात आले. लेफ्टनंट जनरल ए. अरूण म्हणाले,“नव उद्योजकांनी चेहर्यावर सदैव हास्य ठेवले तर तो व्यवसाय यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. कोणतेही कारणे देऊन आपल्या ध्येयापासून, लक्षापासून आणि निर्धारित केलेल्या गोल पासून दूर होऊ नका. ज्ञानाची शक्ती ही सर्वश्रेष्ठ असून विद्यार्थ्यांनी त्यावरच फोकस करावा. व्यावसायिक नेतृत्वात लिडर्सने आपल्या भावना टीममध्ये सांगाव्यात. “प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाची चावी ही ज्याच्या त्याच्या हातात असते. त्यामुळे २४ तास काम करण्याएैवजी आपल्या आवडी निवडी, समाजसेवा, धार्मिक कार्यालाही प्राथमिकता दयावी. या देशाचे उज्वल भविष्य युवा शक्तीच्या हातात आहे.” डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विद्यार्थ्यांनी स्वःधर्म, स्वाभिमान, स्वःत्व या गोष्टींना लक्षात ठेवावे. भारतीय परंपरा ही मातृ देव, पितृ देव भव आणि आचार्य देव भव याची शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात संशोधन हे अत्यंत महत्वाचे आहे. या संशोधनातुनच जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती झाली आहे. त्यातून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला जात आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येणार आहे.” आशितोष दुग्गल म्हणाले,“ स्वामी विवेकानंदांच्या वचनावर चालणार्या या विद्यापीठामध्ये आता विद्यार्थ्यांनी शाश्वत संशोधन करावे. जे मानव कल्याणासाठी असेल. ” राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ येथे गेल्या पाच दिवासांमध्ये एका युनिक विचारांची देवाण घेवाण झाली आहे. नवनिर्मिती, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर शाश्वत विकास होतांना दिसत आहे. या देशात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या संशोधनाच्या जोरावर सोडविल्या जाव्यात. वर्तमान काळात सर्वांनी वसाहतवादी मानसिकता स्विकारून इंडिया याला भारत असे संबोधावे. त्यामुळे देशात नवी चळवळी उभी राहण्यास वेळ लागणार नाही.” प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तपन पाण्डा यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. प्रविण पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश आणि आढावा सांगितला. प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
पुण्यातील शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सज्ज होत असून संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एल.ई .डी. लाईट्ससह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून नैसर्गिक विविध सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर करण्यात येत आहे. मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने सजवले जात असून मंदिर परिसरात सुगंधित फवारे मारण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त मंदिराच्या भोवतालच्या परिसराची स्वच्छताही करण्यात आली आहे.
मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरतीचे साहित्य तयार असून धूप व उदबत्त्यांचा मधुर वासांमुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.३० वाजता विधिवत घटस्थापना येथे संपन्न होईल. श्री लक्ष्मीमातेला सोन्याच्या मुगुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजवण्यात आले आहे.
येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती तसेच प्रसाद वाटप होत असून नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होणार आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही चोख असणार आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे दि. २८ सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार असून भाग्यलक्ष्मी स्पर्धांमधील विविध स्पर्धा, सामुहिक आरती आणि सामुहिक श्रीसूक्त पठण होणार आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मनाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष — शरद पवार यांच्या हस्ते सोमवार दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आ. नाना पटोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व उद्योजक विशाल चोरडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, चांदीची मुद्रा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
आबा बागुल म्हणाले की, ‘समाजात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी ‘महर्षी’ पुरस्कार देऊन गौरवले जाते. समाजात या ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान व्हावा व तरुण पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा यामागे आहे. अशा व्यक्तींचा गौरव म्हणजे जीवनातील उदात्त प्रेरणांचाच गौरव आहे’ असे सांगून आबा बागुल म्हणाले की ‘राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांना दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार म्हणजे गुरूने शिष्याचा केलेला हा सत्कार मानावा लागेल.’
यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी (शास्त्रीय संगीत), डॉ. रघुनाथ माशेलकर (शास्त्रज्ञ), ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (कीर्तनकार), डॉ. शोभना रानडे (सामाजिक कार्य), चंदू बोर्डे (क्रीडा), गोपाळराव पटवर्धन (पत्रकार), डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषितज्ञ), डॉ. विजय भटकर (संगणक तज्ञ), डॉ. विनोद शहा (वैद्यकीय), भाई वैद्य (सामाजिक), डॉ. मोहन धारीया (पर्यावरण), उल्हास पवार (गांधीवादी), डॉ. एम.एन.एस. मोदी (सर्जन), बी.आर. खेडेकर (शिल्पकार), डॉ. प्र. ल. गावडे (शिक्षणतज्ञ), लिला पुनावाला (उद्योजक), सुर्यकांत पाठक (ग्राहक हक्क), किशोरी आमोणकर (शास्त्रीय गायन), पं. हृदयनाथ मंगेशकर (संगीत), पद्मश्री प्रतापराव पवार (माध्यम उद्योगपती), डॉ. श्रीराम लागू (अभिनय), अॅड उज्वल निकम (कायदेतज्ञ), निर्मलाताई देशपांडे (गांधीवादी) यांना ‘महर्षी’ पुरस्काराने गौरवले गेले आहे.
सन २०१९ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पंचवीस व्यक्तींना ‘महर्षी’ पुरस्कार दिला गेला. डॉ. अनिल अवचट (सामाजिक), विद्या बाळ (स्त्री मुक्ती), डॉ. कुमार सप्तर्षी (गांधीवादी), अनिस चिस्ती (अध्यात्मिक), प्रभाकर जोग (संगीत), मोरेश्वर घैसास (वेदाचार्य), सतीश मगर (उद्योगपती), रामभाऊ जोशी (पत्रकार), विजयकांत कोठारी (उद्योगपती), डॉ. कल्याण गंगवाल (व्यसनमुक्ती), वालचंद संचेती (व्यापार), वसंत शिंदे (शिक्षणतज्ञ), एस.के. जैन (कायदेतज्ञ), विठ्ठल काटे (हास्य क्लब), डॉ. संप्रसाद विनोद (योगाचार्य), उमेश झिरपे (गिर्यारोहण), दीपक शिकारपूर (संगणकतज्ञ), संजय टकले (क्रीडा), दत्ता कोहिनकर (समुपदेशन), आदिनाथ चव्हाण (कृषी पत्रकार), बिशप थॉमस डाबरे (धार्मिक), प्रा. श्री. द. महाजन (वनस्पती शास्त्रज्ञ), यशवंत खैरे (पर्यावरण), चंद्रकांत काळे (गायन), शमा भाटे (कथ्थक नृत्य), विवेक खटावकर (शिल्पकार) यांना ‘महर्षी’ पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सकाळ आणि साम टीव्ही हे माध्यम प्रायोजक आहेत.
इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर व अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअर्स डे चे औचित्य साधून वर्ल्ड ऑफ ॲडव्हान्स कंस्ट्रक्शन इंडस्ट्री चे भव्य प्रदर्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भरविण्यात आले होते. या प्रदर्षणाचे उद्घाटन युसुफ इनामदार चेअरमन इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिटय़ूट पुणे सेंटर, उमेश मगर संचालक नांदेड सिटी डेव्हलपमेंट अँड कंस्ट्रक्शन कं.ली.व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांचे हस्ते डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. युसुफ इनामदार यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येऊ घातलेल्या नवीन तंत्रज्ञांना बद्दल मार्गदर्शन केले. औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे मनुष्यबळाची भासणारी कमतरता भरून काढण्यासाठी येऊ घातलेले नव तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. या प्रदर्शनामध्ये टनल बोरिंग मशीन (TBM) चे मॉडेल, H2 /O2 ब्रिदिंग मशिन, शटरिंग सिस्टम, फ्युअल सेव्हर, इको ग्रीन कॉन्क्रीट, ॲडमिश्चर , हायवा मशीन, रोलर मशीन, कॉन्क्रीट निक्सर, रेडी मिक्स कॉन्क्रीट मिक्सर, ऑटीनॉर्ड स्टेअर केस कास्टिंग, कॉलम कास्टिंग, वॉल कास्टिंग मोल्ड ऑफ होम जेसीबी, क्रेन या सारख्या विविध मशिनरी व कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्रीनकॉन्क्रीट , लाईट वेट कॉन्क्रीट, टनल बोरिंग मशीन (TBM) चे कार्य कशा प्रकारे चालते याच्या प्रत्यक्ष अननुभव विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला कॉन्क्रीट डे व इंजिनिअर्स डे चे औचित्य साधून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी व एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प स्पर्धा, पेपर प्रेझेटेशन, पोस्टर प्रेझेटेशन ,ग्रीन कॉन्क्रीट, क्यूब कॉम्पीटीश आयस्टिक ब्रिज कॉम्पीटीशन अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धामधील विजेत्यांना मान्यवराच्या हस्ते रु.५०००००/- इतक्या रक्कमेची रोख पारितोषिके वितरीत करण्यात आली. या विविध स्पर्धासाठी महाराष्ट्रातून तंत्रनिकेतन , अभियांत्रिकी व अर्कीटेकचर माविद्यालयातील ३००० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमासाठी डॉ.नितीन करमळकर,डॉ. एन बी .पासलकर, व्ही.व्ही.गाडगीळ, उमेश जोशी, अच्युत वाटवे, आर बी. सूर्यवंशी , हेमंत जोशी, धैर्यशील खैरे पाटील, अरुण पुरंदरे, आर वासुदेवन,मुकुंद दत्ता, व्ही आर फडके , युसुफ इनामदार, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे , सुचेता कलावार, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.अभय शेलार सर्व विभागप्रमुख प्राध्यापक विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेह साळवेकर व प्रा. नेहा देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाने आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
पुणे, दि. २३: शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमधून कोणत्याही खासगी वसतिगृहांपेक्षा उत्कृष्ट आणि अधिक सुविधा मोफत मिळत असून गुणवंत विद्यार्थी त्यांचा लाभ घेत आपल्या आयुष्याला आकार देत आहेत. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विश्रांतवाडी येथील तीन वसतिगृहातील पाच विद्यार्थ्यांची कँपस मुलाखतीद्वारे नामांकित खासगी कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना सुमारे १३ ते २१ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील वसतिगृहे सुरू केलेली आहेत. यामध्ये वसतिगृहाच्या स्वरुपानुसार कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय तसेच विद्यालय स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, नाश्ता, जेवण, वसतिगृहाच्या स्वरुपानुसार ५०० रुपये ते ८०० रुपये निर्वाह भत्ता, कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ ते वरिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, शारीरिक शिक्षण महाविद्यालय आदी अभ्यासक्रमांच्या स्वरुपानुसार शालेय विद्यार्थी, तसेच महाविद्यालयाचा ड्रेसकोड असल्यास दरवर्षी गणवेशांच्या दोन जोडांसाठी रक्कम, वैद्यकीय ॲप्रन, स्टेथोस्कोप लॅब ॲप्रन, बॉयलर सूट, ड्रॉईंग बोर्ड, स्टेशनरी व इतर साहित्य, शैक्षणिक सहल, प्रकल्प (प्रोजेक्ट) आदींसाठी नियमानुसार रक्कम मुलांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आवारात संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृह विश्रांतवाडी, १००० क्षमतेचे शासकीय वसतिगृह युनिट- १ विश्रांतवाडी आणि शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क अशी तीन सर्व सुविधायुक्त सुसज्ज शासकीय वसतिगृहे आहेत. येथे राहणाऱ्या किरण उत्तम केळगंद्रे, पियुष संजय चापले, शुभम राजकुमार सोमवंशी, प्रितेश अमोल शंभरकर आणि स्वप्निल मारुती जोगदंड यांची मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पानवी बु. ता. वैजापूर येथील किरण केळगंद्रे या विद्यार्थ्याने सांगितले, आईवडील शेतमजुर असल्याने घरची परिस्थिती कठीण होती. अशातही जिद्दीने, कष्टाने दहावी तसेच बारावीच्या आणि सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेत इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या बी. टेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गुणवत्ता क्रमांकानुसार १००० क्षमतेचे शासकीय वसतिगृह युनिट- १ येथे प्रवेश मिळाला.
किरणने येथील मोफत, निवास तसेच अन्य सोयीसुविधांबरोबरच ग्रंथालय, अभ्यासिका, मोफत वायफाय- इंटरनेट सुविधा आदींचा पुरेपूर वापर करत अभ्यासास पोषक वातारवणाचा लाभ घेतला. त्याचा फायदा संस्थेत घेण्यात आलेल्या कँपस इंटरव्यूव्हमध्ये झाला आणि २१ लाख वार्षिक वेतनाचे पॅकेजवर ‘सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रीसर्च’ (एसएसआयआर) कंपनीच्या बंगलोर प्लँटसाठी निवड झाली आहे.
अशाच पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा, ता. नरखेड येथील पियुष संजय चापले यानेही अत्यंत कठीण परीस्थितीला तोंड देत यश मिळवले आहे. त्याचे आई- वडील लहानपणीच अपघातात मृत्यूमुखी पडल्यानंतर पुढील पालनपोषण आजीने केले. १२ वी व सीईटीच्या गुणांनुसार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीईओपी) येथे संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्याची कँपस इंटरव्यूव्हद्वारे बजाज फिनसर्व्ह या कंपनीमध्ये १२ लाख ८१ हजार रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.
शुभम राजकुमार सोमवंशी हा लातूर जिल्ह्यातील शिऊर ता. निलंगा येथील राहणारा असून वडील मजुरी त्याचीही घरची परिस्थिती बेताचीच आहे. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लातूर येथे बारावीचे शिक्षण घेतले. त्याही वेळी शासकीय वसतिगृहाच्या योजनेचा लाभ घेतला. बारावीनंतर सीईटीमध्ये ९९.५१ टक्के गुण मिळवत सीईओपी येथे संगणक अभियांत्रिकीला प्रवेश मिळवला. कोरोगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्याची कँपस इंटरव्यूव्हद्वारे ‘सोसायट जनरल’ या कंपनीमध्ये १४ लाख ९६ हजार रुपयांच्या वार्षिक वेतनाच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
प्रितेश अमोल शंभरकर या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यानगर ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्याने येथील सीईओपीमध्ये २०१९-२०२३ साठी बीटेक इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्याला संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्याचीही ‘सोसायटी जनरल’ या कंपनीत वार्षिक वेतन १४ लाख ९६ हजार रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. स्वप्नील जोगदंड या चिंचोली बाळनाथ जिल्हा लातूर येथील विद्यार्थ्यानेही अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात मिळवत यश मिळवले आहे. पदविकेनंतर २०१९-२०२२ मध्ये एमआयटी मध्ये बीटेक संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेल्या स्वप्नीलची स्नोफ्लेक ईन्स, पुणे या कंपनीत वार्षिक वेतन १५ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
शासनाची साथ, शिक्षणाची आस आणि जिद्द, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी वर्गाचे सततचे मार्गदर्शन यामुळे आत्मविश्वास आलेल्या या मुलांचे जीवन घडत आहे. 0000
‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या पंतप्रधानांच्या निवडक भाषणांच्या संग्रहाचे एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन
हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा ज्ञानकोश असून जटिल सामाजिक समस्यांबद्दल त्यांची सखोल जाण विशद करते : अनुराग ठाकूर
पंतप्रधानांच्या निवडक भाषणांचा संग्रह ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन आज माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी प्रकाशन विभागाच्या संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह केले. हे पुस्तक, पंतप्रधानांनी मे 2019 ते मे 2020 या काळात विविध विषयांवर केलेल्या 86 भाषणांचे संकलन आहे.
देशासमोरील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी केले जात असलेले समन्वित प्रयत्न याविषयीचे आकलन व्यापक करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. सध्याचे सरकार ‘सर्वे जन सुखिनो भवन्तु ’ (सर्व लोक सुखी राहोत ) हे व्यापक तत्त्वज्ञान अंगीकारून काम करत असल्याचे ते म्हणाले. चांगल्या योजना याआधीही सुरू करण्यात आल्या, परंतु सर्व योजनांची निर्धारित मुदत आणि लक्ष्य यांच्या पालनात केवळ सध्याचेच पंतप्रधान अग्रणी आहेत, ते सातत्याने देखरेख आणि लोकांपर्यंत त्या परिणामकारकरित्या पोहोचतील याची काळजी घेतात. आपल्या उत्कृष्ट संभाषण कौशल्याच्या देणगीसह पंतप्रधान मोदी देशातील सर्व लोकांशी सारख्याच प्रकारे संपर्क साधू शकतात,असे कौतुक नायडू यांनी केले.
कोट्यवधी बँक खाती उघडणे अप्राप्य वाटले होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली हे लक्ष्य अतिशय जलदगतीने साध्य करण्यात आले होते, याची आठवण नायडू यांनी सांगितली. थेट लाभ हस्तांतरण हे सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे नायडू यांनी सांगितले. थेट लाभ हस्तांतरणामुळे लोक दलालांच्या कचाट्यातून मुक्त झाले आणि कल्याणकारी उपायांचे वितरण शेवटच्या स्तरापर्यंत सुनिश्चित झाले,असे ते म्हणाले. पूर्वीच्या योजना सरकारी किंवा राजकीय म्हणून ओळखल्या जात होत्या, मात्र उद्दिष्टांची पूर्तता लोकसहभागावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते, हे पंतप्रधान मोदी यांनी जाणले. यातूनच स्वच्छ भारत मोहीम पंतप्रधानांनी जनआंदोलन (लोक चळवळ) म्हणून उभी केली,असे नायडू म्हणाले.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, या पुस्तकात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे उपेक्षित वर्ग आणि महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांना वाटणारी काळजी.
पंतप्रधान मोदी यांच्या पूर्वी देशाचा विकास ही फक्त सरकार आणि नोकरशाहीची जबाबदारी होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी देशाचा विकास हा लोकभागीदारी म्हणजे प्रक्रिया आणि फलश्रुती यात देशाचे लोक समान भागीदार असतील, याची सुनिश्चिती केली आणि यातूनच खरी लोकशाहीची संकल्पना साकार झाली,असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुस्तकाविषयी सांगितले, या पुस्तकात 10 प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 86 भाषणे संकलित करण्यात आली आहेत आणि गुंतागुंतीच्या सामाजिक समस्यांबद्दलची त्यांची सखोल जाण आणि त्यांची स्पष्ट दृष्टी स्पष्ट करते. हे संकलन भविष्यातील इतिहासकारांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या भाषणांमधून, गुंतागुंतीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांचे विचार आणि त्यांचे नेतृत्व, ज्याची परिणती भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यात झाली आहे, ते समजून घेता येऊ शकेल , असे ठाकूर म्हणाले. त्यांच्या तळमळीसोबतच दलालांना वगळत शेवटच्या स्तरापर्यंत सेवा देण्याची आणि सुनिश्चित करण्याची त्याची तळमळ आणि त्यासोबत कृती यामुळेच लोकांना त्यांच्याविषयी अतूट विश्वास वाटतो, असे प्रतिपादन ठाकूर यांनी केले.
सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या विलक्षण क्षमतेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत ठाकूर म्हणाले की, विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत, शेतकर्यांपासून ते सीमेवरील सैनिकांपर्यंत, खेळाडूंपासून ते व्यावसायिकांपर्यंत,जे पंतप्रधानांचे भाषण ऐकतात ते समरस होतात आणि विविध आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांनी पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे. प्रमुख जागतिक नेत्यांनी नरेंद्र मोदी म्हणजे काय याचे विस्तृत विवेचन केले आहे.
या पुस्तकात परराष्ट्र संबंधांवरील त्यांची भाषणे, अर्थव्यवस्थेबद्दलचे त्यांचे विचार आणि काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ धाम, अयोध्या, देवघर सारखा सांस्कृतिक वारसा जपण्याबाबतचे त्यांचे विचार आहेत. हे पुस्तक वाचकांना भारताचे पर्यावरण आणि हरित भारत निर्माण करण्यासाठी उचललेली पावले, विविध मंत्रालयांची कामगिरी , तंदुरुस्ती , योग आणि क्रीडा यांना मुख्य प्रवाहात आणणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय, रोजगार, ग्रामोदय ते राष्ट्रोदय या क्षेत्रातील सरकारची कामगिरी , स्वयंपूर्ण बनण्याचा भारताचा प्रवास याबाबत त्यांच्या कल्पनांची माहिती देईल असे ते म्हणाले.
हे पुस्तक म्हणजे विविध सरकारी योजनांबाबत नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा विश्वकोश आहे. या संकलनात, वाचकांना ऐतिहासिक प्रसंगी केलेली भाषणे देखील आढळून येतील – उदा. राज्यसभेचे 250 वे सत्र , असोचॅमला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केलेले भाषण , 8 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवल्यानंतरचे , 19 मार्च 2020 रोजी कोविड संदर्भात राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण , दिलेला संदेश, फिट इंडिया चळवळीच्या उदघाटन प्रसंगी केलेले भाषण , अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी राष्ट्राला दिलेला संदेश इ.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, या पुस्तकात विविध राजकीय नेत्यांच्या नकारात्मक भविष्यवाणीला दिलेला प्रतिसाद आहे. या राजकीय नेत्यांनी म्हटले होते की कलम 370 रद्द केल्यानंतर भारत तग धरू शकणार नाही, काश्मीरमध्ये एकही व्यक्ती भारतीय तिरंगा फडकवणार नाही. मात्र आज हर घर तिरंगा अभियानाला देशाच्या इतर भागांप्रमाणेच काश्मीरमध्येही तितकेच यश मिळाले आहे आणि काश्मीरमध्ये यापूर्वी कधीही झाला नाही असा विकास आता होत आहे.
यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, प्रकाशन विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि मंत्रालयाच्या विविध माध्यम विभागांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास’ या पुस्तकाबद्दल
हे पुस्तक पंतप्रधानांच्या मे 2019 ते मे 2020 पर्यंतच्या विविध विषयांवरील 86 भाषणांवर केंद्रित आहे. संकल्पनेनुसार दहा भागात विभागलेली ही भाषणे नवभारताबाबत पंतप्रधानांची दूरदृष्टी प्रतिबिंबित करतात. नियोजनपूर्वक विभाग केले आहेत – आत्मनिर्भर भारत: अर्थव्यवस्था, जनता -प्रथम शासन, कोविड-19 विरुद्ध लढा, उदयोन्मुख भारत: परराष्ट्र व्यवहार, जय किसान, टेक इंडिया-न्यू इंडिया, हरित भारत-लवचिक भारत-स्वच्छ भारत, फिट इंडिया- कार्यक्षम भारत, शाश्वत भारत-आधुनिक भारत: सांस्कृतिक वारसा आणि मन की बात.
या पुस्तकात पंतप्रधानांच्या नव- भारताबाबत कल्पनेचे चित्रण केले आहे, जो स्वावलंबी, लवचिक आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्यास सक्षम आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वगुण, दूरदर्शी विचारसरणी आणि दूरदृष्टीला त्यांच्या असाधारण वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून सामान्य माणसांशी जोडले जाण्यासाठी उत्कृष्ट संवाद क्षमतेची जोड लाभली आहे. या पुस्तकातही त्याचाच प्रत्यय येतो.
इंग्रजी तसेच हिंदी पुस्तके प्रकाशन विभागाच्या विक्री केंद्रात आणि सूचना भवन, सीजीओ संकुल , नवी दिल्ली येथील बुक्स गॅलरीत उपलब्ध आहेत. प्रकाशन विभागाचे संकेतस्थळ तसेच भारतकोश प्लॅटफॉर्मवरूनही ते ऑनलाइन खरेदी करता येईल. अमेझॉन आणि गुगल प्लेवर देखील ई-पुस्तके उपलब्ध आहेत.
पुणे-महापालिकेत गेल्या ५ वर्षात ‘अभय पथ’ नेहमीच ‘ विशिष्ट ‘ अधिकारी वर्गाने मुख्य पदाधिकारी यांच्या प्रेमाच्या आदेशाने सुरु ठेवला होता , प्रशासकीय राजवट आल्यावर देखील तो सुरुचा आहे कि काय ? अशी शंका यावी अशी परिस्थिती महापालिकेत दिसून येते आहे . सुरक्षा रक्षक थेट घेऊ न शकणाऱ्या महापालिकेने ‘विशिष्ट ‘बाबी साठी मात्र ‘अभय पथ ; प्रशासकीय कारकिर्दीत देखील हा ‘प्रोटोकॉल ‘व्यवस्थित सांभाळून ठेवला आहे .प्राईड हॉटेल सारख्या स्थळांचा यासाठी उल्लेख हि सुंबडित होताना ऐकायला येतो आहे. या साऱ्याला कारण ठरले आहे ते म्हणजे रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या दहा ठेकेदारांना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभय दिल्याचे म्हणणे सूत्रांनी मांडले आहे. निकृष्ट कामे करणारे ठेकेदार आणि अभियंत्यांवर कडक कारवाई करण्याची पथ विभागाची शिफारस आयुक्तांनी बदलल्याने ठेकेदार आणि अभियंत्यांना अभय मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वयंसेवी संस्थांनी,सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे यातना सहन करणाऱ्या नागरिकांबाबत आयुक्तांना कळवळा नाही. मात्र, ठेकेदारांचा पुळका असल्याचे यातून स्पष्ट झाले असून त्यासंदर्भात शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.शहरातील रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे केल्याप्रकरणी दहा ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस पथ विभागाने आयुक्तांकडे केली होती. तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अभियंत्यांना दहा हजार रुपये दंड आणि विभागीय चौकशी करण्याचे शिफारशीत नमूद करण्यात आले होते. मात्र त्यावर अंतिम निर्णय घेताना आयुक्तांनी शिफारशीमध्ये बदल केल्याचे पुढे आले आहे.विवेक वेलणकर यांनी असे म्हटले आहेकी,’दोषी ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची शिक्षा आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा महिन्यांवर आणली, तर दोषी अभियंत्याची विभागीय चौकशीची शिफारस फेटाळून त्यांना पंधरा हजार रुपये दंड आकारला आहे.देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. पथ विभागाने देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीतील रस्त्यांची यादी तयार केली होती. त्यानुसार १३९ रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ७५ ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या, तर निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या दहा ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचे पथ विभागाने प्रस्तावित केले होते. रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होऊन लाखो पुणेकर खड्ड्यांमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे जबाबदार ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणे आवश्यक होते. कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले असते तर त्यांना पुणे महापालिकेबरोबरच अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस्त्यांची कामे मिळणे बंद झाले असते. मात्र ठेकेदारांचा पुळका असल्याने आयुक्तांनी शिफारशीमध्ये बदल केला आहे. सहा महिन्यानंतर हेच ठेकेदार पुन्हा पुणेकरांना खड्ड्यात घालतील, अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली.
मुंबई, दि. 23 : शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या विक्रीकराची अभय योजना-2022 ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे. 22 सप्टेंबर 2022 ला विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी जवळपास 50%, म्हणजे 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या अभय योजनेचा लाभ झाला आहे.
1 एप्रिल 2022 पासून ही योजना सुरु झाली असून जीएसटी पूर्व कायद्यांच्या थकबाकीतून कायमचे बाहेर पडण्याची शेवटची नामी संधी, असे या योजनेचे वर्णन केले जात आहे. आतापर्यंतच्या प्रतिसादावरुन ही योजना सर्वात आकर्षक आणि व्यापारी वर्गासाठी सर्वात जास्त फायदेशीर अभय योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छोट्या व्यापाऱ्यांकरिता आकर्षक सवलती
या योजनेत छोटे व्यापारी विशेषतः ज्यांची थकबाकी दहा हजारापर्यंत आहे, त्यांना अर्ज दाखल न करता पूर्ण थकबाकी माफ करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेची वैशिष्ठ्य ठरलेली व कमालीची लाभलेली वर्गवारी म्हणजे दहा हजार ते दहा लाखापर्यंतची प्रलंबित थकबाकी. या वर्गवारीतच विभागाकडे सर्वाधिक प्रलंबित प्रकरणेदेखील आहेत. या वर्गवारीत एकरकमी फक्त वीस टक्के थकबाकी भरून ऐंशी टक्के थकबाकी सरसकट माफ केली जात असल्याने, अधिकाधिक व्यापाऱ्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकीतून कायमची मुक्तता मिळवलेली आहे.
मोठ्या म्हणजेच 50 लाखांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी हप्तेसवलतीसारखा सोयीचा पर्याय उपलब्ध असल्याने, अशा मोठ्या प्रलंबित थकबाकीकरिता देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
व्यापारातील अनेक प्रश्नांना एकच उत्तर: अभय योजना 2022
अपिलातील प्रलंबित थकबाकीचा पाठपुरावा करण्यात सर्वसामान्य व्यावसायिकाचा व्यवसायातील बहुमूल्य वेळ व पैसा नाहक खर्च होत असतो. थकबाकीला स्थगिती नसेल तर स्थावर व जंगम मालमत्ता लिलावात निघण्याची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. तशातच कोरोना टाळेबंदीमुळे व्यापारावरील अनिष्ट परिणाम व ढासळलेले अर्थगणित. त्यामुळे व्यापारी वर्गाने या नामी संधीचे जोरदार स्वागत केले आहे.
त्यामुळे अपिलात होणारा वेळेचा व पैशाचा अपव्यय तसेच विभागाकडून होणारी वसुलीची कार्यवाही टाळण्यासाठी अभय योजनेत सहभागी होऊन जीएसटी कारकिर्दीत व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यावर अनेकांनी भर दिल्याचे या योजनेच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे.
अगदी 1970 सालापासूनच्या सुद्धा प्रलंबित थकबाकीसाठी या योजनेत अर्ज सादर केले गेले आहेत, हे विशेष. त्याचप्रमाणे विक्रीकर न्यायाधिकरण अथवा उच्च न्यायालयातील देखील प्रलंबित दावे मागे घेत अनेकांनी या योजनेचा लाभ घेणे पसंत केले आहे. सर्व वर्गातून लाभत असलेल्या या प्रतिसादावरून ही योजना व्यापारीभिमुख आहे व या योजनेत यापूर्वीच्या सर्व अभय योजनांचे विक्रम मोडले जातील हे सुस्पष्ट आहे.
सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही अभय योजना 30 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे योजनेच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापारी बंधूनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीएसटी विभागामार्फत करण्यात आले आहे.
पुणे, दि. 23: भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘जलसमृद्ध ग्रामपंचायत आणि स्वच्छ गाव’ या विषयावर चर्चा करण्यात आली.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अप्पर सचिव अर्चना वर्मा म्हणाल्या, ग्रामपंचायत लोकशाही प्रणालीतील सर्वात सशक्त घटक आहे. ग्रामपंचायतींनी सहकार्य केल्यास देशाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वास आणता येईल. ग्रामस्तरावर विविध घटकांना एकत्र घेऊन सरपंच अनुकूल बदल घडवून आणू शकतात. सरपंच सक्षम असल्यास चांगले बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरतात. शाश्वत विकासाच्या उद्दीष्टापैकी पाणी महत्वाचे उद्दिष्ट असल्याने त्याविषयी नियोजन महत्वाचे आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा म्हणाले, साधनस्त्रोताचा सुयोग्य उपयोग करून गावाला स्वच्छ आणि हरित करण्याची कार्यवाही करता येईल. यासाठी आवश्यक वातावरण कायम ठेवण्याबाबतही चर्चा करणे गरजेचे आहे. निधीचा कार्यक्षम उपयोगाद्वारे गावाचा विकास कसा करता येईल, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि कौशल्य कसे मिळविता येईल यावरही विचार व्हावा. ग्रामीण भागात प्लास्टिकसारखा कचरा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचा विचार करण्याची गरज आहे.
पंचायत राज मंत्रालयाच्या संचालिका मालती राव, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी हेदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातील प्रयोगशील ग्रामपंचायतींच्या यशोगाथांवर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला आणि आपले अनुभव मांडले.
पुणे दि.२३- शासकीय वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी घडविण्यात गृहपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी पालकत्व या नात्याने जबाबदारी घेतल्यास निश्चितच समाजात आदर्श विद्यार्थी निर्माण होतील, असे मत राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या गृहपालांचे दोन दिवसाचे प्रशिक्षण अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. नारनवरे बोलत होते. कार्यक्रमाला बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजय गायकवाड, उमेश सोनवणे, मनिषा फुले, निशा देवी बंडगर आदी उपस्थित होते.
डॉ.नारनवरे म्हणाले, समाजातील पालक मोठ्या अपेक्षेने त्यांच्या पाल्यांना शासकीय वसतीगृहात पाठवत असतात. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यात आदर्श विद्यार्थी निर्माण कसे होतील यासाठी देखील गृहपालांनी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
समाज कल्याण आयुक्तालय पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथे २२ व २३ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात होते. या प्रशिक्षणात राज्यातील सहभागी गृहपाल यांना यावेळी आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात गृहपालांना नाविन्यपूर्ण उपक्रमांचे तसेच विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रमांबाबात तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्यातील सर्व गृहपाल यांनी आयुक्त यांनी राबवलेल्या या नावीन्यपूर्ण संकल्पनेचे स्वागत केल्या असून शासनाला धन्यवाद दिले आहेत.
कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्तालयचे तसेच बार्टीचे अधिकारी व कर्मचारी व राज्यभरातील शासकीय वसतीगृहाचे गृहपाल उपस्थित होते.
पुणे, दि.२३:- आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर दर्जेदार व मोफत उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य करणारी रुग्णालये व आरोग्य मित्रांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औंध जिल्हा रुग्णालयचे डॉ. प्रेमचंद काबळे, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय समन्वयक रणजित मोरडे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोंखडे, जिल्हा प्रमुख चेतन तिकोणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोविडच्या काळात आरोग्य यंत्रणेसह विविध विभागाच्या अधिकरी व कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. आरोग्य विषयक सेवा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात राबविण्यात आहे. नागरिकांना आरोग्य विषयक सोईसुविधा उत्तमप्रकारे मिळण्यसाठी ही योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवावी. योजना अंमबजावणीमध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध रुग्णालयात आरोग्य शिबीरे आयोजित करुन आयुष्मान कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले आहे.
श्री. मोरडे म्हणाले, लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड (ई-कार्ड) वितरित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात योजना लागू झाल्यापासून ४ लाख ५७ हजार २८ पात्र कुटुंबातील २ लाख ४१ हजार २२१ नागरिकांना लाभ देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांमार्फत ५० शाळांमध्ये व्यापक जनजागृतीसाठी करण्यात येत आहे. त्यामध्ये योजनेच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला, पोस्टर रंगविणे, निबंध, घोषवाक्य असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध रुग्णालयात १३ आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी, सूर्या सह्याद्री रुग्णालय कसबा पेठ, तसेच ससून हॉस्पिटलचे आरोग्य मित्र ममता उबाळे आणि पुणे कटक मंडळ येथील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे आरोग्य मित्र उत्कर्ष लांडगे यांचा सन्मान करण्यात आला
पुणे, दि.२३: दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून यादिवशी ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित कराव्यात.
स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने समाज सामाजिक कार्यकर्त्याकरीता व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला आदी उपक्रम आयोजित करावे. या उपक्रमांसाठीच्या पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करावे.
आपल्या कार्यालयातून सदर उपक्रम राबवून माहिती अधिकार कायद्याची व्यापक प्रमाणात राबविण्याबाबत कार्यकाही करावी, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.
मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला होता आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. याचा आनंद शिवसैनिकांनी साजरा करत , एकमेकांना पेढे भरवले.
उत्साह अमाप आहे. एकजूट सुद्धा तशीच ठेवा, पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयचा, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशी जोरदार घोषणाबाजी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.ठाकरे म्हणाले, न्यायदेवरील विश्वास सार्थ ठरला. आता वाजत गाजत, आनंदात दसरा मेळाव्यासाठी या. गूलाल उधळत या. बाळासाहेबांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. शिस्तीला गालबोट लागता कामा नये.
निवडणुका जवळ आहेत. पालिका निवडणुक जिंकायची आहे. त्यावर शिवसेनेचा भगवा फडकावयचा आहे. त्यामुळे गटतट पाडू नका, रुसवे-फुगवे नको. उमेदवारी फार मोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना केले.
यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष सुरू होता. शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी पार पडली आहे. शिवसेनेकडून वकील एसपी चिनॉय आणि मुंबई महापालिकेकडून वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या वकिलानेही यावेळी जोरदार युक्तिवाद केला. तब्बल चार तास हा युक्तिवाद चालला. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळत शिवसेनेला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे.
पुणे, दि.२३: महाराष्ट्रात पंचायतराज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे व त्याविषयीच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य राहील. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आपले राज्य व राज्यातील पंचायतराज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार, केंद्रीय सचिव नागेंद्रनाथ सिन्हा, सह सचिव रेखा यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्राची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री.शिंदे म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ मध्ये शाश्वत विकासाची १७ उद्दीष्टे निश्चित केली असून ती २०३० पर्यंत साध्य करावयाची आहेत. या करारावर सही करणारा भारत हा प्रमुख देश असून ग्रामपंचायतींमध्ये ‘शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण’च्या दृष्टीने केंद्र शासनाने ९ संकल्पना निश्चित करून दिल्या आहेत. या संकल्पना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. राज्यामध्ये स्वच्छता आणि शुद्ध पाणी पुरवठा याबाबतीत मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती झाली आहे.
शाश्वत उद्दीष्टांचे स्थानिकीकरण आवश्यक कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता आणि शुद्ध पाणी या विषयावर झालेल्या सखोल चर्चेचा फायदा गावांमध्ये यासंदर्भातील योजनांची अंमलबजावणी आणि जाणीवजागृतीसाठी करता येईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत विकास आराखडे तसेच विविध विकास योजना व लोकसहभागाच्या माध्यमातून या १७ उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी त्यांचे स्थानिकीकरण आवश्यक आहे.
ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदांमार्फत केली जाते. यासोबतच विकास आराखड्यांच्या माध्यमातून वित्त आयोग, स्वनिधी व इतर निधींमधूनही विविध लोकोपयोगी कामे हाती घेतली जातात. ग्रामविकासाच्या योजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायत यांनी शाश्वत विकासाची उद्दीष्टे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवावीत. त्यासाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाचे विविध विभाग यांनी आपापसात समन्वय ठेवून यासंबंधीच्या योजना यशस्वीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
शाश्वत विकासाच्या संकल्पना राबविण्यासाठी महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकाराबाबत समाधान व्यक्त करून या सर्व संकल्पना ग्रामीण भागामध्ये अस्तित्वात आणण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचेही श्री.शिंदे म्हणाले.
शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग आवश्यक पंचायत राज संस्था, सरपंच, सदस्यांनी ग्रामविकासाच्या या ९ संकल्पनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत. राज्य व केंद्र सरकार त्यांना सर्व सहकार्य करेल. कार्यशाळेतील चर्चेचा उपयोग सहभागी प्रतिनिधींना होईल व ते गावाचा विकास करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात ग्रामपंचायत विकास योजना तयार करताना ९ उद्दीष्टांना प्राथमिक रुपाने समाविष्ट करण्यात येईल. जिल्हा परिषदेप्रमाणे इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना या प्रक्रीयेत सहभागी करून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी सांगितले.
प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या आधारे विकास साधा-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, देशात अनेक चांगली माणसे गावाच्या विकासासाठी आपले योगदान देत आहेत. कार्यशाळेत प्रतिनिधींनी अशा कामातून प्रेरणा घेऊन गावात बदल घडवून आणावे. ग्रामसभेचा उपयोग विकासाचे चांगले नियोजन करण्यासाठी व्हावा. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून गावाच्या विकासात योगदान द्यावे. प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर काम करून आपल्याला कोणतेही उद्दीष्ट गाठता येईल आणि देशातील प्रत्येक सरपंच गावाचा विकास करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत गावांच्या विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ३ लाख ७० हजार कोटी रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. येत्या ३ वर्षात आणखी २ लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी हा निधी देण्यात आला आहे. त्यातून शाश्वत विकासाची उद्दीष्टे साध्य करायला हवीत. कार्यशाळेतून परतल्यावर या उद्दीष्टांना अनुसरून काम सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शाश्वत विकासाचा विचार करताना पायाभूत सुविधांच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. विकासाची उद्दीष्टे गाठल्याने इतरही गावांना प्रेरणा मिळेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती करून घ्यावी. शाश्वत उद्दीष्टे गाठण्यासाठी सातत्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी त्याबाबत सरपंचांना मार्गदर्शन करावे. आपल्या कार्याचा गावाला कसा लाभ होईल या विचाराने सरपंचांनी गावाला विकासाकडे न्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुनिल कुमार प्रास्ताविकात म्हणाले, देशातील २८ राज्यातून १ हजार २०० ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधीनी यात सहभाग घेतला. शाश्वत विकासाच्या ९ उद्दीष्टावर कार्यशाळेत पाच सत्रात चर्चा करण्यात आली. स्वच्छ व हरित ग्रामपंचायत, स्वच्छ आणि शुद्ध पेयजल, जलसमृद्ध गाव आदी विषयांच्या चर्चेत प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला पंचायत राज विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अधिकारी, देशभरातून आलेले सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
तळजाई माता देवस्थानतर्फे अभिषेक, आरती, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम; विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक ४०० वर्षे जुन्या तळजाई मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तळजाई येथील मंदिरात करण्यात आले आहे. अभिषेक, आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम उत्सव काळात होणार आहेत. सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख अण्णा थोरात यांनी दिली.
उत्सवकाळात मंदिर विविध फुलांनी सुशोभित करण्यात येणार असून आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात येणार आहे. नऊ दिवस रोज सकाळी ७ वाजता अभिषेक होणार आहे. दिवसभर पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील भजनी मंडळे येथे सेवा रुजू करणार आहेत. उत्सवात ४० ते ५० शाळांचे विद्यार्थी, गुरुजनांसह दर्शनाला येतात. भक्तांना भेळभत्ता प्रसादाचे वाटप करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी होम-हवन, तसेच कन्यापूजन देखील होणार आहे. पुणे शहरातील विविध भागातील महिला या ठिकाणी श्री सुक्त पठण देखील करणार आहेत.
अण्णा थोरात म्हणाले, सन १६७२ दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेकाची धामधूम होती. सभारंभ रायगडावर होता आणि आराध्य देवतांचा आशीर्वाद राजांना हवा होता. तुळजापूरहून, देवीचे प्रस्थान ठेवले आणि ही पालखी पुणे मार्गे पुढे रायगडाला जाणार होती. जिजाऊ मातेच्या दर्शनासाठी काही काळ पालखी जेथे ठेवली गेली तो हाच तळजाईचा पठार. साक्षात महाराष्ट्राच्या कुलदैवतेचे अधिष्ठान आणि जिजाऊंचा पदस्पर्श या परिसरास लाभला आहे.
रावबहाद्दूर ठुबे यांचे या परिसरात वास्तव्य होते. ते देवीचे परमभक्त होते. येथील तळ्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे. मला स्थानापन्न करण्यासाठी जे आसन तयार करशील ते सूर्यदयापूर्वीच तयार झाले पाहिजे नाही तर मी जमिनीवर ठाण मांडीन. दृष्टांताप्रमाणे ठुबे यांनी शोध घेतला आणि त्यांना तांदळाच्या स्वरूपातील पदमावती, तळजाई माता, तुळजाभवानी यांच्या मूर्ती मिळाल्या. तळ्यापासून आलेली माता म्हणून तिचे तळजाई असे नाव पडले. मातेने आसन वेळेत न झाल्याने तिने जमिनीवरच ठाण मांडले.
तळजाईच्या कृपेने वैभवाचा काळ अनुभवलेल्या रावबहाद्दूरांच्या निधनानंतर हा परिसर पुन्हा एकदा उजाड झाला होता. परंतु कै. अप्पासाहेब थोरात यांच्या सेवेतूनच या परिसराचा विकास झाला. मंदिराचा गाभारा आणि मंडप बांधला गेला. प्रवेशद्वाराशी पडवी मारुती मंदिर आणि तळजाई,पदमावती, तुळजाभवानी यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आले. नवरात्रीच्या काळात अप्पांचा मुक्काम देवीच्या चरणापशीच असे. या काळात ते फक्त फलाहार घेत असत. मातेच्या सेवेतून प्रेरणा घेऊन अप्पांनी झुणका भाकरकेंद्राची योजना भारतात सर्वात प्रथम राबवली ती गोरगरीबांच्या सेवेच्या दृष्टिकोनातूनच, असेही अण्णा थोरात यांनी सांगितले.