Home Blog Page 1599

सहकार क्षेत्राचा केवळ राजकारणासाठी वापर झाला – निर्मला सीतारमण

पुणे- सहकार क्षेत्राचा केवळ राजकारणासाठी वापर झाला अशा शब्दात टीका करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाविकास आघाडीला शनिवारी पुण्यात आव्हान दिले.आजवर सहकार क्षेत्रावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारे केंद्रात सत्तेवर असताना सहकारसाठी स्वतंत्र मंत्रालय का केले नाही? असा सवाल करत टोला लगावला. तसेच पंतप्रधान मोदींनी सहकार क्षेत्रातील सुधारणांसाठीच स्वतंत्र मंत्रालय केले असून सहकार क्षेत्राला करातून सवलत देऊन दिलासा दिला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.विधान भवन येथे केंद्रातील योजनांचा पुणे जिल्ह्यातील आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या

त्या म्हणाल्या नाणार येथील तेल शुद्धीकरण कारखाना, वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आरेमधील कारशेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कुणी विरोध केला? हे प्रकल्प रखडल्याने देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत महाविकास आघाडीने उत्तरे द्यावीत. मगच वेदान्तबाबत प्रश्न विचारावेत,

त्या म्हणाल्या, ‘आपले अपयश झाकण्यासाठीच विरोधकांकडून वेदान्तचा मुद्दा तापविण्यात येत आहे. रत्नागिरीतील तेल शुद्धीकरण कारखाना, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि कारशेड या प्रकल्पांना आतापर्यंत कुणी विरोध केला. जपानकडून स्वस्त कर्ज बुलेट ट्रेनसाठी मिळणार होते. तसेच कारशेडला विलंब झाल्याने चार हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाची किंमत वाढली आहे. केवळ पंतप्रधान मोदी यांना श्रेय मिळेल, म्हणून बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध होत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. तरीदेखील या प्रकल्पांना विरोध कुणी केला?, या प्रश्नांची उत्तरे महाविकास आघाडीने आधी द्यावीत, त्यानंतर वेदान्तबाबत प्रश्न उपस्थित करावेत.’

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि केंद्राच्या योजनांचा कितपत लाभ झाला याचा आढावा घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवस दौरा केला. केवळ बारामतीच नव्हे, तर देशातील प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांतदादा पाटील पुण्याचे पालकमंत्री -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या रखडलेल्या योजनांना गती देणार- महिला व बाल कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा

0

मुंबई
महाराष्ट्रात जनतेचे सरकार आले आहे. आता झोपडपट्टीवासियांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. याबाबत मी, स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. मुंबईतील रखडलेल्या योजनांना गती देण्याकरिता पंधरा दिवसातून दोन वेळा एसआरए प्राधिकरणाच्या कार्यालयात जावून झोपडपट्टीवासियांच्या घरांचा प्रश्न कायमचा मार्गी लावू असे ठाम आश्वासन पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिले. दादर वसंत स्मृती येथे मुंबई भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता संमेलनात ते शनिवारी बोलत होते. संमेलनात ‘झोपडपट्टी समस्या निवारण’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘झोपडपट्टी समस्या व निवारण’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. भारतीय जनता पार्टी नेहमीच झोपडपट्टीवासियांसोबत आहे. आपले सरकार अन्याय विरोधात लढणारे आहे. आता झोपडपट्टीतील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, आपल्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टीधारकाने कागदपत्रांची पूर्तता करावी. पेपरवर्क अत्यंत महत्त्वाचे आहे. एसआरएची स्थिती बिघडली आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार आहे असेही ते म्हणाले. गेल्या ३५ वर्षांत झोपडपट्टीधारकांसाठी केवळ २ लाख ९० हजार घरे झाली आहेत. १५ लाखांपेक्षा जास्त लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्यासाठी कायदा असूनही प्रश्न सुटलेले नाहीत. सरकारचे काम लोकांना घर देणे आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. यापुढे आपल्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टीतील प्रत्येकाने स्वतःला झोकून देऊन काम करावे असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.

मुंबई भाजपा उपाध्यक्ष, अमरजीत सिंह, आचार्य पवन त्रिपाठी, भाजप मुंबई सचिव व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे यांनी मनोगत व्यक्त केले. झोपडपट्टी मोर्चा मुंबईचे अध्यक्ष आर. डी. यादव यांनी प्रास्ताविक केले. धनंजय कोळकर, योगेश खेमकर, दयाशंकर यादव आदी उपस्थित होते. महामंत्री सुरेश पाल यांनी सूत्रसंचालन केले.

दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे – शेखर गायकवाड यांचे प्रतिपादन‌

पुणे, प्रतिनिधी – मानवी संवेदना समजण्यासाठी भाषा हा फार महत्त्वाचा भाग आहे. संवादाच्या माध्यमातून एकमेकांची मने जोडली जातात. दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देणे महत्वपूर्ण आहे. सांकेतिक भाषा समाजामध्ये प्रभावीपणे रुजणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं या उदात्त हेतूने डॉ. सोनम कापसे यांनी सुरु केलेले हॉटेल निश्चितच प्रेरणादायी आहे. दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे. संवेदनशील माणसांनी या मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जाणा-या  टेरासीन रेस्टॉरंट मध्ये जागतिक सांकेतिक भाषादिन साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मुलांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले व सांकेतिक भाषेतील मुलभूत प्रात्याक्षिके दाखविली. दिव्यांगांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी तसेच सहानुभूतीद्वारे नव्हे तर सन्मानाचे व्यासपीठ म्हणून सुरु झालेल्या या रेस्टॉरच्या कार्यक्रमावेळी गायकवाड बोलत होते.

यावेळी बालभारतीचे संपादक किरण केंद्रे, प्रसिद्ध उद्योजक कल्याण तावरे, डॉ. सोनम कापसे, वंदना गायकवाड, शैलेश केदारे उपस्थित होते.

शेखर गायकवाड म्हणाले की, भारतात सर्व जिल्ह्यात अशी मुले आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विकास झाला पाहिजे. नवीन पिढी समाजात चांगले बदल आणत आहे, समाज देखील तो बदल स्विकारत आहे. त्यामधील एक उदाहरण म्हणजे टेरासीन हा प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षे विशेष मुलांना संभाळणे आणि जगवणे हाच उद्देश ठेवून वाटचाल झाली आहे. परंतु, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे, इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगण्यास संधी देणे हे दैवी काम आहे. असा प्रयोग विशेष मुलांना स्वतःच्या पायावर उभा करून स्वाभिमान देणारा आहे. लिखित, बोली आणि सांकेतिक भाषा असे भाषेचे तीन प्रकार असून सांकेतिक भाषा हि देवाला जोडणारी भाषा आहे. देवाशी बोलताना भावना व्यक्त करताना प्रत्येकजण वेगवेगळ्या सांकेतिक भाषेतून देवाशी संवाद साधत असतो.

डॉ. सोनम कापसे म्हणाल्या की, दिव्यांगांना स्वाभिमानाने जगासमोर उभे राहण्यासाठी सुरु झालेले हे रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे. या हॉटेलमध्ये स्वागतापासून ते किचन सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी मूकबधिर असणाऱ्या तरुण-तरुणींवर आहे. सामाजिक बांधीलकी जपत मूकबधिर व्यक्तींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी हे हॉटेल सुरू केले आहे. काहीही ऐकू तसेच बोलता येत नसताना येथील कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देतात. या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये खाद्यपदर्थ्यांच्या पुढे काही सांकेतिक भाषेची चित्रे दिली आहेत. ती पाहून ग्राहक कर्मचाऱ्याला ऑर्डर देऊ शकतो. त्यानंतर हे कर्मचारी ऑर्डर लिहून घेतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर तयार करतात. अगदी सुटसुटीतपणे ही ऑर्डर कुणीही देऊ शकेल अशा पद्धतीने हा मेन्यूकार्ड तयार करण्यात आला आहे. जागतिक पदार्थ बनवण्यासाठी नाचणी, ज्वारी, कोडो, राजगिरा यांसारखे स्थानिक पातळीवर पिकणा-या धान्याचे पदार्थ याठिकाणी मिळत असल्याने शेतक-यांचीदेखील उन्नती साधले जात असल्याचे समाधान डॉ. सोनम यांनी व्यक्त केले. 

‘ नृत्यकथी’ च्या संस्कृत आविष्काराला रसिकांची दाद !

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ नृत्यकथी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्यांजली डान्स अकॅडमी प्रस्तुत या कार्यक्रमात संस्कृत काव्य आणि कथांचा आविष्कार सादर करण्यात आला. या संस्कृत आविष्काराला रसिकांची चांगली दाद मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात नांदी ने झाली. त्यानंतर दलात अडकलेल्या भ्रमराची स्थिती ‘अलारिपू’ या नृत्य सादरीकरणातून उलगडण्यात आली, त्यानंतर ‘राजराजेश्वरी अष्टकम्’ सादर झाले. मंत्रमुग्ध करणारी संक्षीप्त रामायण कथा नृत्यातून सादर करण्यात आली . नृत्यकथाविष्काराचे सादरीकरण झाले. वसंत ऋतु मधील आनंद , उत्साह , ग्रीष्म ऋतु मधील सुर्याची दाहकता, चंद्राची शीतलता आणि वर्षा ऋतुतील नवचैतन्य तिल्लाना या नृत्य सादरीकरणाने ‘नृत्यकथी ‘ कार्यक्रमाची सांगता झाली.

हा कार्यक्रम शनीवार, २४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.नृत्यकथी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन संध्या धर्म आणि मिता पाठक यांनी केले होते. मिता पाठक,यशश्री जाधव,आर्या गिजरे,मैथिली दिवेकर,जान्हवी कशेळीकर,अवनी जवखेडकर,श्रावणी एंचवार,साक्षी पासकंटी,दर्शना पासकंटी हे नृत्यकलाकार सहभागी झाले होते. कृष्णा चतुर्भुज यांनी सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४१ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी सहभागी कलाकारांचा सत्कार केला.

सोमवार पासून नवरात्रात रंगणार कोथरूड महोत्सव – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन व कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे-सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी घटस्थापना करण्यात येणार असून पुढील दहा दिवस कोथरूड सांस्कृतिक महोत्सव रंगणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिली . यावेळी कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,माजी नगरसेविका व उत्सव प्रमुख मंजुश्री खर्डेकर व सौ. श्वेताली भेलके,कार्याध्यक्ष उमेश भेलके इ उपस्थित होते.आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जपतो व सामान्यांच्या हिताच्या अनेक कार्यक्रमांचा अंतर्भाव असतो असे ही खर्डेकर म्हणाले. कोथरूड च्या डी पी रस्त्यावर भेलकेवाडी येथे देवी ची स्थापना करण्यात येणार आहे, मात्र येथे देखील मंडळाने सामाजिक जाणीव जपली असून येथील प्रचंड वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेता मांडवाची रुंदी ही परवाना असलेल्या 25 फुटाची न करता 16 फुटाची केल्याचे ही संदीप खर्डेकर आणि विशाल भेलके यांनी स्पष्ट केले.पूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या महोत्सवात गुरुवार 29 सप्टेंबर ला रात्री 9 वाजता बायको कमाल मेहुणी धमाल हे नाटक यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर केले जाणार आहे, तर शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तुमच्यासाठी काय पण हा लावण्यांचा कार्यक्रम सादर केला जाईल.शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सायं 6 वाजता बालजत्रा,रविवारी 2 ऑक्टोबर रोजी अस्सा भोंडला सुरेख बाई व महाआरती,सोमवार 3 ऑक्टोबर व मंगळवार 4 ऑक्टोबर दांडिया,मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी मंगळागौर व देवीची गाणी आणि कोजागिरी पौर्णिमेला दांडिया व दुग्धपानाने महोत्सवाची सांगता होईल असे संदीप खर्डेकर, विशाल भेलके व उमेश भेलके यांनी सांगितले.याच दरम्यान दुर्गम भागातील गरजू विद्यार्थिनींना स्वेटर वाटप, विशेष मुलांना चित्रपट दाखविणे, तृतीयपंथीयांना मदत असे अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे उत्सव प्रमुख मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर, प्रतीक खर्डेकर व मोहित भेलके यांनी जाहीर केले.
दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा भव्य प्रमाणात नवरात्र साजरी केली जाणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे असेही संयोजकांनी सांगितले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुद्रांक विभागाचा आढावा

पुणे दि.24: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात गतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, सह नोंदणी महानिरीक्षक ज्ञानेश्वर खिलारी, नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड, सुहास मापारी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. हर्डीकर यांनी विभागामार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. रजिस्ट्रेशन ॲक्ट १९०८ मधील सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्ताव ल, मुंबई मुद्रांक अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव, नोंदणी विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञानामार्फत सुरू असलेले नवीन उपक्रमाची सदारीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

महसूल विभागातील इतर सर्व कार्यालये, तहसिल कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्यासाठीच्या उपाययोजना याबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील सर्व कार्यासन अधिकारी उपस्थित होते.

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, दि. २४: जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक असून सध्याच्या व्यवस्थेचा कालबद्धरित्या आढावा घेत नव्या सुधारणांचे प्रस्ताव सादर करावेत, असे असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाची आढावा बैठक मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, जमाबंदी अपर आयुक्त आनंद रायते, भूमी अभिलेखचे पुणे प्रदेश उपसंचालक किशोर तवरेज, नगर भूमापन उपसंचालक बाळासाहेब काळे, भूमी अभिलेख एकत्रीकरण वसंत निकम, ई- फेरफारच्या राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी सरिता नरके आदी उपस्थित होते.

महसूलविषयक सेवांचे अधिकाधिक संगणकीकरण केल्यास नागरिकांचा कार्यालयात येण्याचा त्रास वाचून विभागातील मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढेल, असे सांगून श्री. विखे पाटील म्हणाले, सेवांच्या संगणकीकरणासाठी विभागाचा माहिती तंत्रज्ञान कक्ष अधिक बळकट करावा. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची सेवा घ्यावी. फेरफार नोंदी प्रलंबित राहण्याच्या कारणांचा आढावा घेऊन त्याअनुषंगाने महत्त्वपूर्ण उपाययोजनांचे प्रस्ताव द्यावेत.

महसूलमंत्री पुढे म्हणाले, विभागाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर उपलब्ध माहितीच्या आधारे फेरफार नोंदींच्या सद्यस्थितीचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. जास्त नोंदी प्रलंबित राहत असलेले जिल्हे, तालुके, गावे यांचा आढावा घेऊन जबाबदारीचे तत्व अंमलात आणण्यासाठी कार्यपद्धती तयार करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

भूमी अभिलेख तसेच मुद्रांक व नोंदणी विभागाची संयुक्त ‘सीएफसी’ केंद्रे सुरू करा
भूमी अभिलेख तसेच मुद्रांक व नोंदणी विभागाचे काम पूरक असून दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तालुक्याच्या ठिकाणी सामान्य सुविधा केंद्रे केल्यास नागरिकांना या सेवा तत्परतेने मिळू शकतील. प्रलंबित फेरफार नोंदणी तसेच इतर कामांचा आढावा घेण्यासाठी तालुका स्तरावर संनियंत्रण समित्या स्थापन कराव्यात. विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचे बळकटीकरण करावे, असेही श्री. विखे यावेळी म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा आढावा
मोजणीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षित विद्यार्थी तसेच आवश्यक असल्यास बाह्यस्रोताद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करुन घेऊन मोजणीच्या कामाला गती द्या, अशा सूचना श्री. विखे पाटील यांनी दिल्या. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील जिल्ह्यांमधील प्रलंबित जमीन मोजणीच्या प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदूरकर उपस्थित होते.

यावेळी जमाबंदी आयुक्त श्री. सुधांशू यांनी भूमी अभिलेख विभागात सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. डिजिटल स्वाक्षरीत सात-बारा, आठ-अ आदी अभिलेख तसेच तलाठ्याकडून देण्यात येणाऱ्या अभिलेखातील नक्कल फी माध्यमातून विभागाकडे २०१९ पासून १०५ कोटी ३५ लाख रुपये रक्कम स्वीय प्रपंची खात्यामध्ये (पीएलए) जमा झाली आहे. यापैकी ४५ कोटी ७१ रुपये खर्च करुन लॅपटॉप, प्रिंटर तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ई-हक्क प्रणाली, ऑनलाईन फेरफार, ई- चावडी प्रकल्प, मालमत्ता पत्रक संगणकीकरण, मोजणीसाठी कोर्स आणि रोव्हर यंत्रांचा वापर आदींबाबत माहितीचे सादरीकरण श्री. सुधांशू यांनी केले.

बैठकीस भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कऱ्हाटी येथील ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन

पुणे,: जिल्हा कुपोषणमुक्ती करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण २१ प्रकल्पातील ५३२ ग्राम बाल विकास केंद्रामध्ये ११६ सॅम बालके व ७७८ मॅम बालके असे एकूण ८९४ बालके दाखल करण्यात आलेली आहेत. ही ग्राम बाल विकास केंद्रे ५० दिवसाकरिता सुरु आहेत. आहार व अतिरिक्त मानधनसाठी प्रति बालक ५० दिवसाचे ग्राम बाल विकास केंद्राकरीता २ हजार १५५ रुपये प्रमाणे आगाऊ निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. केद्राकरीता प्रमाणित केलेली सर्व ७ औषधी ग्राम बाल विकास केंद्रामध्ये उपलब्ध करुन देण्यात येतात.

एसएनडीटी महाविद्यालय ऑफ होम सायन्स, पुणे यांनी प्रमाणित केलेली आहार संहितेनुसार सॅम व मॅम बालकांना दिवसातून आठ वेळा आहार देण्यात येतो. त्यामध्ये ग्राम बाल विकास केंद्राचे मध्ये दाखल होण्यापूर्वी बालकाला घरचा आहार देण्यात येतो. सकाळी ८ वाजता नाचणी खीर,गहूसत्व खीर, सकाळी १० आणि दुपारी १२ वाजता अंगणवाडीतील आहार, दुपारी २ वाजता मेथी, कोथिंबीर मुठीया, सायंकाळी ४ वाजता केळी, सांय ६ वाजता मसाला इडली व मुरमुरा लाडू किंवा उतप्पा व मुरमुरा लाडू, रात्री ८ वाजता थालीपीठ अशा प्रकारे बालकाला आहार देण्यात येतो, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी जामसिंग गिरासे यांनी दिली आहे.

शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी हास्य योग महत्त्वाचा- डॉ. रोहिणीताई पटवर्धन

लोकमान्य हास्ययोग संघ परिवारातर्फे पश्चिम विभागीय मेळावा

पुणे : “शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हास्ययोग महत्वाचा आहे. हास्य योगाला अध्यात्मिक, वैज्ञानिक आधार आहे. सकाळच्या प्रसन्न व आल्हाददायी वातावरणात एक तास हास्ययोग केला, तर आपल्याला संपूर्ण दिवसभर उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळते,” असे मत वृद्धत्वशास्त्र तज्ज्ञ डॉ. रोहिणीताई पटवर्धन यांनी व्यक्त केले.
लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात आयोजित पश्चिम विभागीय मेळाव्यात डॉ. पटवर्धन बोलत होत्या. प्रसंगी हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, उपाध्यक्ष डॉ. जयंत मुळे, उपाध्यक्ष बंडोपंत फडके, पश्चिम विभागीय समन्वयक शंकर गुंजाळ, प्रसाद अंबिकर आदी उपस्थित होते.
डॉ. रोहिणीताई पटवर्धन म्हणाल्या, “हास्यक्लब ही चळवळ आता जगभर विस्तारली आहे. सकाळी एक तास हास्ययोग करणाऱ्या व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम, आनंदी असल्याचे दिसून येते. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार करून, स्वतःला वेळ द्यायला हवा. नियमित हास्य योग केला, चांगला आहार ठेवला आणि चांगल्या विचारांना आत्मसात केले तर आपण सकारात्मकपणे काम करू शकतो. इतरांनाही मदत करण्याची भावना आपल्या मनात निर्माण होते.”
डॉ. सुभाष देसाई म्हणाले, “हास्य योगाची साधना गरजेची आहे. आनंदी व निरोगी दीर्घायुष्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी हास्ययोग उपयुक्त आहे. लोकमान्य हास्ययोग संघाच्या परिवारात वाढ होत असून, आज ७० शाखातुन चार हजार लोक सहभागी होत आहेत.”

द्वितीय सत्रात ‘हास्य’ या विषयावर समुहगीत, नृत्य, नाट्य असे विविधांगी सादरीकरण झाले. प्रास्ताविक डॉ. प्रसाद अंबिकर यांनी केले. सूत्रसंचालन दीपा पराडकर व डॉ. मानसी अंबिकर यांनी केले. सुहासिनी दीक्षित यांनी आभार मानले.

महाराष्ट्र हा गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफक्चरिंग हब व्हावा : फत्तेचंद रांका

पुणे :
‘सराफांनी नव्या डिझाईनचे दागिने घडवावेत, फक्त सोनसाखळी, अंगठी, गंठण यामध्ये अडकू नये. नव्या मशीन शिकाव्यात.एकत्र येऊन ‘गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफॅक्चरिंग हब’ तयार करावे.महाराष्ट्र इतर राज्यांच्या आधी मॅन्युफॅक्चरिंग हब बनावे, यासाठी सामूहिक  प्रयत्न  करावे,असे आवाहन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष  फत्तेचंद रांका यांनी केले.
गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन( महाराष्ट्र ) आयोजित पुणे जिल्हा कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे या नात्याने  बोलत होते. दुर्वाकुर हॉल( टिळक रस्ता ) येथे ही कार्यशाळा शनिवारी,२४ सप्टेंबर रोजी झाली. गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन ( महाराष्ट्र) चे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे,कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर,खजिनदार दीपक देवरुखकर,उप खजिनदार कालिदास कांदळगावकर, प्रशासकीय सचिव सतीश पितळे,सचिव राजाभाऊ वाईकर,पुणे जिल्हाध्यक्ष दामोदर खरोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नचिकेत भुर्के, पुणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत चाटोरकर, पुणे शहर प्रमुख सत्यनारायण वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
फत्तेचंद रांका म्हणाले, ‘व्हॅल्युअर्सने आपले ज्ञान अद्ययावत करावे, त्यासाठी वेळ काढावा, काळा प्रमाणे बदलावे. मात्र, मूलभूत ज्ञानाची कास सोडू नये. कायद्याचे ज्ञान ठेवावे.सोने चांदीच्या दागिन्यांचे व्हॅल्युएशन करताना व्हॅल्युअर्सने अनुभवाचा, डोळयांचा कस लावावा, कानसने घासून पाहावे, तीच महत्वाची कसोटी आहे. गोल्ड व्हॅल्युअर्सना दागिने हातात घेतल्यावर मूल्यांकन आणि खरे खोटेपणा समजला पाहिजे, कधीही ओव्हर व्हॅल्युएशन, खोटे व्हॅल्युएशन करुन बँकांना आणि स्वतःला अडचणीत आणू नये. हॉलमार्क विना दागिने सोबत ठेऊ नयेत. स्पर्धेच्या जमान्यात सत्व गमावू नये. प्रशिक्षणावर भर द्यावा.

बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रशिक्षण

गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता आयोजित  कार्यशाळेत शनिवारी  असोसिएशनच्या तज्ञ कोअर कमिटी मेंबर्सनी व्हॅल्युअर्स बांधवांना व्हॅल्युएशन संबंधी सखोल मार्गदर्शन केले. तसेच बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घेण्याचे असोसिएशनचे नियोजन आहे. 

आग्र्याच्या लालकिल्ल्यात डॉ. अमोल कोल्हेंची ‘गरुडझेप’

इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी आग्र्याच्या लालकिल्ल्यात मिळाली. निमित्त होते शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या प्रमोशनचे. प्रफुल्ल तावरे प्रस्तुत आणि डॉ. अमोल कोल्हे निर्मित हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशन करिता गरुडझेपच्या टीमने माध्यम प्रतिनिधींसह आग्रा भेट केली.

या चित्रपटाच्या निमित्ताने हा थरार जिथे घडला त्या लालकिल्ल्यात अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी हा ऐतिहासिक अध्याय, त्याबद्दलची माहिती, शूटिंग दरम्यानचा अनुभव याबाबतची माहिती माध्यम प्रतिनिधींना यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे, त्यातूनच इतिहासाचे स्मरण आणि आयुष्याची लढाई लढण्याची प्रेरणा मिळू शकते. या भावनेतूनच आग्रा भेटीचा हा अनुभव देण्याची संकल्पना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि चित्रपटाच्या टीमने मांडली.

आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर,  प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

अचूक नियोजन करणे, तपशीलवार माहिती गोळा करणे यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळत गेले. आग्र्याहून सुटका ही मोहीम याचेच उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला धैर्याने, संयमाने सामोरं जाण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण प्रत्येक मोहिमेत दिसतो. शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातून हा थरार आणि महाराजांच्या या गुणांचा प्रत्यय घेता येणार आहे.

जगदंब क्रिएशन्स या निर्मीती संस्थेच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल कोल्हे यांची आहे.

येत्या ५ ऑक्टोबरला शिवप्रताप गरुडझेप’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, ठेचून काढू; तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा

पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिलेल्या नाहीत- पुणे पोलिस

पुणे-‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर, या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाही. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्ट करा, यातच हिंदुस्थानाचे हित आहे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.दरम्यान पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिलेल्या नाहीत असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.

‘एनआयए’ने छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली. त्याविरोधात पुण्यात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे. अशाप्रकारची झणझणीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

‘पीएफआय’विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्याचे करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप होतोय. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र, हे आरोप नाकारले आहेत. त्याचप्रमाणे ‘पीएफआय’च्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे पुण्याचे डीसीपी सागर पाटील यांनी म्हटले आहे. बेकायदेशीरपणे जमावाविरुद्ध ‘पीएफआय’वर मात्र गुन्हा दाखल दाखल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘पाकिस्तान घोषणाबाजी’वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडक कारवाई करणार ; फडणवीस म्हणाले- शोधून काढू सोडणार नाही

पुणे-पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलिस यंत्रणा त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत. असा कडक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पीएफआय’ घोषणाबाजी प्रकरणी दिला आहे.त्याचप्रमाणे पाकिस्तान जिंदाबादची घोषणा जर कोणी महाराष्ट्रात अथवा भारतात देणार असेल तर त्याला सोडणार नाही. जिथे असेल तिथे शोधून कारवाई करू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ‘पीएफआय’ आंदोलनात‘पाकिस्तान जिंदाबाद’आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

‘पीएफआय’विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल आंदोलन करण्याचे करण्यात आले. मात्र, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. यावेळी अनेकांना अटक करण्यात आली होती.

तुम्ही खोके घेऊन एकदम ओके, पण तरुणांच्या रोजगाराचे काय? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

पुणे -तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके झालात, पण आमच्या रोजगाराचं काय, असा प्रश्न तरुणांचा आहे. फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.खोके सरकारचे लक्ष त्यांच्या गटात कोण येतेय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतेय, याकडे कुणाचेच लक्ष नाहीय, या शब्दांत त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

हजारो शिवसैनिक एकवटले

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

प्रकल्प दुसऱ्या राज्यात

शिंदे गटावर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. जो प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणे गरजेचे होते. जो येऊ शकत होता. तो प्रोजक्ट दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. वेदान्त-फॉक्सकॉन, बल ट्रक पार्क आणि मेडिसिन डिव्हाइस पास्क हा प्रकल्पही आता महाराष्ट्रातून निघून गेला आहे. महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प बाहेर जात आहेत. 100 टक्के तळेगावात येणारा प्रोजक्ट सरकार बदलल्यानंतर पळवालाच कसा? मविआ सरकार असते तर असे घडले नसते.

रोजगार देखील गेले

आदित्य ठाकरे म्हणाले, एकंदरीत आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

चांगल्या गोष्टीसाठी बोलणार

आदित्य ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी राजकारण केले. ते आम्हाला राजकारण करू नये, असे शिकवत आहेत. आम्ही राजकारण करत नाही आहोत. मुळात तरुणांच्या नोकरींबद्दल बोलणे राजकारण आहे. तर ठीक आहे आम्ही राजकारण करत आहोत. चांगल्या गोष्टींसाठी आम्ही बोलत आहोत.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प

राज्यात तब्बल साडेतीन लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आणू शकणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शेवटच्या क्षणी गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकार हे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. राज्यभरामध्ये आंदोलन केली जात आहे.