Home Blog Page 138

जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीकडून राज्यभर निषेध आंदोलन.

मुंबई,
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा आहे. या अत्याचारी जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने आज राज्यभर निषेध आंदोलन करून हा अन्यायकारक कायदा रद्द करा,अशी मागणी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या आंदोलात भाग घेतला.

मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, यावेळी आमदार डॉ. ज्योती गायकवाड, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व्हेरायंटी चौक येथील गांधी पुतळ्याजवळ अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष आ. अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाणा, जालना, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, पालघर, रत्नागिरी, धाराशिव, सोलापूर, लातूर, ठाणे, जळगाव, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे यासह राज्यभरातील सर्व जिल्हाच्या ठिकाणी आणि तालुका मुख्यालयी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते, डावे पक्ष व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले.

गौरी गाडगीळ आता ‘पर्पल फेस्ट’च्या दूत

पुणे : ‘यलो’ चित्रपटातील भूमिकेतून ओळख मिळवलेली,आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यासाठी प्रसिद्ध पुण्याच्या गौरी गाडगीळ यांची आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ साठी ‘पर्पल अॅम्बेसेडर’ म्हणून निवड झाली आहे. त्या ‘बौद्धिक दिव्यांगत्व’ प्रकाराचे त्या प्रतिनिधित्व करतील. हा महोत्सव नऊ ते १२ ऑक्टोबर या दरम्यान गोव्यात होणार आहे. गोवा सरकारच्या अपंग व्यक्ती आयुक्त कार्यालय, केंद्र सरकारचा दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघटना इंडिया यांच्या सहकार्याने या फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे

चव्हाणनगर कमानीजवळ मारहाण करून जबरीने लुटणारे तिघे ट्रेझर पार्कजवळ पकडले, २ अल्पवयीन

पुणे- सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर कमानी जवळ रात्री साडेबारा वाजता अपघातग्रस्त बनून एकाला लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी ट्रेझर पार्कजवळ पकडले .यातील दोघे अल्पवयीन मुले आहेत तर एक १९ वर्षाचा तरुण आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/०९/२०२५ रोजी रात्री १२/३० वाचे सुमा. फिर्यादी चव्हाणनगर कमान चौक पुणे सातारा रोड काळुबाई मंदिराजवळ पुणे येथुन जात असताना कात्रजकडुन एका मोपेड दुचाकी गाडीवरून तीन इसम अचानक आडवे आले व त्यांचे दुचाकी गाडीची फिर्यादी यांचे गाडीला धडक झाली व ते खाली पडले. त्यावेळी फिर्यादी गाडी थांबवुन कोणी इसम जखमी झाले काय याबाबत त्यांचेकडे विचारण्यासाठी गाडीतुन खाली उत्तरले असता त्या तीघांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच आम्हाला पायाला लागले आहे दहा हजार रूपये खर्च दे असे म्हणाले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली व फिर्यादी यांचे माझे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन चोरून नेले बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७९/२०२५ भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे अनोळखी आरोपी गुन्हा करून फरार झाले होते.
दि.०८/०९/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व अमित पदमाळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे तीन आरोपी हे ट्रेझर पार्क सहकारनगर पुणे येथील श्रीहरी हॉटेलचे जवळ एमएच १२ एक्स झेड ५४७२ या काळे रंगाचे अॅक्सेस गाडीवर बसलेले असुन ते कोणाची तरी वाट पाहत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन तीनही आरोपीना ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) अनिकेत गणेश शिंदे वय १९ वर्षे रा.सर्वे नं.९२, शाहु वसाहत, अनिता वॉशिंग सेंटर मागे, लक्ष्मीनगर पुणे असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांचेपैकी दोन विधिसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर इरामांकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी फिर्यादी यांना गाडीची धडक झाल्याचे कारणा वरुन मारहाण करून त्यांचेकडील दोन मोबाईल हिसकावुन चोरून नेलेची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून एकुण २५,०००/- रु किंचे दोन मोबाईल हॅण्डसेट जप्त करून सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७९/२०२५ भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

चाकणमधील १५० अतिक्रमणे जमीनदोस्त २१ होर्डींग्ज हटवले

पीएमआरडीएसह नगरपरिषद, एनएचएआयकडून संयुक्त कारवाईला प्रारंभ

पिंपरी : चाकण एमआयडीसीसह परिसरातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून (दि. १०) नगरपरिषद, एनएचएआयकडून पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी प्रशासकीय यंत्रणेने स्पष्ट केले.तर आज सायंकाळपर्यंत एकूण १५० अतिक्रमणे काढण्यात आली असून २१ होर्डींग्ज हटवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसीसह शहर परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर चाकण- तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे ४० अतिक्रमणे काढण्यात आली. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा आशयाच्या नोटीसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे.

या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे- नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेबावीस मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सह कार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेस अधिक शक्तिशाली राष्ट्र बनविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही राष्ट्र प्रमुखाचेच नव्हे तर,त्या त्या देशातील सर्व यंत्रणा आणि सर्व सामान्य नागरिकांचे हेच ध्येय असले पाहिजे. त्यामुळे
डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेस अधिक शक्तिशाली राष्ट्र बनविण्याचे ध्येय असेल तर ते अजिबात वावगे नाही. “अमेरिकन फर्स्ट” हे त्यांचे ब्रीद जगजाहीर आहे.

पण मुळात मला प्रश्न असा पडतो की,”मूळ किंवा खरा” अमेरिकन कुणास म्हणावे ?
कारण अमेरिकेचा इतिहास पाहिला तर असे दिसते की,
मूळ अमेरिकन लोक
सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी “आशिया” खंडातून अलास्कामार्गे उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडात स्थलांतरित झाले.अशा या खंडावर २२ ऑक्टोबर १४९२ रोजी क्रिस्टोफर कोलंबस याने पहिल्यांदा पाऊल ठेवले.पुढे तिथे स्पॅनिश, फ्रेंच,डच,इंग्रज आदी युरोपीय लोकांनी वसाहती स्थापन केल्या. या वसाहतवाद्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य युद्ध केल्यानंतर अमेरिकेने ग्रेट ब्रिटनपासून
४ जुलै १७७६ रोजी स्वातंत्र्य
मिळविले आणि हुकुमशाही, राजेशाही,लष्करशाही अशा अनेक प्रकारच्या शासन व्यवस्थांपैकी सर्वोत्कृष्ट ( परिपूर्ण नव्हे!) समजल्या जाणारी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली.
लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते,
अमेरिकेचे १६ वे
राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या करताना म्हटले आहे की,
“लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी , लोकांसाठी चालविलेले राज्य होय”.पण आज मात्र दुर्दैवाने लोकशाही म्हणजे “लोकांकडून स्वतःला निवडून घेऊन मनमानी पद्धतीने राज्य कारभार करणे होय” असे चित्र दिसतेय.

अशा या अमेरिकेचे एकूण क्षेत्रफळ ९८,३३,५२० किमी इतके प्रचंड मोठे आहे. ५० राज्ये मिळून हे राष्ट्र बनलेले असल्याने त्याचे पूर्ण नाव
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे आहे. कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.तर रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांच्या सागरी सीमा अमेरिकेला लागून आहेत.अमेरिका हा एक वेगळा खंड आहे,ही संकल्पना मांडणारा आणि ज्याच्यामुळे अमेरिका हे नाव पडले तो
अमेरिगो वस्पुची हा संशोधक
इटालियन होता.

आता इथे हे लक्षात घेतले पाहिजे की,”अमेरिकन फर्स्ट” असा नारा देणाऱ्या खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांचे मूळही जर्मन आहे. फ्रेडरिक ट्रम्प या त्यांच्या आजोबांचा जन्म नैऋत्य जर्मनीतील कॅलस्टॅड गावात १८८५ मध्ये झाला.
त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प हे न्यू यॉर्क येथे रिअल इस्टेट डेव्हलपर होते.आई मेरी अँनी मॅकलिओड ट्रम्प ही स्कॉटिश होती.डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स बरो येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण खाजगी क्यू-फॉरेस्ट स्कूलमध्ये
तर माध्यमिक शिक्षण यॉर्क मिलिटरी अकादमीमध्ये झाले.
पुढे ते फोर्डहॅम आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात शिकले.त्यांनी बॅचलर ऑफ बिझीनेस ॲडमिनिस्ट्रेशन ची पदवी प्राप्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतल्यानंतर या व्यवसायाचे नाव
“ट्रम्प ऑर्गनायझेशन” असे ठेवले .

अमेरिकेत इंग्रजी शिवाय हवाईयन,सिओक्स या भाषाही बोलल्या जातात.वॉशिंग्टन डीसी ही अमेरिकेची राजकीय तर न्यूयॉर्क ही आर्थिक राजधानी आहे. डॉलर हे अमेरिकेचे चलन आहे.प्रत्येक देशाच्या चलनाची तुलना नेहमी डॉलर शी करण्यात येते,इतके ते “भारी” आहे.

अमेरिकेचे नाव दिलेली व्यक्ती इटालियन होती. तर खुद्द विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मूळ जर्मन आहेत,हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे,अशा या एक नाही, दोन नाही , हजारो नाही तर लाखो,करोडो स्थलांतरित लोकांमुळे हा देश घडला आहे .त्यामुळे या देशाला “स्थलांतरितांचा देश “असेही म्हटले जाते .

आज मितीला अमेरिकेची लोकसंख्या ३४ कोटी हून अधिक आहे.त्यात चिनी वंशाच्या लोकांची संख्या पहिल्या क्रमांकावर म्हणजे
५ कोटी ५० लाख इतकी आहे.तर भारतीय वंशाच्या लोकांची संख्या ही त्या खालोखाल म्हणजे ५ कोटी
२० लाख इतकी आहे. अमेरिकेतील आजच्या भारतीयांकडे बघून आपल्याला असे वाटते की,गेल्या ४०/५० वर्षांपूर्वीच भारतीय तिकडे जायला सुरुवात झाली असेल. तर प्रत्यक्षात तसे नाही. कारण
अमेरिकेच्या भूमीवर १६३५ साली मजूर म्हणून नेलेला
आणि टॉम असे ख्रिश्चन नाव
ठेवलेला हा पहिला भारतीय आहे.टॉम हा व्हर्जिनिया तील जेम्स टाऊन येथील वस्तीच्या
हेडराइट मध्ये नोंदविण्यात आला होता.

अमेरिकेची वाटचाल ही कधीच साधी,सरळ,
शांततापूर्ण नव्हती. अनेक वांशिक, सामाजिक, आर्थिक, मानवी हक्क विषयक लढे, आंदोलने होत होत अमेरिकेचा विकास सुरू आहे.

आता या सर्व पार्श्वभूमीवर ट्रम्प साहेबांनी भारतासह अनेक देशांवर अनेक एकतर्फी
उद्योग,व्यापार, अमेरिकेत प्रवेश ,अमेरिकेत असलेल्या व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावणे अशा एक ना अनेक उलटसुलट निर्णयांचा धडाका लावून सर्वांच्या काळजात धडकीच भरवली आहे.या त्यांच्या हडेलहप्पी कारभाराने
अमेरिकेतील निदान अर्धी लोकसंख्या आणि जगातील सर्व देश एकीकडे तर ट्रम्प आणि त्यांचे समर्थक दुसरीकडे अशी जगाची विभागणी होणे सुरू झाले आहे. अर्थात या निमित्ताने का होईना, जगातील सर्व देश एकत्र आले,बंधुभावाने राहू लागले तर जगात सुरू असलेली युद्धे थांबतील. बहुतेक प्रत्येक देशाचा सर्वाधिक निधी हा संरक्षणासाठी खर्च होत असतो. देशादेशांमध्ये परस्पर विश्वासाचे नाते निर्माण झाले तर हा सर्व निधी त्या त्या देशातील विकास कामांसाठी
खर्च होऊन जगातील लोक
शांततेने,सुखाने जगू शकतील.

पण ट्रम्प महाशयांनी अमेरिकेसह सर्व जगात जे गोंधळाचे,अशांतेतेचे,
अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले आहे,ते भविष्यासाठी नक्कीच भयसुचक आहे. जगाला घडविण्यापेक्षा बिघडविण्याचे कामच सध्या
ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे.
बरे ट्रम्प यांच्या उद्देशामागे अमेरिकेचा विकास हे एकमेव कारण असते तर बाब वेगळी होती. पण या उद्देशामागे धार्मिक,वांशिक,सामाजिक कारणेही असल्याचे दिसते.

अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते.स्वतः अमेरिका आजपर्यंत जगात “मोठा भाऊ” या दादागिरीच्या भूमिकेत राहिला आहे.त्यामुळे
ट्रम्प यांची आताची दादागिरी कशी रोखायची,तिला आळा कसा घालायचा, अमेरिकन काँग्रेस ला नेमके काय अधिकार आहेत,ट्रम्प साहेबांविषयी त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे,असे एक ना अनेक प्रश्न आजच्या घडीला पडले आहेत.

या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ,जगाला नेहमी शांततेचा संदेश देत आलेल्या भारताने आणि भारतीयांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. यातील पहिले पाऊल म्हणून अमेरिकन भारतीयांनी सहमतीने एक दिवस ठरवून, त्या दिवसाची सामूहिक रजा घ्यावी.त्यांच्या या रजा घेण्याने अमेरिकन अर्थ व्यवस्था, दैनंदिन जीवनावर काय, किती, कसा परिणाम होतो,हे दिसून येईल.आज अमेरिकेन भारतीय एकूण कराच्या जवळपास ५ ते ६ टक्के रक्कम भरतात. अमेरिकेतील ६० टक्के हॉटेल, मोटेल व्यवसाय भारतीयांकडे आहे. अमेरिकेतील अनेक छोटे मोठे उद्योग भारतीयांनी सुरू केले आहेत.अनेक वैद्यकीय,
अभियांत्रिकी ,माहिती तंत्रद्न्यान,तंत्रद्न्यान,संशोधन, शैक्षणिक प्रकल्पांमध्ये भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. कितीतरी उद्योग, व्यावसायिक, शैक्षणिक आणि इतर असंख्य संस्थांच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन,सहमतीने एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन आपल्या अस्तित्वाची, त्या अस्तित्वाची ,अमेरिकेच्या अस्तित्वासाठी असलेली अपरिहार्यतेची जाणीव ट्रम्प साहेबांना करून दिली पाहिजे. अमेरिकन भारतीयांचे अनुकरण इतरही लोक करतील .ट्रम्प यांच्या धोरणांशी,कार्य पद्धतीशी सहमत नसलेल्या व्यक्तीही त्यांच्या सोबत येतील आणि त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाण्यापेक्षा तिला वेळीच आला बसण्यास मदत होईल असे मला वाटते.अर्थात यानेही
फार काही फरक न पडल्यास पुढे काय करायला हवे हे पुढचे पुढे ठरविता येईल.
_ देवेंद्र भुजबळ
९८६९४८४८००

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताकडून सुनेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न

पुणे :एमबीए झालेला मुलगा नपुंसक असताना मुलीच्या आई वडिलांची फसवणुक करुन लग्न लावून दिले.आणि मुल व्हावे, यासाठी सासर्‍याबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यासाठी मुलाने व सासुने त्रास दिला. ही विवाहिता एकटी असताना निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने रुममध्ये शिरुन तिला आपल्या पदाची व ओळखीची भिती दाखवून बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (वय ६१), त्याची पत्नी (वय ५६) व मुलगा (वय ३५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .

याबाबत एका ३० वर्षाच्या विवाहितेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ मे ते २३ जून २०२५ दरम्यान घडली आहे. ही घटना घडल्यानंतर हे सर्व कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सासरे हे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आहेत. त्यांचा मुलगा एमबीए झाला आहे. मुलगा नपुंसक आहे, हे माहिती असताना ती गोष्ट लपवून ठेवून पुणे जिल्ह्यातील तरुणीशी त्याचा मे महिन्यात विवाह केला. आपला पती हा नपुसंक असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यावर मुल व्हावे, यासाठी तिचा पती व सासु यांनी सासरे बरोबर संबंध ठेवावेत, यासाठी विवाहितेला शारीरीक व मानसिक त्रास दिला. २३ जून रोजी फिर्यादी रुममध्ये एकटी असताना सासरा जबरदस्तीने रुममध्ये शिरला. आपल्या सुनेला पदाची व ओळखीची भिती दाखवून आपल्याबरोबर शारीरीक संबंध ठेवण्याबद्दल मागणी करुन तिचा हात धरुन तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर तिने आता याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या कुटुंब घर बंद करुन पसार झाले असल्याचे दिसून आले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

एआय जनरेटेड प्रतिमांच्या वापरावर बंदी घाला-ऐश्वर्यानंतर अभिषेक बच्चन दिल्ली हायकोर्टात

0

दिल्ली- मंगळवारी ऐश्वर्या रायने व्यक्तिमत्त्व हक्कांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या पाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्याने न्यायालयाला त्याच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व हक्कांचे (इमेज अँड पर्सनालिटी राइट्स इन पब्लिक) संरक्षण करण्याची विनंती केली. तसेच, वेबसाइट्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्याची प्रतिमा, व्यक्तिमत्त्व आणि बनावट व्हिडिओ, विशेषतः लैंगिक सामग्री वापरण्यापासून रोखले पाहिजे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. पहिल्या सुनावणीत अभिषेक बच्चन यांच्या वतीने उपस्थित असलेले वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला सांगितले की, अनेक प्रतिवादी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ आणि चित्रे तयार करत आहेत. या बनावट मजकुरात अभिषेक बच्चनचे नाव, फोटो आणि अगदी बनावट स्वाक्षरी देखील समाविष्ट आहे.

वकिलाने असेही म्हटले की, काही मजकूर लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह आहे, जो केवळ अभिनेत्याच्या प्रतिमेला हानी पोहोचवत नाही तर कायद्याचे गंभीर उल्लंघन देखील आहे.

ऐश्वर्या रायनेही व्यक्तिमत्त्व हक्कांची मागणी केली

ऐश्वर्या रायने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात व्यक्तिमत्त्व हक्कांसाठी याचिका दाखल केली होती. अभिनेत्रीचे वकील संदीप सेठी यांनी अशा वेबसाइट्सबद्दल सांगितले ज्या ऐश्वर्याचे नाव आणि तिचे चित्र असलेले मग, टी-शर्ट आणि पेय पदार्थांसह अनेक अनधिकृत वस्तू विकत आहेत आणि स्वतःला अधिकृत प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करत आहेत.

लाईव्ह लॉ नुसार, या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी सांगितले की, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि परवानगीशिवाय ऐश्वर्याचे बदललेले फोटो किंवा तिचे व्यक्तिमत्व वापरणाऱ्या लोकांवर बंदी घातली जाईल.

न्यायालयाने म्हटले आहे की ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी मनाई आदेश जारी केला जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जानेवारी २०२६ रोजी होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की मनाई आदेश हा न्यायालयाचा आदेश आहे ज्यामध्ये एखाद्याला बेकायदेशीर किंवा अनधिकृत काम थांबवण्यास सांगितले जाते.

वकील संदीप सेठी यांनी न्यायालयाला सांगितले की, ऐश्वर्या नेशन वेल्थ नावाच्या कंपनीने लेटरहेडवर अभिनेत्रीचा फोटो लावला आणि तिला अध्यक्ष म्हटले. ते म्हणाले, “माझ्या क्लायंटला याची काहीच माहिती नाही. ही पूर्णपणे फसवणूक आहे.”

या सेलिब्रिटींना व्यक्तिमत्त्वाचे अधिकार आहेत

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या आधी, अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीही या वर्षी मे महिन्यात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी आरोप केला होता की त्यांची प्रतिमा आणि व्हिडिओ बदलून परवानगीशिवाय वस्तू विकल्या जात आहेत. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचेही संरक्षण केले होते.

२०२३ मध्ये, न्यायालयाने अनिल कपूरची प्रतिमा, आवाज आणि त्यांच्या “झकास” या वाक्यांशाचा गैरवापर करण्यास बंदी घातली होती. त्याच वेळी, नोव्हेंबर २०२२ मध्ये, अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्क देखील संरक्षित करण्यात आले.

डिजिटल युगातील सेलिब्रिटींच्या गोपनीयता आणि प्रसिद्धीच्या अधिकारांबाबत हे प्रकरण आता एक महत्त्वाचे उदाहरण ठरू शकते. न्यायालय तात्काळ कोणत्याही प्रकारचा अंतरिम आदेश देईल की नाही हे पुढील न्यायालयीन सुनावणीत स्पष्ट होईल.

१०००भारतीय नेपाळमध्ये अडकले अन नेपाळच्या ७ मंत्र्यांनी आणि महापौरांनी घेतला भारतात आश्रय

0

नेपाळमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाने विशेष विमानसेवा सुरू केली आहे .अशांततेमुळे २४ तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर काल रात्री काठमांडू विमानतळ उघडण्यात आले. देशाबाहेर जाण्यासाठी विमानतळावर प्रवाशांची गर्दी दिसून आली.
नेपाळच्या राजधानीत अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो काठमांडूला अतिरिक्त विमानसेवा चालवतील, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी बुधवारी सांगितले.

नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया बुधवार आणि गुरुवारी दिल्लीहून काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष विमानसेवा चालवत आहे.कंपनीने सांगितले की उद्यापासून त्यांच्या नियमित उड्डाणे पुन्हा सुरू होतील. एअर इंडियाने प्रवाशांना मदत करण्यासाठी त्वरित काम करणाऱ्या सरकार आणि इतर एजन्सींचे आभार मानले.विमानतळावर जाण्यापूर्वी प्रवाशांना त्यांच्या फ्लाइटची स्थिती https://airindia.com/in/en/manage/flight-status.html येथे तपासण्याची विनंती आहे. अधिक मदतीसाठी, कृपया आमच्या 24×7 कॉल सेंटरशी 011-69329333 / 011-69329999 वर संपर्क साधा.असे एअरइंडियाने रात्री जाहीर केले आहे .

बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली आहे. परराष्ट्र सचिवांनी नेपाळमध्ये अडकलेल्या सुमारे १,००० भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.

नेपाळमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे, ६-७ कॅबिनेट मंत्री, अनेक महापौर, परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींनी आपले प्राण वाचवण्यासाठी भारतातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे. निदर्शकांचा रोष थेट त्यांच्यावरच उफाळून आला आहे.

अनेक मंत्री आणि नेत्यांच्या खाजगी निवासस्थानांवर जाळपोळ आणि तोडफोड झाली आहे. आंदोलक त्यांचा शोध घेत आहेत. म्हणून, त्यांनी नेपाळच्या सीमेवरील भारतीय शहरे, रक्सौल, आदापूर, भेलाही, छोडाडानो, मोतिहारी, बेतिया, अरेराज, केसरियाकडे वळले आहे.

नेपाळमधून पळून गेलेल्या ३५ कैद्यांना भारतीय सीमा दलाने पकडले
भारतीय सशस्त्र सीमा दलाने (SSB) आतापर्यंत नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या ३५ कैद्यांना पकडले आहे. यापैकी २२ कैदी उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेवर, १० बिहारमध्ये आणि तीन बंगालमध्ये पकडले गेले. अधिकाऱ्यांच्या मते, ही संख्या आणखी वाढू शकते.

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांतील तब्बल 100 जण हिंसाग्रस्त नेपाळमध्ये अडकल्याची माहिती आहे. सरकार या सर्वांची तेथून सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळमधील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेपाळचा प्रवास टाळावा, तसेच सध्या जे नागरीक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. विशेषतः या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. ते म्हणाले, नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन आहे.

राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनानं परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे, असे ते म्हणालेत.

आपत्कालीन मोबाईल क्रमांक जारी

आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी नेपाळमधील 977-980 860 2881 आणि 977-981 032 6134 हे दोन मोबाइल क्रमांक, तर राज्यातील 91- 9321587143 व 91-8657112333 हे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकांवर संबंधितांना व्हॉट्सअॅप कॉलही लावता येणार आहे.


नेपाळमध्ये वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली, सीपीएन (माओवादी केंद्र) अध्यक्ष पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि सीपीएन (युनिफाइड सोशालिस्ट) अध्यक्ष माधव कुमार नेपाळ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना नेपाळी सैन्याने शिवपुरीतील सुरक्षित ठिकाणी नेले आहे.शिवपुरी राजधानी काठमांडूपासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी दुपारी या नेत्यांना शिवपुरीतील आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये नेण्यात आले.

त्याच दिवशी दुपारी २ वाजता ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर लगेचच लष्कराने त्यांना बालुवातारहून शिवपुरी येथे विमानाने नेले. याशिवाय, उपपंतप्रधान आणि नगरविकास मंत्री प्रकाश मान सिंह, उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री बिष्णू पौडेल यांनाही सैन्याने त्यांच्या भैस्पती येथील निवासस्थानावरून शिवपुरी येथे विमानाने नेले. प्रचंड आणि माधव नेपाळ यांना सिंह दरबारातून तेथे नेण्यात आले.

मंगळवारी दुपारी प्रचंड यांनी सिंह दरबार येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती, ज्यामध्ये माधव नेपाल देखील उपस्थित होते. याच दरम्यान प्रचंड यांच्या निवासस्थानी आग लागल्याची बातमी आली. यानंतर, लष्कराने तातडीने कारवाई केली आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.




त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयातील न्यायवैद्यकीय औषध विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, जिथे आंदोलकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत, आतापर्यंत २५ बळींची प्राथमिक ओळख पटली आहे. सहा मृतांपैकी, ज्यांची ओळख अद्याप कळलेली नाही, त्यापैकी एक महिला आहे.“आम्ही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार शवविच्छेदन केले आहे,” असे विभाग प्रमुख डॉ. गोपाल कुमार चौधरी म्हणाले. “आम्हाला मृतदेह साठवून ठेवण्यास सांगितले आहे; आम्ही मृतांची माहिती उघड करू शकत नाही.”
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बहुतेक मृतांची ओळख घटनास्थळांवरून मिळालेल्या कागदपत्रांनुसार किंवा कुटुंबातील सदस्यांच्या ओळखीवरून निश्चित करण्यात आली आहे.“आम्ही बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना ओळख पटविण्यासाठी मृतदेह दाखवत आहोत,” चौधरी म्हणाले.

भारताने UAEला 9 विकेटनी हरवले

0

58 धावांचे लक्ष्य 27 चेंडूंत गाठले, अभिषेकने केले 30 रन; कुलदीपला 4 विकेट
दुबई-आशिया कप २०२५ मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. संघाने युएईविरुद्ध ५८ धावांचे लक्ष्य फक्त २७ चेंडूत पूर्ण केले. हा भारताचा सर्वात जलद धावांचा पाठलाग आहे. अभिषेक शर्मा ३० धावा करून बाद झाला. तर शुभमन गिल २० धावा करून नाबाद परतला.बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएई १३.१ षटकात ५७ धावांवर सर्वबाद झाला. संघाने २८ धावा करताना शेवटचे ८ बळी गमावले. सलामीवीर अलिशान शराफूने २२ आणि कर्णधार मोहम्मद वसीमने १९ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने ४ बळी घेतले. शिवम दुबेने ३ बळी घेतले. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा ३० धावा करून बाद झाला.

चेंडू शिल्लक असताना भारताचा सर्वात मोठा विजय

चेंडू शिल्लक असताना भारताचा हा सर्वात मोठा विजय होता. टीम इंडियाने दुबईमध्ये युएईविरुद्ध फक्त २७ चेंडूत (४.३ षटकात) लक्ष्य गाठले, म्हणजेच ९३ चेंडू शिल्लक होते.

यापूर्वी २०२१ मध्ये भारताने दुबईमध्ये स्कॉटलंडविरुद्ध ८१ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला होता. कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये चेंडू शिल्लक असतानाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय होता.

२०२४ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडने अँटिग्वा येथे ओमानला फक्त १९ चेंडूत हरवले. तेव्हा १०१ चेंडू शिल्लक होते. या विक्रमात श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१४ मध्ये चॅटोग्राममध्ये ९० चेंडू शिल्लक असताना नेदरलँड्सचा पराभव केला होता.

सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत- सूर्यकुमार यादव(कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
UAE- मोहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, राहुल चोप्रा, आसिफ खान, ध्रुव पराशर, हर्षित कौशिक, मोहम्मद जोहेब, हैदर अली, जुनैद सिद्दीकी, मोहम्मद रोहित, सिमरजीत सिंग.

संयुक्त अरब अमिराती vs भारत

सामना 2, आज, दुबई

संयुक्त अरब अमिराती 57-10 (13.1)

VS

भारत60-1 (4.3)

भारत ने संयुक्त अरब अमीरात ला 9 गडी राखून पराभव केला

महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समितीने घेतली ‘कॅग’च्या अहवालातील प्रकरणाबाबत माहिती

पुणे, दि. १०: महाराष्ट्र विधानमंडळ लोक लेखा समितीची बैठक समिती प्रमुख आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज झाली. यावेळी भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या सन २०१८-१९ या वर्षाच्या आर्थिक व महसूल क्षेत्र अहवालातील अनर्जित उत्पन्नाच्या महसूल वसूलीबाबतच्या परिच्छेदाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊन म्हणणे नोंदविण्यात आले.

बैठकीस समिती सदस्य आमदार प्रकाश सोळंके, सत्यजीत तांबे, समीर कुणावार, कृपाल तुमाने, रोहित पवार, महेश शिंदे, विधान मंडळाचे सहसचिव नागनाथ थिटे, उपसचिव उमेश शिंदे उपस्थित होते.

बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, वैभव नावडकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महसूल तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी माहिती सादर केली. अपर आयुक्त (महसूल) तुषार ठोंबरे यांनी स्वागत केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सीएससीमध्ये सामंजस्य करार

0

आता लाभार्थ्यांना महामंडळाच्या सेवा सीएससीमध्ये माफक दरात मिळणार

येत्या काळात मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देण्याचा प्रयत्न

पुणे, दि.१०: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सामान्य सेवा केंद्रामार्फत (सीएससी) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससीचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयामध्ये सामजस्य करार करण्यात आला.

सीएससी हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्वाचे माध्यम आहे, या करारानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या सीएससी केंद्रावर महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ आणि खर्चामध्ये बचत होणार आहे. येत्या काळात लाभार्थ्याकरिता मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रियाअधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल,

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, “या करारामुळे महामंडळाची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजू आणि पात्र तरुणांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहोचणार आहेत. कमी खर्चात आणि त्यांच्या घराजवळच त्यांना आवश्यक सेवा मिळाल्यामुळे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून मराठा समाजातील तरुणांना उद्योजक करण्याचे महामंडळाचा उद्देश पुर्णत्वास नेणे सोपे होईल.

व्यवस्थापकीय संचालक श्री. देशमुख म्हणाले, राज्यामध्ये सीएससीचे ७२ हजाराहून अधिक केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या गावातून पात्रता प्रमाणपत्र कागदपत्रे, बँक कर्ज मंजूरी, बॅकेंचा हप्ता, अपलोड करण्यासाठी प्रत्येकी ७० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या करारामुळे लाभार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नसल्याने त्यांचा वेळ वाचणार आहेत तसेच ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळेल. यामुळे महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या अनधिकृत दलालांना आळा घालणे शक्य होईल, असेही श्री. देशमुख म्हणाले.

१७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन

पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ. शरद गोरे यांनी दिली आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प. म. कार्याध्यक्ष. विक्रम मालन आप्पासो शिंदे उपस्थित होते.

ग्रंथपूजनाने या संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे. १६ भाषांमध्ये पारंगत असलेले बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिख, ग्रंथाचे लेखन करून मानवी मूल्यांपासून राजनीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नैतिकशास्त्र, धर्मशास्त्र, विधीशास्त्र, न्यायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, यासह अनेक विषयांत निष्णात असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा व त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी राज्यभरात विविध ठिकाणी केले जाते. आतापर्यंत राज्यात छ. संभाजी महाराज यांच्या नावाने १६ साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. पुण्यात होणाऱ्या या साहित्य संमेलनात रसिक साहित्यिकांनी सहभागी व्हावे यासाठीही आवाहन यावेळी करण्यात आले.

99व्या संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी : उदय सामंत

पुणे : मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी फक्त साहित्यिकांची अथवा मराठी भाषिकांची नसून शासनाची देखील आहे. महायुतीच्या सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात आधीच्या सरकारने स्थापन केलेली समिती शासकीय होती की त्या राजकीय पक्षाची होती या विषयी विश्लेषण व्हायला हवे, अशी भूमिका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या व्यासपीठावर मांडली. आधुनिक जगाला सामोरे जाताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीत होत असलेल्या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडत मराठी भाषा विभागाकडून एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही त्यांनी जाहीर केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी (दि. 10) ख्यातनाम हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सामंत बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वयाची शंभरी पार केलेल्या शि. द. फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते तर महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांची सन्मानीय उपस्थिती होती. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत मंचावर होते.
साहित्य संमेलनाच्या नियोजनातही मराठी भाषा विभाग सहभागी होईल, अशी ग्वाही देत उदय सामंत म्हणाले, मराठी भाषेची परंपरा आणि ठेवा जतन करण्यासाठी शालेय शिक्षणात साहित्यिकांवरील अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. तसेच इतर भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य मराठी भाषेत अनुवादीत व्हावे याकरिता अनुवाद समिती स्थापन करण्याचे कार्य सुरू आहे. मराठी भाषेला परदेशातही मान मिळावा यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बालसाहित्य, महिला आणि युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मानस आहे.
मराठी बोलता येत नाही म्हणून त्याला मारणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्यात राहणाऱ्या अनेक अमराठी व्यक्तींनी मराठी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींना मराठी भाषेचे शिक्षण देण्यासाठी ॲप विकसित करण्यात येत आहे. बोधचिन्हासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, हे बोधचिन्ह सरकारलाही बोध देणारे आहे. मराठी भाषेवर अन्याय होऊ नये आणि अन्याय करणाऱ्यांवर वार केला जावा हे या बोधचिन्हातून दर्शविले गेले आहे.
मराठी भाषेच्या विचाराला आणि संस्कार परंपरेला पुढे नेण्यात साहित्य संमेलनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा येथे होणारे संमेलन नाविन्यपूर्ण आणि वेगळेपण दर्शविणारे तसेच पुढच्या संमेलनाला आदर्श दर्शविणारे ठरेल, असा विश्वासही मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. मराठी भाषेच्या विकासासाठी उद्योजकांकडून सीएसआरअंतर्गत निधी संकलन करण्यात येत आहे. हा निधीही संमेलनासाठी देण्याची घोषणा त्यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यालाही उत्तमोत्तम साहित्यिक आणि कलाकारांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही उदय सामंत यांनी व्यक्त केली.
शि. द. फडणीस म्हणाले, संमेलनासाठी मी साकारलेल्या बोधचिन्हाचे अनावरण माझ्या हस्ते व्हावे हा मोठा योग आहे. व्यंगचित्रकारांना वाटते की, फक्त आम्हीच विनोद करू शकतो; परंतु राजकीय अंगाने विनोद करणारे राजकारणी आज व्यासपीठावर आहेत. त्यामुळे त्यांनी विनोदी लेखनाकडे वळावे अशी मार्मिक सूचनाही केली. शिवकालीन काळात राज्य चालविण्यासाठी फक्त तलवारीच नव्हे तर उत्तम प्रशासनाची गरज होती हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराज यांनी पेशवे पदाची नेमणूकही सातारहून केली. या लेखणीची व तलवारीची ताकद बोधचिन्हात दर्शविली जावी आणि लेखणीतून साहित्य निर्मितीसह सामाजिक दंभ, ढोंगबाजीवर तलवारीप्रमाणे वार व्हावा हे सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, संमेलनापासून दूर गेलेले साहित्य रसिक संमेलनाकडे परत यावेत या करिता प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा अभ्युदय सातऱ्यातूनच झाला आहे. शासनाची इच्छा असल्यास मराठी भाषेचे नक्कीच भले होऊ शकते. संमेलनाकरिता निधी संकलन करताना फक्त लक्ष्मीचीच पूजा न होता सरस्वतीची पूजा देखील अग्रक्रमाने व्हावी अन्यथा सरस्वतची वीणा क्षीण होईल. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असल्यास मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून मिळणारा निधी वाटपातील असमानता दूर करून मराठी भाषेच्या विकासासाठी पोहचणे गरजेचे आहे. सातारा येथे होणारे साहित्य संमेलन अधिक स्वायत्त, साहित्याभिमुख तसेच लोकाभिमुख व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा लाभली आहे याचा अभिमान आहे. साहित्य महामंडळाने 33 वर्षांनंतर साताऱ्याला संमेलनाची संधी दिली त्यामुळे सातारकर देखील या संमेलनासाठी उत्सुक आहेत. हे संमेलन उत्तम पद्धतीने यशस्वी करून सातारचा ठसा या संमेलनात आणि मराठी साहित्य क्षेत्रात नक्कीच उमटवू.
प्रास्ताविकात बोधचिन्हाविषयी माहिती देताना विनोद कुलकर्णी म्हणाले, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याचे महत्त्व बोधचिन्हातून प्रकट करण्यात आले आहे. मराठी भाषेवर अत्याचार होऊ नये तसेच इतर भाषांचे अतिक्रमण होऊ नये त्या करीता लढा दर्शविणारे बोधचिन्ह साकारण्यात आले आहे.
मान्यवरांचे स्वागत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारच्या पेढ्यांचा हार घालून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले तर आभार सुनिताराजे पवार यांनी मानले.
हास्यविनोदात रंगला सोहळा
शिवेंद्रसिंहराजे भोसले – उदय सामंत यांच्या गावी जाऊनही त्यांची भेट झाली नाही याचे मनात दु:ख होते परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली याचा आनंद आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले – हा राजकीय सोहळा नाही. राजकीय सोहळ्याप्रमाणे एकाच हाराने सत्कार न करता दोन्ही पाहुण्यांसाठी वेगवेगळे हार आणले आहेत.
उदय सामंत – सत्कारासाठी दोन वेगवेगळे हार आणले आहेत, हे मलाही समजले. माझा हार माझ्या वाहनात पोहोचला असून त्यातील पेढे मी रात्री खाणार आहे.
प्रा. मिलिंद जोशी – पुणेकर नुसतेच गोड बोलतात परंतु सातारकर गोड बोलत नाहीत तर गोड पेढे देऊन काम करवून घेतात. सत्कारासाठी आणलेल्या हारातील पेढे सातारच्या मोदींचे आहेत, हे मात्र कुणी सांगत नाहीत.

भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून अभिनंदन

0

मुंबई,: एनडीएचे उमेदवार व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या भारताच्या उपराष्ट्रपतीपदी झालेल्या निवडीबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे, “आपला दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभव, जनसेवेसाठीचे कार्य व लोकशाही मूल्यांबद्दलची निष्ठा या गुणांमुळे देशाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेली आपली सेवा राज्यातील जनतेसाठी लक्षात राहणारी ठरली आहे.”

तसेच त्यांनी नमूद केले की, “मा. राधाकृष्णन हे केवळ एक प्रख्यात विद्वान, उत्तम मार्गदर्शक व उत्कृष्ट वक्तेच नाहीत, तर संसदीय व विधिमंडळ अभ्यास विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या भाषणांना उपस्थित राहण्याची आणि विविध कार्यक्रमांत ऊपसभापती या नात्याने सहभागी होण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी मोठे भाग्य आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, “उपराष्ट्रपती या पदावर आपण आपल्या कर्तृत्व, दूरदृष्टी व सेवाभावाच्या बळावर संसद व लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम, न्याय्य व लोकाभिमुख बनवाल.”

त्यांनी श्री. राधाकृष्णन यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

४० वर्षांपासूनची “पुष्पक वाहिनी” ही शववाहीकेची सेवा अचानक बंद का? सुप्रिया सुळे थेट PMPML कार्यालयात …

पुणे-४० वर्षांपासूनची “पुष्पक वाहिनी” ही शववाहीकेची सेवा अचानक बंद का करण्यात आली ? असा सवाल घेऊन खासदार सुप्रिया सुळे थेट PMPML कार्यालयात गेल्या आणि पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने पीएमपीएमएलचे अध्यक्ष एस देवरे यांना याबाबत विचारणा केली .पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात बसेस रस्त्यावर आणाव्यात अशीही सुप्रिया सुळे यांनी मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या “पीएमपीएमएल”च्या अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही सेवेत कायम करण्यात आलेले नाही, या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, तसेच या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व त्यांच्या निवृत्तीवेतनाची रक्कम अदा करण्यात यावी अशीही कामगार संघटनेच्या वतीने मागणी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात कामगार संघटनेच्या पदाधिकारी व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पीएमपीएमएलचे अध्यक्ष एस देवरे यांची भेट घेतली.यावेळी खासदार सुप्रिया सूळे, प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, शिवाजीराव खटकाळे, सुनिल नलावडे, अनिता इंगळे आदि मान्यवर उपास्थित होते.

गेल्या ४० वर्षांपासून पीएमपीएमएलच्या वतीने सुरू असलेली “पुष्पक वाहिनी” ही शववाहीकेची सेवा अचानक बंद करण्यात आली आहे. पुणेकरांच्या दुःखाच्या प्रसंगाला धावून येणारी ही सेवा अचानक बंद करण्यात आली ही बाब दुर्दैवी आहे. तातडीने ही सेवा पूर्ववत सुरू करावी अन्यथा अंत्ययात्रा घेऊन पीएमपीएमएलच्या स्वारगेट, पुणे येथील मुख्य कार्यालयावर मोर्चा आणण्यात येईल असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला.

पीएमपीएमएल च्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर याबाबत उचित कार्यवाही होईल ही अपेक्षा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे.